इ.स. १०००० - भाग ८

Submitted by बेफ़िकीर on 5 April, 2011 - 04:47

अचानक प्लॅटफॉर्मपाशी एक शटल आलेले पाहून गोप दचकलाच. १६९९ मात्र निराश झाली. कारण खुद्द १६२२ हा तिचा साहेब त्या शटलमधून स्वतःच्या 'स्पेसमधील फार्महाऊस'वर आलेला होता. १६९९ ने सर्व संदेश बंद केलेले असल्याने ४६३४४ चे नेमके झाले काय ही काळजी पृथ्वीवासियांना भेडसावत होती. तिथे काहीतरी भयंकर झालेले असले तर आपल्यालाही धोका होऊ शकतो असे वाटून कुणी तेथे जात नव्हते. पण १६२२ ला धाडस करणे क्रमप्राप्तच होते. कारण ४६३४४ सारख्या अतीश्रेष्ठ मानवाला जगवणे आणि या जगाला इतकी चांगली भेट देणे हे त्याचे महान कर्तृत्व नष्ट झाले की काय या काळजीने तो ग्रासला होता. त्याने शेवटी सगळ्यांचा विरोध मोडून काढत एक शटल घेतले आणि तडक येथे आला. पृथ्वीवरून येथे पोचायला त्यला तब्बल दहा तास लागले. कारण वाटेत एका ठिकाणी एक धूमकेतू आला होता. धूमकेतूपासून किमान पाच हजर किलोमीटर अंतरावरून प्रवास करण्याचा कायदा होता. धूमकेतू येण्याची चिन्हे सिस्टीमवर आधीच दिसायची. तसे झाले की शटलची दिशा बदलावी लागायची. १६२२ ला तर ती इतकी बदलावी लागली की तो चक्क गुरूच्या एका चंद्राजवळ जाऊन उलट्या दिशेने या स्पेस प्लॅटफॉर्मवर पोचला. एक तर आधीच झालेला उशीर आणि त्यात पृथ्वीवासियांशी सगळे संबंध सोडून निवांत बसलेले १६९९ आणि ४६३४४ पाहून तो भडकलाच.

त्याने टिचक्या वाजवायच्या ऐवजी आता टाळ्याच वाजवल्या. १६९९ बराच वेळ डोळ्यांवरून बोटे फिरवत रडत होती. तिने स्वतःची चीप केव्हाच १६२२ ला दिलेली होती. त्याने नक्कीच दिड हजार पॉईंट्स तरी कापलेले असणार हे तिला माहीत होते.

गोप मात्र निवांत होता. नाहीतरी आठ हजार वर्षे कसेबसे जगलोच आहोत, आता कुणी चिडले काय अन कुणी आपल्याला मारले काय, फरक काय पडतो अशी त्याची भूमिका आता झालेली होती. १६२२ ने टाळ्या वाजवल्या आणि १६९९ डोळ्यांवरून बोटे फिरवतीय याचा अर्थ त्याच्या लक्षात आला. त्यातच १६९९ ने स्वतःची चीपही १६२२ ला दिलेली पाहून गोपला खात्री पटली की १६९९ ला १६२२ ने चांगलेच दमात घेतलेले असणार आणि आता तिचे काही खरे नाही. तेवढ्यात १६२२ म्हणाला...

१६२२ - काय चाललंय काय??

१६९९ अजूनही डोळ्यावरून बोटे फिरवत होती.

१६२२ - उत्तर दे... संपर्क का तोडलास??

१६९९ - चुकलं माझं... खूप पॉईंट्स कापू नका...

१६२२ - हा एक्स्पायर झाला असता तर??

१६९९ - नाही नाही... मी व्यवस्थित ठेवलं होतं त्याला...

१६२२ - तू कोण त्याला व्यवस्थित ठेवणारी? त्याला मी जिवंत ठेवलेला आहे... पुन्हा चीप दे...

१६९९ - नको... आता नका घेऊ पॉईंट्स... एकच चूक झाली माझी...

पण १६२२ ने काहीतरी वेगळेच केले असावे. त्याने स्वतःच्या चीपवरून काहीतरी संदेश पाठवला असावा. कारण अचानक १६९९ ची चीप वाजू लागली. १६२२ हा तिचा साहेब तांत्रिकदृष्ट्या तिच्यापेक्षा कितीतरी प्रगत होता. त्याने तिच्या चीपला हातही न लावता तिचे बरेच आणखीन गुण कापले होते.

आता मात्र १६९९ ने डोळ्यावरून बोटे फिरवणे बंद करून चक्क दोन्ही हात डोळ्यांवरच धरून ठेवले.

१६२२ - आक्रोश कसला करतेस? तू काय केलं आहेस याची कल्पना आहे का तुला? माझ्या संपूर्ण आयुष्याचे ध्येय एकच होते ते म्हणजे प्राचीन मानवसंस्कृतीचा अभ्यास करून आजच्या मानवजमातीला योग्य दिशेवर नेणे! या महान कार्यात तू कित्येक तासांचा अडथळा आणलास. कित्येक तास तू याला घेऊन याच प्लॅटफॉर्मवर अवकाश बघत बसलेली आहेस. ६४१ वाल्यांचे एखादे मिसाईल आले असते तर? तुला माहीत आहे की मंगळापर्यंत मिसाईल पाठवू शकतात. आपण अजून तितके प्रगत नसलो तरी ते आहेत. अशा परिस्थितीत तू माझ्याशी सर्व संपर्क बंद करून इथेच बसलीस याला घेऊन! हा तुझा गुन्हा रेकॉर्ड झालेला आहे. यापुढे तुला मिळणारा प्रत्येक पॉईंट तुला तुझ्याजवळचे दोन पॉईंट देऊन मिळवावा लागेल. याचा अर्थच असा की तू जितके गुण आता घेशील त्याच्या दुप्पट गुण गमावशील. आणि एक दिवस सर्व गुण संपले म्हणून तुला नष्ट व्हावे लागेल आपल्या कायद्याप्रमाणे! आणि म्हणून तू जर एकही गुण घ्यायचाच नाही असे ठरवलेस तर 'गुण न मिळवलेल्या दिवसात' तुझे प्रत्येकी तीस हजार गुण कमी होतील. याचाच अर्थ तुझ्याकडे असलेले नऊ लाखाच्या आसपासचे गुण संपायला जास्तीतजास्त '३० पृथ्वीचे दिवस' लागतील. संपलीस तू १६९९, आता संपलीस तू!

१६९९ ने आता आक्रोशाच्याही पुढची पातळी गाठली. तिने स्वतःच्या कपाळावर स्वतःच्या हाताने बुक्या मारायला सुरुवात केली. चेहरा मात्र भावहीनच होता. १६२२ सुद्धा खूप रागावलेला असूनही त्याच्या चेहर्‍यावर रागीट बहव नव्हतेच. आवाजही चढलेला नव्हता. केवळ तीव्र आशयाची वाक्य त्याच्या तोंडातून बाहेर पडत होती. त्यामुळे इसवीसन २००० च्या संस्कृतीत, जेथे देहबोली व चेहर्‍यावरील हावभावांना प्रत्यक्ष शब्दांइतकेच महत्व असायचे, त्या संस्कृतीत राहिलेल्या गोपला पहिल्यांदा हे समजलेच नाही की १६२२ फार प्रचंड भडकलेला आहे व कपाळावर बुक्या मारणे या कृतीतून १६९९ विलाप करत आहे. पण 'संपलीस तू, आता संपलीस' हे वाक्य ऐकल्यावर मात्र गोपला जाणीव झाली.

गोपने विचार केला. १६९९ ने त्याला अतिशय व्यवस्थित ठेवलेले होते. तिने त्याला त्रास तर काहीच दिला नाही, उलट उद्बोधक माहितीही सांगितलि होती आणि मुख्य म्हणजे अवकाशाचे इतके मनोहर दर्शन घडवले होते की आठ हजार वर्षे जिवंत राहिल्याचे सार्थक झालेले होते. अशा १६९९ ला १६२२ ने इतका त्रास द्यावा की तिने आक्रोशाच्याही पुढची पातळी गाठावी हे गोपला आवडले नाही. तेवढ्यात १६२२ म्हणाला...

१६२२ - चल आता.. चला दोघेही पृथ्वीवर... आता तुला एका चौकात उभी करून लोक तुला मुद्दाम स्वतःचे पॉईंट्स देतील.. त्याचबरोबर तुझे दुप्पट पॉईंट्स कमी व्हायला लागतील... संपूर्ण मानवजातीचा गुन्हा केलेला आहेस तू... ८०-११ चा अनुयायी असलेल्या एका श्रेष्ठ व अतीप्राचीन मानवाला तू होल्ड अप केलेले आहेस... तुझे गुण टप्याटप्याने कमी होताना सगळे जण बघतील आणि आनंदाने सहा सहा इंच उड्या मारतील... तुला स्वतःचे नष्ट होणे स्वतःच्या डोळ्यांनी बघावे लागेल.. चल आता दोघेही...

गोप - ए गप रे??? तिच्यायला मगाचपासून कटकट ऐकतोय.. तू कोण बे उपटसुंभ???

अख्खे अवकाश आपल्याभोवती गर्रकन फिरत असून आपल्याच 'स्पेस प्लॅटफॉर्मवर' आपल्यालाच उद्देशून ८०-११ चा हा थोर अनुयायी विचित्र भाषा वापरत आहे असे १६२२ ला वाटले. तो नखशिखांत हादरून ४६३४४ कडे पाहात होता. १६९९ चीही अवस्था तशीच होती काहीशी! ती थिजून ४६३४४ कडेच पाहात होती. मात्र तिला आश्चर्य याचे वाटत होते की ४६३४४ १६२२ ला इतका झापू शकतो??

गोप मात्र निवांतच होता. बापाने किरकिर्‍या पोराला झापावे आणि दुसर्‍या क्षणी तंबाखूचा बार लावावा तसा तो निवांत होता. तसे पाहिले तर नात्याने तो १६२२ चा 'शेकडो वेळा खापर' पणजोबा लागत होता. ते दोघे मात्र हादरलेले होते. गोपला ते जाणवले तसे त्याला आणखीनच अवसान आले.

गोप - हिचे काय पॉईंट बिईंट घेतले ते देऊन टाक इथल्याइथे... डोक्याला ताप नाही द्यायचा.. बिचारी एकटी बाई अवकाशात फिरतीय.. काही स्त्री दाक्षिण्य बिक्षिण्य आहे का नाय?? आ? अन तो कुठला कायदा आहे दुप्पट पॉईंट बिईंट कापण्याचा त्याच्या बैलाला घो... ते सगळे कायदे पृथ्वीवर ठेवायचे... चल आता हिचे पॉईंट देऊन टाक अन कण्णी काप... सूट पृथ्वीवर आल्या पावली... आपलं.. काय ते?? हां!! पावली नाय शटली शटली... आल्या शटली परत जा...

बोलताना चेहर्‍यावरही हावभाव येणारा आणि हातवारेही करणारा हा पहिलाच माणूस पाहिला होता १६२२ ने!

स्तब्धपणे थिजून १६२२ गोपकडे पाहात होता.

गोप - काय बघतो?

१६२२ - मी आपल्याला न्यायला आलोय

गोप - मी इथेच थांबणार आहे...

१६२२ - इथे अनेक अडचणी येतात, पृथ्वीवर आपण सुरक्षित राहाल..

गोप - काय अडचण बिडचण नाहीये इथे.. निवांत बसू देत जरा मला..

१६२२ - सगळे आपली वाट पाहतायत...

गोप - का?

१६२२ - कारण आपण महामानव आहात

गोप - कोण म्हणलं?

१६२२ - आम्हाला सर्वांना ते ज्ञात आहे..

गोप - महामानव म्हणजे काय?

१६२२ - मी आपल्याला फक्त सव्वाशेच वर्षे जिवंत ठेवले, पण त्यापुर्वी आपण ७८७५ वर्षे स्वतःहून जिवंत राहिलेला होतात... हे ८०-११ च्य वरदानाशिवाय शक्य नाही.. त्यांनीच त्यांचा अंश आमच्या या पिढीला दिला आहे... चलावत आपण...

गोप - हा ८०-११ कोण आहे?

१६२२ - ही आपली एक लीलाच म्हणायला हवी... चलावत...

गोप - तू हो पुढे...

१६२२ - मी पुढे होऊन कसे चालेल? तुम्ही येणार कसे?

गोप - ही आहे ना, ही आणेल मला..

१६२२ - तिची तेवढी ताकद नाही.. तिला एक शटल लागेलच... शटल मीच देऊ शकतो..

गोप - आधी हिच्या पाँईट्सचे काय करतोस सांग मला..

१६२२ - आपला आदेश कळावा...

गोप - तो कुठला कायदा बियदा आहे तो हिला लागू करायचा नाही...

१६२२ - शक्यच नाही तो कायदा हिला लागू होणे...

गोप - हिचे आत्ता कापलेले सगळे पॉईंट्स दुपटीने हिला आत्ताच्या आत्ता मिळायला हवेत....

१६२२ - प.... पण...

गोप - ८०-११ कडून पाहिजे का हा आदेश??

१६२२ - नाही नाही... आपण म्हणालात हे पुरेसे आहे... दे ग १६९९ तुझी चीप..

