मॅग्निट्युड ९.०

Submitted by सावली on 22 March, 2011 - 05:42

दिवस - ११-मार्च-२०११
स्थळ - तोक्यो

१३:३०
ऑफिस मध्ये सेमिनार होतं. साधारण दीडशे बाहेरचे लोक शोरूम मध्ये आलेले. बॉसने माझे नेहेमीचे काम सोडून मला सेमिनारचे फोटो काढायला सांगितलं. आवडीचं काम पण नेहेमीचा कॅमेरा नव्हता म्हणून त्याचा एस ९५ घेतला. नेहेमीचा कॅमेरा नसल्याचं वाईट वाटलंच पण ते किती बरं झालं ते नंतर कळलंच

१४:४६
जरा हलतेय का बिल्डींग ? असं वाटलं. तसही मला खूप लगेच भूकंप जाणवतो. मी बोलेपर्यंत सगळ्यांनाच जाणवलं. बिल्डींग आधी हळूच झुलायला लागली मग काही सेकंदात जोरजोरात गोलाकार घुमायला लागली असं वाटलं. शोरूम मधली प्रोडक्ट्स सगळी धडधड खाली पडली. तरीही कोणी किंचाळल नाही. सगळे खुर्च्या सोडून खाली बसले. बिल्डिंगची रोटेशन जरा कमी झाली असं वाटतंय तोच एकदा जोरदार धक्का बसला. माझ्या डोक्यावरच असलेले वरचे लाईट्स साठी सिलिंग मधे असलेले दरवाजे खाड खाड उघडले आणि बिल्डिंग वरखाली धडाधडा हलायला लागली. एकदम रफ धावपट्टीवर विमान उतरताना कसं वाटतं तसच काही सेकंद वाटलं. मग बहुधा भूकंप थांबला पण बिल्डीगचे झुलणे हळूहळू होत होते. भूकंपामध्ये टिकाव धरण्यासाठी विशिष्ठ रचना केलेली असल्याने ते कमी व्हायला जास्त वेळ लागतो.

१४:४६ नंतर दोन तीन मिनिटे.
सगळे जरा उभे राहिले. बॉसने येऊन मला याचे व्हिडियो शुटींग नं करण्याबद्दल विचारलंच. तर मी त्या पडलेल्या सामानाचे फोटो काढले. अजुनही समोरच्या बिल्डिंग जोरदार झुलताना दिसत होत्या. आमच्या बिल्डिंगमधल्या सिक्युरिटीने तिथेच थांबायची अनाउन्समेंट केली. म्हणून तसेच थांबलो.

१४:४६ दुसऱ्या धक्क्यांम्तर अजून काही मिनिटे
डेस्क जवळ परत आले. नवर्याचा फोन लागेना.डेकेअरचा फोन लागेना. नेटवर बघितलं तर इवाते का कुठेतरी जपानी स्केलवर ७ दिसलं. सात म्हणजे इथे सगळ्यात जास्त !! म्हणजे भयानक काहीतरी झाल्याचा अंदाज आला. तोक्यो जपानी स्केल ५प्लस दिसलं. त्सुनामीची वॉर्निम्ग दिसली. नवऱ्याचा इमेल आला त्याला उत्तर दिलं आणि लगेच मायबोलीवर मंजिरीसाठी एक मेसेज टाकला. तेवढ्यात माझ्या बरोबर काम करणारा आत आला. तो जिन्यांवरून ११व्यामजल्यावर आला आणि खूप घाबरलेला दिसला. त्याने सांगितलं आत्ताच्या आत्ता खाली चला. या बिल्डीगला तडे गेलेत. तेवढ्यात पुन्हा एकदा तसाच व्हर्टिकल धक्का बसला आणि पुन्हा आमचे विमान लँड झालं. तेवढ्यात बिल्डिंग वाल्यांनी अनाउन्समेंट केली कि बाहेर जा.
नवऱ्याला एक इमेल टाकला आणि खाली निघालो. इतक्या टेन्शन मध्ये सुद्धा आमच्या स्टाफ ने सगळ्या १५० लोकांना जिन्याने सावकाश उतरायला मदत केली. कोणीच धक्काबुक्की धावपळ केली नाही. म्हातारे लोकही होते ते हळू हळू उतरले तरी त्यांच्या मागचे सगळे सावकाशीने खाली गेले.विचार केला तर १५० बाहेरचे आणि १५ स्टाफ असे १६५ लोक एका शोरूम मधे. एकच एक्झिट होतं. सगळे घाबरून धावायला लागले असते तर?

१५:२०
खाली उभे होतो. कोणाचेच फोन लागत नव्हते. सगळे टेन्शन मध्ये खाली उभे होते.

१५:३०
बिल्डिंग सिक्युरिटीने चेक करून सगळं सेफ असल्याचे सांगितलं. आणि बाकीचे सगळे लोक वर पुन्हा जायला लागले. माझा ऑफिसचा वेळ संपला असल्याने मी निघायचा विचार केला. पण नक्की कसे जावे हे कळेना. ट्रेन बंद असल्याचे कळलेच होते. इथून निघाले तर नंतर नवऱ्याशी काही सम्पर्क राहणार नाही म्हणून सरळ घरी जायला होत नव्हतं. मग त्याच्या ऑफिस पर्यंत चालत गेले. आणि तिथे खाली त्याला शोधले पण त्यांना खाली जायची ऑर्डर नव्हती. आणि फोनही लागत नव्हते.

१६:१०
फोन लागत नाही म्हणून तोक्यो स्टेशन मधे पब्लिक फोन शोधायला गेले. तर स्टेशन पूर्ण भरलेले. अजूनही मला कुठे काय किती झालेय याची फारशी कल्पना नव्हतीच. पण इथे अंदाज आलाच. फोनला खूप मोठी लाईन. तेवढ्यात थोडस इंटरनेट चालू आहे असे वाटले. म्हणून नवऱ्याला इमेल केला पण तो गेलाच नाही. नेट बहुतेक ब्लॉक झालं. मग पुन्हा त्याच्या ऑफिस मधे चालत गेले.

१६:५०
नवऱ्याला फोन करुन खाली बोलावले. त्याला अजून काम होतं पण बहुतेक त्याला बाहेरच्या गर्दीचा अंदाजही नव्हता. शेवटी खाली आला तो आणि आम्ही निघालो.

१७:००
बसने जाण्यासाठी बसच्या थांब्यावर गेलो तिथून रांगेचा शेवट शोधात निघालो. दोन रस्ते पार करून गेल्यावरही शेवट दिसेना तेव्हा तो नाद सोडून एका टॅक्सीच्या रांगेत उभी राहण्याची चूक केली. बराच वेळ उभे राहिल्यावरही अजून काही शे मीटर रांग होतीच.

१७:३०
चालत घरी जायचा निर्णय घेतला. स्टेशन मध्ये जाऊन पाणी घ्यावे असा विचार करून गेले तर सगळी दुकाने सामान संपल्याने बंद! शेवटी एका वेंडीग मशीन मध्ये पाणी मिळाले.
मग एका ठिकाणी फोन बुथ शोधून रांगेत उभे राहिलो. लेकीच्या डेकेअर मध्ये फोन लावला. तिथे सगळे आलबेल असेल अशी खात्री होतीच त्याप्रमाणे होतेच. तिथे लोकांना , मुलांना ट्रेन केलेलं असतंच त्याप्रमाणे सगळे मध्ये येऊन एकाजागी बसले. डोक्यावर काही पडणार नाही याची काळजी घेतली. इमारतीला काही झालं तर मुलांना पालकांनी कुठे भेटायचं हे ही सांगून ठेवलेलं असतंच. पण सगळे डेकेअरमध्येच होते. त्यामुळे काळजी नव्हती. त्यांनी मुलांना रात्रीचे जेवण वगरेही दिले.

१८:००
चालायला सुरुवात केली रस्त्यात प्रचंड गर्दी. पण तरी सगळे शांतपणे चालत होते.त्याच्या फोनवर नेट चालू होतं म्हणून रस्ता शोधायला जीपीएस उपयोगी पडलं. रस्त्यात सगळ्या गाड्याही थांबल्या होत्या. काही ठिकाणी दिवे नसल्याने अंधारही होता.

