की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने.....

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 April, 2011 - 03:13

राळेगणसिद्दीचा नि:शस्त्र योदधा पुन्हा एकदा उपोषणाचे शस्त्र घेवून रणांगणात उतरला आहे. पण यावेळेस तो एकटा नाही तर सामान्य जनतेबरोबर इतरही काही दिग्गजांची साथ त्याला लाभली आहे.

AnnaHazare.jpg

यावेळेस मात्र लढत केवळ राज्यपातळीवर नसून थेट केंद्रसरकारच्या विरोधात आहे. भ्रष्टाचारी राजकारणी-सरकारी अधिकारी-न्यायाधीश यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी तयार होत असलेल्या जन लोकपाल विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीतील ५० टक्के सदस्य देशातील सामाजिक कार्यकतेर् व विचारवंतांमधून नियुक्त करावेत, ही अण्णांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी मध्यंतरी त्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती. मात्र पंतप्रधानांच्या सूचनेवरून या विधेयकासाठी नेमलेल्या मंत्रीगटाशी चर्चा करूनही या मागणीबाबत नकारात्मक सूरच निघाला.

त्यामुळेच अण्णांनी थेट दिल्लीत धडक दिली. अण्णांच्या आंदोलनाला सर्वस्तरातून पाठिंबा मिळू लागल्याने हादरलेल्या पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी रात्री पत्रक काढून त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही करून पाहिला. पण आपल्या लढ्यावर ठाम असलेल्या अण्णांनी आता माघार नाही, असा निर्धार करीत सकाळी असंख्य कार्यकर्त्यांसह 'राजघाट'वरील महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेवून भ्रष्टाचाराविरुद्ध आमरण उपोषणाचे रणशिंग फुंकले आहे.

काय आहे जन-लोकपाल विधेयक?

लोकपाल विधेयक हे एकप्रकारे माहिती अधिकाराच्या कायद्याचे पुढचे पाऊल आहे. माहिती अधिकारानुसार सर्व-सामान्य जनतेला भ्रष्टाचाराची माहिती मिळवता येते, पण माहिती अधिकाराच्या कायद्यामध्ये संबंधीत भ्रष्टाचारी संस्था किंवा व्यक्तीविरुद्ध तक्रार करून संबंधितांना तुरूंगात पाठवण्याची तरतुद नाहीये. त्यासाठी म्हणुन लोकपाल विधेयकाची मंजुरी अत्यावश्यक ठरली आहे. लोकपाल विधेयक सर्वसामान्य नागरिकाला देशाचे पंतप्रधान, मंत्रीमंडळ. आमदार-खासदार तसेच संसदेच्या सभासदांविरुद्ध भ्रष्टाचाराशी संबंधीत आणि विरोधात तक्रार करण्याचा हक्क प्रदान करते. या आयोगाची निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र यंत्रणा असावी, तसेच राजकीय व्यक्ती, नोकरशहांवर भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद असावी, अशीही मागणी करण्यात आली होती. लोकपाल विधेयकाचा पुरस्कार करताना तत्कालीन प्रशासकीय सुधार समीतीने मान्य केले होते की यामुळे न्यायव्यवस्थेबद्दल सर्वसाधारण नागरिकांच्या मनात निर्माण झालेली अविश्वसनीयतेची भावना दूर होवून त्यांचा यंत्रणेवरील, न्यायावरील विश्वास दृढ व्हायला मदतच होइल. त्यानुसार पहिले लोकपाल विधेयक १९६८ मध्ये ४ थ्या लोकसभेच्या दरम्यान म्हणजे मांडण्यात आले होते तिथे ते पासही झाले पण राज्यसभेत मात्र त्याला स्विकृती मिळाली नाही. त्यानंतर सलग १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ मध्ये तेच लोकपाल विधेयक पुन:पुन्हा मांडण्यात आले. पण ते तसेच बासनात गुंडाळाले गेले. अद्यापही ते मंजूर झालेले नाही. त्यामुळेच सध्या भ्रष्टाचारविरोधी कोणताही कायदा नाही.

गेल्या वर्षी काही नव्या मागण्यांसह जन लोकपाल विधेयकासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आणि डिसेंबर २०१० मध्ये नव्या विधेयकाचा मसुदा सरकारला सादर करण्यात आला.

आत्तापर्यंत मांडण्यात आलेल्या विधेयकांपेक्षा या वेळच्या "लोकपाल विधेयकाचे" वेगळेपण काय?

महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी लोकपाल विधेयक हे "जन-लोकपाल विधेयक" या नावाने मांडण्यात आले आहे. यावेळेस विधेयकात काही नवीन मागण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. आता भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत केंदीय पातळीवरील मंत्र्यांचा समावेश व्हावा, ही या नव्या विधेयकाची मुख्य मागणी आहे. मात्र मसुदा बनविण्याच्या संयुक्त समितीत ५० टक्के सरकारी प्रतिनिधी तर ५० टक्के नागरिक आणि बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व असावे असा आग्रह अण्णा हजारे, किरण बेदी इत्यादींनी केला आहे आणि उपोषणातील हा प्रमुख मुद्दा आहे.

जन-लोकपाल विधेयकातील काही महत्त्वाच्या मागण्या...

- भ्रष्टाचारविरोधी नवी आणि प्रलंबित खटल्यांचा तात्काळ निवाडा व्हावा.
- भ्रष्ट अधिकार्‍यांना हटविण्याचे अधिकार
- कोणत्याही न्यायाधीशाच्या, अगदी भारताच्या सरन्यायाधीशांच्याही विरोधात थेट चौकशी आणि कारवाई करण्याचा अधिकार मिळावा. सध्या कोणत्याही न्यायाधीशाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारताच्या सरन्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागते.
- लोकपाल समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा हस्तक्षेप असू नये.
- दोषी व्यक्तीला पाच वर्ष ते जास्तीत जास्त आजन्म कारावासाची शिक्षा असावी. सध्या ही शिक्षा सहा महिने ते सात वर्ष इतकी आहे.

विधेयकाचा मसुदा कोणी तयार केला?

यामध्ये श्री. शांती भूषण, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, निवृत्त न्या. संतोष हेगडे, अ‍ॅड. प्रशांत भूषण, माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह प्रभुतींचा समावेष आहे.

निवड समितीमध्ये दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष, सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश, हायकोर्टाचे दोन वरिष्ठ मुख्य न्यायाधीश, भारतीय वंशाचे नोबेल विजेते, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष, भारतीय वंशाचे दोन मॅगसेसे पुरस्कार विजेते, भारताचे महानियंत्रक आणि लेखापाल इत्यादींचा समावेष असावा अशी मागणी या जन-लोकपाल विधेयकाद्वारे करण्यात आली आहे. याविधेयकानुसार लागू केल्या जाणार्‍या कायद्यांन्वये संबंधीत कायद्यात भ्रष्टाचार नियंत्रण कायदा, गैरव्यवहार या अंतर्गत केल्या गेलेल्या तक्रारींचा समावेश करण्यात यावा तसेच या गैरव्यवहारांची माहिती देणार्‍यांना संरक्षण देण्यात यावे अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. काही राजकीय पक्ष, नेते, समाजातील मान्यवर तसेच प्रत्यक्ष सामान्य जनतेचाही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा लाभल्याने पहील्या दिवसापासूनच हे विधेयक चर्चेत आले आहे.

यावरची सरकारची प्रतिक्रिया मोठी मजेशीर आहे. सरकार म्हणते की त्यांच्याजवळ विधेयकांच्या प्रस्तावाची प्रतच उपलब्ध नाही. केंद्र सरकार यावर्षी पुन्हा एकदा लोकपाल विधेयक संसदेत सादर करणार आहे. सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय सल्लागार समितीसमोर विचारार्थ मांडले जाईल. पण मसुदा समितीत लोकांच्या थेट समावेशाला पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणजेच केंद्र सरकारचा यांचा ठाम नकार आहे.

आ. आण्णा हजारे यांनी आत्तापर्यंत वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आमरण उपोषणाचे शस्त्र उभारले आहे, पण ते यशस्वी ठरल्याची उदाहरणे खुप कमी आहेत. आण्णांनी उपोषण पुकारले की कोणीतरी नेता, मंत्री त्यांची भेट घेतात. नेहमीप्रमाणे आश्वासने देवून आण्णांना त्यांचे उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाते आणि नंतर दिलेली आश्वासने कालौघात सोयिस्करपणे विसरली जातात. त्यामुळे यावेळेस आण्णांनी केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवून आपले उपोषण मागे घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यावेळी किरण बेदी, स्वामी रामदेव, श्री श्री रवीशंकर, स्वामी अग्निवेश, मॅगसेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल, कपिल देव, मनेका गांधी इत्यादींचाही या आंदोलनात समावेष / पाठींबा असल्यामुळे यातून काहीतरी चांगले निष्पन्न होइल अशी आशा करायला हरकत नाही.

शेवटी एक सामान्य नागरिक म्हणून आण्णांना एवढेच सांगावेसे वाटते...

"आण्णा, तुमच्या समाजसेवी वृत्तीबद्दल, तुमच्या देशभक्तीबद्दल आम्हा सर्वसामान्यांच्या मनात कायमच आदर होता आणि राहील. फक्त यावेळेस ही लढाई नेहमीप्रमाणे लुटूपुटीची ठरू नये तर आर-पारचा लढा सिद्ध व्हावी हिच अपेक्षा आणि शुभेच्छा. तूम्ही आवाज द्या, आमची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, फक्त नेहमीसारखा अवसानघातकीपणा करू नका.

"इस बार अब हो ही जाये, या तो हम नही या फीर भ्रष्टाचार नही...! भ्रष्टाचार समुळ बिमोड ही कल्पना फारच भाबडी आणि अशक्य वाटली तरी निदान त्या दृष्टीने सुरूवात तर झालीये आणि आम्ही खात्री देतो की या वेळी शेवटपर्यंत आम्ही प्राणपणाने तुमच्या सोबत लढत राहू !"

संदर्भ:

१. अण्णांचा 'आवाज' देशभर

२. भ्रष्टाचाराविरोधात तलवार परजा!

३. खोट्या आश्वासनांना बळी पडणार नाही!

४. जन लोकपाल विधेयक म्हणजे काय?

५. लोकपाल विधेयक (विकीपिडीया)

जयहिंद ! जय महाराष्ट्र !!

हा लेख माझ्या जालनिशीवर इथे उपलब्ध आहे.

विशाल कुलकर्णी.

गुलमोहर: 

हे सर्व कितीही चांगलं असलं तरी पुर्वी प्रमाणे आजकाल उपोषणांना कोणी दाद देत नाही हो.
मागे अण्णांनी सुरेशदादा जैन यांच्या विरोधात उपोषण सुरू केले होते तेव्हा जैन यांनी देखील लगेच अण्णांच्या विरोधात उपोषण सुरू केले होते. हा म्हणजे खेळ असल्यासारखे झाले आहे.
गांधींचा जमाना राहिला नाही. तेव्हा ब्रिटीशांना थोडा तरी धाक वाटत होता यांच्या उपोषणाचा,
पण आता आपल्याच लोकांचे राज्य आहे, ते कसले बधतात या सार्‍या उपायांना.
असो यातुन खरेच काही चांगले घडले तर चांगलेच आहे.

'लोकपाल' विधेयकाला ५०-५० मान्यता मिळणार हे नक्की असलं तरी RTI कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांसारखं इथेही पहायला नको मिळूदेत हिच इच्छा.

'लोकपाल' विधेयकाकडे भ्रष्टाचारविरोधातली एक सशक्त क्रांती या नजरेने पाहून ते मंजूर होण्यास पाठींबा तर हवाच पण जेव्हा जेव्हा हे शस्त्र उचललं जाईल तेव्हा सर्वसामान्यांचा एक खंबीर बॅकअप हवाच असे मला वाटते.

गांधींचा जमाना राहिला नाही. तेव्हा ब्रिटीशांना थोडा तरी धाक वाटत होता यांच्या उपोषणाचा....
--> क्षमस्व, पण आपले विधान साफ चूक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.
महात्मा गांधी एक व्यक्ती म्हणुन निश्चितच चांगले होते, पण राष्ट्रनेता म्हणुन निश्चितच नाही. ब्रिटीशांना महात्मा गांधी चा धाक कधीच वाटला नाही, ऊलट ब्रिटीशां नी महात्मा गांधी चा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी वेळोवेळी करून घेतला, धाक वाटला तो भारतीयांनाच, तोही निव्वळ महात्मा गांधीवंर असलेल्या असीम आदर आणि प्रेमाचा.

राहिले अण्णां विषयी, त्यांचे हेतु निश्चितच चांगले आहे, पण ऊपोषणाचा त्यांनी पोरखेळ करून टाकला आहे. राजकारणी त्यांना बाहूल्याप्रमाणे हाताळतात, आणि अण्णां त्यांना हाताळु देतात. थोडी फार प्रसिद्धी मिळाली, सत्कार झाले की ह्यांचे शस्त्र म्यान होतात.

राळेगणसिद्धी च्या संदर्भात झालेले अनेक आरोप अजुनही अनुत्तरीत आहेत.

गैर समज नसावा, अण्णां विषयी मला निश्चितच आदर आहे, पण नेता कसा असावा ते सुभाषचंद्र बोस यांचेकडुन शिकावे असे मला वाटते.

जर हे आंदोलन खरोखरच कळ्कळीने होत असेल आणि शेवटापर्यंत जाणार असेल तर ह्या आंदोलनाला माझा मना पासुन पाठिंबा असेल

<जर हे आंदोलन खरोखरच कळ्कळीने होत असेल आणि शेवटापर्यंत जाणार असेल तर ह्या आंदोलनाला माझा मना पासुन पाठिंबा असेल>
पाठिंबा असेल .... म्हन्जे नक्कि काय करणार ..... पाठिंबा नसेल.... म्हन्जे नक्कि काय करायला पाहीजे.....
दिनेशदा .... १००% खर.....

पाठिंबा असेल .... म्हन्जे नक्कि काय करणार ..... पाठिंबा नसेल.... म्हन्जे नक्कि काय करायला पाहीजे....
-->
कुठलेही आंदोलन जन आधाराशिवाय होत नसते.

पाठिंबा नसेल...म्ह णजे..माझ्यासारख्या भावना असणारे लोक शांत बसतील.

पाठिंबा असेल...म्ह णजे..माझ्यासारख्या भावना असणारे लोक विविध प्रकारे आंदोलन तडीस जावे ह्या साठी शक्य तेवढ्या प्रकारे मदत करतील, ऊदा. फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट अश्या आंतरजालावर विविध ग्रुप्स तयार करून पुर्ण जगातुन ह्या आंदोलनाला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करता येईल.
शाळासोबती शी संपर्क साधुन प्रत्यक्ष - अ प्रत्यक्ष सहभाग वाढवता येतील...........
अजुन बरेच काही करता येईल, हे जे मला शक्य वाटले आणि आठवले तेव्हढे मी लिहीले....

अण्णा नेहमीच एकटे पडतात. निदान यावेळी तरी त्यांना लोकांची साथ लाभावी.....
--> १००% सहमत, पण लोकांनी ह्या आधी ही भरपुर वेळा अण्णां ना साथ दिलीय, पण अण्णां च विजय द्रुष्टी पथात आला की शस्त्र म्यान करतात.

तूम्ही आवाज द्या, आमची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, फक्त नेहमीसारखा अवसानघातकीपणा करू नका............ पुर्णपणे सहमत.

>>>> पण मसुदा समितीत लोकांच्या थेट समावेशाला पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणजेच केंद्र सरकारचा यांचा ठाम नकार आहे. <<<<<

या नकारास "तात्विकदृष्ट्या" माझा पाठिम्बा आहे.

या उपोषणातुन काय अन किती साध्य होईल की त्यानिमित्ते कॉन्ग्रेसेतर विरोधी पक्षान्चे हिताचे राजकारण होईल हे काळच ठरवेल. परन्तु एकन्दरीतच "उपोषणबिपोषणाच्या" कृत्त्यास माझा काडीचाही तात्विक पाठीम्बा नसल्याने या उपोषणाचे बाबतीतही अण्णान्चे समर्थन मी करु शकत नाही.
सॉरी.

.

आजपर्यन्त आण्णा कशा कशासाठी उपोषणाला बसले.....त्यात त्याना किती यश मिळाले.....किती वेळेस त्यानी अवसानघातकीपणा केला......उपोषणाच्या मुद्यान्च पुढे काय झाल.....कोणाकडे याचे details आहेत का?....

<जर हे आंदोलन खरोखरच कळ्कळीने होत असेल आणि शेवटापर्यंत जाणार असेल तर ह्या आंदोलनाला माझा मना पासुन पाठिंबा असेल> ईथे शेवटापर्यंत याचा मला अर्थ नाही कळाला....

पाठिंबा आत्ता ताबडतोब हवा आहे.... आणि त्यासाठी चे प्रयत्न पण ......

अश्या हजारो आण्णांवर टिका करणार्‍यांच्या 'पैदासी'ला आळा-बिळा घालत बसण्यापेक्षा आपल्या हातून काही चांगलं होईल का यावर भर द्यावा. .............

हिडीस भाषा वापरण्याने आपण कोणीतरी श्रेष्ठ ठरतो हा आपला शुद्ध गैरसमज आहे....
आमच्या हातून काही चांगलं घडत असेल / आहे तर त्याचा वापर आम्ही प्रसिद्धी साठी का म्हणुन करावा? आणि का म्हणुन त्याची यादी वाटत बसावी ते सुद्धा लायकी नसलेल्या लोकांना?

आण्णा अश्या टिकेस पात्र होतात हाच त्यांचा कार्याचा गौरव आहे..... माझ्या वरील प्रतिक्रीयेत मी आण्णां बद्दल एकही उणा शब्द बोललो आहे असे मला वाटत नाही. मला व्यक्तिशः त्यांच्याबद्द्ल आदरच आहे, पण जेव्हा तुम्ही लोकभावनेला हात घालाल, लोकांकडुन सहभागाची अपेक्षा कराल तर लोकांची ही काही साधारण अपेक्षा असेलच ना. एका हाताने टाळी वाजत नाही, संमिश्र प्रतिक्रीया ह्या येणारच, त्यासाठी आपली पातळी दाखवण्याची गरज नाही.

तेव्हा भाषेचा वापर सुसंस्क्रूत व्यक्ती प्रमाणे करावा ही विनंती, अर्थात हे फक्त सुसंस्क्रूत व्यक्तींनाच लागु पडते. आणि सुसंस्क्रूत व्यक्ती च्या वागण्यात, बोलण्यात त्यांचे संस्कार दिसुन येतातच.

असो.

.

अण्णा नेहमीच एकटे पडतात. निदान यावेळी तरी त्यांना लोकांची साथ लाभावी.>>>

दिनेशदा, १००% सहमत !!

सुशांतजी, प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही उत्तर सुचवा ना. वाद हे सोलुशन होवु शकत नाही. मदतच म्हणाल तर खुप वेगवेगळ्या मार्गाने करता येइल, प्रत्यक्ष रस्त्यावर न उतरता देखील.
बर्‍याच लोकांना अजुन लोकपाल विधेयक काय होते, त्याचे मुद्दे, त्याची धोरणे काय आहेत हेच माहीत नाही. ते मुद्दे जर आपण लोकांपर्यंत पोचवु शकलो तरी खुप मोठ्या प्रमाणात मदत होवु शकेल.

लिंबुदा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या उपोषणाने फारसे काही साध्य होणार नाही याच्याशी मी देखील सहमत आहे. पण प्रथमच आण्णा एकटे नाहीयेत. आणि पाठींबा केवळ उपोषणाला द्यावा अशी अपेक्षा नाहीचेय. उपोषण हे केवळ एक निमीत्त आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात आण्णांनी जो आवाज दिलाय त्याला पाठींबा द्यावा अशी अपेक्षा आहे.

विशाल, उपोषणाच्या निमित्ताने, जरी मिडीयाला चघळायला काही दिवस टुकटुकीत बातम्या मिळाल्या तरी त्यामुळेच या विधेयकाचा (गरजेचा) विषय "सोप सेरियल्स्च्या गदारोळातूनही" जनसामान्यान्पर्यन्त पोचेल, अन त्यान्च्या रोजच्या रोज जगण्याच्या "बिझी शेड्युल" मधे देखिल कुठेतरी कणभर जरी तपशील त्यान्च्याकडून ग्रहण केला गेला तरी ते एक फार मोठेच काम होईल यात मात्र मला जराही शन्का नाही. उपोषण व त्यानिमित्ते विधेयकास मिळणार्‍या प्रसिद्धिचा हा फायदाच म्हणावयाचा.

