दगडफूल - एक अनोखे सहजीवन

Submitted by दिनेश. on 6 March, 2011 - 13:02

आपल्याला शाळेत जीवशास्त्रात कधीतरी दगडफूलाबद्दल एक दोन ओळी वाचलेल्या
आठवत असतील. दगडफूल म्हणजे खरे तर बुरशी आणि शैवाल, काळी बाजू
असते ती शैवालाची आणि पांढरी बुरशीची

आपण ते कौतूकाने येऊन आईला सांगितलेलं ही असतं. आईने, हो क्का असे
म्हणत, आपले म्हणणे कानाआड केलेले असते. आपण त्या वर्षी, एक दोन
मार्कासाठी ते लक्षातही ठेवलेले असते.

मग मात्र आपण ते विसरुन गेलेलो असतो.

मग कधीतरी एखाद्या डोंगरावर ते आपल्याला दिसलेलेही असते. आपण ते उचलून
हातात घेतलेले असते, चुरडून वास घेतलेला असतो, आणि मग भिरकावून दिलेले
असते.

मग कधीतरी आईच्या मसाल्यात ते बघितलेले असते, बस. इतकेच.
पण दगडफूलाची कहाणी इतकी साधी सोपी नाही. ही कहांणी आहे. अतूट बंधनाची.
सहजीवनाची. युगायुगांच्या सहजीवनाची. कशी ती बघूया. (खरं तर हि कहाणी खूपच
गुंतागुंतीची आहे, मी शक्य तितक्या सोप्या शब्दांत मांडायचा प्रयत्न करतो.)

वरच्या फोटोत दिसतय ते दगडफूल आपल्या पारंपारिक मसाल्याचा एक घटक
आहे. मला खात्री आहे कि तूमच्यापैकी अनेकजणांना हे माहित नसणार. अगदी
तूम्ही कूकिंगमधे रस घेणारे असाल, तरी मुद्दामहून कधी हा मसाला आणला
असाल, याची शक्यता कमीच आहे. इथेच काय पण नेटवर आणि इतरत्र
लिहिल्या जाणार्‍या पाककृतिमधे, हा घटक क्वचितच दिसतो.

तसाही हा मसाला इतर मसाल्यांसारखा फ़ोडणीत वगैरे वापरत नाहीत. जो
टिकाऊ मसाला करतात, त्यात हा वापरतात. याला एक खमंग मसालेदार वास
येतो. आणि हा मसाला तेलात परतला कि आणखी खमंग वास सूटतो.

(आणि या अशा अनास्थेमूळेच, भारतात हा मसाला कुठे तयार होतो, त्याचे
उत्पादन किती आहे, कुठल्या राज्यात तो वापरला जातो, याबद्दल मला काही
माहिती मिळाली नाही. जर तूमच्यापैकी कुणाकडे ही माहिती असेल, तर
अवश्य कळवा.)

तर आता आपण अगदी सुरवातीपासून सुरवात करु या. पृथ्वीवर जीवसृष्टी
नेमकी कशी निर्माण झाली, याबाबत अनेक प्रमेये मांडलेली आहेत. पण
एवढे मात्र खरे, कि पहिला एकपेशीय जीव, हा समुद्राच्या पाण्यात निर्माण
झाला असावा.

अशी एक पेशी, कि जिच्यात काही गूणसूत्रे होती आणि जी आपल्यासारखीच
दुसरी पेशी निर्माण करु शकत होती. म्हणजेच पुनरुत्पादन करु शकत होती.
असे पेशीविभाजनाने होणारे पुनरुत्पादन आजही चालूच असते, आणि ते
आपल्याला अनुभवताही येते (उदा, दूधाला विरजण लावल्यावर त्याचे
दही होते.)

या पेशींमधेच दोन तट पडले. त्यापैकी एका गटाने, एका खास द्रव्याच्या
सहाय्याने स्वत:चे अन्न स्वत:च सुरु करायला सुरवात केली.

ते द्रव्य म्हणजे हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल (मराठी नावात जरी
हरित असा शब्द असला तरी ते इतर रंगाचेही असू शकते ) आणि ती
प्रक्रिया म्हणजे, प्रकाशसंश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस.

हि प्रक्रिया आजही अव्याहत सुरु असते. यासाठी त्या पेशींना पाणी,
प्रकाश, कार्बन डाय ऑक्साईड आणि काहि मूलद्रव्ये यांची गरज असते.
सूर्यापासून मिळणारी उर्जा वापरुन, या पेशी या घटकांपासून काही
पिष्टमय पदार्थ आणि शर्करा तयार करतात. हे पिष्टमय पदार्थ आणि
शर्करा वापरुन पुनरुत्पादन केले जाते, शिवाय झालेली पडझड दुरुस्त
करुन, नवीन बांधणीही केली जाते. या पेशी आजच्या वनस्पतिंच्या
पूर्वज होत्या. आज वनस्पतिंच्या रुपाने आपण जरि त्यांचे विकसित
रुप बघत असलो, तरी त्या मूळ पेशी आजही अस्तित्वात आहेत.

त्यापैकी काहिंना आपण ब्ल्यूग्रीन अल्गी असा शब्द वापरतो. मला
वाटते मराठीत शैवाल (शेवाळं नाही, ते वेगळे ) असा शब्द आहे.

आजही हि अल्गी जलाशयात असतेच. ज्यावेळी हि अल्गी पाण्यात
विकसित झाली, साधारणपणे त्याच काळात जमिनीवर बुरशी आपले
हातपाय रोवायचा प्रयत्न करत होती.

आपण असे समजत होतो, कि बुरशी म्हणजे हरितद्रव्य नसलेली
वनस्पति, आणि तसेही तिला वनस्पतिशास्त्राच्या कक्षेत धरतात.
पण ही चूक आता लक्षात आलीय. तिच्यात हरितद्रव्य नसते हे खरेच
आहे, पण तिचे बाह्यावरण ज्या Chitin घटकापासून बनलेले असते त्याच

घटकांपासून किटकांची कवचे, प्राण्यांची शिंगे, नखे आणि केस
बनलेले असतात. पण या कारणासाठी, तिची गणना प्राण्यातही करता
येत नाही. बुरशीची पुनरुत्पादनाची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे.
म्हणून तिचा एक वेगळाच असा गट मानण्यात येऊ लागला आहे.
तर या दोघांच्या प्रेमकाहाणीची सुरवात कशी झाली असेल ?

जिथे सागरा धरणी मिळते,
तिथे तूझी मी वाट पहाते..

हो अगदी अशीच. शैवालांपैकी काही पेशी समुद्रकिनार्‍यावर वहात आल्या.
आणि तिथे ओलसर रेतीवर त्यांनी आपला जम बसवायचा प्रयत्न केला.
रेतीवर अत्यंत पातळ असा थर असे त्यांचे स्वरुप होते, आणि तिथेच
त्यांची भेट बुरशीशी झाली. प्राथमिक बोलणी काय झाली असतील,
युगायुगांच्या सहजीवनाच्या आणाशपथा घेतल्या गेल्या असतील काय,
याची कल्पना नाही. पण त्या दोघांची त्या काळात जी मैत्री जमली,
ती आजतागायत टिकून आहे. जास्त नाहीत, उणीपुरी चाळीस कोटी
वर्षे झाली असतील.

जसे अल्गी सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्ननिर्मिती करतच होती, तसे काही
बुरशीला शक्य नव्हते, कारत तिच्याकडे मोलाचे हरितद्रव्य नव्हते. पण
आजच्याप्रमाणेच एक प्रकारचे आम्ल आपल्या "शरिरातून" सोडून बुरशी
आजूबाजूच्या खडक आणि मातीतील मूलद्रवे शोषून घेऊ शकत असे.
म्हणजे दोघांकडेही एकमेकांना देण्यासारखे काही होते.

आजतागायत वीस हजाराहून अधिक अशी मैत्रीची उदाहरणे सापडली आहेत.
त्यांची मैत्री इतकी अजोड आहे कि, मानवाला अठाराव्या शतकापर्यंत ते
दोन भिन्न "जीव" आहेत याची कल्पनाच नव्हती, त्यांचे शास्त्रीय नामांकनही
असे एकत्रच झाले होते. त्या सर्वांना Lichen लायकेन असा शब्द वापरला जातो.

प्रारंभी समुद्रकाठी किंवा इतर जलाशयाच्या काठी जन्माला आलेली हि मैत्री,
आज मात्र आलम दुनियेत फैलावली आहे. यात हिरवा, मोरपिशी, पिवळा,
केशरी, काळा असे अनेक रंगही दिसतात.

नूसते रंगच नव्हे, तर यात विविध आकारही दिसतात. काही प्रकारात तर
चक्क पानांचा भास होतो. काहि प्रकारात गवताचा भास होतो. असे गवत
काहि झाडांच्या फांद्यांवर तूम्ही बघितले असेलच.

या अशा धाग्यासारख्या रचनेत, बाहेरचे आवरण बुरशीच्या धाग्यांचे असते.
त्याने आतील ओलावा धरुन ठेवला जातो. त्याच्या आत शैवालाच्या पेशी
असतात. त्या तिथे अन्न निर्माण करतात, तसेच वरच्या थरामूळे त्यांचे
अतिनील किरणांपासून संरक्षण होते. त्याच्याही आत, आधार म्हणून
बुरशीचा एक धागा असतो, (बुरशी अशी धाग्या धाग्यानेच वाढत असते)
या धाग्यात पोषक द्रव्ये आणि पाणी साठवलेले असते.

अशी गुंतागुंतीची रचनाच या युतीला, जगात कुठेही तग धरायला लायक
बनवते. मी वर लिहिल्याप्रमाणे पाणी, प्रकाश, हवा आणि मूलद्रव्ये या
वनस्पतिंच्या मूख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही
अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथे दगडफूले
जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी बुरशी वा शैवाल तग धरु
शकणार नाही, अशा ठिकाणीहि, दगडफूले तग धरु शकतात.

अंटार्टिका वर भरपूर पाणी असले तरी ते गोठलेल्या स्वरुपात आहे. कुठलीही
वनस्पति ते शोषू शकत नाही. पण त्यापासून ३०० मैलाच्या परिसरात
दगडफूले आढळतात. हिमालयात १८००० फ़ूट उंचीवर ती तग धरु शकतात.
आर्टिक टुंड्रा परिसरात मात्र त्यांची वाढ जोमाने होते. तिथे त्यांची जी
गवतासारखी दिसणारी वाढ होते त्याला रेनडीयर मॉस असा शब्द आहे. आणि
अर्थातच रेनडियर प्राणी, हिवाळ्यात ते खाऊनच गुजराण करतात. हे मॉस
मानवानेही खाण्यायोग्य असते (मॅन व्हर्सेस वाईल्ड मधे, बेअर ग्रिलला हे
खाताना बघितले असेल) याचेच काही औषधी उपयोगही आहेत.

अतिशीत प्रदेशाबरोबरच अतिऊष्ण प्रदेशातही दगडफूले आढळतात. नामीबियाच्या
वाळवंटातही ती आढळतात. (या वाळवंटाचे चित्रीकरण उर्मिला मातोंडकरच्या, मस्त
या चित्रपटात आहे, तसेच ते जेनिफ़र लोपेझच्या, द सेल या चित्रपटातही आहे.)
या वाळवंटात वर्षभरात जेमतेम ४ इंच पाऊस पडतो. पण तिथे पहाटे समुद्रावरुन
जे वारे येतात, त्यात असणार्‍या बाष्पावर तिथली दगडफूले तग धरतात.

या दोन्ही परिसरात, जर पाणी अगदीच उपलब्ध झाले नाही, तर दोघेही तात्पुरती
समाधी घेतात, आणि सर्व चयापचय क्रिया स्थगित केल्या जातात. परत पाणी
उपलब्ध झाले कि त्यांची वाढ व्हायला सुरवात येते. या अशा परिस्थितीत, केवळ
एक चौरस सेमी वाढ व्हायला, दगडफूलाला ५० ते ६० वर्षे लागू शकतात.
काही दगडफूले हवेतील प्रदूषणाला तोंड देऊ शकत नाहीत आणि त्याची वाढ खुंटते,
म्हणजेच जर ती दगडफूले नीट वाढत असलीम तर हवेत प्रदूषण नाही, असे
समजता येते.

