काल ना..चैत्रात आभाळ भरून आलेलं.. !!

Submitted by Kiran.. on 9 April, 2011 - 23:56

सकाळी बोचरी थंडी असते. दिवसा गरम होतं म्हणून चैत्रच आहे म्हणायचं..!

पण कोकिळेचं गाणं कानावर पडतंय आणि तुझं गुणगुणणं आठवतं. मी तुला म्हणायचो "ऐक ऐक ..ती म्हणतेय ..कुळीव कुळीव" आणि तू म्हणायचीस "कुहू कुहू..!"

तुझ्या आवाजातलं ते कुहू कुहू ऐकताना कानात ह्रूदय गोळा व्हायचं आणि कुठेतरी मनाच्या पडवीतल्या वीणेच्या तारा झंकारायच्या. तू न्हात असतांना गायचीस .. गाणं होतं कि नुसतंच गुणगुणणं ते..पण ते ऐकताना आसमंतातला प्रत्येक कण न कण सुरांच्या तालावर तरंगू लागायचा. आणि तू केस पुसत तुझ्या गो-या अंगावर टॉवेल गुंडाळून बाहेर यायचीस तेव्हां........!

मी संगमरवरी पुतळा होऊन अनिमिष नेत्रांनी पहात रहायचो तुला. मला असं पुतळा झालेलं पहायला तुला खूप आवडायचं.. नाही का ? मग तू खिदळायचीस. त्या हास्याची किणकिण मंदिरातल्या घंटांची आठवण करून देते न देते तोच माझ्याजवळ येऊन झटकलेल्या तुझ्या ओल्या केसांतल्या पाण्याने अंगावर शहारा येऊन मी पुतळावस्थेतून बाहेर यायचो...... आणि मग तुला मिठीत घ्यायचा मोह अनावर व्हायचा ...
तू अंगाला झटके देत माझ्यापासून दूर जायचीस..
आणि मी धडपडलो कि पुन्हा खिदळाचीस............

तुझ्या गुलाबी ओठांवर ओठ ठेवून तुला गप्प करीपर्यंत !!

ऐकतेस का ? तुझ्या आवडीचा ऋतू परततोय. चैत्रपालवी दिसू लागलीय. सकाळी सकाळी किलबिलाटाने जाग येते. एरव्ही मी फिरायला जातो तेव्हां अंधारलेलं असतं. रस्त्याने कैरीची झाडं दिसतात आणि तुझ्यासाठी पाडलेल्या कै-या आणि मागे लागलेला माळी आठवतो. चिंच या वेळेस बरीक वाकलीय.

ज्या वर्षी चिंचा येतात त्या वर्षी आंबे कमी येतात.. तू म्हणाली होतीस. आणि मी काहीतरी बोललो असलो पाहीजे कारण तू लज्जेनं लाल झालेली आणि नंतर मला मारत सुटलेलीस..

डोंगराकडे जातांना तुझ्या लज्जेचा लालिमा पूर्वेला पसरलेला असतो. मी पश्चिमेकडे चालणारा वाटसरू त्या कोवळिकीने थबकतो. मागे वळून पाहतांना उजव्या हाताची हिरवाई त्या सोनेरी स्पर्शात झळाळून उठलेली दिसते आणि पाटाच्या पाण्यातून उडणारे सोनसळी तुषार वेचून घ्यायला मन धावतं.. तू वेडी व्हायचीस ना हे असं काही पाहतांना ? आणि तुला तसं पाहतांना मी ही ?

आपल्या फिरायच्या रस्त्यावरचं वळणावरचं ते लिंबाचं झाड चांगलंच डंवरलंय आणि चाफाही बहरलाय. तुला आठवतंय का गं ?.. त्या चैत्राच्या आधीच्या महिन्यात अवेळी पाऊस आलेला आणि तेव्हां चाफ्याचा वर्षाव झालेला बघ पावसाआधी... रस्त्यावर पावसाआधी पांढरा शुभ्र सडा पडला होता. आपण त्यात पूर्ण भिजायच्या आधीच तो गायबही झालेला. याआधीही गेल्या महिन्यात एकदा असाच अवेळी पाऊस पडला होता...

आता पक्षांचे थवे त्या खुणेच्या तळ्यावर येतील. पांढ-याशुभ्र बगळ्यांची माळ आकाशात दिसू लागेल. गुलमोहराचं झाड बहरून येईल.. मी त्याला आजही गुलमोहरच म्हणतो.. तू नाही म्हणायचीस. कुठल्या तरी ब्रिटीश मुलीचं नाव घ्यायचीस. त्या नावाचं झाड म्हणे.. काय गं ते ? गुलमोहरासारखंच झाड ?? छे !मला कुठलं लक्षात रहायला ते ?? मला अशा तजेलदार फुलांच्या झाडाला आणि तुलाही गुलमोहरच म्हणायला आवडतं. .. अरे हो , तुत्तूच्या झाडाला मोहर आलाय. तुत्तूची आंबटगोड फळं आता लवकरच येतील.

