आभास हा, छळतो मला..

Submitted by मी मुक्ता.. on 9 April, 2011 - 09:49

मी जरा जास्तच उशीरा जन्म घेतला याची प्रामाणिक खंत ज्या लोकांकडे बघुन मला वाटते त्यातलं एक ठळक नाव म्हणजे किशोर कुमार.. आभास कुमार गांगुली.. मुख्य म्हणजे त्याच्या आवाजाने आणि त्याबरोबरच वेळोवेळी कळत गेलेल्या विक्षिप्तपणाच्या कथांमुळे. (कारण जगाने वल्ली ठरवलेल्या लोकांबद्दल आकर्षण तर आहेच पण त्यांच्यासोबत माझं सूत जरा लवकरच जमतं असा माझा अनुभव आहे.. असो..)
"कुणी विचारायला येवु नये, नाहीतर खूप चिडचिड होईल" असं वाटतं आणि "कोणी विचारायला का येत नाहीये?" असं वाटुन पण त्रागा होत असतो अशा वेळी किशोरचा आवाज पांघरुन बसणे हा कायमच एक सोयिस्कर मार्ग असतो.
शब्दांकडे अतिरीक्त लक्ष देण्याची खोड म्हणजे माझ्या आठवणींपलीकडची. मला आठवतय तेव्हापासून गाण्यातील शब्दांकडे जरा जास्तच चिकित्सकपणे लक्ष देत आलिये मी. अगदी सूरप्रधान शास्त्रिय गायकी ऐकतानापण ती चीज सगळी समजत नाही तोवर अस्वस्थ वाटत रहातं. पण शब्दांकडे लक्षच जाऊ नये किंवा त्यांना दुय्यम स्थान मिळावं अशी काही जादू आपल्या आवाजाने करुन, त्याच्या सूरांनीच तो मला ओढुन, बांधुन ठेवायला लागला तेव्हा मात्र त्याच्यापुढे हात टेकले मी.
किशोरच्या गाण्यातल्या या गद्यात घेतलेल्या छटा, म्हणजे एखादं उपहासात्मक हास्य, एखादा उसासा या गोष्टी जितक्या खल्लास करतात तितक्या कोणाच्याच नाही असा माझा तरी अनुभव आहे. "कैसे कहे हम, प्यारने हमको" या गाण्यात तो जे ऊपहासाने हसलाय ना की प्रत्यक्ष त्या सिच्युअशनला असं हास्य कोणी दिलं तर संबंधित व्यक्तीने तिथेच शरमेनं मरुन जावं.
त्याच्याविषयीच्या सगळ्या कथा म्हणजे एकेक आश्चर्यच वाटायच्या ऐकताना. आणि नंतर नंतर त्याच्याविषयी काहीही ऐकल्याचं आश्चर्य वाटलं तर त्या आश्चर्य वाटण्याचं आश्चर्य वाटावं इतकं त्याचं विक्षिप्तपण अंगवळणी पडलं. निर्माते पैसे वेळेवर न देण्याच्या भीतीने म्हणे त्याला कायम ग्रासलेलं असायचं. त्यातून त्या वाटण्यापोटी त्याने केलेले सत्राशे साठ प्रकार तर त्याहून अजब. कुठे अर्धाच मेकअप कर, कुठे शुटींगमधून पळुनच जा, कुठे निर्मात्याच्या घराबाहेर रोज सकाळी जाऊन ओरड, घराबाहेर "beware of kishore" अशी पाटीच लाव.. एक ना दोन, हजार कथा. विक्षिप्त वाटायला लावणार्‍या.. पण त्याचबरोबर त्याचं स्वत:च्याच परसदारच्या वृक्षराजीशी गप्पा मारणं, त्यांना मित्र मानणं, मधुबालासाठी इस्लाम स्विकारणं, शेवटपर्यंत तिची सोबत करणं याही काही गोष्टी त्याचा विचार करुन करुन हैराण करायला लावणार्‍या. आणि "आ चलके तुझे मै लेके चलुं" मधल्या हळुवार भावना लिहिणारा हाच झुमरु आहे हे कळलं तेव्हापासून तर मनाला चटका लावुन गेलाय तो. तो नक्की कसा होता, काय होता याचा विचार करणं हा रिकाम्या वेळेचा छंदच बनून गेला मग..
