किती दिवस

Submitted by वैभव देशमुख on 15 March, 2011 - 01:30

किती दिवस धरून ठेवशील केसांमधे काळा रंग
किती दिवस लखाकेल तुझं गोरं गोरं अंग

किती दिवस डोळ्याखालची काळी वर्तुळं टळतील
किती दिवस गाली तुझ्या लाल फुलं फुलतील

किती दिवस राहील तुझ्या देहामधे दरवळ
किती दिवस खेचशील वासनांची वर्दळ

किती दिवस काळजाचा आवाज तुला येणार नाही
किती दिवस जीव तुझा आरशाला भिणार नाही

...वय तुझ्या अंगावर दाट जाळं विणेलच
मी खोटं बोलत नव्हतो हे तुला कळेलच....

- वैभव देशमुख

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अप्रतिम भाव. काचका मुळीच नाही..

किती दिवस काळजाचा आवाज तुला येणार नाही
किती दिवस जीव तुझा आरशाला भिणार नाही

हे खूपच छान सुचले आहे...अतिशय सुंदर रचना.. असेच लिहीत रहावे. - पुलेशु Happy

का का क मध्ये का टाकली?
आम्हाला प्रश्नांकितच ठेवायचं होतं का?
Wink
मस्तचय!
रामकुमार

सुरेख Happy