काळजी

Submitted by मी अभिजीत on 26 June, 2008 - 02:17

शेतकरी चढतो फासावर, नको काळजी !
आपणास मिळते ना भाकर, नको काळजी !

पेढ्या, बँका बुडती येथे, बुडेनात का..!
स्विस बॅकेतुन ठेवा लॉकर, नको काळजी !

पाच सनांनी भरेल येथे खुर्चिस्वयंवर,
बिज्वर तरिही ठराल उपवर, नको काळजी !

पचतो आहे तोवर पैसा खात रहावे,
होऊन झाले काय आजवर, नको काळजी !

याने केला दावा, त्याने केस ठोकली,
न्यायनिवाडा नाही सत्वर, नको काळजी !

शिमगा येथे रोजच पेटत असते होळी.
पोळी घ्यावी भाजून त्यावर, नको काळजी !

भावभावना अश्रू मुबलक ग्लिसरिनयोगे.
संधीपुरता यावा गहिवर, नको काळजी !

प्रहार खोटा यांचा, त्यांचे रडणे खोटे.
एक तमाशा सारे संगर , नको काळजी !

गुणवत्तेहून जेथे ठरते संख्या मोठी,
पाचच ते अन आम्ही शंभर, नको काळजी !

-- अभिजीत दाते

गुलमोहर: 

फारच छान!!!!!!! अगदी जळजळीत अंजनयुक्त रचना आहे....
गुणवत्तेहून जेथे ठरते संख्या मोठी,
पाचच ते अन आम्ही शंभर, नको काळजी !

व्वा!! छान ओळी आहेत ह्या!

>>भावभावना अश्रू मुबलक ग्लिसरिनयोगे.
संधीपुरता यावा गहिवर, नको काळजी !

व्वा वा. मतला पण झक्कास, अगदी शंभरपैकी शंभर! Happy

अभिजीत दाते--काही लोकांची नावे बघताच त्यांच्या रचना वाचाव्या वाटतात
त्यापैकी तू एक्!उत्तम