त्यांचा भारत

Submitted by ठमादेवी on 26 March, 2011 - 06:32

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत... शाळेत कधी काळी छातीकडे हात धरून किंवा हात सरळ लांब ठेवून, ताठ उभं राहून घेतलेली प्रतिज्ञा आठवली ती या "त्यांचा भारत" नावाच्या छोटेखानी पुस्तकावर लिहिली होती तेव्हा... प्रास प्रकाशनाचा हा बारावा "प्रास" असा अचानकच हातात पडला... बॉसच्या समोर ठेवलेला होता... सहज म्हणून उचललं आणि पहिलं पान उघडलं... म्हटलं तर कविता आणि म्हटलं तर मुलाखती अशा स्वरूपातलं हे अवघ्या ४६ पानांचं पुस्तक... पहिल्याच पानावर आधी उजवीकडे लक्ष...

नाय!
भूक नाय लागत आपल्याला!.........

अशी सुरूवात करणारं... नजरवेधक.... मी खिळूनच बसले... बॉस म्हणाला जा घेऊन अर्ध्या तासात आणून दे...
जगभर बालक वर्ष म्हणून जाहीर झालेल्या १९७९ सालच्या काही महिन्यांमध्ये कलकत्त्यातल्या एका कॉलेजच्या काही तरुणांनी रस्त्यावर जगणार्‍या मुलांच्या मुलाखती घेतल्या आणि सरकारी माहितीही मिळवली... त्याचं एक छोटेखानी पुस्तक "ओदेर भारत"... याच पुस्तकाचा हा अनुवाद होता...

पहिल्या मुलाखतीतला कॅप्टन म्हणजे एक छोटा मुलगा... तो एका मोडक्या टॅक्सीला स्वतःचं घर बनवून तिथे राहू इच्छितो... तो मुलाखत घेणार्‍या मुलाला सांगतो...
मी काही लहान मुलगा नाही... मी कॅप्टन आहे...
पुढचा संवाद-
वर ये, या दादाला एक गाणं म्हणून दाखव
नाय! आपला मूड नाय!
का रे? भूक लागलीय?
नाय! भूक नाय लागत आपल्याला !
कॅप्टन किती दिवसांत आंघोळ केली नाहीस?
आंघोळ करतो की मी! (हात वर करून दाखवतो) साबणाशिवाय निघणाराय का हा मळ?- तूच सांग... साबणाला पैशे दे ना!
साबणाला पैशे? का? लंपास कर ना!
साबण ! छॅट!

कलकत्यातला एक मुलगा बिशू दास त्याच्या गावी जायला निघालाय काही दिवसांसाठी.. पण त्याच्या मनात आनंद नाही...त्याचा एक भाऊ जो नुकताच जन्मलाय त्याला या मुलाने पाहिलेलंही नाही... मग या मुलाखतकाराला तो कामावरच्या घटना सांगतो... सगळ्यात शेवटी त्याला खल्लास! म्हणायची सवय आहे...

तिकडं बरं वाटतं की इथं?
हे बरं आहे
का?
तशा बर्‍याच गोष्टी आहेत
इथं काय आहे जे तिथं नाही?
इथं सगळं आहे तिथं काहीच नाही...

मग तो एक गाणं म्हणतो...
मायेर देवा मोटा कापड
माथाय तुले ने रे भाई
दिनदुखिनी मा जे तोदेर
करबे की बलो भाई

हे गाणं कुणी शिकवलं तुला?
आपल्याआपणच शिकलो
ऐकलंस कुठे?
गावी. रेकॉर्ड लवत होते
आणखी काही सांगायचंय तुला?
नाय! खल्लास!