२१:००
लेकीला डेकेअर मधनं घेतलं. सगळ्या सेन्सेईचे हजारवेळा आभार मानले. काही सेन्सेई आज तिथेच रहाणार होते. अजूनही काही पालक पोचले नव्हते. सगळ्यांची चौकशी करून घरी आलो. दरवाजा उघडताना धाकधूक होती काय्य काय पडलं असेल असा विचार करत होतो. पण नशिबाने सगळं ठीकठाक होतं. कुठे काही पडलं नव्हतं. आल्यावर सगळ्यात आधी टीव्ही लावला आणि मग काय प्रचंड उत्पाथ झालाय याची कल्पना आली.

रात्री १ पर्यंत
बराच वेळाने घरी आणि इतर काही मैत्रिणीशी सम्पर्क झाला. बातम्या बघून भयंकर वाटत होतं. मध्येच केव्हातरी भूकंपाचे धक्के बसतच होते. रात्री झोपायला गेल्यावरही झोप येतच नव्हती बाहेरचे लाईट चालू ठेवले. ईव्हेंक्यूएशन ब्याग तयार करून दरवाजाजवळ ठेवली. कुठे जायचं त्याचा म्याप आधीच सिटी ऑफिस ने दिलेला तो काढून ठेवला.

दुसरा दिवस सकाळ:
उठून आधी बातम्या लावल्या. पुन्हा अजून जास्त डीटेल्स आले होते. खेळण्यासारख्या दिसणाऱ्या गाड्या आणि बोटी वाहून जाताना बघायला भयानक वाटत होतं. गावच्या गावे अक्षरश: वाहून गेली होती.
सकाळीच दुकानात जाऊन थोडं आठवडयाच सामान आणलं. थोडं रेडी टू इट पण आणून ठेवलं. लाईट , ग्यास गेले तर काय खाणार असा विचार करून. सकाळीच हे सगळे करणे किती उपयोगी होतं ते कळलंच नंतर. नंतर सगळ्या दुकानात खडखडाट झाला होता.
पुन्हा एखादा धक्का बसत होताच. मध्येच केव्हातरी टीव्हीवर टिंग असा आवाज होऊन येणाऱ्या भूकंपाची नोटीस यायची आणि काही सेकंदात पुन्हा धक्का.
एका जवळच्या मैत्रिणीच्या आईबाबांचे घर सगळे वाहून गेले पण आईबाबा सुखरूप आहेत असंही कळलं.

दुसरा दिवस दुपार:
मला पहिल्यांदा अणुभट्टीची बातमी कळली. सगळ जपानी मध्ये असल्याने सुरुवातीला नीट कळत नव्हती. मग एका मैत्रिणीला भाषांतर करायला सांगितलं. तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

आधी फुकुशिमा दाई इची १बान मधे एक स्फोट झाला आणि धूर आला असा एक व्हिडियो टीव्हीवर दिसला. तो दोन वेळा दाखवल्यावर गायबच झाला. त्यामुळे जरा टेन्शन आलं. कि नक्की काय लपवत आहेत ते कळेना. तो व्हिडियो नंतर दुसऱ्या दिवशी पर्यंत दाखवला नव्हता. शिवाय थोड्या वेळाने अजून एक फोटो. त्यात सकाळी ९ वाजताच्या फोटोत त्या प्लांट ची इमारत दिसत होती तर दुपारी चार च्या फोटोमधे फक्त त्याचा सांगाडा दिसत होता. मग बऱ्याच उलट सुलट इंग्रजी बातम्या, अनालिसीस वगरे ऐकून शेवटी संध्याकाळी एदानो यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यांनी स्फोट झाल्याची बातमी दिली. आणि आधी ३.५ किमी मध्ये धोका असल्याचे सांगितलं. नंतर ते १० किमी केलं. खरंतर हे प्लांट भूकंप झाल्यावर आपोआप थांबले होते. लाईट गेल्यावर बॅकअप डिझेल पॉवर वर शिफ्ट झाले होते. पण नंतर आलेल्या त्सुनामीने डिझेल पॉवर सप्लाय खराब झाला आणि प्लांटचे तापमान प्रचंड वाढले.

पुढचा सगळा वेळ टेन्शन मध्येच गेला. आता भूकंपाची भीती नव्हती फारशी. पण रेडीएशनचे काय ते कळत नव्हते.
रविवारी अजून एका रीअ‍ॅक्टर मध्ये स्फोट झाला आणि आग लागली. रेडीएशन थोडावेळा पुरते वाढले. आणि पुन्हा कमी झाले. आता २० किमी मधल्या लोकांना बाहेर काढलं आणि ३० किमी मधल्या लोकांना शक्यतो घरातच राहून ए.सी वगरे सगळे बंद ठेवायला सांगितले.

सगळ्या एव्हेक्युएट केलेल्या लोकांना खायला प्यायला फारसे मिळत नव्हते. एखादी ओनिगिरी, एक डोनट, एक बाटली पाणी असे जेवण. काही ठिकाणी थोडी बरी परिस्थिती होती तिथे सूप किंवा नुडल्स शिजवून मिळत होते. अशा परिस्थितीतही लोकं प्रत्येकी एक बेन्तो आणि एक बाटली पाणी हे आपले आपण घेत होते. उगीच कुनी खेचाखेची नाही. ओरबाडून घेणे नाही. कोणाची फारशी तक्रार नाही.
सतत काही तासांनी प्राईम मिनिस्टर कान किंवा एदानो यांची प्रेस. कॉन्फ असायची. काय करणार आहेत. काय परिस्थिती आहे याबद्दल ते नीट उत्तरे द्यायचे. शिवाय तोक्यो इले. पॉवर कंपनी काय करतेय, तिथे लोकं कसे प्रय्तन करत आहेत हे सांगायचे.
११तारखेचा भुकंप ९.० रिश्टर स्केलचा होता हि बातमीही आली. आधी ८.९ चा सांगितला होता.
अजुन साधारण १०००० लोकांचा ठावठीकाणा कळत नव्हता. साधारण ३००० मृत घोषीत केले होते. घरे, आणि इतर वित्तहानी तर अपरिमित होती.

आम्ही सगळा वेळ बातम्या बघण्यामध्ये बिझी असल्याने लेक प्रचंड वैतागलेली होती. त्यात मध्ये मध्ये येणारे भूकंपाच्या सुचना आणि काम थांबवून एका जागी बसणे यामुळेही तिला जरा भीती वाटत होती. तिच्या खेळातही , ब्लॉक्स च्या खेळण्यातही ती भूकंप भूकंप खेळत होती. बघून वाईट वाटत होतं, पण इथल्या सगळ्याच मुलांना असंच वाटणार ना!

सोमवार १४ मार्च-
नेहेमीसारखेच ऑफिसला गेलो. नेहेमीची कामं सुरु केली. पॉवरसेव्हिंग करण्यासाठी एलेव्हेटर, एस्कलेटर बंद होते. पण कुठे कोणाची तक्रार चिडचिड दिसलींच नाही. ट्रेनही बऱ्याच बंद होत्या. किंवा खूप कमी फ्रिक्वेन्सीने चालत होत्या. प्लेटफॉर्मवर जायला इतकी गर्दी होती कि रांगा अगदी पायऱ्या चढून वर तिकीट गेट्स च्या बाहेर आल्या होत्या. पण लोक शांतपणे रांगेत उभे होते.
ऑफिसमध्ये आवराआवरी करत असतानाच अजून एक भूकंपाचा धक्का बसला. त्या नंतर बॉसने ऑफिस चे शोरूम् आठ दिवस बंद ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस बंद ठेवायचा निर्णय घेतला.
ही अनिश्चितता बघून मग आम्ही दोघेही फोनवर बोललो. थोडे दिवस भारतात राहूयात का असा विचार करायला लागलो. हं निर्णय फारच कठीण होता. शिवाय सगळे आमचे जपानी मित्र मैत्रिणी इथे असताना सगळ्यांना सोडून जाणे पटत नव्हते. शेवटी रात्री पुन्हा एकदा बोलून निर्णय घ्यायचे ठरवले.खरंतर घरातूनही लेकी साठी प्रेशर येत होतं कि लगेच परत या.
घरी येऊन मंजिरी आणि नेरीमाशी बोलले. त्यांनीही सांगितले कि त्यांच्या ओळखीचे काहीजण परत जात होते. मग पुन्हा नवऱ्याला फोन केला तर त्याने नुकतेच तिकीट बुकही करून टाकलेले. त्या एजंटने सांगितले कि लगेच बुक केलेत तर १६चे मिळेल नाहीतर मग १८ /१९ चे मिळेल. हे ऐकून त्याने लगेच बुक करून टाकले. हा निर्णय घेतल्यावर रात्री दोघेही झोपू शकलो नाही. फारच वाईट वाटत होतं.
टीव्ही वरच्या बातम्या चालूच होत्या. आता बातम्यांचे स्वरूप जरा बदलून रेस्क्यू ऑपरेशन्स आणि इतर गोष्टी दाखवत होते.

मंगळवार १५ मार्च -
आज ऑफिस नव्हतेच. पण मग इतर लायब्ररीची पुस्तके परत देणे. नर्सरी मध्ये जाऊन सांगणे अशी कामं केली.सगळया भाज्या दुघ वगरे नर्सरी मध्ये नेऊन दिले म्हणजे फुकट जाणार नाही. नर्सरी मध्ये सेन्सेईना वाईट वाटलं. आणि त्याहून जास्त वाईट मला वाटलं. पण शेवटी निर्णय घेतलेला होता. काही जपानी लोकही हिरोशिमा, किंवा ओसाका अशा लांबच्या शहरात निघाले होते.
पुन्हा मध्येच तोक्यो मध्ये थोडं रेडीएशन आढळल्याची बातमी आली. आजही प्रेस. कॉन्फ झाली.
दुपारी एअरपोर्ट वर जाण्यासाठी काही उपाय मिळत नव्हता. बसेस बंद होत्या. ट्रेन बंद होत्या. शेवटी एका ठिकाणी प्रीपेड टेक्सी केली.
संध्याकाळी एक मोठा भूकंपाचा धक्का बसला. तोक्यो मधेही बऱ्यापैकी जोरात वाटला. हा धक्का शिझुओका मध्ये होता. तिथेही थोडीफार हानी झाली.

बुधवार १६ मार्च -
सकाळ पासून धावपळ करतच होतो. साडे दहा वाजता ठरल्या प्रमाणे गाडी आली आणि आम्ही निघालो.
रस्त्यात गर्दी असेल असं वाटलं होतं. पण अजिबातच नव्हती. त्यामुळे लवकर पोचलो. आत घुसल्यावर मात्र क्षणभर दचकायलाच झालं. खूप गर्दी. बरेच लोकं पथारी पसरून चक्क झोपले होते. काही फ्लाईट्स कॅन्सल झाल्या होत्या.
तिथे पोचल्यावर थोड्याच वेळात पुन्हा एक भूकंप झाला. हाही वरखाली होणारा धक्का होता.
विमान वेळेवर सुटेल का याची जराशी धाकधूक होती. चेक इन आणि सिक्युरिटीसाठी प्रचंड मोठ्या रांगा होत्या. वेळेवर सगळं होऊन विमानात बसलो. टेक ऑफ झाला आणि थोड्यावेळाने किंचित टर्ब्युलन्स आला. तसं लेकीची पहिली रिएक्शन "ममा, भूकंप!"

गुरुवार १७ मार्च-
आमच्या परतण्याने घरातले सगळेच खुश!
दुपारी खेळताना लेकीने एक बोट बनवली आणि सांगितलं कि नवीन प्रकारची बोट आहे ती त्सुनामी मध्येही बुडत नाही!

--------------------
आधी हे लिहायचे राहीलेच होते त्या बद्दल क्षमस्व.
इथे मायबोलीवरच्या अनेक मित्र मैत्रीणींनी ज्या आपुलकीने चौकशी केली त्यामुळे खरच फार छान वाटले. आपली काळजी करणारे इतके लोक आहेत ज्यांना आपण बघितलेलेही नाही हे जाणवुन अगदी हेलावुन गेले. यासाठी मायबोली आणि मायबोलीकरांचे मनापासुन आभार.

---------------------
अनेक गोष्टी लिहायच्या राहिल्यात.पण जसे आठवले तसे लिहीले.
इतक्या सगळ्या आपत्तीमधेही लक्षात रहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे जपानी लोकांची सहनशीलता, आणि कुठल्याही परिस्थितीमधे नियम न तोडता रहाण्याची शिस्तप्रियता!
कुठच्याही दुकानात कुठेही लुटालूट नाही, कुठेही उगाच धक्काबुक्की नाही, उगाच दुसर्‍याला, सरकारला दोष देणे, आक्रोश करणे नाही.
जपान च्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशुन केलेल्या भाषणात दुसर्‍या महायुद्धा नंतरचा हा सर्वात कठीण प्रसंग आहे असे सांगुन लोकांना सहकार्याचे आवाहन केले.
आता परवाच कुठल्यातरी वर्तमान पेपर मधे वाचले की हे नुकसान भरुन काढायला अमुक वर्षे लागतील, इतके मनुष्यबळ लागेल वगैरे वगैरे. पण मला मनापासुन खात्री आहे की जपान लवकरच हे नुकसान भरुन काढून पुन्हा ती राख झालेली सगळी घरं तशीच्या तशी उभी करेल. आणि गेलेल्या माणसांच्या स्मृती मनात जपुनही पुन्हा एकदा जपान आपलं अस्तित्व सिद्ध करेल.
हे देशप्रेम, हि मानसिकता या लोकांनी कुठून आणली असेल?

---------------------
तुमची मदत इथे पाठवा-
Official Donation collection accounts, announced by several NGOs.
Telecasted in NHK (national telecast) as well.
Please generously donate to this.

Central Community Chest of Japan,
5F Shin Kasumigaseki Bldg., 3-3-2 Kasumigaseki, Chiyoda-ku, TOKYO, JAPAN 100-0013
info@c.akaihane.or.jp
http://www.akaihane.or.jp/english/eng20.html
Post Office Account Number 00170-6-518

जपान अर्थक्वेक रिलिफ फंड.
जपान रेडक्रॉस
URL: http://www.jrc.or.jp
http://www.jrc.or.jp/english/relief/l4/Vcms4_00002070.html

गुलमोहर: 

बरे झाले लिहीलेस. तुम्ही सुखरूप आहात, तोक्यो सुखरूप आहे. याचेच काय ते समाधान.
त्सुनामीचे व्हिडीयोज पाहून पार झोप उडाली होती.

यावेळेस मला जपानी communication पद्धतीचा फार जाच वाटला आणि अजूनही वाटतो आहे. वैयक्तिक मत. पुरेशी माहिती न देणे किंवा माहितीच न देणे. असो.

जपानी लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. दरवेळेस नव्याने स्तिमीत व्हायला होते.

मायबोलीवर शंभरेक तरी लोकांनी आपणा सर्वांची चौकशी केली. अशा प्रत्येक वेळेला मला मायबोलीवरील लोकांचेही कौतुक वाटते. व्हरच्युअल असले तरी ऋणानुबंध आहेतच.
फेसबुकनेही जगभरात लोकांची खुशाली आप्तस्वकीयांना कळवली. मला तरी नव्याने या माध्यमाची ताकद जाणवली.

!!

सावली बरे झाले लिहीलस.

खरे तर जपानला भुकंप नविन नाही. यावेळी झालेला भुकंपामुळे जपानी माणुस नक्कीच घाबरला नसणार. पण नंतर आलेल्या त्सुनामी व रेडीएशनच्या धोक्यामुळे परीस्थिती खराब झाली व अनेकांनी देश तात्पुरता का होईना सोडण्याचा किंवा तोक्योपासुन लांब जाण्याचा निर्णय घेतला. अजुनही धक्के बसतच आहेत. दोन दिवसांपूर्वी इबाराकीमधे भुकंप झाला.

मित्रांच्या कडुन ऐकले की सिनेमात दाखवतात तसा माकुहारीपाशी फुटपाथ दुभंगला व त्यातुन पाणी यायला सुरुवात झाली. यावेळी इमारतीला बसणारे हादरे उभे व आडवे पण होते. परतीच्या प्रवासात सुध्दा अचानक धक्का बसुन ट्रेन बंद झाली होती.

जपानी लोकांच्या संयमाबद्दल हॅट्स ऑफ. फक्त एका गोष्टीचे वाईट वाटले ते म्हणजे सेंदाईमधल्या प्लँटच्या सुरक्षीततेविषयी जपान एवढे गाफील कसे राहीले. त्या ठिकाणी या आधीही छोटे मोठे अपघात होतच आले आहेत म्हणे व तसे गेले ५ वर्ष जपान दुर्लक्षीत करत आहे.

