खुळ्या भिंगोर्‍या

Submitted by नीधप on 12 April, 2011 - 23:08

sh87_0_0.jpg

चळ लागल्या झुळझुळ रेषा
त्यावरून नजर फिरवताना
मी चित्रमित्राला विचारलं
'सांग की कुठून आणल्यास ह्या वाटा
एकातएक मिसळणार्‍या
आणि एकातून एक फुटणार्‍या?
सांग ना कुठून आणलास
लख्ख पिवळा रंग
आणि पिवळट पाचोळा?'

उत्तरादाखल तो स्वचित्रातून
केवळ रोखून बघत राह्यला.
आणि चित्रागणिक अजूनच
विस्कटत, उसवत, पेटत गेला.
त्याचे लाल केस भुरूभुरू जळत होते
नजरेमधे ठिणग्या होत्या
आणि उजव्या बाजूला कानाच्या जागी जखम होती.

मग वाटत राह्यलं
आपल्याला त्याच्या वाटा कळल्यात,
पिवळट जाणीवांचा उगम हातीच आलाय..

आता त्याचं स्वचित्र
खदाखदा हसलं
पिवळा जांभळ्यात, जांभळा निळ्यात, निळा हिरव्यात
हिरवा परत पिवळ्यात उडी मारून गेला
रेषा खुळ्यासारख्या भिंगोरल्या
....
....
मी अजून भिंगोर्‍याच खेळतेय!

- नी

गुलमोहर: 

रेषा खुळ्यासारख्या भिंगोरल्या
....
....
मी अजून भिंगोर्‍याच खेळतेय!>>

मस्त... खुळ्या भिंगोर्‍याचा खेळ एकदा खेळायला लागलं की सुटका कठीण.. Happy आवडली..

खूप खूप सुंदर. मला वाटतं, यापूर्वी मिपावर वाचली होती, तेव्हाही अशीच आवडली होती आणि आताही. Happy

प्रद्युम्नसंतू (तुमचे नाव त्या साइटवर कसे बरे ऐकू येईल? :दिवा:)
लिंकबद्दल आभार. मस्त साइट आहे ती.

तुम्ही दिलेल्या लिंकवर
व्हॅन गॉफ - ब्रिटिश
व्हॅन गो - अमेरिकन
व्हेन खूफ - डच

असे तीन उच्चार दिले आहेत.
http://www.howjsay.com/index.php?word=van+gogh&submit=Submit

मी पेंटींग्ज, आर्ट, पेंटर्स अश्या बर्‍याच गोष्टींबद्दल अमेरिकेत शिकले त्यामुळे त्या काही विषयांमधल्या शब्दांचे अमेरिकन उच्चार माझ्या तोंडात बसलेले आहेत. व्हॅन गो हा त्यापैकीच एक.

या कवितेने लक्ष वेधून घेतलं. कवयित्रीला काय म्हणायचं हे बाजूला ठेवून एका वाचकाला ती कशी भावली या दृष्टीने केलेला हा रसग्रहणाचा, सौंदर्यग्रहणाचा एक प्रयत्न.

चळ लागल्या झुळझुळ रेषा

व्हॅन गॉग (काहीही म्हणा) च्या चित्रांचं इतकं बेमालूम वर्णन एकाच ओळीत, माफ करा शब्दांच्या एका फटका-यात केलं गेलं कि बस्स..

मी चित्रमित्राला विचारलं
'सांग की कुठून आणल्यास ह्या वाटा
एकातएक मिसळणार्‍या
आणि एकातून एक फुटणार्‍या?
सांग ना कुठून आणलास
लख्ख पिवळा रंग
आणि पिवळट पाचोळा?'

आणि खरंच सर्पिले आकार असावेत तशा एकात एक मिसळणा-या रेषा आणि त्या भुलभुलैयात गुंतून जाणारी नजर पाहणा-याला स्पेलबाऊंड करून टाकते त्या अस्वस्थेला आणखी काय म्हणणार ?

उत्तरादाखल तो स्वचित्रातून
केवळ रोखून बघत राह्यला.
आणि चित्रागणिक अजूनच
विस्कटत, उसवत, पेटत गेला.
त्याचे लाल केस भुरूभुरू जळत होते
नजरेमधे ठिणग्या होत्या
आणि उजव्या बाजूला कानाच्या जागी जखम होती.

त्या निर्मितीमागची अस्वस्थता, प्रेरणा ज्याच्यापर्यंत पोहोचते तो कवी...!! व्हॅन गॉग रंगातून व्यक्त होत राहीला, त्या प्रतिमा आणि रेषांमधून त्याचं अस्वस्थ मन, त्याची खंत आणि त्याचा वेडसरपणा या ओळीतून पोहोचला.

मग वाटत राह्यलं
आपल्याला त्याच्या वाटा कळल्यात,
पिवळट जाणीवांचा उगम हातीच आलाय..

आता त्याचं स्वचित्र
खदाखदा हसलं
पिवळा जांभळ्यात, जांभळा निळ्यात, निळा हिरव्यात
हिरवा परत पिवळ्यात उडी मारून गेला
रेषा खुळ्यासारख्या भिंगोरल्या

कदाचित चित्रकाराची ट्रॅजेडी माहीत असल्याने या ओळींचा पूर्वग्रह भारित अर्थ पोहोचला असावा. एका साधारण माणसाच्या प्रतिभेपेक्षा त्याची वेदना आणि सृजनशीलता नक्कीच वेगळी होती. जगावेगळा होता तो. खरंचच तो स्वतःला कळाला नाही तिथं इतरांना कसा कळणार.. तरी पण असं वाटत राहतं कि तो मुठ्ठीत आलाय आणि त्याच वेळी सर्व प्रतिमांसकट तो लांबचा वाटत राहतो. हेच तर वेड लागलंय त्याच्या चित्रांनी..

या कवितेने त्याच्या चित्रांच्या माध्यमातून केलेलं भाष्य आणि व्हॅन गॉग च्या चित्रकलेलाच एक प्रतिमा बनवणं.. !! पुन्हा पुन्हा वाचण्याशिवाय पर्याय नव्हता.

टीप : व्हॅन गॉगची गाजलेली चित्रं ही तो स्क्रिझोफेनिक असतानाची आहेत. त्याच्या चित्रांमधे झाडांची उंची आभाळाला टेकलेली दाखवलेली असते. ते त्याचं स्वतःबद्दलचं भाष्य.. गर्दीत त्याला उठून दिसायचं होतं..

प्रद्युम्नसंतू (तुमचे नाव त्या साइटवर कसे बरे ऐकू येईल? >>>>>>>
माझ्या नावात एखाददुसरा वगळता खरे सूर नाहीतच्. अगदी माझे खरे नाव 'सतीश कर्णिक'ही रुक्षच आहे. तुमच्या आयडीत मात्रा ओळीत येणारे सूरच आहेत.
असो. पहिला प्रतिसाद भीतभीतच दिला होता. मात्र कविता अतिशय आवडली. ती रसिकाला Van Gogh विषयी अधिक माहिती मिळवण्यास उद्युक्त करते.

गॉग पिकासोच्या गळ्यात गळा घालुन रडतोय आणि लिओनार्दो मोनालिसाच्या चित्रामागे लपतोय.भारी कविता.

Van Gogh या कलाकाराविषयी माहिती करून देणारा लेख मराठीतून कुठे अवेलेबल आहे का? मागे मी मुक्ता... चं एक लिखाण वाचलं होतं. पण बहुदा त्याच्या चित्रांचं तिच्या मनातलं इंटरप्रीटेशन तिने मांडलं होतं त्या लेखात.