मधाळ

Submitted by जया एम on 4 March, 2011 - 05:58

तलम उन्हाचे वस्त्र रेशमी
कुठे सावली नक्षीदार
निळे-जांभळे मोर उमटले
सुवर्णपंखी तालेवार

सुबक कळ्यांचे ओठ मधाचे
ठिबकत काही नवलकथा
झेलून घेई मुकी पाकळी
थेंब सुखाचे टपटपता

कळी पाकळी देठ फुलाचा
खेळ चालतो गोडीचा
मोराच्या डोळ्यात उमटतो
धागा रेशीमओढीचा

ऊन गोड की मऊ सावली
वीण असावी मोरपिशी
मधाळ काठावरी झुकावी
भरात फांदी नाजुकशी...

गुलमोहर: 

छान Happy

इतकं गोड इतकं गोड की,
म्हणावं एकच----------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
शब्दं मधुरं भावं मधुरम् ।
गीतं मधुरं काव्यं मधुरम् ॥
--------------------------
--------------------------
इतकं गोड!
रामकुमार

मधाळ!

कस्ली लय आहे... शब्दलाघव...
जया... पुस्तक काढलय? नाही तर कधी काढणार?
चांगलं साहित्यं वाचायला मिळणं हा सर्व रसिकांचा हक्कं आहे आणि तो पुरवणं हे तुमच्या सारख्यांचं कर्तव्यं.

चांगलं साहित्यं वाचायला मिळणं हा सर्व रसिकांचा हक्कं आहे आणि तो पुरवणं हे तुमच्या सारख्यांचं कर्तव्यं.> +१

हा धागा वर काढत आहे..

>>>>तलम उन्हाचे वस्त्र रेशमी
कुठे सावली नक्षीदार
निळे-जांभळे मोर उमटले
सुवर्णपंखी तालेवार

आहाहा! ऊन-सावलीचा खेळ किती सुंदर व्यक्त केलेला आहे.