झेन कथा १० फुलदाणी

Submitted by ठमादेवी on 23 March, 2011 - 03:43

एका नवीनच उभारण्यात आलेल्या विहारासाठी गुरू शोधण्याची जबाबदारी ह्याकुजोनवर होती... त्याच्याकडे अनेक हुशार शिष्य होते... त्यामुळे कोणाला निवडावं हेच त्याला कळत नव्हतं... त्याने सर्वांना बोलावलं आणि एक पाण्याने भरलेली फुलदाणी समोर ठेवली

हे काय आहे? त्याने विचारलं...

सरळ उभं आहे पण ते झाड नाही... आतमध्ये पोकळ आहे पण या विहारातल्या स्वैपाक्याचं ते डोकं नाही... एक भिक्षु म्हणाला..

आतमध्ये पाणी आहे पण ती विहीर नाही... पाणी घ्यावं तर काढता येत नाही... दुसरा म्हणाला...

तरीही गुरूला काही समाधान वाटेना...

तेवढ्यात तिथल्या स्वैपाक्याचा धक्का लागून ती फुलदाणी फुटली...
अरेरे ही फुलदाणी होती आणि आत पाणी होतं.... स्वैपाकी म्हणाला... ते ऐकून गुरूच्या चेहर्‍यावर आनंद आणि समाधान विलसलं...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चातक, टिवटिव, कुठलीही गोष्ट आत्मसात करणं आणि ती गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवणं ही एक कला असते... तुम्ही किती अलंकारिक बोलता यावर तुम्हाला किती आणि काय समजलं हे अवलंबून नसतं... साध्या सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशा शब्दांत ज्ञान वाटलं तर ते सर्वांपर्यंत पोहोचतं, कळतं आणि आत झिरपतं सुद्धा!!! पहिल्या दोन शिष्यांना ते काय होतं हे कळलं होतं पण सोप्या भाषेत मांडता आलं नाही जे काहीही ज्ञान नसलेल्या स्वैपाक्याला जमलं... म्हणून गुरू स्वैपाक्यावर खूष झाला...

किमान मी तरी या कथेचा अर्थ असा लावला आहे... आता आणखी कुणाला काय अर्थ लागतो ते पाहूयात... Happy

ठमा, मला ते पॉझिटिव्ह बोलणे आणि निगेटिव्ह बोलणे असा फरक वाटला. आधीच्या दोन्ही रिमार्क्स मधे, ते काय आहे यापेक्षा काय नाही यावर (उगाचच) भर होता.

आतापर्यंतच्या कथांमधली सर्वात चांगली कथाये ही!
बरयाच जणांचं 'असं असावं', 'असं असतं तर' किंवा साध्यासाध्या गोष्टींना उगीचच्या उगीच कॉम्प्लिकेट करण्याच्या नादात 'अ‍ॅक्चुअल काय आहे' किंवा 'वस्तुस्थिती' चं भान सुटतं. आणि ज्याचं भान सुटलं तो शहाणा नक्कीच म्हणवला जात नाही.

अजून एक अर्थ Happy

पहिल्या दोघांनी वर्णन करताना फक्त शब्दांचे खेळ दाखवले. ते खोटं बोलत नव्हते पण त्यांच्या बोलण्यामुळे नेमका अर्थबोध होत नव्हता.

पण स्वयंपाक्याने सऱ साध्या सोप्या शब्दात वर्णन केलं.

गुरु असाच असावा, अचूक / नेमका.

छान

गुरुकुलातील शिक्षणपध्दतीचे कंगोरे काही गुढरित्या विकसित केलेले असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा Disciple ला (इथे भि़क्षु) प्रत्यक्ष त्याच गुरूकडून असे काही धडे मिळतात की आपण जर "सरळसोट" अथवा "व्यावहारिक" उत्तर दिले तर गुरूला ते भावणार नाही असाच प्रत्येक शिष्याच्या मनी संशयाचा भुंगा रुंजन घालीत असतो. याच पठडीतील ते पहिले दोन भिक्षु. जी गोष्ट सैपाक्याला समजते ती इतकी वर्षे गुरुकुलात राहिलेल्या दोन्ही भिक्षुंना समजत नाही असे मानण्याचे कारण नाही. पण परत शिक्षणाची ती भीती त्यांच्या मनी अशी काही दाटली आहे की ज्यामुळे ते माहीत असूनाही स्वच्छ सूर्यप्रकाशालादेखील 'अवकाशातून परावर्तीत होत असलेला अज्ञात चांदणीवरील प्रलय" असेही उत्तर देतील.

पुढे सैपाक्याने "फुलदाणी आणि पाणी' असे अचूक उत्तर दिले म्हणून जर त्याची नूतन विहाराच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाली तर मग गुरुकुल शिक्षणपद्धतीचे महत्वच संपले. (त्यातल्या त्यात समाधान म्हणजे कथेत गुरुच्या चेहर्‍यावर समाधान दिसले इतपतच आले आहे. सैपाक्याची 'गुरुपदी' नियुक्तीचा आदेश निघालाही नसेल.)

(ठमाताई ~ तुम्ही थेट कथा सांगितली असून या कथेचे तात्पर्य सांगितलेले नाही. तुमच्याकडून ते वाचायला आवडेल.)

Happy

प्रत्येक वेळी कथेचे तात्पर्य सांगितले तर विचार अधिक सहज कळतील असे वाटते. प्रतिसाद वाचण्यापुर्वी खर्रच बोध झाला नव्हता.

प्रतिकना अनुमोदन.
मी असेही म्हणेन की विद्यार्थ्यांना ही फुलदाणी आहे हे साधे उत्तर द्यायला कमी पणा वाटत असेल. म्हणजे गुरुकुलात शिक्षण घेउन एवढ सरळ उत्तर द्यायचं? आम्ही "क्ष" गुरूचे शिष्य आहोत.. असा अहंपण असेल का?

जाजु, ही देखील शक्यता आहेच...

मला आणखी एक अर्थ जाणवला... म्हणजे मी त्या कथेवर काल रात्री विचार करत असताना तो अचानकच जाणवला... गुरूकडे केवळ शिकण्यासाठीच गेलेल्या शिष्यांना गुरूला नेमकं काय ते सांगणं कठीण गेलं... पण स्वैपाकी मात्र तिथे शिकायला गेला नव्हता... नुसत्या गुरूच्या सम्रोर असण्याने, त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. हे महाभारतातल्या एकलव्यासारखं आहे का? असंही मला वाटलं...
त्याचबरोबर मला आणखी एक कथा आठवली... एक हवामान संशोधक एका गावात गेला... त्याने गावातल्या लोकांना सांगितलं की यंदा पाऊस फार पडणार नाहीय... आणि तो उशिरा पडेल... तेव्हा तुम्ही पेरणी इतक्यात करू नका... गावातल्या सर्व शेतकर्‍यांनी त्याचं ऐकलं... पण एक शेतकरी मात्र कामाला लागला होता... त्या हवामान संशोधकाने त्याला म्हटलं, अहो काका, मी सांगितलं ते तुम्हाला कळलं नाही का?
शेतकरी म्हणाला, मुला असंय की मी माझ्या गुरांवर विश्वास ठेवतो याबाबतीत... पाऊस पडणार असला की ते एका विशिष्ट पद्धतीने कान हलवतात... गेले दोन दिवस त्यांनी तेच सुरू केलंय आणि आता उद्या पाऊस पडेल... दुसर्‍या दिवशी पाऊस पडला... शास्त्रोक्त ज्ञान घेतलेल्या संशोधकाकडे जी दृष्टी नव्हती ती नेमकी या शेतकर्‍याकडे होती...
त्यामुळे तुमच्याकडे माहिती किती आहे यापेक्षा तुम्हाला ज्ञान किती आहे हे महत्त्वाचं.... वरच्या कथेतही त्या दोघांकडे माहिती होती आणि स्वैपाक्याकडे ज्ञान होतं असं दिसतं का?