खून

Submitted by मामी on 13 April, 2011 - 13:23

गुंजानं डोक्यावरचं ओझं दाराबाहेरच उतरवलं आणि शेजारच्या नळावर ठेवलेल्या बादलीतलं पाणी घेऊन तोंडावर हबके मारले. उरलेलं पाणी पायावर घालून ती जरा त्यातल्या त्यात ताजीतवानी झाली. उसनं अवसान आणायलाच हवं. नेहमीप्रमाणेच नशिबाला बोल लावत हातातली पिशवी घेऊन तिनं झोपडीचं दार उघडलं. उघडलं म्हणजे तसं ते उघडंच होतं. तिनं फक्त पायानं ढकललं. दार फाटदिशी उघडलं ... उघडेल नाहीतर काय? त्याचा जीव तो केवढा! दाराचा जीव? आपल्याच विचाराची तिला गंमत वाटली आणि क्षणभराकरता तिच्या रापलेल्या चेहर्‍यावर एक क्षीण हसू येऊन गेलं.

म्हाद्या रोजच्यासारखाच दारूच्या तारेत काहीबाही बरळत कोपर्‍यात लोळत पडला होता. त्याच्या पेकाटात एक जोरदार लाथ घालण्याच्या इच्छेचा तिनं पुन्हा एकदा मनातल्या मनात गळा दाबला.

"मुडदा बशिवला तुजा ****" ... गुंजा स्वत:शीच पुटपुटली.
"ए भवाने, तुज्या **** मला शिव्या देते काय?"

दिवसभर रिकामटेकडे विचार करकरून भिरभिरलेला म्हाद्या आता खुश होता. आता बायकोला शिव्या देण्याच्या दैनिक कार्यक्रमाची रितसर सुरुवात झाली होती. मनमुराद भांडण केल्यावर त्याला दिवसाचं सार्थक झाल्याचं वाटे. शिवाय कितीही शिव्या दिल्या तरी आपल्या आवडीचे गरमागरम जेवण आपल्याला मिळणार याची त्याला खात्री होतीच. गुंजाच्या हातच्या चमचमीत, तिखटजाळ जेवणाची चव त्याच्या शब्दांत उतरली होती.

"आज सांगतलं व्हतं ना तुला, त्ये करते न्हवं? बरूबर भाकरी कर हां .. रोज परमानं हंडाभर भात उकडू नगंस ..."

हे पण रोजचंच होतं.....

*********************************

कधीकाळी म्हाद्या तरणाबांड मर्द गडी होता. त्याच्या मर्दानगीवर भाळून गुंजा त्याच्यावरून आपला जीव ओवाळून टाकायला तयार होती. दोघांचा संसार सुरू झाला तेव्हा स्वर्गातला इंद्राचा दरबार त्यांच्या झोपडीत उतरला होता. तसंही आणखी काय लागतंय गरीबाला? दोन वेळा भाकरतुकडा, ल्यायला दोन वस्त्रं आणि जीव लावणारा जोडीदार. गुंजाच्या भाग्याचा हेवा तिच्या मैत्रिणींना वाटलाच नाही असं कोणीही छातीठोकपणे म्हटलं नसतं..... पण .....

एका अपघातात म्हाद्याच्या पायाला बरीच खोल जखम झाली. ती बरी होईपर्यंत चारेक आठवडे तो घरी होता. सुरवातीला नाईलाजानं आणि नंतर.... म्हाद्या बदललाच त्या एका महिन्यात. घरीच असल्यामुळे कंटाळलेल्या म्हाद्याच्या भोवती चार तशीच रिकामी टाळकी जमायला वेळ लागला नव्हताच. मग बरोबर विडी आणि त्यापाठोपाठ दारू चोरपावलानं येऊन झोपडीभर भरून गेली. बघताबघता म्हाद्याची बरं होण्याची इच्छाच नाहीशी झाली. दारूच्या नशेत धुत्तं होऊन घरी बसायचं आणि सकाळ-संध्याकाळ चवीनं खायचं ... आयुष्य चैनीत चालू झालं.

गुंजा सुरवातीला हिमतीनं घेत होती. दोघांच्या वाट्याचे कष्ट उपशीत होती. पैसा पुरत नव्हताच वर नको ते खर्च वाढले. म्हाद्याचं बदललेलं रूप आता तिला त्रासदायक होत होतं. संताप-संताप व्हायचा तिचा. म्हाद्याची जेवणातली फर्माईश तिला काचू लागली. आज काय सकाळला हेच कर आणि संध्याकाळला तेच कर. सकाळी घाईघाईनं त्याच्या आवडीचं रांधून जायचं आणि संध्याकाळीही दमून भागून आल्यावर त्याच्या जीभेचे चोचले पुरवायचे. जणू काही आता म्हाद्या केवळ त्याच्या जीभेपुरता अस्तित्वात उरला होता. चमचमीत जेवणं आणि ओरखडे लागतील असं बोलणं .... काय हे आपलं नशीब!