दगडफूले दगड निवडताना पण चोखंदळपणा दाखवतात. ज्या दगडांचा उपयोग, पक्षी
विसावा घेण्यासाठी करतात, त्या दगडांवर त्यांची खास मर्जी असते. पक्ष्यांच्या
विष्ठेतून मिळणारी, मूलद्रव्ये त्यांच्यासाठी फार महत्वाची असतात.

जरा जवळून बघू या.

या दोघांचे जरी सहजीवन चाललेले असले तरी, यात बुरशीचा वरचष्मा असतो. काही
अपवादात्मक परिस्थितीत एकवेळ शैवाल एकटे तग धरु शकेल, पण तसे करणे
बुरशीला शक्य नसते. त्यामूळे शैवालाला, बुरशीने ओलिस ठेवले आहे, असेच म्हणावे
लागेल. वेळप्रसंगी शैवालाच्या काही पेशींचा खातमाही, अन्न मिळवण्यासाठी बुरशी
करते.

इथे शैवालाच्या पेशीच्या आत बुरशीने चंचूप्रवेश केलेला असतो. पण तरीही त्यांचे
स्वतंत्र व्यक्तीमत्व मात्र जपलेले असते. त्यांच्यामधे "लग्न" असे लागलेले नसते.
यांचे पुनरुत्पादन कसे होते, ते बघणे पण मजेशीर आहे.

समजा बुरशीने आपली "बीजे" हवेत सोडली, तरी तिला तग धरण्यासाठी नवा शैवाली
पार्टनर शोधावाच लागेल. तसे पोषक परिस्थितीत, दोघेही स्वतंत्र वाढू शकतात, पण
एकत्र जगायचे असेल तर मात्र वेगळी व्यवस्था असते. यावेळी दोघांच्याही एकेक पेशी
प्रवासाला जोडीने निघतात, आणि योग्य ती जागा सापडल्यास परत सहयोगाने
वाढू शकतात.

म्हणजे अजूनतरी त्यांचे पुनरुत्पादन, त्यांच्या स्वतंत्र पद्धतीनेच होत आहे. पण त्यांची
दिसण्याबाबत इतर झांडाशी जी स्पर्धा आहे ती बघता, माझ्या मनात असे विचार
येतात, कि पुढे मागे, त्यांना फूले वगैरे येतील का ? म्हणजे खर्‍या अर्थाने त्यांचे
लग्न वगैरे लागून, पुनरुत्पादनाची एक वेगळी प्रणाली निर्माण होईल का ?
इतकी युगे त्यांचे लिव्ह इन चालू आहे, तर आपण त्यांना शुभेच्छा देऊ या.

नांदा सौख्यभरे.

==============================================

टिप : मी दगडफूले आणि लायकेन हे समानार्थी शब्द म्हणून इथे वापरले आहेत. अल्गी
म्हणजेच शैवालाला ओलिस ठेवण्याचे आणखीही काही प्रकार निसर्गात होतात. मला जर
त्यांचे फोटो मिळाले तर त्यांच्याबद्दल अवश्य लिहिन. तसेच दगडफूलांबद्दल आणखी
बरीच माहिती आता उपलब्ध आहे. यापासून काही रंग, औषधे तयार करतात. इतरही काही
दगडफूले खाण्यायोग्य असतात. या लेखाच्या मर्यादेत सगळ्याचा परामर्श घेणे शक्य नव्हते.
पण तूमच्या मनात यांबद्द्ल उत्सुकता निर्माण व्हावी या मर्यादीत हेतूनेच हे लेखन केले आहे.

गुलमोहर: 

दोस्तानो, तरी आपल्याला या निसर्गातली, फारच कोडी सुटलीत !

अल्पना, हि मोलाची माहिती. म्हणजे हे खास जातीचे दगडफूल, हि सह्याद्रीची खासियत आहे, असे म्हणायला वाव आहे. आता सगळ्या दूर्गभ्रमणवाल्यांनी / भटक्यांनी हे कुठे दिसते का ते बघायला पाहिजे.

