मी मज हरपून ...

Submitted by pahaat on 24 March, 2011 - 14:15

मी मज हरपून ...

"जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्यविधाता ... " या ओळी कधीही कानावर पडल्या तरी चित्तवृत्ती उल्हसित होतात. एकटे-दुकटे फिरताना, दुरून जरी हे सूर कानावर पडले तरी आपण थबकतो, रस्त्यातच ५ मिनिटे उभे राह्तो, मायभूमीची आठवण काढतो, प्रफ़ुल्लित होतो आणि परत आपली वाट धरतो. हेच राष्ट्रगीत जेव्हा एक ४५००० लोकांचा समूह गातो, माझ्या देशाचा विजय व्हावा या साठी अंतिम क्षणापर्यन्त साथ देतो ... तेव्हा ’हरपून’ जाण्याशिवाय काही उरतच नाही !

निमित्त झालं ते भारत-दक्षिण आफ़्रिकेच्या वर्ल्ड कप मॅच चं ! भारत म्हणजे क्रिकेटवेडा देश आणि त्यात वर्ल्ड कप म्हणजे क्रिकेट मधला ’सवाई गन्धर्व’! सवाई आणि संगीतप्रेमी हे जसं नातं आहे, तेच वर्ल्ड कप आणि क्रिकेटप्रेमींचं. ’स्कोअर काय झाला बे ??’ ’तेंडल्या आहे कि गेला?’ ’टॉस कोणी जिंकला?’ ’आज आपण हरू बहुतेक .. ’ (?? .. Sad Sad ) . अश्या असंख्य प्रतिक्रिया आणि प्रश्न ... असो ..! तर आम्ही मारामारी करुन या मॅच ची तिकिटे मिळवली आणि १२ मार्च च्या सकाळी नागपूर ला जाऊन पोहोचलो. १२ मार्चच्या गांधीजींच्या दांडीयात्रेची आठवण झाली एकदम! त्यांनी हातात काठी घेऊन दांडी यात्रा सुरू केली होती आणि आम्ही भारताचा झेंडा घेऊन .. Happy विमानामधे अख्खा झेंडा (दांड्यासकट) न्यायला परवानगी मिळाल्यामुळे आमचं देशप्रेम कोणाच्या नजरेतून सुटलं तर नाहीच पण आम्ही मॅच पहायला चाललो आहोत हे ही सर्वांना समजलं .. : . ’यांना कशी बुवा तिकिटं मिळाली, नक्कीच काहितरी वशिला असेल’ असे त्यांच्या मनातले पण चेहयावर स्पष्टपणे उमटलेले प्रश्न आम्ही तेवढ्यातल्या तेवढ्यात वाचून घेतले आणि त्यामुळेच की काय माहिती नाही, पण आमचे चेहरे जरा जास्तच आनंदी दिसत होते Happy Happy

नागपूर ला सकाळी सकाळीच पोहोचल्यामुळे २.३० पर्यंत काय करायचं हा प्रश्न होता. आम्ही प्रथमच लाईव मॅच पाहत असलो तरी आमच्या बरोबर असलेल्या मित्राने हा अनुभव आधी घेतला होता. त्यामुळे ’कुठे बसलो तर काय दिसतं’, ’कसं दिसतं’, ’ऊन कुठे येतं’, ’पॅविलिअन कुठून जवळ आहे’, वगैरे वगैरे चर्चा सुरू होत्या. आमची उत्कंठा इतकी वाढली होती की कधी एकदा तो झेंडा घेऊन स्टेडिअम वर पोहोचतोय असं झालं होतं. शेवटी ती घटिका आली आणि आम्ही मैदानाकडे आगेकूच केलं. नागपूर स्टेडिअम कडे गावातून जाणारा एकच रस्ता आहे. त्या रस्त्याला आम्ही जसे लागलो तसं लक्षात आलं की आपल्यासारखी हजारो माणसं हातात झेंडे नाचवत, उत्साहात निघाली आहेत. रस्त्यावर नुसता इन्डिया-इन्डिया चा गजर सुरु होता. घरी स्वस्थ बसवत नसल्यामुळे खरंतर आम्ही वेळेच्या बरेच आधी निघालो होतो, तरी पण ट्रॅफिक, पार्किंग, तिकिटे तपासण्यासाठी असणारी लोकांची रांग या सर्व गोष्टी अस्वस्थ करत होत्या. रस्त्यातच झेंडे विकणारे लोक आणि पोलिस ही १०-१० फ़ुटांवर पसरले होते. दक्षिण आफ़्रिकेचे झेंडे आणि समर्थक दिसताच लोकांच्या आरड्या ओरड्याला नुसता ऊत येत होता. शेवटी एकदाचे आम्ही स्टेडिअम वर पोहोचलो आणि पार्किंग, तिकिटे असे सोपस्कार उरकून आतमधे (अक्षरश:) घुसलो.

002Beautiful_Stadium_Stands_orig_1.JPG
आतमधे शिरताच हिरव्यागाSSSSर स्टेडिअम चं झालेलं ते दर्शन काय वर्णावं ... वाह वाह ...! TV वर खूप मोठं आणि लांबवर पसरलेलं असं दिसणारं स्टेडिअम आता अगदी जवळचं वाटू लागलं. इथेच आता आपले एकेक वीर उतरतील, धावांचे डोंगर उभे करतील, SA च्या विकेट्स घेतील अश्या विचारांनीच इतकी गंमत वाटत होती की बस्स ! मॅच सुरू व्हायला १.५ तास अवकाश होता. आम्हीही हळू हळू स्टेडिअम च्या वातवरणात रुळलो .. थोड्या वेळाने भारत आणि दक्षिण आफ़्रिकेचे संघ सरावासाठी मैदानात उतरले आणि इतका वेळ कुठे भेळ खा, एकमेकांचे posters बघ, चित्र विचित्र - रंगवलेले चेहरे न्याहाळ असं करत बसलेला प्रेक्षकवर्ग अचानक जागा झाला. आवडत्या खेळाडूंच्या नावाने आरडा ओरडा करत आम्ही सर्वजण सराव पाहू लागलो. दक्षिण आफ़्रिकेच्या संघाने शिस्तबद्ध सुरूवात केली. warm up, stretching, catches ( win matches ;-)), bowling अशी व्यवस्थित प्रॅक्टिस पाहत असतानाच प्रेक्षकांमधून गोSSSSSSल असा रोअर ऐकू आला. म्हटलं अरेच्या! युवराज सिंगला गोल अडवता आलेला नाही दिसतोय .. अरे हो, सांगायचं राहिलच की आपला संघ त्या वेळी फुटबॉल खेळत होता. थोडसं relaxation, you know ! पण गॅरी कर्स्टन अवतरले आणि त्यांनी संघाची छानच प्रॅक्टिस घेतली.

003PracticeSessions_1.JPG

टॉस झाला आणि मग .... "जन गण मन ....!!" भारतीय असण्याचा अभिमान प्रत्येकाच्या चेहयावर तर दिसत होताच पण मनामधे सुद्धा फक्त भारतच भारत व्यापून उरला होता. राष्ट्रगीत जसं संपलं तसा प्रत्येक जण भारावून गेला होता. ’वन्दे मातरम’ चा पुन्हा एकदा जयघोष करून आम्ही आपापल्या जागा घेतल्या. ’अशीच ही सगळी माणसं कायम एकजुटीने राहिली आणि वागली तर???’ असा एक आगाऊ प्रश्न तेवढ्यात मनाला शिवून गेला .

005Review.NOT_OUT!!!_1.JPG

आता आमचे डोळे लागले होते ते आपल्या धुरंधर फलंदाजांकडे. सेहवाग आणि सचिन. ह्या दोघांनी जसं मैदानावर पाउल ठेवलं तसा स्टेडिअम मधे जो दंगा झाला ... बापरे ! तो आवाज अजूनही कानात घुमतोय. सेहवागसाठी टाकलेला पहिलाच बॉल आणि त्याने तो शैलीदार टोलवला, सीमेपार .... ४ रन्स ... त्यानंतर अखंड धावांची बरसात होत गेली ती गंभीर आऊट होई पर्यंत. स्टेडिअम मधे इकडे फलंदाजांनी चेंडू उचलला की तिकडे लोक उसळत होते. इंडिया-इंडिया .. सचिन-सचिन .. ह्यापलिकडे दुसरं काही ऐकूच येत नव्हतं. ’जगातल्या उत्तमोत्तम खेळाडूंचा खेळ पहायला मिळतोय यापेक्षा आणखी सुख ते काय’ असाच भाव सर्वांच्या मनात होता. सगळ्यात न विसरता येणारा क्षण म्हणजे सचिनच्या १०० व्या धावेचा. सगळ्या स्टेडिअमने उभं राहून टाळ्यांच्या गजरात सचिनच्या साथीने जणू काही ती १०० वी धाव पूर्ण केली असं वाटून गेलं .. आम्हीही मनातल्या मनात या महान खेळाडूला सलाम केला. इतकी वर्षं खेळूनही मैदानावर ज्या निश्चयाने तो आपली कामगिरी पार पाडतो त्याला तोड नाही .
जितके आनंदाचे क्षण सुरूवातीच्या फलंदाजांनी दिले तेवढेच वाईट वाटले ते शेवटचे ७-८ जण एकामागे एक तंबूत परतलेले पाहून. आणि आपल्या डोळ्यासमोर जेव्हा हे घडतं तेव्हा जाम चिडचिड होते ... Sad