गुणांची देवाणघेवाण झाली तशी १६९९ च्या मनात आनंदाची कारंजी उडू लागली.

गोप - थोडे मलाही दे पॉईंट...

१६२२ - आपल्याला कशाला? आपण तर खुद्द ८०-११ चे अंश!

गोप - तुमचं काय सांगता येतंय? उद्या मला भूकंपास जबाबदार हरवाल.. थोडे गुण दून ठेव मला..

१६२२ - सगळेच घ्या..

गोप - छे छे.. एक दिडशे बास झाले..

१६२२ - अजून?

गोप - हे शटल इथेच ठेव.. आम्हाला वाटले की आम्ही निघू इथून..

१६२२ - आणि मी कसा जाऊ?

गोप - तू पोचल्यावर शटल पाठवून दे...

१६२२ - शटल असं वाटेल तिथे स्वतःहून नाही जात..

गोप - ते बघ तुझं तू... एक शटल लागेल आम्हाला...

१६२२ - एका मानवाला पाठवेन मी दोन शटल घेऊन.. एक इथे ठेवेल अन एकात बसून तो परत येईल..

गोप - आणि हीजी महिला आहे तिचा यानंतर एकही पॉईंट जाणार नाही अशी तरतूद कर...

१६२२ - ते माझ्या हातात नाही.. ते एजंट बघतात..

गोप - एजंटाला सांग मी सांगीतलंय म्हणून.. निघतोस ना आता??

१६२२ - हा काय लगेच निघालो... १६९९.. मला माफ कर..

१६९९ थिजलेली होती. जे झाले त्यावर विश्वास बसू शकत नव्हता तिचा! आता तिला गोपने स्वत:इतकेच महत्वाचे करून ठेवलेले होते. पृथ्वीवर गेल्यावर ती सम्राज्ञी ठरणार होती. आपल्या आयुष्यात असा प्रसंग येईल असे तिला कधीच वाटले नव्हते.

१६२२ आपल्या शटलमधून परत निघाला होता. शटल सुसाट वेगाने दूर जाऊ लागलेले होते. तो वेग पाहून खरे तर गोपची छातीच दडपलेली होती. या चांदण्याचा धबधबा असलेल्या रंगीन अवकाशात ते शटल आता एका बिंदूप्रमाणे दिसू लागलेले होते. गोप टक लावून शटलकडे पाहात होता. काय हा मानवाचा वेग! या वेगाने तर हे लोक लवकरच नेपच्यून ग्रहाच्याही बाहेर पोचायचे एखादवेळेस! मानवाच्या तांत्रिक प्रगतीचा तो अशक्य आविष्कार पाहताना गोप खिळलेला होता.

शटल ज्या क्षणी दिसेनासे झाले तेव्हा कुठे त्याचे लक्ष १६९९ कडे गेले.

१६९९ ! मंगळाच्या कक्षेत आणि गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात फिरत असलेल्या या स्पेस प्लॅटफॉर्मवर आता गोप आणि १६९९ दोघेच होते. आजूबाजूला होते अवकाश! निळ्या, तांबूस, हिरव्या, लालभडक, सोनेरी, जांभळ्या आणि चंदेरी रंगांच्या चांदण्यांचे! ते अवकाश बघण्यासाठी किमान एक जन्म सेपरेट मिळावा असे अवकाश! फक्त त्या अवकाशातील सितार्‍यांमध्ये एकाच रंगाचे सितारे नव्हते. ते म्हणजे गुलाबी! पण ती कमतरता १६९९ च्या गालांनी भरून काढली होती.

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये केशर आणि चेरी घालून त्यांचे मिश्रण मोरपीसाने गालांवर अ‍ॅप्लाय करावे तसे तिचे गाल आत्ता दिसत होते. गोपला अवकाशाकडे बघावे की १६९९ च्या गालांकडे ते समजत नव्हते. त्यातील नेमके काय अधिक सुंदर हे ठरवता येत नव्हते. पहिल्यापासूनच त्याला १६९९ अद्वितीय सुंदर आहे हे ज्ञात होते. पण आत्ता १६२२ येऊन गेल्यानंतर आणि जो प्रकार झाला तो झाल्यानंतर तिच्या चेहर्‍यावर इसवीसन २००० मधील हनीमूनला निघालेल्या नववधूचे भाव आले होते. त्यामुळे ती एक चांदणीच भासत होती. अवकाशात असलेल्या अब्जावधी चांदण्यांना फिके पाडणारी एक जिवंत चालतीबोलती चांदणी!

