उधारीचे जीणे

Submitted by harish_dangat on 13 March, 2011 - 19:36

उधारीचे जीणे

(ही कविता ज्या लोकांना असाध्य रोग आहे, त्यांना समोर ठेउन लिहीली आहे)

उधारीचे जीणे जगताना
हिशेब क्षणाक्षणाचा होतो
जगण्याचा भार सोसताना
हिशेब कणाकणाचा होतो

गेलेला क्षण होतो मोठा
आलेला क्षण होतो छोटा
कितीही हिशेब मांडला
खाली उरतो फक्त तोटा

फाटल्या आभाळात
अंधार खोल आहे
क्षण अखेरचे सांगती
जगणे अमोल आहे

आत दोन मने आहेत
हे त्यावेळीच कळते
एक हळू फुंकर घालते
दुसरे जोमाने जळते

रोज उठताना सकाळी
कोवळी पालवी फुटते
झोपताना रात्री मात्र
खोडास वाळवी लुटते

रोजच प्राण गलीतगात्र
रोजच ही अखेरचीच रात्र
दिवस मात्र रोज उजाडे
हाती जगण्याचे भिक्षापात्र

-हरीश दांगट

गुलमोहर: