तुझा सहवास

Submitted by क्रांति on 5 April, 2011 - 02:13

तुझ्या नजरेने गात्रांवर गोंदलेली धुंदी
श्वास श्वासांत माळून गेले बकुळ सुगंधी
तुझ्या बोलण्याने छेडलेली मंद नंदधून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

तुझ्या प्राजक्ताचा गंध माझे फुलवी अंगण
तुझ्या भासाचे-ध्यासाचे माझ्याभोवती रिंगण
धुंद होते, मिरवते तुझ्या चाहुली लेऊन
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

वीज लहरे देहात अशी तुझी नेत्रबोली
तिच्या वर्षावात चिंब होते लाजून अबोली
मला लपवू पहाते, डोळे माझेच झाकून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

तुझी हिरव्या चाफ्याची प्रीत भिनते अंगात
जागेपणी रंगते मी तुझ्या स्वप्नांच्या रंगात
जग विसरते, जाते देहभान हरपून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

गुलमोहर: 

जग विसरते, जाते देहभान हरपून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून! >>> व्वा...सुंदर...या ओळींत तर संपुर्ण कविता सामावली.!

ये ब्बात.. क्रांती, प्रणयीक शब्दांतही दादागिरी आहे तुझी जशी विरहिणीच्या शब्दात आहे तशीच! मस्त गं.

Happy
छान!!

क्रांतीजी !
वीज लहरे देहात अशी तुझी नेत्रबोली
तिच्या वर्षावात चिंब होते लाजून अबोली

या मला आवडलेल्या सर्वाधिक सुंदर ओळी.त्यात नवतारुण्याची सळसळ आणि उपमा अलंकारचा परिपूर्ण वापर यांचा सुरेख संगम आहे. खरेतर संपूर्ण रचनाच भावनाविष्काराचा उच्च पातळीवरील नजाकत उलगडणारा एक भाव-पट आहे.
अनेक सुंदर रचनांमधील आणखी एक असेही म्हणावे वाटले.