कधी कधी गाभा-यात

Submitted by zaad on 11 April, 2011 - 12:58

कधी कधी गाभा-यात देव नसतो
(आवडत्या भक्ताला भेटायला जातो?)
तरी पुजारी नेमाने पूजाअर्चा चालूच ठेवतो,
कधी देवाचं परत येणं लांबतं
तेव्हा पुजारी कदाचित विसरूनही जातो त्याची वाट पाहाणं वगैरे.
स्वयंभू स्थान, मंत्रभारला गाभारा, स्वतःची चिवट श्रद्धा
या सा-यातदेखील त्याला जाणवत राहतं देवाचं अस्तित्व
आणि यातच समाधान मानून,
देव कधी का होईना परत आलाच तर
अशी स्वतःची सांत्वना करीत
पुजारी जगत राहतो अस्सल पुजा-याचं आयुष्य...

यावेळी देवाचं परत येणं खूपच लांबलं
(आवडत्या भक्तापाशी देव इतका रमला की आपला गाभारा विसरला?)
पुजारी मरताना रिकाम्या गाभा-यात एवढंच म्हणाला,
" तुझा भक्त व्हायचे होते, पुजारी व्हावे लागले..."

कधी कधी गाभा-यात आता देव खूपच एकटा असतो म्हणे...

गुलमोहर: 

जबरी !

" तुझा भक्त व्हायचे होते, पुजारी व्हावे लागले..."

कधी कधी गाभा-यात आता देव खूपच एकटा असतो म्हणे... मस्त....!!

कुसुमाग्रजांच्या "गभारा" कवितेची अठवण झाली. Happy

वॉव !
>>>" तुझा भक्त व्हायचे होते, पुजारी व्हावे लागले..."

कधी कधी गाभा-यात आता देव खूपच एकटा असतो म्हणे..<<< सहीच !