द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - अंतिम भाग

Submitted by बेफ़िकीर on 7 March, 2011 - 02:22

'गेल्या एका वर्षात तुम्ही काय केलंत????'

Lol

श्री अजय यांचा हा धागा पाहून मी जरा अवलोकन वगैरेच केलं माझ्या सदस्यत्वाचं! अजून एक वर्ष पूर्ण व्हायला बहुधा २ आठवडे असावेत. या अवधीत नऊ कादंबर्‍या 'ओतल्या'. (हा अंतिम भाग धरून! बना आणि कला मात्र बिचारे अर्धवट राहिले, नाहीतर अर्धा डझन कादंबरीबाह्य संबंध तरी झाले असते). ५९ स्वतःच्या अन सहा तरही गझला 'पाडल्या'! आमच्याकडे मशीन आहे गझलांचं! घेतले यमक की पाडली गझल! १८ कविता, सात विडंबनं, तीन विनोदी (?) लेखनं, नऊ लेख, चार लळितं आणि बोक्याच्या धरून अकरा कथा!

तरीच, हल्ली घरातही कुणी विचारत नाही अन मायबोलीवरही! Lol

असो!

एकंदर 'काहीच केले नाही' असे मात्र वाटत आहे.

'द वर्ल्ड ऑफ डिफरन्स' ही कादंबरी आज संपली. ही काल्पनिक कादंबरी होती. काही प्रसंग अवास्तव असू शकतील. या कादंबरीचे वाचन करणारे, प्रतिसाद देणारे, चक्क वाट वगैरे पाहणारे, टीका करणारे, चुका दाखवून देणारे व अर्थातच मायबोली प्रशासन या सर्वांच्या ऋणात मी आहे.

कृपया शेवट गोड मानून घ्यावात, कादंबरी आवडली, नाही आवडली हे जरूर कळवावेत.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

==========================================

रात्रभर जागरण आणि कैद्यांना आणि सरिताला शोधण्याचा इतका ताण पडला होता की नताशा आता बसूनच डुलक्या देत होती.

नताशा! महिला हवालदार होती नताशा! नुकतेच लग्न झालेले! नवरा चिडवायचा! कसल्या पोलिसी कामगिर्‍या करता तुम्ही बायका? गणेशोत्सवात पहारा द्यायचा नाहीतर मग वाहतूक सांभाळायची!

मात्र नताशाने आज पार पाडलेली कामगिरी अफाट होती.

सहा हवालदारांमध्ये ती एकमेव महिला हवालदार होती. आणि गुंजवणी गावापासून ते कात्रज घाट ओलांडेपर्यंत सरिताला व्हॅनमधून आणणे ही कामगिरी तिने पार पाडलेली होती. हे नवर्‍याला सांगितल्यावर त्याची मते नक्कीच बदलणार होती.

त्याच उत्साहात ती रात्रभर जागीच होती. त्यातच आकाश, वाघ आणि नसीम मिळाल्यावर तर जबरदस्त फोनाफोनी झाली होती. तमाम पोलिस अधिकार्‍यांनी या व्हॅनमधील सर्वांचे मुक्तकंठाने अभिनंदन केले होते. ही बातमी उद्या फोटोसकट झळकली की नताशा ही महिला पोलिस अधिकारी तमाम महाराष्ट्राला माहीत होणार होती आणि आयुष्यभर नवरा तिच्याशी आदरानेच बोलणार होता. अर्थात, तो होता चांगलाच स्वभावाने, फक्त गंमतीने तिला म्हणायचा की कसल्या कामगिर्‍या करता तुम्ही लोक!

आणि व्हॅन घाट ओलांडून पुण्यात शिरली तसे एक 'टिटु' नावाचे हॉटेल लागले. खरे तर त्या हॉटेलचे नाव 'ती - तू' असे होते. पण इंग्रजी भाषेत नाव लिहिल्यामुळे ते 'टिटु' वाटायचे सुरुवातीला!

चहा!

चहाची नितांत गरज भासली सगळ्यांना!

व्हॅन थांबली. आकाश, वाघ, नसीम आणि सरिताला बेड्या घातलेल्या होत्या. शेंडे नावाचा हवालदार प्रमुख होता. त्याच्याकडे एक शस्त्रही होते. बाकीच्यांकडे फक्त केन्स!

या कैद्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश असतानाही जिवंत पकडून आणण्याचे शेंडेने ठरवलेले होते.

आत्ता स्टाफ व्हॅनबाहेर उतरला तसे कैदीही म्हणाले..

"आम्हालाही जरा बाथरूमला जायचे आहे"

हे मान्य करायलाच लागणार होते. एकेका कैद्याला नेऊन आणण्यात आले. ते काम प्रथम उरकून घेतले सगळ्या स्टाफने! पुन्हा एकदा कैद्यांना व्हॅनमध्ये बेड्या घालून त्या बेड्या व्हॅनला असलेल्या कडीत अडकवून व्यवस्थित बंद करण्यात आले. झालेल्या मारहाणीमुळे आकाश, वाघ आणि नसीम अजूनही कण्हतच होते.

आता पाच हवालदार आणि नताशा हे चहा प्यायला मोकळे झाले.

आपल्याच धुंदीत नताशा त्या पहाटेची गार हवा अनुभवत मजा लुटत होती. तिला घाई झाली होती पेपर्स वाचायची. पण पेपर हातात यायला अजून चार तास होते. आत्ता फक्त पहाटेचे अडीच वाजलेले होते. सकाळी तिकडे पुण्यात पेपरमध्ये आपला फोटो, किमान नाव वाचून नवरा आश्चर्याने तीनताड उडेलच हे तिला माहीत होते. तिने मोबाईलवरून त्याला कसलीही कल्पना दिलेली नव्हती. शी वॉन्टेड टू गिव्ह हिम अ सरप्राईझ!

सगळे चहा घ्यायला आत बसले तशी नताशा लेडिज रेस्टरूमची मळकट पाटी बघून तिकडे जायला निघाली. किर्र काळोखात वाट दिसावी म्हणून असलेला एक धुळकट बल्ब धुगधुगी उरल्याप्रमाणे श्वास घेत होता.

कशीबशी बाथरूमपर्यंत पोचलेली नताशा तिथून परत येताना मात्र...

... खस्सकन अंधारात ओढली गेली...

प्रशिक्षित हवालदार असली तरीही... नताशा शेवटी एक स्त्री होती... त्या पकडीतून सुटणे अशक्य आहे याची तिला जाणीव होऊ लागलेली होती. तोंडावर हात दाबून धरल्यामुळे किंचाळताही येत नव्हते.. धडपड कितीही केली तरी तिचे डावे मनगट त्या माणसाच्या डाव्या पंजाच्या पकडीत गच्च धरले गेले होते आणि उजवा फोरआर्म, जो तिच्या तोंडावर दाबून धरलेला होता त्या हाताच्या पंजात होता एक जबरदस्त सुरा! आठ इंची पात्याचा!

"चूपचाप उधर चल्ल. चिल्लायेगी तो आखिरी बार चिल्लायेगी... समझी????"

मुल्ला!

सव्वीस दरोडे घालणारा आणि अख्ख्या महाराष्ट्रातील पोलिसांच्या नाकी नऊ आणणारा मुल्ला त्या अंधारात लपलेला होता याची कुणालाही जाणीव असणे शक्य नव्हते. तो बाईकवरून पुण्याहून घाटाकडे चाललेला असतानाच त्याला 'टीटू'पाशी व्हॅन दिसली. त्यामुळे तो झाडीत लपून बसला. कारण या व्हॅनला तो दिसलेला नसला तरी निदान या पोलिसांच्या हालचाली काय आहेत ते तरी कळावे म्हणून तो लपून बसला.

आणि त्याला धक्काच बसला. सरिता, आकाश, नसीम आणि वाघ???

ह्यांना कधी धरले??

अत्यंत तीव्र वेगात मुल्लाला विचार करायचा होता. दोन पर्याय होते. इथून एकट्यानेच पळून जाणे हा एक पर्याय! मग बाकीच्यांचे काही का होईना! आणि दुसरा पर्याय म्हणजे यांना वाचवण्याचा प्रयत्न करणे!

पहिला पर्याय मुल्लाच्या मनात अर्धा क्षणही टिकला नाही. न टिकण्याचे दुय्यम कारण हे होते की तो एक दोन दिवसात पकडला गेलाच असता, ज्या अर्थी हे सगळे पकडले गेले आहेत त्या अर्थी! कारण तो गुंजवणी भागात जाणार आणि तिथून कुठेतरी निसटणार हे आता डिपार्टमेन्टला माहीत झालेले असणारच होते. पण प्राथमिक कारण हे होते की ज्या वाघ आणि नसीमबरोबर आपण अनेक वर्षे एका बरॅकमध्ये राहिलो त्यांना असे धरलेले पाहून आपण निसटून जायचे एकट्याने? हीच यारी?? ही कसली यारी? त्यापेक्षा मार खाऊ आणि मरून जाऊ! नाहीतरी आता सुटून आपण काही फार मोठे पुण्यकर्म करू शकणार नाहीच आहोत. इतकेच काय तर उजळ माथ्याने जगूही शकणार नाही आहोत. आज नाही तर महिन्याने आणि महिन्याने नाही तर सहा महिन्यांनि आप़ धरले जाऊच! त्यापेक्षा...

... त्यापेक्षा ह्यांनाच सोडवायचा प्रयत्न केला तर???

गॉश!

नताशाला एकटीला तिकडे जाताना बघून त्याच क्षणी मुल्ला जीवावर उदार झाला. आर या पार! मी गोळ्या खाऊन मरेन पण या खात्यातील माणसांना माझी चमक दाखवूनच! आजवर मी दरोडे कसे टाकले असतील याची निदान चुणुक तरी त्यांना दिसायलाच हवी!

आणि त्यानंतरच्या केवळ तिसर्‍या मिनिटाला नताशा त्याच्या पकडीत होती.

मुल्ला तिला ढकलत ढकलत सरळ 'टिटु'च्या समोर गेला.

ते दृष्य दिसणे, समजणे आणि त्यानंतर त्या दृष्याच्या गांभीर्याची पातळि जाणवणे!

यात जे काही तीन सेकंद गेले तितकेच! सटपटून उठलेले हवालदार मुल्लाच्या हातातले पाते नताशाच्या गळ्यात रुतलेले पाहून जागच्याजागी स्तब्ध झाले. केवळ तेच नाही तर आत व्हॅनमध्ये बसलेले कैदी आणि 'टिटु'वरील स्टाफही!

"रिव्हॉल्व्हर फेके दे *****"

मुल्लाने शेंडेला अत्यंत हीन शब्दात दिलेली ती आज्ञा पाहून प्रत्येकाचेच रक्त उसळ्या मारू लागले. शेंडे तर रागाने लालभडक झालेला होता. पण नताशाचे काही खरे दिसत नव्हते. ती सुटण्याची धडपडही करत नव्हती. खरे तर ती गुदरमतच असावी मुल्लाच्या फोरआर्मच्या जबरदस्त पकडीमुळे!

शेंडेने प्रसंगावधान राखून रिव्हॉल्व्हर फेकले. ते तसेच जमीनीवर राहू दिले मुल्लाने! आणि दुसर्‍या हवालदाराला सांगितले..

"सबको बाहर निकाल... और बेडी खोल सबकी..."

या वेळेस नताशाने एक जोरदार प्रयत्न केला सुटण्याचा! तिचा डावा हात तर सुटलाही मुल्लाच्या पकडीतून! पण मुल्लाने पटकन तिचा डावा दंड धरून तिला पुन्हा खेचले आणि यावेळेस मात्र सुरा खरोखर तिच्या गळ्यावर रुतवलाच! असह्य वेदनेमुळे नताशा ओरडली. एक अगदी बारीक थेंबही आला रक्ताचा!

मुल्ला पुरुष होता. पण त्याच्यासमोर आत्ता एका नि:शस्त्र स्त्रीवर वार करण्याखेरीज पर्यायच नव्हता. बरं! ती स्त्री काही सामान्य स्त्री नव्हती. असल्या प्रकारांचे तिला यथोचित प्रशिक्षण होते.

एक नताशा आत्ता सुटली असती तर मुल्लाच्या शरीरात सहा गोळ्या घुसल्या असत्या पुढच्या सहा सात सेकंदात!

पण मुल्लाची आज्ञा शेंडेने त्या हवालदाराला ऐकायला लावली. त्याच्यासमोर वेगळाच प्रश्न होता. खात्यातील या पाच हवालदारांच्या बेजबाबदार वर्तनामुळे एक महिला पोलिस मेली किंवा जखमी झाली तर?? एक वेळ कैदी सुटले तर पकडता तरी येतील, पण या नताशाला काही झाले तर?? नोकर्‍या तर जायच्याच, पण पुन्हा कुणी कुठे उभेही करणार नाही आपल्याला! नताशाची सुरक्षितता ही त्याची सर्वोच्च प्रायॉरिटी होती आत्ता!

परिणामतः केवळ सहाव्या मिनिटाला वाघ, नसीम, आकाश आणि सरिता, हातात बेडी नसलेल्या अवस्थेत बाहेर उभे होते आणि वाघच्या हातात होते शेंडेच रिव्हॉल्व्हर!

"नसीम और आकाश.. इनको बेडिया पहनाओ... सिर्फ दो मिनिटमे..."

नताशा आता हतबुद्ध होऊन घडणार्‍या प्रकाराकडे पाहात होती कारण आता तिला एकट्या मुल्लाने धरलेले नव्हते. आता सरितानेही तिला गच्च धरून ठेवलेले होते.

अचाट प्रकार पाहायला मिळाला 'टिटु'वाल्यांना!

पोलिस काही कैद्यांना बेड्या घालून व्हॅनमधून आले. चहा प्यायला येथे थांबले. चहा अर्धवट पिऊन झाला असतानाच अचानक कैद्यांनीच त्या पोलिसांना बेड्या घातल्या. आणि व्हॅन निघून गेली.

पाच हवालदार आणि नताशा या सहाहीजणांना बेड्या घालून ड्रायव्हरच्या अगदी मागे लटकवून ठेवण्यात आले होते. त्यांचे मोबाईल फोन आकाशने ताब्यात घेऊन ते स्विच ऑफ केलेले होते. नसीम व्हॅन चालवत होता. वाघ रिव्हॉव्हर रोखून सगळ्यांवर लक्ष ठेवत होता. आणि मुल्ला नताशाला म्हणत होता...

"माफ करना बहन... ये करना पडा.. हमे इन्तिकाम लेना है..."

ते ऐकून नताशा शिव्या देत होती, पण तिच्या शिव्या कुणालाही ऐकू येत नव्हत्या कारण इतर हवालदार जोरजोरात आणखीनच शिव्या देत होते.

अचानक सरिता भानावर आली.

"आकाश... बाबूला फोन लाव... नवलेच्या नंबरवर..."

मुल्लाला हे काही माहीतच नव्हते. त्याला वाटले नवलेने बाबूला धरले.. तो चिरकला...

"मतलब?? बाबू पकडा गया??"

"उसने नवलेको खल्लास कर दिया..."

वाघचे ते विधान ऐकून मुल्लाने आरोळीच ठोकली आनंदाने! नवले मेल्याचा सर्वांनाच अतिशय आनंद झालेला होता.

आकाशने शेंडेच्या सेलफोनवरून बाबूला फोन लावला. अर्थातच बाबूने तो उचलला नाही. कारण त्याला नांव दिसले होते...

'कॉन्स्टेबल शेंडे'

मग त्याच सेलफोनवरून आणि इतर एक दोन सेलफोन्सवरून आकाशने काही वेळा प्रयत्न केल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आले. की बाबू फोन उचलणारच नाही. मग आकाशने एसेमेस पाठवला.

'मी आकाश आहे, आम्हाला मुल्लाने सोडवले, फोन घे'

शांतता! अजूनही शांतताच! बाबू असल्या मेसेजेसनी फसणार नाही हे आता सगळ्यांच्याच लक्षात आले. आता करायचे काय? ही पोलिस व्हॅन घेऊन पुण्यात कुठे जायचे??

तेवढ्यात...

कर्र कर्र.... कर्र कर्र...

व्हायब्रेशन्स! आकाशने अर्ध्या सेकंदात फोन उचलला..

"बाबू? आकाश.. आम्ही सुटलोयत... तू कुठेयस "

"कशावरून सुटलायत???"

आकाशला समजले. बाबू ते मान्यच करणार नव्हता. पोलिसांच्या दबावाला बळी पडून आकाश तसे विचारत असणार हे बाबूला माहीत होते.

"अरे विश्वास ठेव.. मुल्लाने आम्हाला सोडवले... सगळे हवालदार इथेच आहेत.. पण बेड्यात आहेत.."

"सॉरी आकाश... तुम्ही सगळे पकडला गेलेला आहात... खरच सॉरी... पण मी अजून मुक्त आहे.. जैनला खलास केल्याशिवाय मी मरणार नाही... पुढच्या जन्मी पुन्हा भेटू..."

"मिनी कुठाय??????????????"

हा प्रश्न मात्र बाबूने फोन बंद करता करता ऐकला आणि चक्रावलाच बाबू!

हे सगळे पकडले गेलेले असताना आकाश असा प्रश्न विचारेलच कसा?? आणि कशासाठी?? फक्त आपल्याला फसवायला?? हे दाखवायला की आम्ही सुट्टे आहोत म्हणून मिनीची चौकशी करतोय?? हाही डावच असेल हवालदारांचा??

"मिनी कुठे आहे म्हणजे???"

"कुठे आहे मिनी??? तुझ्याबरोबर आहे का??"

जर हे सगळे पकडलेलेच असतील तर मिनीही पकडलीच गेली आहे हे यांना नक्की माहीत असणार! म्हणजेच हा प्रश्न ते फक्त इतकेच दाखवायला विचारत असणार की ते पकडले गेलेले नसून मोकळे आहेत. हा डावच असणार! आता ह्यांचीही दिशाभूलच करायला हवी.

"हो... मी आणि ती बरोबरच आहोत..."

ह्यावर बाबूला एक विधान अपेक्षित होते. ते म्हणजे सगळ्यांना जर हे माहीत असेल की मिनीही पकडली गेलेली आहे तर आपले उत्तर ऐकल्यावर सगळेच चक्रावतील आणि हवालदार आकाशच्या हातातील फोन बंद करून पहिल्यांदा मिनी खरच सुटली की काय याची चौकशी करायला लागतील.

पण.... झाले उलटेच... आकाश आनंदाने चित्कारला...

"सरिता... मिनी पण बाबूबरोबरच आहे..."

मुल्लाने आनंदाने आरोळी ठोकलेलीही बाबूला ऐकू आली. हवालदारांचे चेहरे मात्र पाहण्यासारखेही राहिलेले नव्हते.

बाबू चक्रावलाच! हे कसे काय झाले?? सगळे एकमेकांशी बोलू शकतायत, फोनवर काय बोलायचे हे सांगण्यासाठी गॅप घेतली जात नाहीये! काय चाललंय काय??

"आकाश... खरं सांग.. मी कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी जबरदस्तीने तुला हा फोन करायला लावलाय ना???"

"ह्यॅ?? काहीतरी काय?? अरे वाघच्या हातात पिस्तुल आहे पिस्तुल.. सगळे हवालदार बेड्यांमध्ये आहेत.. "

तेवढ्यात ... खर्र खर्र...

वॉकी टॉकी वाजला..

एक सूचना ऐकु आली..

"कालच्या अपघातातले दोघेही हवालदार निधन पावले आहेत... दोनो मरगये.. बोथ आर डेड.."

भीतीदायक शांतता पसरली होती त्या क्षणी! तेवढ्यात शेंडेने तोंड उघडले.. या यंत्रणेवर अत्यंत सक्षमपणे मेसेजेसची देवाणघेवाण होऊ शकायची. मात्र सगळेच हवालदार त्या यंत्रणेपासून लांब असल्याने त्यांना वॉकी टॉकी ऑन करता येणे शक्य नव्हते. पण आता तो ऑन झाला होता आणि त्यावर पटकन व्हर्बल मेसेज देणे सहज शक्य होते. शेंडे ओरडला..