दिनेशदा, तुमच्या हया अशाप्रकारच्या सगळ्या लेखांमधून मिळणारा आनंद काही औरच असतो... दगडफूलाचे सहजीवन अतिशय आवडले... Happy फोटो सुंदर, माहिती अद्वितिय आणि सांगण्याची पद्धत अतूलनिय... तुम्ही शिक्षक असला असतात तर कितीतरी विद्यार्थी वनस्पतीशास्त्राकडे वळले असते!!! Happy लेख माझ्याही निवडक दहात.

आज सावाकाशीने वाचला लेख! नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.
आपल्याकडे तसेच दक्षिणेत मसाल्यात दगडफूल वापरतात. याच बरोबर आयुर्वेदिक औषधातही वेगवेगळ्या जातीचे लायकेन वापरतात. प्रदूषण, हवामानातला बदल आणि माणसाची ओरबाडायची वृत्ती या मुळे लायकेनचा होणारा र्‍हास थांबवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

दिनेशदा माहीती पुर्ण लेख...! दगडफुल एकुन होतो, पाहीले ही होते पण तेच का माहीत नव्हते आज त्याचं सचित्र जन्मापासुनचं कळलं Happy

धन्यवाद

चातक >> आम्ही त्याला बाद्याफुल पण म्हणतो, ते तसेच खाउन पाहिले आहे का ?
मस्त स्वाद असतो त्याचा.

दिनेशदा, दगडफुला विषयी उत्तम माहिती. दगडफुला विषयी माहीती होतीच , पण एव्ह्ढी नाही :).

बाप रे .. हि सगळी माहिती ग्रेट.. अगदी कोपरापासून.. कर जिथे माझे जुळती.. Happy आरामात बसून वाचावं लागणार..
साबा हा मसाला कांद्याचं वाटण मसाल्याच्या भाजी साठी ( वांगे, पाट वडी) करतना टाकतात. ( कधी कधी) .. तो वास इतका असतो..कि दहा वेळा हात धुतला तरी जात नाही .. आणि भाजी पण इतकी तेलकट होते म्हणजे १०-१५ वर्षान नंतर जो हृदय विकार होणार असेल तो आत्ताच होईल असं वाटतं त्या भाजी कडे बघून.. पण जी चव येते ती आहाहाहा
.. त्यांना पण हे वाचायला देईल.. Sad ..

दिनेशदा, दगडफूल खान्देशात भरपूर वापरलं जातं... आम्ही ते कढीला फोडणीत घाल्तो, खुप छान वास लागतो कढीला आणि बाकी ते साठवणीच्या मसाल्यांमधेच वापरलं जातं... आणि अजून याचा वापर होतो तो खानदेशी शेव-भाजी चा मसाला बनवताना अगदी छोटासा तुकडा घेतात. मी अगदी भारतातून येताना भरपूर घेऊन येते, १०० ग्रॅममधे पण हे भरपूर मिळतं आणि फ्रिजमध्येही वर्षोन् वर्षे टिकतं...

दिपाली

हे फूल नाही, फळ आहे. याला चक्रीफूल म्हणतात. स्टार अनिस पण म्हणतात.>> छान नाव आहे दिनेशदा माहीतीसाठी आभारी.

टिल्लु, बघतो चव घेउन Happy

@चातक : चातक, हे बादेलफूल आहे. त्याला बाद्यान, बादयान असं देखील म्हणतात. याचा वास आणि चव थोडीशी बडीशेपीसारखी असते. इंग्रजीमध्ये अनिस्टार.
दिनेशदा,तुमचं लिखाण खासच असतं.हा लेखही पूर्वलौकिकाला साजेल असाच आहे.असंच लिहून मायबोली समृद्ध करा.(तुम्ही ती करता आहातच.)

छान माहिती. खुप चांगले समजावून सांगितले आहे

अमोल केळकर
--------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

दिनेशदा, माझी आई गरम मसाला साठवणीचा करुन ठेवते वर्षभराचा त्यात दगडफूल अचूक वापरते त्यामुळे साधारण माहिती होती पण तेवढ्यापुरतीच. अथ पासून इतिपर्यन्त तुमच्यामुळे कळले. अद्भुत दुनिया आहे दगडफूलाच्या इतिहासाची! तुमचे सगळेच लेख खूप आवडीने आमच्याकडे सगळेच वाचतो अन तुमच्या निसर्गवेडेपणाचा आनन्द घरबसल्या घेतो!