किशोर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो त्याचा मिष्किल, खट्याळ चेहरा पण कदाचित त्याच्या इच्छेप्रमाणे तो रिटायर्ड होऊन खांडव्याला जाऊन राहिला असता तर या खट्याळ चेहर्‍यामागे लपलेला "आ चलके.." लिहिणार्‍या कवीने त्याच्याकडून नक्कीच काहीतरी लिहुन घेतलं असतं.. तो थोडा अजून उलगडायला मदत झाली असती कदाचित..
कॉलेजच्या काळात असताना लागलेलं किशोरच वेड मात्र पुरं झपाटून टाकणारं होतं. तेव्हा त्याच्या बर्‍याच पैलुंचा वेड्यासारखा शोध घेतला मग. मधुबालाच्या जिवंतपणाला आणि खळखळत्या उत्साहाला तितकीच समर्थ साथ देऊ शकणारा एक किशोरच वाटायचा मला. बाकी एखादा गुरुदत्त सोडला तर सगळेच तिच्यासमोर पानी कम वाटायचे. अगदी कधी कधी देवानंदसुद्धा... ती सुद्धा त्याच्यासोबत बालिशपणा करताना फुलून आल्यासारखी वाटायची कायम मलातरी. "चांद रात, तुम हो साथ" असो, "आंखोमे तुम दिल मे तुम" असो नाहीतर "हाल कैसा है" किंवा "पांच रुपय्या बारा आना".. माहित नाही नक्की काय ते, पण त्याचं अस्तित्वच मोहून टाकणारं होतं. आजही ही सगळी गाणी दोनशे अठराव्यांदा ऐकतानादेखिल मी नाचत असते एवढं मात्र खरं.. आणि त्याची दु:खी गाणी ऐकणं हा तर सोहळाच असतो. नको नको म्हणताना ओढत नेतोच तो आपल्याला त्या मनस्थितीत.. क्षणात तोडुन टाकतो सगळ्या जगापासून..
त्याला सगळ्यात समर्पक विशेषण द्यायचं झालं तर मला एवढच सुचतं की त्याचा आवाज उमदा होता. म्हणजे खरच त्याची गाणी ऐकताना कायम असं वाटायचं की एखादं देखणं, भारदस्त व्यक्तिमत्व गातय. त्यामुळे प्रत्यक्षात त्याची बरीच गाणी पाहिली तेव्हा प्रचंड मोठा भ्रमनिरास झालेला माझा.
त्याची आवर्जुन बोलावी, उल्लेख करावी अशी गाणी भरपूर आहेत आणि एखाद्या गाण्यातल्या एखाद्या ओळीत त्याने केलेल्या करामती सांगायच्या म्हटलं तर तेच लिहित बसावं लागेल मला. पण मला वाटतं त्याचा असा शोध घेत रहाणं हेच जास्त छान आहे. एखादं गाणं शंभरवेळा ऐकुन झालेलं असतानासुद्धा अचानक नंतर त्याने एखाद्या शब्दांत केलेली गंमत जाणवते तेव्हा आपल्याही नकळत आपण त्याला दाद देवुन जातो.
तसं आज त्याच्याविषयी बोलायचं काही खास कारण नाही पण त्याच्याविषयीचं हे सगळं वाटणं मांडायचं होतं कुठेतरी.. त्याचा सूर सच्चा होता, लकबी वेड्या.. काळजाला सुगंधी जखमा करुन गेलेला मोगरा होता तो.. किशोर.. त्याच्या नावाप्रमाणेच - आभास.. त्याच्या सूरांनी वार करुन छळणारा. आणि या जखमांसाठीच कायम त्याच्या मागे मागे जायला भाग पाडणारा..

