गारुड ...

Submitted by vaiddya on 10 March, 2011 - 12:48

एक मस्त हवेशीर संध्याकाळ .. मार्च महिना असूनही उन्हाळ्याची चाहूलही नसलेली ही संध्याकाळ .. कारण आम्ही आहोत दिल्ली मधे. आमची गाडी मस्त मोठ्या मोठ्या रस्त्यांवरून कधी वळणं आणि कधी वेग घेत मानसिंग रोड्वरच्या ताज मधे येते .. आज इथे आहे महिंद्र एक्सलन्स इन थियटर अवॉर्डस् चा अंतिम सोहळा .. आम्ही त्यात नामांकनं मिळवलेले काही जण या गाडीतून इथे आलो आहोत. ताज मधे पूल साइड लॉन्स वरती हा सोहळा रंगणार आहे. निळ्या प्रकाशात न्हायलेलं स्टेज एका बाजूला आणि दुसरीकडे खान“पान” व्यवस्था .. सोहळ्याच्या अर्धा तास आधी कॉकटेल्स सुरू झाली आहेत .. उंची मद्यं ओतली आणि रिचवली जात आहेत .. दिल्लीमधले प्रतिष्ठित आणि नाट्यक्षेत्रातले अनेक दिग्गज आणि आमच्यासारखे धडपडे वेडे काही अशी आगळीच मैफिल जमली आहे. आता आणखीच वाढलेल्या थंड हवेने मद्याची झिंग वाढवत नेली असतानाच अचानक कुठूनतरी बॅगपाइप चे स्वर कानावर येऊ लागतात .. आम्ही सगळे पाहातो तर त्या भागाच्या पार मागून काही झुडुपांआडून येऊन, आम्हाला ओलांडून स्टेजच्या दिशेने निघालेला एक राजस्तानी बॅगपाइपर त्याच्या पारंपरिक वेषात आणि पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बॅगपाइपसह मस्त वाजवण्याच्या नशेत चाललाय .. आणि तेव्हाच कार्यक्रम सुरू होत आहे या बद्दल घोषणा .. त्यामुळे आता आम्ही सगळे त्या बॅगपाइपर वाल्याच्या मागे .. कार्यक्रम सुरू होतो .. बक्षिसं दिली जाताहेत आणि मधेमधे काही मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर होत आहेत असा सगळा माहौल .. आणि त्यातच एका क्षणी प्रेक्षकांच्या मागच्या बाजूने अचानक मंत्रमुग्ध करणारे असे बीन (पुंगी)चे सूर येऊ लागतात .. एक नव्हे बर्‍याच .. एकत्र .. ह्ळू हळू आमच्या जवळ जवळ येत चाललेला तो आवाज .. त्या सोबत काही खंजिरी, चिमटे आणि मोरशिंगं (तोंडात धरून वाजवायचं एक तंतू-पटल असं मिश्र ताल वाद्य) वाजताहेत .. पाहाता पाहाता भगव्या कफन्या घातलेले, आणि फेटे ल्यायलेले वीस जण आपल्या वाद्यांसह प्रेक्षकांच्या मधोमध प्रकट झाल्याचं आणि मधल्या मार्गिकेतून पुढे म्हणजे स्टेजच्या दिशेने सरकत असल्याचं आम्ही पाहात बसलोय .. आम्ही अवाक् आहोत .. आता ते सगळे स्टेजवर पोहोचले आहेत आणि त्यांचा कार्यक्रम तब्बल दहा मिनिटं ते सादर करत आहेत .. मला बक्षिसांसदर्भात अनेक फोन, मेसेजिस येत आहेत .. पण माझं आता त्यांच्याकडे लक्ष नाही .. माझं लक्ष या बीन वादकांकडेच ! झकास कार्यक्रम. झणझणीत, खुसखुशीत आणि फक्कड चवीचा !

