उमेश विनायक कुलकर्णी

Submitted by मीन्वा on 23 June, 2008 - 15:01

तो अगदी साधा सरळ, सदाशिवपेठी (सदाशिवपेठेत राहणारा या अर्थीच घ्या.. ) मध्यमवर्गीय घरातून आलेला मुलगा. पेरूगेट भावेस्कूलचा विद्यार्थी, बीएमसीसी मधून कॉमर्स ग्रॅज्युएट झालाय. त्यानी सीए इंटर पूर्ण केलंय आणि हो LLB झालाय. हे सगळं वर्णन वाचून पुढचं वाक्य 'तो आज अमुकतमुक कंपनी मध्ये मधे कारकुनी करतो' असंच असेल ना? मग चुकलात... तो 'वळू' या मस्त मराठी सिनेमाचा दिग्दर्शक आहे आणि त्याचं नाव आहे.... उमेश विनायक कुलकर्णी..
umesh_vinayak_kulkarni.jpg
खुसखुशीत संवाद, उत्तम पार्श्वसंगीत, साधी कथा (काहीच अचाट आणि अतर्क्य नाही म्हणजे काय? ) आणि सर्वच कलाकारांचा सुंदर अभिनय यामुळे लक्षात राहतो तो हलकाफुलका चित्रपट म्हणजे वळू. वळूचा दिग्दर्शक उमेश कुलकर्णीशी गप्पा मारायची संधी मिळाली तर का सोडा? उमेश मला माहीत असायचं कारण म्हणजे माझा बालमित्र. अर्थात तेव्हा कधीही असं वाटलं नव्हतं की आपला बालमित्र असं मस्त काम करेल आणि आपण त्याचीच मुलाखत घेऊ. त्याने ही अभिमानास्पद संधी मला दिली त्यामुळे झालेला आनंद शब्दात मांडणं खरोखर अवघड आहे.

उमेशला त्याची 'मुलाखत मिळेल का?' असं विचारल्यावर त्याने लगेच होकार दिला. वळू प्रदर्शित झाल्यावर उमेशला भेटल्यावर सर्वात प्रथम जाणवलं की तो अजून तसाच आहे. सेलिब्रिटी झाल्याने किंवा चित्रपटासारख्या माध्यमात आहे म्हणून त्याच्यात काहीही बदल झालेला नाहीये. बदल झालाच असेल तर तो इतकाच की गेल्या अनेक वर्षात तो अनुभवाने खूप समृद्ध झालाय. मी ओळखत होते त्या उमेशपेक्षा खूप जास्त प्रगल्भपणा त्याच्या बोलण्यातून जाणवत होता.

मीनाक्षी: पहिला प्रश्न अर्थातच तू अचानक या क्षेत्रात कुठे आलास हाच आहे? लहानपणी आपण सगळेच गणपतीत कार्यक्रम करायचो. त्यात तू केलेले नाच मी विसरले नाहीये. संस्कार भारतीच्या नाट्यवर्गात वगैरे तू नाटकात काम करत होतास पण या क्षेत्रात जाशील आणि तेही दिग्दर्शक म्हणून असं अजिबात वाटलं नव्हतं.

उमेशः तुला माहितीच आहे मी पेरूगेट भावेस्कूलमधे दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं त्यानंतर बीएमसीसीमधून ग्रॅज्यूएशन. सीए इंटर केलं. माझी आर्टिकलशिपपण पूर्ण झाली होती.

त्याच वेळी आमचे एक प्रमोद काळे सर आहेत त्यांनी मला विचारलं की सुमित्रामावशींना (सुमित्रा भावे.) त्यांच्या दोघी या चित्रपटासाठी असिस्टंट हवे आहेत. तूला आवडेल का हे काम करायला? मी आणि सचिन कुंडलकर त्यावेळी बीएमसीसीमधे दुसर्‍या वर्षाला होतो. मला कुठलीही नविन गोष्ट एकदा करुन पहायलाच हवी असं वाटतं. मग आम्ही दोघांनीही लगेच ठरवलं 'Why not films?' त्यांना असिस्ट करायला लागलो. त्यावेळी पहील्यांदा क्लॅप द्यायचं काम करायला लागलो. तेव्हापासून सुमित्रा मावशी आणि सुनील सुकथनकर यांच्याबरोबर काम करायला लागलो.

त्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक माहितीपट केले. प्रत्येक माहितीपट एक नविन खिडकी उघडत जात होता. आयुष्याकडे बघायचा वेगवेगळा दृष्टिकोन प्रत्येक वेळी मिळत होता. माहितीपटामुळे एकेका विषयाबद्दल जास्त सखोल माहिती मिळत होती. हे काम करतानाच चित्रपट हे माध्यम किती प्रभावी आहे त्याची जाणीव झाली. चित्रपटाचा तो बघणार्‍या व्यक्तीवर होणारा परिणाम किती असतो याचा अंदाज आला. सुमित्रामावशींची काम करण्याची पद्धत, त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सगळं अनुभवताना जगण्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने कळत गेला. या क्षेत्रात काही तरी काम करावं अशी प्रेरणा मिळाली. त्या दरम्यान ह्या क्षेत्रात काम करायचं हे जवळजवळ पक्क झालं. लोकांचे टॅक्स वाचवण्यात आयुष्य घालवायचं नाहीये याची खात्री पटली.

(उमेश मनापासून बोलत होता. मला वेगळ्याच एका अनोळखी माणसाला भेटायला आल्यासारखं वाटत होतं. ज्याच्याबरोबर विसर्जन मिरवणूक पहात रात्र रात्र फिरत होतो, कितीतरी वेळ खेळत होतो तो उमेश आज कसा भेटेल..? काळ झरझर पुढे जातो आपल्या मनात मात्र त्या माणसाची जुनीच प्रतिमा आपण सांभाळत राहतो.)

त्यानंतर गोपी देसाई 'मुझसे दोस्ती करोगे' चे दिग्दर्शक, त्यांच्याबरोबरही काम केलं

(इथे माझ्या मनात उमेशच्या आईवडिलांबद्दल विचार आल्याशिवाय राहिला नाही. तथाकथित धोपट मार्ग सोडून मुलाने ग्रॅज्युएशन झाल्यावर, सीए इंटर झाल्यावर ते सगळं सोडून तिसरंच काहीतरी करायचं ठरवल्यावर कुठलेही पालक नक्कीच चिंतेत पडले असते, त्यांनी या सगळ्याला कदाचित विरोध केला असता. उमेशला मात्र त्याची पालकांनी ही संधी घेऊ दिली, ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याबाबतीत उमेश भाग्यवान आहे, असं मला वाटतं. आयुष्यात उगीच काहीतरी करत रहायचं; तेही केवळ आयुष्यात आपल्याला नक्की काय करावसं वाटतं, हे उशीरा कळलं म्हणून; असं कितीतरी जणांच्या बाबतीत होतं. त्याला या जीवघेण्या जगण्याच्या शिक्षेतून जावं लागलं नाही, यापेक्षा भाग्याची गोष्ट काय असू शकते?)

मीनाक्षी: तुझ्या चित्रपट माध्यमात काम कराण्याच्या निर्णयाचं घरुन स्वागत झालं की...?

उमेशः मी हे सगळं करु शकलो, ते माझ्या आईबाबांमुळेच. त्यांनी मला कुठलीही गोष्ट करु नको म्हणून कधीही सांगीतलं नाही. तुला करायचंय ना.. मग कर. खरं म्हणजे बाबांचा स्वत:चा व्यवसाय होता; मी इंजिनिअरींग केलं असतं, किंवा आर्किटेक्चर, तर त्या व्यवसायात सहज मला तयार इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध होतं. त्याचा त्यांनाही फायदा झाला असता. पण तरीही त्यांनी मला एकदाही, तसं करशील का म्हणूनही विचारलं नाही.

मला वाटतं या अशा प्रोत्साहनामुळेच, मी हवं ते करु शकलो किंवा मला नक्की काय करताना मजा येते हे कळवून घेईपर्यंत थांबू शकलो.

मीनाक्षी: मग तू फिल्म इन्स्टिट्यूटमधे दाखल झालास का?

उमेशः त्यावेळी नेमकं फिल्म इन्स्टिट्यूटमधे झीरो इअर होतं. दोन वर्ष ऍडमिशन बंदच होत्या. कॉलेजशी काही तरी संपर्क रहावा म्हणून त्या दोन वर्षात मी LLB केलं.

ऍडमिशन ओपन झाल्या तेव्हा परीक्षा दिली. पुण्यातली फिल्म इन्स्टिट्यूट जगातल्या ज्या मोजक्या चांगल्या फिल्म इन्स्टिट्यूट आहेत त्यापैकी एक आहे. सुनील सुकथनकरांकडून त्यांच्या फिल्म इन्स्टिट्यूट मधल्या दिवसांबद्दल अनुभवांबद्दल खूप ऐकलं होतं. साधारण दोन ते तीन हजार जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी चाळीस जणांना ऍडमिशन मिळाली. परीक्षेसाठी काही खास तयारी नव्हती केली. ऍडमिशन मिळेल असं वाटलंच नव्हतं सुदैवानं ऍडमिशन मिळाली. सगळं नकळतच घडत होतं.

मीनाक्षी: तुम्ही फिल्म इन्स्टिट्यूटमधे जो कोर्स करता त्याचं नक्की स्वरुप काय असतं? डीग्री का?

उमेशः खरं म्हणजे तो डिप्लोमा आहे.... पोस्ट ग्रॅज्यूएशन डिप्लोमा. पण अगं त्याने काही फरक पडत नाही. म्हणजे जेव्हापासून कोर्स सुरु झाला तेव्हापासून त्याला डीप्लोमाच म्हणलंय आणि तसही ते सर्टिफिकेट महत्त्वाचं नसतं. ते दाखवून तुम्हाला कसलीही नोकरी मिळत नाही. महत्त्वाचा असतो तो फिल्म इन्स्टिट्यूट मधे मिळणारा अनुभव. तुम्ही तीन वर्ष तिथे काय शिकलात; ते तुम्हाला तुमच्या माध्यमातून दाखवायचं असतं. तो कोर्स करत असताना पहिल्याच वर्षी मला स्कॉलरशिप मिळाली. पॅरीसमधल्या एका संस्थेचा समर युनिव्हर्सिटी कोर्स असतो. त्यासाठी ती स्कॉलरशिप असते. बारा देशातून प्रत्येकी एकाची निवड यासाठी होते. त्यासाठी माझी निवड झाली. पॅरीस मधल्या त्या तीन महिन्यांच्या काळात मला पहिल्यांदा भारतापासून बाहेर असताना; आपण भारतीय आहोत म्हणजे नक्की काय आहोत याची ओळख झाली. त्याचवेळी परदेशी चित्रपटांशी अधिक चांगली ओळख झाली. विचार करण्याची पद्धत थोडी मोकळी ढाकळी झाली. जजमेंटल वृत्ती कमी झाली.

मीनाक्षी: चित्रपटसृष्टी म्हणलं की सर्वांना प्रथम आकर्षण वाटतं ते अभिनयाच्या क्षेत्राचं... तुला दिग्दर्शन क्षेत्रात जावंसं का वाटलं?

उमेशः दिग्दर्शकाला त्याच्या मनात असेल ते दाखवायला पूर्ण कॅनव्हास मिळतो, त्याला जे हवं ते त्यावर रेखाटू शकतो. मी प्रत्यक्ष न भेटताही कितीतरी जणांना माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून भेटू शकतो. वळू रिलीज झाल्यावर माझ्या कितीतरी वेगवेगळ्या ठीकाणी असणार्‍या मित्रांना मी भेटल्याचा आनंद झाला.

मीनाक्षी: आता जरा वळूबद्दल बोलू यात.. ही कथा तू कुठून शोधून काढलीस? कसं ठरतं की या विषयावर चित्रपट बनू शकतो किंवा बनू शकत नाही असं..

उमेशः मी सुमित्रामावशीबरोबर खूप डॉक्युमेंटरी केल्या नंतर मी स्वतंत्रपणेही खूप डॉक्युमेंटरी केल्या. त्यावेळी मी महाराष्ट्रातल्या गावोगावी फिरलो. एक डॉक्युमेंटरी केली ती 'दाईं' या विषयावर होती. धूळ्याच्या आसपासच्या आदिवासी भागात जवळपास हॉस्पिटल वगैरे नाही, म्हणून त्यांनी या दायांना प्रशिक्षण दिलंय; त्यावर ती होती. एक मी केलेली डॉक्युमेंटरी आहे 'ओवी'.... ती 'ओवी' या काव्यप्रकारावर आहे. अर्थात त्यासाठीही गावात फिरणं झालं आणि अशा अनेक डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने मी गावोगावी फिरलो. गावातल्या लोकांचा डॉक्युमेंटरी करताना आलेला अनुभव खूपच मजेशीर होता. कुठेतरी तो माझ्या मनात रेंगाळत होता.

एके दिवशी माझा मित्र, मयुरेश बेलसरे मला म्हणाला की तो त्याच्या भावाबरोबर, अनिरुद्धबरोबर वळू पकडायला गेला होता. मी त्याला म्हणालो की, पुढच्या वेळी जाशील तेव्हा मला सांग. मला त्यावर डॉक्युमेंटरी करायला आवडेल. हे माझ्या डोक्यात घोळत राहिलं.

मला असं वाटतं की, एखादी गोष्ट खूप दिवस तुमच्या डोक्यात / मनात जेव्हा घोळत राहते, तेव्हा नक्कीच त्यात काहीतरी असं असणार जे आपल्याला काहीतरी सांगतंय किंवा सूचित करतंय. त्यात काहीतरी सूत्र दडलेलं असतं; त्याचा शोध घ्यायला हवा.

मग मी आणि गिरीशने (गिरीश कुलकर्णी) यावर खूप विचार केला की हे का आपल्याला सांगावंसं वाटतंय? काय सांगावंसं वाटतंय? वळू हा एक असा प्राणी आहे जो पूर्णपणे स्वतंत्र आहे. कसलेही नियम आणि बंधनं न मानणारा. इतर सर्व बैल बांधलेले आहेत. अशावेळी जे बांधलेले आहेत ते; मोकळं असणार्‍या प्रत्येकाला कायमचं बांधू पाहतात.

मीनाक्षी: विनोदी चित्रपट करणं अवघड आहे, त्यातून विनोदी चित्रपटामागे असा गंभीर विचार ..

उमेशः आम्हाला काही सांगायचं होतं पण आम्हाला हा विचार मांडायचाय आणि तशाच विचारातून तुम्ही चित्रपट पहा अशा ठाशीव, उपदेशपर पद्धतीने नव्हतं सांगायचं. तसंच हा चित्रपट विनोदी चित्रपट म्हणून करायचाय असं काही नव्हतं. सहज सोप्या पद्धतीने ते मांडायचं होतं. विनोद विरोधाभासातून, भाषेच्या लहेजातून, परीस्थितीतून आपोआप अवतरला.

गेल्या काही वर्षात जे विनोदी चित्रपट आले त्यात जे काही दाखवतात त्यावर आपल्याला हसूही येत नाही. त्यावर टीका करत राहण्यापेक्षा आपल्याला आवडणारा विनोद कसा असेल ते करून दाखवणं ही जास्त चांगली प्रतिक्रीया ठरेल असं वाटलं.

मीनाक्षी: तुझा हा चित्रपट गाजल्यावर, इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर कसं वाटतंय?

उमेशः खरं म्हणजे वैयक्तिक असा काही वेळच राहिला नाहीये. फोन तर सतत वाजत असतो. मोबाइल अगदी नकोसा वाटायला लागतो.

मीनाक्षी: वळू गाजल्यावर अनेक प्रतिक्रिया तुला मिळाल्या असणार.... त्यापैकी तुला आवडलेल्या काही प्रतिक्रिया सांगू शकशील का?

उमेशः मी लहान मुलांना भेटलो तेव्हा त्यांनी 'मला पण डुरक्या व्हायचंय, किंवा पुढच्या वेळी मी डुरक्याचं काम करीन' अशा प्रतिक्रिया दिल्या. डुरक्या हा नुसता एक प्राणी म्हणून न राहता तो एक व्यक्तीरेखा म्हणून पोचल्याचा, तो इतका जवळचा वाटल्याचा आनंद यातून मिळाला. आम्ही ज्या पद्धतीने डुरक्या हा एक प्राणी म्हणून न पाहता एक वृत्ती म्हणून पाहिला ते पोचल्याचा आनंद वाटला. तसंच परदेशातील मराठी प्रेक्षकांकडून एक प्रतिक्रिया आली की 'हा चित्रपट गोड गोड नसूनही त्यात एक गोडवा आहे' किंवा 'इतकं साधं, सोपं, सहज असं काही गेल्या अनेक वर्षात पहायला मिळालं नव्हतं'

अजून एक गोष्ट म्हणजे गाव सोडून जे शहरात नोकरी धंद्याच्या निमित्ताने आलेत त्यांना हा सिनेमा पाहून खूप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं म्हणजे इतकं की अगदी तातडीने गावाकडे परत जावसं वाटलं.

मीनाक्षी: तुझ्या क्षेत्रातल्या काही प्रतिक्रिया...?

उमेशः हो म्हणजे विक्रम गोखलेंचा मेसेज आला की, गेल्या दहा वर्षात त्यांनी असा सिनेमा पाहिला नाही. नसिरुद्दीन शहा जे चित्रपटसृष्टीतल्या उत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहेत त्यांचाही फोन आला. चंद्रकांत गोखले म्हणाले 'या सिनेमात कुठेही नाव ठेवायला छोटी सुद्धा जागा नाही'. शोभा डेंनी 'ऑस्करला पाठवावा' असं म्हणलं. मला आवडणार्‍या खूप कलाकारांनी भरभरुन कौतुक केलं.

आणि 'वळू' प्रेक्षकांनी इतका उचलून धरला की त्यामुळेच तो २१ आठवडे झाले तरी अजून थिएटरला आहे.

मीनाक्षी: बाहेरच्या देशात तू फिल्म फेस्टिवलमधे हा सिनेमा नेलास.. त्यांना कळला का रे सिनेमा? म्हणजे यातले विनोद हे मराठी भाषेतले शब्दप्रयोग, बोलण्याची वेळ आणि बोलण्याची पद्धती यावर जास्त करुन अवलंबून आहेत, त्यामुळे हा प्रश्न मला पडला.

उमेशः काही काही गोष्टी परभाषकांना कळणं अवघडच होतं... जसं जीवन्या म्हणतो 'फारेश्ट, तुमी इथं गोट्या खेळत बसला व्हय?' याचं सबटायटल 'You are playing marbles here..?' असं आहे यात 'गोट्या खेळणे' हा शब्दप्रयोग आपण कशा अर्थी वापरतो हे माहीत नसल्याने त्यांना तो अर्थ पोहोचला नाही; पण त्यांना त्यातली गम्मत मात्र कळली.

मीनाक्षी: अशा प्रकारचा विनोदी चित्रपट हा साधारण पहिल्यांदा पाहताना मजा येते नंतर पाहताना कंटाळा येऊ शकतो. रिपीट ऑडियन्स नसेल असं वाटतं का?

उमेशः नाही खरं म्हणजे माझा अनुभव अगदी याच्याविरुद्ध आहे. दिलीप प्रभावळकर म्हणाले, मी पहील्यांदा पाहिला तेव्हा मला आवडला. दुसर्‍यांदा पाहताना अजून आवडला आणि तिसर्‍यांदा पाहताना अजूनच आवडला. प्रत्येक वेळी काहीतरी नवी मजा कळत गेली. तसंच माझ्या बहिणीने दिप्तीने अनेकवेळा पाहीला तिचीही प्रतिक्रिया अशीच होती की मी कितीही वेळा पाहू शकते. एकंदरीतच खूपवेळा 'वळू' पाहणारे खूपजण आहेत.

मीनाक्षी: दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी, निर्मीती सावंत, भारती आचरेकर, चंद्रकांत गोखले.. हे आणि अनेक इतर खूप सिनिअर अभिनेत्यांनी यात भूमिका केली आहे जसे मोहन आगाशे आहेत. त्यांनी तुझ्या दिग्दर्शनाच्या कामात ढवळाढवळ केली, असं कधी झालं का?

उमेशः नाही. आपले सगळेच मराठी कलाकार हे नाट्य रंगभूमीच्या माध्यमातून आलेले आहेत त्यामुळे सगळेच जमिनीवर असतात. तसं या चित्रपटात तू पाहिलंस तर भूमिका खूप छोट्या छोट्या आहेत तरीही हा चित्रपट या लोकांनी स्वीकारला याचं कारणच मुळी काही तरी चांगलं होणार आहे, हा विश्वास हे होतं. सर्वांनीच माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला.

त्यातून चित्रपट चित्रित होत असताना इतक्या छोट्या छोट्या तुकड्यात चित्रित होत असतो, की कलाकाराला हा तुकडा पूर्ण चित्रात नक्की कुठे येणार आहे? हे माहीतही नसतं. त्यामुळे तसं होण्याची शक्यता, दिग्दर्शकावर विश्वास असेल तर खूप कमी असते.

मीनाक्षी: वळूच्या चित्रिकरणादरम्यान झालेल्या गमतीजमती सांग ना..

उमेश: शूटिंगची साईट म्हणजे एक प्रचंड गोंधळाची जागा असते. सतत काही ना काही चालू असतं; गडबड गोंधळ. डुरक्याला शूटिंगच्या साईटवर आणला आणि दाव्याला बांधुन ठेवला. गाय दिसल्यावर तो दावं तोडून पळाला. आम्हाला म्हणजे गावातल्या सगळ्या गाई कुठे लपवायच्या; असं झालं होतं. अमृता सुभाषला म्हशीवर बसुन जायचं होतं एका शॉटमधे.. ती बसली आणि म्हैस उधळली तिच्या पायाला चांगलीच इजा झाली होती. आता शूटींग होणार की नाही असंच वाटत होतं. पण ती लगेच पुन्हा तयार झाली आणि ते शूटिंग पार पडलं.

मीनाक्षी: तू स्वतःला दिग्दर्शक म्हणून कसं रेट करतोस? कुठे नक्की?

उमेशः कुठेच नाही. प्रत्येक चित्रपट केल्यावर असं वाटतं की आता पुन्हा मला सगळं पहिल्यापासून समजून घ्यायला हवं.

मीनाक्षी: चित्रपटाव्यतिरीक्तचे तुझे छंद काय?

उमेश: माणसांना भेटणे, गप्पा मारणे, मित्रांबरोबर रात्री पत्ते कुटणे, चांगलं गाणं ऐकणे, निरुद्देश भटकणे.

सध्या मात्र चित्रपटाच्या कामातच इतका व्यस्त असतो की आता बाकी काहीच छंद जोपासता येत नाहीत. तरीपण चित्रिकरणासाठी जागा शोधताना खूप फिरता येतं. त्यानिमित्तानं भटकणं होतं

मीनाक्षी: तुझे आवडते दिग्दर्शक आणि चित्रपट कोणते?

उमेश: आवडते चित्रपट म्हणले तर - Happy together, In the mood for love, Lives of others, Talk to her, संत तुकाराम, पथेर पांचाली, वास्तुपुरुष, सुवर्णरेखा, ध्यासपर्व, उसकी रोटी.

FELLINI , TARKOVSKI, ABBAS KIAROSTAMI, सत्यजित रे, Wong Kar Wai, ऋत्विक घटक, मणी कौल हे माझे आवडते दिग्दर्शक आहेत.

मीनाक्षी: तुझे आवडते लेखक आणि पुस्तकं पण सांग ना मायबोलीच्या वाचकांना वाचायला नक्की आवडतील.

उमेश: जी. ए. कुलकर्णी, दि. बा. मोकाशी, दुर्गा भागवत, विनोदकुमार शुक्ल हे माझे आवडते लेखक आहेत. माणसे, आरभाट आणि चिल्लर, आनंद ओवरी, ढग, आता आमोद सुनासि आले ही माझी काही आवडती पुस्तकं आहेत.

मीनाक्षी: आता पुढे काय करायचा विचार आहे?

उमेशः सुभाष घईंच्या मुक्ता आर्टसने दोन हिंदी चित्रपट करायचा प्रस्ताव दिलाय तो मी स्वीकारला आहे. कथा वगैरे अजून ठरली नाहीये. त्याआधी एक मराठी चित्रपट करणार आहे. तो मात्र गंभीर विषयावर आहे.

उमेशबरोबरच्या गप्पा इथे संपल्यात, पण उमेशचा या क्षेत्रातला प्रवास मात्र आत्ताच कुठे सुरु होतोय. अजून खूप चांगले मराठी आणि हिंदी चित्रपट त्याने बनवावेत; ही माझी आणि सार्‍याच मराठी मनांची अपेक्षा तो नक्कीच पूर्ण करेल. त्याच्या पुढच्या वाटचालीला मन:पूर्वक शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आटोपशिर आनि छान मुलाखत.त्यान्चे आवडते लेखक आनि पुस्तक जरा हट्के वाटलि. छान

मीनु छान घेतलीय मुलाखत एकदम आटोपशीर. Happy
वळू हा चित्रपट खुप खुप आवडला. मी ३-४ वेळा पाहीला. माझ्या मुलांनी तर किती वेळा पाहीला असेल त्याची गणतीच नाही, कारन त्यांचा पुर्ण चित्रपट पाठ झालाय. अगदि साभिनय करुन दाखवत्तात दोघेजण.
त्यातले नावाजलेले २-४ पात्र वगळले तर बाकिचे सगळे, कुसवड्याचेच अस्सावेत अस मला वाटायच. Lol
उदा. तान्ही, संगी, जिवन्या, आबा हे मला मुळचे त्या गावातलेच अस्तिल अस वाटायच, इअतके हुबेहुब वठवले आहेत सर्वांनी.

Pages