मस्त भुरभूर पाऊस चालु होता. आता शहरापासुन थोडं बाहेर आल्यावर ड्रायविंग पण संथ, एका लयीत चालु होतं. गाडितली म्युझिक सिस्टिम शांत होती पण मनात बडे गुलाम अली घुमत होते.. "आये ना बालम.. का करु सजनी.." शहराबाहेर कुठेतरी शिफ्टिंगचं सामान घेवुन चाललेला ट्रक दिसला तिला गाडीपुढे..
कितव्या शहरातलं कितवं शिफ्टिंग होतं हे काय माहिती..त्या न मोजता येणार्या पसार्यात तशाच न मोजता येण्यासारख्या आठवणी.. त्यांचे फोटोग्राफीचे प्रयोग...
"अर्रे हळू....!!!"
"काय?"
"आठवणींची कुपी अलगद उघडायची असते.. सांडुन गेली अत्तरासारखी तर दरवळ राहिल फक्त.. आणि तोही पकडता यायचा नाही मग..!"
"धसमुसळी तू आहेस, मी नाही.."
"अॅहॅहॅ...!"
अचानक वाजणार्या हॉर्नने तंद्री भंगली तिची. संध्याकाळ आताशी चाहुल देत होती. पावसाळ्याच्या शेवटाला मावळतीचा सुर्य आकाशात जसे रंग उधळतो तशीच आजची पण वेळ. पण काही मनात उतरत नव्हतं..
दाटुन आलेली निळी संध्याकाळ असते. गडद गार, चिंब ओली, दिवसभर पावसात हुंदडुन येवुन गपगार झालेले असतात दोघेही..
"स्कॉच?"
"स्कॉच..!"
"चिअर्स..!"
काही न बोलता अचानक व्हायोलिन आणुन हातात ठेवते त्याच्या.
"काय वाजवु?"
"काहीही.."
बीथोवेन ची धून निघायला लागते.. हेच का वाजवायचं असतं याला नेहमी..(किंवा मला हेच ऐकायचं असतं हे कसं कळतं याला?) भरुन आलेल्या डोळ्यांसोबत मन भरुन जातं, सूर ऐकु येईनासे होतात तेव्हा ती म्हणते,
"काय होईल रे तुझं किंवा माझं आपण वेगळे झालो तर?"
तिच्या असल्या प्रश्नांना व्यावहारिक उत्तरं दिली की तिचा नूर भावनिक होतो आणि भावनिक दिली की व्यावहारीक होतो हे त्याला चांगलच कळुन चुकलेलं. या आईवेगळ्या मुलीची आई आणि तिच्यातल्या आईचं मूल पण होण्याची जबाबदारी याचीच असायची. तिला अजुन एक दुरावा किती असह्य आहे याची कल्पना होती त्याला... तिचं डोकं मांडीवर घेवुन थोपटत रहायचा मग तो शांतपणे..
त्यांच्या नेहमीच्या जागी गाडी पार्क करुन ती निघाली हातातलं सामान घेवुन. मस्त दाटलेली कच्च हिरवळ. उमलेली रानफुलं.. आणि त्यांच्या सौंदर्याशी स्पर्धा करणारी फुलपाखरं.. अगदी अशीच स्थिती. नुकत्याच सरुन गेलेल्या पावसानंतर जंगलात, झाडाझुडपात भटकुन आल्यावरचा त्याच्या अंगाला येणारा एक मिश्र वास असायचा, कडवट हिरवा.. ओलसरसा.. तिला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायचा तो वास. त्याला आवरुही न देता त्याच्या कॉलरमध्ये नाक खुपसून मिठीत पडुन रहायची त्याच्या..
गडद निळी किनार असलेलं मोरपंखी रंगाचं फुलपाखरु, लाल ठिपके मिरवणारं.. तिच्या मते त्या फुलपाखराचे रंग तिला मिळालेत आज. सकाळपासुन त्या रंगांचं वेड घेवुन फिरत असते सगळ्या शहरातून. मग कधीतरी मनासारखे रंग मिळाल्यावर तो ड्रेस घालुन आलेली असते ती...
"ए, मी कशी दिसतेय?"
"अं..."
"सांग ना, कशी दिसतेय मी?"
"अंघोळ केली नाही वाटतं आज?"
"अरसिक कुठला..दुष्ट..!"
ठेच लागल्यामुळे भानावर आली ती.. त्यांचा तो नेहमीचा पॉइंट.. टेकडीवर सगळयात उंच.. थोडा वेगळासा.. दुसर्या बाजुला असलेला. खरतर तिला खूप भीती होती अशा उंचीची पण त्याच्यामुळे यायला लागली. एकदिवस अचानक त्याने असाच तिला नको नको म्हणत असताना अक्षरशः भाग पाडलं होतं पॅराग्लायडिंग करायला..
"चल.."
"कुठे?"
"आपण पॅराग्लायडिंग करतोय.."
"वेडा आहेस का तू? तुला माहिती आहे ना मला भीती वाटते.."
"चल गं.. मी आहे ना..."
त्याच्या आग्रहाखातर आणि त्याच्यावर विश्वास ठेवुन झोकुन दिलं तिने स्वतःला. डोळे किलकिले करुन पहाता पहाता तिला स्वतःच्याच चित्रात उतरल्यासारखं व्हायला लागलं.. आणि मग तिने घेतलेला धरतीवर बरसण्याच्या वेडाचा आकाशाचा छंद..
आपण खरच किती बदललो त्याच्यामुळे.. पण तो काहीच बदलला नाही का? आत्ता जाणवतय हे. त्याने कधीच आपला आग्रह म्हणुन पत्र लिहिली नाहित की मी बोल म्हटले म्हणुन बोलला नाही. किती वेळा.. किती वेळा...
"ढॅन्टॅणॅन...!!"
"हे काय नविन?"
"हा घे कागद.. पत्र लिही मला.."
"कोण मी?"
"नाही. तुझा व्हायोलीन..! अर्थात तूच"
"काय वेड्-बिड लागलं की काय तुला? मला नाही लिहिता येत तुझ्यासारखं.."
"ते काही नाही. लिहिलंच पाहिजे.."
"हे बघ! एक काम करु, तू लिही. मी तुला बघत बसतो.."
"काही गरज नाहिये.. लिही.. लिही.. लिही..."
आणि मग चक्क तासभर बसुनही तिने कुठूनतरी शोधुन काढलेल्या त्या पिवळसर, जीर्ण, तिला जपुन ठेवायच्या असलेल्या पानावर त्याने फक्त I love you लिहुन दिलं होतं...
किती वेड्यासारखे हट्ट असायचे ना आपले आणि वेड्यासारखे प्रश्न पण. त्याला त्रास होत असेल का या सगळ्याचा? Individuality, Individuality म्हणता म्हणता किती अवलंबत गेलो आपण त्याच्यावर नकळत. माझे प्रश्न खरच होते की त्याला समोर बघुनच पडायचे...
"सगळ्या रंगांवर चंद्र सांडला तर काय होईल?"
"..."
"सांग ना.. तुझ्या व्हायोलिनवर जसा सांडतो तसा माझ्या रंगांवर सांडला तर?"
"चंदेरी होऊन जातिल तुझे रंग आणि पर्यायाने तुझी स्वप्नं.. कॅनव्हास कायम चांदीचा वर्ख लागल्यासारखा होऊन जाईल आणि तुझ्या नव्या खरपुस कॅनव्हासवर गर्द हिरवा डोंगर काढताना तुला रानात गेल्यासारखं नाही वाटायचं मग..!"
"..."
प्रश्न अजुनही पडतायेत रे.. मला अजूनही उत्तरं हवियेत. कुठे आहेस तू?
आज पुन्हा त्याच कड्यावर उभी आहे ती.. आज पुन्हा पाऊस आहे. वारं असं भणाणलय की पाऊस उलटा ढकलला जातोय त्या उंचीवर. तिच्यासोबत आहे त्याचा व्हायोलिन, तिचा कॅनव्हास, तिचे प्राणप्रिय रंग, त्यांचे फोटोग्राफिचे प्रयोग आणि कुठून कुठून तंगडतोड करुन जमवलेल्या रेकॉर्डस्.. आज तिला उंचीची भीती वाटत नाहिये. पाय पुढे टाकुन बघतेय ती. पॅराशुटशिवाय मारु का उडी तुझ्या आठवणींसोबत? मला पण पहायचाय कसा त्रास होतो, कशा असतात खर्या-खुर्या शारिरीक प्राणांतिक वेदना... तुला पण अशाच वेदना झालेल्या का त्या अपघातानंतर? आणि काय सांगायचं होतं तुला अंधुकशा त्या नजरेतुन? एकदा तरी डोळे टक्क उघडले असतेस तर वाचलं असतं मी नक्की.. तू कायम हेच कारण सांगायचास ना तुझ्या कमी बोलण्याचं?
"ए.. बोल ना काहितरी.."
"काय बोलु? मला बोलण्यासारखं काही ठेवतेस का तू? सगळंच तर समजतं तुला माझ्याकडे बघतानाच. वेगळं काय बोलणार?"
"काहीही बोल.. मी कधी विचारते का तुला काय बोलु म्हणुन. वटवटत तर असते सारखी.. आज तू बोल. मी फक्त ऐकणार.."
आणि तो बोलण्याची वाट बघताना त्याच्याकडे बघत बघत वेळ जायचा निघुन. तो बोलायचाच नाही शेवटी. आणि त्याच्या त्या गूढ तरी खोडकर चेहर्यावरचे रेषांचे आणि रंगांचे अर्थ लावताना हरवुनच जायची ती, विसरुन जायची की तिला ऐकायचय.. काय काय ऐकु यायचं तिला, काय काय बोलायचा तो मुक्यानेच..
कायमची शांतता भरुन राहिलेली आता. सगळ्या सामानाकडे एका निष्क्रिय तटस्थपणे पाहुन घेतलं तिने एकदा. हल्ली त्याच्या फोटोकडेही तशीच बघायची ती.. त्याच्या बोलण्याचे, हसण्याचे, असण्याचे.. सगळेच भास आता असह्य होत होते तिला.. आणि त्याच्या खुणा पुसून टाकायच्या होत्या आता. मनातुन कसं जाणार होतं सगळं? पण असले विचार येत नव्हते. मुर्खपणा असला तरी तेच करावसं वाटत होतं. बॅग धरली तिने कड्यावर. परत मागे घेतली. आता याच तर आठवणी आहेत. यांच्यासोबत तर जगायचय. याच काढुन टाकल्या तर काय राहिलं मग तुझ्या नसण्याच्या भकास पोकळीशिवाय? पण तसही यांच्या सोबतीने ती पोकळी कुठे भरुन निघणार आहे? पण मिटवुन टाकण्याचा अट्टहास का? कारण असण्याचा फायदा नाही. फायद्या-तोट्याची गणितं कधीपासून मांडायला लागले मी आपल्या नात्यात?
मनातल्या या आंदोलनांपुढे टिकणं अवघड झालं तशी तिथल्या खडकावर पुन्हा बसुन घेतलं तिने. ह्म्म... अशक्य.. अशक्य... त्याच्याइतकच अशक्य आहे त्याचा स्पर्श झालेल्या कुठल्याही गोष्टीला दूर ढकलणं.. आणि का हट्ट करा? अजुनही मिळतेच आहे की त्याची सोबत.. त्याचा अबोलपणाच वाटतो अजुनही त्याचं नसणं म्हणजे. आणि जोवर हे वाटतं तोवर हे सगळं जीवापाड सांभाळेन मी. त्याच्या सगळ्या खुणा सांभाळेन.. एक मोठ्ठा उसासा सोडला तिने. अंधार चांगला दाटु लागला तशी परत फिरली मग.. सगळ्या आठवणींसकट.. सगळ्या समानासकट...
स्वप्ना_राज, धन्यवाद..
स्वप्ना_राज, धन्यवाद..
रुणुझुणू , लिहिलेलं पोचल्याचं समाधान..
शूम्पी..
कमी शब्दात कथा बरंच काही
कमी शब्दात कथा बरंच काही सांगून जातेय.
सुंदर जमलंय कथन..
सुंदर!!!
सुंदर!!!
अ..............प्र...........
अ..............प्र..............ति................म.....................
दक्षिणा, जिप्सी, saakshi, खूप
दक्षिणा, जिप्सी, saakshi,
अगदी मनापासून आलेल्या प्रतिसादांबद्दल मनःपुर्वक धन्यवाद. 
खूप खूप खूप आभार..
आवडलं
आवडलं
मॅड! (मेरा कुछ सामान... फक्तं
मॅड!
(मेरा कुछ सामान... फक्तं हे तो म्हणतोय... इजाजत न घेता निघून गेलेला)
लिहीत रहा, मुक्ता....
धन्यवाद डुआय.. दाद, अगदी
धन्यवाद डुआय..
दाद,
अगदी अगदी.. कसं नेमकं बोललात.. शुभेच्छांबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार.. 
त्रास झाला हे वाचून..आतमध्ये
त्रास झाला हे वाचून..आतमध्ये खूप काहीतरी तुटलं..डोळ्यांतून नकळत अश्रू निखळले..
म्हणजे नक्की काय ते नाही सांगता येणार..पण मुक्ता, हे असाच सुरेखसं, त्रासदायक लिहित रहा..
पु. ले.शु.
भानु
))))या आईवेगळ्या मुलीची आई
))))या आईवेगळ्या मुलीची आई आणि तिच्यातल्या आईचं मूल पण होण्याची जबाबदारी याचीच असायची
फारच छान!!!
भानुप्रिया, खूप खूप आभार..
भानुप्रिया, खूप खूप आभार..
aabasaheb, धन्यवाद..
मुक्ता.... भन्नाट झालिये
मुक्ता....
भन्नाट झालिये यार!!
अगं कित्ती कल्पकता आहे तुझ्यात..... मस्तच! keep it up dear!
वा वा!!
वा वा!!
Pages