सनई चौघडे

Submitted by हिम्सकूल on 23 June, 2008 - 19:00

चित्रपट : सनई चौघडे
निर्मिती: मुक्ता आर्टस्, दिप्ती तळपदे..
प्र. भू. : सई ताम्हणकर, सुबोध भावे, शिल्पा तुळसकर, तुषार दळवी, पाहुणा: श्रेयस तळपदे
दिग्दर्शक : राजीव पाटील
संगीत : अवधूत गुप्ते
नुकताच ह्या चित्रपटाचा प्रेस रिलिज शो बघण्याचा योग आला. मराठी चित्रपटानी कात टाकल्याची प्रचिती हा चित्रपट करुन देतो.. विषय तसा जुनाच कुमारी माता.. आणि तिचे लग्न..
कुमारी माता असलेली मुलगी आपल्या आईला मृत्यूशय्येवर वचन देते की मी कोणाला काही सांगणार नाही आणि लग्न करीन.. आणि तीची आई तिथेच प्राण सोडते. मुलीची जबाबदारी तिच्या मावस बहिणी वर.. तिचा नवरा US मध्ये जॉब मिळवून तिकडे जाण्याच्या प्रयत्नात.. आणि त्यात ह्या मुलीची जबाबदारी त्यांच्या डोक्यावर.. पण बायकोच्या एकुतल्या एका मावशीची मुलगी म्हटल्यावर दुसरा काही पर्याय नाही..
"कांदे पोहे मॅरेज ब्युरो" एका वेगळ्या पध्दतीचा मॅरेज ब्युरो. Tag line : nothing is impossible वेगळीच Concept.. सगळ्या उपवर मुलां आणि मुलींमधून ५ जोडपी निवडून त्यांच्यात लग्न लावून देणार.. ह्याचा हेड सुबोध भावे. एक हुशार आणि कर्तबगार मालक.. आतापर्यंत यशस्वी.. उपलब्ध अर्जांमधून ५ मुली व ५ मुले घेऊन corianthan club मध्ये प्रयाण आणि योग्य जोडी निवड्यास सुरवात. एकूण सात फेर्‍यांमधून जोडीदाराची निवड प्रक्रिया पूर्ण..
मध्ये मध्ये काही धमाल प्रकारानी एकमेकांना जाणून घेण्याचे प्रकार.. एकूणच इंटरेस्टींग.. शेवटच्या फेरीत सई म्हणजेच कुमारी मातेने ती कुमारी माता आहे म्हणुन तिच्या निवडलेल्या जोडीदारास सांगणे आणि त्यामुळे होणारी गुंतागुंत..
जोडीदाराने नकार देणे मग सुबोध भावेचा सई कुमारीमाता आहे म्हणुन त्याच्या कंपनी साठी त्याचा पब्लिसिटीसाठी उपयोग करुन घेणे.. त्याचा अर्थातच सई आणि तिच्या कुटुंबियांना त्रास होणे.. शेवटी ४च जोड्यांचे लग्न करणार असल्याची घोषणा करुन माघार घेणे.. आणि climax ला... (हे सांगितल्यास काय मजा रहाणार)
एकून चित्रपटात सगळ्यांची कामे उत्तम झाली आहेत.. सई ताम्हणकरचा पहिलाच चित्रपट असला तरी तशी नवखी वाटली नाही.. काही मालिकांमध्ये कामाचा अनुभव असल्यामुळे असेल. सुबोध भावे चांगलीच छाप पाडतो. सुरेख भूमिका आहे आणि बर्‍याच प्रमाणात निभावली पण आहे.. शिल्पा तुळसकर आणि तुषार दळवी.. दिलेली कामगिरी योग्य पध्दतीत पार पाडतात.. दिवाकर जोशी आणि असंभव मधला सध्या जेल मध्ये असलेला अभिमान. ह्या दोघांच्या वाटेला काही सुरेख पंचेस असलेले संवाद आहेत आणि त्यानी ते अप्रतिम घेतेले आहेत.. दिवाकर जोशींचा "point of view" अप्रतिम आहे. श्रेयस तळपदे एका गाण्यात आणि काही प्रसंगात आहे. एकूणच चित्रपट क्षेत्रात स्थिरवला असल्यानी उत्तम...
आता संगीताकडे बघु या.. अवधूत गुप्ते.. सध्या फारच लोकप्रिय आहे.. तीनच गाणी आहेत.. पण फारशी लक्षात रहात नाहीत.. एक गाणे चक्क सुनिधी चौहानने म्हटलेले आहे.. ह्यातले शब्द फारच भारी आहेत. "आयुष्य हे चुलीवरच्या कडई मधले कांदेपोहे" सुरुवातीला दोन वेळा हे काही कळतच नाही पण नंतर नीट कान देऊ ऐकाल्यावर ह्याचा बोध झाला..
सुबोध भावे वर चित्रित केलेले गाणे पण ठिक आहे.. "पत्रिकेतला मंगळ मी, भटजी मी, अंतरपाट मी" असे काही से आहे हे गाणे.. ह्या गाण्याचे चित्रकरण छान झाले आहे
चित्रिकरण बरेचसे पुण्यातच झालेले आहे.. काही शॉट्स सुरेख झाले आहेत.. एका शॉटचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो.. श्रेयस तळपदे कार मधून उतरतो आणि एक ट्रक मागून येऊन त्याला उडवून निघुन जातो.. अंगावर येतो हा शॉट.
एकूणच एकदा नक्कीच बघण्या सारखा चित्रपट.. काही तरी नविन concept पहायला नक्कीच चांगली वाटते...
आणि हो ह्या चित्रपटाचे मूळ नाव "कांदे पोहे" होते.. ते कधी आणि का बदलले ह्यावर कोणीतरी प्रकाश टाकेलच..
पण पहिला अर्धा भाग जेवढा फास्ट आहे तितकाच दुसरा अर्धा भाग स्लो झाला आहे.. त्यामुळे नंतर कधी एकदा संपतोय चित्रपट असे वाटते...
==================
फुकट ते पौष्टीक

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण कालच पाहिला हा सिनेमा आणि मला काही आवडला नाही.
चकचकीत लोकेशन्स, टकाटक कपडे, उडती गाणी ज्याचे शब्द कुठेही तोडलेले असतात यालाच मॉडर्न म्हणायचं असेल तर ठिके पण बाकी मॉडर्न सिनेमा का बरं म्हणलंय याला असा प्रश्नच पडावा असं आहे.
मुळात त्यांना arranged marriage या विषयावर सिनेमा करायचाय की कुमारी माता या विषयावर? की कुमारी माता या संदर्भाने एकुणात लग्नाच्या आणि सगळ्याच स्त्रीपुरूष व्यवहारांबद्दल?
कुमारी माता हा विषय इतक्या भडकपणे आलाय की सगळंच हास्यास्पद झालंय. कुमारी मातेचं लग्न हा काही आजच्या घडीला न भूतो न भविष्यती प्रकार नाहीये. फसवून वा न फसवता दोन्ही पद्धतीने आजतागायत अनेक कुमारी मातांचे विवाह झाले आहेत.
आणि कुमारी मातेला मुलासकट जर एखादा प्रथमवर स्वीकारायला तयार नसेल तर त्यात मला नाही वाटत त्या मुलाचं काय चुकलं? आपण कुठली जबाबदारी घ्यावी किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
मुळात आईला दिलेला शब्द म्हणून मुलीने मूल असणं लपवून ठेवणं आणि लग्नाच्या बाजारात उतरणं याला फसवणूकच म्हणता येईल. पण ती मुलगी प्रचंड प्रामाणिक आहे असं सगळेच जण सतत म्हणत रहातात नंतर. आणि त्या बिचार्‍या आदित्यला पटवायचा प्रयत्न करतात. मग आदित्यला वाईट दाखवण्यासाठी उगाच आपला एका गॉसिपचा आधार... ये बात कुछ हजम नही हुई!
कुमारी माता ही संकल्पना मेकर्सनाच गळी उतरत नाहीये त्यामुळे तिचा म्हणजे कुमारी मातेचा 'स्वीकार' करणं हे किळस यावी इतकं ग्लोरिफाय केलं गेलंय.
मधेच चिन्मय मांडलेकर आणि अनिता दातेचा एक सीन आहे ज्यात एरवी अगदी पारंपारीक असणारी ती मुलगी विचारते 'की माझ्यावर लग्नानंतर बलात्कार झाला तर तू काय करशील? टाकून देशील?' त्यावर तो अभावितपणे हो म्हणतो. तो सीन छान आहे पण त्यामुळे अपेक्षा वाढतात. असं वाटतं की कुमारी मातेच्या इश्यूला धरून एकुणातच लग्न, संबंध आणि स्त्री-पुरूष या बाबतीत हे बाकीचे लग्नाळू डोळसपणे चर्चा करतील. त्यातून त्यांची नाती कशी डेव्हलप होतायत ते काही असेल. पण नाही तेही काही घडत नाही कारण या सीन नंतर सगळी जोडपी परत दिसतात ती मंचावर तेही जुळलेल्या जोड्यांमधे..
शेवट तर इतका obvious की बास्स.. केवळ फुगा फोडायचा नाही म्हणून लिहित नाहीये पण कुमारी मातेचं लग्नं ठरणं हा केवळ व्यावसायिक स्टंट वाटतो... उगाच जमवलेला.
पण तरी सई ताम्हणकर ही चांगली अभिनेत्री आहे. मुळात चिकणा चुपडा मुखडा तिला लाभलेला नसला तरी तिच्या अभिनयामुळे ती खूप छान वाटते. तिचं पदद्यावर असणं सुखावह होतं. नाचते मात्र जडजड. सुशांत शेलारचा अभिनयही चांगला. सुबोध भावे चांगलाय पण तो यापेक्षा खूप चांगलं करू शकतो. कधी नव्हे ते तुषार दळवीने पण एक सीन चांगला केलाय.

एकुणात thumbs down!!
पण माझ्या कडच्या यादीत... 'सध्या पाह्यलेली सगळ्यात भंगार फिल्म' हा किताब या फिल्मला मिळू शकत नाही. अजूनही त्या बाबतीत JA ची पातळी कोणी गाठू शकलेलं नाहीये.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

जेव्हा सई तिची रहस्य सांगते त्या नंतर होणारा चिन्मय (अभीमान) आणी त्याची होणारी बायको ह्यांच्या मधला संवाद कुठे तरी अर्घवट राहीला अस वाटल. पण overall चित्रपट मस्त आहे. आणी आमच्या शो ला जवळ पास सगळ चित्रपटग्रुह भरलेल होत.

मी पण पाहिला हा सिनेमा... त्यातल्या बर्‍याच ओष्टी खटकल्या..

१. सई आईला दिलेल्या वचनासाठी लग्नाला उभी राहते.. पण तिने आईला दुसरंही वचन दिलेले असते की हे रहस्य कोणालाही सांगणार नाही..त्याचे काय?? म्हणजे आपल्या सोयी प्रमाणे वचन पाळावे असे असते का?
२. कुमारीमाते चा पुरस्कार करण्यासाठी जे काही (इल) लॉजिकल संवाद आहेत त्याला पाया नाही.(बेसलेस) उदा. कुंती,सीता आणि द्रौपदी यांचे उल्लेख केलेले आहेत.. त्यातली फक्त कुंती कुमारीमाता होती. सीतेला त्या पंगतीत बसवून तिच्या पावित्र्याचा अपमान!!
३. जर सईला त्या मुलाला जन्म द्यायचाच होता तर त्याच्या भविष्याच तिने त्याला जन्म द्यायच्या आधी विचार करायला हवा होता... म्हणजे त्याला आपण पित्याचे छत्र देऊच शकलो नाही तर्...तुझ्या इच्छेखातर दुसर्‍यांवर का जबरदस्ती?? म्हणजे असा कुणी पुरूष प्रत्येक कुमारीमातेला मिळेलच असे नाही या वास्तवाची जाणीव कुठेतरी व्हायला हवी होती.

म्हणजे यांना हलक्याफुलक्या चित्रपटात जाता जाता समाजाला संदेश वगैरे द्यायचा आहे असे दिसते..मूळ उद्देश तो नाही..
म्हणजे त्यामध्ये आपण समरसून जात नाही..ते प्रश्न, त्या समस्या तिर्‍हाइताच्या वाटतात .पण मग या सिनेमापेक्षा "सातच्या आत घरात " कितीतरी दर्जेदार वाटतो संवाद, प्रसंग , पटकथा याबाबतीत.
तो थेट मनाला भिडतो. म्हणजे त्यात इतर पात्रांना पडलेले प्रश्न आपल्यालाही पडतात आणि त्यात मिळालेली उत्तरेही पटतात!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

अज्जुकाला अनुमोदन !
कुमारी माता विषय अगदीच भडक आणि हास्यास्पद मांडलाय, अतिशय उथळ !
मुळात त्या मुलीला 'प्रामाणिक' म्हणणं हेच विनोदी , वर अशी खाजगी गोष्ट जेंव्हा मॅरेज ब्युरो ला कळाते तेंव्हा हि सम्स्या इतर लग्नाच्या couples आणि त्यांच्या parents पुढे discuss करायची हे महा विनोदी, म्हणजे एखाद्या डॉक्टर ने त्याची प्रायव्हेट केस इतर रुग्णां पुढे मांडल्या सारखं झालं!
ही मुलगी त्या बिचार्‍या मुलाला आधी काही कल्पना न देता आग्दी शेवटी हे असा स्फोट करणार आणि मग त्या मुलाला हिचं आधीचं मुल नको असेल म्हणून त्याने नकार दिला तर तो लगेच एकदम व्हिलन , हे पण विनोदी !
प्रामाणिक म्हणवून घेणार्‍या मुलीने सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वात आधी कशी सांगितली नाही ?
मला स्टार कास्ट पैकी छोट्याशा भूमिकेतला श्रेयस तळापदे सोडून कोणीच प्रॉमिसिंग वाटलं नाही .
ती यु.एस च्या मुला बरोबर लग्न ठरलेली मुलगी संध्या मृदुल आणि सुष्मिता सेन सारखी दिसते थोडी.

नीरजा -- JA म्हणजे कुठला सिनेमा ?

दीपाली मी आत्ताच लिहीणार होतो की तू वेगळाच fullform लिहीशील त्याचा पण चक्क बरोबर लिहीलास Happy