इ.स.१०००० - भाग ४

Submitted by बेफ़िकीर on 17 March, 2011 - 02:57

धडधडधड... फडाड... सुर्र र्र र्र र्र ..... धड... झूSSSSSSSम....

दचकून गोप उठला. आपल्याला १६९९ आत्ताच इथे सोडून बाहेर गेली आणि अचानक बाहेर कसले इतके आवाज झाले??? धडपडत उठून तो खिडकीपाशी जायच्या विचारात होता तेव्हा त्याला समजले की येथे खिडक्या वगैरेसारख्या बिनडोक गोष्टीच नसतात. हे लोक भिंतीतूनच आत बाहेर करतात आणि हे मानव आणि भूत या दोन पातळ्यांच्या मधोमध कुठेतरी पोचलेले असावेत.

काय झाले असावे हे समजून घेण्यासाठी त्याने बेल दाबली. 'बेल दाबलीस की एक माणूस येईल तुला हवं नको बघायला' असे १६९९ म्हणाली होती.

कुणीही आले नाही.

गोप भडकला.

"च्यायला सर्व्हर डाऊन आहे का काय?? १०००० सालीही हेच प्रॉब्लेम्स दिसतायत! "

पाच वेळा बेल दाबल्यावर बेलमधूनच संदेश ऐकू आला.

"तीन वेळा प्रयत्न करूनही कुणी येत नसेल तर आणखीन दोन वेळा प्रयत्न करून काय होणार असा विचार करून गप्प बसावे"

गोप थिजून त्या बेलकडे पाहात होता. तेवढ्यात अचानक १६९९ आत आली. तिचा चेहरा प्रचंड भेदरलेला होता. गोपकडे ती घाबरून पाहात होती.

गोप - काय झालं हो?

१६९९ - युद्ध होणार आहे...

गोप - अरे तिच्यायला.. कुणाच्यात??

१६९९ - पृथ्वीवासीय व्हर्सेस चंद्रवासीय!

गोप - आं??? ... मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आपण तर इथे आहोत मंगळावर.. टेका जरा आरामात... चहाबिहा घेऊ...

१६९९ - सुरक्षित स्थळी जायचंय...

गोप - म्हणजे कुठे?? प्लुटो का???

१६९९ - परग्रहांची नावे घेऊ नकोस...

गोप - परग्रहांची म्हणजे??

१६९९ - तो खरा ६४१ चा ग्रह आहे... पुर्वजांनी चोरून आपल्याकडे हिशोबात धरला होता पुर्वी..

गोप - असा कसा काय हिशोबात धरला..

१६९९ - तो त्या वेळेस नेमका आपल्या सूर्याभोवती फिरल्यासारखा फिरत होता... वास्तवात तो तिसर्‍याच तार्‍याभोवती फिरत होता....

गोप - हे म्हणजे भुजबळांसारखं झालं.. सेनेत तिकीट नसलं तर राष्ट्रवादी...

१६९९ - निरर्थक बडबडू नकोस... उठ...

गोप - उठ तर उठ... आता काय.. मी एक प्रयोगातील स्पेसिमेनच आहे म्हणा.. न्या कुठे हवे तिथे..

१६९९ - ही चीप लाव खांद्याला..

गोप - याने काय होते?

१६९९ - माणूस जिवंत राहतो..

गोप - म्हणजे काय?? मरणार आहे का मी आता??

१६९९ - चीप नाही लावलीस तर मरू शकशील...

गोप - आपला काय प्लॅन आहे समजेल का?

१६९९ - मंगळ आणि गुरूमधे असलेल्या स्पेस प्लॅटफॉर्मवर तीन दिवस राहायचे आहे..

गोप - का??

१६९९ - चंद्र आणि पृथ्वीवरून येणारी काही अस्त्रे मंगळावर सहज पडू शकतील...

गोप - म्हणजे आपल्या पत्रिकेतच मंगळ आहे म्हणा की?

१६९९ - हा दांडुका हातात घे...

गोप - हा कसला दांडुका आहे?

१६९९ - यात जवळ येऊ शकणार्‍या अस्त्रांमधील चुंबकीय तत्वाच्या बरोब्बर सेम तत्व असल्याने त्या अस्त्रांना वेगळी दिशा मिळेल..

गोप - तुम्ही किती आरामात भीती दाखवता नाही?? तुमच्या हातात का नाहीये असला दांडुका?

१६९९ - इन्स्टॉल्ड असतो...

गोप - मग घाबरताय कशाला?

१६९९ - मी घाबरत नाही आहे.. तू घाबरायला हवे आहेस हे सांगतीय...

गोप - मगाशी आवाज कसला झाला हो??

१६९९ - सगळे वर गेले...

गोप - वर म्हणजे??

१६९९ - पृथ्वीवर..

गोप - का??

१६९९ - लढायला...

गोप - अहो काय सांगताय??

१६९९ - तुंबळ युद्ध सुरू होईल तासाभराने... या गेलेल्यांना चंद्राच्या कक्षेजवळून जातानाच प्रचंड मार्‍याला तोंड द्यावे लागेल.. पण पृथ्वीवर पोचल्यावर ते त्याचे उट्टे काढतील..

गोप - मला एक सांगता का?? हे युद्ध होतंय कशावरून नेमकं??

१६९९ - कावेरी नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे स्पेसमध्ये.. त्याच्या सहाय्याने चंद्रवासीय अधिकाधिक सूर्यप्रकाश स्वतःकडे वळवण्याच्या प्रयत्नात असतात... म्हणून भांडण होते..

गोप - काहीच्या काही बोलता तुम्ही.. इथेही सीमावाद आहेच म्हणजे..

१६९९ - ए... तू बाहेर जा..

गोप - हे आत्ता आत आलं ते काय होतं??

१६९९ - रोबोट.. तू बेल वाजवल्यामुळे आला होता..

गोप - आत्ता?? बेल वाजवली तेव्हा का नाही आला??

१६९९ - माणसांना शटलवर बसवण्याच्या कामात सगळे रोबोट्स मदत करत होते..

गोप - किती रोबोट्स आहेत इथे??

१६९९ - तसं काही नाही... वाटलं की एक निर्माण करता येतो..

गोप - तुम्हाला एक सांगू का??

१६९९ - काय??

गोप - मी आहे नं मी?? तो मी आता काय वाट्टेल ते ऐकू शकतो.. काहीही ऐकायची आता माझी तयारी झालेली आहे..

१६९९ - हे मनगटावर लाव....

गोप - लावा लावा.. काय वाट्टेल ते कुठेही लावा....

१६९९ - नीट बसव ते..

गोप - हे कशासाठी आहे पण?? एखादे अस्त्र परत फिरलेच नाही तर आपल्यालाच उलटीकडे फिरवायला का??

१६९९ - नाही.. तीन दिवस आता आपण दोघेच असणार... एकांतात.. त्या कालावधीत तुझ्याकडून विनयभंगाची केस होऊ नये म्हणून ही चीप लावलीय.. ही काढलीस की शंभर पॉईंट्स जातील..

गोप - कुणाचा विनयभंग??

१६९९ - दोघेच आहोत म्हंटल्यावर कुणाचा होणार??

गोप - माझ्या सोज्वळ मनात नाही नाही ते विचार पेरताय तुम्ही.. अख्खा एक दिवस आपण एकत्र आहोत.. एकदा तरी मी वाईट वागलो का तुमच्याशी??

१६९९ - वागूच शकला नसतास..

गोप - अहो.. मी नाही हो करणार विनयबिनय भंग... !

१६९९ - हं... चल आता..

गोप - कसं जायचंय??

१६९९ - नसत्या काळज्या करू नकोस..

एका अरुंद पट्टीवरून सरकत सरकत दोघे मंगळाच्या पृष्ठभागावर आले तेव्हा गोपने मंगळ स्पेशल युनिफॉर्म परिधानही केलेला होता.. काही ठिकाणी बरीच गर्दी वगैरे होती.. लढायला इच्छूक असणारे तुफान वेगाने शटलवरून पृथ्वीकडे झेपावत होते.. कुठेतरी लांबवर पृथ्वी असण्याची शक्यता होती... आत्ता सूर्याचा उजेड असल्यामुळे आकाशात काहीच तारेबिरे दिसत नव्हते.. अचानक १६९९ ने गोपला एका शटलवर ओढून घेतले...

एक गचका बसला...

... हादरलेला गोप खुर्चीतल्या खुर्चीतच हेलपाटला... १६९९ स्वतःचे दोन्ही ओठ तीन वेळा वरखाली केले.. ती आत्ता हासली हे गोपला समजले...

गोप - मला तुमचे पॉईन्ट्स द्या.. वीस..

१६९९ - का??

गोप - तुम्ही मला हासलात.. माझा विनयभंग झालाय..

१६९९ ने मोजून दहा वेळा दोन्ही ओठ हाताच्या बोटांनी वर खाली केले... चेहर्‍यावर मात्र हासण्याचे भावच नाहीत...

गोप - तुम्ही अजून हासताय..

आता १६९९ ने दोन्ही ओठ ताणूनच धरले आणि तसेच ठेवले..

गोपला समजेना यावर काय करावे.. त्याने टिचक्या वाजवायला सुरुवात केल्या.. गोप हुषार होता.. त्याने टिचक्या वाजवायला सुरुवात केल्याबरोब्बर डोळे विस्फारून १६९९ त्याच्याकडे बघू लागली..

१६९९ - खोटे निघाले तर पन्नास पॉईंट्स जातील..

गोप - काय खोटे निघाले तर??

१६९९ - तुझा राग..

गोप - राग खोटा कसा काय निघेल??

१६९९ - सगळे रेकॉर्ड होते..

गोप - मग तुम्ही हासताय त्याचे गुण नकोत का कापायला??

१६९९ - मला या आयुष्यात एकुण ५३ तास हसायची परवानगी आहे.. ते मी कुठेही हसू शकते.. ५३ तास झाले की मग हसता येत नाही..

गोप - हाड तिच्यायला.. म्हणे हसायची परवानगी... ओ.. हे रॉकेट थांबवा... मी मंगळावरच बसणार आहे.. ह्यांना घेऊन जा..

१६९९ पुन्हा ओठ हालवून हसू लागली.

गोप - आता का हासताय??

१६९९ - मर्जी माझी!

गोप - तरी??

१६९९ - तू सांगून हे शटल थोडीच थांबणार आहे??

गोप - मी एक विचारू का??

१६९९ - विचार..

गोप - आपण खरच तिथे दोघांनीच राहायचंय तीन दिवस??

१६९९ - कोणते तीन दिवस??

गोप - हे.. याच्यापुढचे??

१६९९ - तिथे दिवस, रात्र असं काही नसतं.. तो स्पेस प्लॅटफॉर्म आहे.. कायम रात्रच!

गोप - पण सूर्याचा प्रकाश??

१६९९ - सूर्य आणि त्याच्यामध्ये मंगळ असतो..

गोप - म्हणजे.. सारखंच चांदणं??

१६९९ - हं!

गोप - इंद्र वगैरे कुठल्या भागात असतात हो??

१६९९ - इंद्र म्हणजे काय?

गोप - इंद्र म्हणजे... जाउदेत.. किती वेळ लागेल हो त्या तिथे जायला??

१६९९ - अजून तासभर तरी लागेल..

गोप - पण मग.. तिथे प्राणवायू??

१६९९ - सगळं आहे तिथे..

गोप - सार्वजनिक आहे का तो प्लॅटफॉर्म...

१६९९ - नाही.. १६२२ चा स्वतःचा आहे..

गोप - एक विचारू का??

१६९९ - आता प्रश्न विचारलास तर मधेच उतरवेन तुला..

गोपने बाहेर पाहिले.. अवाढव्य मंगळाचा गोल खूपच जवळ दिसत होता... पण तरीही गोलाकार स्पष्ट जाणवावा इतपत दूरही गेलेला होता.. आयर्न ऑक्साईडमुळे मंगळ तांबुस दिसत होता... एकीकडून सूर्याचा प्रकाश येत होता... तो प्रकाश दाहक नव्हता... आठ लख किलोमीटर इतके अंतर जास्त होते सूर्याचे मंगळापासून पृथ्वीपेक्षा... त्यामुळे तो प्रकाश सुसह्य वाटत होता.. मधेच गोपने १६९९ कडे पाहिले.. तिने डोळे मिटलेले होते..

गोप आता विचार करू लागला..

हे सगळं काय चाललंय? मंगळ काय अन गुरू काय? शुक्रावर काय राहतोय माणूस? चंद्रवासीय अन पृथ्वीवासीय यांचे युद्ध काय! हे कुठे पोचलंय जग? माणूसकी, भावना, भावनांचे मुक्त प्रदर्शन .. काहीच नाही?? राग आला तर टिचक्या काय, हसू आलं तर ओठ हालवायचा काय! सगळंच भयंकर!

यात आपली भूमिका काय, स्थान काय? केवळ एक प्रयोगाचा स्पेसिमेन?

काहीतरी ठरवायला हवं! पण ठरवणार तरी काय? हे सगळे लोक आपल्यापेक्षा प्रगत आहेत. आपण विचार केला तरी यांना कळतो. एकच करता येण्यासारखं आहे.. ते म्हणजे.. नाहीतरी हजारो वर्षे आपण जगलोच आहोत... आता जगलो काय अन मेलो काय.. असं समजायचं की आपण मेलेलोच आहोत.. आणि.. फक्त पाहात राहायचं... काय काय होतं आणि कसं कसं होतं... दुसरं काहीही आपल्या हातात नाही...

अचानक गोपच्या खांद्याजवळ कसला तरी आवाज झाला.. एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण वाजावे तसा..

गोप - ओ... ओ १६९९... हे काय वाजतंय..????

१६९९ शांतपणे जागी झाली आणि तिने गोपच्या खांद्याकडे पाहिले.. आणि...

... त्याचक्षणी ती तीव्र धक्का बसून डोळे फाडून पाहू लागली...

तिच्या धक्याचा आविर्भाव इतका भयंकर होता की गोपला वाटले आपल्या खांद्यावर पाल बसली की काय? तो खांद्यावरील ती चीप झटकून थयाथया ओरडत नाचू लागला.. शटल थांबले.. इकडे ती खाली पडलेली चीप झटकन उचलून १६९९ ने गोपच्या एक खाडकन कानाखाली लावली.. अचानक स्वतःचा गुन्हा लक्षात येऊन पटकन आपले चक्क १०० गुण गोपला बहाल करून टाकले..

गोप तर हादरून नुसते घडेल ते पाहातच होता.. शटल चालवणारा तिकडून बोंबलला..

"१६९९.. शटल कस काय थांबले???"

शटल चालवणारा स्वतःच शटल थांबवून शटल कसे काय थांबले हे १६९९ ला विचारतोय हा गोपला विनोद वाटला.. तो खदाखदा हासला अन म्हणाला..

"हे बघा हुषार... ब्रेक दाबतात अन प्रवाश्यांनाच विचारताच पीएमटी कशी थांबली... "

१६९९ - ए... तू कोण आहेस???

हा प्रश्न गोपला अजिबातच अपेक्षित नव्ह्ता.. हा प्रश्न ऐकून तो अधिकच हसू लागला..

गोप - मी कोण आहे?? मी कोण आहे हा मलाच आता प्रश्न पडला आहे.. बहुतेक मी ४६३४४ च आहे..

तोवर शटलवाला चक्क आत आला होता... गोपकडे तो डोळे फाडून पाहात होता... आता गोपही हादरलाच.. काहीतरी भयंकर बाब घडलेली आहे हे त्याच्य लक्षात आले..

१६९९ - रिव्हर्स... रिव्हर्स घे शटल..

शटलवाला तातडीने त्याच्या जागेवर गेला.. इकडे १६९९ तुफान वेगाने कुणाशीतरी संपर्क साधायचा प्रयत्न करत होती.. संपर्क झाला असावा... कारण ती अगम्य भाषेत काहीतरी बडबडली आणि तिकडूनही स्पीकर फोनवर यावा तसा आश्चर्योद्गार निघाल्याचे गोपने पाहिले..

शटल पुन्हा मंगळाकडे निघाले.. गोप फक्त साक्षीदारासारखा नुसता होईल ते ते पाहात होता... तोवर १६९९ ने ती मगाचची चीप गोपच्या खांद्यावर पुन्हा ठेवली.. गोप विरोध करू लागला तसे तिने त्याला दटावले.. मग गोपनेही ती परिस्थिती मान्य केली..

साधारण वीस एक सेकंदांनी ती चीप पुन्हा वाजू लागली.. शटल तिथेच थांबले... आत्ता कुठे गोपच्या लक्षात आले..

स्पेसमधील एका विशिष्ट स्पॉटवरून शटल जाताना आपल्या खांद्यावरची ही चीप वाजतीय आणि त्याचे या दोघांना कमालीचे आश्चर्य वाटते आहे. मात्र आपल्याला त्रास काहीच होत नाही आहे...

१६९९ च्या चीपवरून पलीकडून बोलणारा आता फक्त थक्क होऊन आश्चर्योद्गारच काढत होता गोपच्या चीपवरचे आवाज ऐकून!

१६९९ आणि त्याचे पुन्हा अगम्य भाषेत बोलणे झाले. डोळे विस्फारून गोपकडे पाहात १६९९ मटकन खुर्चीत बसली... तिने शटलवाल्याला खूण केली तसे त्याने शटल चालू केले....

गोपला काहीच समजत नव्हते...

गोप - काय हो??? काय झालं काय??

पुन्हा १६९९ उठली आणि तिने स्वतःचे आणखीन शंभर गुण गोपला बहाल केले.

गोप - मला गुण का देताय?? ही चीप वाजली म्हणून?? मग सारखीच वाजवा की??

१६९९ - मला माफ कर...

गोप - का?

१६९९ - मला हे माहीत नव्हतं... कुणालाच माहीत नव्हतं..

गोप - काय??

१६९९ - की तू ८०००००००११ चा कुणी आहेस म्हणून...

गोप - ८०००००००११ म्हणजे कोण??

१६९९ - आमच्या सृष्टीचा नियंता.. मूळपुरूष... तू कोण त्याचा??

गोप - काही कल्पना नाही बुवा..

१६९९ - माझे आणखीन काही गुण तुला हवे आहेत का??

गोप - द्या की? खैरात आहे का??

१६९९ - थट्टा करू नकोस.. मी मनापासून सांगत आहे..

गोप - मीही मनापासूनच सांगतोय.. सगळेच गुण द्या..

१६९९ ने आपली दोन्ही हातांची बोटे स्वतःच्या डोळ्यांवरून पाच पाच वेळा फिरवली..

गोप - हे काय केलंत आपण??

१६९९ - रडले..

गोप - कोणत्या आनंदात रडलात??

१६९९ - का थट्टा करतो आहेस?? माझे सग्ळे गुण गेल्यावर मी काय करायचे??

गोप - अहो गंमतीने म्हणालो मी.. मला नकोत तुमचे गुण बिण.. ठेवा तुमच्याच जवळ..

१६९९ आनंदाने हरखलीच! तिने मोजून वीसवेळा ओठ वरखाली केले स्वतःचेच!

गोप - इतक्या का हासताय??

१६९९ - तू महान आहेस...

गोप - असणारच.. त्याशिवाय ८००० वर्षे कोण जगेल??

अचानक गडबड उडाल्याचे दिसले.. शटलच्या काचेतून बाहेर काही इतर शटल्स आलेली दिसली.. ती थांबली.. हेही शटल थांबले.... बाहेरच्या शटलमधील लोकांनी अनेकवेळा स्वतःचे ओठ हालवले.. तसे मग गोपनेही हालवले... ते पाहून त्या लोकांनी आणखीन ओठ हालवले.. आता शटल्स चालू झाली..

गोपला जाणवले... ही खांद्यावरची चीप हा एक भयंकर प्रकार दिसतो आहे.. याच्यामुलेच अनेक लोक आपल्याकडे पाहून दचकत आहेत.. परिस्थिती आपल्याच ताब्यात आहे की काय?? ही १६९९ सारखी रुक्ष स्वभावाची बाईही आपल्याला तिचे गुण द्यायला तयार झाली..

तेवढ्यात १६९९ म्हणाली..

१६९९ - मी रुक्ष नाही आहे स्वभावाने.. स्वभावाला कोणतीही विशेषणे नसतात हो?

अरे तिच्यायला! विचारच करायचा नाही.. नाही का? या लबाड माणसांना लगेच समजते मनातले..!

१६९९ - लबाड नाही आहे हो मी..

गोप - नाही हो.. अजिबात नाही आहात.. माझ्या मनात काय वाट्टेल ते विचार येतात.. तुम्ही त्यावर विचार करू नका..

१६९९ - नाही करणार.. तुम्ही म्हणालात तर मी त्यावर विचार नाही करणार...

गोपला जाणवले. नक्कीच परिस्थिती आपल्या ताब्यात आहे. आत्ताच फायदा उपटलेला बरा!

गोप - मला फक्त एकच गोष्ट हवी आहे..

१६९९ - कोणती??

गोप - तुमची ती... दुसर्‍याच्या मनातले समजण्याची चीप मला द्या..

१६९९ ने पुन्हा पाच वेळा मोजून डोळे पुसले.. मग हळूच ती चीप काढून गोपच्या हातात ठेवली..

गोपने ती 'मनातले समजण्याची' चीप स्वतःच्या पोटावर बसवली.

आता १६९९ पुन्हा डोळे पुसत होती.

गोप - रडू नका हो.. कुणी पाहिलं तर काय म्हणतील?? मी काही केलं की काय असं वाटेल कुणालातरी..

१६९९ - आहेच कोण पाहायला??

डोळे पुसतच १६९९ म्हणाली!

त्याच क्षणी गोपच्या मनात एकदम एक विचार प्रकटला.

'हा ८१००००००११ चा भक्त आहे हे माहीत असते तर मी आधी अशी वागलेच नसते..."

झटकन गोपने १६९९ कडे पाहिले. ती विरुद्ध दिशेला पाहून डोळे पुसत होती.

गोप - अहो .. अहो नका हो रडू.. नाहीतर मी रडेन आता.. मी तसा फार निरागस माणूस आहे मनाने..

१६९९ - करा... अजून थट्टा करा...

गोप - अहो कसली थट्टा?? मी कुणाचाही भक्त नाही हो.. मी फक्त स्वामी समर्थांचा भक्त आहे..

१६९९ - कुणाचाही भक्त नाही तरी चीप वाजली???? खोटे बोलता ना माझ्या समाधानासाठी????

गोप - अहो.. तुम्ही अशा रडलात तर मी कुणाकडे पाहायचे??

१६९९ - तुम्ही काय?? आता कुणाकडेही पाहू शकाल...

गोप - अहो हे ८०००००००११ कोण होते हो???

१६९९ - जसं काही माहीतच नाही.... मी तुम्हाला तिथे सोडून पुन्हा मंगळावर जाणार आहे...

गोप - असलं काहीतरी अभद्र बोलू नका हो??? अख्ख्या अवकाशात मी एकटा कसा काय राहीन??

१६९९ - का??? ८०००००००११ आहेतच की काळजी घ्यायला??

गोप- ते तिथेच असतात का??

१६९९ - त्यांचीही थट्टा करताय?? काही वाटत नाही??

तेवढ्यात १६९९ ची चीप पुन्हा वाजली. खर्र खर्र आणि अगम्य उच्चार ऐकू आल्यानंतर चीप बंद झाली. १६९९ आता अधिकच रडू लागली होती.

गोप - काय झालं हो??

१६९९ - १६२२ ने स्वतःचे पाचशे गुण कापले आणि आमच्या प्रत्येकाचे तीन तीनशे...

गोप - का पण?? ही काय मोगलाई आहे की काय??

१६९९ - कारण आम्ही तुम्हाला असं वागवलं म्हणून..

गोप - असं म्हणजे काय??? चांगला मजेत आहे की मी??

एकदम आशावादी चेहरा करून १६९९ उठली आणि गोपपाशी येऊन त्याच्या गुडघ्यांपाशी बसत म्हणाली..

१६९९ - सांगाल हे?? सांगाल सगळ्यांना प्लीज?? की आम्ही तुम्हाला नीट ठेवलं होतं???

गोप - ओ बाई.. आधी बाजूला व्हा..

१६९९ दचकून बाजूला झाली.

गोप - मजेतच आहे की मी? न सांगायला काय झालं??

१६९९ आनंदाने चीत्कारली. तिने पुन्हा एक चीप दाबली. तिकडून आवाज आल्यानंतर तिने अत्यंत उत्साहात काहीतरी मेसेज पाठवला.. नंतर ती चीप गोपसमोर धरली.. त्याला म्हणाली..

"सांगा ना.. बोला या चीपवर... "

"हॅलो.. ?? हॅलो???"

"हॅलो नका म्हणू... नुसतं म्हणा मगाशी म्हणालात ते.."

"बरं.. ऐका हो जे कोण आहात ते... या १६९९ ने मला अत्यंत सुखासमाधानात ठेवलेले आहे.. तिचे साहेब १६२२ हे स्वभावाने अत्यंत चांगले असून त्यांनी माझी काळजी जशी घेतली तशी माझ्या ८००० वर्षाच्या आयुष्यात आजवर कुणीही घेतलेली नाही.. त्या सर्वांना त्यांचे सर्व गुण परत मिळावेत इतकेच नाही तर... माझ्यातर्फे त्यांना आणखीन हजार हजार गुण दिले जावेत... मी या आधी इतक्या आनंदात कधीही नव्हतो.. "

चीपवर एकच कल्ला ऐकू आला. १६९९ अत्यानंदाने स्वतःचे दोन्ही ओठ स्वतःच्या बोटांनी विलग करून पाच सात मिनिटे आढ्याकडे बघत तशीच बसली.

ही इतकी भयंकर का हसत असावी हे गोपला समजले नाही. तेवढ्यात शटलवाला आला आणि त्याने अत्यानंदाने स्वतःचे काही गुण गोपला बहाल केले.

आपल्याला हे सगळे काय समजत आहेत तेच गोपला समजत नव्हते.

गोप - अहो १६९९.. मला जरा.. एक सांगता का?? ... ही .. ही भानगड काय आहे सगळी??

१६९९ ने लाजर्‍या नजरेने आणि लाडीक चेहर्‍याने खूप खूप खुष होऊन गोपकडे पाहिले. त्यातही गोपला बरे वाटले की आत्ता हिची ती 'मनातले समजण्याची' चीप आपल्याकडे आहे. नाहीतर 'ही आत्ता किती छान दिसली' या विचारावर आपले दहा पाच गुण तरी गेलेच असते. १६९९ तसाच लाडीक चेहरा ठेवून गालातल्या गालात हासत म्हणाली..

१६९९ - त्यात कसली भानगड?? .. ८०००००००११ चेच अंश आपण!

गोप - हा ८०००००००११ आहे कोण नक्की??

१६९९ - असा का अनादराने उल्लेख करतात त्यांचा?? तो ही आपण असा उल्लेख करावात?? मी आपले आभार मानते की या अनंत काळच्या आपल्या प्रवासातील या टप्यात आपण माझे सहकार्य स्वीकारलेत!

बोंबला! ही काय नवीच भानगड?? म्हणजे आत्तापर्यंत टाकाऊ वस्तू असणारे आपण आता एकदम देवतूल्य झालो तर!

गोप मुळात एक सामान्य माणूस होता. मिळालेल्या पोझिशनचा स्वीकार करतानाही घाबरणारा माणूस! निगर्वी! त्याला लगेच जाणवले, जशी झटक्यात ही पोझिशन मिळाली तशीच ती झटक्यात जाऊही शकते. त्यावेळेस आपले हाल कुत्रा खाणार नाही. आत्तापासूनच नम्रपणे राहणे अत्यावश्यक आहे.

गोप - अहो बाई... तुम्ही मला काहीही माना.. पण मि एक साधा यक:श्चित मानव आहे.. आणि मी तसाच वागू शकतो...

१६९९ अजूनही त्याच मूडमध्ये होती. तिचे कुठलेच गुण जाणार नव्हते, उलट हजार एक गुण मिळणारच होते. आपण ८०००००००११ च्या खर्‍याखुर्‍या अनुयायासह आहोत हे समजल्यावर पृथ्वीवर काय 'आनंदी हल्लकल्लोळ' माजलेला असेल याची तिला कल्पनाच करता येत नव्हती. युद्ध नक्कीच थांबलेले असणार होते. पृथ्वी, चंद्र, मंगळ आणि शुक्र येथील सर्व रहिवाश्यांना केव्हाच समजलेली असणार होती ही बाब! पुथ्वीवर गेल्यावर काय अफाट जल्लोषात आपले स्वागत होईल याची कल्पना करून १६९९ अत्यानंदाने हासत होती.

गोप फारच मागे लागला तसा तिने तो प्रकार सांगून टाकला.

भानगड अशी होती की ८०००००००११ या व्यक्तीला आजची मानव जमात आपला मूळ पुरुष मानत होती. या पुरुषाआधी झालेले सर्व अवतार हे सृष्टी नष्ट करण्याच्या हेतूने निर्माण झाले होते असा या लोकांचा समज होता.

वास्तविक पाहता आधी निर्माण झालेली माणसे ही सुद्धा साधीसुधी माणसेच होती. पण ८०००००००११ या माणसाला अनेक चांगल्या शक्ती प्राप्त झालेल्या होत्या. त्याने सृष्टी फुलावी यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्या शक्तींचा वापर केला होता. त्यांच्यापासूनच ही मानव जमात सुखात राहायला सुरुवात झालेली होती. इ.स. ८०२१ पासून मानव प्रगत झाला याचे कारण सर्वजण ८०००००००११ चा अवतार असेच मानत होते. ही अंधश्रद्धा नसून शास्त्रीय आधार होता त्याला! ८०००००००११ ने तेव्हाच्या पिढीला संकटमुक्त करून जीवनदान प्रदान केलेले होते. आज मिळत असलेले व जात असलेले सर्व गुण हे शेवटी ८०००००००११ला दाखवावे लागतात असा विश्वास ८० % जनतेला होता. या ८०००००००११चे विश्वात सध्या स्थान कुठे आहे हे माहीत नसले तरीही ते कुठेही कधीही असतात हे माहीत होते. ते असताना त्यांच्या संपर्कातील सर्व माणसे आचरणाने अत्यंत पवित्रच होती. त्याचा प्रभाव असा पडला की काही दशकांनंतर निर्माण झालेल्या चीप्सपैकी ८०००००००११ यांचा जो शुद्ध भक्त असेल त्याची चीप विशिष्ट आवाज करत संदेश द्यायची. असे संदेश मिळणारे लोक समाजात पूज्य ठरू लागले. हळूहळू मूळ शुद्धतेपासून समाज दूर जाऊ लागला. 'असे संदेश मिळू शकणारे लोक होते' या आता दंतकथा बनू लागल्या. त्याच्या नावावर वाट्टेल ते खपवले जाऊ लागले. भीती दाखवली जाऊ लागली. शेवटी एजंट्सनी सर्व प्रकाराचे नियंत्रण हाती घेतले व स्पष्टप्णे कायदा केला की कुणाची अशी चीप प्रत्यक्ष वाजली तरच त्याला पूज्य मानले जावे. पुर्वीच्या लोकांच्या अशा चीप्स वाजायच्या या कथांना अनुसरून आज कोणतीही प्रथा चालवू नये.

आणि आश्चर्याचा तीव्र धक्का म्हणजे कुणी नाही तर गोपचीच चीप वाजली नेमकी!

आज नेमके मंगळ ते स्पेस प्लॅटफॉर्म या प्रवासाच्या मार्गावरच ८०००००००११चे स्थान होते.

आणि त्यामुळे अर्थातच, मानव समाजातील सर्वच्या सर्व समजुतींना, संस्कृतीला आणि गृहीतांना जबरदस्त धक्का बसलेला होता. गोपच्या चीपवरील तो आवाज १६२२ ने पृथ्वीवर चक्क एजंट्सच्या सर्वोच्च नेत्याला ऐकवला होता. तो आवाज ऐकून तो नेताही हादरला होता. ८०००००००११ चा एक दूत आजही हयात आहे हे पाहून आणि नेमका तो दूतच गेले आठ हजार वर्षे जीवित आहे हे पाहून तो नेता इतका उडालेला होता की त्याने आधी पृथ्वी व चंद्र येथील रहिवाशांचे युद्ध थांबवले होते व संपूर्ण मानवजातीचे लक्ष त्या घटनेकडे वळवले होते. क्षणाक्षणाला ते शटल कुठे जात आहे, त्यात गोप आणि १६९९ एकमेकांशी कसे बोलत आहेत वगैरे सर्व काही घराघरात दिसत होते. त्या चीपचा रेकॉर्ड केला गेलेला आवाज सतत घराघरात ऐकवला जात होता. १६९९ तर स्वप्नांच्य दुनियेतच वावरू लागली होती. शटल चालवणारा इलेक्ट्रॉनिकली मुलाखत देत होता. अनेक शटल्स त्या शटलच्या मागून जाऊन मानवंदना देत होती.

गोप!

एक गरीब स्वभावाचा ८००० वर्षे जगलेला गोप हा माणूस आज अवघ्या सृष्टीचा नेता बनणार होता. तो आणि १६९९ एकमेकांशी काय बोलत आहेत ते मात्र आदराने गुप्त ठेवले जात होते. एजंट्सचा नेता सोडला तर कुणालाही ते ऐकता येत नव्हते. गोपने सांगितल्याप्रमाणे 'कंट्रोलरेट ऑफ पॉईंट्स डिस्ट्रिब्युशन अ‍ॅन्ड लाईफ परफॉर्मन्स ऑफ अ ह्युमन' या केंद्रिय संस्थेतर्फे १६२२ व त्याच्या सर्व स्टाफला हजार हजार गुणांचे वाटप मगाशीच झालेले होते.

मात्र, ८०००००००११ हा स्वामी समर्थांचा इसवीसन ८००० मधील अवतार होता हे ८०००००००११ आणि खुद्द स्वामी समर्थ यांच्यशिवाय कुणालाही ज्ञात नव्हते.

स्पेस प्लॅटफॉर्म जवळ आला होता. हा प्लॅटफॉर्म १६२२ चा स्वतःचा असल्यामुळे तर पृथ्वीवर १६२२ ल अक्षरशः उचंबळूनच आलेले होते. कधी एकदा ते शटल तिथे लॅन्ड होतंय आणि मी अख्या मानवजमातीत महान ठरतोय असे त्याला वाटू लागले होते.

शटल लॅन्ड झाले एकदाचे!

केवळ तासा - सव्वा तासाच्या प्रवासात 'सामान्य गोपचा' 'महान ४६३४४' झालेला होता.

प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर १६९९ आनंदाने बागडू लागली. गोप एखाद्या जगजेत्याच्या थाटात उतरला. पण मनातून हबकलेलाच होता. शटलवाला हसून अभिवादन करून पुन्हा मंगळाकडे निघाला होता...

गोपला आता अवकाशातील तो अंधार आणि दाही दिशांना असलेले मंत्रमुग्ध करणारे चांदणे पाहून खरे तर भीतीच वाटली. नक्की आपण कुठे आलो आहोत ते समजत नव्हते. एक वेगळाच अवाढव्य आकाराचा गोळा आकाशात दिसत होता..

हा नक्कीच गुरू असणार असे गोपला वाटले.. त्याला आता हे मानसिक धक्के सहन होत नव्हते. त्याला हवी होती विश्रान्ती!

विश्रान्ती घ्यायची जागा कुठे आहे हे विचारण्यासाठी त्याने १६९९ ला हाक मारली...

"ओ १६९९... मला जरा पडायचंय.. इथे आडवं व्हायला जागा आहे का आतमध्ये???"

१६९९ची नजर झुकली. लाजरं हसू तिच्या गुलाबी होणार्‍या गालांवर फुलत होतं! नजरेतून नक्षत्रे उतरत असावीत असे वाटत होते. लांबसडक पापण्या त्या प्लॅटफॉर्मच्या गुरुत्वाकर्षणाने झुकल्यात की काय हे गोपला समजेना.. क्षणभर तोही त्या स्वर्गीय मुद्रेकडे बेभान होऊन पाहातच राहिला...

तेवढ्यात १६९९ ने एक गिरकी घेतली.. हासत हासत गोपकडे पाहात पुन्हा नजर खाली झुकवली...

तिच्या स्मितहास्यातून अवकाशातील चांदण्यापेक्षाही सुंदर चांदणं उतरत होतं!

"ओ १६९९... फिरता काय गरागरा?? इथे कुठे आराम करण्यासाठी जागा आहे का एखादी???"

लज्जेने भिजलेले डोळे ४६३४४ वर रोखून मंद हासत १६९९ म्हणाली...

"मला ... नुसतंच ९९ म्हणा... लाडाने... "

गुलमोहर: 

चुकून जर्दाळू या नावानेच प्रकाशित होतायत राव भाग!

काही समजत नाही.

ड्यु आय घेतल्याचे परिणाम भोगतोय!

Lol

-'बेफिकीर'!

आज मी पहिली.... छान झाला हा ही भाग.. या ई. स. १००००० मधल्या लोकांचा पोषाख काय असेल??? कि सगळे स्टील बॉडी रोबोट सारखे???? उत्सुकता ताणली जातेय प्रत्येक नवीन भागामुळे.....

आम्हाला तुमच्याच नावाने दिसतोय हा भाग.. पु.ले.शु बेफि.......

हाड तिच्यायला.. म्हणे हसायची परवानगी... ओ.. हे रॉकेट थांबवा... मी मंगळावरच बसणार आहे.. >> हे वाक्य म्हणजे एकदम "खुद्दक्कन"हसवल्या सारखं झालं आहे Biggrin

'कंट्रोलरेट ऑफ पॉईंट्स डिस्ट्रिब्युशन अ‍ॅन्ड लाईफ परफॉर्मन्स ऑफ अ ह्युमन' या केंद्रिय संस्थेतर्फे>> सह्हिय..!

मात्र, ८०००००००११ हा स्वामी समर्थांचा इसवीसन ८००० मधील अवतार होता हे ८०००००००११ आणि खुद्द स्वामी समर्थ यांच्यशिवाय कुणालाही ज्ञात नव्हते.>> 000203FB[1].gif

हा भाग खुपच आवडला 'भुषणराव'.

बेफि़कीरजी रंगत एकदम वाढत चाललीय, १६९९ चे रडण्याची , हसण्याची पध्दत पाहीली आता प्रेमात काय नविन शोध लागेल याचा विचार करून खूप खूप वेळा ओठ खाली वर केलेत. मस्तच येऊ द्या पुढचा भाग.

कथा आणि तुमची विचारशक्ती मस्तच पण स्वामी समर्थांचा अवतार वगैरे भानगड नसती तरी चाललं असतं....तुम्हाला दुसरं काहीतरी लिहिता आलं असतंच. असो.

अरे सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हीये हा पण भाग.... जाम करमणुक झाली Lol साईंटिफिक कॉमेडी ती ही मराठीतली... पहिल्यांदाच वाचनात आलीये. जबरदस्त!!!

हे ८०००००००११ मायबोलीवरचे कुणी नाहित का?>>> असतीलही निलिमा... साक्षात बेफिजीच असावेत ते! Rofl

उद्या लिहिणार आहे. धन्यवाद!

आज काहीतरी वेगळे लिहायचा प्रयत्न चालू आहे. ही धमकी गंभीरपणे घ्यावीत की नाही हे मला अजून ठरवता येत नाही आहे. Happy

भुषणराव.....
खूप खूप वेळा ओठ खाली वर केलेत .... अगदि पहिल्या वाक्यापासुन ते अगदि शेवतच्या वाक्या पर्यॅम्त....

९९ च लाजण वाचुन तर आता खरच प्रेमात काय काय नविन शोध लागणार आहे ह्याचि उस्तुकता लागलि आहे.

तुमच्या कल्पना शक्तिला सलाम.....

गोप - मला तुमचे पॉईन्ट्स द्या.. वीस..

१६९९ - का??

गोप - तुम्ही मला हासलात.. माझा विनयभंग झालाय.. >>>> Lol

"मला ... नुसतंच ९९ म्हणा... लाडाने... " >>> Rofl Rofl