घर - अंतिम भाग

Submitted by बेफ़िकीर on 1 March, 2011 - 02:23

'घर' या कादंबरीचा हा अंतिम भाग आहे.

या कादंबरीचे वाचक, प्रतिसादक, प्रोत्साहक आणि स्पष्टपणे टीका करणारे... ह्या सर्वांनी वेळोवेळी ही कादंबरी पूर्ण करण्यात सहभाग घेतला.

ही कादंबरी संपवताना माझ्या मनात एक वेदनांनी युक्त अशी रिकामेपणाची भावना आहे.

मायबोली प्रशासनाचा व सर्व प्रोत्साहकांचा मी मनापासून आभारी आहे.

-'बेफिकीर'!

=========================================

"भेल और पानीपुरी जैसी चीजे खाकर जो है... पेट पूरा खराब होता है..."

"होने दो.. "

गगनने अगदी मोठ्या माणसाच्या आवेशात टाकलेल्या या सल्लावजा वाक्याचा बिगुलने पार कचरा केला. "होने दो"!

सगळेच हासत होते. वास्तविक कानपूरला राहिल्यामुळे बिगुलला चाट आयटेम्सबद्दल अधिक प्रेम निर्माण झालेले होते. पण तो हट्टी नव्हता. महिन्यातून एक दोन वेळा सारसबाग, पेशवेबाग आणि येताना हे प्रकार खाऊन घरी येणे यावर तो खुष असायचा. दुसरीत होता तो! आणि गगन आता हळूहळू घरातील एक सदस्य होण्याच्या मार्गावर होता.

गगनला इतरांनी स्वीकारायचे काहीच कारण नव्हते. खरे तर वसंताचे आधीचे हॉटेल बंद झाल्यानंतरच गगन हा विषय संपला असता. पण चुणचुणीत मुलगा होता आणि कामात तरबेज! जीभ मात्र वय वर्षे ऐंशी असल्याप्रमाणे चालायची. पण त्यानेही मनोरंजनच व्हायचे बहुतेकवेळा! तसेच, गगनला स्वतःमधले व इतर मुलांमधले अंतर व्यवस्थित माहीत होते. त्यात त्याला काहीही कमीपणा तर वाटत नव्हताच पण कधी वेदा, उमेश यांची बरोबरी करावी असेही वाटत नव्हते. तो काम तर इतके करायचा की त्याची आता गरजच वाटू लागली होती.

या नवीन घरात सगळ्यांनी एकत्र राहायला येताना 'गगन' या विषयावर वैयक्तीक आणि सांघिक पातळीवर भरपूर चर्चा झाली. अर्थातच, गगनच्या अपरोक्षच! पण गौरी जेव्हा म्हणाली की तो किचनमध्ये झोपेल आणि कामात भरपूर मदत करेल तेव्हा 'महिनाभर बघू ठेवू' असा निर्णय झाला.

आणि महिन्याची गरजच भासली नाही. एका आठवड्यातच गगनने स्वतःचे महत्व इतके वाढवून ठेवले की कुणाचे त्याच्याशिवाय पान हालेना!

स्वयंपाक, साफसफाई, बाजारहाट, आवराआवरी, इतर बाहेरची काही कामे, एकही बाब अशी नव्हती की जिथे गगनची मदत मागीतली जायची नाही. त्यात वर पुन्हा तो शायनिंग मारण्यासाठी बाबांची आणि आईंची खूप सेवा करायला लागला होता. ही कल्पना त्याला गौरीनेच सुचवलेली होती.

या सर्वांच्या जोडीला त्याचे डायलॉग्ज! आठवण काढून काढून हसायचे सगळे! त्याला त्या गोष्टीचे वाईट तर वाटायचेच नाही, उलट अभिमानच वाटायचा! की अनेक प्रकारे आपण या लोकांच्या उपयोगी पडतोय. हासवतोय, मदत करतोय! त्यामुळेच आपले स्थान अधिक बळकट होत आहे इथले आणि वडिलांवर आपला भार पडत नाही आहे.

वेदा आणि उमेश त्याला गगन म्हणूनच हाक मारायचे. पण बिगुल त्याच्यापेक्षा खूपच लहान होता. तो मात्र गगनदादा म्हणायचा. उमेश आता दहावी पास होणार होता तर वेदा सातवी! त्यामुळे त्यांची अभ्यासाची वर्षे होती. बिगुलला या नवीन घराच्या जवळपास खेळायची फारशी संधी, फारसे मित्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे तो अनेकदा गगनदादाबरोबरच काही ना काही खेळायचा, बहुधा क्रिकेटच!

घरासमोरच्या रस्त्यावर सहज क्रिकेट खेळू शकण्याचे दिवस होते ते!

गगनबाबत गौरीने गंभीर होण्याचे कारण नव्हते. पण तिच्या मनात विचार यायचा. हा मुलगा मदतच करतोय, देवाच्या दयेने आपल्याकडे भरपूर आहे, आपल्याला याची मदत झाली आणि त्यातून त्यालाही काम आणि पगार मिळत राहिला तर वाईट काय?

सुरुवातीला 'अगदी नोकर चाकर ठेवून आहेत' अशी उपहासात्मक कुजबूजही झाली होती अंजली वहिनी आणि तारका वहिनींमध्ये! पण गगनचे महत्व समजल्यापासून ते बंद झाले होते.

आता कुणीही घरात आले की पहिली हाक बायकोला न मारता गगनला मारायचे अन म्हणायचे..

"चाय वाय पिला रहे हो के नही??"

आणि त्यावर ठराविक उत्तर यायचे.

"मजबूर हूं साहब.. मजबूरकी न जुबान होती है न दिल.. "

असे म्हणून तो आधण टाकायचा ते सगळ्यांसाठीच असायचं! चहाचं प्रमाण प्रचंड झालं होतं आता घरातल्यांचं! कुणी आलं आणि चहा करा म्हणालं की गगन बाबा, दादा, अंजली वहिनी, अण्णा, राजू दादा आणि वसंता अशा सगळ्यांचाच अर्धा अर्धा कप चहा टाकायचा. आणि शेवटी स्वतःही अर्धा कप ढकलायचा घशात दर वेळी!

