मनोव्यवस्थापन

Submitted by नरेंद्र गोळे on 7 March, 2011 - 07:12

मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते. ह्यातून बाहेर पडण्याचा राजमार्ग म्हणजे ओंकार जप, प्रार्थना, कल्पनाचित्रण इत्यादींच्या उपयोगाने मन एकाग्र करण्याची किमया साधणे. ह्यालाच 'ध्यानधारणा' म्हणतात. बहिणाबाई चौधरींनी मनाचे खूपच सुंदर वर्णन करून ठेवलेले आहे. त्या म्हणतातः

मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर । किती हाकला, हाकला फिरी येत पिकावर ॥

भरल्या संसारातील मन उभ्या पिकातल्या गुरासारखेच नाठाळ असते. त्याचेवर ताबा मिळवणे सोडाच पण केवळ ते स्थिर ठेवणेही अवघड असते. ते अस्थिर होते. कसे? तर काही लोकं खुर्चीत बसल्यावर सारखा हात अथवा पाय हलवत राहतात. काही लोकं एक काही बोललेले असतील तर त्यावरील प्रतिसादाची प्रक्रिया पुरी होण्याच्या आतच लगेच त्यांना दुसरे काहीतरी वेगळेच बोलायचे असते. काही लोकं एकापाठी एक असंबद्ध विषय चर्चेला घेत असतात. तर अनेकांना समोर कुणी पाहुणा येऊन बसताच मोबाईलवर बोलायचे असते. कित्येक लोकांशी त्यांच्या घरी भेटायला जाऊनही त्यांच्याशी चार शब्द बोलणे केवळ दुरापास्त होऊन बसते. कारण ते टी.व्ही पाहत असतात. जाहिरात लागेपर्यंत आपण फक्त बसून राहायचं. हव तर टी.व्ही. पाहायचा. आणि लोकंच अशी वागतात असे नसून आपणही अनेकदा ह्या प्रकारच्या वागणुकीचे नमुने ठरत असतो. अशा प्रकारची वागणूक इतरांस देणे म्हणजे खराब मनोव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना होय.

आमच्या योगशिक्षिका ध्यानधारणेस बसतांना मोबाईल बंद करण्यास सांगत. फोन येईल अशा अपेक्षेत असलेले मन कुठल्याही कामात क्वचितच एकाग्र होऊ शकते. त्या म्हणत जे काम करत असाल, त्याव्यतिरिक्त सर्व कामे तात्पुरती पण पूर्णपणे थांबवा. शिवाय (लटकेच का होईना पण), जे काम करत आहात ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ (ऑल द टाईम इन द वर्ल्ड- अहो हल्ली प्रत्येक गोष्ट इंग्रजीत पुन्हा एकदा सांगावीच लागते! काय करणार?) उपलब्ध आहे असे समजा. मुळीच घाई-गडबड नाही, असेही माना. ते काम पूर्ण इतमामानिशी आणि शांत मनाने पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला कुठलेच काम करण्याची गरज भासणार नाही अशीच भूमिका घ्या. असे साधल्यास मनाची जी निश्चयात्मक अवस्था होत असते तीच साधणे हे ध्यानधारणेचे प्रमुख उद्दिष्ट असते.

एका वेळेस एकच काम. जे करत असू त्याव्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी त्यावेळी दुर्लक्ष. स्वस्थचित्त होणे. सावधचित्त होणे. दत्तचित्त होणे. म्हणजे ज्या गोष्टीकरता वेळ दिलेला असेल तिचाच विचार, आचार आणि व्यवहार त्या वेळी करणे. ही एकाग्रतेची प्रमुख साधने आहेत.

आमच्या बसमध्ये एक गृहस्थ दररोज घर ते ऑफिस सर्ववेळ एका छोट्याशा डायरीत राम राम राम राम असे लिहीत बसलेले दिसून येत. केवढी प्रचंड एकाग्रता त्यामुळे त्यांना साधलेली होती. ह्यात नामसामर्थ्य, जपसामर्थ्य पारंपरिक अर्थाने कितपत निर्माण झाले मला माहीत नाही मात्र ते गृहस्थ कार्यालयात नक्कीच कुठलेही काम एकाग्रतेने करू शकत असले पाहिजेत. विशेषतः त्यांचा व्यवसाय जर लेखनिकाचा असेल तर ते त्यातही कौशल्य मिळवून असावेत हे स्पष्टच आहे. कुठल्याही गोष्टीचा स्वाध्याय आणि अभ्यास माणसाला त्या गोष्टीबाबत परिपूर्ण करतात.

