एक दिवसाचा पाहुणा - सनबर्ड पक्ष्याचे पिल्लू

Submitted by पुरंदरे शशांक on 27 March, 2011 - 06:45

एक दिवसाचा पाहुणा - सनबर्ड पक्ष्याचे पिल्लू

एका सक्काळी सक्काळी दार उघडून समोर अंगणात बघतो तर काय - चक्क सनबर्ड पक्ष्याचे एक गोड पिल्लू बसलेले. ती मादी आहे हे लगेच ओळखू येत होते. मी आजूबाजूला कानोसा घेत होतो त्याच्या आई-बाबांचा, पण त्यांचा तर पत्ताच नव्हता ! मी जवळ जाऊन पाहिले तर ते पिल्लू बिचारे भेदरलेले होते. अशा पिल्लांना मांजरे, कावळे लगेच भक्ष्य बनवू शकतात हे ओळखून मी त्याला अलगद उचलून घरात आणले.

त्या गोजिरवाण्या जीवाला पाहून घरात एकदम जल्लोष उडाला. मुलींनी तर लगेच सुरुच केले - "आपण पाळू या त्याला आता".

हे एवढे शांत का बसले असावे असा मी विचार केला व नुसते म्हटले की - याने रात्रभर काही खाल्ले नसेल, उपाशीपोटी अंगात बळही नसेल बिचार्‍याच्या - उडण्याचेही..... हे म्हणायचा अवकाश - लगेच घरातील सर्व मंडळींनी - भाताची शिते, पोळीचे कुस्करलेले तुकडे, काय काय आणून हजर केले. मीही बिनडोकसारखे त्याच्या समोर ते धरले. ते बिचारे काय खाणार यातले ?
मनात म्हटले - हे रात्रभर उपाशी राहून या सगळ्या खाद्यपदार्थांना चोचही लावत का नाही, याची तब्येत तर नरम नसेल ?

तेव्हा बायकोची एकदम ट्यूब पेटली - अरे, हे तर फुलातला रस पिणारे - हे काय पोळी- भात खाणार ?
मग बच्चमजींकरता बाटलीतला मध आणला - मला वाटते - असा मध (बाटलीतला) खाणारे हे सनबर्डचे एकमेवच पिल्लू असणार - पुढे कधी उडताना काही अडचण आली तर त्याची आई म्हणेल देखील त्याला - "अरे, बाटलीतला मध खाल्लेला तू, तू काय असा उडणार आमच्यासारखा ?"

मध समोर दिसताच चिरंजीवांनी लगेच चोच पुढे काढून बारीक दोरी सारख्या जिभेने मधप्राशन सुरु केले आणि आमचा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. मधाने त्याला तरतरी आलीच व ते चांगले बागडू लागले.

मी विचार केला - फोटोसेशनला किती सुंदर सब्जेक्ट मिळालाय ! त्यावेळेस डीजीकॅमचे प्रस्थ फार वाढले नव्हते, माझ्याकडे पेंटॅक्सचा एस एल आर कॅमेरा होता. या पिल्लासाठी एक नवीन रोल टाकून सुरु केला फोटोसेशन !!
-पण ते तर पिल्लूच ! त्याच्या कलाकलाने फोटो काढताना तो रोल केव्हा संपला कळले पण नाही. [३६ फोटो काढता येणारा तो रोल आत टाकणे, वेगवेगळी सेटिंग्ज ठेउन फोटो काढणे (व पुढे डेव्हलपिंग, प्रिंटींग हा अजून एक पोटात गोळा आणणारा भाग) हे किती दिव्य होते - हे या डिजीकॅमच्या सुटसुटीतपणामुळे आता जाणवतंय.....]
.... आता उत्सुकता होती फोटोंची - कारण काढले होते खरे फोटो - पण प्रिंट्स कशा येतात देव जाणे !! दुसरी भिती अशी की हा एकच चान्स, परत असे जवळून थोडेच फोटो काढता येणार ?

हे सगळे होईपर्यंत दुपार टळून गेली होती, मला बाहेर कुठे तरी त्याच्या आई - बाबांचे कॉल्स ऐकू येउ लागले.
मी त्या पिल्लाला सोडून देऊ म्हणताच मुलींची रडारड सुरु झाली. अखेर माझ्या बायकोने त्यांना समजावले - ते किती लहान पिल्लू आहे, त्याच्या आई - बाबांपासून कसे दूर राहू शकेल ते ? तुम्हाला कोणी असे उचलून नेले तर आवडेल का तुम्हाला ? आणि मला, बाबांना चालेल का हे - तुम्हाला दूर नेलेलं?

कशाबशा त्या तयार झाल्या व आम्ही त्या पिल्लाला अंगणात ठेवताच ते त्याच्या आई - बाबांकडे झेपावले. आई-बाबांनी त्याची काहीतरी विचारपूस केली असावी. आपले पिल्लू व्यवस्थित आहे या समाधानात ते दोघेही गोड चिवचिवाट करत पिल्लासकट उडून गेले.

आमच्याकडे मात्र ते पिल्लू फोटोंच्या रुपात अजूनही आहेच आणि मनाच्या खोल आठवणीतही......

Picture 031_0.jpgPicture 033.jpgPicture 035.jpgPicture 039.jpgPicture 041.jpgPicture 045.jpgPicture 049.jpg

आंतरजालावरुन मिळालेले काही फोटो -
घरट्यावर बसलेली मादी

r_Sunbird_Nest_X.JPG

गडद रंगाचा नर

purple sunbird male.jpg

आपण वर पाहिलेले पिल्लू मोठे झाल्यावर असे दिसेल

purple sunbird female.jpg

गुलमोहर: 

अरे.छान!.......मार्चमधलं लिखाण असून आधी वाचल्याचं आठवत नाही.
शशांक..........सगळेच निसर्ग प्रेमी असल्याने बरं आठवलं शांकलीला.....मध चाटवण्याच!!
शशांक "डॉग व्हिस्परर"मधे तुला प्रतिसादात एक बक्षिस आहे बघ! ...जाताना "दिवा" घेऊन जा रे!

किती मस्त वाटतंय हे वाचून.
तुमच्या सहृदयतेला आणि फोटोग्राफीलाही सलाम !!!

आहा, हे वाचलेच नव्हते. किती सुरेख रे. फोटो मस्त, शांकलीचेही कौतुक Happy
काय विश्वासाने बोटावर बसलय ते. जिओ Happy

ओह मीपण हे बघितलंच नव्हतं!
सर्व फोटो सुरेख विशेषतः तळहातावर पिल्लू बसलेला फारच छान!

आहा..
मला प्राण्यांचा स्पर्श खुप आवडतो विशेषतः ते जेव्हा आपल्याजवळ निर्धास्त असतात तेव्हा..ते कसल मस्त आहे..छोटुस एकदम.. आईने आम्हाला सहसा पक्षांना डायरेक्ट कधीच हात लावु दिला नाही..ती म्हणायची कि आपण हात लावल्यावर त्याचे सगेसोयरे त्यांना स्विकारत नाही Sad ..

फुलातला रस पितात तर मग यांचे आई पप्पा यांना अगदी लहान , न उडन्याजोगे असताना काय खाउ घालतात ?
फुलातला रस चोचीत कसा आणणार ?

फुलातला रस पितात तर मग यांचे आई पप्पा यांना अगदी लहान , न उडन्याजोगे असताना काय खाउ घालते ?>>> त्यावेळेस छोटे किडे भरवतात. तसेही मोठे झाल्यावर फुलातल्या रसाबरोबर प्रथिनांसाठी किडेच खातात हे पक्षी.... Happy

मस्त अनुभव.. मध टिपतांनाचा प्रचि अगदी गोड आहे..
त्याच्या आईबाबांनी बरं स्वीकारलं त्याला, काही पक्षी नाही घेत ना परत?
मी लहानपणी एका चिमणीच्या अंडयाला हात लावला तर तिने ते जमिनीवर ढकलून दिले. Sad
त्यामुळे मी घाबरतेच अंडी किंवा पिल्लाला स्पर्श करायला..

गोड आहे तुमचा पाहुणा.. असे पाहुणे रोज यावे..
तुमच्या कुटुंबीयांच पण कौतुक करायला हवंच.. फोटो तर अप्रतिम.. बोटावरच मध शोषणारा तर अवर्णनीय.

Pages