याच दरम्यान गगन अंजली वहिनींच्या गळ्यातला ताईत बनला होता. कारण रात्री बेरात्री अभ्यास करणार्‍या उमेशसाठी उठून तो चहा करून द्यायचा. उमेश त्यामुळे अभ्यासाला स्वयंपाकघरातच यायचा! मात्र गप्पांचा मूड निर्माण होतोय असे दिसले की गगन मोठ्या भावाप्रमाणे सांगायचा..

"बाते मर करना उमेशभैय्या.. बाते करनेके लिये जिंदगी पडी है.. अभी पढाई कर लो... छुट्टी मे तो बातेही बाते करनी है..."

आपल्याच घरात कामाला असलेल्या साधारण समवयीन मुलाचे हे बोल ऐकून उमेशला कधीच राग येऊ शकायचा नाही. याचे कारण असे की उमेशला हे माहीत होते. आपल्याच वयाचा असूनही हा गरीब असल्यामुळे शिकू शकत नाही, काम करतो, पडेल ते काम करतो आणि कितीही राबतो. त्याचमुळे आज घरात तो सगळ्यांना हवासा आहे. आपण फक्त या घरात जन्माला आलो आहोत म्हणून शिकून मोठे होणार आहोत. वास्तविक तोही तितकाच हुषार आहे, फक्त त्याला संधी नाही.

एक मात्र होतं! गगन मुलांमध्येही विलक्षण लोकप्रिय झाल्यामुळे मुळातच आयांनाही हवाहवासा झाला होता.

मात्र वसंता आता त्याला महिना तीनशे रुपये आणि त्याच्या वडिलांना महिना तीनशे रुपये वेगळे देऊ लागला होता. गगन आता मोठा झाला होता. त्याला पगार द्यायलाच हवा होता. हा खर्च मत्र वसंता स्वतःच बेअर करायचा.

गीतावहिनीचे पोट आता दिसू लागले होते. डॉक्टरांनी तिला विश्रान्तीचाच सल्ला दिलेला होता. हे पटवर्धनांचे घर होते. येथे या बाबीचे कौतुकच झाले. गीताला पूर्ण आराम मिळावा म्हणून आता गौरीने स्वतःच स्वतःचीही आणि गीताचीही जबाबदारी उचलली. गगनच्या अस्तित्वामुळे अंजली वहिनी आणि तारका वहिनींना बर्‍यापैकी आराम मिळू लागला होता. कारण त्या ज्या कामे करायच्या ती गौरीने गगनला करायला पहिल्याच दिवसापासून सांगितले होते.

अणि आज बिगुल मागे लागला होता..

"गगनदादा.. मला सारसबागेत जायचंय..."

अगदी, अगदी खरे सांगायचे तर गगनलाही वाटले. आपणही आज बागेत जावे. थोडे खेळावे, पाणिपुरी वगैरे खावी, बिगुलशी खेळत, मस्ती करत आनंदात हासत हासत घरी यावे. पण तसे वाटणे आणि तसे वाटत आहे असे सांगणे यातील फक्त पहिल्याच बाबीवर त्याचे नियंत्रण नव्हते. वाटण्यावर! सांगण्यावर मात्र नियंत्रण होतेच! नाही म्हणजे नाही बोलून दाखवायची स्वतःची इच्छा! मला आज सुट्टी हवी आहे, मला आज बागेत जावसं वाटतंय, मला आज पिक्चर पाहावासा वाटतोय, मलाही शाळेत जायचंय! अंहं! नाही बोलायचं मनातलं! त्याच्या वडिलांनी त्याला पाजलेले बाळकडू होते ते!

त्यामुळे तो बिगुलला समजावून सांगत होता की जायला नको! वास्तविक पाहता बिगुलला समजावून सांगण्यात त्याचा हेतू हा होता की कुणीतरी मोठ्या माणसाने म्हणावे बिगुलला, की जाऊ नकोस! म्हणजे मग आपोआप बिगुलला आपला राग येणार नाही. पण तसे कुणीच म्हणत नव्हते. त्यामुळे तो भारीतले भारी हिंदी डायलॉग आठवत बिगुलला कसा नकार द्यावा याचा विचार करत होता.

पण तेवढ्यात कुमारदादा म्हणाले..

"अरे ले के जाओ उसको.. तुमभी घुमके आओ.. कितना काम करते हो..."

भले शाब्बास! 'बडे साहब'नीच परवानगी दिली आणि वर आपले कौतुकही केले म्हंटल्यावर घरात कुणाची आता बिशाद आहे 'जाऊ नका' म्हणण्याची!

मानभावीपणे एक दोनदा नाही नाही म्हणत शेवटी गगन बिगुलला म्हणाला..

"बडे चाचा बोल रहे है इसलिये ले जा रहा हूं.. वैसे हमेशा ऐसे बागवागमे नही जाया करते..."

अण्णा आणि गौरीने दहा दहा रुपये काढून गगनजवळ दिले. रस्त्यातून नीट जा, सांभाळा, कुठलेतरी पाणी पिऊ नका, जास्त पाणीपुरी खाऊ नका, दमलात तर येताना रिक्षेने या वगैरे सूचनांचे गाठोडे मनात बंदिस्त करत गगनने बिगुलचा हात धरला.... आणि जोडगोळी रस्त्याला लागली....

==============================================

इकडे घरात आता सगळे गप्पांच्या मूडमध्ये होते.

गगन बाहेर गेल्यामुळे रात्रीच्या स्वयंपाकाची बरीचशी जबाबदारी गौरी आणि तारकावहिनींवर होती. अंजली वहिनी हल्ली थोरलेपणाची पूर्ण हौस फिटवून घेऊ लागल्या होत्या. नुसत्याच बसून गप्पा टाकायच्या अनेकदा! आणि तारकाही त्यांना कामाला हात लावू द्यायची नाही. 'आयुष्यभर काय राबणारच आहात का, जरा आराम करा' असे म्हणून त्यांना बाजूला करायची. नेमक्या तेव्हाच तिथे आई आल्या तर दोघी चूपचाप व्हायच्या आणि कामाला लागायच्या. आणि आई बाजूला गेल्या की एकमेकींकडे बघून पदर तोंडाला लावून हासायच्या.

"हे आले... हेगडेवार"

बाबांनी नुकत्याच दारात उगवलेल्या राजूकडे पाहात वाक्य टाकले. बाबा काही कमी नव्हते.

अण्णा - हल्ली शाखेत काय शिकवतात रे??

राजू - काय शिकवतात म्हणजे??

अण्णा - गर्भधारणेच्या काळात घ्यायची काळजी वगैरे का??

इकडे गीतावहिनी लाजून चूर झाली.

राजू - शाखा म्हणजे काय मधुमालती गुणेंचा दवाखानाय??

अण्णा - विचारलं आपलं..

वसंता - हा शाखेत जातच नाही..

अण्णा - मग?

वसंता - हा जुळं व्हावं म्हणून नवस करायला कसबा गणपतीला जातो..

राजू - वसंता.. पोरकटपणा गेलेला नाही तुझा अजून.. बिगुल कुठेय?

आई - गेला बागेत...

राजू - शेवग्याच्या शेंगा आणल्यात वहिनी... करून टाका आमटी आज..

तारका - हक्काची बायको आहे ना घरात?? तिला सोडायच्या ऑर्डरी...

राजू - घराला हल्ली घरपण राहिलेलं नाहीये..

अंजली - कसं राहणार?? एक शाखेत, एक दुकानात, एक बॅन्केत अन एक मिठाई विकतोय..

राजू - पुर्वी मी शेवग्याच्या शेंगा आणल्या की वहिनीच म्हणायच्या आमटी करते.. काय अण्णा??

अण्णा - तेव्हा तिचा स्वभाव चांगला होता.. गेले ते दिवस..

कणीक मळताना तसेच हात घेऊन तारका वहिनी ताडताड बाहेर आल्या..

तारका - पोळ्या करू की माहेरी जाऊ??

अण्णा - ठरवा बुवा.. आम्ही काय बोलणार??

तशाच ताडताड आत चालत गेल्या पुन्हा!

राजू - अण्णा.. हे धाडस मात्र तुलाच जमू शकतं हां??

अण्णा - कसलं??

राजू - तोंडावर 'माहेरी जा' सांगण्याचं..

अण्णा - अती झालं की स्फोट होतोच रे कधीतरी...

अंजली - काय अती झालंय हो तुम्हाला?? बिचारी राब राब राबतीय तारका..

आई - मग तू का बसलीयस??

अंजली वहिनी लगबगीने उठून आत निघाल्या..

आई - ए... बस इथे.. चालली लगेच..

गीता - म्हणजे काय हो?? अण्णाभावजींचं धाडस होतं म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला??

राजू - छे छे.. मी आपली त्याची स्तुती केली..

गीता - माझी ही दुसरी वेळ आहे.. दुसरं बाळंतपण सासरीच करतात म्हंटलं...

राजू - मग करा की... दुसरं काय.. तिसरं, चौथं सगळं सासरीच करा..

गीता - जिभेला तर हाडच नाहीये...

राजू - दादा?? तुला काही कल्पना आहे?? जीभ या अवयवाला हाड असते वगैरे??

दादा - ऐकून होतो..पण जीभेचा वापरच केलेला नाहीये मी लग्न झाल्यापासून.. त्यामुळे सांगता येत नाही..

अंजली - चवी बर्‍या कळतात पदार्थांच्या.. अगं.. मीठ कमी झालंय.. अगं.. जरा झणझणीत करत जा..

दादा - ते स्वगत असते..

अंजली - बरे स्वगत असते.. गौरी घरात आल्यापासून कधी म्हणाले नाहीत.. असं झालंय तसं झालंय...

वसंता - माझ्या बायकोच्या हाताला आहेच मुळी चव..

अंजली - हिला फ्रॉक घालता यायचा नाही तेव्हापासून स्वयंपाक करतीय मी तुमचा... गप्प बसा...

वसंता - त्याचमुळे तब्येती अशा आहेत सगळ्यांच्या..

तारका - हो क्का?? मग घेऊन बसा बायकोला आपल्या खोलीत... हातांची चव बघत...

गौरी आतमध्ये हसत होती.

अंजली - आणि कशायत हो तब्येती?? चांगले सहा सहा पोळ्या भरताय की..

वसंता - या घरात माझं कधी खाणं काढलं जाईल असं वाटलं नव्हतं..

अंजली - न काढायला काय झालंय.. तुम्ही आमच्या हाताच्या चवी काढणार ते चालतं का??

राजू - वसंता.. तू बोलू नकोस.. हल्ली दिवस स्त्रियांचे आहेत...

अण्णा - दिवस पहिल्यापासूनच स्त्रियांचेच असतात..

राजू - तसले दिवस नाहीत.. अण्णाला काही सुचतच नाही दुसरं..

अण्णा - काय करणार?? मलाही एक मुलगा हवा होता.. विरलं ते स्वप्नं...

तारका - तुमच्या स्वप्नांमध्ये आमचा जीव जातो..

अण्णा - तेही स्वप्नं विरलं..

आता मात्र गौरी बाहेर येऊन हसू लागली.

अंजली - तू काय गं दात काढतीयस?? ... आमची स्वयंपाकघरातून बाहेर यायची टाप नव्हती..

आई - तरी यायचीस की??

अंजली वहिनींना सासूकडून सलग दुसरा जोडा मिळाला तसे सगळेच हासले.

बाबा - अरुणा... कुणाला खरं वाटेल का तुला कर्करोग झालाय??

आई - म्हणजे?? तडफडून मरू की काय??

बाबा - काय बोलेल!

अण्णा - दादा? तू कधी ... ते .. हे केलयंस का रे??

दादा - ... काय??

अण्णा - अभक्ष्य... भक्षण..

आई - शी... शरद.. भरल्या घरात कसं रे सुचतं तुला असलं??

दादा - मी नाही केलं...

अंजली - माझा मेंदू खाणं हे अभक्ष्य भक्षणच आहे..

दादा - ती उपासमार आहे..

तारका - गीते.. तुला डोहाळे कसले आहेत गं??

अण्णा - शाखेत जायचे...

वसंता - म्हणजे राष्ट्रीय बाळंतसेवक संघ होणार आता..

दादा - शरद... तू फार बोलतोस वहिनींना..

पुन्हा तारका वहिनी बाहेर आल्या.

तारका - बघा बघा.. दादा भावजी घरात नसते तर मी नांदूच शकले नसते या इथे..

अण्णा - अगं तो मजा करतोय..

तारका - ते नाही कधी मजा बिजा करत... ते आहेत म्हणून तुम्ही तिघे दबून आहात....

वसंता - दादा.. तुझी अन अण्णाची भांडणं व्हायची का रे कधी लहानपणी??

अण्णा - हिम्मत आहे का माझी दादाशी भांडायची??

दादा - मी तसा गरीबच स्वभावाने

अण्णाने हात ओवाळले मोठ्या भावापुढे...

अण्णा - वा रे वा गरीब... तुम्हाला सांगतो अंजली वहिनी.. इतकी दादगिरी करायचा हा..

दादा - काय करायचो मी??

अण्णा - एक साधा विटी दांडू आणला माझ्यासाठी.. तर बाबांच्या मागे लागून स्वतःसाठी बॅट आणली..

दादा - त्याचा विटी दांडूशी काय संबंध?? मला बॅट हवीच होती...

अण्णा - पण अगदी तेव्हाच कशी रे??

दादा - मग? आता तू खेळणार विटी दांडू! मग मी काय बघत बसायचं??

अण्णा - मला खेळू दिलीस का विटी दांडू??

दादा - अंजली.. हा हूड होता.. याचं ऐकू नकोस..

तारका - अजूनही हूडच आहेत हे...

दादा - आता तो तुमचा दोघांचा प्रश्न आहे...

तारका - नाही नाही... एक सांगतीय आपलं..

अंजली - मला आठवतंय .. अण्णा भावजींनी देवानंद कट केलावता...

तारका - ह्यांनी?? कधी???

अंजली - आमचं लग्न झाल्यानंतर महिन्याभरात..

तारका - मग??

अंजली - ह्यांनी इतकं झापलंवतं तेव्हा भावजींना..

तारका - झापायलाच पाहिजे कुणीतरी..

वसंता - का झापलंवतं पण??

अंजली - केस नकोत का तेवढे?? फुगाही निघत नव्हता..

वसंता - पण म्हणून झापायचं??

अंजली - अरे नोकरी नाही काही नाही.. नुसते पोरींकडे बघत उंडारल्यावर झापणार नाहीत का??

तारका - तरीच.. अजूनही रस्त्यात मान वळवून वळवून बघतात कुणी दिसली की..

अण्णा - त्यात मला सुरुवातीची तू आठवतेस...

राजू - काही म्हणा.. पण मला नाही वाटत दादा दादागिरी करत असेल...

अण्णा - आपलीच माणसं उलटली तर करायचं काय?? या राजूसाठी मी काय काय त्याग केलाय..

राजू - जुनी हॉकी स्टिक आणि एक खेळण्यातली सायकल... हे ह्यांचे त्याग..

अण्णा - त्यावेळेस त्यालाही महत्व होते...

राजू - हो पण तू मन भरल्यानंतर मला दिल्यास त्या गोष्टी.. तोवर नाही...

अण्णा - जशा मला मिळायच्या तशाच मी पुढे द्यायचो..

दादा - शरद.. वाट्टेल ते बोलू नकोस.. तुला सगळं नवीन आणलं जायचं..

आई - एक मात्र आहे... कुमार खरच गरीब होता...

आईच्या या विधानावर कल्ला झाला. अण्णाही हासू लागला. लगेच गीतावहिनीने विचारले..

गीता - सगळ्यात हूड कोण़ होतं हो??

आता आई काय उत्तर देणार याच्याकडे सगळ्यांच लक्ष होतं... तर आई म्हणाल्या..

"हे"

बाबांनी कपाळाला हात लावला.

राजू - आई मीही गरीब होतो की नाही??

आई - तू?? डोंबल्याचा गरीब.. हट्टी नंबर एक..

गीता - कसला हट्ट करायचे हे??

आई - गौरीच्या आईच्या हातचे शंकरपाळे खायचे असायचे.. त्या अक्कांना काही उद्योग नाही का??

गौरी - अय्या हो.. मला आत्ता आठवलं.. हे सारखे यायचे शंकरपाळे खायला..

गीता - अजूनही तारका वहिनींच्या मागे लागतातच की.. शेंगांची आमटी करा.. आमटी करा म्हणून..

राजू - माझ्याहून हा जास्त लाडका पण सगळ्यांचा.. शेंडेफळ..

वसंता - शक्यच नाही... आई बाबांचं प्रेम दादावर जास्ती आहे..

आई - सरळ आहे.. पहिला मुलगाय तो...

दादा - अंजली... तुझं प्रेम सगळ्यात जास्त कुणावर आहे??

अंजली - हा काय प्रश्नय का???

दादा - सांग ना??

अंजली - तुम्हालाही माहितीय..

दादा - तरी सांग..

अंजली - सरळ आहे.. अण्णा भावजी..

अण्णाच्या डोळ्यात पाणी आले. अंजली वहिनींनी घरात आल्यापासून आपले जे जे केले होते ते क्षणात आठवले... अंजली वहिनींचे उत्तर ऐकून तारकालाही फार फार आनंद झाला...

दादा - आणि तुमचे??

तारका - माझं नाहीये कुणावर प्रेम बिम...

सगळेच गालातल्या गालात हासत होते. सगळ्यांना तारकाचे उत्तर माहीत होते...

अंजली - हिचं प्रेमही अण्णाभावजींवरच आहे..

आता सगळे मोठ्याने हासले..

तारका - ह्या! काहीही..

गीता - मग????

तारका - बसलेत की इथे हे.... द्वाड सगळ्यात...

वसंता - काय वहिनी... प्रेम आहे हे असं सांगतात होय???

गौरी - ह्यांच्यावर???

अंजली - हो मग?? तुम्ही वेगळे राहिलात त्या रात्री रात्रभर रडत होती ही..

दादा - शरद?? तुझं???

अण्णा - माझ प्रेम फक्त माझ्यावर आहे...

तारका - ते माहीतच आहे... त्याशिवायचं चाललंय..

अण्णा - मग सगळ्यांवर...

तारका - अंहं... सगळ्यात जास्त...

अण्णा - भाऊ काका..

बाबा - त्याच्यावर त्याचं स्वतःचंही प्रेम आहे की नाही काय माहीत..

दादा - मी सांगतो...

अंजली - सांगा...

दादा - ह्याचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर आहे..

अण्णा - ह्या... तुझ्यावर काय प्रेम करायचंय..

हासता हासताच अण्णाच्या डोळ्यात पाणी येत होतं..

अंजली - आणि तुमचं??

दादा - माझ सगळ्यांवर समान प्रेम आहे..

तारका - आता नाही हं भावजी.. आता सगळे उत्तरं देतायत.. तुम्ही पण दिलंच पाहिजेत..

वसंता - ह्याचं अण्णावरच असणार.. सगले सामील आहेत इथे एकमेकांना राजूदादा..

राजू - नायत्तं काय??

अंजली - ह्यांचं प्रेम खरच अण्णाभावजींवर आहे अगं...

दादा - असं काही नाही... राजू अन वसंताही माझेच आहेत...

अंजली - मला नका सांगू.. दिवसातून दहा वेळा शरद शरद करत असता...

दादा हासू लागला.

तारका - तुमचं कुणावर आहे राजूभावजी??

गीता - ह्यांचं कुणावरही नाहीये.. फक्त शाखेवर...

राजू - असंच काही नाही.. वेळ पडलीच तर मी कुणावरही प्रेम करेन..

गीता - कुणावरही नका करू... आपल्याच लोकांवर करा..

तारका - तुम्ही नाही का केलात कधी?? देवानंद कट??

राजू - अण्णाला झाप पडल्यावर हिम्मत होणार आहे का कुणाची??

दादा आणि सगळेच हासू लागले.

गीता - आता शेट्टी कट व्हायला लागलाच आहे..

राजू - माझ्यापेक्षा अण्णाला टक्कल जास्त आहे..

अण्णा - बायकोच्या स्वभावावर असतं बाबा सगळं..

तारका - पुन्हा माझा स्वभाव काढलात तर माहेरी जाईन...

अण्णा - वर्षानुवर्षं ऐकून ह्या धमकीची भीतीही वाटत नाही आणि उत्सुकताही...

तारका - एकदा मी निघून गेले की समजेल.. कसं वाटतं ते...

अण्णा - तुम्ही चौघी स्वतंत्र का राहात नाही कुठेतरी??

अंजली - तुम्हाला गिळायला कोण करून घालणार??

अण्णा - वसंताचं हॉटेल आहे.. चिंता नाही आता आमची...

अंजली - ए खरच.. गौरी... आता हॉटेलचं काय करणार??

गौरी - काही नाही... दादाभावजींना चालत असेल तर इथेच.. नाहीतर मग बाहेर जागा बघणार...

तारका - काढ गं बिनधास्त इथेच..

दादा - काय रे?? काढणारेस का हॉटेल? घरात??

वसंता - काय करू??

दादा - इथे एवढी गर्दी नसते..

वसंता - तेच ना..

दादा - नाहीतर आपल्या दुकानाच्या बाहेर लाव स्टॉल..

वसंता - अंहं.. जागा जास्त लागेल..

दादा - मग??

वसंता - तेच कळत नाहीये.. जागा बघावी असं वाटतंय..

गौरी - आईच्या घरात काढलं तर चालेल का??

दादा - हरकत काहीच नाही.. पण त्यांना उगाच या वयात त्रास..

गौरी - तिला काहीच त्रास नाही होणार..

दादा - आधीच घराच्या दोनच खोल्या राहिल्यायत त्यांच्याही..

गौरी - उलट सोबतच होईल तिला..

दादा - बघा मग.. काढायचं असलं तर काढा..

गौरीच्या चेहर्‍यावर समाधान आणि वसंताच्या चेहर्‍यावर उत्साह पसरला.. सगळ्यांनाच बरे वाटले.. आणि त्याच क्षणी दार वाजले..

राजूने दार उघडले तर दारात गगन उभा होता.. रडून रडून अर्धमेला झालेला गगन...

"बिगुल गाडीके नीचे आया... सूर्या अस्पतालमे ले गये उसको..."

===========================================

न्युरॉलॉजिस्ट डॉ. शहा गंभीरपणे कुमार पटवर्धनला सांगत होते...

"ही नीड्स टू बी ऑपरेटेड इमिजियेटली... इट्स अ‍ॅन एक्स्पेन्सिव्ह सर्जरी हाऊ एव्हर.. द एक्स्पेन्सेस वुड बी क्लोज टू वन अ‍ॅन्ड अ हाफ लॅख रुपीज.. लेट मी नो इन टेन मिनिट्स.."

"प्लीज गो अहेड डॉक्टर.. वुई हॅव नो चॉईस इट सीम्स.."

"नो.. वुई डोन्ट..."

पुन्हा सगळ्यांमध्ये आलेल्या दादाने रडणार्‍या राजूला आणि गीताला थोपटत सांगितले..

"बरा होणार आहे बिगुल.. काळजी करू नका.. फक्त एक ऑपरेशन करावे लागणार आहे..."

गगनला राजूने कानफडात मारून हाकलून दिले होते बापाकडे! गगन तसाच रस्त्यातून रडत रडत त्याच्या वडिलांकडे कायमचा निघून गेला होता.

जबरदस्त धक्का बसलेल्या मनस्थितीतच गीतावहिनी आक्रोशत म्हणून गेली होती....

"हिला पाहावत नाहीत फुललेले संसार.. दुसर्‍यांचे... कारण स्वतःचा संसार नाही.. आपल्या घराला लागलेली कीड आहे ही.. "

वसंता हतबुद्ध होऊन त्या प्रकाराकडे पाहात असतानाच आईही ओरडल्या..

"त्या अपघातात तूही का मेली नाहीस???? माझ्या घराचं वाटोळं करतीयस ते..."

नेसत्य वस्त्रानिशी गौरी मृतवत चेहर्‍याने घराबाहेर पडली होती. स्वतःच्या माहेरी जायला!

तिला अडवावे हेही वसंताला सुचत नव्हते. कारण सगळे धावत होते हॉस्पीटलमध्ये!

आणि भावनातिरेकाने तासभराने गौरीही सूर्या हॉस्पीटलमध्ये आली.. तिच्याशी बाकीचे तर जाऊदेत.. वसंताही एक अक्षर बोलला नाही... ती नुसतीच चौकश्या करत राहिली.. एकट्या कुमारदादाने सांगितले.. आत्ता ऑपरेशन करणार आहेत...

चौघांचे विषय पैशांचेच चाललेले होते... ताण ताण आणि नुसता ताण! गीतावहिनीच्या पाठीवर गौरीने हात ठेवला.. तो तिने झिडकारला आणि गौरीकडे असे काही पाहिले की गौरीला स्वतःच्याच अस्तित्वाची घृणा वाटावी... स्वतःचेच पाय ओढत गौरी हॉस्पीटलमधून बाहेर पडू लागली.. दाराबाहेर पाय टाकताना एकदाच तिने वळून वसंताकडे पाहिले.. त्याचवेळी नेमके वसंतानेही तिच्याकडे पाहिले.. आणि पुन्हा दुर्लक्ष करून तो दादाशी बोलू लागला..

सगळंच संपलेलं होतं!

गौरी बाहेर पडली त्यानंतर दहाच मिनिटात राजू सोडून सगळेच भाऊ विविध ठिकाणी पांगले.. पैशांची सोय करायला..

अण्णाचे आत्ताच गृहकर्ज आणि स्कूटरचे कर्ज झाल्यामुळे कर्जही मिळेना आणि उचलही! शेवटी ती एक व्यावसायिक बॅन्क होती. एक दोन मित्रांनी मिळून दहा एक हजार देऊ केले.. तेवढेच घेऊन अण्णा परतला...

तर वसंताला चितळ्यांनी वीस हजार दिले होते.. महिना हजार कापून घेणार होते ते! मोठा माणूस! नेहमीच मदतीला धावायचा!

राजूकडे तीस हजार होते! आत्ताच शनिवार पेठेत घेतलेल्या नवीन घरात सगळ्यांचीच बचत जवळपास कामी आलेली होती.

दादाला मात्र काहीच पैसे जमवता आले नाहीत. फक्त पाच हजार! कारण त्याने नवीन घरासाठी अण्णाचेही काही पैसे दिलेले होते. सर्वात मोठा भाऊ या क्षणी चांगुलपणामुळे सर्वात गरीब होता.

हॉस्पिटलमध्ये पासष्ट हजार भरले आणि सहा तास चालणार असलेल्या ऑपरेशनमध्ये काय होणार याची वाट बघत सगळे थांबले..

वसंता मात्र पुन्हा बाहेर गेला.. त्याला काही ओळखीच्यांकडून ताबडतोब पैशांची व्यवस्था करायला कुमारदादाने बाहेर पाठवले होते. आता आई बाबाही हॉस्पीटलमध्ये येऊन बसलेले होते.

मधेच एक नर्स बाहेर आली. तिच्याकडे चौकशी केल्यावर ती म्हणाली..

"कंडिशन सिरियस आहे.. काही सांगता येत नाही..."

गीतावहिनीचा आक्रोश बघूनच तारका आणि अंजली हमसत होत्या. राजू भिंतीवर तोंड दाबून रडत होता.

बिगुल! सगळ्यांचा लाडका बिगुल आतमध्ये जीवन मरणाच्या रेषेवर लटकलेला होता.. इकडे पडणार की तिकडे?? याचे उत्तर काही तासांमध्ये मिळणार होते..

मिळाले..

चार तासांनी बाहेर आलेली तीच नर्स पुन्हा घाईघाईत आत चालली होती.. तिला विचारल्यावर ती म्हणाली..

"तुम्हाला डॉक्टरच सांगतील.."

"हो पण.. आता कसा आहे तो???"

"बहुतेक.. डेन्जर नसावे आता..."

सुटकेचा नि:श्वास सोडेपर्यंत तोंड पाडून वसंता आत आला. कुमारदादाकडे त्याला मिळालेले दहा हजार देत म्हणाला..

"त्यांना आत्ता जर रिक्वेस्ट कर दादा.. इतकेच जमू शकतायत..."

कुमारदादा विनंती करायला हॉस्पीटलच्या प्रशासक डॉक्टरकडे गेला..

"मला पाऊन लाख जमवता आले.. जरा वेळ लागेल सगळे पैसे जमायला..."

"मला हे माहीत होते..."

"म्हणजे काय?? "

"एकदम आलेला खर्च आहे हा.. असे होणारच.. त्याला डिसचार्ज देण्याआधी द्या म्हणजे झालं.."

"ओक्के..."

"आणि.. समजा डेथ वगैरे झाली तर मात्र.. लगेच जमवावे लागतील..."

ते वाक्यही ऐकावेसे वाटत नव्हते दादाला! पण त्यांच्यासाठी तो एक व्यवसायच होता. कसाबसा दादा तिथून परत आला. ' ते आपल्याला मुदत देणार आहेत ' ही त्यातल्या त्यात बरी बातमी त्याने सगळ्यांना सांगितली.

तेवढ्यात अक्का तिथे आल्या. त्यांच्याशी आई एक शब्द बोलल्या नाहीत. दादा आणि वसंता मात्र बोलले. अक्कांची रडून रडून वाईट अवस्था झालेली होती.

डॉक्टर बाहेर आले. त्यांनी राजूला खुण करून केबीनमध्ये बोलावले तसे सगळेच तिकडे धावले. अक्का सोडून! कारण त्यांच्याशी कुणी बोलतच नव्हते.

चौघेही भाऊ डॉक्टरांसमोर बसले. बाबा, आई आणि तीनही वहिन्या दारातच उभ्या राहिल्या.

"यू सी.. द ऑपरेशन हॅज बीन सक्सेसफुल.. पण.. बराच मार लागला होता.. पोलिस केस केली आहेत की नाही ते माहीत नाही.... नसलीत तर करावी लागेल.. कारण हॉस्पीटलचे रेप्युटेशन आहे... तुमच्या मुलाला साधारण वर्षभर सांभाळावे लागेल अतिशय.. त्याचा आहार आणि दिनचर्या मी समजावून सांगेनच.. इथे त्याला पंधरा दिवस तरी ठेवावे लागेल... अजून दोन तासांनी तो शुद्धीवर येईल.. पण आई वडिलांशिवाय इतर कुणी त्याला भेटू नका.. तो वाचलेला आहे.. मात्र वर्षभर खूपच काळजी घ्यावी लागेल.."

डॉक्टर निघून गेल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकून गीता अंजली वहिनींच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडली. राजू वसंताच्या!

पोलिस!

तेवढ्यात एक पोलिस आणि दोन माणसे आली. पंचनामा करावा लागेल सांगितले. अक्का निघून गेलेल्या दिसत होत्या. पण कुणालाच त्याचे काही वाटले नाही. उलट बरेच झाले असे वाटले.