कित्तीतरी वेळ तिचे दोन्ही ओठ तिने विलगच करून ठेवलेले होते. आत्ताच्या प्रकारामुळे झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी याशिवाय कोणतेही माध्यम तिला ज्ञात नव्हते. आपल्या दोन्ही हातांची दोन्ही पहिली बोटे रिस्पेक्टिव्ह गालांवरून तिने कित्येक वेळा फिरवली होती या काही मिनिटांच्या अवधीत! आपण ४६३४४ मुळे खूप महत्वाच्या बनलो आहोत आणि त्याला अतिशय आवडलेलो आहोत या दोन्ही विचारांमुळे आलेली स्त्री सुलभ शरम व्यक्त करण्यास तिच्याकडे याशिवाय कोणतेही माध्यम उपलब्ध नव्हते.

अमेरिकेच्या अध्यक्षालाही प्राप्त होणार नाही असे मधुचंद्रासाठी सर्वात उत्कृष्त असे ते स्थळ होते. आणि १६९९ या अद्वितीय अप्सरेबरोबर तिथे होता कोण तर एक सरळ साधा मध्यमवर्गीय आणि सामान्य माणूस गोप!

गोप - ओठ मिटा की? तळ्याबाहेर येऊन काठावर मगरी तोंड उघडून बसतात तश्या काय बसताय?

गोपला यापेक्षा सुंदर उपमा सुचणे शक्य नव्हते. तसा बिचारा होता तो!

१६२२ मात्र ओठ मिटू शकत नव्हती.

गोप - अडकलेत का काय ओठ?

गोप अजून २००० मधलेच प्रश्न विचारत होता. त्या प्रश्नाचे हसू आल्यामुळे तर १६९९ ने पूर्ण जबडा दोन्ही हातांनी उघडला आणि पुण्यातल्या रस्त्यांवर दुचाकीवरून जाताना हालते तशी मानही हालवायला सुरुवात केली.

गोप - किती यांत्रिक हासता हो तुम्ही?

बयाच वेळाने हसणे संपल्यावर १६९९ ने विचारले.

१६९९ - आम्ही यांत्रिक हासतो म्हणजे?

गोप - हे काय हासणं आहे?

१६९९ - मग तुम्ही हासता?

गोप - सरळ आपलं असं! हा हा हा हा हा हा हा

१६९९ - हा आवाज का करता हासण्याचा?

गोप - आपोआपच होतो तो ...

१६९९ - आम्हाला आवजाशिवायही हासता येतं..

गोप - ही प्रगती आहे की अधोगती कोण जाणे!

१६९९ - किती मस्त बोललात हो तुम्ही १६२२ ला?

गोप - हां मंग? च्यायला मी बरा असा कुठेही जाईन??

१६९९ - पृथ्वीवर जावसं नाही वाटत??

गोप - मगाशी वाटत होतं.. आता नाही वाटत...

१६९९ ने पुन्हा गालांवरून बोटे फिरवली...

गोप - तुम्ही का लाजताय? काही विशेष??

१६९९ - माझ्यासाठीच इथे थांबलायत ना?

गोप - नाही म्हणण्याची हिम्मत आहे का माझी??

१६९९ - मला खूप वाटतं तुमच्याबद्दल..

गोप - मलाही माझ्याबद्दल खूप वाटतं...

१६९९ ने पुन्हा ओठ विलग केले..

१६९९ - तुम्हालाही तुमच्याचबद्दल वाटतं?? ... माझ्याबद्दल काही नाही वाटत??

गोप - वाटत की? नाही कसं?

१६९९ - काय वाटतं?

गोप - की तुमचं बोलणं ऐकावं, या चांदण्यांच्या भाऊगर्दीत तुमच्याकडेच बघत बसावं, इथून कुठे जाऊच नये वगैरे असं!

गोपने कुठल्या साहसाने हे वाक्य टाकलं त्याचं त्यालाच माहीत!

१६९९ ने मात्र हातांचे पंजे खसाखसा घासले स्वतःच्या गालांवर!

१६९९ - मग बोलला नाहीत कधीच??

गोप - कधी बोलणार? भेटून दोन चार तर दिवस झालेत आपल्याला..

१६९९ - एकही दिवस झालेला नाही.. कारण आपण कोणत्याच ग्रहावर त्यच्या एक दिवसाइतके राहिलेलो नाही आहोत.. भूक लागलीय??

गोप - भयंकर!

१६९९ - काय खाणार??

गोप - पाव शॅम्पल मिळेल का?

१६९९ - म्हणजे काय?

गोप - काय खाणार या प्रश्नाला काही अर्थ आहे का? तीन तर प्रकारच्या गोळ्या आहेत तुमच्याकडे फक्त..

१६९९ - असंच काही नाही काही! आलेच मी...

मिनिटातच १६९९ परत आली. एका कसल्याश्या गोळीला ती बोटांनी कसलीशी पावडर चोपडत होती. एक भन्नाट चविष्ट सुगंध आसमंतात पसरलेला होता. तो त्या गोळीचा किंवा पावडरीचाच असणार हे गोपला समजले.

१६९९ ने दिलेली ती गोळी खाताच गोपला प्रचंड जेवल्यासारखे वाटू लागले. १६९९ मात्र नवर्‍याला आणखीन एक पोळी घालावी असे पाहावे तशी गोपकडे पाहात होती.

१६९९ - अजून हवीय??

गोप - छे?? काहीतरी काय! भस्म्या झालाय काय मला??

१६९९ - भस्म्या?

गोप - खात सुटण्याचा रोग!

१६९९ पुन्हा हासली.

गोप - तुम्ही नाही घेतलंत काही?? निदान अर्धी गोळी तुम्ही तरी खायचीत..

१६९९ ने गालांवर बोटे फिरवत सांगीतलं!

१६९९ - ही गोळी आम्ही नसते खायची.. पुरुषांची असते ती..

गोप - का?

१६९९ - कळेल आता तुम्हाला..

गोप - तुम्ही अश्या सारख्या लाजूबिजू नका हो? दहा वेळा चेनकडे पाहिलं मी माझ्या.. आयला.. इथे कुठली चेन म्हणा! इथे तर अवकाश स्पेशल युनिफॉर्म!

१६९९ अजूनही टक लावूनच गोपकडे पाहात होती. कसल्याश्या अपेक्षेने पाहावे तसे!

आणि काही क्षणातच गोपचा चेहरा बदलला. त्याने आता टक लावून १६९९ कडे पाहायला सुरुवात केली. त्याला काहीसे जाणवत होते की एका परस्त्रीकडे असे पाहू नये वगैरे! पण त्यावर आता आपले नियंत्रण राहात नाही आहे हेही जाणवत होते. हिने आपल्याला पलंगतोड पानासारखे काही चारले की काय असाही एक विचार अस्पष्टपणे त्याच्या मनात तरळून गेला. तो विचार तरळून गेल्याबद्दल त्याला पश्चात्तापही झाल्याचे त्याला अस्पष्टपणेच जाणवले. मात्र आता त्याला १६९९ मध्ये आशा दिसू लागली होती.

गोप - काय हे लावण्य!

१६९९ ने बोटे गालावर फिरवली.

गोप - जणू इंद्राने शिल्पकार खात्यातील प्रत्येक कामगाराला दुप्पट इन्क्रिमेन्ट देऊन या कामी लावले असावे असे...

१६९९ - हंहं??

गोप - काय हे चेहर्‍यावरचे अप्रतिम भाव

१६९९ - ....??

गोप - जणू मेनकेने विश्वामित्राशी फिक्सिंग करावे आणि त्याचा तपोभंग करावा..

१६९९ - या कसल्या उपमा??

गोप - या आमच्यावेळेस असायच्या...

१६९९ - आणि??

गोप - आणि असं वाटतंय की तुमच्याकडे पाहात राहावे..

१६९९ - मग पाहा की?

गोप - मग पाहतोयच की? तुम्ही अशा दूर का?

१६९९ - जवळ कशाला यायचं??

गोप - मग प्रेम व्यक्त कसं करणार??

१६९९ - जवळ येऊन कसं काय करणार? प्रेम तर नुसते आविर्भावांनी व्यक्त होते..

गोप - म्हणजे??

१६९९ - हे असे ओठ केले की त्याचा अर्थ मी तुमचे एक पुसटसे चुंबन घेतले..

गोप - तुम्हाला काही वाटत नाही का हो असं बोलायला?? भर अवकाशात एका पुरुषाचा विनयभंग करता कसा काय??

गोळीचा परिणाम संपलेला दिसत होता. १६९९ अत्यंत दु:खी झाली. आता ४६३४४ आपले सगळे गुण कापणार असे तिला वाटू लागले.

तिने मान खाली घातली.

गोप - नाही नाही.. म्हणजे आमच्यावेळेस ना?.. असं सगळं पुरुष बोलायचे.. तुम्ही आता स्वतःच बोलताय..

१६९९ - का? बायकांनी का नाही बोलायचे??

गोप - संस्कृतीचा हास नाही का होणार?

१६९९ - इथे एकच संस्कृती आहे.. ६४२ ची संस्कृती.. आता बायकांना स्वातंत्र्य आहे...

गोप - आमच्यावेळेसपेक्षा प्रगतच म्हणायचात तुम्ही..

१६९९ - तुमच्यावेळेस प्रेम कसे करायचे??

गोप - ऑफीसमधून घरी जाताना कधी एकदा बायकोला पाहतोय असे वाटायचे. घरी गेल्यागेल्या चहा, पाणी, पोहे, उपमा सगळे बाजूला ठेवून नवरा बायकोला प्रेमाने जवळ घ्यायचा.. मग बायकोलाही जरा वाटायचे की तिच्यावर त्याचे प्रेम आहे... मुलेबाळे घरात असतील तर हे जमायचे नाही.. मग नुसतेच सूचक बोलण्यातून ते दाखवत राहावे लागायचे..

१६९९ - इथे कुठे आहेत???

गोप - काय??

१६९९ - तेच... मुले.. अन बाळे..???

गोप - इथे कशी अस....

'अवकाशात कशी मुलेबाळे असतील' हा गोपचा प्रश्न अर्धाच राहिला. कारण त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. की १६९९ असे सुचवत आहे की इसवीसन २००० शैलीचे प्रेम करा माझ्यावर!

आशाची मनातल्या मनात माफी मागून गोप धीम्या पावलांनी १६९९ च्या जवळ गेला.

काय प्रसंग होता तो! १६९९ ने स्वतःच्या अंगावरच्या सर्व चीप्स डिटॅच केलेल्या होत्या. गोपच्या अंगावरच्या चीप्स तिने बाजूला केल्या होत्या.

मंगळ आणि गुरू ग्रहांच्या मध्ये असलेल्या एका स्पेस प्लॅटफॉर्मवर दोघे होते. लाखो किलोमीटर अंतरावर दुसरा सजीव नव्हता. यांचे प्रेम बघायला तेथे केवळ रंगीबेरंगी चांदण्या होत्या. त्यांच्याहीमधून आता आधीपेक्षा अधिकच रंग उधळवले जात होते. अवकाशाचे अत्यंत कमी तापमान आता किंचित वाढू लागले होते. १६९९ च्या लावण्यावर एक अद्वितीय निखार चढलेला होता. गोप हरवल्यासारखा तिच्या जवळ जाऊन तिला पाहात होता. आता ती गालांवरून बोटे फिरवत नव्हती. कारण तिलाही समर्पणाचीच ओढ लागली असावी.

गोपने १६९९ ला जवळ घेतले. ८००० वर्षांनंतर प्रथमच तो अशा धुंदावणार्‍या स्पर्शाची जादू अनुभवत होता. अंगात बळ नसल्याप्रमाणे आणि जणू अस्तित्वाआठीच ४६३४४ वर अवलंबून असल्याप्रमाणे १६९९ त्याला बिलगलेली होती. अवघे अवकाश थबकून या मीलनाच्या सोहळ्याच्या आरंभाकडे बघत होते. तिथल्या अवकाशाला निर्मीती झाल्यापासून असा सोहळा बघायलाच मिळालेला नव्हता. निसर्गाची सर्वात अद्भुत किमया निसर्ग स्वतःच पाहात होता.

गोपने १६९९ ची हनुवटी वर उचलली आणि स्वतःचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. त्या चुंबनाच्या शब्दातीत जादूमुळे गोपचे स्वतःचे डोळे मिटले. मात्र १६९९ टक्क डोळ्यांनी गोपकडेच बघत त्याच्या चुंबनाला प्रतिसाद देत होती. गोपने जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याला ते जाणवले.

गोप - डोळे मिटायचे असतात..

१६९९ - कशाला??

गोप - त्या शिवाय खरे चुंबन होत नाही...

१६९९ - असं आम्ही कधीच करत नाही.. हे करण्याची जरूरही नाहीये..

गोप - का?

१६९९ - तीस वर्षांपुर्वीच असा शोध लागलेला आहे की किसिंगची भावना देणारी एक गोळी निर्माण होऊ शकते... आम्हाला कुणाला तसे वाटले की आम्ही ती गोळीच खातो...

झटकन हात सोडले गोपने! कोरड्या ठण्ण आणि अत्यंत बदललेल्या नजरेने तो १६९९ कडे पाहू लागला..

१६९९ - काय?? ... काय झाले??