दक्षिण आफ्रिकेची inning पाह्ताना पण अगदी सारख्याच अनुभवाला आम्ही सामोरे गेलो. सुरूवातीचा आनंद आणि मॅच संपताना सुन्न झालेलं डोकं. अगदी शेवटच्या over पर्यंत आशा न सोडणारा प्रेक्षक वर्ग शेवटच्या over मधली पहिली ४ आणि मग ६ पाहताच एवढा शांत झाला म्हणून सांगू ... स्टेडिअम मधे शेजारच्या व्यक्तिचं बोलणं ऐकू येणार नाही एवढा दंगा करणारा audience अगदी हतबल आणि चिडिचुप झाला होता.

014Difficult_to_Get_The_Car_OUT_1.JPG

मॅच हरलो आणि आम्ही खालमानेने स्टेडिअम च्या बाहेर पडलो. पार्किंगच्या प्रचंड गोंधळानंतर कसेबसे रात्री १.३० च्या सुमारास घरी परतलो. सकाळचा उत्साह आता मात्र पार मावळला होता, सगळ्यांचे चेहरे पडले होते. पण अजूनही मनाने त्या मैदानावरच आहोत असं वाटत होतं ... क्रिकेटची नशाच और आहे !! तो crowd, तो उत्साह, ती २ टीम्स मधली अंतिम विजयासाठीची झुंज, प्रत्येक ४ आणि ६ बरोबर त्या माणसांच्या उसळणाया लाटा, Team India ला cheer करण्यासाठी केलेले गजर, टाळ्यांचा पाउस, देहाच्या कणाकणावर केशरी-पांढरा आणि हिरवा रंग चितारुन देशप्रेमाचे दर्शन घडवणारे प्रेक्षक, आपला player आऊट होताना वाचला की ऐकू येणारे सुस्कारे, चिडचिड-संताप-frustration, मॅच हरल्यानंतर झेंडे फेकून देण्याइतपत जाणारी मजल आणि हाच का तो मगाशी भारत-भारत करणारा प्रेक्षक असे पडणारे प्रश्न ... कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी, भान सोडायला लावणार्‍या , भान जपायला लावणार्‍या आणि ’मी मज हरपून बसले गं ...’ म्हणायला लावणार्‍या ....

Panoramic_1.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान लिहीलय्..त्या मॅच नंतर निराशा झाली खरी..पण हे थ्रील प्रत्यक्ष अनुभवण्याची मजा काही औरच असेल!

सुरेख शब्दबद्ध केलंय. असे बरेच सामने आहेत कि जे आजही लक्षात राहतात.
शेवटी 'विजय' तो विजयच पण कधी कधी 'पराभव' सुद्धा एक वेगळा थ्रिल आणि निखळ करमणूक करतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...
मागच्या दोन्ही matches पण मस्त झाल्या ...
आता फक्त १ पाउल पुढे टाकल की कप आपलाच Happy

टीम India ला शुभेच्छा ....
कप घेउनच या घरी :ड

मस्त.. >>मॅच हरल्यानंतर झेंडे फेकून देण्याइतपत जाणारी मजल आणि हाच का तो मगाशी भारत-भारत करणारा प्रेक्षक असे पडणारे प्रश्न ..>>

धन्यवाद ..
फायनल फारच सुरेख झाली ... धमाल आली एकदम ...!!! Happy

आता असेच एकजुटीने श्री. आण्णा हजारेन्ना पाठिम्बा देउ या !!