Submitted by harish_dangat on 3 April, 2011 - 16:18
पाउस पडला धो धो
भरुन वाहती नाले ओढे
अडलेली कातकरी बाई
कुठे जावे पडले कोडे
दिसेना पुढे काहीही
तिला पडली रानभूल
तेवढ्यात दिसला तेथे
एक ओढ्यावरचा पूल
कुठे कोरडी जागा नाही
धार लागली उभ्या शिवारा
पुलाखालच्या मोरीमध्ये
सापडला तिला निवारा
पोटमधल्या दाबल्या कळा
रडू फुटले वाहत्या ओहळा
एक उसासा देउन काढला
पोटातून मांसाचा गोळा
सापडले दोन दगड तेथे
धुवून काढला त्यांचा गाळ
खाली एक वरती दुसरा
दगड आपटून तोडली नाळ
नाल्याचे ते गढूळ पाणी
अन थंडीने भरले हीव
बुडविला तो दोन वेळा
धुवून काढला नवा जीव
टाहो फोडला बाळाने
उराशी धरला तान्हा
उपाशी पोटी मायेला
भरगच्च फुटला पान्हा
एक प्रहर टळता आणिक
पावसाची ओसरली सर
पाठीला बांधून गाठोडे
निघून गेली ती झरसर
-हरीश दांगट
गुलमोहर:
शेअर करा