गोप - तीस वर्षांपुर्वी शोध लागला म्हणजे?? तू... तू किती वर्षांची आहेस??

१६९९ - ऐंशी???

सर्वच स्वप्नांचा चक्काचुराडा व्हावा तसा चरकून गोप बाजूला झाला...

१६९९ - काय झाले तुम्हाला??

गोप - तू... तू माझ्या आईपेक्षाही जास्त वयाची आहे..

१६९९ - हो... पण मग???

गोप - मग काय मग्?? इतक्या वयाच्या बाईवर कुणी प्रेम करतात का??

१६९९ - आणि... मग... ८००० वर्षाच्या म्हातार्‍याला कुणी जवळ येऊ देईल का??

पांढर्‍या फटक चेहर्‍याने गोप १६९९ कडे पाहात असतानाच तिने आणखीन एक बॉम्ब टाकला.

"तुम्ही कुणीही नाही आहात, माझ्या चतुराईने प्रवासात मी तुमच्या खांद्यावरची चीप वाजवल्यामुळे सगळ्यांना तुम्ही ८०-११ चे अंश आणि अनुयायी वाटत आहात... हे सगळं मी माझ्या स्वतःसाठीच करत होते.. पण त्याच प्रक्रियेत माझे तुमच्या निरागसपणावर प्रेम बसले.. मी जगाला खरे सांगितले तर १६२२ तुम्हाला भयानक अंत देईल.. पण त्याचं काय आहे... की.... "

गोप कापायला नेण्यात येणार्‍या बकर्‍याप्रमाणे पाहात राहिलेला होता...

" इसवीसन २००० पेक्षा आजचा, इसविसन १०००० चा मानव अधिक चांगल्या स्वभावाच आहे... म्हणून वाचलात... "

गुलमोहर: 

हे असे ओठ केले की त्याचा अर्थ मी तुमचे एक पुसटसे चुंबन घेतले..>> Lol

गोप, कापायला नेण्यात येणार्‍या बकर्‍याप्रमाणे पाहात राहिलेला होता... >> 'भुषणराव' भारीच उत्सुकता लागली आता पुढच्या भागाची.

" इसवीसन २००० पेक्षा आजचा, इसविसन १०००० चा मानव अधिक चांगल्या स्वभावाच आहे... म्हणून वाचलात... " >>> क्या बात है...! Happy

छान लिहिलाय हा भाग.. लवकर संपला अस वाटलं, गोप आता काय करणार??? १६२२ ला सर्व कळलं तर काय होईल त्याच???.. प्रचंड उत्सुकता....!!! वाट पाहतेय, पु.ले.शु

Finally

हातीच्या मारी, तो अंश नाहीच्चे होय...
मला वाटलं तो आता त्याच्या दैवी गुणांचा कसा कसा वापर करून घेईल ते वाचायला मज्जा येईल...पण छ्या...तुम्ही राव आमच्या नायकाला पार एकदम अंधातरी करून टाकला...
एवढा माज केला त्याने...

बेफिकीर,
तुम्ही लिहता सुंदर, एक एक प्रसंग मस्त रंगवता.
पण तुच्या प्रत्येक कथेत नकारात्मक भाव, उदासिनता ठायी ठायी भरलेली असते.
जणु जगात काही सकारात्मक घडतच नाही याचा उतारा म्हणजे तुमच्या कथा.
तुमचा नायक म्हणजे नुसतं शिकस्त खाणारा.... कठीण परिस्थीतीवर मात करणे तुमच्या कुठल्याच नायकाला जमले नाही..... याचं मुळ कारण तुमच्या अंगी मुरलेली नकारात्मकता असावी. तुमच्या कथेतीला नायकाची होणारी शिकस्त म्हणजे तुमच्यातील नकारत्मक भावनेचा प्रतिबींब. एक अप्रतिम कथा नकारत्मकतेचा बळी जाते आहे.... एवढेच.
मी फक्त तुमच्या कादंब-या वाचायला ईथे खातं उघडलं, प्रत्येक भागाची आतुरतेने वाट पाहतो. त्यामुळे तुम्हाला हक्काने मनातलं सांगत आहे.

(स्पष्ट लिहल्या बद्दल क्षमा असावी)

शक्य आहे बकासूरराव,

बघतो विचार करून!

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

Hello,

I like ur all novels..
But i dont know the marathi typing..

छान झाला हा ही भाग, थाडी काळजी वाट्ते गोपची बाकी चांगला चालला भाग पुढचा भाग लवकर पाठवा.