हल्लीहल्लीच कामावरच्या मुकादमाच्या नजरेशी गुंजाची नजर फेर धरू लागली होती. त्याचा मुद्दाम लागणारा धक्का तिला हवाहवासा वाटू लागला होता. खोपटातल्या हाटेलात बसून कळकट चहा पिताना त्याने स्वतःचे मन तिला वाचून दाखवले. ती ही हुलारली होतीच पण जित्याजागत्या नवर्‍याला सोडून दुसर्‍याचं घर बांधायला तिचं मन अजून तयार झालं नव्हतं. काही झालं तरी एकेकाळचा प्रेमाचा नवरा होता तो! मुकादम मात्र ऐकायला तयार नव्हता.

झटपट काहीतरी सोक्षमोक्ष लावायचा असा मुकादमी हिशेबीपणा करून त्यानं तिला घोळात घ्यायला सुरवात केलीच होती. दारूच्या व्यसनापायी तुझा नवरा आज ना उद्या खपणारच आहे, मग त्याला यातून सोडवण्याची जबाबदारी आपण घेतली तर काय झालं. "लै त्रास दिलाय त्यानं तुला, माज्या रानी! एकदा का माजी झालीस की तुला मी सुकानं ठिवनार हाय. गावाकडनं म्हातारी बी मागं लागलीया सुनमुक बगाया. आता गावी जाईन तं तुला घिउनच जानार म्या." त्या गोडगोड आणि गोलगोल बोलात गुंजा अडकत चालली.

मग एक दिवशी तिला गिलिटाच्या बांगड्या चढवताना, त्यानं एक छोटीशी बाटलीही सरकवली तिच्या हातात. जेवणात दे मिसळून, नाहीतर दारूच्या बाटलीतच भर. विषारी दारूनच मेला असं वाटेल सगळ्यांना .... गुंजा थरारली. इतकं सोप्पं आहे? जमेल मला? का नाही? .. पण नाहीच जमलं. तेलाच्या बाटलीच्या मागे लपवलेली ती बाटली तशीच राहिली. मुकादमाबरोबरच्या संबंधांना समाजमान्य स्वरूप देण्याचं लांबतच राहिलं.

पहिले पहिले घायकुतीला येणारा मुकादमही आता निवळला. त्याला काय बायांची कमी नव्हतीच. दुसरं उफाड्याचं पाखरू त्यानं कधीच हेरलं होतं. गुंजावर जीव जडला होता, तिला बाईल करून घ्यायला तो तयारही होता, आईला ही सून आवडली असती हे ही त्याला माहित होतं पण जर तीच कच खायला लागली तर बाप्यागड्यानं करावं तरी काय? गुंजानं हा बदल जोखला आणि मनाशी निश्वय केला......

**********************************

कोपर्‍यातला कोयता गुंजानं उचलला. कसलं जडशीळ हत्यार होतं ते! दोन पायांत दगड धरून ती मन लावून कोयत्याला धार करायला लागली. एका मोठ्या टोपात भरपूर पाणी घेऊन तिनं ते स्टोववर गरम करत ठेवलं होतं. म्हाद्यानं मागितली म्हणून बाजारातून आणलेली दारू मगाशीच त्याच्या स्टीलच्या ग्लासात भरून तिन त्याला आपल्या हातानं पाजली होती. म्हाद्याही आज नेहमीपेक्षा शांत होता. गुंजाच्या आजच्या प्रेमाच्या कृतीनं तोही गप्प झाला होता. तिचा हात हातात घेऊन त्यानं तिला पुन्हा पुन्हा आपल्या जुन्या प्रेमाची ग्वाही दिली, डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि क्षणभर गुंजा भूतकाळात हरवली. मन घट्ट करून ती उठली. आता वेळ घालवून चालण्यातलं नव्हतं. म्हाद्याला झोप लागली होती तेवढ्यात तिला सारं उरकायचं होतं. पाणीही उकळू लागलं होतचं. पिशवीतून आणलेली कोंबडी तिनं बाहेर काढली, कोयता उचलला आणि एका झटक्यात कोंबडीची मान धडावेगळी झाली.......

कोंबडीत मसाला वाटून घालताना, गुंजा मनाशीच म्हणत होती "द्येवा मला माफ कर रं... त्या मेल्या बाईलयेड्या मुकादमाच्या मोहापायी काय करणार हुते मी! नशिबानं वाट्याला आल्याला नवरा सोडून आता मला कुटच जायाचं नाय. कसा बी असंल तरी माजा म्हाद्याच माजा हाय ..."

गुलमोहर: 

मामी थोSSडीच लहान झाली कथा, पण उगिच उत्कंठावगैरे ताणायला गेला असतात तर वाट लागली असती कथेची, मला तरी आहे तितकीच चांगली वाटतेय Happy

मामि तुमिबि लिव्ह्ता
कथा ?
म्हाईत न्हवत न्ना !

छान आहे कथा
पन थोडि कळली
थोडी नाहि कळ्ली
.....................
वाचतुया

छान आहे कथा, मला संवाद जास्त आवडतात त्यामुळे संवाद असते तर अधिक खुलली असती असं वाटलं, पण ती प्रत्येक लेखकाची आवड.

छान लिहिली आहेस.
मी आधी वाचली नव्हती ही कथा. आत्ता नवीन लेखनात वर आल्यावर वाचली. आवडली Happy

शीर्षक चपखल नाहीये असं आपलं मला वाटलं.

Pages