रक्तबंबाळ

Submitted by अवधूत on 27 March, 2011 - 12:48

अचंबित होऊनिया जन विचारती
घातलीस जीर्ण वस्त्रे काय उपरती
फिरताना दिसे इथे शोधतोसी काय
अर्धवट झोपेमध्ये वाटते का भय

मनामध्ये म्हणलो मी नाही जुनी वस्त्रे
जखमांना झाकणारी झालीत लक्तरे
अर्धवट मिटलेले दिसतील डोळे
निद्रासुख नव्हे तर मिटे ग्लानीमुळे

घनघोर लढाईत पराक्रम फार
भरपूर वेळा केले कायमचे वार
जखमांनी भरताना झाला साक्षात्कार
उभा ठाकलेला शत्रु प्रतिबिंब नर

हात लावे कपाळाला थकलो थांबुन
समशेर चालवतो शत्रु पिसाळुन
रक्ताळल्या अंगावर थेंब थेंब हासे
तुझ्यासवे वेचलेले क्षण क्षण जसे

गुलमोहर: