सहजच..!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आयुष्यात ही जाणीव खूप भयानक वाटते... परतीचे दोर आपणच आपल्या हातांनी कापल्याची! कॉलेज संपतं.. सारे दहा दिशांना पांगतात... आपण मात्र ठरवलेलं असतं पक्कं की आपली मैत्री कधीच तुटू द्यायची नाही. सुरूवातीला रोज फोन, २-३ दिवसांनी भेटणं वगैरे उत्साहात होतं. मग काही काळाने वाटू लागतं की आता आठवड्यातून एकदा भेटलं तरी चालेल... त्या आठवड्याचा महीना कधी होतो समजतही नाही. मग नोकरी... नवे मित्र...! त्याचे फोन तरीही येत राहतात अधूनमधून.... कंटाळून शेवटी ते फोनही कमी होतात. आता बोलण्यातही मधे मधे gaps येऊ लागतात. मनाची समजूत घातली जाते की आता वेळ मिळत नाही... Life busy झालंय पार! नंतर कधीतरी वाटतं... आताशा आपलं बोलणं होत नाही विशेष.. पण ठीक आहे... चलता है... तो तरी कुठे फोन करतो आता! आणि मग बर्‍याच वर्षांनी कधीतरी जुना काहीतरी reference सापडतो... आपल्याला अचानक जुन्याच मैत्रीचा नव्याने उमाळा येतो आणि.... मग फेसबुकात स्वतःचाच जुना चेहरा शोधायची आणि दाखवायचीही धडपड केली जाते...
"कसा आहेस? कुठे असतोस हल्ली?"
"बरा आहे. इथेच आहे. तू?"
"मी पण"
"..."
"जमलंच नाही रे touch मधे रहायला... projects, deadlines वगैरे... "
"it's ok!"
"भेटूया ना कधीतरी"
"हो. नक्कीच..."
"..."
"चल.. नंतर बोलू. meeting आहे. bye. tc."
समोरची chat window बघता बघता निर्जीव होते. तो "नंतर" बहुधा उगवतच नाही. फक्त एक दोर कापल्याची जाणीव कुठेतरी हुळहुळत राहते...

प्रकार: 

अगदी माझ्या मनातला विषय मांडला तुम्ही...
मी पण याच विषयावर दोन दिवसापासून विचार करत होतो..
माझा एक मित्र खारघरला राहतो..आणि मी पनवेलला मला विचार करताना आश्चर्य वाटलं की आम्ही दोघं दोन वर्षात एकदाही भेटू शकलो नाही .......त्यात कहर म्हणजे आम्हाला वेळ नसतो असं ही काही नाही....
आणखी एक मैत्रिण राहते वरळीला ती माझ्या कुटूंबाला दोन वर्षापासून भेटायला बोलवतेय पण मला जमत नाही. (जमत नाही असं बोलणं ---हे चुकीच आहे, मी जमवत नाही..)
.......... पण मग आपण असं का वागतोय याचा विचार मी दोन दिवसापासून करत होतो.........
कारण ज्यावेळी आम्ही एकत्र होतो तेव्हा एक दिवस कोण भेटला नाही तर नुसतं बेचैन व्हायचं.....कॉलेजमधे कितीही गप्पा मारल्या तरी घरी गेल्यानंतर तासाभराने फोन लावले जायचे....कॉलेज संपले तेव्हा वाटले होते की आत्ता नंतर भेटणे शक्य नाही....पण नियतिने पुन्हा आम्हाला आमच्या गावा पासून ५००-६०० कि.मी.वर पुन्हा एकत्र एकाच शहरात आणून ठेवलं आहे हे आमचं भाग्य...पण आम्ही मात्र करंटे निघालो....
(या दोन दिवसात त्या दोघांनाही फोन केला ....तसा करतो कधीतरी .........)

धन्यवाद! तसं गद्यलेखन हा माझा विषय नाही फारसा. पण हे अगदी मनातलं होतं म्हणून बरं मांडता आलं असं वाटतंय.
माझ्या या लेखनाच्या निमित्ताने का होईना, तुमच्यापैकी कोणी कोणी जर आपल्या मैत्रांना पुन्हा contact केलं असेल, तर मला आनंदच आहे!

मनातली रुख रुख शब्दात व्यक्त केलीत.
पण असंही होतं--पुनःभेटीत पहिल्यासारख्या ताराच जुळत नाहीत.
पण सुरुवात करायला उद्युक्त करतेय तुमचे हे स्फुट
Happy

आपल्या जुन्या (आणि संपर्कात नसलेल्या) अनेक मित्र / मैत्रणींची, - जास्तकरून त्यांच्या पासुन दूर (परदेशात) असल्यावर खुप आठवण येते. पण अशांना contact करण्याचा काही सोप्पा उपाय कोणी सुचविल का?

खूप भावलं़ ...

मला कदाचित यासाठी सोशल साइट्सवर फार काळ राहता आलं नाही... जुने मित्र्/मैत्रीणी भेट्ले की त्या ढोबळ काही चौकशा संपल्या की पहिले पाढे ....:(