आणखी एक मुलाखत...
आई जास्ती का आवडते गं?
लहान मुलांना आईला सोडून राहवतं का? आई नसली की रडू नाही येत? सांग ना?
हो, येतं.
मग?
तुला येईल का आईला सोडून राहता?
मी तर मोठी झालेय. मला येईल. त्या घरातल्या आजी म्हणताहेत तू चल आमच्याबरोबर. ते शाळेत घालणारायत मला. जरा दुकानांबिकानांत जावं लागेल. मग शाळा. शिकायचं.
तू शिकूनबिकून काय होणारायस मोठी झाल्यावर?
व्हायचंय काय त्यात?
मग शिकणार ती कशाला?
असंच!
तुला जर का गडियाहाटच्या बाजारात नेलं आणि सांगितलं की एक काही तरी खरेदी कर.... तर काय घेशील तू?
म्हंजे खायची गोष्ट?
नाही, सगळ्यांतनं काहीही..
मासे.
हे वर्ष- ठाऊक आहे का तुला- लहान मुलांचं वर्ष आहे. लहान मुलांना काय हवं असेल ते मिळेल. तुला काय हवंय?
मला? मी तर मोठी झालेय! मी लहान नाही काही आता!

साताठ वर्षांची टगर स्वतःला लहान म्हणत नाही... तिचं बालपण कुठेतरी हरवून गेलंय... घरच्या परिस्थितीने करपून गेली आहे ती... पण एक छोटी मुलगी, आईजवळ राहू इच्छिणारी आहेच तिच्या आत...

अशा परिस्थितीत आईला शरीरविक्रयाचा व्यवसाय करावा लागला तर मग तिचा मुलगा काय करतो? तो म्हणतो, "सबंध रात्र मी मांजरांशी खेळत बसतो" ... त्याच्या बाबांनी आईच्या बहिणीचा खून केलाय... त्यांना ती आवडायची आणि एक डॉक्टर तिच्याकडे "यायचा" म्हणून...

हा मुलगा प्रश्नांची उत्तरं देतो
आएनं रात्रभर कुणाला घरात घेतलं आणि कडी लावून घेतली तर-
ते तर रोजच होतं की.. कुणी आलं नाही तर आई जेवतच नाही काहीकेल्या. उपाशी राहते. किती सांगितलं तरी ऐकतच नाही काही केल्या.
मग तू काय करतोस रात्रभर?
मी मांजरांशी खेळत बसतो. माझी सहा मांजरं आहेत. पैकी दोन बोके. एक अमजाद आणि धर्मेंद्र. मजाद रागीट आहे भारी. त्याचा एक डोळा निळा आहे आणि एक हिरवा....
सबंध रात्र तू मांजराबरोबर जागून काढतोस?
मग! नाहीतर आईला दारू रोज कोण आणून देईल?

आपल्या शरीरविक्रय करणार्‍या आईल दारू आणून देणार्‍या या मुलाची गोष्ट अंगावर काटा न आणेल तरच नवल.
मग दुसरा एक मुलगा भेटतो... स्मशानात प्रेतं जाळणारा..

. तो म्हणतो

जाळलं की ३१ रूपये. लाकडं रचून ही चिता बनवायचे १६ रुपये.
असं कसं रे ढोसत नाहीस मढं?
लोकं म्हणाले तर ढोसून देतो\
ही जी मढी तू जाळतोस रामाशिस, तुला वाईट नाही वाटत?
माझ्या वयाचं कुणी मेलं तर नाही जाळणार
म्हातार्‍याला जाळायला गंमत वाटते ना?
फार बरं वाटतं.
तुझ्या वयाची मुलगी आली तर?
नाही जाळणार
माझ्या वयाची कुणी मुलगी आली तर?
जाळून टाकीन...

प्रेतं जाळण्याच्या व्यवसायात असलेली ही मुलं नेमका काय विचार करत असतील? आपल्या लहान लहान पोरांना आपण झोपताना बागुलबुवाची भीती घालतो... मग ती कुशीत येतात. आपणही कुणाचं प्रेत बघितलं की हतबुद्ध होतो. मृत्यूची कल्पनाच नको असते... मग ही मुलं रोज सकाळ संध्याकाळ प्रेतं जाळताना घाबरत असतील का?

