इथे जे सांगणार आहे, तो एक अनुभव आहे, माझा. वडिलांनी खूप लहानपणापासून, सातत्यानं माझ्या मनावर तरंगत ठेवलेला विषय म्हणजे अध्यात्मं. विवेकानंद आणि त्यांची शिकवण म्हणजे त्यांच्या अतीव जिव्हाळ्याचा विषय. ती आवड राहिली. लग्नानंतरही योगायोगाने जोपासली गेली.
सिडनीतल्या वेदांत केंद्रातर्फे एक "स्पिरिच्युअल रिट्रीट" आयोजित केलं जाण्याची बातमी कळली. ’ह्यावेळी तू जा...’ असं नवर्याने बोलून दाखवल्यावर मी उड्या मारायच्या बाकी ठेवल्या होत्या... त्यामागे, ’जा बाई जा... चार दिवस जरा आम्ही निवांतपणे घालवतो’ असेल काय? वगैरे सुद्धा माझ्या मनात आलं नाही.
तीन डोंगरांच्या कुशीत, मूळ शहरापासून शंभरेक किलोमिटर दूर, जिथे मो-बाईलवेडेपणा करता येत नाही अशा ठिकाणी हे रिट्रीट होतं. चार दिवस. संध्याकाळी सात ते सकाळी साडेसात मौन, पहाटे चार वाजता सुरू होणारा आश्रमाचा कार्यक्रम, योगासनं, दिवसातून दोनवेळा ध्यान, आश्रमात अंगमेहनत इ. इ. कशालाच न घाबरता मी नाव दिलं आणि गेलेही. माझ्यासारखेच अजून एकोणपन्नास जण होते. त्यात, ज्यांचा शब्दन-शब्द ऐकावा असे वेदांत केंद्रातले मोठे वयोवृद्ध पूर्णानंद स्वामी, शिवाय आत्मानंद अन वेदानंद स्वामी, असे आम्ही नेहमी आश्रमात बघायचो ते दोन स्वामी आणि एक आम्ही न बघितलेले अगदी तरूण- स्वामी ईशानंद.
बरीचशी वयस्कर जोडपी, काही तरूण जोडपी, काही एकटे तरूण आणि तरूणीही... मीही त्यात
. एकूण जमाव अतिशय आनंदी. आयुष्याच्या अनिर्बंध प्रवाहाला काहीतरी बांध घालता येण्याजोगी कला शिकायला मिळावी... किमानपक्षी त्या दिशेने विचार तरी व्हावेत ह्याच उद्देशाने स्वत:हून एकत्र झालेला.
पहिल्या दिवशी संध्याकाळी एकेक करीत गाड्या आल्या. आम्ही सगळेच एकमेकांना मदत करण्यात गुंतलो. केंद्राचे सगळे तरूण स्वामी कुणाची खोली कुठे, आंघोळी-पांघोळींची व्यवस्था, औषधोपचार, आजूबाजूचा परिसर असलं सगळ्यांना सांगण्यात गुंतलेले. ईशानंद स्वामी, आलेल्या वयस्करांचं सामान उचलून त्यांच्या त्यांच्या खोल्यांमधून ठेवीत होते. आम्ही सगळेच संध्याकाळी सातच्या आत सगळं मार्गी लावायच्या पाठी लागलो. त्यानंतर मौन... हातवार्यांनीही बोलायचं नाही.
माझ्या खोलीत एक मध्यम वयाच्या दाक्षिणात्य काकू होत्या. शांततेत रात्रीचं जेवण उरकुन, दुसर्या दिवसाचा गजर लावून झोपलो.
गजराच्या आधीच मला जाग आली... कसल्याच आवाजाने नाही. किंबहुना पाखरंही उठायच्या आधीच्या निरव शांततेनंच असणार. माझ्या मोबाईलमधला अलार्म तानपुर्याच्या आवाजाचा आहे.... शहरात इतर आवाजांत तो इतका छान वाटतो म्हणून सांगू... पण त्या पहाटेवर त्या आवाजानेही ओरखडे उठल्यासारखं वाटलं.
पटापट आवरून मोठ्ठ्या ध्यानाच्या सभागृहात आलो. एका स्वामींनी थोडक्यात दिलेल्या सुचना ऐकत सगळेच ध्यानाला बसत होते. एक एक करीत सगळेच गोळा होत होते. माझ्या खोलीतल्या काकू आल्या. त्यांना जमिनीवर बसता येत नसल्याने ईशानंद स्वामींनी उठून त्यांच्यासाठी खुर्ची आणून दिली. कृतज्ञतेने त्यांच्याकडे बघत, काकू बसल्या आणि त्यांनी डोळे मिटले.
अजून काही साधक आले ज्यांना वयोपरत्वे खाली बसता येत नाही. ईशानंद स्वामी, लक्षं ठेऊन त्यांनाही मदत करीत होतेच.
संन्यास म्हणजे कोण रूक्षपणा, कहर साधना, तपश्चर्या, निर्लेप कोरडेपणा... असलं काही डोक्यात घेऊन आलेल्या कुणालाही ह्या तरूण स्वामींचं असं धावून धावून मदत करणं, नक्की आश्चर्यजनक वाटलं असतं. ईशानंदांनी तत्परतेने केलेली कोणतीही सेवा, छोटीशी गोष्टं, आमचे मोठे, वयोवृद्ध स्वामी पूर्णानंद स्वामी मोठ्या कौतुकाने बघत होते. अधे-मधे स्निग्धं हसूही सांडत होतं. क्वचित प्रसंगी त्यांच्या सशक्तं तरूण हातांचा आधार घेण्यासाठी मोठे स्वामी पायर्यांशी थांबलेलेही दिसत.
नाश्त्याच्यावेळी, कुणाला अजून कॉफी हवी असल्यास जग घेऊन ईशानंद आमच्यात फिरत होते. मी, काकूं अन अजून दोघं-तिघांच्या कंपूकडे येता येताच पूर्णानंदांची हाक आली तसे, हातातला जग माझ्या हातात देऊन गेलेही. मी उरलेल्यांना कॉफीवाटप केलं.
दुपारच्या जेवणाला सगळे रांगेत उभे राहिलो. ईशानंद सगळ्या वयस्कर साधकांना बसायला जागा, पाणी बघत होते, किंवा वाढूनही आणत होते. मधेच त्यांनी एक पान वाढून मोठ्या स्वामीजींना नेऊन दिलं.
मी माझं पान घेऊन, माझ्या खोलीतल्या काकूंसहं एका डेरेदार झाडाच्या पारावर बसले. साधा भात, कोशिंबीर, डाळ, दही बेत होता. जेवण रुचकर अन भरपूर होतं. बसलो होतो तिथून वरून सगळेच दिसत होते... मन लावून जेवताना. ईशानंद मोठ्या स्वामींना हवं-नको बघून मग आपलं वाढून घेऊन इतर दोन स्वामींसोबत बसलेले दिसले.
आमच्या इथे गप्पा चालल्या होत्या.. काही काही पारमार्थिक... बर्याचशा सांसारिक.... मुलं, बायका, नवरे, नोकर्या असलंच काहीतरी तोंडीलावणं.
"भात आवडायचा नाही... इतर इंडियन मित्रांच्या घरचं बघून रोटी हवीच असायची... नाहीतर डोसातरी. नुस्त्या भातावर जेवलाच नाही कधी", काकू ईशानंदांकडे बघून म्हणाल्या.
"तुम्ही ओळखता त्यांना?", संन्याशाचा सांसारिक भूतकाळ त्याच्यासकट सगळ्यांनीच विसरायचा असतो, अशी आपली माझी समजूत.
"हो तर.... माझा मुलगा" काकू म्हणाल्या अन हसून पुढला घास घेतला.
माझा हातातला घास हातात अन तोंडातला तोंडात. कालपासून ही माऊली अन तिचा संन्यास घेतलेला मुलगा एका छपराखाली वावरतायत. कुठे अगदी तिळमात्रंही त्यानं आई म्हणून झुकतं मापच काय पण, ओळखसुद्धा दिलेली दिसली नाही. काकूंनीही एकदाही उल्लेख तर सोडाच पण मदतीची अपेक्षाही दाखवली नाही. तिच्यालेखी जसे ते दोन स्वामी तसाच हा ही.
मूल म्हणून ईशानंदांच्या वेषात शिरता येईना अन आई म्हणून तर ह्या माऊलीच्या मनाच्या दारातही उभं रहायचं धाडस होईना. नक्की काय अन कसं निभवतायत हे दोघं... ते ही इतकं सहज? कसं शक्यं आहे? किती अन काय काय माझ्या मनात दाटून आलं म्हणून सांगू.
आपसूक हातातला घास पानात परतून ठेवत मी स्तब्धं झाले.
माझी अवस्था काकूंच्या ध्यानात आली. माझ्याकडे वळून त्या म्हणाल्या, ’... मी ठीकच आहे. सुरूवातीला खूप खूप जड गेलं, बघ.
विवेकानंद मोठेच... हवेतच... पण ते शेजारचीच्या घरात जन्माला यावेत... आपल्या घरात नको ते.. हाच विचार होता सुरूवातीला.
माझी कूस असामान्यं करण्याची संधी दिली देवानं... त्यासाठी देवाची, ईशानंदांची ऋणी आहे मी... जेव तू.... आपल्याला पुढच्या लेक्चरला जायचय ना?’
किंचितही न ढळलेली ही माऊली, तिचा धारधार कर्मयोग अन तिला ध्रूवपदावर बसण्याची संधी देणारे स्वत: कर्मसंन्यासी ईशानंद.... साक्षात माझ्यासमोर होतं, हे.
हे काय आहे? नक्की आपल्याला काय होतय ते कळेना. काय अनुभवतेय मी...
अगदी माझ्यासमोर बसून अत: पासून इतिपर्यंत... हे निळं आकाश देवानं रंगवावं... त्यात मोजके ढग, पक्षी, उगवू पहाणार्या सूर्याची आभा.... हे सगळं सगळं माझ्या समोर घडावं.... असं वेड्यासारखं झालं.