मी पहिल्यांदा जेव्हा योगसाधनेसाठी बसलो. मला डोळे मिटून घेण्यास सांगण्यात आले. पण काय आश्चर्य. माझे डोळे मिटेचनात. सारी सृष्टी केवळ डोळ्यांच्याच आधारे अनुभूत करण्याची लागलेली चमत्कारिक सवय सुटता सुटेना. डोळ्यांव्यतिरिक्त इतरही इंद्रिये आपल्याला आहेत हे भान मला तेव्हा आले. आंधळे कसे काय जगत असतील कोण जाणे. मी मात्र महत्प्रयासाने तेव्हा डोळे मिटू शकलो. उत्तरोत्तर प्रगती होत, आता मी ध्यानधारणेसाठी योग्य त्या प्रकारे म्हणजे अर्धोन्मिलीत डोळे ठेवून राहू शकतो. त्यासाठी कष्ट पडत नाहीत. आजूबाजूला काय घडत आहे ते डोळे किलकिले करून पाहावेसे वाटत नाही. शिक्षिकेच्या, तोंडी मार्गदर्शनाबरहुकूम योगासने करीत असतांनाही, डोळे मिटलेले असूनही, आता हात कशाला धडकणार तर नाहीत, ही व्यर्थ भीती मन हल्ली बाळगेतनासे झालेले आहे. सकारात्मक विचार करायला शिकविणे हा संस्कृतीचा भाग झाला. मात्र एके दिवशी

'बदका बदका नाच रे, तुझी पिल्ले पाच रे एक पिल्लू हरवले, पोलिसाला सापडले'

हे गाणे मी एका मुलाला

'बदका बदका नाच रे, तुझी पिल्ले पाच रे एक पिल्लू हरवले, पोलिसाने पकडले'

असे म्हणतांना ऐकले.

मुलाचे मन नकारात्मक विकल्पास किती पटकन पकडू शकले हे जाणवून माझे मन स्तिमित झाले. नकारात्मक विकल्पांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवण्याची साधने आपल्या प्रथा-परंपरांमध्ये प्रच्छन्नपणे गुंफिलेली आपल्याला दिसून येतात. त्यांचा वापर मुलांसाठीच नव्हे तर आपल्यासाठीही करून घेण्याचे दिवस आलेले आहेत.

तशीच गोष्ट आहे एकाकीपणाची. एकत्र कुटुंबे विभक्त होऊ लागली. विभक्त कुटुंबांमध्येही एकमेकांशी अर्थपूर्ण संवाद साधायला वेळच मिळेतनासा झाला. कित्येकांच्या घरात नवरा-बायकोला एकमेकांचे निरोप समजावेत म्हणून पाटी-पेन्सिल ठेवलेली मी पाहिलेली आहे. हृदयविकार हा जसा अतिरेकाचे पर्यवसान ठरणारा रोग आहे. तसाच तो एकाकीपणाचे पर्यवसान ठरणाराही आहे.

आपल्याला आरोग्यपूर्ण जगायचे असेल तर आयुष्याचा वेग कमी करा. थांबा थोडे. बोला घरच्यांशी. बाहेरच्यांशी कार्यालयातल्यांशी. कुठल्याही विषयावर. मोकळेपणाने. वितंडवाद न घालता. आपल्याला आवडणारे त्याचे गुण त्याला वर्णन करून सांगा. केवळ चांगल्या गोष्टीच हुडका. आणि त्यांची स्तुती करा.

मनुष्याची भाषा ही अभिव्यक्तीचे उत्तम साधन आहे. तिच्या आधारे. वस्तू, परिस्थिती, काळ, त्यांचे परस्परसंबंध, पर्यवसान इत्यादींबाबतची वर्णने करता येतात. वर्णने एकतर स्तुतीपर असतात, वस्तुनिष्ठ असतात किंवा निंदाव्यंजक असतात. यांमधील निंदाव्यंजक वर्णने टळावित म्हणून संस्कृतीची गरज भासते. भारतीय संस्कृतीत ह्यावर शोधलेला उपाय म्हणजे चांगल्याची स्तुतीस्तोत्रे. अशी असंख्य स्तुतीस्तोत्रे आपल्या आठवणीत असतील. मात्र निंदाव्यंजनाची गीते आपल्या स्मरणत कितीशी आहेत? तुम्ही 'रावणनिंदा' अशा प्रकारचे काव्य ऐकलेले आहे का कधी? कारण ते निषिद्धच मानलेले आहे. तेव्हा निंदाव्यंजनापासून दूरच राहावे हे बरे.

रोज रात्री झोपण्यापूर्वी विचार करा की आज आपण कोणती सृजनात्मक गोष्ट केली. काय महत्त्वपूर्ण साध्य केले. उद्या सृजनात्मक, महत्त्वपूर्ण काय करावे ह्याचाही विचार करा. स्वतःसाठी नव्हे अक्ख्य्या मानवतेसाठी. हळूहळू नवनवीन गोष्टी सुचतील. मनोव्यवस्थापन रंगत आणेल.
.
http://aarogyasvasthata.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखातले विचार मननीय आहेत.

>>तुम्ही 'रावणनिंदा' अशा प्रकारचे काव्य ऐकलेले आहे का कधी? कारण ते निषिद्धच मानलेले आहे. तेव्हा निंदाव्यंजनापासून दूरच राहावे हे बरे.

अगदी बरोबर. रावणाचा वध केल्यावरही रामाने त्याला नमस्कारच केला होता, आणि भ्राता लक्ष्मणालाही करायला लावला होता. Happy

चांगला लेख.

हल्ली मनाची शांती मिळवण्यातच किंवा मनाला शांती कशाने मिळतेय हे शोधण्यातच आपलं मनःस्वास्थ्य बिघडून जाते. कुत्र्याने स्वतःचे शेपूट चावण्याच्या प्रयत्नात गोल गोल फिरत रहावे तसे. आणि हे लक्षात येत नाही.

सुरेख लेख. मन हे पार्‍या सारखे चंचल असते. प्रयत्नपुर्वक त्याला ताब्यात ठेवावे लागते. आणि त्यासाठीच ध्यानधारणा,योग सांगितला आहे.दुसरे असे की आपल्या सर्वाना एक अमेरिकन सवय लागली आहे. त्यामुळे स्वस्थ बसले की वेळ वाया गेला अशी अपराधीपणाची भावना आपल्याला येते. सुमारे २०-२५ वर्षापूर्वी रविवार म्हणजे आराम असा फंडा होता. सध्या आठवड्याची पेंडींग कामे संपवण्याचा दिवस अशी नवी व्याख्या आहे. परवाच्या 'सकाळ' च्या पुरवणीत प्रवीण दवणे यांनी एक सुरेख लेख लिहिला आहे. स्वस्थता हवीय पैसा नकोय. त्याचीच आराधना केली तर स्वास्थ मिळेल अशी आशा आहे.

>>>कुठल्याही विषयावर. मोकळेपणाने. वितंडवाद न घालता. आपल्याला आवडणारे त्याचे गुण त्याला वर्णन करून सांगा. केवळ चांगल्या गोष्टीच हुडका. आणि त्यांची स्तुती करा.<<<<

हे कठिण आहे हो मायबोलीवर. Happy बाकी लेख चांगला आहे. कृती करण्यास प्रयत्न करावे लागतील. Happy

गेल्या ३ वर्षांपासून "मन" याच विषयावर अखंड वाचन चालवलेले आहे. कधी इंग्रजीत कधी मराठीत! त्यातले जे जे उमजले, जे जे समजले ते ते सर्व वरील लेखातील प्रत्येक वाक्याशी रीलेट करता आले. आणि त्या सर्वांचा आपल्या भारतीय संस्कृती आणि स्तोत्रांशी असलेला मेळ आपल्या आपणच लक्षात आला. जमतील तेव्हा running notes काढल्या आहेत. वेळ मिळेल तेव्हा इथे पोस्टेन.

