इ.स. १०००० - भाग १

Submitted by बेफ़िकीर on 8 March, 2011 - 02:42

गोपचे डोळे उघडले.

काही विचित्र चीत्कार ऐकू आले त्याला! ज्या अर्थी ऐकू आले त्या अर्थी डोळे आणि कान ही इंद्रिये नक्कीच काम देत असावीत. हळूहळू धूसर दृष्य स्पष्ट होत गेले.

गोरीपान आणि एकदम धडधाकट सहा माणसे! त्यात दोन स्त्रिया! सगळेच्या सगळे एकजात देखणे! आणि त्याच्याकडे पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारलेले, स्तब्ध, पापण्या लवणे विसरलेल्या!

"आशा कुठंय???"

गोपला प्रश्न विचारता आला. तेव्हा त्याला आणखीनच आनंद झाला. आपण बोलूही शकतो आहोतच! काय झालंय कुणास ठाऊक नक्की! हे सगळे डॉक्टर्स बहुधा आपल्या शुद्धीत येण्याचीच वाट पाहात असावेत.

एका स्त्रीने एक हाताच्या पंजात मावेल असे काहीतरी मशीन गोपच्या तोंडासमोर गरागरा फिरवले आणि मग स्वतःजवळ घेऊन काही वेळ ती पाहात राहिली. अचानक ती स्त्री तेच स्वतः उद्गारली..

"आशा कुठंय"

पुन्हा सहा जणांमध्ये काही चीत्कार आणि संवाद घडले.

काही वेळ ती स्त्री तेच मशीन पाहात राहिली. पुन्हा अचानक उद्गारली.

"मराठी"

पुन्हा चीत्कार आणि संवाद! एक जण बाहेर धावला.

संवाद अगम्यच होते.

पुन्हा स्त्रीने ते मशीन पाहिले आणि खोलीत ते मशीन गरागरा फिरवत चालू लागली. पुन्हा पाहिले आणि नकारार्थी मान डोलावत सगळ्यांकडे पाहिले. आता सगळेच निराश मनाने गोपकडे पाहू लागले.

तोवर बाहेर गेलेल्याने सहा लहान उपकरणे आणलेली होती. ती प्रत्येकाने कानाला लावली आपापल्या!

गोपला काही समजेना! त्याने पुन्हा विचारले..

"आशा कुठे आहे सांगा ना?? "

सगळेच हासले. मग एक उपकरण एका ड्रॉवरमधून काढण्यात आले. ते गोपच्या कानावर बसवण्यात आले.

"कोण आशा??"

गोपला आनंद झाला. हा डॉक्टर मराठीच असावा! तेवढ्यात एक स्त्री उद्गारली.

"आशा म्हणजे मेल की फिमेल??"

गोप गोंधळला. या स्त्रीचा आवाज अगदी त्या आधीचा प्रश्न विचारणार्‍या डॉक्टरसारखाच होता.

"आशा, माझी बायको..."

"बायको म्हणजे काय??"

तिसर्‍या डॉक्टरचाही आवाज तसाच आल्यानंतर मात्र गोप भडकला. तिच्यायला काय लावलंय हे कानांना? या यंत्रामुळे सगळे आवाज सारखेच येतायत!

"तुम्ही कोण आहात?"

"कुणीच नाही... तू??"

"मी गोप.. "

"गोप?? "

सगळे हासले. गोप चिडला. हासतायत काय लेकाचे?

"आशा कुठंय??"

"असं काही नसतं ... आशा वगैरे..."

".....म्हणजे काय??"

"आशा, गोप असं काहीही नसतं.."

"आशा, गोप असं काही नसतं म्हणजे काय?? "

"सगळे जी ६४२ च आहेत... नंबर्स असतात..."

"जी ६४२ म्हणजे काय??"

"जी ६४२ म्हणजे काय म्हणजे काय??"

"तुम्ही कोण आहात??"

"मी जी ६४२ - ८१००००३१७४"

"हे वेड्याचं इस्पितळ आहे का?"

"तू काय बोलतोयस ते आम्हाला समजत नाही... तू तुझी माहिती सांग..."

"अरे हाड?? आधी तू कोणेस ते सांग.."

सगळे एकमेकांकडे पाहू लागले. गोंधळलेले होते सगळे!

पुन्हा गोपने विचारले..

"आशा कुठे आहे ते बर्‍या बोलाने सांगा नाहीतर चामडी लोळवीन एकेकाची..."

"चामडी लोळवीन म्हणजे??"

"म्हणजे हे तुझं कातडंय ना कातडं?? ते सोलून काढीन.."

"असं कसं करता येईल?? ... तू कोण आहेस ते सगळं सांग..."

"मला काय झालंय?? नक्की काय झालंय मला??"

गोपने हात आणि पाय हालवून पाहिले. एकदम व्यवस्थित हालवता येत होते. आपल्याला झालंय काय तेच त्याला समजत नव्हतं!

"तुला काय झालंय म्हणजे?? "

"म्हणजे अ‍ॅक्सीडॅन्ट झालाय का??"

"आम्हाला काय माहीत??"

"मग इथे कशाला ठेवलंय मला??"

"स्टडी चाललाय..."

तेवढ्यात धाडकन एका भिंतीतून आवाज आला. भुतासारखा अचानक एक देखणा तरुण भिंतीतून आत आला होता. तो अत्यंत घाईघाईत धावत आलेला होता. तो आला तसे सगळे आदराने बाजूला झाले. तो तरुण अवाक होऊन गोपकडे बघत होता. गोपच्या कानाला लावलेल्या यंत्रामुळे गोपला सगळ्यांचेच बोलणे समजत होते.

त्या तरुणाला पाहून गोप दचकून म्हणाला..

"ए.. धावतो काय?? काय बघतो?? आ?? हा कोण आहे हो??? कुठनं आला कुठनं हा??"

तो तरुण हात तोंडावर दाबून धरत आश्चर्याने थक्क होऊन म्हणाला..

"हा बोलला.. "

"बोलला म्हणजे काय?.. ए अरे उठवा मला.. आशा कुठे आहे??"

"आशा मेली असणार..."

गोपला प्रचंड धक्का बसला त्या तरुणाचे ते विधान ऐकून! त्या धक्यातून सावरण्याआधीच गोप भीषण सुरांमध्ये रडू लागला. दोन्ही हात चेहर्‍यावर धरून गोप हमसाहमशी रडू लागला. मधेच त्या तरुणाला म्हणत होता.

"तुम्हीच मारलं असणार तिला.. नालायक.. अरे कुठे आहे रे ती... आशा... आशा अगं असं काय झालं गं??"

"सर.. हा काय करतोय???"

"तो रडतोय.. "

"म्हणजे काय??"

"दु:ख व्यक्त करण्याची पद्धत आहे ती त्याची..."

सगळे नीट निरखून गोपकडे पाहू लागले.

गोप खूप रडत होता. त्याला एकाच वेळेस पराकोटीचे दु:ख व संताप आलेला होता. आशा मेली असू शकेल असे त्यालाही मनापासून वाटत होते. कारण तो भुकंपच तसा होता. त्याने त्याच्या डोळ्यांनी आशाच्या अंगावर छप्पराचा खूप मोठा भाग कोसळताना पाहिलेला होता. मात्र नंतरचे त्याला काहीही आठवत नव्हते. नक्कीच आशाला खूप मोठी दुखापत झालेली असणार हे गोपला समजू शकत होते. पण हे लोक तिच्याबाबत काहीही बोलतही नव्हते आणि तिला भेटूही देत नव्हते. त्यामुळे तो संतापलेला होता. त्यातच या नव्या तरुणाने अंदाज व्यक्त केला होता की ती 'मेलेली असणार'! म्हणजे 'नक्की मेलीच' असे नाहीच, नुसतीच 'मेलेली असणार' ही शक्यता!

गोपने पुन्हा होप्स ठेवून विचारले..

"ओ अहो खरं सांगा ना... आशा कुठे आहे?? ... का छळताय??? एकदा या डोळ्यांनी पाहू देत मला तिला.. "

" १६२०... याचा पट्टा सोड... "

नवीन तरुणाने कुणाला तरी त्याच्या नंबरने हाक मारून आज्ञा दिली होती. १६२० ताबडतोब गोपच्या पोटावरचा पट्टा सोडू लागला. तशी गोपला जाणीव झाली की आपल्याला बांधलेले होते. आता त्याला जरा बरे वाटू लागले. गोप सरळ उठून बसला.

