वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार

Submitted by नरेंद्र गोळे on 19 March, 2011 - 23:49

श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. ह्या लेखात कुणाचीही जाहिरात करण्याचा उद्देश नाही. केवळ उपलब्ध पर्यायांची माहिती म्हणूनच ह्याकडे पाहावे. तरीही इथे हे नमूद करायला हवे की हे लिखाण निराधार नाही. बखरनुमा आहे. हे केवळ अनुभवातून/ वाचनातून आलेले शहाणपण आहे. या लेखात वर्णन केलेले वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार मी स्वतः घेतलेले नाहीत. त्यांची माहिती केवळ उपलब्ध पर्यायांपैकी एक म्हणून मिळवली होती. पुढे अनेक रुग्णांना हे उपचार घेतांना आणि बरे होतांनाही मी स्वतः बघितलेले आहे.

प्रस्तावना: धमनीकाठिण्य ह्या रोगाची आणि त्याच्या उपायांचीही अवस्था 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी आहे. ह्या लेखनाच्या आधारे 'सम्यक जीवनशैली परिवर्तनास' सामान्यजनांनी सिद्ध व्हावे, कर्मठपणे ते आचरावे आणि हृदयरोगच नव्हे तर इतरही अवनतीकारक रोगांना आपल्यापासून दूरच ठेवण्यात यश मिळवावे अशी माझी अपेक्षा आहे. ह्या लेखनाचा आपल्या सार्‍यांच्याच आरोग्यस्थितीवर सकारात्मक, सत् प्रभाव पडू शकेल तेंव्हाच ते यशस्वी झाले असे समजता येईल.

जुन्या काळी म्हातार्‍या आई-वडलांचे पाय चेपणार्‍या मुलांची दृश्ये सहजीच दिसून येत असत. हल्ली एक तर वेळ नसल्यामुळे म्हणा, किंवा वडिलांचा त्या काळी जो आदर राखला जात असे तो आज राखला जात नसल्यामुळे म्हणा, असे दृश्य कालबाह्य झालेले आहे. मात्र विरोधाभास असा की, अगदी तसेच पाय चेपणारे यंत्र आता विकसित करण्यात आलेले असून, त्याचा हृदयविकारनिवारणार्थ अतिशय मोलाचा उपयोग होत असल्याचे सिद्ध झालेले आहे. याची खर्चिकता वगळली, तर हा उपाय सर्वात कमी हानीकारक, सुरक्षित आणि साधा-सोपा आहे. याच सुरस उपचार प्रणालीची माहिती आज आपण करून घेणार आहोत.

वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार (वबाप्रो-Enhanced External Counter Pulsation-EECP), हे हृदयोपचाराचे अत्याधुनिक तंत्र आहे जे विशिष्ट प्रकारच्या हृदयधमनीविकाराच्या उपचारांत आणि रक्तप्रवाह अवघडून हृदयाघात होण्यास प्रतिबंध करण्याकरता अवलंबले जाते. हे तंत्र आरामदायी आणि धोकाविरहित आहे.

सम्यक जीवनशैली परिवर्तने, धमनी स्वच्छता उपचार, हृदयधमनी रुंदीकरण, आणि हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रिया यांपैकी पहिला वगळता इतर सर्व पर्याय शस्त्रक्रियात्मक आणि अतिक्रमक आहेत. पहिला पर्याय रोगनिवारणार्थ अंतिमत: स्वीकारावाच लागतो. मात्र त्याच्या अवलंबनानंतर शरीरास प्रतिसाद देऊ लागण्यास तीन ते चार सप्ताह लागू शकतात. तोपर्यंत धोका टाळण्यासाठी शेवटले तीन पर्याय अवलंबले जातात. त्यांपैकी धमनी स्वच्छता उपचार सर्वात सोपा आणि कमी खर्चिक असला, तरी त्याचे मूत्रपिंडांवर अवांच्छनीय उपप्रभाव होत असतात. बर्‍याच रुग्णांना ते उपचार धार्जिणेही ठरत नाहीत. त्यात वापरल्या जाणार्‍या औषधांचे काहींना वावडे असते.

अशा वेळी सम्यक जीवनशैली परिवर्नांप्रमाणेच "वबाप्रो" हे हृदयधमनी विकाराच्या मुळावरच आघात करणारे, त्यातल्या त्यात कमी खर्चिक, अनातिक्रमक आणि अवांछनीय उपप्रभावांविरहित उपाय ठरतात.

सामान्यतः वयपरत्वे आढळून येणारा हृदयधमनीविकार: म्हणजे हृदयास रक्त आणि त्याद्वारे प्राणवायू पुरविणार्‍या धमन्यांमध्ये कीटण जमून त्या अरुंद होणे. त्यामुळे हृदयास होणारा रक्तप्रवाह मंदावतो, आणि थांबतोही. ज्याने हृदयशूळ, श्वसनहीनता, हृदयाघात आणि इतर लक्षणे संभवतात. हृदयधमनीविकाराची लक्षणे कधी कधी शरीरास व्यापून टाकणारी असतात तर कधी कधी लक्षातही न येणारी असू शकतात.

रक्ताभिसरण अवरुद्ध होऊन घडून येणारा बिघाड (Congestive Cardiac Failure): रक्तप्रवाह अवरुद्ध होऊन हृदयाघात होण्याने लाखो आयुष्ये धुळीस मिळतात. कोणत्याही वयात हे घडू शकते. वयस्कांमध्ये हे खूपच सामान्य झालेले आहे. प्रचलित औषध व शल्य उपचार त्रास कमी करतात पण हृदयशूळ, हातापायांवर सूज येणे, श्वसनहीनता आणि थकवा ह्या सर्वसामान्य त्रासांपासून कधीच मुक्त करत नाहीत.

वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार: हे उपचार बाह्यरुग्ण विभागात घेतल्या जाणारे अनातिक्रमक उपचार आहेत. हे उपचार म्हणजे थोडक्यात यंत्राद्वारे पाय चेपणेच होय. ह्यामुळे रुग्ण पूर्णत: शिथील होतो. ह्याचे एक सत्र एक तासाचे असते. ज्यामध्ये रुग्ण बिछान्यावर आरामात पडलेला असतो. त्याचे दोन्ही पायांवर हवेच्या पिशव्या गुंडाळून (रक्तदाब मोजतांना बांधतात तशा) बांधतात. मग त्यामध्ये यंत्राद्वारे वेगाने हवा भरली आणि सोडली जाते. हृदयस्पंदनेही सोबतच मोजली जात असतात. हृदयस्पंदनांच्या विरुद्ध, मात्र त्यांच्याच गतीने, मग पाय दाबले जातात. यामुळे, हृदयाकडे रक्त रेटले जाऊन नव्या केशवाहिन्या निर्माण होतात. सप्ताहात सहादा याप्रमाणे सहा सप्ताह सत्रांमध्ये हे उपचार दिले जातात.

वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचाराचे फायदे: अवरुद्ध धमन्यांना समांतर नवीन रक्तवाहिन्या घडवल्या जातात. पायातील रक्त हृदयाकडे वेगाने आणि दाबाने विस्थापित झाल्यामुळे हृदयधमन्यांत लोटल्या गेल्यामुळे हे घडून येते. अवरुद्ध धमन्यांची नैसर्गिक उल्लंघने आपसुकच घडून येतात. ह्यामुळे दिवसेंदिवस हृदयशूळाची वारंवारता घटत जाते. रुग्णाची व्यायामक्षमता वाढू लागते आणि औषधांची गरजही घटू लागते. हार्वर्ड, याले आणि कोलंबिया यांसारख्या प्रमुख विद्यापीठकेंद्रांमध्ये करण्यात आलेल्या, आता विख्यात झालेल्या (Now famous), यदृच्छय (Randomized), दुतर्फा-अंध (Double blind), औषधाभासी (Placebo), नियंत्रित वबाप्रो अभ्यासांमध्ये असे दिसून आले की वबाप्रो घेणार्‍या जवळजवळ ८० टक्के रुग्णांनी ह्यामुळे मिळालेले वैद्यकीय लाभ एक वर्षानंतरही अबाधित राखले. एका वर्षानंतरही केलेल्या पाठपुरावा (Follow-up) अभ्यासात असे दिसले की पाच वर्षांनंतरही पाच टक्के रुग्णांमध्ये ह्यामुळे मिळालेले वैद्यकीय लाभ अबाधित राहिले होते.

इथे हे नमूद करावे लागेल की वबाप्रो हे हृदयधमनी रुंदीकरण वा उल्लंघन शस्त्रक्रियांना पर्यायी उपचार नाहीत. तर ज्यांना हृदयधमनी रुंदीकरण वा उल्लंघन शस्त्रक्रियांचा उपयोग होण्यासारखा नसतो आणि ज्यांचेवरील औषधोपचारांनी याआधीच कळस गाठलेला असतो अशांसाठी हे उपचार वैकल्पिक उपचार ठरतात. हे उपचार हृदयधमनीविकार असणार्‍या कुणासही लाभकारक ठरतात. विशेषत: ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया होऊनही लक्षणे निवारल्याच गेलेली नसतात अथवा पुन्हा उद्भवलेली असतात त्यांचेसाठी, गंभीर वैद्यकीय अवस्थेमुळे शस्त्रक्रिया करण्याजोगी नसते त्यांच्यासाठी, जे शस्त्रक्रिया करून घेऊ इच्छित नसतात त्यांच्यासाठी अथवा ज्यांना हृदयशूळामुळे हालचालीच कमी कराव्या लागलेल्या असतात त्यांच्यासाठी. शिवाय जे कमी खर्चाचे, निसर्गसदृश उपचार शोधत असतात त्यांचेसाठीही.

ह्या (http://www.expresshealthcaremgmt.com/20050315/technology03.shtml ) लेखाचा स्वैर मराठी अनुवाद करून त्याचे आधारे वरील लेख लिहिलेला आहे. मूळ लेख वाचूनच त्यातील माहितीचा उपयोग करावा ही विनंती.
.
http://aarogyasvasthata.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users