अमी

अतिशय सुरेख लिखाण आहे.

प्रदूषणाओळ्खण्यापासून ते औषधा पर्यंत या दगड फुला चे गुण आहेत.

आयुर्वेदामधे देखील या दगडफुलांचा उपयोग केला जातो. त्वचा रोगांवर यांचा प्रामुख्याने लाभ होतो.

याच्या इंग्रजी नावावरुन 'लिचेन' , लिचेन प्लेनस" नावाचा एक त्वचारोग नमूद केला आहे.

मात्र मानवाने अजूनही या नैसर्गिक देणगिचा योग्य वापर केला नाही.
प्रदूषण नियंत्रणा पासून ते कर्क रोग उपचारा पर्येन्त याचा वापर होउ शकतो.

बॉटनीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही अजब सुरस चमत्कारीक गोष्ट माहित आहे. टि वाय ला एक आख्खा चॅप्टर होता. आता अर्थात आठवतायत ३-४ च गोष्टी... Happy
सिम्बायोटिक रिलेशन ऑफ अल्गी अ‍ॅण्ड फंगाय, पोल्यूशन इंडिकेटर आणि त्यातले एक कॉम्बो दगदफूल म्हणून मसाल्यात वापरतात.

आमच्या कलेक्शन टूरमधे दोडाबेट्टाला अगदी तुरळक सापडली होती आम्हाला अर्थात ती मसाल्यात घालायची नव्हती.
लायकेन्स संदर्भाने बरेच सारे नियम, बंदी असंही काय काय असतं ते आमच्या सरांनी तेव्हा सांगितलं होतं. आता विसरलं. पण नामशेष (की नामःशेष) होणार्‍या जातींमधे लायकेन्स येतात.

ती तोडण्यावर/ काढण्यावर बंधनं आहेत त्यामुळे आणि त्याची लागवड अशी करता येत नाही. असंही आठवतंय.

नीधप, मला अभ्यासाला हे असतं, तर मी नसता एवढा रस घेतला.
ज्या विषयांची गोडी लागली, त्याचे पूर्ण श्रेय त्या त्या विषयांच्या शिक्षकांना !
सानी म्हणते तसं, जर कुणी असे रंजक करुन सांगितले असते, तर आवड निर्माण झाली असती.

दा अतिशय रंजक माहिती.सह्याद्रीत भटकताना कुठ दिसलं तर प्र.ची. नक्की घेणार. आभारी आहे Happy

दादाश्री, पावसाळ्यात काळ्या दगडावर हे निर्माण होते, पण वरचा रंग काळाच असल्याने दिसत नाही. पण जर एप्रिल मधे गेलात तर सुकुन पापुद्रे वेगळे झालेले दिसतील.
तूम्हाला कुठे झाडावर बोकडाच्या दाढीसारखे हिरवे गवत आढळले, तरी त्याचा फोटो घ्या.
माझ्या लेखात भारतातले फोटो देता येत नाहीत, त्याची रुखरुख असते मला.

दिनेशदा, खूपच छान लेख! हा पदार्थ मसाला करताना नेहमीच वापरला जातो. पण आता त्याच्याकडे नीट पाहु.

वाह! काय झकास लेख!!
>> एक दोन मार्कासाठी ते लक्षातही ठेवलेले असते.... मग मात्र आपण ते विसरुन गेलेलो असतो.
ह्म्म्म... हे वाक्य एकंदर सगळ्याच शालेय अभ्यासाला लागू आहे Sad
>> सिंबॉयसिस
हे मी कधिही विसरणार नाही... सरांनी विचारलेल्या या प्रश्णाचे उत्तर आमच्या मागच्या रांगेतल्या एकाही पोराला नव्हते आले... सरांनी अख्या वर्गासमोर मस्त स्तुती केली होती!
>> म्हणजे खर्‍या अर्थाने त्यांचे लग्न वगैरे लागून, पुनरुत्पादनाची एक वेगळी प्रणाली निर्माण होईल का ?
लिव्ह इन मधे त्यांचे एवढे सुरेख सुर जुळलेत... कशाला लग्न करुन रिस्क घ्या Happy

Pages