आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे "स्ट्रेस"(ताण) हा शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतो. कोणाला शारीरिक ताण तर कोणाला मानसिक ! या ना त्या कारणाने आपण सगळेच तणावग्रस्त आहोत किंवा झाले आहोत की काय असे वाटायला लागले आहे. या सगळ्याचे मूळ मानसिक ताणातच आहे असे आता निदर्शनासही आले आहे.मूळात प्रश्न हा आहे की हा ताण निर्माण कशाने होतो? तशी बरीच कारणं देता येतील...कधी आपल्या अपेक्षा आणि त्यांची पूर्तता यात न बसलेला ताळमेळ तर कधी विश्वासाला गेलेला तडा..एक ना अनेक..थोडक्यात काय तर प्रामुख्याने आपल्या मनाला पवनकुक्कुटाप्रमाणे वारा येईल त्या दिशेला भरकटण्याच्या लागलेल्या सवयीने ही समस्या निर्माण झालेली दिसून येते.
स्ट्रेस मॅनेजमेंट करावयाचे असेल तर ध्यान हा उत्तम उपाय आहे असा बोलबालाही आपल्याला सर्वत्र ऐकू येतो.पण ध्यान करणे म्हणजे नेमके काय? इंग्रजीत ध्यानाला Meditation म्हटले आहे. Meditation या शब्दाच्या dictionary meaning नुसार Meditation is nothing but continuously thinking about something ! म्हणजेच सतत एकाच गोष्टीचा विचार करणे म्हणजेच ध्यान असा ध्यानाचा ढोबळ अर्थ !
मग कुणी पैशावर ध्यान करत असेल तर कुणी खेळावर. अर्थात प्रत्येकजण कशाना कशाचा सतत विचार करीत असतो म्हणजेच ढोबळ अर्थाने ध्यानच करीत असतो.विचार करणे हा मनाचा स्थायीभाव आहे मग त्याला चिरडून किंवा मारून आपल्याला जे साध्य करावयाचे आहे ते कसे साध्य करता येईल? मनाला आपला मित्र बनवूनच हे शक्य होईल.ज्याप्रकारे सुसाट वाहणार्या नदीच्या प्रवाहाला योग्य दिशेने वळविले असता तिचा उपयोग जनकल्याणाकरिता करता येऊ शकतो त्याच प्रकारे आपल्या मनाचा नियमनाद्वारे आपल्याच कल्याणाकरिता उपयोग केला जाऊ शकतो.मनाचे नियमन त्याला योग्य विचाराची दिशा देऊन आणि योग्य विचारावर स्थिर करून ध्यानद्वारे सहज साध्य होऊ शकते.
पण जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा खरी परीक्षा सुरू होते. डोळे मिटून बसल्यावर आपल्या मनात अक्षरशः विचारांचं काहूर माजतं.म्हणजे डोळे उघडे असताना येणार नाहीत एवढे विचार डोळे बंद केल्यावर येतात. मग करायचं काय? अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं.जसे एखादी व्यक्ती नको असताना आपल्या घरी आल्यास आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अगदी तसेच आपल्या विचारांच्या बाबतीतही करायचे.म्हणजे आपोआपच विचारांची निर्मिती बंद होऊन मन निर्विचार होण्यास सुरुवात होते.अश्या तर्हेने काही दिवस नियमितपणे अभ्यास चालू ठेवल्यास ध्यान करणे सोपेच नाही तर आनंददायी बनते. मग ताण्,स्ट्रेस अश्या शब्दांना आपल्या आयुष्यात काही महत्त्वच उरत नाही.म्हणूनच ध्यानामुळे होणार्या या फायद्याकडे पहाता ध्यान ही काळाची गरज होती , आहे आणि राहील असेच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मला असे वाटते की असे करू
मला असे वाटते की असे करू लागलो तर लोक म्हणतील "काय पण ध्यान आहे", म्हणून करणे होत नाही. असो गंमतीचा भाग सोडला तर ध्यानविचार चांगला मांडला आहे.
मला असे वाटते की असे करू
मला असे वाटते की असे करू लागलो तर लोक म्हणतील "काय पण ध्यान आहे", म्हणून करणे होत नाही.<< मग आपणही म्हणायचे "सुंदर ते ध्यान आहे " हा.का.ना.का.
माझ्या डोक्यात एकाच वेळी,
माझ्या डोक्यात एकाच वेळी, इतक्या विषयांवर विचार चाललेले असतात, कि सर्व काढून टाकणे अशक्यच वाटतय. मला वाटते एकाच गोष्टीत न गुंतणे, हा माझ्यासाठी विरंगुळा आणि विश्रांती आहे.
विचार चांगले काय उत्तमच
विचार चांगले काय उत्तमच आहेत.
पण concentration = एकाग्रता
contemplation = चिंतन
meditation = ध्यान (काहीही न करणे)
असा तिन्हीत फरक आहे. तुम्ही म्हणता तसे ध्यानात विचारांकडे अलिप्तपणे बघण्याचा अभ्यास करायचा असतो. हे ही ठीक.
पुढे जे म्हटले आहे <<अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं.जसे एखादी व्यक्ती नको असताना आपल्या घरी आल्यास आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अगदी तसेच आपल्या विचारांच्या बाबतीतही करायचे.म्हणजे आपोआपच विचारांची निर्मिती बंद होऊन मन निर्विचार होण्यास सुरुवात होते.>> ते अतिशय अवघड आहे, अशक्य नाही. मन निर्विचार करणे फारच कठीण - ते काही क्षणाकरताच होते - सेकंदाच्याही खाली. पण सतत निर्विचार राहू शकत नाही.
<<अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं.>> हे ध्यानानं साध्य होते हे बरोबर.
या सगळ्याचा अभ्यास कसा करायचा ते दिले तर अजून चांगले होइल. या एका चांगल्या उपक्रमाकरता मनापासून अभिनंदन.
म्हणजेच सतत एकाच गोष्टीचा
म्हणजेच सतत एकाच गोष्टीचा विचार करणे म्हणजेच ध्यान असा ध्यानाचा ढोबळ अर्थ
ध्यानाच्या वेळी एका विशिष्ट विचारावर मन केंद्रित केले जाते.
ध्यान करताना सुखासनात (पद्मासनात किंवा खुर्चीवर बसल्यास ताठ) बसायचे.
श्वास घ्यावा उच्छ्वास सोडताना शरीराचा एकेक भाग शिथील करीत जावा (रिलॅक्स)
अशा प्रकारे संपूर्ण शरीर शिथील करावे.
मग श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू तोही संथ लयबद्ध होत जाईल. इतका संथ की आपण श्वास घेतोय की सोडतोय हे जाणवणार नाही.
आता आपल्या ठरवलेल्या विचारावर लक्ष/मन केंद्रित करावे.(म्हणजे एखाद्या प्रश्नाचा विचार करावा असे नाही...तर स्वतःच्या मनाला सूचना दिल्यासारखा स्वसंवाद साधावा). हे विचार आधी शब्दबद्ध करून पाठ केलेले असले तर उत्तम . (मन भरकटू लागतेच. विचलित न होता त्याला योग्य जागी स्थिर करावे.)
इथे नामस्मरण इ. ही करता येते.
मन पूर्ण निर्विचार केल्याने नक्कीच लाभ होतो.
मस्त लिखाण.... आसेच चांगले
मस्त लिखाण.... आसेच चांगले लिहित जा.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार

दिनेशदा आपल्या मनाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे त्यामुळे एका वेळी अनेक विचार येणे पूर्णपणे नैसर्गिक आहे.पण हा वेग हळूहळू कमीही करता येऊ शकतो.गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची
ध्यान करताना भरतने म्हटल्याप्रमाणे सुखासनात बसावे खुर्चीवरही बसले तरी चालते.
ध्यान हे जर हृदयावर केले म्हणजे जिथे आपल्याला हृदयाचे ठोके ऐकू येतात तिथे केले तर उत्तम.
या मागची कारणे अशी:-
१. आपल्या संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा हृदयाद्वारे होतो त्यामुळे हृदय स्वस्थ तर शरीर स्वस्थ.
२. कोणतीही भावना सर्वात आधी हृदयात रजिस्टर होते उदा. भीती वाटल्यास धडधडणे,आनंद झाल्यास ऊर भरून येणे इ. त्यामुळे हृदयाच्या संवेदनशीलतेवर आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते.
