गुढी पाडवा नव वर्षाचा शुभारंभ

Submitted by किंकर on 3 April, 2011 - 22:22

नमस्कार!
सोमवार दिनांक ४ एप्रिल २०११
गुढी पाडवा नव वर्षाचा शुभारंभ.
उदबोधक कार्यक्रम,मनोरंजन,नवीन संकल्प मनाशी ठरवत,इंग्लिश कालगणनेनुसार सुरु होणारे नव वर्ष आपण नेहमीच साजरे करत असतो. पण भारतीय संस्कृती आणि आपले संस्कार जपण्यासाठी आपण शालीव्हान शक १९३३ देखील तितक्याच उत्साहाने साजरे केले पाहिजे.आपले सर्वसाधारण आयुष्यमान ८० ते १०० वर्षांचे असते असे गृहीत धरले तर शतक विशेषतः सहस्त्रके हि खूपच म्हणजे खूपच दीर्घ वाटतात. आपल्या जीवनात जन्म आपल्या हाती नाही. आपण आपले जन्मदाते स्वतः ठरवू शकत नाही. म्हणजेच कोणचे पोटी जन्म घ्यावा हे आपण ठरवू शकत नसलो तरी, कोणास जन्म द्यावा, हे ठरवतच आपण अपत्य निर्मितीचा सृजन आनंद, कालचक्रात राहून घेत असतो.आपले आयुष्यमान निश्चित नसूनही आपण सहजतेने भविष्य- कालीन योजना आखून,त्याचा पाठपुरावा करीतच असतो. या जगण्याच्या सहजवृत्तीतून नियोजनाची सुरवात झाली . त्यातूनच निसर्गचक्रातील बदल सुसह्य करणारे, सणवार साजरे करण्याची सहजता माणसात आली. पुढे हे असे का ? या माणसाच्या चौकस वृतीस उत्तर देताना येणाऱ्या मर्यादा किंवा प्रश्नकर्त्यासमोर आपले अज्ञान उघड होवूच नये म्हणून या सणवारांची सांगड रूढी, परंपरा याच्याशी घालण्यात आली. हे थोडेसे विस्ताराने यासाठी सांगितले कारण- सन २०११ हे यावर्षी आंतरराष्ट्रीय अरण्य वर्ष म्हणून - The United Nations या संस्थेने घोषित केले आहे.
आता दर वर्षी ते वर्ष एखाद्या विषयाला, एखाद्या संकल्पनेला, वाहून साजरे करण्या मागे, आपल्या हिताच्या असून देखील केवळ अल्प कालावधीचा विचार करून माणसाने ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे व त्यामुळे निर्माण झालेल्या धोक्याची जाणीव सर्व मानव जातीस करून देणे हा सार्वजनिक हिताचा विचार असतो. तर या संकल्पनेचा विचार करून आपण या सन २०११ या अरण्य वर्षाची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. माणूस जितका निसर्गाच्या जवळ जाईल तितका सुखी होईल. हे त्रिकालाबाधित सत्य माणसाला समजले /उमजले पण तरीही ते त्यांनी स्वीकारले नाही. त्यातून त्याने निसर्गाचे जवळ न जाता त्यावर आक्रमण केले. आणि या बाबतीत सर्व मानवजात एकजात दोषी ठरते.काळा गोरा, श्रीमंत गरीब, विकसनशील अथवा विकसित देशाचा रहिवासी प्रत्येकजण समान दोषी आहे. आणि कदाचित या अंतर्मुख वृत्तीतून या वर्षी अरण्य वर्ष घोषित झाले आहे असे वाटते आहे. प्रथम आपणास आपल्याकडून होत असलेल्या विध्वंसाची कारणे सांगतो. अरण्ये नष्ट होण्यामागे संपत्तीचे असमान वाटप, भ्रष्टाचार, वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण आणि अनियोजित जागतिकीकरण हि प्रमुख कारणे आहेत. म्हणजेच या घटनेस अपायकर्ता म्हणून आपण सर्वचजण जबाबदार आहोत . आता सन २०११ च्या निमित्ताने आपण उपायकर्ता म्हणून काही करण्याचे नक्की करूयात. या बाबत प्रत्येकास स्वतःची काही वेगळी कल्पना राबवता येईल.
पण गुढी पाडव्याचे निमित्ताने मी आपणास या विषयाकडे-'भारतीय संस्कृती आणि आपल्या पूर्वजांचे ज्ञान'या ठेव्याचा वापर करीत वळवू इच्छित आहे. भारतीय संस्कृतीस अनुसरून आपण नक्षत्र वन जपण्याचा संकल्प करीत यावर्षी एक आगळा वेगळा उपक्रम सिद्धीस नेवू या.यावर्षी आपण राहत असलेल्या परिसरात एक वृक्ष लावणे व जोपासणे हे प्रथम उद्दिष्ट पार पाडू.कदाचित आपण यापूर्वीच अरण्य वर्षाची वाट न पाहता वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला असेल,तर ते नक्कीच सुजाण नागरिकत्वाचे लक्षण आहे. यावर्षी जागतिक पातळीवर हा प्रयोग अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी एक वृक्ष आपण राहतो त्या परिसरात लावून तो जोपासला पाहिजे.परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाने, आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी, आपण ज्या नक्षत्रावर जन्मलो आहोत त्या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आणि आपल्या नावाच्या अद्याक्षाराची एक औषधी वनस्पती लावण्याचा संकल्प करून, त्याची पूर्तता आपल्या यानंतरच्या पहिल्या भारतभेटीत पार पडण्याचा संकल्प आज या शुभ दिनी पूर्ण करून यात सहभागी झाले पाहिजे.आपणास या आजच्या संकल्पाची पूर्तता करणे सोपे जावे म्हणून,आपणास नक्षत्राचे नाव त्याचा आराध्य वृक्ष कोणता यांचा तक्ता सोबत देत आहे. तर ज्ञानेश्वरी समजावून घेताना जसे फक्त ज्ञानेश्वरीचे वाचन न करता 'एक तरी ओवी अनुभवावी' हे जसे संतांनी सागितले आहे तसे आज आपणा सर्वांना कळकळीचे विनंती करीत आहे कि,आजचा गुढी पाडवा आणि अरण्य वर्षाचे निमित्ताने 'एक तरी फांदी जगवावी.' नव वर्षाच्या निमित्ताने सृजन वाचकांना यापेक्षा अधिक सांगणे न लगे.
Nakshatra vriksha.doc (115.5 KB)

गुलमोहर: 
शब्दखुणा: