द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ११

Submitted by बेफ़िकीर on 3 March, 2011 - 06:07

हल्लकल्लोळ!

एकाच शब्दात त्या परिस्थितीचे वर्णन होऊ शकत होते.

मिनीने नवलेवर केलेली तक्रार तिच्यावरच उलटली होती. अर्थात, तेच होणार होते. कारण ज्या वेळेस ती जेलमध्ये आली आणि नवलेविरुद्ध तिने तक्रार केली त्याचवेळेस तिचा पती सजयबाबू आणि त्याच्या बरॅकमधील चार कैदी पळून गेले होते. त्यात एक कैदी तर फाशीचा कैदी होता. हा घटनाक्रम कुठल्याच मुर्खाने दुर्लक्षित ठेवला नसता. आजच कशी काय आली ही तक्रार करायला?

चार महिला पोलीस मिनीला एका खोलीत नेऊन प्रश्नांची सरबत्ती करून अक्षरशः हैराण करत होत्या. अर्थात, मिनीने खेळलेला डाव फारच घणाघाती होता. एकीकडे पाच कैदी पळून जाण्याचा धक्का अजून नीटसा समजलेलाही नाही तोवर जेलचा सर्वोच्च निवासी अधिकारी लैंगीक शोषणाच्या तक्रारीत आत?

येरवडा जेलची बेअब्रू होणार होती अख्या भारतात उद्या! पेपरवाले एकेका क्षणाची नोंद लिहून घेत होते. मालपुरे महाराष्ट्राच्या सीमेत पोचलाही होता.

मिनी, संजयबाबू आणि आकाश हा त्रिकोण गृहीत धरून बंडगार्डन चौकीने निर्मल जैनला केव्हाच इन्टिमेशन दिली होती की कैदी सुटलेले आहेत. ही माहिती निर्मल जैनला देण्याचे काहीच कारण नव्हते डिपार्टमेन्टला! पण निर्मल जैनचा पैसा त्यांना त्याच्याप्रती निष्ठावान बनवत होता.

पाचही कैद्यांचे राहते घर, कामाच्या जागा आणि त्यांचे इतर नातेवाईक, मित्र, ओळखीचे या सर्व ठिकाणी कडा पहारा केवळ दुसर्‍या तासाला बसलेला होता. सगळ्यांचे फोन्स टॅप होऊ लागले होते. सरिताही गायब आहे याचा अर्थ डिपार्टमेन्टला व्यवस्थित समजला होता.

स्वारगेट, शिवाजीनगर येथील बसस्टॅन्ड्स, शिवाजीनगर व पुणे स्टेशन येथील रेल्वे स्थानके या चारही ठिकाणी डोळ्यात तेल घालून अनेक अधिकारी नुसते थयाथया नाचत फिरत होते. शहरातून बाहेर जाणार्‍या प्रत्येक रस्त्यावर तीन तीन ठिकाणी गाड्यांचे चेकिंग सुरू झाले होते. एका वेळेस पाचच नाही तर एका वेळेस तीन किंवा अधिक माणसे जर एखाद्या खासगी वाहनात दिसली तर वाहन सरळ थांबवून चौकशी केली जात होती.

कारागृहापासून गुंजन सिनेमापर्यंत एकच रस्ता जात होता. तेथून मात्र दोन रस्ते आणि त्या दोन्ही रस्त्यांना पुढे अनेक रस्ते फुटत होते. त्या मार्गांवर सतत व्हॅन्स फिरत होत्या. मशीद, देऊळ आणि चर्च यातील एकही वास्तू चेकिंगमधून सुटत नव्हती. निर्मल जैनने तर रीतसर तक्रारच दाखल केली होती की काही माणसांपासून त्याला जीवाचा धोका असल्यासारखे वाटत आहे. ही तक्रार दाखल करून घेणे आणि त्यावर उपाय म्हणून दोन हवालदार तेथे पाठवणे ही कामेही डिपार्टमेन्टने प्रामाणिकपणे केलेली होती.

जेलचा कोपरा अन कोपरा सर्च लाइट्समध्ये उजळलेला होता. लाँड्रीच्या पाईपमधून सहा हवालदार सुसाट सुटले होते. प्रत्येकाच्या हातात भला मोठा टॉर्च, जवळ किमान एक शस्त्र आणि वरच्या खिशात मोबाईल फोन्स होते.

येरवडा, नगर रोड, स्टेशन, स्वारगेट आणि शिवाजीनगर या भागात एकट्या चालणार्‍या माणसालाही हटकले जात होते. उद्या सकाळी पेपरमध्ये या बेअब्रूची बातमी यायच्या ऐवजी 'पोलिसांच्या कर्तृत्वामुळे पाच जहाल कैदी पुन्हा सापडले' अशी बातमी येण्यासाठी डिपार्टमेन्ट जीवाचे रान करू लागले होते.

नवले मात्र आता आरामात होता. कारण 'मिनीने खोटी तक्रार दाखल केली आहे हे मान्य करा' हा त्याचा आग्रहही बंडगार्डनवाल्यांनी निर्मल जैनच्या पैशांखातर मान्य केला होता. नवलेवरची तक्रार फाडून टाकली तेव्हा नवलेने ज्या दृष्टीने मिनीकडे पाहिले होते ती नजर पाहून मिनी थरारली होती. हा माणूस आपल्याला खलास करणार असेच तिला वाटले होते.

गेले दोन तास मिनी महिला पोलिसांना एकच उत्तर देत होती.

'मला आजही नवलेसाहेबांनी बोलावले होते, पण आज काहीतरी गडबड झाली म्हणून मला आत घेतले नाही, तेवढ्यात समाजकार्य करणारे काही लोक तिथे आले, त्यांनी माझी चौकशी केली की मी कशी काय जेलच्या दारापाशी, खोदून खोदून विचारल्यावर मी रडत सत्य सांगितले आणि त्यांनी मला नवलेसाहेबांविरुद्ध तक्रार करायला लावली. नवले साहेबांनी खरोखरच मला हॅरॅस केलेले आहे. माझा नवरा कसा पळून गेला याबाबत मला काहीही माहीत नाही. मी त्याच्यासाठी दोन दिवसांपुर्वीच एक चिठ्ठीही नवलेसाहेबांकडे दिली होती. त्या चिठ्ठीत मी स्पष्टपणे लिहीले होते की जैनसाहेबांचे लोक मला छळतात. ती चिठ्ठी माझ्या पतीला मिळाली की नाही हे मला माहीत नाही. मात्र जेलमधील अनेक अधिकारी सांगू शकतील की त्या रात्री मी नवलेसाहेबांच्याच घरात होते. मला चौकशीसाठी ऑफीसमध्ये न्यायच्या ऐवजी क्वार्टरवर नेले होते. मी आजही त्यांनीच बोलावल्यावरून जेलमध्ये गेले होते. पण हा प्रकार झाला.'

आता मात्र महिला पोलिसांचे हात बोलू लागले होते. पहिलाच फटका मिनीच्या खांद्यावर बसला तशी तिला जाणीव झाली. आपण आता टिकणार नाही या चौकशीमध्ये! काही ना काही नाटक करायलाच हवे. पुढच्या एक दोन फटक्यांनतरच बेशुद्ध वगैरे पडायला हवे. एकदा अ‍ॅडमिट केले की मिटेल!

.............

इकडे निर्मल जैनने ताबडतोब लाला आणि उल्टाखोपडीला बोलावले होते.

लाला - क्या हुवा शेठ?

जैन - बाबू छूटगया

हादरून लाला निर्मल जैनकडे पाहातच बसला.

लाला - छूटगया???

जैन - मतलब भाग गया जेलसे...

लाला - ... कब????

जैन - थोडी देर पहिले..

खोपडी - अब?

जैन - अब तुम, ये लाला और मै.. तीनो मरनेवाले है..

लाला - उसके मां की. ****... हमे क्या मारेगा वो??

जैन - मैने अभी मेरे घरपे रहना अच्छा नही... कहीं और जाते है.. दो हवालदारभी आ रहे है....

लाला - ऑफीस??

जैन - अंहं.. पूनासे बाहर निकलते है..

लाला - किधर??

जैन - बॉम्बे..

लाला - बॉम्बे? अंहं.. मै कहता हूं मुळशी चलो..

जैन - मुळशी?? ....वो तो पूनामेही है..

लाला - हां! लेकिन चालीस पैतालीस किलोमीटर दूर है.. और मेरा एक चार कमरेका घर है वहां..

जैन - वहा कौन होता है??

लाला - सिर्फ एक नौकर और काफी सारे छुरे चक्कू...

जैन - और??

लाला - मै और खोपडी आपके सामनेही खडे रहेंगे... और हवालदार तो आ ही रहे है ना?

जैन - तो.... चले??

लाला - हां.. लेकिन गाडी मेरी... आपकी गाडी मत लेना..

जैन - क्युं??

लाला - वो पहचानी जायेगी.. मेरी गाडीकी तरफ बाबू देखेगा भी नही..

जैन - चलो फिर..

लाला - कॅश लेके रखिये शेठ... एक पेटी...

जैन - क्युं??

लाला - पता नही किसको कब खिलाने पडे??

जैन, लाला आणि खोपडी तुफान वेगाने मुळशीला निघाले. जाताना दोन हवालदारांनाही पिक अप केले. स्थानबद्ध न होता येण्याची जैनने चौकीवर अनेक कारणे दिली. शेवटी दहा हिरव्या नोटा खुपसल्यावर ते निघू शकले. त्यांना कल्पना होती की मिनी आत्ता याच क्षणी आतल्या खोलीत आहे. पण तिच्याबाबत अवाक्षरही न उच्चारता लालाच्या उनोमधून सगळे सुटले.

..............

लाँड्रीच्या पाईपमधून सहा हवालदार ड्रेनेज कव्हरमधून बाहेर ज्या ठिकाणी आले तो येरवड्याहून खडकीला जाणारा मेन रोड होता.

आजूबाजूला चौकशी करताना हवालदारांना स्वतःच्याच घाणीने भरलेल्या शरीराची किळस वाटत होती. मात्र अमूल्य माहिती मिळाली. एक ट्रॅक्स त्याच ठिकाणी थांबली होती जिथे ते ड्रेनेजचे कव्हर होते. आणि काहीच मिनिटांपुर्वी ती नगरच्या दिशेने गेलीसुद्धा!

ही माहिती राजासाबला कळवून हवालदारांनी जवळपासच आलेली एक पोलिसव्हॅन थांबवली आणि ते सुसाट सुटले नगरच्या दिशेने!

.............

परिस्थिती विचित्र झालेली होती. भोपाळहून निघालेला मालपुरे महाराष्ट्रार प्रवेश करतोय. सहा हवालदार व्हॅनमध्ये बसून नगरच्या दिशेने ट्रॅक्स शोधत सुटलेत! राजासाब जेलच्या ऑफीसमध्ये बसून फोन घेणे, करणे आणि कागदपत्र बनवणे ही कामे करतोय! जगाच्या दृष्टीने नवलेवरच केस झालेली असल्यामुळे नवले बंडगार्डन चौकीवर थांबलाय! तिथे त्याच्या सुरक्षेसाठी आणि मिनीच्या चौकशीसाठी पुरुष व महिला मिळून टोटल आठ स्टाफ आहे. निर्मल जैन, लाला आणि उलटा खोपडी मुळशीच्या दिशेने सुटले आहेत. आणि.....

..... सरिताने ज्या ट्रॅक्सची व्यवस्था केलेली होती तिच्यातून खराडी फाट्यापाशी उतरून तिनेच व्यवस्था केलेल्या एका मेटॅडोरम्ध्ये बसून पाचही जण, ड्रायव्हर आणि सरिता आता पुन्हा उलटे पुण्याकडेच येत होते.

वाटेतले चेकिंग कसे फेस करायचे हा प्रश्नच उरलेला नव्हता. कारण ते मधल्याच एका रस्त्याला वळून तेथे असलेल्या एका अंधार्‍या खोलीत थांबलेही!

बदाबदा पाणी अंगावर ओतून ते प्रथम स्वच्छ झाले. पाठोपाठ केवळ दहा मिनिटात प्रत्येकाने मिळालेली कात्री आणि रेझर वापरून दाढी आणि मिश्या सफाचोट केल्या. सरिताने दिलेल्या बोचक्यातील कपडे घालून 'कामगिरीसाठी' तयार व्हायला त्या सगळ्यांना खोलीत गेल्यापासून केवळ वीसच मिनिटे लागली. या वीस मिनिटात बाहेरच्या जगात अनेक ठिकाणी पहारा कडक केला गेला होता. पण आता कसलीच चिंता नव्हती.

पाच मोटरसायकली! या कुणाकडून आणि कशा काय आणल्या हे विचारायचाही वेळ नव्हता. इन फॅक्ट वाघ तर इतक्या वर्षात मोटर सायकल चालवायचेही विसरूनच गेलेला होता. मुळात पाच जणांपैकी आकाश सोडून प्रत्येकालाच बाहेरचे जग प्रदीर्घ कालावधीनंतर दिसल्यामुळे झालेला आनंद आणि कुतुहलच लपत नव्हते चेहर्‍यावरून!

पराकोटीचा ताण होता प्रत्येकाच्या मनावर! सरिता त्या ड्रेनेजमध्ये माखलेल्या कपड्यांनिशी तशीच शीघ्र वेगाने बाहेर पडली आणि मेटॅडोरमधून पसारही झाली. तिची कामगिरी संपलेली होती. पण जाताना भावाबहिणींनी एकमेकांना जवळ मात्र घेतले. निधन पावलेल्या वडिलांच्या आठवणींनी दोघेही आक्रंदले. त्यांना बाबूनेच वेगळे केले खरे, पण सगळेच गहिवरलेले होते. निघताना सरिताने भावाला एक मात्र सांगितले..

"पुन्हा पकडला गेलास तरी बेहत्तर आकाश... पण निदान एक खून तरी करच... निर्मल जैनचा.."

सरिताची गाडी लांब जाईपर्यंत आकाश हरवलेल्या नजरेने बघतच बसला होता. पण त्याला सगळ्यांनी भानावर आणले. याचीही आठवण करून दिली की ज्या मिनीमुळे आपण सुटलोय तिला तर बाबू भेटूही शकत नाही आहे.

पाच दुचाक्या पाच दिशेंना पांगणार होत्या. मुल्ला नगरच्या दिशेने जाऊन मोठा वळसा घेऊन पुण्यात येणार होता. वाघ खराडी फाट्यालाच उजवीकडे वळून सोलापूर रोडला लागणार होता. बाबू बिनदिक्कत गुंजन थियेटरवरूनच जाणार होता. काहीही झाले तरी त्याला बंडगार्डन पोलिस चौकीचे एक दर्शन हवेच होते. आकाश ब्ल्यु डायमंडवरून कॅम्पमध्ये घुसणार होता. आणि नसीम खडकी रोडला लागणार होता.

कुणाचेही चेकिंग होऊ शकले असते. त्यामुळे अत्यंत सावधपणे जायचे होते. हेल्मेट्स मात्र दिलेली होती प्रत्येकाला सरिताने! अशक्य तयार ठेवलेली होती या दोन बायकांनी!

'एक माणूस' जाताना दिसला तर चेकिंग करण्याचे पोलिसांना तसे कारण नसले तरीही चेकिंग होणारच होते. नाक्यानाक्यावर दोन दोन हवालदार थांबलेले होते.

मात्र पाचही जण एकमेकांना मिठ्या मारून निघाले. कुठे भेटायचे, कधी भेटायचे हे सगळ्यांना सरिताने सांगितलेले होते. प्रत्येक जण सूर्य उगवायच्या वेळेस आणि एक दुसर्‍याच्या पोचण्यात किमान एक तासाचा अवधी राहील या बेताने गुंजवणी या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका वस्तीतील एका घरात भेटणार होते. आणि सरिता.... तेथे आधीच पोचलेली असणार होती.

मोबाईल कुणाकडेच नव्हता. कारण एक पकडला गेला तर त्याच्या मोबाईलवर असलेल्या कॉल डिटेल्समुळे दुसराही पकडला जायचा! फक्त ठरल्याप्रमाणे, ठरल्याजागी भेटायचे होते इतकेच!

आत्तापर्यंत कित्तीतरी महिने जेल आणि जेलमधलेच जग अनुभवणार्‍या या पाचजणांना रात्री सव्वा अकराच्या त्या थंड हवेत मोटारसायकल तुफान स्पीडला नेताना अनुभवता येत होते...

.... द वर्ल्ड ऑफ डिफरन्स...

मस्त हवा, मोकळे रस्ते!

सर्वात जास्त मजा येत होती वाघला! एक तर त्याचा रूट मुल्लाच्या खालोखाल सर्वात लांबचा होता, त्यात पुन्हा मोटरसायकल चालवायला तो पहिल्या पाचशे मीटर्समध्येच शिकला होता नव्याने!

इकडेतिकडे पाहून तो एका ठेल्यापाशी थांबला. सिगारेटचे पाकीट आणि गुटखा ही पहिली खरेदी केली त्याने सरिताने दिलेल्या कॅशमधून! त्याचा अजूनही विश्वासच बसत नव्हता की तो आता स्वतंत्र होता. कदाचित, काही काळासाठीच का असेना, पण स्वतंत्र! शेजारी एक लोकल फोन होता. वाघला स्वतःच्या गल्लीतल्या वाण्याचा जुना नंबर अजूनही आठवत होता. पण आता सहा वर्षांनी नंबर अनेकदा बदलला असणार हे माहीत होते. वाण्याला सांगून वडिलांना बोलावून निदान एकदा तरी त्यांचा आवाज ऐकावा हा मोह वाघला स्वस्थ बसू देत नव्हता. नवलाईचीच बाब! याच वडिलांना आपल्या बायकोवर तिच्या मर्जीनेच हात टाकल्यामुळे जीवे मारावे असे वाटणारा वाघ आज सहा वर्षांनी त्यांच्याचबाबतीत पुन्हा मृदू झाला होता.

अंहं! डिरेक्टरीही नव्हती आणि पानवाल्याशी जास्त बोलण्यातही अर्थ नव्हता. काही चौकशी झाली तर सांगायचा, असा असा माणूस होता म्हणून!

पानवाल्याचे लक्ष सध्या तरी पानेच लावण्यात होते. कारण समोर तीन गिर्‍हाईके उभी होती. एक जण स्वतःचे पान कसे लावले जात आहे हे बारकाईने बघून सूचना देत होता. "ये डालो, वो डालो"! दुसरे दोघे एकमेकांशी हिंदीत बोलत होते. त्यांच्या बोलण्यावरून वाघला इतकेच समजले की सध्या क्रिकेटच्या कसल्यातरी मॅचेस चालू असाव्यात! त्यात त्याला काहीच रस वाटणे शक्य नव्हते. तेवढ्यात लांबवर सायरन ऐकू आला. ती व्हॅन इतकी जोरात असावी की लांब म्हणता म्हणता वाघची मोटरसायकलपर्यंत जाण्याचीही अवस्था राहिली नाही. त्याने ताबडतोब रस्त्याकडे पाठ करत पानवाल्याला एक कलकत्ता मसाला मागीतले. आणि हृदयच बंद पडायची वेळ आली.

व्हॅन!

व्हॅन त्याच ठेल्यापाशी थांबली.

आता???

वाघने जणू काहीच झाले नाही अशा पद्धतीने ठेल्यावर ओणवे होऊन पान कसे लावले जात आहे हे बघण्याचा अभिनय सुरू केला. दोनच हवालदार उतरले होते. बाकीचे चार पाच जण आतच बसले असावेत. एका हवालदाराने ऑर्डर सोडली.

"ए .. तीन ब्रिश्टाल आन गायछाप दे चार... आन टपरी बंद कर भडव्या बारा वाजता... काय???"

"जी... जी साब..."

भैय्या पानवाल्याने उत्तर दिले तशी बाकीची गिर्‍हाईके पोलिसाच्या अरेरावीकडे पाहू लागली. मात्र वाघ अजूनही आतच बघत होता. पोलिसांची चर्चा त्याला ऐकू आली त्यातल्या त्यात!

"तुझीबी नाईट होती???"

"न्हाSSSSSय... हे लफडं झालं आन बोलावून घेतलंन मला "

"कस्काय झालं कस्काय पन काय समजत नाय..."

"आता हाये हप्ताभर पायाला भिंगरी.. आ???"

"न्हाय... मिळतील उद्या परवा... "

बास! इतकंच! सगळी गिर्‍हाईके बाजूला ठेवून पानवाल्याने पोलिसांना आधी मोकळे केले. व्हॅन निघून गेली तसा वाघ शांत झाला. पानवाल्याला म्हणाला..

"किसको ढुंढ रहे है ये लोग??"

"हम कुछ नही जानते साहब..."

मात्र पान कसे लावावे याच्या सूचना देणारा मिश्कीलपणे म्हणाला..

"जेल तोडके कैदी भाग गये... इसलिये ये भाग रहे है..."

फस्सकन हसून वाघ मोटरसायकलकडे निघाला तेव्हा...

... गेलेली व्हॅन रिव्हर्स घेत पुन्हा ठेल्यापाशीच येत होती..

आता मात्र एकदम समोरासमोर!

वाघची फाटली! पायच उचलवत नव्हते. आता आपल्याला धरणारच हेच गृहीत धरून तो मृतवत नजरेने मोटरसायकलकडे गेला. व्हॅनमधून पुन्हा एक पोलिस उतरला आणि पानवाल्याला तिथूनच ओरडून म्हणाला...

"ए मघई हाये का रे?????"

खट्ट! खर्र र्र र्र र्र र्र र्र ! झुम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म !

वाघ! विद्युतवेगाने वाघची हिरो होंडा सुटलेली होती त्याच क्षणी!

...................................

"कुट्ट गेलावतांस????? "

"पिक्चर... "

"कन्ता???"

"खिलाडी..."

"कोन कोन है त्यात??"

"अक्षय कुमार...."

"टाकीज कन्तं??"

"वेस्ट एन्ड..."

"तिकीट ठेवलंन का फाडलंन??"

"अं?? तिकीट टाकलं हो साहेब मी???"

"लायसन??"

"लायसेन्स नाही आहे सर..."

"नांव???"

"आकाश..."

"कुटं र्‍हायला सायब तुमी??"

"धनकवडी..."

"शिक्षान किती??"

"ग्रॅज्युएट आहे.."

"आन नियम म्हाईत न्हाईत??"

"सॉरी... चूक झाली..."

"चला ... चला आता चौकीवं... तिकडं सायबाला सांगा चूक झालीन म्हनाव..."

हवालदाराने सरळ किल्लीच काढून घेतली म्हंटल्यावर आकाशने शेवटचं अस्त्रं वापरलं..!

"सर... रात्र झालीय.. वडील म्हातारे आहेत... काहीतरी.. मिटवून टाका की???"

"कसं मिटवायचं साहेब??? हुकूम करा बरं???"

उपहास जाणवला तसा आकाश निरुत्साहीच झाला एकदम! सगळंच संपणार होतं चौकीला गेल्यावर! आणि आत्ता मोटरसायकलला किक मारून पळून जाणंही शक्य नव्हतं! किल्ली हवालदाराकडे होती. वेस्ट एन्ड पास होताना त्याने खिलाडीचे पोस्टर बघितले होते.

"सांगा सांगा... कसं मिटवायचं?? आम्हालाही जरा ग्यान मिळूदेत की??"

"साहेब प्लीज.. वडील आजारी असतात म्हणून रिक्वेस्ट करतोय..."

"वडील आजारी आहेत तरी पिक्चर बघणारच ... आ????"

"ते.. ते आजच्या दिवस जा म्हणाले..."

"आणि त्यांच्यावर लय उपकार करायचे म्हणूण अर्धाच पिक्चर पाहून निघाला तुम्ही??? आ???"

हवालदाराचं बरोबर होतं! पिक्चर सुटायला वेळ होता अजून!

आकाश गप्प राहिला.

"काय मोबाईल नंबर काये??"

"नाहीये साहेब मोबाईल..."

"बघितलं का कामत?? हल्ली भंगारवाल्याकडं असतोय अन ह्यांच्याकडं मोबाईल न्हाई.. ग्रॅज्युएट झालेत.."

"सर.. सर प्लीज... "

"दोन हजार दंडय लायसेन नसलं तर..."

"सर.. प्लीज अहो.. एवढे नाहीयेत माझ्याकडं..."

"जाऊन घेऊन ये ... रिक्षेनं जा आन रिक्षेनं ये हो???"

"साहेब.. त्या पेक्षा ... तुम्हाला... "

"किती देतोस???"

"शंभर.. "

"इकत घेतोयस???"

