एक विझलेली मेणबत्ती

Submitted by अनुराधा म्हापणकर on 11 April, 2011 - 02:49

नाहीतरी.. वर्ल्ड कप संपलाय..
वर्षाअखेरीची धावपळही
आणि मुलांच्या परिक्षाही..
आयपीएल तर संध्याकाळी
थोडा वेळ आहे तळव्यावर..

मलाही वाटलं तेव्हा मग
"सो कॊल्ड" भ्रष्टाचाराविरोधात
एखादी मेणबत्ती पेटवून..
उभं राहावं.. एका कळपात..

आणि ...
माहितीचा अधिकार... लोकपाल..
असं पुटपुटावं काहीबाही..

पण खोटं का बोलू...
आयुष्यात बरेच शॊर्टकट्स
मी ही मारलेत...
परवा पिवळा लाइट असताना
गाडी पळवली म्हणून दिलेली चिरिमिरी..
पैशाची निकड भागवताना..
बिलाची फाइल पास व्हावी
म्हणून केलेली हुशारी..
क्वचित कधीतरी
तिकीटं काढताना...
रांगेत केलेली घुसखोरी..

"जिंदाबाद" करायला
आवळलेल्या मुठी उघडल्या..
माझे तळवे बरबटलेले नव्हते जरी
मळलेले तरी होतेच ना !

तुम्ही म्हणाल..
त्यात काय... !!
देर आये दुरुस्त आये..
पण छे हो.. कसंच काय ?

दहावी झाल्यावर मुलांची...
कदाचित इन्जिनीअरींग-मेडीकलची
"तश्शी" पेसीट घ्यावी लागेल..
त्यासाठी मी जमवतेय नं पैसे...

पण... मला सांगा..
तुम्ही आहात का हो..
अगदी धुतल्या तांदळाचे ??
त्याच काय्ये,
विझलेली ही मेणबत्ती
तुमच्या हाती देईन म्हणते.. !!

अनुराधा म्हापणकर.

गुलमोहर: 

“पण... मला सांगा.. तुम्ही आहात का हो..............तुमच्या हाती देईन म्हणते.. !!”
…. छान .... विचार करायला प्रवृत्त करणारी कविता.

आहेत, अजूनही धुतल्या तांदळासारखं चारित्र्य जपणारी माणसं आहेत. दुर्दैवाने, ते स्वत: भ्रष्ट नसले तरी नाइलाज म्हणून त्यांना काही प्रमाणात भ्रष्टाचार सहन करावा लागतो. उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी भ्रष्टाचाराचा नि:पात करायचं ठरवलं तर आपोआपच खालच्या पातळीवरच्या भ्रष्टाचाराचा बीमोड होईल.

“माझे तळवे बरबटलेले नव्हते जरी
मळलेले तरी होतेच ना !”
असा विचार करणं मात्र साफ चुकीचं आहे.
"लाच घेणार्‍याइतकाच लाच देणाराही दोषी असतो किंवा अन्याय सहन करणारा अन्याय करणार्‍या इतकाच दोषी असतो" असले डायलॉग्स नाटक/सिनेमा/सिरीयलसाठी ठीक, पण प्रत्यक्ष जीवनात त्याला अर्थ नाही. लाच मागितलीच गेली नाही तर उगाचच कोणी लाच देईल का ? नाइलाज म्हणून एखाद्याला लाच देणं भाग पडलं तर त्याचे हात मलीन होतात हे मला तरी पटत नाही.
आपल्या लहानपणी आपल्या आईने/आजीने आपल्यावरून मीठ मोहर्‍या ओवाळून टाकून, "इडा पिडा टळो" असं म्हणत आपली दृष्ट काढली त्यावेळी आईचे/आजीचे हात मलीन झाले का ???

खरंच <<विचार करायला प्रवृत्त करणारी कविता.>>
बरेच दिवसानी तुमची कविता वाचायला मिळतीये, अनुराधाजी.

वाह. मस्तच.

भिडे काकांच्या मतांना अनुमोदन.

विषय मस्त आहे आणिक मांडणी सुरेखच. अर्थात किती तरी प्रश्न जन्म घेतात विचार करायला लागल्यावर.

एक रोगानं असे ग्रासले आहे कि त्या रोगाचे न नाव आपल्याला माहित , न त्याचे निदान्..विशेष म्हणजे ते रोग आहे, असे मानण्यास देखिल विरोध....असे किती तरी विचार भंडावून सोडतात.

असो. कविता आवडली. 'जे न देखे रवि, ते देखे कवि' - समाजाचे प्रतिबिंब!

खूपच अंतर्मुख करणारी कविता. मांडणी, विषय, आशय सगळंच सही. भिडे काकांचे विचारही पटतात, पण तरीही कुठंतरी थोडीशी बोच रहातेच अपराधीपणाची.