कार्यक्रम पुढे पुढे सरकत थांबतो आणि आम्ही जेवायला जमा होतो. तिथे पुन्हा त्यातल्या एका सपेर्‍याशी माझी गाठभेट होते. खूप गप्पा होतात आणि मगाशीच, बीनच्या कार्यक्रमाच्या वेळी आणि त्यामुळे जागृत झालेलं कुतुहल शमतं. आणि उभे राहिलेले प्रश्नही मिटतात. कोणीतरी काहीतरी कुठेतरी चांगलं करत असतं आणि त्याबद्दल आपल्याला (कदाचित उगाचच .. ) असं मस्त वाटत राहातं तसं काही मनात घेऊन त्या पार्टीतून मी बाहेर पडतो आणि हॉटेलच्या रूमवर येऊन झोपी जातो अशी एकंदर ती संध्याकाळ.. ती रात्र .. मेटा मधे मिळालेल्या माझ्या दुसर्‍या अवॉर्डमुळे लक्षात राहिलच पण त्याचबरोबर त्या बीनवादक सपेर्‍याशी (गारुडी) झालेल्या माझ्या गप्पा आणि त्यात मिळालेल्या माहितीमुळेही लक्षात राहिल अशी.

सपेरा अश्यासाठी म्हणायचं की भारतात साप पकडून त्याच्याशी निगडित व्यवसाय पारंपरिक पद्धतीने करणार्‍या अनेक जाती-जमाती आहेत. आपण इकडे त्यांना सरसकट गारुडी म्हणतो पण उत्तर हिंदुस्थानात दिल्ली-पंजाबकडे कफनी, फेटा अश्या (चित्रपटांमधे आपण पाहिल्याप्रमाणे) पेहेरावातल्या आणि राजस्थानकडच्या तारामती बारादरी सारख्या काही जमाती या सपेरा म्हणून काम करत. या सपेर्‍याकडे बर्‍याच जादुई शक्ती असतात असा एक समज आणि तश्या अनेक कथाही उत्तर हिंदुस्तानात (आणि चित्रपटांमुळे सर्वत्र) प्रसिद्धच नाही तर लोकमान्यता पावलेल्या होत्या. अलिकडे असं लक्षात येऊ लागलं की नाग ही प्रजातीच नष्ट व्हायच्या मार्गावर आहे आणि ह्या साप-नाग पकडून त्याच्यांवर गुजराण करणार्‍या लोकांमुळेच त्यांच्या जीविताला जास्त धोका पोहोचतो आहे. ऐशी टक्के नाग हे गारुडी अथवा सपेर्‍यांमुळेच मृत्युमुखी पडतात असं निदर्शनास येऊ लागलं .. मग सर्पमित्र संघटना आणि त्यांच्या लढ्यांमुळे नाग पकडणे, पाळणे, त्यांना व्यवसायाकरता वापरणे, त्यांचे खेळ करणे, त्यांचे विष काढून घेणे, त्यांना बाळगणे अश्या कश्यावरही कायद्याने बंदी आली. सर्पमित्र आनंदी झाले आणि मग अजून एक प्रजाती नष्ट व्हायच्या मार्गावर आल्याचं लोकांच्या थोडं उशिराच लक्षात आलं. ती म्हणजे गारुडी किंवा सपेर्‍यांची अख्खीच्या अख्खी “प्रजाती”. भारतात साधारण तीन लाख गारुडी असतील. हे सगळे फक्त हेच काम करत होते. इतर काहीही त्यांना येत नव्हतं. शिक्षण नाही, दुसरं काही उत्पन्नाचं साधन नाही अश्या दुरवस्थेत सगळेच या नियमामुळे लोटले गेले. काहींची विपन्नावस्था मग काही लोकांच्या लक्षात आली आणि ते यावर विचार करू लागले. मी मेटाच्या त्या पार्टीत ज्याच्याशी बोललो, त्या सपेर्‍याची दोन्हीही मुलं शाळेतून काढली गेली, भीक मागू लागली.

आपल्याला बरखा दत्त माहिती आहे, पण ती जिची बहीण आहे ती बहार दत्त आपल्यापैकी फार लोकांना माहित नाही. बहार दत्त चा याबाबतीत विचार असा होऊ लागला, की इतर सामाजिक संस्था (ज्या या प्रश्नावर काम करू लागल्या होत्या त्यांच्याप्रमाणे) या सपेर्‍यांना ड्रायव्हिंग सारखी कामं शिकवून पोटापाण्याला लावत आहेत त्यापेक्षा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्षमतेतूनच काय करता येईल .. आणि त्यातूनच बहार दत्त च्या सर्परक्षक या संस्थेच्या स्थापनेतून आणि जीविका ट्र्स्ट च्या माध्यमातून एक योजना आकाराला आली. वीस सपेर्‍यांना हाताशी घेऊन त्यांच्या पुनर्वसनाची एक प्रायोगिक योजना सुरू झाली. या योजनेखाली हे बीन वादक, खंजिरी, चिमटे आणि मोरशिंग वापरून एक वाद्यवृंद स्थापन करायच्या कामाला लागले आणि तो तयार झालाही. या योजनेखाली आजवर तब्बल शंभर सपेर्‍यांना जीविका लाभली आहे. यांचे असे कार्यक्रम देश-विदेशात सादर झाले आहेत. मध्यंतरी स्कॉटलंडला ह्यांचा दौरा झाला तर हे सगळे तिथून स्कॉटिश ट्यून्स आणि सिंफनीज् शिकून आले. त्यांची तालिम करून आता त्याही आपल्या कार्यक्रमात वाजवू लागले. लोक गीतं, चित्रपटातली प्रसिद्ध गाणी आणि वेस्टर्न सिंफनीज असा पाहिजे तितक्या वेळाचा कार्यक्रम हे लोक करू लागले आणि स्वतःच्या पूर्वीच्या व्यवसायातला एक कलात्मक भाग वापरत आपलं गारुड आता रसिकांच्या मनावर घालू लागले. माझ्याशी बोलणार्‍या गारुड्याला या योजनेबद्दल खूप अभिमान आणि कृतज्ञता वाटत होती .. “आम्ही करत होतो ते चूक होतं हेच आधी आम्हाला पटत नव्हतं .. पण त्यामागच्या शास्त्रीय मीमांसेपासून सगळं आम्हाला त्यांनी समजावलं आणि सर्पमित्र हे आमचे दुष्मन आणि आम्ही त्यांचे नि सापांचे दुष्मन न राहाता आमचं मनोमीलन झालं‘” अश्या आशयाचं “नाग-सपेरा” अश्याच फिल्मी मॉडेलचं काही तो माझ्याशी बोलला.

या वर्षीच्या मेटा मधून माझ्या मनात सतत गुंजत राहील तो हा भाग. मग घरी आल्यावर या प्रोजेक्ट बद्दल नेटवर वाचलं ते ही इथे देतो आहेच.

मेटा च्या त्या पार्टीमधे कार्यक्रमापूर्वीच पेयांचा आस्वाद ज्यांनी घेतला होता, त्यापैकी काहींचा या बीन वादनाच्या कार्यक्रमासंदर्भातला चिटवळपणा चालू होता. या वर्षीच्या ज्युरींपैकी एकांचं आडनाव “नाग” होतं हे निमित्त साधून. सृजनशील मनाला अश्या कोट्या सारख्याच सुचत असल्या आणि त्या एखाद्या पेयाच्या गारुडाखाली आणखी जोरात बाहेर पडत असल्या तरीही या पुंगीच्या गारुडाविषयी सुचलेली “बहार”दार कल्पना नुसती सृजनात्मकच नाही तर “संजीवना”त्मकही नाही का ? या स्वरमयी योजनेचं गारुड अजूनही माझ्या मनातून उतरायला तयार नाही.

बहार दत्त च्या या प्रोजेक्ट विषयी वाचा :

http://www.hindustantimes.com/Snake-charmers-on-the-road-to-revival/Arti...

या प्रोजेक्टची भव्यता इथे जाणवेल :

http://www.primetimeprism.com/index.php?option=com_content&view=article&...

गुलमोहर: