अधीर आणि सुधीर व्यक्तीमत्व

Submitted by नरेंद्र गोळे on 1 March, 2011 - 21:15

अधीर (अ-प्रकारचे) व्यक्तीमत्व आणि हृदयविकार ह्यांचा संबंध आजकाल सर्वश्रुत झालेला आहे. किमान, डॉक्टर्स आणि त्यांच्या हृदयरुग्णांमध्ये. मात्र अ-प्रकारच्या व्यक्तीमत्वांची वैशिष्ट्ये, माध्यमांतल्या प्रसिद्धीपश्चातही संदिग्धच राहीली आहेत. अ-प्रकारच्या व्यक्तींची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आपण धानात ठेवायला हवी. एक म्हणजे वेळाच्या संदर्भातली 'तातडी', 'घाईगर्दी', 'अधीरता' आणि दुसरे म्हणजे सर्वकाळ जाणवणारा, सर्वव्यापी वैरभाव.

अ-प्रकारच्या वागणूकीची दोन मानसिक आणि सहा शारीरिक लक्षणे, डॉक्टर फ्रीडमन ह्यांनी ओळखलेली होती ती खालीलप्रमाणे आहेत.

मानसिक लक्षणे:

१. अधीरता किंवा सहज चाळवल्या जाणारा वैरभाव आणि
२. कायम जाणवणारा भविष्यातील येऊ घातलेल्या घटनांचा धोका.

शारीरिक लक्षणे:

१. कपाळ आणि वरच्या ओठांवर अतिरिक्त घाम येणे.
२. दात एकमेकांवर आवळल्या जाणे.
३. जीभ टाळूवर वरच्या दातांमागे सतत दाबल्या जाऊन खळगा पडणे.
४. वरच्या पापण्याची उघडझाप होणे.
५. जिवणीचे कोपरे आक्रसणे.
६. डोळ्याभोवती काळी वर्तुळे येणे.

माझ्या बाबतीत दोन्ही मानसिक लक्षणे कायमच हजर असत. सहाही शारीरिक लक्षणे कधीच जाणवली नाहीत. पण समोरच्याने नापसंत वक्तव्य करण्याचा अवकाश की माझ्या कपाळावर आडव्या आणि हो, उभ्याही आठ्यांचे जाळे सावकाश स्पष्ट होऊ लागे. ही लक्षणे दूर केल्याने मूळ भावनेत बदल संभवत नाही. म्हणून, मी मूळ भावनाच बदलण्याचा भरकस प्रयत्न केला आणि बर्‍यापैकी यशही मिळविले.

कधी कधी ह्यापूर्वी कधीच न पाहिलेल्या माणसाला भेटतांनाही त्याचे बाबत शत्रुभाव जाणवलेला मला आठवतो. हल्ली मी अकारण शत्रुत्व जाणवत असल्यास असे का? हा प्रश्न मनाला विचारतो. मग शत्रुत्वाची भावना एवढी प्रबळ राहत नाही असा माझा अनुभव आहे.

खालील दहा प्रश्नांची होकारार्थी उत्तरे आल्यास
आपले व्यक्तीमत्व अधीर (अ-प्रकारचे) आहे असे समजेल.

१. तुम्ही, बव्हंशी लोक हे सामान्यत: स्वार्थी आणि स्वकेंद्रित असल्याचे मानता काय?
२. कशासाठीही प्रतीक्षा करावी लागली तर तुम्हाला राग येतो काय?
३. तुम्ही इतरांबद्दल साशंक असता काय?
४. वेळाच्या मर्यादेत कामे करणे तुम्हाला आवडते काय?
५. तुम्ही नेहमीच घाई करत असता काय?
६. तुमच्या भावना तुमच्यापुरत्याच मर्यादित ठेवण्याकडे तुमचा कल असतो काय?
७. इतर लोक, ‘तुम्ही अकारण वैर घेत आहात’ असे समजतात काय?
८. इतर लोक तुम्हाला 'उगाच ताण घेऊ नका' असे सांगतात काय?
९. रिकामपणी, तुम्हाला ‘भविष्यात काय होईल?’ ह्याविषयी भयोत्सुकता जाणवते काय?
१०. तुम्ही जेव्हा रागावता, तेव्हा ते लोकांपासून लपवता काय?

खालील दहा प्रश्नांची होकारार्थी उत्तरे आल्यास
आपले व्यक्तीमत्व सुधीर (ब-प्रकारचे) आहे असे समजेल.

१. लोक सामान्यत: चांगले असतात, असे तुम्हाला वाटते काय?
२. कुणासाठीही प्रतीक्षा करत असतांना तुम्ही धीराने वागता काय?
३. बहुतेकदा, तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करत असता, त्यांचेवर विश्वास ठेवू शकता काय?
४. 'तुम्हाला वेळाच्या मर्यादेत काम करणे जमत नाही' असे लोक म्हणतात काय?
५. संधी मिळेल तेव्हा तुम्ही विश्रांती घेता काय?
६. तुम्ही इतरांवर विसंबून राहू शकता काय?
७. तुम्ही इतरांचे म्हणणे ऐकून घेता काय?
८. एका वेळी एकाच समस्येवर लक्ष केंद्रित करण्याकडे तुमचा कल असतो काय?
९. नियमितपणे सुट्टी घेणे, सहल काढणे तुम्ही महत्त्वाचे मानता काय?
१०. आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्ही शांत राहू शकता काय?

सम्यक जीवनशैली परिवर्तनांमध्ये वर्तणुकीतील बदलांचाही समावेश असतो. आणि आपले व्यक्तीमत्व अ-प्रकाराकडून ब-प्रकाराकडे नेण्यामुळे हृदयविकारापासून आपल्याला दूर जाता येईल असे आढळून आलेले आहे. मात्र तसे करण्याने तुमचे मूळ व्यक्तीमत्व बदलणार आहे. ते कदाचित तुम्हाला रुचणार नाही. दुसरे म्हणजे सुचविलेले बदल तुम्हाला तुमची स्पर्धात्मकता, अधीरता, 'विश्वाचा भार माझे शिरावर' असे समजण्याचा स्वभाव, हे सारे सोडायला लावतील. जीवनाचा वेग कमी करायला लागेल. निरोगी राहण्याची किंमत तुमच्या जीवनातील श्रेयसंपादनाचा वेग कमी करून तुम्हाला चुकवावी लागेल. निवड तुमच्याच हातात असते. आरोग्य आणि श्रेयसंपादन ह्यातला समतोल राखावा लागतो.

अगदी धावांचा दर राखणे किंवा धोका टाळून विकेट वाचविणे ह्यामधील समतोलासारखाच. फक्त मॅच जिंकण्याच्या उद्दिष्टाकडील वाटचाल अविरत, वेगाने सुरूच राहायला हवी. नाही का?

http://aarogyasvasthata.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही प्रश्नावलीतील दहाही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी यायला हवीत का? की काही किमान मर्यादा आहे? कारण माझी थोडी होकारार्थी दोन्ही याद्यात आहेत.

छाया, आगाऊ, जो, वर्षू, पालथा घडा, मामी आणि अरुंधती सगळ्यांना प्रतिसादाखातर धन्यवाद!

आगाऊ,
दोन्ही प्रश्नावलीतील दहाही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी यायला हवीत का? की काही किमान मर्यादा आहे? कारण माझी थोडी होकारार्थी दोन्ही याद्यात आहेत.>>>>
हे ठोकताळे आहेत हो. फार नेमकेपणाने घ्यायचेच नाहीत मुळात. तरीही एकदा का ह्या लेखाचा अर्थ मनात उतरला की, त्याचा जीवनातील प्रवेश नाकारण्यासारखा राहतच नाही!

जो, नावानेच सुधीर असल्याने इतरत्र धीर शोधण्याची तुला गरजच नाही, बाबा!

पालथा घडा,
अधीर लोकानाच टाइप ए type A पर्सनॅलिटी म्हणतात.>>>> पालथ्या घड्यात इतकेही उरत नाही हो!

मामी,
हो. बर्‍यापैकी सरळ समीकरण आहे हे. परिमाणे निराळी असतील कदाचित. मात्र सहभागी चल, नक्कीच सहभागी आहेत.