खरंच, जपानी लोकांचे जे गुण तुम्ही वर्णन केले आहेत ते वाचून खूप आदर निर्माण झाला त्यांच्याविषयी. तुम्ही म्हणता तसे अगदी लवकरच ते बाहेर पडतील या आपत्तीतून.
आपल्यालाही खूपच शिकता येण्यासारखे आहे या मंडळींकडून...

सावली.. तू सपरिवार सुखरूप परत आलीस ,हे कळलं आणी हायसं वाटलं.. रोज आम्ही मागोवा घेतच होतो घडलेल्या गोष्टींचा..पण तुझा प्रत्यक्ष अनुभव वाचून काटा आला अंगावर..
जपानी लोकांच्या संयमाची सी एन एन ,बीबीसी वर खूप तारीफ होत होती.. खरच त्यांना सलाम ..

सावली,

तुम्ही सर्व सुखरूप आहात यातच सारं काही आलय.

जपान देश हा फिनीक्स पक्ष्याप्रमाणे आहे, राखेतुन ऊठून स्वतःचे साम्राज्य ऊभे करणार्यापैकी एक

सुन्न..
तुलना करायला नको पण तरीही अशा आपत्तीच्या वेळी आपल्याकडे किती प्रचंड गोंधळ होतो/होउ शकतो हे मनात येतेच. Sad

सावली, मनातलं शब्दांत चांगलं उतरवलयंस. मगाशी वेळ नव्हता लिहायला म्हणून २ ओळी लिहिल्या.

त्या दिवशी जेव्हा तू पहिल्यांदा जपान बीबीवर भूकंपाबद्दल सांगितलंस तेव्हा त्याचा सिरीयसनेस खरंच कळला नव्हता. मला वाटलं तुला धक्के अधेमधे जाणवत असतात, हा त्याच टाईपचा आहे. नंतर जेव्हा तू परत लिहिलंस व रैनाचाही प्रतिसाद आला, तेव्हा हे प्रकरण थोडं गंभीर आहे हे जाणवलं. लगेच नवर्‍याला ऑफिसमध्ये फोन करून भूकंपाबद्दल विचारणा केली, कारण त्याच्याकडे बर्‍याचदा जपान टाईम्स उघडलेला असतो. पण त्याला याची काहीच कल्पना नव्हती. लगेच बीबीसी लावल्यावर प्रसंगाची भीषणता कळली. त्यानंतर नुसतं बघूनही डोकं भणभणलं होतं.

हॅट्स ऑफ टू जपानी पीपल.....खूपच पेशंट आहेत ते.

सुन्न !
कसल्या भयानक परिस्थितीतून जावं लागलं असेल तुम्हा सगळ्यांना. जपानी लोकांच्या धीराचं खरंच कौतुक वाटतं.

जपानी लोकांच्या संयमचं खरंच कौतुक.

ज्या परिस्थितीतून तुम्ही सगळे गेलात, त्याचा विचार करतानाही अंगावर काटा येतो. भुकंपाच्या बातम्या टिव्हीवर बघणेसुद्धा त्रासदायक वाटत होते. Sad

>>परिस्थितीतही लोकं प्रत्येकी एक बेन्तो आणि एक बाटली पाणी हे आपले आपण घेत होते. उगीच कुनी खेचाखेची नाही. ओरबाडून घेणे नाही. कोणाची फारशी तक्रार नाही.

ह्यावर नेटवर सुध्दा एक लेख वाचला. कमाल आहे ह्या लोकांची. हे असं भारतात झालं तर काय होईल ह्याची कल्पनाही करवत नाही. इथे सगळा "सबकुछ रामभरोसे" कारभार आहे. तुम्ही सुखरूप आलात हे पाहून बरं वाटलं. ईव्हेंक्यूएशन बॅगेत साधारण काय ठेवावं? खरं तर आमच्या घरी सुध्दा आम्ही अशी बॅग तयार ठेवण्याबद्द्ल चर्चा केली होती. पण "पुन्हा पहिले पाढे पंचावन्न" Sad

स्वप्ना, बॅगमध्ये टॉर्च, छोटा ट्रान्झिस्टर, सुका मेवा, अत्यावश्यक औषधे, छोटा चाकू, ग्लुकोज, पाणी बॉटल, मिनिमम कपडे, बँडएड, बँडेज, सॅव्हलॉन, सोफ्रामायसिन, रस्सी, जुने वर्तमानपत्र, जास्तीचे बॅटरी सेल्स, टेलिफोन नंबर्सची डायरी, महत्वाची कागदपत्रे किंवा त्याच्या फोटोकॉपीज वगैरे असावे.

हे असं भारतात झालं तर काय होईल ह्याची कल्पनाही करवत नाही. >>> भारतात एवढ्या मोठ्या भूकंपाला एकही इमारत उभी राहिली नसती. सगळं जमीनदोस्त Sad

> हे देशप्रेम, हि मानसिकता या लोकांनी कुठून आणली असेल?

हे देशप्रेम, हि मानसिकता या लोकांनी भारतातूनच घेतली. म्हणूनच सध्या भारतात त्यानची वानवा आहे.

बापरे!!!! तुम्ही सुखरूप आहात हे वाचून खूप छान वाटले.
जपानी लोकांच खरच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मला वाटते इतक्या कठीण परिस्थीतीत एवढा संयम बाळगणे हे जपानी लोक स्वतःपेक्षा त्यांचा देश जास्त महत्वाचा मानतात याचं लक्षण आहे.

बाप रे सावली.. जे सुखरूप आहेत त्यांच्यासाठी परमेश्वराचे आभार..! आणि जे निसटून गेले.. त्यांना तो बघत असेलच. Sad

केश्विनी, अग भारतात भुकंप प्रवण ठिकाणी त्यानुसार घरे बांधतीलच.. जपानने किती तरी वर्षे असे भुकंप पचवले आहेत आणि त्यांचे तंत्रज्ञान हे अनुभवातून आलेले आहे.

जपानी लोकांबद्दल काय लिहावे? सगळी संकटे त्या चिमुकल्या देशाला का बरे? मला वाटतं ह्या संकटांनीच त्यांना एवढे चिवट्/कणखर आणि कष्टाळू बनवलं असेल. कित्येक लोकांनी आपल्या आईवडीलांना आधी वाचवले आणि मग आपल्या मुलांना.. मग स्वतःला. किती घट्ट कौटुंबिक वीण आहे! माझ्यावर वेळ आली असती तर मी काय केले असते देव जाणे Sad

सावली, तुम्ही सगळे सुखरूप आहात हे वाचून बरं वाटलं.
बाकी जपानी लोकांबद्दल काय बोलावं!! त्यांचं कौतूक खरंच!

वाचुन सुन्न झाले. Sad
जपानी लोकांच्या संयमाला आणि धीराला सलाम.
जपानमधले सगळे मायबोलीकर सुखरुप आहेत, हे ऐकुन बरं वाटलं.

सावली बरे झाले लिहीलेस. तुम्ही सुखरूप आहात, याचेच काय ते समाधान.
जपानी लोकांच खरच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मला वाटते इतक्या कठीण परिस्थीतीत एवढा संयम बाळगणे हे जपानी लोक स्वतःपेक्षा त्यांचा देश जास्त महत्वाचा मानतात याचं लक्षण आहे.>>>> अनुमोदन.

खरंच हा लेख लिहिल्याने बरं केलस. खुपच महत्त्वाची निरिक्षणे नोंदवली आहेस. जपान यातूनही लवकरच बाहेर पडेलच. त्यांचा इतिहास बघता हा फिनिक्स पक्षी पुन्हा एकदा झेप घेईलच. समाजहित हे व्यक्तीगत हिताच्या आधी ठेवल्याने बर्‍याच गोष्टी सुकर होतील.

बीबीसीवरच्या बातम्या बघवत नव्हत्या खरोखर. तुम्ही किती धीराने परिस्थिती हाताळली त्याचे कौतुक वाटले.

पाहून ऐकून कल्पना करवत नव्हती. प्रत्यक्ष अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद सावली.

>>नवीन प्रकारची बोट आहे ती त्सुनामी मध्येही बुडत नाही!
Happy
लहान मुलांच्या मनावर अश्या घटनांचा खूप परिणाम होतो. भीती असते. ती विचार करत असणार असं वाटतंय. तिच्याशी बोल, उपाय शोधतेय असं दिसतंय. Happy

Pages