आरोग्यरक्षणाचा किमान अर्थ

Submitted by नरेंद्र गोळे on 7 April, 2011 - 02:20

गुरुवार, ७ एप्रिल २०११ हा जागतिक आरोग्यदिन म्हणून साजरा केला जात आहे.

काय आहे आपल्याकरता ’आरोग्याचा अर्थ’?

डॉ.आनंद नाडकर्णी यांनी अनेक दशकांपूर्वी एक पुस्तक लिहिले होते, ज्याचे नाव होते 'वैद्यकसत्ता'.

आजच्या संपन्न जीवनात वैद्य म्हणजेच डॉक्टर अनभिषिक्त सत्ता गाजवू लागलेले दिसून येतात. तर आजच्या विपन्न जीवनात वैद्य म्हणजे डॉक्टर, औषधालाही सापडत नाही अशी अवस्था प्रत्यक्षात आहे.

डॉ.नाडकर्णींनी वैद्यकीय पाशातून माणसे कशी मेटाकुटीला येत आहेत? त्यातून बाहेर कसे पडावे ह्याचे सुबोध उपाय सांगितले होते. त्याच पुस्तकाच्या सुधारून वाढवलेल्या, अलीकडेच निघालेल्या आवृत्तीचे नाव आहे 'आरोग्याचा अर्थ'. या पुस्तकात आरोग्य या शब्दाचा, आपल्याकरता खरा अर्थ काय आहे आणि तो वास्तवात कसा आविष्कृत करावा ह्याविषयी मौलिक मार्गदर्शन केले आहे.

त्यावेळी (अनेक दशकांपूर्वी) डॉक्टर अभय बंग यांनी महाराष्ट्रातील कुपोषणाचा अहवाल 'कोवळी पानगळ' या नावाने प्रसिद्ध केला होता. शहरी जीवनात अतिसेवनाने वैद्यकसत्तेच्या पाशात अडकलेले भारतीय, डॉ.नाडकर्णींनी अधोरेखित केले होते, तर दुसर्‍या बाजूस महाराष्ट्र कुपोषित बालकांच्या अपमृत्यूंनी गाजत होता. त्या विपन्नावस्थेतील बालकांना वैद्य सोडाच, पण साधे पोषणही मिळण्याची मारामार झालेली होती.

आज भारतातल्या शहरी जीवनात हृदयविकार, कर्करोग, मधुमेह इत्यादी वयपरत्वे येणार्‍या अवनतीकारक रोगांचे प्रमाण वाढते आहे. एवढेच नव्हे तर हे रोग मनुष्याला अकालीच, अल्पवयातच, गाठू लागलेले आहेत. माझ्या मित्राचा मुलगा वयाच्या साडेतीनव्या वर्षी कर्करोगाने गेला. आमचे एक शेजारी वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी हृदयरोगाने निवर्तले. आजूबाजूस कायमस्वरूपी औषधी गोळ्या दररोज घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 'मी दररोज कुठलीही औषधी गोळी घेत नाही' असे सांगणारा मनुष्यच दुर्मिळ होत चालला आहे. हे सगळे का होत आहे? काय आहेत ह्याची कारणे? त्यांचे निवारण कसे करता येईल? ह्या प्रश्नांमुळे अन्न गोड लागत नाही.

गावाकडली दिनचर्याच अशी होती की सर्व शरीराचे सतत संचालन होत राही, करावेच लागत असे. पाणी आणण्याकरता असो, जळण जमा करण्याकरता असो, उपजीविकेकरता असो, माणसाला शारीरिकदृष्ट्या सतत सक्रिय राहावेच लागत असे. जसजसे लोक उपजीविकेपाठी शहरांत येऊ लागले तसतसे त्यांना शारीरिक संचालनातील स्वायत्ततेचा संकोच झल्याचे जाणवू लागले. त्यांचे तासंतास उभ्या व बैठ्या, तसेच अत्यंत अवघडलेल्या अवस्थेतीलही नित्य प्रवास सुरू झाले. दिनचर्या बैठी आणि शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय होत गेली. प्रतीक्षाकाळ आणि मानसिक तणाव वाढतच गेले. मोकळेपणाने हात पाय ताणून आळस देणेही अवघड झाले. स्वच्छंदपणे हासणे असभ्य ठरले. मैदानी खेळ तर केवळ स्वप्न ठरू लागले. मुलाबाळांशी खेळण्यासही वेळ मिळेनासा झाला. लहान मुलांशी खेळण्यातला आनंद नाहीसा होऊन 'बेबीसिटिंग' हे दिव्य ठरू लागले.

एखादे यंत्र अमूक लाख वेळा काम करू शकते असे म्हटल्यावर, ते सिद्ध करण्याकरता त्या यंत्रास ताबडतोब, तितके लाख वेळा चालवून पाहतात. म्हणजे तो दावा खरा की खोटा ते सिद्ध होते. मात्र त्याकरता वर्षानुवर्षे थांबण्याची गरज राहत नाही. अशा चाचणीस, त्या यंत्राची त्वरित-आयुष्य-चाचणी (accelerated-life-test) असे संबोधले जाते. आजकाल जणू मानवी शरीरांची त्वरित-आयुष्य-चाचणीच होऊ लागली आहे. त्यामुळेच, वयपरत्वे वृद्धत्वी येणारे रोग माणसाला अल्पवयातच गाठू लागलेले दिसतात. म्हणूनच ह्यातून वाचण्याकरता काय करायला हवे आहे हेही उघड आणि स्पष्टच आहे.

आपल्या आजच्याच जीवनातील घटनांची गती आपल्याला शक्य असेल तितकी कमी करायची. शरीराचे जास्तीत जास्त स्वायत्त संचालन सतत करण्याचे प्रयास जारी ठेवायचे. अतिसेवनाने येणार्‍या आजारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवायचे. आणि मुलाबालांशी खेळण्यात, आनंद मिळवण्यात धन्यता मानायची. दररोजच्या जीवनात मैदानी खेळ खेळण्याची संधी हुडकत राहायची. मिळेल तशी, तेव्हा ती साजरी करायची. हे तरी आपण करायलाच हवे आहे. शिवाय, आपल्याच शरीराची आपण 'त्वरित-आयुष्य-चाचणी' घेत आहोत काय याचे सतत परीक्षण करून, त्यातून आपले मार्ग आपणच काढायचे. हाच आपल्याकरता आज आरोग्यरक्षणाचा किमान अर्थ आहे.

रोजच्याच जीवनात, काय वेगळे करावे म्हणजे अवनती टाळता येईल? हाच खरा प्रश्न असतो. त्याकरता खालील पाच कलमी धोरण कुणीही अवलंबू शकेल असेच आहे. सर्दीपडशाकरता औषध घेणे टाळणेच उचित आहे. दिनचर्येतील, आहारातील बदलाने ते साधता आल्यास पाहावे, हे उचित आहे. बघू या काय काय जमते ते. मात्र मी खालील वाक्ये रोज म्हणू शकलो, तर मला अभिमान वाटेल आणि आरोग्यरक्षणही नक्कीच साधेल!

१. 'मी दररोज कुठलीही औषधी गोळी घेत नाही',
२. 'मी दररोज कुठलातरी मैदानी खेळ खेळतो',
३. 'मी साखर, मीठ, तेल, तूप यांसारखे मानवनिर्मित संहत पदार्थ सेवनातून घटवण्याचा सतत प्रयत्न करतो',
४. 'मी बैठ्या, नेत्रावलंबी कामात व्यग्र असता नेहमीच, तासातासाला पाच-पाच मिनिटे अवस्थांतर करतो',
५. 'मी दररोज सृजनात्मक, इतरांना आनंद देईल असे एक तरी काम करतो'.

तेव्हा 'जीवनशैली परिवर्तन' तर हवेच. मात्र ते कसे असावे ह्याबाबतची ही पाच प्राथमिक उद्दिष्टे आहेत. मला सांगा तुम्हाला ही उद्दिष्टे पटतात का?
.

http://aarogyasvasthata.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधा,सरळ व अत्यंत उपयुक्त मार्ग ! धन्यवाद.
माझ्यापुरतं तरी मी आणखी एक वाक्य यात घालीन-
६. मी महिन्यातून कमीत कमी एक दिवस तरी निसर्गाच्या सानिध्यात घालवायचा प्रयत्न करतों .

लेख आवडला, पटलाही. मीही ही वाक्ये रोज म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. अजुन अपेक्षित यश आलेले नाहीय तरी प्रयत्न चालु आहेत.

इथे अस्थानी आहे तरीही एक प्रश्न विचारावासा वाटतो कारण कदाचित तुमच्याकडे ही माहिती असेल. काल रेडिओवर ऐकले की सोन्याचे वळे ग्लासभर पाण्यात ठेऊन ते पाणी १० मिनिटे उकळुन रोज सकाळी प्यायल्यास स्वास्थ्यास चांगले. हे कितपत खरे?

अनिल, बी, रैना, भ्रमर, रूनी, भाऊ, एक मुलगी, फार एण्ड, साधना आणि रावी सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

भाऊ,
६. मी महिन्यातून कमीत कमी एक दिवस तरी निसर्गाच्या सानिध्यात घालवायचा प्रयत्न करतों.>>>
चांगली भर घातली आहेत. आवडली.

साधना,
इथे अस्थानी आहे तरीही एक प्रश्न विचारावासा वाटतो कारण कदाचित तुमच्याकडे ही माहिती असेल. काल रेडिओवर ऐकले की सोन्याचे वळे ग्लासभर पाण्यात ठेऊन ते पाणी १० मिनिटे उकळुन रोज सकाळी प्यायल्यास स्वास्थ्यास चांगले. हे कितपत खरे?>>>

प्रश्न अस्थानी नाही. आरोग्यावर मात्र फारसा प्रभाव पाडणारा नाही. तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी प्यावे म्हणतात. पाण्याच्या साठवणात चांदीची वस्तू ठेवावी म्हणतात. मात्र ह्या सगळ्या गोष्टी थेट आहार-विहारादी गोष्टींइतक्या प्रभावी नसतात किंबहुना त्या त्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत. म्हणून अशा गोष्टींवर वेळ व बुद्धी खर्च न करता थेट 'जीवनशैली परिवर्तन', ते नैसर्गिक राहणीच्या निकट नेईल या दृष्टीने घडवत राहणे जास्त सयुक्तिक वाटते. जास्त उपयुक्त ठरेल याची खात्री वाटते!