फुटपाथवर राहणारा एक मुलगा... त्याला आईबाप नाहीत, भावंड नाही... वय किती, आईबाप कधी वारले या सर्व प्रश्नांवर त्याच्याकडे फक्त एकच उत्तर आहे.... "वय किती आहे तुझं? सात? खूप दिवस!" हा मुलगा स्वत्:च्या उदरनिर्वाहासाठी भीक मागतो... आणि स्वतःहून बोलायलाही तयार नाही... काही दोन चार वाक्य बोलला की हा गप्प बसणार...

आई मरतान पाहिलं होतंस तू?
हो.
काय झालं होतं?
आजारी होती.
कुठें वारली?
हे काय. इथंच
नाव काय होतं आईच?
गौरी
वडलांचं?
सर्जूप्रसाद सिंग
वडलांना पाहिलं होतंस तू?
नाही
नाव आईने सांगितलं?
हो/.
कधी वारले ते?
खूप दिवस झाले
किती वर्षं?
खूप् दिवस
वय किती आहे तुझं? सात?
खूप दिवस...

गप्प...

तुझ्या देशाचं नाव ठाऊक आहे का तुला?
देश?
हं ज्या देशाच्या मातीत आत्ता बसलायस तू...
सिंथी नाका.

गप्प

तुझा एक डोळा खूप सुजलाय अन् लाल झालाय, ठाऊक आहे का तुला?
नाही बुवा
आरशात नाही बघत?
खूप मागं एकदा बगितलं होतं...

गप्प

अक्षरशः अंगावर काटा आणणार्‍या मुलाखती... त्याला विरोधाभास ठरणारी पश्चिम बंगाल सरकारने केलेल्या निरनिराळ्या योजनांची माहिती आणि फसवी आकडेवारी... हे चित्र बंगालच का देशातल्या कुठल्याही भागात जाऊन पाहिलं तरी असंच्या असं दिसेल... १९७९ सालीही तेच होतं आणि आजही तेच आहे.... आपण आपल्या भारतात राहत आहोत.... "त्यांचा भारत" कुठे आहे? आता अत्यंत दुर्मिळ असलेलं हे पुस्तक हा प्रश्न तर विचारत नसावं ना?

त्यांचा भारत
संपादक
अमित बोस
उमेश आनंद
पूषन गुप्त
प्रास प्रकाशन.
पाने ४६

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठमे,अंगावर काटा आला. काही मुलाखती खरोखर काळजाला थेट भिडून नको ते प्रश्न विचारतात.
अत्ताही तेच झालं.

कोमल, आपण ना काही करु शकत ना पाहु शकत. भारतीय राज्यघटनेतली कल्याणकारी राज्याची कल्पना एक कल्पना बनुन राहिली आहे.

आत्ताच हे तुला का वाचायला मिळाल असेल ? प. बंगालमध्ये निवडणुका येउ घातल्यात. विरोधक अस नेमक शोधुन काढतात आणि सत्तेवर येताच शेपुट घालतात.

Sad त्यांचा भारत....

मागे पुण्यातल्या स्पॅरोज नावाच्या रस्त्यावरच्या मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेच्या मार्फत काही रस्त्यावर राहणार्‍या मुलांबरोबर थोडा वेळ घालवला होता.... खूपच भिन्न, विषण्ण करणारं जग आहे त्यांचं....