सर्वत्र स्टीलच्या भिंती होत्या. अनेक उपकरणे होती. मात्र रासायनिक प्रयोगशाळा किंवा हॉस्पीटल नव्हते वाटत ते!

"हे काय आहे?? कुठे आणलंय मला???"

"तू जिथे होतास तिथेच आहेस... इथेच होतास तू... तुला पाहून आम्ही बाजूने ही खोली बांधली..."

"बिनडोक वाटलो का मी?? काहीच्या काही फेकतो काय?? आ??? हे काय आहे हे? प्रयोगशाळा??"

"प्रयोगशाळा म्हणजे काय असते???"

"तुझ्यायला तुझ्या... हे काय असते अन ते काय असते... सरक.. मला उतरूदेत..."

गोप सरळ खाली उतरला बेडवरून! अनेक उपकरणे व वायरी यांनी ती खोली भरलेली होती. अनेक उपकरणांचे चित्रविचित्र आवाज येत होते.

"दार कुठे आहे??"

"सर.. हा काय बोलतो समजत नाही..."

"आय थिंक ही इज आस्किंग हाऊ टू गो आऊट फ्रॉम हिअर..."

"हा हा तेच... हाऊ टू गो आऊट??"

"असं आत, बाहेर असं काही नसतं आता..."

"आत बाहेर काही नसतं आता??? .. ए.. माझा सेलफोन कुठे आहे???"

"सेलफोन?? म्हणजे??"

"मोबाईल मोबाईल..."

गोपने कानावर हात धरून खुण केली. तसा एक जण म्हणाला..

"तू फोनबाबत बोलतोयस का??"

"मग तुला काय वाटले??"

"फोन बिन नसतात आता..."

"तुम्हाला एकेकाला ना..आईशप्पथ मी तंगड्या मोडेस्तोवर मारणारे... "

आता तो प्रमुख तरुण शांतपणे पुढे झाला आणि म्हणाला...

"तुला कल्पना नाही आहे.. तू खूप जुना आहेस..."

"जुना आहे म्हणजे???"

"तुला तारीख आठवते का एखादी???"

"का??"

"सांग ना??"

"न आठवायला काय झालं??? माझं अन आशाचं लग्न ११ फेब्रुवारीला झालं.. "

"लग्न म्हणजे काय??"

"लग्न ही 'केलेली नसताना' करावीशी वाटणारी व केल्यावर 'करायला नको होती' असे वाटणारी गोष्ट आहे."

"तुझा जन्म कधी झाला???"

"२२ मार्च.."

"म्हणजे लग्नानंतरच्या महिन्यात??"

"गाढवा... जन्मतारीख बावीस मार्च १९७०... लग्न ११ फेब्रुवारी १९९३..."

"हां.. मला तेच विचारायचं होत... इयर किती?? १९७०???"

"हो... का??"

"आम्ही सगळे तेच तुला सांगायचा प्रयत्न करतोय.. तू अनेक वर्षे बेशुद्ध होतास... इथेच ..."

"अच्छा अच्छा... म्हणजे हे ठाण्याचं वेड्यांचं इस्पितळ असून मी इथे अ‍ॅडमिट झालोय तर..."

"म्हणजे काय??"

"आज तारीख कितीय???"

"१६ ऑक्टोबर..."

"म्हणजे तीनच दिवसांपुर्वी झाला भूकंप..."

त्या तरुणाने इतर तरुणांकडे हासत हासत पाहिले.

"हासतो काय बे??"

"भूकंप सारखेच होतात... आजही सकाळी झाला...."

"आणि लगेच ही खोलीही बांधलीत काय तुम्ही???"

"तू जो म्हणतोस तो भूकंप तीन दिवसांपुर्वी नाही झाला..."

'मग??"

"तो किती साली झाला होता??"

"याड बिड लागलं का काय?? आत्ता परवा झाला तो..."

"अंहं.. साल... साल सांग..."

"अर्थातच... दोन हजार..."

त्या तरुणाने गोपच्या पाठीवर हासत हासत थाप मारली अन म्हणाला..

"तेच.. तेच तर सांगतोय तुला... हे इसवीसन दहा हजार आहे..."

क्षणभर गोप त्या तरुणाकडे बघतच बसला.. आणि दुसर्‍याच क्षणी...

जमीनीवर मांडी घालून बसला आणि कपाळाल दोन्ही हात लावून गडगडाटी हसू लागला..

"सर... तो काय करतोय???"

"नक्की कल्पना नाही.. कारण अशी अ‍ॅक्शन ते आनंद झाल्यावर करायचे.. ह्याला तर दु:ख व्हायला पाहिजे.."

"अरे नरसाळ्या मला हसू येतंय हसू..." गोप खदाखदा हासत मधेच म्हणाला..

"हो ना... पण हसू आनंद झाल्यावर येतं ना??"

"आनंदच झालाय मला.. सात जालीम यडे भेटल्यामुळे.. जा तू जा.. अजून हसवू नकोस.."

"तुला आनंद झालाय?? आठ हजार वर्षे तू बेशुद्ध होतास याचा आनंद?? असा कसा आनंद झाला??"

गोप स्वतःचीच उजव्या हाताची मूठ डाव्यापंजावर आपटून जोरजोरात हासत होता... हासता हासताच म्हणाला..

"कोण आहे?? कोण आहे??? .. डॉक्टर कोण आहे इथे???"

"सगळेच डॉक्टर असतात..."

आता मात्र गोप लोळला जमीनीवर! लोळत लोळतच म्हणाला...

"आशा मेली असली तर सुटली म्हणायचं... काय पब्लिक आहे राव... ए.. सरका तिकडे.. दार कुठे आहे??? आ??"

गोप प्रत्येक भिंतीपाशी धावला. कुठेही दार नव्हते. त्याने हाताने चाचपून पाहिले. अभेद्य भिंत होती ती! मगाचचा तो सगळ्यांचा प्रमुख असलेला तरुण आत आलाच कसा हे गोपला समजेना! आता मात्र त्याला भीती वाटू लागली. ही भुताटकी असावी हे त्याचे ठाम मत झाले आता!

"राम, राम, राम, राम, राम, राम, राम, राम"

"ही इज चॅन्टिन्ग...."

"राम, राम, राम, राम, ......"

"ही इज चॅन्टिन्ग राम, राम, राम, राम..."

भूते स्वतःहून रामाचे नांव घेतील ही शक्यता काही वाटत नव्हती गोपला! त्याने दचकून सगळ्यांकडे पाहिले.

"ए.. अरे तुम्हीच काय राम राम म्हणताय??? भुताटकीय का काय आहे काय हे???"

"तू खूप जुना आहेस... तुला जपायला हवा..."

"जपायला हवा म्हणजे?? मारणार बिरणार होतात की काय मला???"

"तुला लक्षात कसं येत नाही?? आठ हजार वर्षांनी शुद्धीवर आलायस तू..."

".......??????"

"आठ हजार वर्षे... "

"आठ हजार वर्षे??? असं कसं होईल?? कशावरून म्हणता तुम्ही हे??"

"कशावरून म्हणजे काय?? ... "

"कालनिर्णय वगैरे आहे का??"

"कालनिर्णय?? म्हणजे काय??"

"भिंतीवरी कालनिर्णय असावे... "

"हा काय म्हणतोय रे??"

"अरे कॅलेन्डर आहे का कॅलेन्डर???"

"ओह... हे बघ... "

अचानक त्या प्रमुखाने स्वतःचे मनगट दाखवले.. त्यावर घड्याळ वगैरे नव्हते.. मनगटातच एक स्क्रीन इन्स्टॉल झालेली होती डिजिटल... त्यावर वेळ होती..

'डार्क तीन पस्तीस... १६.१०.१००००'

गोप हादरला आणि पुन्हा हसू लागला..

"च्यायला.. कसली घड्याळं रे ही तुमची?? कुठे मिळतं असलं घड्याळ?? म्हणजे हातातच घड्याळ बसवून घ्यायचं का पर्मनंट??"

"म्हणजे काय?? "

"हे हे.. हे घड्याळ.. हे हातातच आहे..."

"मग कुठे असायला पाहिजे???"

"अरे म्हणजे याला पट्टा बिट्टा काही नाहीच.. आतमध्येच घड्याळ..."

"म्हणजे काय?? असेच जन्माला येतात सगळे...."

आता मात्र गोप खाली बसून पुन्हा हसू लागला. हासता हासताच अचानक रडू लागला.

"तुला आनंद झालाय की दु:ख??"

"अरे घंट्याचा आनंद... अरे मला सोडवा रे.. सोडवा इथनं... आशा कुठे आहे आशा??"

त्या प्रमुखाने एकाला विचारले..

"२२७३... येथे निधन पावलेल्यांचा डेटा आणता येईल का लगेच?? याला दाखवू...."

"छे छे... तीन तास लागतील... इथे नाहीये तो..."

"मग??"

"मंगळावर ट्रान्स्फर केल्यात हार्ड कॉपीज.. स्क्रीनवर दाखवता येईल इथे पाहिजे तर..."

मंगळ हा शब्द ऐकून गोप जिवंत भुते पाहावीत तसा बघत बसला.

"सॉफ्ट कॉपीजवर तो विश्वास ठेवणार नाही... एक काम कर.. यालाच घेऊन जा सरळ मंगळावर..."

आता गोप पुन्हा हसू लागला.

"सर.. त्याला प्रवास करता येणार याचा आनंद झालाय का हो???"

"शक्यता आहे... "

"पण याचा नंबर काय??"

"नंबर दहा सेकंदात मिळेल.. अ‍ॅप्लाय कर ऑनलाईन..."

खरच नंबर आला. ८१०००४६३४४!

"ए.. हा तुझा नंबर... ही तुझी आयडेन्टिटी आहे...जा याच्याबरोबर..."

तेवढ्यात ज्याच्याबरोबर जायचे होते तो तरुण प्रमुखाला म्हणाला...

"सर.. मला आज स्मॉल ब्रेन रिप्लेस करायचाय.. "

"ओह... मग १६९९... तू जा घेऊन याला..."

१६९९ ही एक स्त्री होती! ती उत्सुकतेने पुढे आली आणि तिने गोपला सरळ धरून उठवले. हबकलेला गोप सगळ्यांकडे बघत असतानाच अचानक भिंत सरकली आणि त्यातून ती स्त्री त्याला बाहेर घेऊन गेली.

बापरे! बाहेरचे जग अविश्वसनीय होते. गोप चरकलेला होता.

अनेक माणसे! अनेक म्हणजे शेकडो माणसे! पण एकही आवाज नाही. जे चालत होते ते पाय न उचलता चालत होते. त्यांनी रस्त्यावरील एक कमी रुंदीची पट्टी भाड्याने घेतलेली होती. ती पट्टीच सरकत होती. मात्र काही जणांनी पट्टी भाड्याने घेतलेली नव्हती. त्यांना बहुधा ते परवडत नसावे. ते मात्र पाय उचलत होते. काही दयाळु श्रीमंत, पाय उचलून चालणार्‍यांना आपल्या पट्टीवर घेत होते. प्रमुख रस्त्यावर अनेक स्वयंचलीत वाहने होती. पण एकाही वाहनाचा आवाज येत नव्हता. धूरही नव्हता. त्यावर बसलेली माणसे निवांत इकडे तिकडे बघत पुढे सरकत होती. हॉर्न नाहीत, प्रदुषण नाही, नियमभंग नाही! काहीही नाही!

फेरीवाले नव्हते.

एका बॉक्समध्ये १६९९ या स्त्रीने एक कार्ड स्वॅप केले. मग बॉक्समध्ये नंबर दिसला. पट्टी क्रमांक ६! मग एका पट्टीवर त्या स्त्रीने पाय टाकला व गोपला ओढून घेतले. काही क्षण गोपला तो प्रकार फारच रोमॅन्टिक वाटला. तिला चिकटून चालायचे. पण आशाची आठवण आली तसा बिचारा पुन्हा दु:खी झाला.

तेवढ्यात त्या स्त्रीच्या पोटापाशी असलेली एक चीप किणकिणली. तिने ती काढून पाहिली आणि गोपची आयडेन्टिटी हातात घेऊन त्यावर दाबली व पुन्हा पोटापाशी चिकटवून टाकली.

"हे काय???"

"तुझ्या मनात तीन सेकंद माझ्याबद्दल गैरविचार आले हे आता रेकॉर्ड झालेले आहे..."

"मग... आता काय करणार मला???"

"काही पायाभूत सुविधा मिळण्यावर त्याचा परिणाम होत राहतो... पण अनेक तास व्यभिचारी विचार मनात असल्याशिवाय गंभीर परिणाम होत नाहीत... तीन सेकंद म्हणजे काहीच नाही... "

"अहो... अहो पण... तुम्ही केलंत कशाला असं?? कशाला रेकॉर्ड केलंत ते???"

"म्हणजे काय?? नाही केलं तर मी व्यभिचार खपवून घेतला हे रेकॉर्ड झालं असतं..."

"अ‍ॅ?? पण ते कळणार कुणाला???"

"हे काय सगळीकडे कॅमेरे आणि रेकॉर्डर्स आहेत... "

हादरलेला गोप पुढे पुढे सरकू लागला. पुढे जायला श्रम काहीच पडत नव्हते.

"अहो... पण.. आपोआप असे विचार येतात ना?? .. अएस विचार करूनही ते रेकॉर्ड न होण्याचा काही उपाय आहे का??"

"मलाच विचारतोयस?? ... हे पण रेकॉर्ड झालं आता... हं... तुझ्या आयडीवरही नोंद झाली... "

"अहो नको हो... पण मला एक सांगा... हे खरच दहा हजार साल आहे का हो???"

"खोटं दहा हजार साल कुठे असतं???"

"नाही नाही.. पण म्हणजे ... मी राहिलो कसा???"

"काही गोष्टी कुणालाच समजत नाहीत...."

"आता... कुठे चाललोयत आपण??"

"मंगळ.."

"अहो हसवू नका न हो...."

"म्हणजे काय?? तू मगाशी करत होतास तसं का??"

"हसणं नाही माहीत हसणं?????"

"म्हणजे आनंद की दु:खं???"

"खरं सांगू.. मी आणि आशा आमच्या गरीबीमुळे खूप दु:खी असायचो... पण.. एकमेकांच्या प्रेमामुळे इतके हसायचो ना..."

"चल... बस आली.. "

खरच अचानक समोर एक बससारखे वाहन यून थांबले होते. ते अचानक कसे काय आले याचे आश्चर्यच गोपला व्यक्त करता आले नाही कारण १६९९ ने त्याला आत ओढलेही होते. तेवढ्यात बाहेर काही बायका व माणसे गर्दी करून उभी राहिली..

कंडक्टर ओरडला..

"मंगळ... मंगळ... फक्त मंगळ.. डायरेक्ट मंगळ... अधलेमधले चढू नका..."

बाहेरचा एक माणूस म्हणाला..

"साहेब दोन चंद्र घ्या की... "

"नाय.. बायपासने जाते ही गाडी.. चला.. चंद्र मागून येतीय... "

हादरलेला गोप ते संवाद ऐकत होता.

उभाच होता तो! १६९९ने त्याला एक जागा करून दिली. अनेक जण गोपकडे थक्क होऊन बघत होते. काहींना ते एक सोंग वाटत होते.

अर्धा तास झाला होता प्रवासाचा! बस चालली आहे असे जाणवतच नव्हते. धक्का नाही की आवाज नाही!

बर्‍याच वेळाने गोपने १६९९ ला विचारले..

"काय करायचंय मंगळावर जाऊन???"

"आशा म्हणजे काय??"

"माझी बायको..."

"बायको म्हणजे काय???"

"म्हणजे.. एक स्त्री आणि एक पुरुष एकत्र राहतात.. पुरुष नवरा... स्त्री बायको..."

"एकत्र?? एकत्र कशाला राहायचे?? "

" ते जाऊदेत... पण त्याचा मंगळाशी काय संबंधय???"

"तिथे डेटा आहे... पुरातन काळाचा... ती आशा कधी मेली ते समजेल... "

बसमधील एकाही सजीवाला 'माणसाच्या डोळ्यातून पाणी कसे काय येते' हे समजतच नव्हते.

गुलमोहर: 

मस्तच नवीन कादंबरी....एवढ्या लवकर धमकी खरी होईल अस वाटलं नव्हतं.
एकदम नवीन विषय,मला तरी खुप छान वाटला..मजा आली वाचायला,खुप छान सुरुवात आहे.... खुप खुप शुभेच्छा

जबरदस्त कल्पना आहे....चालेल येउद्या.

आम्ही बघु ईस १०००० आपल्या नजरेतुन भुषणराव
पुढ्च्या लेखनाला शुभेच्छा.

मस्त...

बेफिकीरजी अभिनंदन ! काय अफलतून विषय निवडलात. खूपच इंट्रेस्टीग अगदी १००००साली खरच अस काहिस अफलातूनच असेल असेच वाटते. येऊ द्या पुढचा भाग लवकर.
खूप खूप शुभेच्छा !

अरे व्वा.... हटके विषय !! वाचायला सुरुवात केलीये Happy पुढे काय काय अफलातून घडणारे याची उत्सुकता वाटतीये

ह्या अभिनव विषयावरची कादंबरी सुरु केल्याबद्दल धन्यवाद बेफिकीरजी. Happy
तुम्ही हा विषय जाहिर केल्यापासून कधी यावर लिहिताय असे झाले होते. अनपेक्षितपणे आज तो सुखद धक्का मिळाला!!!

खुप मजा आली वाचतांना. ही कादंबरी नक्की एकदम सुरस होणार याची खात्री वाटतेय... 'अवतार' हा इंग्रजी चित्रपट असाच नवीन विषयावर होता. तुम्ही नक्की पाहिला असणार... त्यात पॅन्डोरावरची जीवसृष्टी अनुभवणे ही एक अप्रतिम अनुभूती होती. मी एकाच दिवशी दोनदा हा सिनेमा पाहिला होता, तोही थिएटरमध्ये!!! लागोपाठ त्याचे दोन शोज पाहिले होते. इतका तो आवडला होता. तसंच काहीसं वाचायला मिळेल असा अंदाज आहे.

गोपच्या मनातले विचार रेकॉर्ड झाले, ते संवाद फार मजेशीर होते. तो मंगळावर चाललाय, हा विचारच एकदम सह्ह्ही आहे! पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट पहातेय...

<<<कंडक्टर ओरडला..

"मंगळ... मंगळ... फक्त मंगळ.. डायरेक्ट मंगळ... अधलेमधले चढू नका..."

बाहेरचा एक माणूस म्हणाला..

"साहेब दोन चंद्र घ्या की... "

"नाय.. बायपासने जाते ही गाडी.. चला.. चंद्र मागून येतीय... ">>>
फारच मजेशीर!!!!!
पोट धरुन हसलो.
१०००० सालातली PMT आठवली

बेफिकीरजी,
I was waiting for this story.
फार फार पुर्वी दुरदर्शन वर स्टार ट्रेक नावाची मालिका होती, त्यावर त्या यान वरचे लोकं एका ठिखाणाहुन दुसर्‍या ठिकाणी जाण्या करिता एका काचेच्या चेंबर मधे जात होते आणि त्यांचे कंट्रोल्स समोर एक माणसा कडे असत, जेव्हा ते चेंबर मधले सगळे तयार असत, तेव्हा ते कंट्रोल्स असलेल्या माणसाकडे खुणावत, तेव्ह तो माणुस काही बटन्स दाबताच, काचेच्या चेंबर मधले सर्व माणसं ईपसित स्थळी काही सेकंदा मधे पोहचत होते, त्याची आठवण झाली.

मस्त मस्त.. विषय एकदम 'हटके' निवडला आहेत आणि पहिल्या भागापसुनच उत्कंठा निर्माण झाली आहे.

पु.ले.शु.

लै भारी Happy

"मंगळ... मंगळ... फक्त मंगळ.. डायरेक्ट मंगळ... अधलेमधले चढू नका..."

बाहेरचा एक माणूस म्हणाला..

"साहेब दोन चंद्र घ्या की... "

"नाय.. बायपासने जाते ही गाडी.. चला.. चंद्र मागून येतीय... "

>> Lol १०,००० सालीपण असंच चालणार का? वडाप बंद केल्या का कॉर्पोरेशन ने

आणि हातात घड्याळ याय्च्या आधि मेंदुत सेल फोन नक्की येइल. विचार रेकॉर्ड करणारा कॅमेरा म्हणजे
भलतीच पंचायीत आहे, व्यक्तीस्वातंत्र्य नाही का?

फेरीवाले नव्हते>>>> म्हणजे चाट नाही? वडापाव तरी आहे का हो? नसेल तर आम्हा मुंबईवाल्यांना दु:ख होईल Proud
मस्त कल्पना पु. भा. वा. पा. ( पुढिल भागाची वाट पाहतेय.)

"मंगळ... मंगळ... फक्त मंगळ.. डायरेक्ट मंगळ... अधलेमधले चढू नका..."

बाहेरचा एक माणूस म्हणाला..

"साहेब दोन चंद्र घ्या की... "

"नाय.. बायपासने जाते ही गाडी.. चला.. चंद्र मागून येतीय.>>>>

तरिही कोणी चढले तर त्यांना उतरवणार कोठे? :-o

बेफिकिरजी,
खरतर धन्यवाद आतापर्यंतच्या सर्व लिखाणासाठी,

१. मला प्रतिसाद लिहायला पण खुप वेळ लागतो, पण तुम्ही इतक्या कमी वेळात नवीन नवीन भाग पोस्ट करता, एक कादंबरी संपते न संपते तोच नवीन कादंबरीचा विषय तयार असतो आणि तो ही एका कादंबरीचा ईफेक्ट संपायच्या आतच....

२. या तणावग्रस्त वातावरणात आपण आपलं घर, ऑफीस सर्व सांभाळून इतकं छान लिखाण करता त्यात समरस होता आणि आम्हालाही एकरुप व्हायला लावता आपल्या लेखनशैलीने.....

३. तुमच्या कादंबर्‍या खुप वास्तववादी होत्या, काही माहितच नव्हत बाहेरचं जग अस नाही पण तुमच्या लिखाणामुळे मात्र खुप काही शिकायला मिळालं विषेशतः 'एक बाप'

४. तुमच्या 'सोलापुर,डिस्को, ओल्ड मंक' आणि आताची कादंबरी 'वल्ड ऑफ डीफरन्स' यातुन विदारक सत्य मांडलय तुम्ही. वेश्या, गुन्हेगार यांच्या विषयाने सुद्धा नाक मुरड्णारे आम्ही त्यांची व्यथा, तडफड तुमच्या लिखाणातुन कळली आम्हाला...

५. 'घर', 'एक बाप' या भावनाप्रधान कादंबर्‍या वाचताना डोळ्यात पाणी आणलतं. एक बाप ईतका विचार करतो किंवा करत असेल हा विचारही मनात आला नव्हता कधी. मी बाबांची लाडकी त्यामुळे असेल कदाचित ही कांदबरी वाचल्यापासुन त्यांच्यातही 'पेंढारकर' बघते मी आणि त्यांच्याबद्दलचा आदर दुणावतो...

६. वाचन पहिल्यापासुन आवडत मला पण असं लिखाण नियमित वाचायला मिळणं ही पर्वणी, कारण ऑफिस, अभ्यास,प्रवास,तणाव, टेन्शन या सगळ्यातुन वेगळ व्हायला, फ्रेश व्हायला तुमच लिखाण कारणीभूत आहे....

७. सर्व नकारात्मक प्रतिसादांना बगल देऊन लिहित राहीलात त्याबद्दल आभार

या सगळ्याबद्दल मी खरच खुप आभारी आहे तुमची, हे सगळ आजच का? तर तुम्ही 'घर'च्या शेवट्च्या भागात लिहिलय 'या एका वर्षात तुम्ही काय केलंत' त्याला धरुनच हे लिहावस वाटलं.
आतापर्यंतच्या सर्व लिखाणासाठी खुप खुप धन्यवाद. आणि नवीन लिखाणासाठी अगदी मनापासुन शुभेच्छा...
आशा आहे काही वर्षात तुमच्या कादंबर्‍या पुस्तकरुपात वाचायला मिळतील... धन्यवाद

बेफिकीरजी... अशीच एक शिरवळकरांची कथा वाचली होती.. कथानायक ८०० वर्श पुढे जातो वगैरे....

श्वेता,

आपल्या प्रतिसादाने शाबासकी मिळाल्यासारखे व खूपच चांगले वाटले. आपले लिखाणाकडे आधीपासूनच लक्ष आहे तर! असाच लोभ राहू द्यावात! तुमच्या वर्च्या प्रतिसादाचे आभार मानून त्या प्रतिसादाचे महत्व कमी करत नाही.

कल्याणी गौरव,

आहात कुठे? धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी!

चांगभलं,

दखल घेतल्याबद्दल आभारी आहे. लोभ असावा.

-'बेफिकीर'!

Pages