"सेव्ह अस.. वुई आर हेल्ड अप... शेंडे.. कात्रज घाट.... गुंजवणी व्हॅन.. "

वाघची एक अतिशय सणसणीत लाथ शेंडेच्या पोटरीवर बसल्याने त्या वाक्याच्या शेवटी शेंडेची किंकाळीच ऐकू आली. पण.....

... पण बहुतेक तो संदेश तिकडे पोचलेलाच होता.. नेमके जे नको तेच झालेले होते... आकाश पटकन वॉकी टॉकी बंद करण्यासाठी धावला पण त्याला मुल्लाने धरले.. मग मुल्लाने वाघकडचे रिव्हॉल्व्हर हातात घेतले आणि वाघला खुण केली... सगळ्या कैद्यांमध्ये सर्वात अनुभवी वाघच होता... आणि आत्ता संजयबाबू येथे नसल्याने आपोआपच कप्तानपद त्याच्याकडेच आलेले होते..

वाघ पटकन वॉकीटॉकीच्या जवळ गेला आणि म्हणाला..

"हमने कहां आना है???"

"मेसेज.. मेसेज... "

यावर काय बोलायचे ते वाघला माहीत नव्हते.. प्रत्यक्षात अपेक्षित हे होते की मेसेज कोण आणि कुठून देतंय!

"शेंडे कॉन्स्टेबल.. कुठे यायचंय आम्ही???"

खट्टकन आवाजच बंद झाला. त्याचक्षणी शेंडेच्या चेहर्‍यावर हलके स्मितहास्य पसरले. आणि पाठोपाठ सगळ्याच हवालदारांच्या!

अचानक सगळ्यांचे सेल फोन्स वाजू लागले. वाघ आणि सरिताने ते फटाफटा बंद केले. आता तर शेंडे अधिकच हासत होता. का हासतो आहे हे नक्की माहीत नसल्याने भडकलेल्या मुल्लाने त्याला शिवीगाळ करत एकच लाथ घातली. तरीही शेंडे हासतच होता.

नक्कीच! नक्कीच हे सगळे ट्रेस झालेले होते आणि काहीतरी विचित्र प्रकार आहे हे सेन्ट्रल रूमला समजलेले होते. वाघला कोड लॅन्ग्वेजच माहीत नसल्याने त्याने घोळ करून ठेवलेला होता.

बाबू आणि आकाश बोलत असलेला सेल फोन मात्र चालूच होता. बाबूने कर्कश्श ओरडून विचारले..

"अरे काय झाले आहे???"

आकाशने केवळ मिनिटभरात मुल्लाने होल्ड अप केल्यापासून ते वॉकी टॉकी पर्यंतचे सगळे सांगितले. बाबूने शिव्याच घातल्या.

"अक्कल्शुन्य आहे का वाघ?? त्याच्यावर कशाला बोलला?? पहिल्यांदा ते बंद करून टाक... त्या पोलिसांना व्हॅनमधेच राहूदेत... अडकलेले.. तुम्ही उतरा आणि दुसरे वाहन घेऊन मुळशीला सुटा... एकही सेलफोन बरोबर आणू नका.. अगदी बंद असला तरीही... आता आपला संपर्क डायरेक्ट मुळशीला.. पत्ता समजून घे...."

बाबूचे कप्तान कौशल्य निर्विवाद असल्याने आहे तिथेच व्हॅन थांबवण्यात आली. सगळेच्या सगळे सेल फोन्स डिस्ट्रॉय करण्यात आले पोलिसांच्या समोरच! वॉकी टॉकीचे बटन ऑफ करून टाकण्यात आले.

आता मात्र शेंडे गंभीर झालेला होता. त्याला समजलेले होते की बाबू नावाचा यांचा जो लीडर आहे तो मात्र खरोखरच पोचलेला आहे.

त्यातच नसीमने आणखीन अक्कल चालवून ती व्हॅन रस्त्याकडेला असलेल्या एका खड्यात घातली सरळ! आणि उडी मारली. शरीराला किती आणि कुठेकुठे लागलेले होते याचा विचार करण्याची ती वेळच नव्हती. फक्त जीव वाचवून सुटायचे होते इतकेच!

आणि मागून आलेल्या ट्रकला सरळ रिव्हॉल्व्हर दाखवत वाघने क्लीनर आणि ड्रायव्हरला खाली ओढले आणि बडवून काढले. आता त्यांना ट्रकमधल्याच एका दोरीने ट्रकच्या मागे बांधून ठेवले आणि तिथे वाघ स्वतः, सरिता आणि आकाश लक्ष देत बसले. नसीम आणि मुल्ला केबीनमध्ये गेले.

"या नसीमला सगळ्या गाड्या कशा काय चालवता येतात??"

आकाशला आजतागायत नसीमची कथाच माहीत नव्हती. वाघला हे माहीत नव्हते की आकाशला ती कथा माहीतच नाहीये! जेलमधील पहिल्या रात्री पहाटेपर्यंत झालेल्या गप्पांच्यावेळेस नसीम चेंबरमध्ये होता. त्यामुळे तेव्हा काहीच कळले नव्हते. आणि नंतर ते विचारत बसण्याचा वेळच मिळाला नव्हता कधी!

"ड्रायव्हरच आहे तो... इस्टेटीच्या भांडणात बापाच्या डोक्यात दगड घातला आणि फाशी झाली.. "

"आहे कुठला तो??"

"एम्पायर टॉकीजपाशी घर आहे..."

"फॅमिली??"

"शादी नही बनाया..."

"एका खुनावरून फाशी?? आणि बाबूला सातच वर्षे???"

"हं... आणि मला फक्त जन्मठेप.. "

सरिताने हादरून दोन्ही हातांच्या ओंजळीत तोंड लपवले. काय माणसे होती ही? कुणाच्या सुटकेकरता प्रयत्न करतोय आपण? कशासाठी??? फक्त आपल्या भावाला वाचवण्यासाठी?? यातील प्रत्येक माणूस एक पोचलेला गुन्हेगार आहे. प्रत्येक माणूस! फक्त आपाला भाऊ सोडून! निर्मल जैनच्या लोकांनी केलेल्या अत्याचारांचा सूड घेण्यासाठी आपण त्या मिनीचे ऐकत गेलो. आपल्याला वाटायचे त्यातून आपला भाऊ सुटेल. सुटला तर आहे खरा! पण लवकरच अडकण्याचीही चिन्हे आहेतच! निर्मल जैनला मारून अडकतो की न मारता इतकाच प्रश्न उरलेला आहे. आणि ...

.... आणि मुख्य म्हणजे आपणही... आपणही एक गुन्हेगार झालो आहोत या सगळ्या प्रकारात...