गुलमोहर: 

अगदी ,अगदी .मी तर फावल्या वेळात किशोरकुमार मधुबालाचे पिक्चर बघत असते .अगदी वेळ सार्थकी
झाल्यासारखा वाटतो .

आपल्या आधीचा लेखांचा दर्जा पाहता, कुठेतरी काहीतरी कमी पडतंय असं वाटलं..

मी ही किशोरचा फार मोठा fan असल्याने, पूर्णपणे न्याय दिला गेलाय असं नाही वाटलं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि मला लिहायला सांगितलं किशोरवर तर कदाचित एवढं पण लिहू शकणार नाही.. आपल्यात ते शब्दसामर्थ्य आहे, म्हणून अपेक्षा जास्त.. Happy

बाकी लेख छानच.. Happy

सुंदर लेख...
.... कुणी विचारायला आलं तर चिडचिड होईल.... आणि त्याच वेळी विचारायला कुणीच आलं नाही म्हणून होणारा त्रागा.... काय गमतीशीर परिस्थिती असते ना ही?

अजून वाचायला मिळावे असे वाटत असताच लेख संपला... Sad
अजून लिहा.
-चैतन्य.

त्याचा सूर सच्चा होता, लकबी वेड्या.. काळजाला सुगंधी जखमा करुन गेलेला मोगरा होता तो.. किशोर.. त्याच्या नावाप्रमाणेच - आभास.. त्याच्या सूरांनी वार करुन छळणारा. आणि या जखमांसाठीच कायम त्याच्या मागे मागे जायला भाग पाडणारा..
व्वा!

कणखर,
"रफी वगैरे गायक मला आवडतात पण किशोरवर माझे प्रेम आहे">> अगदी अगदी.. किशोरवर प्रेम आहे आणि खरं सांगायचं तर प्रेमच वाटतं त्याच्याविषयी कारण तो खूप आपलासा वाटतो.. Happy

डॉक, धन्यवाद, छानच लेख आहे तो.. Happy

निवडुंग,
Happy मलाही असच वाटलं. पण लिहावं तेवढं कमीच असंही वाटायला लागलं. सवडीने अजून निवांत लिहायला आवडेल नक्कीच.. Happy

चैतन्य दीक्षित,
अशाच गमतीशीर परिस्थितीतच लिहिलाय हा लेख पण.. Happy नक्की लिहीन..

सुनील जोग,
खूप खूप आभार..

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद...!

मी मुक्ता, खरंय किशोरबद्दल कितीही लिहू तितकं कमीच आहे. माझाही किशोर कुमार प्रचंड आवडता, अर्थात रफीही आहेच पण किशोर कुमार आणखीन थोडा जवळचा.

किशोर म्हटलं की आजही कानात येऊन म्हटल्यासारखी त्याची एक ओळ ऐकू येते. "मुस्कुराऊं कभी तो लगता है, जैस होठोंपे कर्ज रखा है.." ही लताने सुंदर गायलेली ओळ हळु हळू झिरपत जायची आत तेव्हा अचानक कधीतरी किशोरच्या आवाजात हे ऐकताना >>>>>हे काही लक्षात नाही आलं. पिक्चरमध्ये हे किशोरच्या आवाजात नाहीये.