पंचनाम्यात पोलिसाबरोबर आलेल्या साक्षीदारांनी सांगितले..

"तो टेम्पो वाट्टेल तसा जात होता.. ब्रेक फेल झाले होते... त्या दुसर्‍या मुलाने याला ढकलून बाजूला करायचा खूप प्रयत्न केला.. पण नाही करता आले.. टेम्पोवाल्याला अटक केलेली आहे... त्या दुसर्‍या मुलाच्या पायालाही खूप लागले आहे... पण त्याने काहीच केस केलेली नाहीये.. "

ऐकून सगळेच हादरलेले दिसत होते. मात्र वसंताच्या डोळ्यात आलेले दोन अश्रू कुणालाच जाणवले नाहीत! ते अश्रू गगनसाठी होते. गगनची आजवरची ती सर्वात मोठी कमाई होती. साहेबाच्या डोळ्यात त्याच्यासाठी दोन अश्रू येणे!

वसंताला जाणवले.. या म्हणजे याच क्षणी गौरीला भेटायला हवेच.. झाले त्यात तिची चूक काय???

दादाला 'गौरीकडे जातोय' असे सांगून वसंता तीरासारखा बाहेर पडला..

वीस मिनिटे लागली त्याला अक्कांच्या घरी पोचायला..

एका पलंगावर गौरी झोपलेली होती. अक्का पलंगाच्या पायाशी बसून मुसमुसत होत्या.

गौरीला भलताच धक्क बसलेला असावा. किंवा ताप आलेला असावा.

"गौरी... मी तुला न्यायला आलोय.. तुझी काहीच चूक नाहीये.. सगळ्यांना मोठ्या मनाने माफ कर आणि घरी चल.. बिगुलही वाचलाय... "

गौरीने मान वळवून पाहिलेही नाही वसंताकडे!

अक्कांनी मात्र तीव्र नजरेने वसंताकडे पाहिले. ती नजर! ती नजर पाहूनच वसंता शहारला! रडून रडून डोळे लाल झाले होते त्यांचे!

अचानक त्या म्हणाल्या..

"तो गगन आणि त्याचा बाप गेलेत केस दाखल करायला लकडी पूलावरच्या चौकीवर.... तू इथेच थांब आता..."

वसंताला संताप आला. गौरीने नक्कीच छळाची तक्रार केलेली असणार! किंवा गगनला लागल्याची!

"... क... कसली तक्रार?? आम्ही काय केलंय तिला????"

अक्कांनी भेसूर नजरेने वसंताकडे पाहात ते भयानक शब्द उच्चारले..

"मेलीय ती... आत्महत्या केली तिने... झुरळांचे औषध पिऊन.. त्याची तक्रार करायला गेलेत ते..."

मटकन खाली बसला वसंता! मात्र त्याच क्षणी दादा आणि अण्णा तिथे आले..

दादा वसंताला पाहून म्हणाला..

"वसंता.. अरे अक्कांनी पैसे भरलेत हॉस्पीटलमध्ये.. सगळे... अक्का.. कुठून आणलेत इतके पैसे??"

अक्कांनी दादाकडे पाहात सांगितले..

"स्त्रीधन मोडलं..... गौरीचं.... "

========================================

वसंता आता पुन्हा वेगळा राहायला लागलेला आहे. काहीच मिळालं नाही आयुष्यात! नाही शिक्षण, नाही स्वतःचं घर, नाही प्रेम! आणि घरातले सगळे आता त्याला घरी बोलावतात खरे... पण तो पाय टाकत नाही तिथे... अक्का गेल्या मागच्याच वर्षी... वसंतानेच केले सगळे..

बिगुल आता चौथीला आहे.. मस्त मजेत आहे... हुंदडत असतो.. उमेश कॉलेजला आणि वेदा दहावीला.. शनिवार पेठेतील घरातच सगळे राहतात..

वसंता चितळ्यांकडे नोकरी नाही करत आता... पुन्हा डेक्कन विभागात एक खोली भाड्याने घेऊन राहतो.. आणि तिथे दुकान चालवतो... आता मात्र त्या दुकानाचे नांव बदलले आहे.. एटीजी मिसळ नाहीये आता नाव... आता नाव आहे... गौरी - गगन मिसळ सेन्टर....

सिगारेटी ओढायचाच... दारूही प्यायला लागलाय.. भरपूर.. आणि रोज..

गौरीच्या आत्महत्येची केस केव्हाच निकालात निघाली.. पटवर्धन कुटुंबीय किती प्रेमळ आहेत याच्या साक्षी सदाशिव आणि शनिवार पेठेतील सगळ्यांनीच दिल्या..

इतकेच काय... अक्कांनीही 'माझ्या मुलीची तिच्या सासरबाबत काहीच तक्रार नव्हती' असेच सांगितले..

गगन आता भिकारदास मारुतीपाशी एक टपरी चालवतो.. सिगारेट, गुटखा, तंबाखु, सुपारी वगैरे!

'घर'!

ते 'घर' केव्हाच गेले.. त्याचे घरपणही गेले... कुमारदादा अगदी लहान असताना त्याला घेतलेली तीनचाकी खेळण्यातली सायकल... जी बिगुलही लहानपणी खेळला होता... ती मात्र अजूनही साक्ष देते त्या सुंदर जमान्याची...

वसंत रामकृष्ण पटवर्धन!

आता रोज रात्री गौरीचा फोटो छातीशी घेऊन ओक्साबोक्शी रडत कधीतरी पहाटे झोपी जातात...

.....

गौरी त्या घरातली कधी झालीच नाही... बाकीचे मात्र त्या घरातले होते...

आणि... त्या घरातले सगळे आजही जिवंतही आहेत.....

फक्त एकच गोष्ट नाहीये आता या जगात... ती म्हणजे...

'ते घर'!

======================================

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

अतिशय, टुकार, तद्दन टाकाऊ, भिकार, फालतू....
शेवट.....

चायला यांच्याच घरात बरे रोज कोण न कोण गाडीखाली येत

बकवास

बेफिकीर असा अलका कुबलच्या शीणीम्या प्रमाणे काय हो रडका शेवट केलात?

मला जमल्यास स्पष्टीकरण द्या , म्हणे असंच शेवट का करावासा वाटला?