"तसं नव्हतं म्हणायचं.. "

"चल्ल... तीनशे रुपये काढ..."

अवाक्षर न बोलता आकाशने हजारपैकी तीनशे काढून दिले. आणि दुसर्‍याच क्षणी....

झुम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म

..............................................

"मुर्गी है???"

"हा..."

"क्या है मुर्गीमे??"

"चिक्कन मस्साला.. कर्री.. सूखा.. लालीपाप... तंदुरी.. बिर्याणी..."

"बिर्याणी हाप है??"

"चिक्कन मे हाप नही आता... व्हेज हाप आहे.."

"चिकनकी फुल्ल ले के आ... और नमक दे..."

"साब शराब उधर पीना.. बाहर बैठकर...."

"क्युं??"

"यहां फ्यामिली आताय.."

"दुनियामे एकभी फॅमिली ऐसा होगा जो इस वक्त यहां आयेगा???"

"वो मालिकसेच पूछो साहब... "

हासत हासत मुल्ला बाहेरच्या मस्त हवेतील एका बाकड्यावर बसला आणि कसलाही विचार न करता त्याने रमची अर्धी क्वार्टर ग्लासात ओतून उरलेल्या ग्लासात पाणी आणि मीठ घातले आणि कधीकाळी ज्याला भजायचा त्या अल्लाची मनातल्या मनात माफी मागून दोन सेकंदात ग्लास खाली केला.

मुल्ला! मनात आणले असते तर आत्ता त्याने एकट्यानेच हा ढाबा लुटला असता. ढाबेवाला ततपप करत सगळा गल्ला मुल्लाला अर्पण करून पळूनही गेला असता. पण शब्द तो शब्द! उद्या गुंजवणी म्हणजे गुंजवणी!

कसलं आलंय उद्या गुंजवणी! बुलेट! साडे तीन हॉर्सपॉवर! आणि ती कमी वाटावी अशा हॉर्सपॉवरचे दोन पोलिस! त्यातला एक तर चक्क सब इन्स्पेक्टर!

हादरला मुल्ला! आता एकदम ऑर्डर कॅन्सल करून निघून जाणे शक्य नव्हते. अती शहाणपणा आणि दारू आणि मुर्गीचा मोह नडला होता. बरं आसपास लपावं तर वेटर शोधतोय म्हंटल्यावर पोलिसांना संशय येणारच होता. बिनधास्त राहून मृत्यू स्वीकारणे! हा एकमेव उपाय होता आता! आणि तसेच करायचे असले तर मुल्ला त्य दोघांपैकी एकाला आयुष्यभर लक्षात राहील अशी अद्दलही घडवणार होता.

बेदरकार, बेफिकीर होत त्याने अंधारातच आकाशात पाहात उरलेला ग्लासही खाली केला. तोवर समोरच्या थाळीत कांदा, लिंबू आणि मिरच्या येऊन पडल्या होत्या. कच्चकन एक मिरची खात मुल्लाने बिडी पेटवली.

तिकडे हवालदाराने चौकशी सुरू केली मालकाबरोबर!

"काय रे?? संध्याकाळपासून कोन कोन आलं हित्तं?? "

"म्हन्जे??"

"पाच जन आलेवते का कोन??"

"पाच होय?? न्हाय... का??"

"ट्रॅक आलीवती का ट्रॅक??"

"न्हाय.. ट्रॅकबिक न्हाय आली... इज्या आलीवती का रं ट्रॅक???"

"न्हाSSSSSय..."

पोलिसांनी ढाब्याचे निरीक्षण केले. पुन्हा विचारले.

"कोन कोन आलवतं ते सांग.."

"आ?.. एक नवरा बायको व्हते.."

"कसा होता दिसायला??"

मिनी आतच असल्यामुळे पोलिसांना बाबूचा संशय आलेला नव्हता. पण सरिता असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे त्यांना माहीत होते.

"त्यो व्हय??.. चांगला व्हता की दाणगट.."

"ह्यातलं कोन पाहिलं का संध्याकाळपास्नं??"

पाच फोटो! इकडे मुल्लाला वरून प्यायलेली रम खालून सोडायची इच्छा होऊ लागली होती. आत्ताच मालकाने आणि वेटरने मुल्लाला पाहिलेले होते.

मुल्ला! सव्वीस दरोडे घालणारा, मात्र भावनांवर काहीही नियंत्रण नसलेला कैदी! भयानक काही होईल असे वाटले की तो भेसूर रडू लागायचा, ते जे काय भयानक व्हायचे असेल ते एकदाचे होऊनच जावे असा प्रयत्न करू लागायचा.

तिकडे मालकाबरोबर आता वेटरही फोटो पाहू लागला होता. फोटोत असलेल्या चेहर्‍यांना दाढीमिशा होत्या. गणवेष होता. इतक्या रात्री, अंधार्‍या ढाब्यावर, याच फोटोंपैकी एक जण बसलेला आहे हे त्यांना जाणवणे अशक्य होते. पण मुल्ला मात्र पुतळ्यासारखा स्तब्ध होऊन मागून येणारे आवाज जीवाचे कान करून ऐकत होता.

"न्हाय बा.. ह्यातलं कोन न्हाय आलं.."

"दोघं तिघं कोन आलेवते का??"

"दोघं आलेवते.. पर गावाकडचेच व्हते..."

"कशावरून??"

"आता माझ्याच गावातले व्हत म्हनल्यावं??"

"अच्छा तुझ्याच गावातले होते व्हय?? हा कोने??"

"गिर्‍हाईके"

संपलं सगळं! दोघेही चालत सरळ मुल्लाकडे यायला निघाले. मुल्ला तर आता उठून त्यांच्यातल्या एकावर वार करून पळतच सुटायच्या बेतात होता.

"अय... कोने तू??"

"भीमा कोरेगावचाय मी..."

"हिकडं कसा??"

"पुण्याल गेलतो... जाताना जेवून जातोय..."

"काय करतोस??"

"आडताय... धान्याचा.."

"ह्ये कधी बघितले का???"

मुल्लाने फोटो निरखून पाहिले.

"न्हाय.."

दोघेही पोलिस जायला लागले. मुल्लाच्या अंगातील थरथर नियंत्रणात येणार तेवढ्यात एक पोलिस मागे वळून म्हणाला...

"तुझं नाव काय रे???"

"माझं?? ......अण्णा कदम..."

"तुझंच नांव सांगायला लईच वेळ घेतलास की??"

"म्हन्जे??"

"आई *** तुझी ... हिकडं ये... "

पोलिसाचा तो 'खास' आवाज ऐकून मात्र मुल्लाला समजून चुकले. एकाने आपल्याला ओळखले तरी किंवा कसलातरी संशय तरी आला.

घाबरून मुल्ला उठून पोलिसाच्या जवळ गेला आणि...

... खण्ण... !

पोलिसी खाक्याचा तो उलटा हात गालफडावर बसताच मुल्ला हेलपाटला. तोवर दुसर्‍याला लक्षात आले होते की हा कुणीतरी गुन्हेगार आहे, त्याशिवाय आपला साथीदार याला मारणार नाही..

"कोने रे हा??"

"साहेब.. नीट बघा... त्या मुसलमानाचा फोटो अन हा...."

संपलं होतं सगळं! मुल्लाला त्याही परिस्थितीत समजलं ते! ढाबेवाला आणि वेटरचे तर बोबडेच वळायची वेळ आली होती.

आणि... कुणालाही काहीही कळायच्या आत.. केवळ निमिषार्धात...

पुर्वी दरोडे घालताना करायचा तशी स्विफ्ट अ‍ॅक्शन केली मुल्लाने...

एकाचवेळेस एक लाथ एकाच्या पोटात आणि एक गुद्दा दुसर्‍याच्या नाकावर ठेवून दिला.. खच्चून! आणि पुढचे तीन सेकंद त्याने चक्क पुन्हा तीच अ‍ॅक्शन करण्यासाठी वापरले..

पोलिसांच्या दृष्टीने हा अक्षरशः एक चमत्कार होता... अक्षरशः चमत्कार!

कंबरेला रिव्हॉल्व्हर लावलेला सब इन्स्पेक्टर आणि हातात केन असलेला एक हवालदार यांना गेलीकाही वर्षे जेलमध्ये सडून अशक्त झालेल्या एका कैद्याने इतके आणि इतके फास्ट मारावे?

साधारणतः पोलिसांच्या हालचाली अत्यंत वेगवान असतात. काही कळायच्या आत गुन्हेगार अर्धमेला होईल अश्या!

पण येथे उलटेच झाले होते. वाईट सुजलेली नाके आणि आतड्यांपर्यंत पोचलेल्या लाथा खाऊन दोघे क्षणभर बिचकले तेवढ्यातच मुल्ला वादळी वेगाने बाईककडे धावला. मागे पाहिले तेव्हा सब इन्स्पेक्टरचा हात रिव्हॉल्व्हरकडे जात होता. आणि त्याच्या हातात रिव्हॉल्व्हर आले तेव्हा...

... मुल्ला सुसाट सुटलेला होता.... फक्त... मुल्लाला एक माहीत होते... की आता ताबडतोब त्याचा पाठलाग सुरू होणार आणि पुढे असलेल्या गावांमधल्या पोलिस पाटलांनाही दक्षतेने हायवेवर थांबायला सांगितले जाणार...

त्याच वेगात पाऊण किलोमीटर पुढे जाऊन मुल्लाने बाईकच्या आरश्यात पाहिले तेव्हा एक ट्रक फक्त खूप मागून येत होता.. समोरून काहीच नाही.. मुल्लाने जेमतेम वळण्याइतकाच वेग कमी करून...

३६० मध्ये टर्न घेतला आणि आता मुल्ला पुन्हा पुण्याच्याच दिशेने निघाला...

हातात फार तर दहा एक सेकंद असणार हे त्याला माहीत होते.. समोरून येणार्‍या प्रत्येक वाहनाच्या दिव्यावर तो नजर ठेवत होता... आणि त्याला ते दिसले.. एकच दिवा... अत्यंत प्रखर.. ही बुलेटच असणार हे नक्की.. त्या दोघांना हा उलटा निघालेला असेल हे माहीत असणे अशक्य होते.. ते त्यांच्या वाटेत येईल त्या वाहनाला ओव्हरटेक करत असल्यामुळे ते रस्त्याच्या मधोमधच होते.... आणि मुल्लाने वेग कमी केला... कुणीतरी आरामात जात आहे असे वाटावे म्हणून...

हातात फक्त चार ते सहा थ्रिलिंग सेकंद होते... आणि त्यातील मोजून तिसर्‍या सेकंदाला मुल्लाने स्वतःची बाईक सरळ रस्त्याच्या मधे घेतली... थरार.. केवळ थरार घडणार होता आता..

बुलेट तर थरथरलीच... हा असा अचानक कोण मधे आला.. तेही आपण आणि तोही अशा स्पीडमध्ये असताना????

एक सेकंद परिस्थिती समजण्यातच गेला.. मुल्ला तर जीवावरच उदार झाला होता.. कसलाही विचार न करता त्याने स्वतःची बाईक सरळ बुलेटवर नेली...

शेवटून दुसरा सेकंद... आता धडक होणार हे हवालदाराला आणि मागे बसलेल्या अधिकार्‍याला समजले... आ वासून ते फक्त ती धडक टाळता कशी येईल याचा विचार करत सुन्न झालेले होते...

मानसशास्त्र! भीती कुणालाही वाटू शकते आणि भीतीदायक प्रसंग टाळण्यासाठी कोणताही माणूस प्रयत्न करतोच!

शेवटच्या क्षणी.. जेव्हा फक्त काही फुट अंतर राहिलेले होते दोन बाईक्समध्ये... तेव्हा हवालदाराने बुलेट सरळ राँग साईडला घेतली... कारण धडक टाळण्याचा तो एकमेव इलाज उरलेला होता... डाव्या बाजूला महाकाय ट्रक आणि समोर मुल्लाची मोटरसायकल होती... राँग साईडला जाण्याशिवाय पर्यायच नव्हता...

मुल्लाला जणू त्या गोष्टीचा अंदाजच होता.. त्याने एक सेन्टिमीटरही स्वतःची दिशा बदलली नाही...

पुढचाच सेकंद...! मुल्ला तसाच सरळ रेषेत जात आहे... आणि बुलेट राँग साईडला तुफान वेगात जात आहे..

त्याच्या पुढचा सेकंद... मुल्लाने स्वतःची बाईक पूर्ण डाव्या साईडला आणलेली आहे आणि आता तो मागे वळून बघत आहे... आणि बुलेट???

बुलेटचा अपेक्षित असल्याप्रमाणेच बॅलन्स गेलेला होता... समोरून येणार्‍या एका टेम्पोवर बुलेट पूर्ण वेगात आदळली होती...

खलास!

मुल्ला वीज फ्री! फ्री टू गो एनीव्हेअर... प्रोव्हायडेड.. त्या दोघांनी त्याचे वर्णन आधीच कुणाला कळवले नसले तरच!

पण कसलाही विचार न करता मुल्ला पुण्याच्या दिशेने सुटला... अचाट वेगाने..

झुम्म्म्म्म्म्म्म्म्म

.............................

राजा व्हेज नॉन व्हेज अ‍ॅन्ड परमिट रूम!

फुल्ल टाईट झलेला नसीम अजून दारू मागवत होता. सगळ्यात उशीरा पोचायचे होते त्याने गुंजवणीला! त्यामुळे!

पण बारमध्येच पोलिस आले. प्रत्येकाला निरखू लागले. ते समजल्याबरोब्बर नसीमने त्या दाटीवाटी असलेल्या बारमधील आपल्या समोर बसलेल्या एका माणसाशी एकदम बोलायलाच सुरुवात केली हासून खेळून! केवळ तिसर्‍या मिनिटाला तो माणूस नसीमला त्याचे स्वतःचे नाव, पत्ता आणि दारूच्या आवडीनिवडीही सांगून बसलेला होता. नसीमने खूप जुना, त्याला आठवणारा असा एकमेव जोक त्या माणसाला ऐकवला आणि तो माणूस आणि नसीम टाळ्या देऊन हसायला लागले.

अर्थातच, पोलिसांना ते दोन मित्र वाटले आणि आत्ताच जेलमधून सुटलेला जहाल कैदी जेलच्या इतक्या जवळच्या बारमध्ये मित्राबरोबर पीत बसणे अशक्य आहे हे पटल्यावर पोलिस निघून गेले.

नसीम! ज्याला केवळ तीन दिवसांनी फाशी होणार होती तो नसीम आरामात बाईकला किक मारून युनिव्हर्सिटी रोडने चांदणी चौकातून वारजे विभागातून कात्रजच्या घाटातही पोचला होता...

गुंजवणीला जायला आता सरळ रस्ता तेवढा उरलेला होता... नसीम वॉज फ्री... फक्त... त्याला एकच गोष्ट माहीत नव्हती...

ती म्हणजे... पुढे जाऊन तो ज्या ढाब्यावर थांबला ... तेथेच... वाघही दारू प्यायला थांबला होता.... आणि... नसीम आणि वाघ यांच्यात फक्त आंखमिचौलीच झाली... एकमेकांशी अजिबात बोलायचे नाही हे दोघांनाही समजले.. पण.. पण त्या नवख्याला ते कसे समजणार... त्याला डोळ्यांनी दटावून गप्प बसवावे लागले..

आकाश!

जेवायला नेमका त्याच ढाब्यावर आकाश थांबलेला होता....

.... आणि पाठोपाठ... एक पोलिस व्हॅनही येऊन थांबली...

......................................

निर्मल जैनच्या पैशाच्या ताकदीवर चौकीतून विजयी मुद्रेने बाहेर पडताना नवले वार्ताहरांना पाहून तुच्छपणे हासला. वार्ताहरांनाही समजले. लवकरच दारू आणि कोंबडी अशी पार्टी मिळणार आपल्याला आता! चौकीवर मिनीचा संपूर्ण जबाब लुहून घेण्यात आला होता. पाचही जणांना पळवण्याचा प्लॅन मी आणि आकाशच्या बहिणीने केला. त्यांना लाँड्रीच्या पाईपमधून पळवले. तिथे वाहन ठेवले. ते वाहन नंतर बदलले. आणि नंतर प्रत्येकाला एकेक मोटरसायकल देऊ केली. तिथून त्या सर्वांनी गुंजवणीला पोचायचे आहे. आणि नंतर जमेल तसा हवा तेथे पोबारा करायचा आहे.

विषयच संपला होता सगळा! मिनीला रीतसर अटकच झाली. सरितावरही तक्रार दाखल झाली. आणि हे सगळे झाल्यानंतर नवले स्वतंत्र होऊन हासत हासत बुलेटला किक मारून निघाला. बॅक टू जेल! आता काही प्रश्नच राहिलेला नव्हता. कैदी सापडणारच होते गुंजवणीला! तिथे नाही सापडले तरी निदान त्य रस्त्यावर कुठे ना कुठे सापडणारच होते. आणि मिनीच ताब्यात असल्यामुळे 'पोलिसांना सगळी योजना समजलेलि आहे' हे त्या पाचजणांना आणि सरिताला समजणे शक्यच नव्हते, जोपर्यंत त्यांना हे समजत नाही की मिनीला डायरेक्ट अटकच झाली आहे.

इतका बेदरकारपणे चौकीबाहेर येऊन बुलेटला किक मारणारा नवले पाहून......

...... चक्क समोरच्या झाडामागे बाईक उभी करून झाडावर चढून बसलेल्या बाबूच्या डोक्यात संतापाने चमका निघाल्या...

ताडकन उडी मारून त्याने स्वतःची बाईक सुरू केली. जेलच्या रस्त्याला लागायच्या आधी नवलेला खलास करणे अत्यावश्यक होते... आणि त्याला खलास केल्यानंतर आपण पकडले गेलो तर निर्मल जैनवरचा सूड आकाशलाच घ्यावा लागेल ही तडजोड मान्य करावी लागत होती...

मिनी! ती कधी आणि कुठे भेटेल ते आता सांगता येतच नव्हते... कदाचित कधीच नाही...

पण नवले जेलकडे गेलाच नाही. बाबू हादरलाच! नवले ब्ल्यू डायमंडकडे वळत होता. सापडले की काय कुणी चौघांपैकी??

बाबूने तुफान वेग दिला बाईकला! आणि रजनीश आश्रमाच्या चौकात दोन हवालदारांशी बोलण्यासाठी नवले थांबलेला असतानाच प्रचंड वेगात बाबूला पुढे निघून जावे लागले. आता मागे वळणे म्हणजे मरण पत्करण्यासारखेच होते.

बाबू पुलाच्या पलीकडे जाऊन इनलॅक बुधरानीच्या मागच्या बाजूला अंधारात थांबला.. बाईक सुरूच होती... अ‍ॅक्सीलरेटर फुल्ल रेज केलेला होता...

आणि .. अपेक्षित असलेला प्रकार झालाच...

मिनिटभरातच नवलेची बुलेट आरामात पूल चढून आली आणि पूल उतरायलाही लागली...

आयुष्यात नवले असा हादरलेला नव्हता... एक तर अचानक एक मोटरसायकल प्रचंड वेगात मधे आली.. बुलेट सावरायलाही वेळ नाही.. धाडकन धडक झाली... अशा वेळेस जरी धडक झाली तरीही पब्लिक लगेच धावतेच... इतकेच काय रजनीश आश्रमापासल्या हवालदारांनाही हा आवाज आलेला असू शकत होता... हे सगळे बाबूला व्यवस्थित माहीत होते... धडक झाल्या झाल्या बाबू सावरलेलाच होता... मात्र नवले रस्त्यावर पडलेला होता... केवळ अर्ध्या मिनिटात प्रकार आवरायला हवा होता... आणि आवरणारही होता... कारण त्या कार्याचा शुभारंभ करणार होता.... आजवर सात मर्डर करणारा...

... संजय बाबू....

बाबू - काय नवले.. *****.... बाबू आहे मी... ओळखलं का??

पडलेल्या नवलेच्या सेन्टरमध्ये खच्चून लाथ घालत बाबू शांत स्वरातच म्हणाला..

तेवढ्यात लांबून दोघे तिघे पळत येताना दिसले...

बाबूने आधीच पाहून ठेवलेला एक मोठा दगड हातात उचलला....

बाबू - ******** ... मिनी पाहिजे तुला??? मिनी पाहिजे??? *******...

नवलेला स्वतःचे भवितव्य समजून चुकलेले होते. तोंडातून शब्दही फुटत नव्हता त्याच्या!

आणि पुढच्याच क्षणी बाबूने तो प्रचंड दगड नवलेच्या डोक्यात घातला... चिथड्या उडाल्या त्याच्या मस्तकाच्या... आपण केलेल्या प्रकाराचा अतीभीषण परिणाम पाहून बाबूच हादरला... आजवर त्याने असा मर्डर कधीच केला नव्हता..

धावत आलेले दोघे मात्र ते दृष्य पाहून गळाठून लांबच उभे राहिले.. त्यांचे पाय थिजून गेलेले होते... नवलेच्या ब्रेन्सचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले होते... एक हैवान नष्ट झाला होता... हैवान फक्त कैदीच असतात असे नाही... कुणीही असू शकते... नवले हैवानच होता.. बोलायचीही संधी मिळाली नाही त्याला..

खस्सकन नवलेचे लोडेड रिव्हॉल्व्हर आणि सेलफोन हातात घेत बाबूने स्वतःची मोटरसायकल गाठली आणि तुफान वेगात तिथून निघून जाताना त्याला रिअर व्ह्यू मिररमध्ये जाणवले.. खूप लांबवरून रजनीश आश्रमापासचे हवालदार धावत येत होते.....

बाबूने खूप लांब जाऊन मिल्ट्री एरियात मोटरसायकल झाडीत घातली. नवलेचा सेल फोन हातात घेतला. मिनीचे काय झाले आहे ते त्याला माहीतच नव्हते. त्याने मिनीला फोन लावला तर स्विच्ड ऑफ! काहीतरी प्रॉब्लेम असणार हे जाणवले खरे! त्यातच दुसरा नंबर त्याने फिरवला निर्मल जैनचा..

अचानक जैनचा आवाज ऐकू आला...

"हां नवले साहब.. कॉन्ग्रॅच्युलेशन्स सर... सब लोग मिल गये.. आपके मुंहमे घी शक्कर और दो पेटी.. बाबूभी मिलगया ना??"

बाबूने फोनवर नुसतंच "हं' म्हंटलं!

"तो आजाईये साहब मुळशी के घरपे लालाके... मुर्गीशर्गी खायेंगे... शराब वराब पियेंगे... आईये आईये.."

जेव्हा कात्रज घाटापलीकडल्या ढाब्यावर थांबलेल्या व्हॅनमधील पोलिस आकाश, वाघ आणि नसीमला पकडून मारत म्हणत होते... की..

"चला.. गुंजवणेवाडीला जायचं ना??? आ??? "

आणि जेव्हा... लालाचे मुळशीचे फार्महाऊस कुठे आहे याचे पूर्ण ज्ञान असलेला संजयबाबू...

... तुफान वेगाने मुळशीकडे चाललेला होता... आणि त्याचवेळेस...

.... दोन पोलिस बसलेल्या बुलेटला भीषण अपघात झाल्याचे वृत्त समजल्यामुळे प्रचंड वेगात कोरेगावकडे निघालेल्या पोलिस व्हॅनकडे मिश्कीलपणे बघत...

....... गाणे गुणगुणत मुल्ला खराडी फाट्यावरून लेफ्ट टर्न घेत होता... गुंजवण्याला जायला...

गुलमोहर: 

बेफिकीरजी,

कादंबरी मध्ये लिहिला नाही का भाग ? तिथे नाही आला वाट्ते.

रोज पहात होते नविन भागासाठी. आणी, हो, शिव्या ला * केल्या बद्दल आभारी.

काय बोलणार आज... एकाबद्द्ल वाचताना वाटत होत दुसर्‍याचं काय झाल असेल, उत्सुकता अतिशय वाढत गेली या भागात, अप्रतिम थरारनाट्य...... पु.ले.शु.

उत्सुकता फ़ाssssर ताणताय

अरे किती दिवसानी पुढचा भाग येतोय.

हे मराठी सिरीयलसारख जाणवताय. ते जसे आठवडेच्या आठवडे एकमेकांकडे बघत बसतात आणि मागचा आठवतात तसच् इथेही जुनेच भाग परततायत.

का वर्ल्ड ऑफ क्रिकेटचा परीणाम आहे ?

आपला पंखा
गुगु

थरार.............. हा एकच शब्द आहे माझ्याकडे........
लवकत पुढचा पण भाग वाच्तो, आता धिर धरवत नाहि...