फर्ग्युसन रोडवर, जंगली महाराज रोडवर भीक मागणार्‍या मुलांना माझी एक मैत्रिण बर्‍याच रात्रींना टिफिन घेऊन जायची, एकाच वेळी निरागस आणि कमालीची निगरगट्ट वाटावीत अशी ही मुलं.... चटकन जीवही लावणारी!
त्या मैत्रिणीला रस्त्यावर पाहिलं की जिथे असतील तिथून धावत यायची, तिनं काही खायला आणलं नसलं तरी तिच्याशी गप्पा मारायची. आमचा ग्रुप कधी जंगली महाराज रोडवरच्या रेस्टॉरंट्समध्ये जेवायला गेला की आम्ही मुद्दामहून थोडे जास्त पदार्थ ऑर्डर करायचो... त्याचं पार्सल जाताना जवळपास भीक मागत घुटमळणार्‍या, फुगे विकणार्‍या पोरांच्या हातात कोंबायचो. पैशाची भीक दिली तर त्यांच्या बॉसकडे ते पैसे जातात, त्या मुलांना मिळत नाहीत. रोजचे ठराविक पैसे जमवायलाच लागतात त्या मुलांना.

खूप भयाण जग आहे ते.

जामोप्या, प्रत्येक शहरात या मुलांसाठी काम करणार्‍या काही संस्था आहेत. फक्त त्यांची संख्या व रस्त्यावरच्या मुलांचं प्रमाण हे व्यस्त आहे. Sad

पुण्यात जशी स्पॅरोज संस्था आहे तशाच अजून २-३ संस्था माझ्या माहितीत आहेत... त्या संस्थांद्वारे आपण ह्या मुलांना मदतीचा हात पोहोचवू शकतो.

शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ काम करणारी एक संस्था आहे, ती रेल्वे स्थानकावर/ रस्त्यावरच्या मुलांना रात्रीचा निवारा पुरविते... जेव्हा बर्‍याच वर्षांपूर्वी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होता तेव्हा ते रात्रीचे जेवणही द्यायचे मुलांना, थोडेफार साक्षरता वर्ग घ्यायचे.... सध्याची स्थिती माहित नाही.

सिंहगड रोडलाही एक अशीच संस्था आहे.... रस्त्यावरच्या, पळून आलेल्या मुलांना त्यांच्या घरी सोडायचे काम करतात ते.... एका रेल्वे प्रवासात त्या संस्थेच्या एका कार्यकर्त्याशी ओळख झाली होती तेव्हा त्याने त्यांच्या संस्थेची माहिती दिली होती. कर्नाटकातील एका गावातून पुण्याला पळून आलेल्या मुलाला त्याच्या गावी, त्याच्या घरी पुन्हा सोडून परत येत होता तो.

मुंबईतही काही संस्था आहेत अशा मुलांसाठी काम करणार्‍या... पण या मुलांना अशा संस्थांमध्ये पाहण्यापेक्षा ती रस्त्यावरच बरी असं वाटतं कधी कधी... मी रिमांड होम्समध्ये गेले होते बर्‍याचशा या विषयातल्या बातमीच्या स्रीरीजसाठी, आणि नंतर एका फेलोशिपवर काम करताना... मुलांचे अनुभव ऐकून वाटलं की ही मुलं गुन्हेगार नाहीत... आपण आहोत... समाज आहे...

नितीन. निवडणुकांचा इथे काही संबंध नाही... ते असंच पडलं होतं समोर... मी उचललं...

ठमा, मी ज्या संस्था पाहिल्यात तिथे मुलांवर त्या ठिकाणी राहायचेच असे बंधन नव्हते, ज्या मुलांना तिथे यावेसे वाटायचे ती यायची. इतकेच काय, काही वेळा संस्थेचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर वगैरे हिंडून त्या मुलांना मदत करायचे काही अडचणीच्या वेळी. अर्थात हे चित्र बरेच जुने आहे. सध्या मी त्या लोकांच्या संपर्कात नाही.

बालसुधारगृहांविषयी लिहायचे झाले तर तो एक स्वतंत्र विषय होईल.

अकु... अशा अनेक संस्था आहेत... मुंबईतही अशा संस्था आहेत.. पण या मुलांना एक चांगलं सुरक्षित आयुष्य आपण देऊ शकत नाही... हीच खंत आहे...