पेंढारकरांचा शेवट पण रडकाच झाला होता

प्रसन्न, रोहित व विनायक,

स्पष्ट प्रतिसादाबद्दल आभारी आहे. विचार करून बघतो मला काही इतर सुचले असते काय याचा!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

अरे बापरे.........
संपल पण..
कोणाच्या संसाराचा असाही शेवट असतो......................
very unexpected????
खुप विदारक शेवट.....

छान लिहिलय... पण गौरीला का आणि कसली शिक्षा??? शेवट नाही आवडला......
पण लिखाण कौशल्य अप्रतिम आहे तुमचं.....

(अवांतरः मायबोली जॉईन करुन एक दिवस नाही झाला तर सगळीकडे निगेटीव्ह प्रतिसाद द्यायला तयार असतात माणसं :राग:)

जेव्हा गगन आणि बिगुल बाहेर जातात आणि लांबलचक संवाद दिसला तेव्हाचं वाटलं की अपघात..........
प्रेडिक्टेबल होतय जरा

शेवट वाईट झाला पण काहि प्रमाणात पटला. माझ्यामते एकदा एका बद्दल जे प्रथमदर्शनी मत होत तेच कायम रहात त्या व्यक्तीने कितीहि बदलायचा प्रयत्न केला तरी....म्हणुनच काहिही वाईट झाले कि त्याच व्यक्तीच्या माथी ते मारले जाते. असो मला आवडला शेवट. उगाच कथा कादंबरीतला नाहि वाटत.

आता पुढची कादंबरी कधी?? आणि कुठची??

बेफिकीरजी , कादंबरी खूपच छान होती. प्रत्येकाला पाहीजे तसा शेवट करायचा म्हणजे अवघड आहे. एक चांगली कादंबरी दिलीत त्याबद्दल धन्यवाद . पुढच्या कादंबरी साठी शुभेच्छा.

आवडली. ही पण कादंबरी. मनुष्याच्या विविध स्वभावाचं वर्णन छान जमतं तुम्हाला.

मला शेवट गुंडाळल्यासारखा वाटला...पण असं होतं...घरात अनेकदा एखाद्याला वाईट ठरवलं जात शेवटपर्यंत....त्याने स्वतःला कितीही सिद्ध केलं तर....चांगभलं यांची प्रतिक्रिया खूपच लाउड आहे. विशेषतः त्यांच्या सभासत्वाला २४ तासही झालेले नसतांना...निगेटिव्ह प्रतिक्रिया द्यायलाच विशेष करुन इथे आले आहात का हो मास्तर

अपेक्षेप्रमाणे मेलोड्रामॅटिक शेवट.
बिचारी गौरी हकनाक मेली या घरच्यांच्या गोंधळात.
पण त्या चार भावांनी एकत्र एक घर घेऊन रहाण्याच्या नाटकी शेवटापेक्षा हा शेवट बराच बरा म्हणावा लागेल.
काही म्हणा कादंबरी वाचनीय होती.काही प्रसंग छान रंगवले होते.
एखादे माणूस अपशकुनी असण्याची अंधश्रद्धा दूर करावी असं तुम्हाला वाटलं नाही याचं वाईट वाटतं. अर्थात तुम्ही अनिस वाल्यांचं काम केलं पाहिजे ही अपेक्षा नाहीच.

थोडि प्रेडिक्टेबल होति कादंबरी पण खूपच सहज आणि सुंदर होति. अपघात कदाचित रिपीट बरेच वेळा झाले. तरीपण एकदाहि असं वाट्लं नाहि कि वाचु नये. अतिसुंदर संवाद. नेहमिच पुढ्च्या भागाची वाट पाहणे कायम असायचं. एक रितेपण येतं तुमचि कादंबरी संपली की. आता पुढे काय? पूलेशु.

बेफिकिरजी,
ही कादंबरी काही जमून आली नाही. खर सांगायच तर गेले दोन तीन भाग तसे विस्कळीत वाटले होते. आणि शेवट पण तसा ठीक वाटला नाही. बाकीच्या कादंबर्यांसारखा ह्या कादंबरीत तुम्हाला सूर सापडला नाही अस वाटल.
पण काही गोष्टी छान जमून जातात.. काही नाहीत .. कदाचित म्हणूनच तुम्हालासुद्धा रिकामेपणाची भावना आहे??
असो.. पुढच्या कादंबरीच्या प्रतिक्षेत..

पु. ले. शु.

मला वाटले होते वसंत आणि गौरी पुन्हा वेगळे राहायला लागतील, गगनसोबत. बाकी अगदी अविश्वसनीयदेखील असा शेवट नाही.
आता पुढे काय? कोणती कादंबरी घेताय? मला वाटत "द वर्ल्ड ऑफ डिफरन्स" चे भाग आता पटापट यायला हरकत नाही..

शेवट माझ्यामते सुखद नसला तरी जरा वास्तववादी झाला असे मी म्हणेन. थोडासा पराकोटीला गेला असल्याची शक्यता आहे पण They lived haapily ever after पेक्शा बरा आहे.

वाईट नक्कीच वाटल पण वाचुन.

बाकी तुमच लिखाण वाचायला खुप आवडत. आम्हाला एवढ्या सातत्याने चांगल्या कथा कांदबर्‍या दिल्याबद्द्ल मनापासुन धन्यवाद.

पुढ्च्या लेखनासाठी शुभेछा!

कादंबरी छान होती पण शेवट फारच दुखी होता.
"द वर्ल्ड ऑफ डिफरन्स" फारच छान चालु आहे. त्याचे भाग येउ द्या पटपट. नविन कादंबरीची उत्सुक्ता आहे.

पु.ले.शु

मला आवडला शेवट खूपच सत्याला धरून होता ..(नो ओफेन्स प्लीज) लिखाणाच्या बाबतीत म्हणाल तर मी तरी बेफिकीरजींची पंखा आहे त्यामुळे त्यांनी लिहिलेलं भावतं मला Happy

भुषणराव, शेवट वाईट दिलात्....
पण गौरी आणि वसंताच्या आयुष्याला ग्रुहीत धरलं तर पटला आहे.....!

हर फिल्म का एण्ड हॅप्पीएण्ड नही होता..!

पुढच्या कांदबंरीच्या प्रतिक्षेत..!

मला वाटले दोन्ही प्रकारचे शेवट लिहिलेत. जर दुख्खी शेवट नको असेल तर अर्ध्या भागानंतर शेवट समजता येइल काय?

Pages