[माझे वरील मत हे, माझ्या "लोकांच्या थेट समावेशाबद्दलच्या" मतास तसेच कायम ठेऊन, अन तरीही असेच मान्डले आहे. तसेच उपोषणबिपोषण वगैरे उपायान्वर माझा विश्वास नाहीच, पण आता ते करताहेतच तर त्यातुन काय काय चान्गले नि:ष्पन्न होऊ शकेल त्याचा अन्दाज वरील मतात वर्तवू पाहिलाय. उलट माझ्या मते तर अण्णान्सारख्या व्यक्तिस "उपोषण" करावयास बसावे लागणे यासारखी दुसरी कोणतीच लज्जास्पद गोष्ट "जनसामान्यान्करता" नाहीये! कारण याच जनसामान्न्यातुन "सरकार" तयार होत अस्ते. सबब अण्णान्ना त्यान्च्या प्रयत्नात शुभेच्छा]

(एडिटलेल विशेष काय नवत रे भो)

उलट माझ्या मते तर अण्णान्सारख्या व्यक्तिस "उपोषण" करावयास बसावे लागणे यासारखी दुसरी कोणतीच लज्जास्पद गोष्ट "जनसामान्यान्करता" नाहीये! कारण याच जनसामान्न्यातुन "सरकार" तयार होत अस्ते. सबब अण्णान्ना त्यान्च्या प्रयत्नात शुभेच्छा

लिंबुदा, हे तु किंवा मी इथे लिहू शकतो अथवा मनातुन व्यक्त होऊ शकतो एवढाच तुझ्या-माझ्यासारख्यांच्या रोल काय? कितीही अमूल्य आणि विचार करून केलेलं तुझं माझं मतदान यशस्वी ठरलं किंवा ठरतयं असं तुला किंवा मला वाटलं आहे का? अर्थात चर्चा ही व्हावीच, चांगलं-वाईट हे आपल्या मनाला पटेल तेव्हाच आपण प्रतिसाद देत असतो किंवा अश्या गोष्टींवर बोलत असतो.

शेवटी काय 'तण मुळासकट उपटून टाकलं कि कधीही चांगलं पण ते उपटणं, तण किती माजलयं यावरच अवलंबून असतं ना?' कारण कंबरेपर्यंत वाढलेल्या तणाच्या मुळाशी हात घातला कि 'दंश'च अनुभवयास मिळतो. तेव्हा आता तण कंबरेएवढं झालय आणि माज गळ्यापर्यंत पोहचलाय असं म्हणायला हरकत नाही.

हे माझं मत.

*'माज' हा शब्दप्रयोग खटकला असेल तर त्याचा सौम्य किंवा एकंदरीत पोष्टीशी अर्थ जुळवून घ्यावा.

विशाल .... मी वाद घालन्यासाठी प्रश्न विचारले नाहित्.....आणि माझ्या काहि प्रश्रानामुळेच मला प्रफुल्ल कडुन वरिल काहि link मिळाल्या .....
आजपर्यन्त आण्णा कशा कशासाठी उपोषणाला बसले.....त्यात त्याना किती यश मिळाले.....किती वेळेस त्यानी अवसानघातकीपणा केला......उपोषणाच्या मुद्यान्च पुढे काय झाल.....तुझ्याकडे याचे details आहेत का?....असतिल तर please share करा की राव्....हे काय वाद घालण्या साठी नाहि तर सध्या / पुढे आपल्याला काय काय करता येइल हे पहाणे आहे....

आंदोलन हवेच आहे !!

आणि यशस्वी होणार हे ही नक्कीच आहे !!

फक्त आंदोलना नंतर अण्णा " महात्मा " होवु नयेत म्हणजे मिळवलं

अण्णा आणि त्यांच्या कार्याबद्दल जो असायला हवा तो आदर मला पण आहे.
पण हल्लीच्या काळात उपोषणाच्या मार्गाने मला नाही वाटत काही बदल घडू शकेल.
घडला तर चांगलेच आहे, पण शक्यता कमी वाटते, मी वर दिलेले सुरेश जैन यांचे उदा. पहा.
आजकालच्या राजकारणी लोकांना कशाचेच काही नाही. निर्लज्जपणे म्हणतील की आम्ही अगदी स्वच्छ आहोत आणि ते लोकांना कळावे म्हणून आम्ही पण उपोषण करू.
खरेतर गांधींच्या उपोषण अस्त्राचे फाळणी नंतरच्या दंगलीच्या काळातच बारा वाजले होते.
नोआखाली, कलकत्ता इ. ठिकाणी दंगे थांबावेत म्हणून उपोषण चालू केले.
तिकडे नेहरू भेटायला गेले. लोकांचा जमाव नेहरूंकडे धावला आणि म्हणाला,
गांधींच्या उपोषणाचे आम्हास कौतुक नाही. पंतप्रधान या नात्याने तुम्ही काय उपाय योजना करणार आहात ते सांगा.
तात्पर्य : उपोषण हे हत्यार तितकेसे प्रभावी नाही. दुसरा काही पर्याय शोधला पाहिजे. (राजकारण्यांची रसद तोडावी का ?) Happy

फक्त आंदोलना नंतर अण्णा " महात्मा " होवु नयेत म्हणजे मिळवलं>>>> १००००००% अनुमोदन !

सुशांत अहो गुगलवर आण्णा हजारे म्हणून सर्च देवून बघा. खुप काही मिळेल. पण सद्ध्या गरज भुतकाळातली मढी उअकरून काढायची नाहीये. आण्णांच्या या आंदोलनाच्या निमीत्ताने आपल्याला संधी मिळालीय. या संधीचे सोने करायलाच हवे.

विशाल, चांगली माहिती दिलीस. अण्णांच्या ह्या उपक्रमाला मनःपूर्वक पाठिंबा व शुभेच्छा!!!
एरवी आपण भ्रष्टाचाराविरूध्द नुसती बोंब ठोकतो, आज हा माणूस किमान त्यावर अ‍ॅक्शन तरी घेत आहे. त्यांच्यापाशी उपोषणाचे आतापर्यंत लोकशाहीतील मान्य अस्त्र आहे त्याचा ते वापर करत आहेत. मला वाटतं, त्या अस्त्राचा उपयोग ह्यावेळी आयत्यावेळी तलवारी म्यान करून होणार नाही, कारण अण्णांच्या बरोबर इतर बरीच मंडळीही ह्यात सामील आहेत.

भ्रष्टाचाराचा खातमा करण्याचे इतर काही उपाय तुम्हाला माहित असतील तर ते करा. किंवा तसे उपाय अण्णांना वा या चळवळीशी संबंधितांना सुचवा. पण जे कोणी लोक भ्रष्टाचाराविरूध्द उभे ठाकले असतील त्यांचे पाय खेचू नका. कृपया.

विशाल खूप छान लेखा लिहिला आहेस विशेषतः लोकपाल विधेयक नक्की काय आहे आणि आण्णांचा लढा नेमका काय आहे हे तू छान मांडलम आहेस. आण्णांच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा आणि परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना की, त्यांचे हे व्रत सुफळ संपूर्ण होवो ..बाकी आपण निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा प्रार्थना केली तर आण्णांच्या कार्याला बळ मिळेल असे मला वाटते.

महेश, मग प्रार्थना करा की हा लढा यशस्वी होवो. निगेटिव्ह विचार करण्याचा काहीच उपयोग होणार नाही. कोणाला पर्याय सुचत असतील तर ते करा, पण दिवसेंदिवस अगदी ओकारी येण्याइतपत बोकाळलेल्या ह्या भ्रष्टाचाराला संपवायचेच आहे हे सर्वांनी मनाशी घ्या राव!! Happy

अरूंधती, निगेटीव्ह विचार करून आणि न करून काही उपयोग नाहीये, कारण भ्रष्टाचार भारताच्या एवढा रक्तात भिनला आहे की, त्या करता एक तर सर्वांना उडवायचे किंवा सर्वांचे मतपरिवर्तन करायचे असे दोनच उपाय आहेत. त्यातला पहिला उपाय तात्कालिक आहे, दुसरा उपाय जरा प्रभावी आहे, पण वेळ खुप लागेल.

Pages