आई नाही, बाबा नाहीत, भाऊ होता तो आता गोळ्या खाऊन मरणार तरी किंवा पुन्हा जास्त कालावधीसाठी अडकणार तरी! आणि आपणहि अडकणार!

त्यापेक्षा?? त्यापेक्षा आपण मरूनच गेलो तर?? काय आहे नाहीतरी या आयुष्यात???

ट्रक जसजसा पुढे चालला होता, जसजसा पुण्यात आत आत प्रवेशत होता, प्रत्येकाच्याच मनावर, येणार्‍या उजाडणार्‍या पहाटेच्या ऐवजी काळोख पसरत चालला होता. अधिकाधिक!

भवितव्य सरळ दिसत होते. दोन पोलिस गंभीर अपघातात मृत्यूमुखी, नवलेचा भर रस्त्यावर खून, नताशाला होल्ड अप करून नंतर सहा हवालदारांनाच होल्ड अप केले, त्यांना बेड्या घालून ती व्हॅन रस्त्याच्या कडेला पाडली आणि हे सगळे कुणी केले? तर कालच रात्री येरवडा जेलमधून सुटलेल्या पाच कैद्यांनी!

अर्थ उघड होता. आता कोणतेही न्यायालय त्यात पडणार नव्हते. उच्चस्तरीय पातळीवरून एन्काउन्टरचे आदेश दिले गेले असणार होते. काही प्रश्नच उरलेला नव्हता.

सरिता हमसून हमसून रडू लागली तसा मात्र आकाशचाही बांध फुटला. त्याने सरिताच्या मांडीवर डोके ठेवून रडायला सुरुवात केली. सरिता त्याला फाड फाड मारत होती. ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर यांच्या मुसक्या आवळलेल्या असल्याने ते नुसतेच हादरून पाहात होते. त्यातल्या त्यात त्यांच्या दृष्टीने जमेची बाब एकच होती की या गटात एक बाई तरी होती. वाघ अत्यंत उद्विग्नपणे ड्रायव्हर केबीन आणि बॉडी यात असलेल्या लहानश्या खिडकीतून बाहेर पाहात होता.

कोणत्याही क्षणी समोरून हात दाखवण्यात येणार होता. ट्रक न थांबल्यास पाठलाग करण्यात येणार होता. टायर्स फुटणार होते. आडवा तिडवा जात ट्रक आपटून थांबणार होता. सर्वांना कुत्र्यासारखे मारत खाली ओढले जाणार होते. भरपूर मारहाण झाल्यानंतर एकेकाला झाडीत नेऊन गोळ्या घातल्या जाणार होत्या.

आयुष्य! आयुष्ये संपणार होती आजच पहाटे! कदाचित या तारखेचा सूर्य उगवलेला पाहणे नशिबात नसणार होते.

पळालोच नसतो तर??

का सगळ्यांनी मिळून ठरवेल की पळायचे??

बाबूसारखी मात्र जिगर नाही एकाचीही! भर रस्त्यात नवलेला खलास केला. भर रस्त्यात! कुणाच्या बापाची भीती नाही! सरळ मर्डर! तोही डेप्युटी इन चार्ज ऑफ द जेलरचाच!

बाबू तो बाबूच! संजय बाबू! बिचारा आपल्या बायकोचे, जिने स्वतःची आहुती देऊन त्याला बाहेर काढले तिचे, तोंडही न पाहता खलास होणार होता एन्काउन्टरमध्ये!

पहाटेचे तीन वाजलेले होते. नसीम जीवाच्या आकांताने ट्रक पळवत होता. लांबवर कसलाही निळा रंग दिसला की टर्न घेत होता. आपला ट्रक असा चालवता येतो हे ड्रायव्हर आणि क्लीनरला आयुष्यात पहिल्यांदा समजत होते. ट्रक वळताना मागचे हे पाचही जण एकमेकांवर जोरात आदळत होते. ब्रेक्सचा आवाज इतका भयानक येत होता की ट्रक निघून गेल्याच्या तिसर्‍याच क्षणी इतक्या पहाटेही घरांमधले लोक खिडक्या उघडून बाहेर पाहात होते.

चांदणी चौक!

आत्ताचा बायपास नव्हता त्यावेळी! धनकवडीहून चांदणी चौकापर्यंत यायचे म्हणजे एरवी किमान पाउण तासाचे काम होते. आत्ता पहाट होती म्हणून फार तर तीस ते पस्तीस मिनिटे! त्यातही ट्रक आहे म्हंटल्यावर पस्तीस ते चाळीस मिनिटेच!

पण नसीम??? नसीमला कित्येक वर्षांनी त्याच्या आवडीची गोष्ट करायला मिळत होती. आता तो फक्त वार्‍याच्या आवाजाशीच बाता करणार होता.

नसीम! अंगात संचारल्यासारखा त्याने ट्रक बाविसाव्या मिनिटाला चांदणी चौकात आणला होता. शेजारी बसलेला मुल्ला स्वतःच्या मरणाला घाबरला नसेल इतका त्या ड्रायव्हिंगला घाबरला होता. गच्च धरून ठेवले होते त्याने दोन बार्स!

आणि चांदणी चौक ओलांडतानाच ते हादरवणारे दृष्य दिसले.

दोन व्हॅन्स! बाराच्या आसपास अधिकारी! तिघांच्या हातात वेपन्स! लांब पल्याची!

एव्हरीथिंग वॉज फिनिश्ड! ऑल ओव्हर!

नसीमने गच्चकन ब्रेक दाबला.

उघड होते. आता नेतृत्व वाघकडेच होते. कारण बाबू तर होता मुळशीला!

केबीन आणि बॉडीच्या मधोमध असलेल्या लहानश्या खिडकीतून वाघ जीवाच्या आकांताने किंचाळला...

"घुसेडदे बीचमेसे...."

त्यानंतर पुढच्या दहा मिनिटात नसीम सोडला तर एकाचाही विश्वास बसत नव्हता की आपण जिवंत आहोत. नसीमने वाघची आज्ञा प्रमाण मानून ट्रक चक्क व्हॅनवरच धडकवत पुढे नेला होता. अख्खे अधिकारीच्या अधिकारी झाडीच्या एका बाजूला गेले होते धावत. हातातल्या वेपन्सचा वापर करायच्या आधीच ट्रक शंभर मीटर्सवर पोचून एक तीव्र वळण घेत होता.

पुढचे वळण घेत असताना मागे बसलेल्या सगळ्यांना जाणवले. व्हॅन्स स्टार्ट होत होत्या. नसीमचा वेग अधिकच वाढला.

आणि बावधन आणि भुगाव वादळी वेगात मागे टाकून ट्रक जेव्हा पिरंगुट घाटावरून उतरायला लागला तेव्हाच आणखीन एक भीषण दृष्य दिसले. खूप खाली... घाट उतरल्यानंतर... भरपूर स्टाफ होता.. तीन व्हॅन्स होत्या..

आता काहीही करणे शक्य नव्हते.. सरेन्डर! हे अधिकारी तर गोळ्याच घालणार होते ट्रकवर!

आता तर नसीम वाघलाही विचारत नव्हता की काय करायचे. आपण पुढचे वळण नीटपणे घेणार आहोत की दरीत कोसळणार आहोत हे आतल्या पब्लिकला समजतच नव्हते. नसीमने कल्पनातीत वेग दिला होता ट्रकला उतारावर!

बहुधा तेच कारण असावे. वरून तो ट्रक असा राक्षसी वेगाने उतरतोय हे पाहूनच बहुधा खाली प्रचंड घाबरीघुबरी हालचाल झालेली असावी. कारण मध्ये उभ्या केलेल्या सगळ्या व्हॅन्स तातडीने रस्त्याच्या कडेला घेण्यात आल्या. रांगेने अधिकारी उभे होते. नसीमने मुल्लाला खुण केली. मुल्ला खाली वाकला. ते पाहून आतमध्ये वाघनेही सगळ्यांना खाली आडवे व्हायला लावले. आपण हे सगळे काय आणि का करतोय याचा विचार करण्याची आता वेळच राहिलेली नव्हती.

आणि ते ठिकाण जवळ आले. शेवटच्या उतारावरून ट्रक असा वळू शकतो हे बापजन्मात कुणी पाहिले नसेल. दचकून रांगेतले अधिकारी सैरावैरा धावले. तीच संधी समजून नसीम अक्षरशः अ‍ॅक्सीलरेटरवर उभा राहिला..

फाड... फाड... फाड...

गोळ्यांच्या आवाजांनी कान फाटायची वेळ आली... श्वास घेणे विसरून गेले होते सगळे... आणि पिरंगुटची कोकाकोला कंपनी मागे पडली तेव्हा लक्षात आले...

'आपण अजूनही जिवंतच आहोत....'

घोटवडे फाटा आला कधी अन गेला कधी हेच समजल नाही. खूप लांबून बहुधा पोलिस व्हॅन्सचे आवाज येत असावेत. आता काय करायचे काही समजत नव्हते. कारण रस्ता सरळसोट होता. पार मुळशीपाशी गेल्याशिवाय घुसळखांब आणि भिरा फाटा लागणारच नव्हते. आणि फाटे लागले तरीही दोन्हीकडे बंदोबस्त असणारच होता.

मृत्यूचक्रात आपण स्वतःहून प्रवेश करत आहोत आणि खूप आतवर आलेलो आहोत हे सगळ्यांना ज्ञात झालेले होते.

मात्र नसीम काहीही सांगण्याच्या पलीकडे गेलेला होता. त्याच्या डोळ्यात फक्त रस्ता आणि वेग एवढेच परावर्तीत होत होते.

मुल्ला अक्षरश: जीव मुठीत धरून एकदा रस्त्याकडे आणि एकदा नसीमकडे पाहात होता.

नॉर्थ स्टार्स इक्विपमेन्ट्स!

कंपनी मागे पडली आणि जंगलातील घाट सुरू झाला. याच घाटात मागच्या व्हॅन्स आणि आपल्यामधील अंतर वाढू शकते हे नसीमच्या लक्षात आले. त्याने दोन्ही हातांनी ज्या पद्धतीने स्टिअरिंग व्हील वळवायला सुरुवात केली ते पाहून मागून पाहणारा वाघ नसीमला देवच मानायला लागला.

एकाही कीएमपीएचने वेग कमी न करता घाट चढून आणि उतरूनही झाला.

अजूनही उजाडण्याची अजिबात चिन्हे दिसत नव्हती. चार वगैरे वाजलेले असावेत. आणि ट्रकच्या अत्यंत प्रखर दिव्यांमध्ये ते दिसले....

.... एक मोटरसायकलस्वार....

बाबू??? संजय बाबू???

ओह येस्स! ओह येस्स! संजयबाबूच!

ट्रक येतोय हे लक्षात आल्यावर दचकून बाबूने मोटरसायकल झाडीत घेतलेली होती. तर ट्रक तिथेच स्लो झाला आणि मुल्लाची हाक ऐकू आली...

"बाबू... जल्दी बैठ अंदर....."

पकडलेल्या ड्रायव्हर आणि क्लीनरला आता फक्त श्वास घेणेच शक्य राहिलेले होते. एक आडदांड माणूस अचानक कसाकाय चढून वर आला हे त्यांना समजेना! वाघ आणि आकाशने बाबूला मिठ्या मारल्या.

सुटला ट्रक!

पुन्हा मागून खूप लांबून आवाज यायला लागले होते. बाबूने मागे बघत एक शिवी हासडली आणि त्याला जाणीव झाली की भेदरलेली सरिताही ट्रकमध्येच आहे...

बाबूने झटकन ड्रायव्हर आणि क्लीनरला मोकळे केले आणि ट्रकच्या मागच्या फळीपाशी उभे केले. आपले काय केले जाणार याची यत्किंचितही कल्पना नसताना ट्रक बर्‍यापैकी स्लो करून ड्रायव्हर आणि क्लीनर दोघांनाही धक्के दिले गेले.. ते दोघेही रस्त्यात पडले आणि निपचीत पडल्यासारखे झाले...

पुन्हा नसीम बेभान झाला.. बाबूचे डोके कसे चालते याचा आकाशला पुन्हा अनुभव आला.. आता त्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी व्हॅन्स स्लो होणारच होत्या. त्यांच्याकडून माहिती मिळाली तर मिळाली. आता तर सरळ लढाईच चालू झालेली होती. जगायचे कुणालाच नव्हते. मरायचेच होते! पण तत्पुर्वी निर्मल जैनला खलास करायचे होते.

बारीक बारीक वाड्या, वस्ते, फाटे मागे टाकत ट्रक तुफान चाललेला होता. नक्किच मगाशी मुल्लाने होल्ड अप केलेल्या व्हॅनमधील पोलिसांचा माग इतर पोलिसांना लागलेला होता आणि सगळीच माहिती मिळालेली दिसत होती. म्हणूनच या रस्त्यावर एवढा बंदोबस्त केला गेलेला असणार हे सगळ्यांनाच समजत होते. प्रश्न इतकाच होता की हे निर्मल जैनलाही समजले तर तो आणखीन कुठे पळून जातोय की काय??

मुळशी!

समोर 'वाय' आकाराचे रस्ते होते. उजवीकडे जायचे हे नसीमला माहीत होते. इतक्या वेगाने आजवर एकही ट्रक त्या रस्त्याला लागलेला नसावा. तेवढ्यात समोरून भाजी नेणारी बैलगाडी दिसली. तिला वाचवायचे की उडवायचे हा घोळ संपत नव्हता नसीमच्या मनातला! पण त्या अवाढव्य ट्रकचा आवेष पाहून ती बैलगाडीच क्षणार्धात बाजूला घुसली झाडीत! रस्ता मोकळा!

मात्र हा घाट काहिच्या काहीच होता. यु टर्न, हेअर पीन टर्न आणि तेही तीव्र चढ असलेले!

ट्रक स्लो झाला. खूपच स्लो झाला. शेवटचा चढ चढताना ते दिसले! त्याच 'वाय' आकारापाशी आता झगमगाट होता. व्हॅन्स!

निर्मल जैनला मारायला बहुतेक वेळही मिळणार नव्हता. बाबू त्याही परिस्थितीत विद्युतवेगाने विचार करत होता.

आणि संधी मिळाली.

"पेड गिरा... पेड गिरा...."

बाबूने केलेला आकांत समजायला नसीमला एक सेकंदही खूप झाला होता... त्याने एका लहानश्या पण मजबूत झाडाच्या पुढे गेल्यावर ट्रक थांबवला... आतले सगळे केबीनच्या बाजूकडे सरकले.. रिव्हर्स गिअरमध्ये ट्रकच्या मोजून तीन धडका झाडाला बसल्या... पण नेमके झाड उलट्याच बाजूला पडले... काहीच उपयोग झाला नव्हता... रस्ता मोकळाच राहिला होता... उल ट्रकचेच भयंकर नुकसान झाले होते...

नसीमला गांभीर्य जाणवले... प्रत्येकाचाच चेहरा खर्रकन उतरलेला होता.. काही कळायच्या आत नसीमने ट्रक सुसाट सोडला...

आत्ता जिथे मल्हार माची आहे त्या मल्हार माचीला जाणार्‍या पायवातेवर ते घर होते.. दुर्लक्षित असे.. बाहेरून पडके वगैरेच वाटावे... आतमध्ये मात्र सुविधा पाहण्यासारख्या होत्या.. आणि मुख्य म्हणजे..

दोन हवालदार त्या घराच्या बाहेर उभे होते... ते चरकलेच.. ट्रक असा येताना पाहून.. एकदम अ‍ॅलर्ट झाले.. बहुधा त्यांना इन्फर्मेशनच मिळाली नसावी की असा असा एक ट्रक येतोय..

या दोघांना माहिती कशी काय नाही हेच बाबूला समजेना! त्याच्या दृष्टीने त्या दोघांच्या ऐवजी तिथे खरे तर दहा बारा हवालदार असायला हवे होते.. उतरायचे, कसेतरी आत पोचायचे, जैनवर गोळी झाडायची.. आणि पाठोपाठ स्वतःवरही.. असा बाबूचा विचार होता... पण इथे तिसराच प्रकार?? कुणी नाहीच दोघांशिवाय??

तेवढ्यात आणखीन दोन टाळकी दिसली! एक चेहरा तर बाबूला लगेचच ओळखू आला.. लाला..

लाला आणि खोपडी असणार हे दोघे!

बाबूचा चेहरा संतप्त झाला. मागच्या व्हॅन्सचा आवाज आणखीन जवळ आला होता. उगाचच झाड पाडण्यात वेळ गेला होता.

नसीम! नसीम म्हणजे भूतच होते एक!

त्याने काय करावे?

त्या कच्च्या वाटेवर त्याच वेगाने घातलेला ट्रक त्याने त्याच वेगाने त्या घरावरही नेला.. वेळ कुणाला होता पार्किंग वगैरे करायला???

हवालदार ** फाटल्यासारखे आजूबाजूला धावले... दारात उभे असलेले लाला आणि खोपडी हालूही शकले नाहीत...

एक भिंत खाली!

अर्धवट पडलेल्या भिंतीच्या मागे हादरलेले लाला आणि खोपडी उभे होते.. आणि त्यांच्या मागे...

.. निर्मल जैन!

हवालदारांना 'आपण धावून या कैद्यांना अटक करायला हवी' हे सुचायच्या आतच वाघने आणि मुल्लाने दोघांना तुडवून काढले.. सरिता दचकून ट्रकमध्येच बसली होती.. नसीमचा पाय जबरी दुखावला गेला होता त्या धडकेमुळे! पण त्याने तेवढ्यात ट्रक झाडीत घुसवला आणि लाईट्स बंद केले...

बाबूने पहिल्यांदा लालाकडे धाव घेतली... जागच्याजागी मुतावे असे भाव असलेला लाला बाबूचा तो आवेश पाहून मटकन खालीच बसला.. खस्स....

उल्टा खोपडीची किंकाळी गगन भेदून गेली... पण ती किंकाळी त्याला झालेल्या वेदनांमुळे फुटलेली नव्हती... आजवर ज्या लालाची साथ दिली त्याची आतडी बाहेर आल्यावर कशी दिसतात हे समजल्यामुळे आलेली किंकाळी होती ती!

इकडे एक विचित्रच प्रकार घडला..

तीन व्हॅन्स तुफान वेगात रस्त्यावरून जाताना दिसल्या... मूर्ख पोलिसांनी त्या इकडे वळवल्याच नाहीत.. त्यांना निर्मल जैनवर हल्ला होईल याची कल्पना नव्हती की काय हेच समजेना.. त्या सरळ निघून गेल्या... ट्रकही लपलेलाच होता.. व्हॅन्स निघून गेलेल्या पाहून मात्र हवालदारांनी सेल फोन्स काढले.. ते मुल्लाने हातात घेतले... हवालदारांवर वाघने रिव्हॉल्व्हर रोखलेले होते..

मिनीला छेडण्याची भयानक शिक्षा लालाला मिळालेली होती... निर्मल जैन ते दृष्य पाहूनच जागच्या जागी ओकला.. सरिता बेशुद्ध पडलेली होती..

हवालदार चूपचाप ते खूनसत्र पाहायला तयार झालेले होते... नसीमने तोवर उल्टा खोपडीवर मागून वार केलेले होते.. हे कोणतेही धर्मयुद्ध नव्हते.. येथे फक्त सूड होता.. तोही बाबू आणि आकाशचा असला तरीही सर्वांनी स्वतचा समजलेला होता...

आणि आता... आता निर्मल जैनला मुल्ला आणि नसीमने धरलेले होते... आकाशने सरिताला शुद्धीवर आणले होते...

निर्मल जैन!

बाबूचा पहिला सूड काही तासांपुर्वीच घेऊन झाला होता... नवलेचा..

नसीमला पठाणचा सूड घेता आलाच नव्हता... बाबूला इसापचाही सुड घेता आला नव्हता...

पण आकाश, सरिता, मिनी आणि बाबू या चौघांना जो महत्वाचा सूड घ्यायचा होता... तो मात्र आता घेता येणार होता...

बाबूची जबरदस्त मूठ जैनच्या नाकावर बसली तसे त्याने डोके गुडघ्यात घातले... बर्‍याच वेळाने वर पाहिले तेव्हा रक्ताच्या धारेने त्याचे कपडे भिजलेले होते.. पुढचीच मूठ हनुवटीवर बसली... तीन दात रक्त आणि थुंकी यांच्या मिश्रणासहीत जमीनीवर येऊन पडले.. तोवर जैनच्या पोटात वाघचीही लाथ बसली...

बाबूने वाघला थांबवले... आकाशला पुढे येऊन वार करायला सांगितला..

आकाश! आकाश आणि सरिता! मध्यमवर्गीय घरातील बहिण, भाऊ! आयुष्यात कुणावर साधा हातही उगारलेला नाही.

नाही फटका देता आला आकाशला! खूप ताकदीने बुक्की मारण्यासाठी मागे खेचून धरलेला हात आकाशने लुळावत खाली आणला... साधी शिवीही देता आली नाही त्याला... आधीच डोळ्यासमोर लाला आणि खोपडीचे मर्डर पाहून तो आणि सरिता बोलू शकण्याच्या पलीकडे पोचलेलेच होते..

बाबूने खण्णकन आकाशच्या कानाखाली वाजवली....

"*****... बापाचा अन बहिणीचा सूड घेता येत नाही तर पळतो कशाला??? वाघ... यालाही खलास करायचाय.... "

आकाश भेसूर रडायला लागला.. ते पाहून सरिता तर पुन्हा बेशुद्धच पडायला आली.. तिला कसेबसे सावरत नसीमने एके ठिकाणी बसवले आणि तोंडावर पाणी मारले...

वाघ अजूनही हवालदारांवर रिव्हॉल्व्हर रोखूनच उभा होता.. बाबूने आकाशला परत एक लगावली.. तसा मात्र आकाश उठला.. जवळ पडलेली एका हवालदाराची केन हातात घेऊन त्याने निर्मल जैनच्या टाळक्यात एक प्रहार केला.. अत्यंत शक्तिशाली प्रहार...

शुद्ध हरपली जैनची!

अर्थातच, तसे होणारच!

पण त्याला शुद्धीवर आणले मुल्ला आणि नसीमने!

आणि मग बाबू म्हणाला..

"तेरे लिये सात मर्डर किये थे... आठवा भी करदिया... नवले का.. नौव्वा इस लाला का.. अब दसवा तेरा है.. देख... खुद देख... दुसरोंका मर्डर करनेको बोलता है और फिर जेल भेजता है ना?? खुद देख... खुद मरते हुवे कैसा लगता है... स्साले.. *********** ... मेरी मिनी.. मेरी मिनी तेरे वास्ते जेलमे गयी... मर भोसडीके.. "

बाबूने मुल्लाकडच्या आठ इंची पात्याने, ज्यावर अजून लालाचे रक्त ओलेच होते.. निर्मल जैनच्या पोटात वार केला.. सरिता जागच्याजागी आडवी झाली... आकाश डोळे फाडून तो प्रकार बघतच राहिला...

निर्मल जैन लुढकला होता.. त्याच्या तोंडातून साधा आवाजही आलेला नव्हता..

त्याच्या लुढकलेल्या प्रेतासमोर गुडघ्यांवर कोसळत बाबू आक्रोशू लागला...

मिनीच्या नावाने...

सगळेच संपलेले होते.... दोन्ही हवालदार डोळे फाडून त्या दृष्याकडे बघत वाघला दम भरत होते की आम्हाला मारलेस तरी तू अडकणारच आहेस.. जिगरबाज होते दोघे...

तेवढ्यात मुल्ला बाबूला थोपटत म्हणाला..

"बाबू.. अब आखरी काम करना है सबको....."

बाबूने भकास नजरेने मुल्लाकडे आणि नंतर वाघकडे पाहिले... वाघचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता... नसीम तर रडायलाच लागला.. सरिता काही वेळाने पुन्हा भानावर आलेली होती...

बाबूने तेच पाते पुन्हा हातात धरले... आकाशला हे काहीच समजत नव्हते...

"यारो... मेरा साथ देनेके लिये शुक्रिया.. अगले जनममे फिर मिलेंगे... मेरी मिनी... ओ साहब.. मेरी मिनीआपको मिले तो इतना कहदेना.. के उसने बहुत कुछ किया मेरे लिये.. मै कुछ कर नही सका.. लेकिन.. लेकिन अगले जनममे मै उसके कदमोंपर अपनी जान रखदुंगा साहब.. इतना बोलदेना उसको..."

वाक्य संपतानाच.. कुणालाही काहीही समजायच्या आत बाबूने गर्रकन मागे वळून नसीमच्या पोटात पाते खुपसले.. .. ते पाते ओढून काढायला लागला तितकाच वेळ लागला.. आकाश आयुष्यात इतका कधी हादरलेला नव्हता... तोवर वाघने आयुष्यात पहिल्यांदा रिव्हॉल्व्हर चालवले... मुल्लाच्या पाठीतून घुसलेली गोळी छातीतून बाहेर आली होती... आकाशला लक्षात आले की हे काय होते आहे.. मरणाची भीती त्याच्या डोळ्यांत साकळली.. ग्लानीत असलेल्या सरिताच्या अंगावर तो झेपावणार इतक्यात त्याला दिसले.. मुल्लाला खलास करणार्‍या वाघच्या पोटात तेच पाते घुसले होते.... त्या पात्याने लाला, जैन किंवा नसीम जरी किंचाळलेले नसले तरी वाघ मात्र खच्चून ओरडला.. त्याच्या हातातले रिव्हॉल्व्हर सैल होते आहे हे लक्षात येताच हवालदार धावणार तेवढ्यात बाबूने फरशीवर कोसळून ते रिव्हॉल्व्हर झेलले आणि....

... सण्ण!

आकाशला ऐकू आलेला त्याच्या आयुष्यातील तो शेवटचा आवाज... ती शेवटची जाणीव... डोके फुटले आहे.. असह्य वेदनांचा एक डोंब उसळला आहे... दॅट्स ऑल...

खालीच पडलेल्या बाबूने मिनीसाठी आणखीन एकदाच अश्रू काढून रिव्हॉल्व्हर कानांवर ठेवले.. स्वतःच्या!

द व्हेरी नेक्स्ट मोमेन्ट...... ऑल ऑफ देम वेअर इन...

'द वर्ल्ड ऑफ डिफरन्स'

गुलमोहर: 

मला सगळे भाग कुठे मीळतिल?

बेफिकीर कुठे गेले? भुक्कडचे पुढे काय झाले?

sir... mi ya kadambari che suruwati che kahi bhag vachle aahet. nantar ata ha direct shewat cha bhag disat aahe. mala sagle bhag ekatra kuthe vachayla miltil. krupaya kuni tari sanga.