ह्म्म्म ज्याम आवडलं. धन्स मुक्ता. >>प्रचंड आवडता असा किशोर नाहीये माझा तरीही त्याची कोई हम दम ना रहा, मेरे मेहबूब ही गाणी विशेष आवडती Happy

अजून वाचायला मिळावे असे वाटत असताच लेख संपला.. नक्कीच Happy

मुक्ता, एक आगाऊपणा करतोय, कृपया समजून घ्या!
तुमचा गुलजारवरचा लेख वाचलेला या आधी आणि आता हा किशोरवरचा लेख. दोन्ही लेख निव्वळ प्रेमापोटी आलेले , सच्चे असे वाटले. पण एक मात्र कायम जाणवत राहिलं की तुम्ही गुलजार, किशोर यांच्याबद्दल अजून लिहू शकता. किंवा तुम्हाला अजून बरंच काही बोलायचंय यांच्याबद्दल पण का कुणास ठाऊक ते राहून गेलंय. ते राहून गेलेलं पुन्हा सांधता आलं तर एक रसिक म्हणून माझ्यासाठी ती एक पर्वणीच असेल! अर्थात हे सगळं माझं वैयक्तिक मत. वि.पू. मधे मुद्दाम नाही टाकलं कारण माझ्याशी अजून कुणी सहमत असेल तर ते पहायला आवडेल मला.

सुंदर लेख मुक्ता Happy

"कैसे कहे हम, प्यारने हमको" या गाण्यात तो जे ऊपहासाने हसलाय ना की प्रत्यक्ष त्या सिच्युअशनला असं हास्य कोणी दिलं तर संबंधित व्यक्तीने तिथेच शरमेनं मरुन जावं.>>>>>अगदी अगदी Happy

अजून वाचायला मिळावे असे वाटत असताच लेख संपला...
अजून लिहा.>>>>चैतन्यला अनुमोदन. Happy

आऊटडोअर्स,
पण ते गाणं किशोरच्यापण आवाजात आहे. सिनेमाचं आठवत नाहीये ठिकसं पण मी नेहमी त्याच्याच आवाजात ऐकते हे गाणं. तसही लहानपणी ऐकलेलं हे गाणं पुढे कित्येक वर्षांनी पाहिलं. तोवर माहितीच नव्हतं कोणता सिनेमा, काय सिच्युअशन.. Happy

डुआय, झाड, जिप्सी,
ह्म्म.. मलाही अजून लिहावसं वाटतय नक्कीच पण उगीच विनाकारण लांबड लागु नये असंही वाटतं त्यामुळे वाचायला बोअर वाटुन त्या व्यक्तीचा उगीच अजाणता अवमान होवु नये म्हणुन काळजीपुर्वक कमी लिहीलय. आणि शेवटी त्यांच्या सूरप्रतिभेपेक्षा, शब्दप्रतिभेपेक्षा माझी लेखनप्रतिभा त्यांचं चित्रण करायला कायमच अपूरी वाटेल मला. पण अजून लिहायचा प्रयत्न करेन नक्कीच..

झाड, गुलजारविषयी जे सांगायचय ते सगळं त्या शेवटच्या कवितेत आलय असं वाटतं मला.. अजून काय बोलणार मी..

सर्वांचे खूप आभार.. Happy

>>झाड, गुलजारविषयी जे सांगायचय ते सगळं त्या शेवटच्या कवितेत आलय असं वाटतं मला.. अजून काय बोलणार मी..

सहमत! ( चिवट वाचकाचा एक 'तरी पण...'!! Happy )

मी मुक्ता, अगं पिक्चरमध्ये ते गाणं अनुप घोषाल व लता (दोन्ही सोलो) अशा आवाजात आहे. मी तरी कधीच किशोरच्या आवाजातलं ऐकलं नाही म्हणून विचारलं फक्त.

मुक्ता, किशोर काय, गुलजार काय... तुझ्या भाषेत, शब्दांत खूप खुलले दोघही...
<<पण मला वाटतं त्याचा असा शोध घेत रहाणं हेच जास्त छान आहे. एखादं गाणं शंभरवेळा ऐकुन झालेलं असतानासुद्धा अचानक नंतर त्याने एखाद्या शब्दांत केलेली गंमत जाणवते तेव्हा आपल्याही नकळत आपण त्याला दाद देवुन जातो>>
.... हे खरच....
पण खूपच लवकर नि:शब्दंही झाले.... असही वाटतय.
(तुझसे नाराज नही जिंदगी.... ते गाणं किशोरच्या आवाजात ऐकलेलच नाही. )

उत्तम लेख, आवडला!
पण तरीही 'झाड'ला अनुमोदन.
'तुझसे नाराज नही जिंदगी' किशोरच्या आवाजात आहे याबद्दल मला प्रचंड शंका आहे. तुझ्याकडे ते गाणे असल्यास कृपया शेअर करावे, स्वतः ऐकल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही.

मुक्ता,
अरे हो ! खरंय आऊटडोअर्स, दाद, आगाऊ यांचं. ते गाणं किशोरच्या आवाजात नाहिये. पण बराच मिळताजुळता आवाज आहे हे नक्की. मी पण पहिल्यांदा ऐकलेलं तेव्हा कन्फ्युज झालेलो.. Proud

नक्की हेच गाणं म्हणायचं होतं की, "तेरे बिना जिंदगी से कोई" ?

वरती कुणीतरी सांगितल्याप्रमाणे तो अनुप घोषाल यांचा आवाज आहे. त्यावेळी आरडी बंगालीतही काम करत होता आणि अर्थात यशस्वीही. अनुप घोषाल तिथलाच अत्यंत प्रसिद्ध गायक. 'मासूम'च्या कुठल्याच गाण्यात किशोर नाही हेही एक विशेषच.

लोक्स... Lol Sad My bad..
आणि अक्च्युअली आता मला हसावं की रडावं तेच कळत नाहीये. गेली १०-१२ वर्षे मी त्या आवाजाला किशोर समजतिये. आणि शक्यतो मी गाण्याच्या अनुषंगाने बाकीची माहिती घेते पण या गाण्याला कधीच स्र्कुटिनाइझ का केलं नसावं मी माझं मलाच कळत नाहीये.. Lol मला हसू येतय खूप आणि विश्वास ठेवण खूप अवघड आहे की ते किशोरचं नाही. कदाचित आता मला अनुप घोषाल चा शोध घ्यावा लागेल.
असो, ते गाणं किशोरचं समजुन जरी हा प्रवास सुरु झाला असला तरी बाकी सगळं सगळं श्रेय खरंखुरं त्याचच आहे.. Happy पण आता असं वाटतय की तो गद्यात बोलण्याचा पंच किशोरने कसा दिला असता? त्याच्याविषयीच्या प्रश्नात अजून एक भर.

आणि सगळ्यांचे खूप खूप आभार लक्षात आणुन दिल्याबद्दल.... Happy

आऊटडोअर्स, दाद, आगाऊ
प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.. Happy

त्या ओळीच काढुन टाकल्या मी. तिथे अजून कुठलं गाणं ठेवणं हे स्वतःशीच अप्रामाणिकपणा केल्यासारखं होईल.. Happy त्याच्या आवडत्या गाण्यातील आवडत्या जागांविषयी लिहिताना कदाचित मला कळेल त्याची माझ्या मनातली अजून खोल ओळख. तोवर ती जागा रिकामीच.. Happy

धन्यवाद..!

पिक्चरमध्ये ते गाणं अनुप घोषाल व लता (दोन्ही सोलो) अशा आवाजात आहे. >>>>>येस्स, चित्रपटात हे गाणं अनुप घोषालच्याच आवाजात आहे.

थोडेसे विषयांतर Happy

कित्येक वर्षे मला "तेरा साथ है तो मुझे क्या कमी है....." हे "प्यासा सावन" मधील गाणे "मुकेश" च्या आवाजातील वाटायचे. पण या गाण्याचे गायक होते "कमलेश अवस्थी". Happy

http://www.youtube.com/watch?v=nZt0nSgccXw

ह्हॅ.. मुक्ता, आहे तसच ठेव....
त्या गाण्याच्या बाबतीत मी ही चकले होतेच.
किशोर जळी-स्थळी दिसायला हरकतच नाही... काहींनी त्याच्यासारखं गाण्याच्या फंदात केलेत हे गोंधळ.
तुझा लेख निव्वळ आनंद देणारा आहे... त्या एका गोंधळासकट!!!

उत्तम..........लेख आवडला.....किशोरच्या आवाजाने मोहिनी घातली नाही असा जीव विरळाच.
चैतन्यशी सहमत. तुमची लेखनशैली या लेखाला अजून खूप फुलवू शकेल असे वाटते.....
एखादा मोठा लेख येउ द्यात.
Happy

दोन्ही लेख निव्वळ प्रेमापोटी आलेले , सच्चे असे वाटले. अनुमोदन!

या लेखाच्या निमित्ताने जेवढं बाहेर आलंय, त्यापेक्षा अधिक अजून आतच राहिलंय असं वाटलं मला.. Happy
शुभेच्छा!

मुक्ताबाई, सुंदर लेख. Happy
किशोर आणि रफी यांच्या आवाजाबरोबर मी कुठेही आणि कितीही वेळ राहू शकतो.
आम्ही मित्र सगळे एकत्र जमतो खास मैफिल रंगवायला. त्यात जुनी जुनी गाणी सर्वांनी मिळून ऐकणे हा एक कार्यक्रम असतो आमचा.
असाच आणखी एक आपला मायबोलीकर जो किशोरच्या आवाजाचा वेडा. चिमण. या वर्षाअखेरीस येतोय. तेंव्हा आम्ही पून्हा मैफिल जमवणार. तुम्हाला सस्नेह निमंत्रण. Happy

मला आवडणार्‍या किशोरच्या गाण्यांपैकी काही तोंडावर असलेली..
१) ठंडी हवा ये चांदनी सुहानी
२) ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा (मस्तपैकी, एखाद्या छान नदीच्या किनारी, पौर्णिमेच्या चांदण्यात, गार वारं अंगावर घेत, पाण्याची खळबळ ऐकत या गाण्याचा अस्वाद घ्यायचा. Happy यात आशाचा आवाजही सही लागलाय)
३) ख्वाब हो तुम या कोई हकिकत कौन हो तुम बतलाओ
४) कैसे कहें हम प्यार ने हमको क्या क्या खेल दिखाये
५) हम है राही प्यार के
६) सिमटीसी शरमाईसी
७) ये दिल ना होता बेचारा
८) आ चल के तुझे मै लेके चलू
९) मेरे मेहबूब कयामत होगी
१०) भवरेकी गुंजन है मेरा दिल

बाकी रफीवर लिहायच तर एक वेगळा स्वतंत्र लेख लिहावा लागेल. Happy

लेख पटकन संपला तरी आवडला.. आणि मला 'उगीच विनाकारण लांबड लागु नये असंही वाटतं त्यामुळे वाचायला बोअर' हे अगदीच पटतं.

मला बर्‍याच जणांची गाणी आवडतात पण मी किशोरचा सगळ्यात जास्त फॅन आहे. कारण त्याचं अ‍ॅक्टिंग आणि गायन.. दोन्ही अफलातून.

तुझसे नाराज नही जिंदगी.. हे गाणं किशोरचं नाही हे पहिली ओळ ऐकल्यावर लगेच कळतं.

मुक्ता...
लेखाला फ्लो छान आलाय, पण अजून फुलवता आला असता लेख.
मध्येच संपवलास असं वाटतंय..

किरू, छान पोस्ट... Happy

किशोर न आवडणारा माणूस या जगात विरळाच नाही का?

>>>>किशोर न आवडणारा माणूस या जगात विरळाच नाही का?
दक्षिणे, किंबहुना किशोर न आवडणारा माणूस या जगातून वगळा.. Proud

Pages