स्वामी समर्थांनी बलोपासना करण्यास का सांगितले असावी आणि सामर्थ्याची स्तुतीपर कवने का रचली असावीत? याचा , सर्वे भद्राणि पश्यंतु वगैरे श्लोकांचा नव्याने विचार केला.

creative (सृजनात्मक), (imaginative visualisation) कल्पनाचित्रण , प्रार्थनेचा खरा अर्थ आणि आवश्यकता, श्रद्धा या संकल्पनेचा खरा अर्थ अशा बर्‍याच गोष्टी आकळल्या.

'विचार बदला म्हणजे नशीब बदलेल', 'पेराल ते उगवेल', 'what is impressed in is expressed out', 'मनी वसे ते स्पप्नी दिसे', 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' वगैरे म्हणींचा अर्थ नव्याने रीलेट झाला. आपल्या अस्तित्वाचा 'मन' हे गाभा आहे. या सत्याची आणि वस्तुस्थितीची जाणीव झाली.

नरेंद्रजींनी त्याच्या मुलाच्या वर्तनाविषयीचे जे उदाहरण दिले आहे त्यावरून मागे विपत्रात आलेली एक गोष्ट आठवली. सर अब्दुल कलाम आझाद यांच्या कुठल्यातरी भाषणात त्यांनी ही बोधपर कथा सांगितली असा त्या विपत्रात उल्लेख होता. एक मुलगा खूप उंच फांदीवर असलेले फळ तोडण्यासाठी झाडावर चढला असताना त्याची आई खाली उभी राहून घाबरल्या आवाजात "पडू नकोस हं" असं नकारात्मक वाक्य बोलत राहते आणि आणि तो मुलगा खरोखरीच खाली पडतो. थोडक्यात आपला मुलगा पडला-बिडला तर या भितीपोटी तिच्याही नकळत ती त्याच्या पडण्याचे कल्पनाचित्रण मनात करत राहिल्याने तीच वस्तुस्थिती वाट्याला आली. त्यापेक्षा उलट "नीट चढ/ जपून चढ" (climb safe, be safe) असे बोलून तोच संदेश सकारात्मक पद्धतीने देता आला असता. अशा आशयाची ती काहीतरी कथा होती. (शाळेत make the sentece affirmative म्हणून हे इंग्रजी व्याकरणात प्रकार असे. त्याचाही अर्थ आणि उद्देश नव्याने कळला.) Happy

आपल्याला आरोग्यपूर्ण जगायचे असेल तर आयुष्याचा वेग कमी करा. थांबा थोडे. बोला घरच्यांशी. बाहेरच्यांशी कार्यालयातल्यांशी. कुठल्याही विषयावर. मोकळेपणाने. वितंडवाद न घालता.>> असे असुनही मनस्वास्थ्य मिळते का हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे.कित्येकवेळा बर्‍याच लोकांचे आयुष्य निवांत ह्या सदरातच मोडत असते ,असे असुनही ती माणसे 'आजकाल पुर्वीसारखे समाधान नाही' हो असे म्हणताना दिसतात ,असे का? की वर कुणी म्हंटल्याप्रमाणे रीकामपणातुन येणारी अपराधी भावना असते ती?

मंदार, गजानन, अरुंधती, हसरी, नितीनचंद्र, सुनील, ध्वनी, अनिल७६, निंबुडा, स्वर, arc, रेशिम आणि चांगभलं सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

असे असुनही मनस्वास्थ्य मिळते का हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे.कित्येकवेळा बर्‍याच लोकांचे आयुष्य निवांत ह्या सदरातच मोडत असते ,असे असुनही ती माणसे 'आजकाल पुर्वीसारखे समाधान नाही' हो असे म्हणताना दिसतात ,असे का? की वर कुणी म्हंटल्याप्रमाणे रीकामपणातुन येणारी अपराधी भावना असते ती?>>>>
सर्वसामान्यपणे आजकाल आयुष्ये फारच धावपळीची झालेली आहेत. हे गृहित धरूनच हा लेख मुळात लिहीला आहे. मात्र ज्याचे आयुष्य फारच निवांत असेल त्याला उद्दिष्टाचा अभाव जाणवत असू शकतो. कारण, आयुष्याकडे केवळ साक्षीभावाने पाहणे सगळ्यांना साधतेच असे नाही. साधल्यास त्यापरता स्वास्थ्य नाही.