३.कोणत्याही व्यक्ती बाबत बोलताना आपण त्याला good-hearted or evil-hearted person असे म्हणतो म्हणजेच माणसाचा स्वभाव त्याच्या हृदयातून निर्माण होतो.त्यामुळे स्वभावात परिवर्तन करावयाचे असेल तर हृदय शुद्धीकरण आणि पर्यायाने परिवर्तन आवश्यक आहे.
४.मानवाच्या अस्तित्वाचा प्रारंभ आणि अंत दोन्ही क्रिया हृदयाशीच निगडीत आहेत.गर्भावस्थेत सर्वप्रथम हृदयाचे ठोकेच ऐकू येतात म्हणजेच शरीर पूर्ण आकाराला येण्याआधी ही हृदय अस्तित्वात येते.आणि मानवजीवनाच्या अखेरीसही हृदयच बंद पडते.
५. सर्वात शेवटचे पण महत्त्वाचे कारण म्हणजे "ईश्वर हा सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात वसलेला आहे" या विधानावर सर्व धर्मांची, तत्त्ववेत्यांची एकवाक्यता आहे.
छान
छान
धन्यवाद जामोप्या
धन्यवाद जामोप्या
छान स्वप्ना...
छान स्वप्ना...
छान सुरवात झालीय्.पण ध्यान
छान सुरवात झालीय्.पण ध्यान लागणे भलतेच अवघड्.मन कधी निसटुन जाते ते कळतच नाही.
धन्स सायली , समई समई
धन्स सायली , समई

समई सुरुवातीलाच जर हे अवघड आहे असे मानून चाललो तर मग खरेच अवघड होईल पण सुरुवातीलाच पॉझिटीव्ह अॅप्रोच ठेवला तर सगळे सोपे होऊन जाते
छान विषय आहे! जर विचारांचा
छान विषय आहे!
जर विचारांचा साक्षी होणे जमत नसेल तर श्वासाचा साक्षी व्हावे! प्राणायाम नव्हे, पण श्वास पहावा. हळुहळु विचार लोप पावत जातात. आणी चांगला किंवा वाइट असे कोणतेहि लेबल न देता विचार पहावेत साक्षी होउन.! कारण एखादा विचार चांगला किवा वाइट हादेखील विचारच आहे. या विचाराचाही साक्षी बनणे गरजेचे आहे.
आणी चांगला किंवा वाइट असे
आणी चांगला किंवा वाइट असे कोणतेहि लेबल न देता विचार पहावेत साक्षी होउन.! कारण एखादा विचार चांगला किवा वाइट हादेखील विचारच आहे. या विचाराचाही साक्षी बनणे गरजेचे आहे.<< १००% अनुमोदन
म्हणूनच की काय शेक्सपियरने म्हटले आहे"Nothing is good or bad thinking makes it so "
ध्यान किंवा विपश्यना.
ध्यान किंवा विपश्यना.
ताण का येतो हे आधी समजले तर ध्यानाचा फायदा होतो. ताणाचं कारण म्हणजे मनुष्य समस्या धरून ठेवतो. समस्या धरून ठेवल्या तर त्या सुटत नाहीत. समस्या सोडून दिल्या म्हणजे त्या नाहीशा होत नाहीत. समस्या पकडून न ठेवता त्या सोडवता येणं ही कला जमली कि ताण कमी होतो. पूर्णपणे ताणरहित जीवन जगायचं तर थोडं अजून वाचायला लागेल. सगळं सोडून दिलं कि ठीक होतं.
हिंदू संस्कृतीत सांगतात कि "जो जो जब जब होता है, वो वो तब तब होता है "
याचा शब्दशः अर्थ घेतला तर मनुष्य अंधश्रद्धाळू होईल किंवा निष्क्रीय होईल. याचा डोळसपणे अर्थ घेतला तर मात्र तो तणावरहित कार्य करू शकतो. तुम्ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहा पण आताच समस्या सुटली पाहीजे, मला हवं तसंच झालं पाहीजे या चिडीने जर समस्येला चिकटून राहिलात तर दुसरं काहीच होत नाही. ती सुटायची तेव्हां सुटेल, तुम्ही मात्र ताण घेऊन हजारो आजार जडावून घेता.
एकदा एस डी बर्मन यांना एक गाणं हवं होतं. चाल तयार होती. या गाण्यासाठी त्यांना त्या काळचे सर्वात बिझी गीतकार शैलेंद्रच हवे होते. असतात एकेक संगीतकाराचे आडाखे. शैलेंद्र यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं पण शैलेंद्र काही त्यांच्या हाती लागत नव्हते. त्यांची शंकर जयकिशन व अन्य संगीतकारांसोबतची पेंडींग कामं चालूच होती.
एसडी खूप अस्वस्थ झाले. त्यांनी आरडी बर्मनना आदेश दिला कि शैलेंद्र यांना शोधून काढ आणि जोपर्यंत गाणं लिहून आणत नाहीस तोपर्यंत घेरी येऊ नकोस. आरडीची अवस्था एकदम अडचणीची झाली. शैलेंद्र बिझी माणूस, इकडे पित्याची आज्ञा. त्यांनी शैलेंद्र यांना सगळं सांगितलं. शैलेंद्र तत्वज्ञानी माणूस. ते हसले.
तीन दिवस ते आरडी ला घेऊन फिरत होते. रोज आरडी विचारायचे आणि शैलेंद्र सांगायचे "पंचम आज भी तू घर नही जा सकेगा, क्युं कि आज का दिन इस गीत का नही है "
तीन दिवसांनी आरडी काकुळतीला आला. तोपर्यंत शैलेंद्रने एक सिटींग संपवली. रात्र झाली होती. मग ते आरडी घेऊन भटकत राहिले. सिगरेटी ओढल्या. आरडीकडे पण सिगरेटचं पाकीट होतं. पण त्या काळात इतक्या लहान वयात सिगरेट जवळ आहे हे समजलं तर गाण्या ऐवजी शैलेंद्र एसडींना हेच सांगतील ही भीती होती.
आरडीने पुन्हा विचारलं. शैलेंद्र म्हणाले , चल जुहू बीच वर जाऊ.
बीच वर ते चंद्राकडे बघत होते. मध्येच ढग आले.
"शैलेंद्र म्हणाले आरडी तू आज भी घर नही जा सकेगा. क्युं की मुखडा तैय्यार है लेकीन कागज नही है"
आता मात्र आरडीला सिगरेटचं पाकीट काढून आतला कागद काढावा लागला.
शैलेंद्र ने ते पाकीट फाडलं. आतल्या बाजूवर गाणं लिहीलं
"खोया खोया चांद
खुला आसमान"
मग ते आरडीला म्हणाले " जी गोष्ट जेव्हां व्हायची असते तेव्हांच होत असते"
या गोष्टीत एसडींनी ताण घेतला. फॉलोअप ठीक आहे. पण अस्वस्थ होण्याने गीत लिहून होत नाही. त्यासाठी त्यांनी आरडी पाठवलं हे ठीक पण घरीच येऊ नकोस हे ताणाचे लक्षण आहे. हा ताण त्यांनी मुलाला पण ट्रान्स्फर केला. आरडींनी तो दबाव शैलेंद्रकडे ट्रान्फर करण्याचा प्रयत्न केला. पण शैलेंद्र तत्वज्ञानी होते. त्यांच्यावर दबाव आला नाही.
शैलेंद्र हे त्यामुळेच एव्हढा दबाव असतानाही , एव्हढे बिझी असतानाही शांतपणे गाणी लिहू शकले. ताण घेतला असता तर गाणे सुचलेच नसते.
आपल्यावरही अनेक जण दबाव आणतात, काही दबाव आपण घेतो. त्याने काहीच होत नाही.
हे ओळखण्यासाठी ध्यान.
ध्यानाने फोल काय, योग्य काय हे समजू लागतं.
खूप छान लिहिले आहेस रानभूली.
खूप छान लिहिले आहेस रानभूली.
ध्यानाने फोल काय, योग्य काय
ध्यानाने फोल काय, योग्य काय हे समजू लागतं. >> आवडलं रानभुली.
धनवन्ती आणि वामिका , असंच
धनवन्ती आणि वामिका , असंच विस्कळीत लिहीलेलं, तुम्ही मनापासून वाचलंत,
आणि आवडलं याबद्दल कृतज्ञ आहे.