नॉस्टॅल्जिया.. गुलजार..!

Submitted by मी मुक्ता.. on 6 March, 2011 - 03:35

गुलजार.... नाव ऐकलं की आजही एक क्षण खूप मोठा प्रवास करुन येते मी.. काळजाचा ठोका चुकल्यासारखा वाटतो त्या सगळ्या क्षणांच्या आठवणींनी.. गुलजारविषयी हे असं नक्की कशामुळे वाटतं? "ए जिंदगी गले लगाले.." या त्यांच्या शब्दांचा आधार घेत अनेक कडवट क्षणांनंतर आयुष्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत राहिले म्हणुन? मनाच्या तळापासुन जीव पिळवटुन प्रेम करावसं वाटलं तेव्हाही त्यांचे अनेक अनेक शब्द मनात घुमत राहिले म्हणुन? "मुस्कुराऊ कभी तो लगता है, जैसे होठोंपे कर्ज रखा है.." या शब्दांचा शब्दश: प्रत्यय घेतला म्हणुन? की नंतर नंतर त्यांचे शब्द म्हणजे फक्त त्यांच्या-माझ्यातलाच संवाद आहे असं वाटायला लागलं म्हणुन..?
जेव्हापासून कवितेतलं काही विशेष कळत नव्हतं तेव्हापासुन गुलजारचे शब्द सोबतीला आहेत. याचं श्रेय जितकं त्या संगीतातील आर्ततेला आहे तितकंच ते गुलजारच्या शब्दांच्या नेमकेपणाला आहे. मला आपलं कायम असं वाटत रहातं की गुलजारकडे छान लयीत मुरवत घातलेल्या शब्दांची एक बरणी असली पाहिजे, त्यामुळे त्यांचे सगळेच शब्द कसे गाण्याच्या धून मध्ये विरघळुन जातात.
पुढे जेव्हा गुलजारचं रावीपार, त्रिवेणी वै वाचनात आलं तेव्हा त्याच्या अजुन बर्‍याचशा रुपांचा परिचय झाला. पण आजही गुलजार म्हटलं की, "दिल ढूंढता है फिर वोही" च आठवतं.. अतिशय नॉस्टॅल्जिक मूड मध्ये नेणारी ही रचना पण मला मात्र कायमच एक परफेक्ट रोमँटिक चित्र वाटत आलिये. "बर्फिली सर्दियोंमे, किसी भी पहाडसे, वादिमें गुंजती हुयी खामोशियां सुने" म्हटलं की आजही सर्रकन् काटा येतो अंगावर..
आणि मग वेळोवेळी भेटत गेलेला गुलजारचा चांद, त्याचे वेगवेगळे ऋतू.. मोरा गोर अंग लै ले पासुन सुरु झालेली ही जादू अजुनही, दिल तो बच्चा है जी म्हणतेच आहे.. बुलबूलोको अभी इंतजार करने दो म्हणतेच आहे. माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या क्षणांना गुलजारच्या शब्दांच्या सोबतीने अविस्मरणीय करुन ठेवलं आहे.
गुलजारकडून प्रेमाचे धडे गिरवता गिरवता मी गुलजारच्या प्रेमाच्याच प्रेमात पडत होते. गुलजारच्या शब्दांची वेडी होत होते. त्यांचे शब्द म्हणजे नशा नव्हते.. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर,"जादु है जो सर चढेगा, और जो उतरेगी शराब है" ती जादू होती.. ती जादू आहे.. आणि त्यामुळेच ती कधी कमी नाही होणार.. ती कायम तेवढीच गूढ रहाणार आहे.
गुलजार हे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सगळ्या उत्कट भावनांच्या क्षणांचे साथीदार आहेत. अजुनही ह्रूदयात एक अनामिक, उचंबळुन टाकणारी लाट उमटते गुलजारचं नाव ऐकलं की, त्यांना पाहिलं की.. आणि ते कायमच तसं रहाणार आहे. एका रंगीत, सुगंधी धुक्यात हरवलेली असते मी गुलजारच्या शब्दांसोबत असताना. फक्त मलाच कळु शकेल असं काहितरी, मलाच दिसु शकेल असं काहितरी ते लिहितायेत असं वाटतं मला. "जिना तो सिखा है मरके, मरना सिखादो तुम" हे मागणं मागायला शिकवलं पण गुलजारने आणि पुरवलं पण गुलजारने..
"शायद किसी नदियापर चलता हुवा तू मिले" मधल्या अल्लड वयातल्या भावनांपासून "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही" पर्यंतचा प्रेमाचा प्रवास गुलजारच्या कल्पनाविलासांवर/ त्यांच्या शब्दांवरच तर चालत आलाय. आणि मग 'त्या' वयातुन बाहेर आल्यावर गुलजारच्या बाकीच्या रुपांचा शोध सुरु झाला. तसं त्यांच्या, "तुझसे नाराज नही जिंदगी.." किंवा "ए जिंदगी गले लगा ले"ची जादु नव्हती असं नाही. पण "आदतन जिये जाते है, जिये जाते है.. ये आदते भी अजीब होती है" किंवा "फिर ना मांगेगे जिंदगी यारब तुझसे, ये गुनाह हमने एक बार कर लिया" हे म्हणणारा गुलजार जेव्हा भेटला तेव्हापासुन तर आता कोणतीच भावना गुलजारशिवाय पुर्ण होत नाही. "दर्द ने कभी लोरिया सुनायी तो, दर्द ने कभी नींदसे जगाया रे" या ओळी ऐकुन त्यांच्या प्रेमात अधिकाधिक रुतत जाण्यापासून नाही रोखू शकले मी स्वतःला. तशी इच्छा पण नाहीये म्हणा.. मी गुलजारचं प्रेम पाहिलं आणि मग प्रेम जगले. मी माझं आयुष्य जगले आणि मग गुलजारची कविता पाहिली. अगदी अगदी माझ्यासाठीच असलेली. माझ्या आयुष्यातले अनेक क्षण गुलजारच्या शब्दांचे ऋणी आहेत.
त्यांच्या शब्दांचं शहारुन येणं असं आहे की लाजाळुनेही चकित व्हावं.. उत्कटता अशी की, क्षणभर पतंगाला प्रश्न पडावा.. औदासिन्य असं की शिशिर पण फिका वाटावा.. आणि दु:ख असं की अग्नि सुसह्य भासावा..
"तेरी इक हंसीके बदले, मेरी ये जमीन ले ले.. मेरा आसमान ले ले" ही म्हणजे अगदी "कुबेर होवुन तुझ्यात यावे, होवुन जावे पुरे भिकारी" च्या पण पुढची पायरी आहे. कारण कुबेराच्या त्या लुटून जाण्याला पण अट आहे तुझा बधीर ओठ गिळण्याची, पण इथे मात्र एका हास्याच्या बदल्यातच सगळा सौदा आहे.
गुलजारच्या काव्यातील प्रेमाला भारावुन सुरु झालेला हा प्रवास कधी आयुष्याच्या सगळ्या अंगप्रत्यंगाचा भाग बनुन गेला तो क्षण आठवणं अशक्य आहे. गुलजारचे अनेक कल्पनाविलास, अनेक रुपकं अशी आहेत की ज्यांच्यावर बोलावं तितकं थोडंच वाटेल. अशा किती किती कल्पना सांगाव्या? नुसता गुलजारचा चंद्र म्हटला तरी डोळ्यास्मोर उभी रहाणारी त्याची अनंत रुपं, "चांद की भी आहट ना हो बादल के पीछे चले" मधला उत्कटतेच्या चरम सीमेवर आलेला चंद्र असो किंवा "रात को खिडकीसे चोरी चोरी नंगे पॉव" येणारा खट्याळ चंद्र असो किंवा "नीली नदी के परे गीला स चांद खिल गया" मधला शांत, धीरगंभीर तरी अधीरसा वाटणारा चंद्र असो किंवा"चांद निगल गयी दैया रे, अंग पे ऐसे छाले पडे" मधला आग लावणारा, वणवा भडकवणारा चंद्र असो किंवा "उस रात नही फिर घर जाता वो चांद यही सो जाता है" मधला तारे जमीनपर बघुन मोहरलेला चंद्र असो "तेरे बिना चांदका सोणा खोटा रे.." मधला त्याच्याशिवाय निष्प्रभ वाटणारा चंद्र असो.. त्यांच्या कवितांत डोकावुन जाणारा "लॉनके सुखे पत्ते सा चांद" असो किंवा "एक चांदकी कश्ती मे चल पार उतरना है" म्हणत रात्रीचा नावाडी झालेला चंद्र.. तर सगळ्यात पहिला, "बदरी हटाके चंदा, चुपकेसे झांके चंदा" मधला एका अधीर प्रेयसीची बोलणी खाणारा चंद्र.. आणि या चंद्रासोबत आलेली लसलसणारी वेदना.. "ओ मोरे चंद्रमा, तेरी चांदनी अंग जलाये
तेरी उंची है अटारी, मैने पंख लिये कटवाये.."
काय बोलावं? शब्द खुंटतात माझे तरी.. गुलजारनी सिनेमामधल्या प्रसंगाला अनुसरुनच गाणी लिहिली पण ते लिहिताना त्या भावनेच्या इतक्या गाभ्यापर्यंत गेले की ती गाणी त्या प्रसंगापेक्षाही खूप जास्त बनून गेली. जसं की,"एक छोटा लम्हा है जो खत्म नही होता, मै लाख जलाता हू ये भस्म नही होता"मधला प्रत्येकाच्याच आयुष्यात नक्की असणारा असा एक क्षण किंवा "उम्र लगी कहते हुये, दो लब्ज थे इक बात थी" मधली प्रत्येकाच्याच आयुष्यात नक्की असणारी अशी एक गोष्ट..
त्यांच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक मात्रेत, प्रत्येक रिकाम्या जागेत जी नजाकत आहे ती अगदी रेशमाच्या लडीसारखी आपली आपल्यालाच उलगडावी लागते. गुलजारच्या भाषेत बोलायचं तर अगदी "एकही लट सुलझानेमें सारी रात गुजारी.." मधल्या सारखं.. त्या रंगीत धुक्यात आपणच हरवुन जाता जाता नविन काहीतरी शोधायचं असतं.. त्यांच्या त्या अनंत कल्पना आणि प्रत्येक कल्पनेची अनंत रुपं.. एखादी "खत मे लिपटी रात.." एखादी, "फिर वोही रात है" मधली "रातभर ख्वाब मे देखा करेंगे तुम्हे" म्हणत स्वप्नांची खात्री देणारी रात.. एखादी, सीली सीली जलनेवाली बिरहाकी रात तर कुठे, नैना धुंवा धुंवा करणारी धीरे धीरे जलनेवाली रैना
त्यांची ही उत्कट लेखणी हलकीफुलकी होते तेव्हा पण सहज म्हणुन जाते, "चांदका टिका मथ्थे लगाके रात दिन तारोंमे जिना विना इझी नही" किंवा "चांद से होकर सडक जाती है उसिसे आगे जाके अपना मकान होगा...", "जो सरमे सोच आयेगी, तो पॉवमे मोच आयेगी" अशी मजा करता करता हळुन कुठे सांगुनही जाते, "दुनियासे भागे दुनियामें.. दुनियाको हुयी हैरानी.."
ह्म्म.. गुलजारची भाव व्यक्त करायची पद्धत पण त्या भावनांइतकीच अनवट. त्यामुळे या इतक्या मोठ्या आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वेळी त्या शब्दांचा, रुपकांचा एक वेगळाच अर्थ लागतो. आणि तो इतका परफेक्ट असतो की प्रत्येक वेळी "युरेका....." म्हणुन ओरडावसं वाटतं. मला आवडणारी गुलजारची गाणी तीच आहेत. त्यात भर पडतेय पण जुनी अजुनही तितकीच प्रिय. पण मी जशी मोठी होत चाललेय तसे त्या शब्दांचे निराळेच अर्थ उमजू लागलेत मला. आणि गुलजारच असं हे उलगडत जाणं मला फार फार फार प्रिय आहे.......

गुलजारसाठी...

न जाने किस दिन ये सफर शुरु किया था मैने..
न जाने कबसे आपके लफ्ज मेरी सांस बन गये..

न जाने कबसे,
अक्सर बुझती हुयी रातो मे मिला किया है
आपका चांद पहाडोंके परे..
बादलोकी सिलवटोंमे आपके खयाल ढुंढता हुवा..
हमेशा बेच जाता है मुझे सपने
चंद आसुंओके बदले..
(सुना है चांदनी नाराज रहती है उससे आज कल..
कह रही थी,
आपके खयालोंमे आकर बडा मगरुर हो गया है..)

न जाने कब एक बार,
खुशबूका एक झोका जिंदगी लेके आया था...
कहां, गुलजारसे मिलकर आ रहा हु..
इससे पहलेकी इत्र बनाके रखती उसका
निकल गया देखतेही देखते
जिंदगी की तरह...

न जाने कबसे,
मेरी हमसफर बनी है आपकी कल्पनाये..
एक कोहरासा बना रहता है,
गुजरती हुं जिस किसी रास्तेसे..
छुनेकी कोशिश की थी एक बार,
तो पिघल गया..
गीली उंगलीयोपे डुबते हुये सुरज की किरने
चमकती रही बस्स...

न जाने कितनी बार,
आपकी कहांनिया लोरी सुनाती रही..
जब दिन खत्म हो जाता था कुछ पलोंमे,
और एक पल रातभर
इन्कार करता रहता था गुजरनेसे...

ह्म्म...
अब तो लगता है जैसे,
सदिया बीत गयी हो ये सफर शुरु किये..
पर ना जाने कबसे,
आपकी नज्मोंका सजदा करतीं आयी हुं
मै हर पल..
के कभी मेरी जिंदगीभी एक दिन,
आपकी कोई नज्म बन जाये...!
--------------------------------------------------------------------------------
खरतर लिहायला सुरुवात करण्याआधी गुलजारशी संबंधित माझ्या आठवणी लिहायचं ठरवलं होतं मी. पण मग लिहिता लिहिता स्वतःला विसरुनच गेले. गुलजार तेवढे राहिले शिल्लक.. Happy

http://merakuchhsaman.blogspot.com/

गुलमोहर: 

सुंदर लेख..
स्वतःचा प्रवास मांडला असला तरी तो केलेल्या कुणाशीही तितकाच जवळीक साधून जाणारा आहे... शेवटी हा प्रवास "दिलसे दिलतक" असाच आहे!
संदर्भांची रेलचेल असली तरी गाण्यांच्या ओळींमधून लेख प्रवाही झाला आहे...
बाकी "तुझसे नाराज नही जिंदगी" आणि "ए जिंदगी गले लगा ले" साठी मिलाओ हाथ! Happy some of my all time fav!!
मुक्ते, शेवटच्या ओळी तर खल्लास!! Happy

जियो!!
शुभेच्छा! Happy

क्या बात है ? मला तर चाची ४२० चा बहुदा निर्माता/दिग्दर्शक गुलजार म्हणुन जास्त लक्षात राहीले. दिल धुंडता है फिर वही हे गाण गुलजार पेक्षा भुपेंद्र च्या आवाजामुळे जास्त लक्षात राहिल होत.

सुंदर लेख !

सगळीच्या सगळी गाणी आवडतात ! अगदी " जंगल जंगल पता चला है । चड्डी पहनके फूल खिला है " हे पण !! Happy

आता गुलजारची गाणी आणि तुझ्या आठवणी येऊदेत ....

मला खात्री आहे मला त्या माझ्या वाटतिल Happy

आनंदयात्री,
इतक्या भरभरुन प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. Happy

अमित, शोभाजी, Anky No.1, हंसा..
Happy खूप खूप आभार...

नितीनचंद्र,
चाची ४२० तर आहेच पण त्यापेक्षाही मला इजाजत जास्त भावतो.. Happy आणि भुपेंद्र चा आवाज स्लो लयीच्या गाण्यात जास्त भारी आहे. मस्तच तेही.. Happy प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

मितान,
नक्की प्रयत्न करेन तेही लिहायचा लवकरच.. Happy

सुरेख!!!!! Happy

अतिशय नॉस्टॅल्जिक मूड मध्ये नेणारी ही रचना पण मला मात्र कायमच एक परफेक्ट रोमँटिक चित्र वाटत आलिये. "बर्फिली सर्दियोंमे, किसी भी पहाडसे, वादिमें गुंजती हुयी खामोशियां सुने" म्हटलं की आजही सर्रकन् काटा येतो अंगावर..>>>>>>अगदी, अगदी Happy

अजुन एक आवडतं गाणं "थोडीसी जमीं थोडा आसमाँ तिनको का बस इक आशियाँ" (चित्रपट: सितारा Happy )

धन्यवाद आगाऊ.. Happy
चांद की गठरी सर पे ले ली, आपने कैसी जहमत की है!!!... Happy

जिप्सी, Happy धन्यवाद..
गुलजारची अजून खूप आवडती गाणी राहिलीत लिहायची.. "हमने देखी है इन आंखोकी मेहकती खुशबू, हाथ से छुके इन्हे रिश्तो का इल्जाम ना दो.. प्यार को प्यारही रहने दो कोई नाम ना दो" या ओळी काय कमी काव्यमय आहेत? "इस मोडसे जाते है" पण तितकंच सुंदर.. "बचपन के चोली जैसे छोटे होने लगे दिन" हे रुपक किंवा, "तेरे इश्कमे कब दिन गया, कब शब गयी, मैने रखली सारी आहटे, कब आयी थी शब कब गयी" यासारखं वाक्य पण सुफियाना अंदाज मध्ये जी जादू करुन जातं त्याला तोड नाही.. Happy

मस्तच , सुरेख लेख.
गुलजार बस नाम ही काफी है.
सुबह सुबह एक ख्वाब के दस्तक पर दरवाजा खोला
देखा , सरहद के उस पारसे कुछ मेहमान आये है ..
अशा सगळ्याच कवीता मनात आहेत , आणी त्यांचा तो आवाज.
त्यांच्या कवीता त्यांच्याच आवाजात ऐकायला मस्त वाटते.

आभार.... Happy

नंद्या, पहिला लेख वाचला होता. दुसरा कसा काय राहिला इतके दिवस? मी स्वतः वेडी आहे ट्युलिपच्या शब्दांची. इतका सुंदर लेख वाचायला दिल्याबद्दल खूप खूप आभार.. Happy

गुलजार.. आणि तो आवडणार्‍या प्रत्येकालाच अपरिहार्यपणे भेटणारे, भिडणारे हे त्याचे मेटाफर्स.. कधी चंद्राचे.. कधी रस्त्यांचे आणि कधी ऋतूंचेही. साधेच पण नात्यांची क्लिष्ट गुंतागुंत सहज उलगडवून दाखवणारे.

अप्रतिम वाटलं वाचताना मुक्ता! सुंदर लिहिलं आहेस.

नंद्या तुझेही आभार. ते लेख पुन्हा वाचायला मिळाले म्हणून.

अरे हा लेख मी कसा नाही पाहिला? काय मस्त लिहिलयसं गं.... गुलजार हा शब्दच इतका गुलजार , अळवार आहे ना आणि माझा वीक पॉईंट खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप मस्त आणि तुझी कविता तर केवळ अप्रतिम Happy
असे शब्द केवळ प्रतिभेने येतात हे मला मान्य नाही त्यामागे अनुभवांची शिदोरी असली पाहिजे नक्कीच. पुढच्या लेखाची वाट पहात आहे. पुढचा लेख टाकलास की माझ्या विपुत त्याची लिंक दे प्लीज नाहितर उशिर होईल वाचायला Happy

वाह, गुलजारच्या रचना ऐकल्यानंतर केवळ नि:शब्द होऊन त्या अनुभवाव्यात तसे वाटले हा लेख वाचल्यावर. मला गुलजारचा अतिशय आवडणारा चित्रपट "अंगुर".
बाकी चित्रपटगीते आणि "मारासिम" सारखा एखादा अल्बम सोडला तर बाकी रचना फार वाचल्या नाहीयेत. पण त्यांच्याच शब्दात सांगायच तर फुरसत के रात दिन पुन्हा शोधून वाचायच्या / ऐकायच्या आहेत.

महेश.. Happy खरय.. माझाही खूप आवडता आहे अंगुर.. पण मौसमी साठी जास्त. She actually rocked it.!!! ह्म्म.. खरय पण.. फुरसतके रात दिन काढूनच गुलजांरला भेटलं पाहिजे.. Happy

धन्यवाद रसिका.. खूप खूप आभार.. Happy

खुप खुप मस्त मुक्ता! भारवल्या सारख झाल वाचुन तुझा लेख, कविता हि अप्रतिम ! मी हि गुलजार ची पंखा!

Pages