सुरेख लेख, अजून मोठा असायला हवा होता.>>>>
चांगल्या (आवडत्या) गोष्टी संपूच नये असे वाटते खरे! मात्र नश्वर जगातील सार्‍याच गोष्टी जिथे लयास जातात, तिथे ह्या लेखाची काय ती मातब्बरी!!

नरेंद्रजी
अतिशय सुंदर लेख्.माझ्या आयुष्यातील कांही पेच प्रसंगांचे उत्तर इथे आहे.
मी गेल्या एप्रिल मध्ये स्वेच्छेने निव्रुत्ती घेतली.मला ज्या गोष्टी प्रिय आहेत त्यांचा पाठपुरावा करण्या साठी अन मुकलेल्या छंदाना पुन्हा नव्या तजेल्याने जोपासण्यासाठी-अन तसेच अप्राप्य झालेला निवांत पणा अनुभवण्यासाठी,उपभोगण्यासाठी.
पण तरीही निवांत बसलो,काहीहि करण्याची गरज नसली तरिही अपराधी वाटते-ही कॉर्पोरेट मध्ये व्यतीत केलेल्या पूर्वायुष्याची भेट :(.
आता मात्र गती धीमी करून चित्त स्थिर करण्याची नितांत गरज भासते आहे पण यश फार तर ५% आहे.
आपण दिलेली उदाहरणे माझ्या बाबतीत तंतोतंत लागू आहेत.
पण आपल्या लेखनाने कुठेतरी आशेचा किरण दिसतोय.
धन्यवाद

असे असुनही मनस्वास्थ्य मिळते का हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे.कित्येकवेळा बर्‍याच लोकांचे आयुष्य निवांत ह्या सदरातच मोडत असते ,असे असुनही ती माणसे 'आजकाल पुर्वीसारखे समाधान नाही' हो असे म्हणताना दिसतात ,असे का? की वर कुणी म्हंटल्याप्रमाणे रीकामपणातुन येणारी अपराधी भावना असते ती?>>>> पूर्ण अनुमोदन . पण हे असे घडायचे कारण म्हणजे आपल्याला लहानपणापासूनच रिकाम बसण्ं हे पाप आहे आणि सतत काहिना काहि करत राहणं च उत्तम असं शिकवलं गेलंय.. रिकामावेळ कसा हाताळायचा किंवा स्थिरता कशी हाताळायची हे आपल्याला माहितच नाही . या लेखात लेखकाने माझ्या मते हेच ध्यानधारणेद्वारे साध्य होते हे सांगायचा प्रयत्न केलाय.आनि जो कोणत्याही परिस्थितीत सुखी राहतो तो नेहमीच सुखी राहतो असं म्हणतात. कारण सगळे प्रश्न सगळ्या समस्या मनाशी निगडीत असतात. मनाला नीट वळण लावले पाहिजे नियमन केले पाहिजे दाबून मारले नाही पाहिजे.मनाला आपला दोस्त केला तर त्याच्यासारखा चांगला सोबती नाही.
हे केवळ वाचनाने साध्य होण्यासारखे नाही यासाठी योग्य ते मार्गदर्शनच घ्यावयास हवे.

मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी योग साधना, यमनियम्,तसेच काही शिस्त शिवाय रोज रोज स्वतःला बजावणे आवश्यक असते की 'मी सुखी आहे" तसेच रोज केर काढावा तसे मनातील जळमटे, वाईट आणि निगेटीव्ह विचार हाकलून जे जे चांगले आहे त्या कडे पाहणे आणि नकारार्थी बोलणार्‍या,वागणार्‍या व्यक्तिंपासून लांब रहाणे ही दैंनंदिन साधना सुरू ठेवली तर थोडे फार यश येतेच. तसेच व्यवस्थापनाची ( एच आर डी)वरील पुस्तके वाचणे, राजकारणी बातम्या,टीव्ही वरील रटाळ कार्यक्रम दूरच.. आणि झेपेल तेव्हढे थोडे का होईना समाजकार्य..अगदी जवळच्या दवाखान्यात अनोळखी पेशंटना भेट्णे अशी दिनचर्या ठेवली तर बरे वाटेल हा माझा अनुभव आहे. पहा प्रयत्न करून...