उघड्या बोडक्या डोंगराला पालवी फुटतेय. पुढह्च्या काही ऋतूत हा हिरवागार होऊन जाईल . तुझा आवडता आंबा मात्र डेरेदार झालाय आताच. भर उन्हात इथल्या आंब्याखाली काय छान झोप लागते. त्याही वेळी असचं व्हायचं आताही तसचं तर सगळं आहे. तोच ऋतू आहे, तेच बदल आहेत. तेच संकेत आहेत.. पण त्यावेळी आंब्याचा मोहर धुंद करून टाकत होता तसा आता करत नाही. काल आभाळ भरून आलं होतं तेव्हां मोहर झडला आणि काळजाचा ठोका चुकला. ज्या वर्षी चिंचा येतात त्या वर्षी... तू म्हणालीच होतीस.

तुझा आवडीचा चैत्र पुन्हा तेच रूपडं घेऊन येतोय, पुन्हा एकदा !! पण काल ना...चैत्रात आभाळ भरून आलेलं...!!!

कालचा चैत्रातला पाऊस अनुभवतांना तो अतृप्त करून गेलेला पाऊस आठवला आणि तुझी भिजायची तीव्र इच्छा आठवली. कालच्या वादळी पावसात अंग अंग चिंब होतांना मन मात्र छिन्नविछिन्न झालं.. पुन्हा तो जागर झाला तेव्हां सहन नाही झाला गं कालच्या एकाच पावसात....आभाळागतच मनही दाटून आलेलं आणि गळा ओहोटीच्या लाटेगत आंत आंत खेचला जात होता..

आणि आता तर पुन्हा तोच ऋतू .., तेच बदल ...तेच संकेत .... तेच ते सगळं तुझं आवडतं..कसा सामोरा जाऊ मी या सगळ्याला ?

तुझ्याशिवाय .........!!!!

- Kiran

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकाच पावसात....आभाळागतच मनही दाटून आलेलं आणि गळा ओहोटीच्या लाटेगत आंत आंत खेचला जात होता..
......धस्स झाल एकदम्.....नि:शब्द केलत....

सावरी

खुप वेळा वाचलं तरी परत परत वाचावसं वाटतं. कुठल्याही ऋतुत वाचलं तरी बाहेर चैत्र फुलल्याचा भास होतो इतकं हुबेहुब वर्णन आहे निसर्गाचं. खुप अप्रतिम लिहिलं आहे.

बागेश्री, नानबा, लाजो, सावरी मनिमाऊ, वनराई, मंदार जोशी ...मित्रांनो मनापासून आभार आपले.
चुकून कुणाचा नामोल्लेख राहिला असल्यास क्षमस्व !

मनिमाऊ.... डब्बल थँक्स Wink

बरोबर एक वर होत आलं. या वेळी पाचगणीला सडा पडला तेव्हां मी वरंधा घाटात होतो. मग वाट वाकडी करून पुन्हा पाचगणीला गेलो... फोटो घ्यायचंही भान राहीलं नाही . माझ्यासाठी गारा शिल्लक नव्हत्या पण ते धुंद करणारं वातावरण , तो गारवा पुन्हा अनुभवला. मग महाबळेश्वरला एक प्राजक्त शोधून काढला आणि त्याखाली पडलेला पांढ-या शुभ्र फुलांचा सडा..... !!!!

युरी, यावेळी तिच चैत्राची चाहुल आहे अन असच वातावरण.. Happy आंम्ही स्टेशनला आलो कि एक तुत्तुचं झाड आहे.. माझी मैत्रिण आजच उड्या मारुन मारुन हाताला फळं लागताहेत का बघत होती पण तितक्यात गाडी आली. आजच कळली होती हि फळं न आता या लेखात वाचलं तुत्तुचं फळ.
छान लिहिलं आहेस सगळं Happy

अतिशय सुरेख! खरंच डोळ्यांसमोर उमटून गेला चैत्रबहर!
प्रत्येक ऋतूचा मनाशी अखंड संवाद चालू असतोच.. कधी जाणवेलसा कधी कळतही नाही असा...
आणि मग काही क्षण असे काही अडकून राहतात की हे असे उमटून जातात...

Pages