हे त्या करनाटकूचंच एक उदात्तं नाट्यं. कोणत्याही बाजूने ह्या नाट्याकडे बघू गेल्यास ’ठकची पडीले’ होत होतं.
नकळत हातातलं ताट बाजूला ठेऊन मी काकूंच्या पायावर डोकं ठेवलं. गडबडीने पाय बाजूला घेत मला उठवत त्या म्हणाल्या, ’वेडी का तू?... स्वत: इतके सगळे स्वामी आपल्यासमोर असताना, माझे पाय धरायचे...’
’माये, ह्या सगळ्या स्वामींतत्वांना जन्मं देणारी, स्तन्यं पाजून हाडा-मासांत घडवणारी तू..... त्यांच्यातल्या परम-तत्वाची त्यांना जाणीव करून देणारीही... कदाचित तूच....तुला आधी नमन.
वाटलच तर तुझ्या धैर्यातला एक.. अगदी एक इवला कण माझ्या रित्या झोळीत टाक....
नाहीतरी अशी माऊली माझ्या आस-पास वावरली.... ह्यानंच धन्यं आहे मी... मी, एक माणूस म्हणून.... एक आई म्हणून’....
प्रत्यक्षात ह्यातलं काहीही ओठांबाहेर पडलं नाही. त्यांच्या समोर लहान होऊन अत्यानंदाने अश्रू ढाळता आले मात्रं.... हीच पुण्याई.
अप्रतीम! नेहमीसारखेच.....
अप्रतीम! नेहमीसारखेच..... दाद, तु खुप छान लिहितेस... काळजाला भिड्णारे तुझे लि़खाण असते. तु तुझा कथासग्रह का नाहि काढत?
असं कसं जमु शकतं!
हे कसं बरं निसटलं नजरेतून ?
हे कसं बरं निसटलं नजरेतून ?
.... दाद, काय लिहू ? त्या माऊलीला _/\_ !
.
.
दाद, लेख छान खुलवलाय. मायेत
दाद,
लेख छान खुलवलाय. मायेत राहूनही मायेपासून अलिप्त कसं रहायचं याचा वस्तुपाठ आहे हा. शिवाय मायलेकरे एकमेकांना ओळखही दाखवतात. संन्याशाने पूर्वायुष्य विसरायचं असतं हे खरंय. मात्र निरुपद्रवी स्मृतींचा उगीच बाऊ न करता आहेत तश्याच स्वीकारलेल्या दिसतात दोघांनी. यालाच सहजभावानं वावरणं म्हणता येईल.
हाच सहजभाव तुमच्या लेखातही उतरलेला दिसतो. तुम्ही सांगूनही खरं वाटंत नाही की, अनुभव लेखबद्ध करण्यासाठी दोन वर्षे तुम्ही स्वत:शीच झगडलात!
लेखाबद्दल आपल्या चरणीही सादर प्रणाम!
आ.न.,
-गा.पै.
हा ही अनुभव पुन्हा पुन्हा
हा ही अनुभव पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा........
अक्षरांचा नेमका अर्थ जाणून त्या अक्षरांची अशी योजना केली जाते जिथे अक्षरांच्या सहाय्याने अक्षरांच्या पलिकडले वाचकापर्यंत पोहोचताना ना अक्षरे उरतात ना दाद - ही किमया "दाद" ही "अक्षरयोगिनीच" करु जाणे........
खूपच सुंदररीत्या शब्दबध्द
खूपच सुंदररीत्या शब्दबध्द केलाय हा अनुभव...
प्रतिसादासाठी शब्दच सापडत
प्रतिसादासाठी शब्दच सापडत नाहीयेत.
वाह सुरेख अनुभव.
वाह सुरेख अनुभव.
परवा अचानक या लेखाची आठवण
परवा अचानक या लेखाची आठवण झाली.
पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला पण परत एकदा स्तिमित व्हायला झालं.
>>>>>साधी ओळखही दाखवायची नाही
>>>>>साधी ओळखही दाखवायची नाही, हा नियम उभयपक्षी पाळला जातो. Sad
केवढं रडू येत असेल.
सुरेख दाद ! प्रतिसादही सुंदर
सुरेख दाद ! प्रतिसादही सुंदर आहेत.
दरवेळी असं नकळत काळजाला हात घालणं कसं काय जमतं तुम्हाला!
तुम्ही म्हणालाय तसं खरतर अगदी छोटीशी घटना एखाद मिनिटाची. पण त्याचा साक्षात्कार किती प्रभावीपणे पण तरीही नजाकतीने मांडला आहे.
ज्ञानेश्वरांचे दृष्टांत जसे नाजूक पण भावविभोर अवस्थेत नेतात तसेच काहीसे वाटले. सुंदर, प्रत्ययंकारी अनुभूती. खरंच शब्द कमी पडताहेत.
तुम्ही लिहावं आणि आम्ही परत परत अनुभवावं हेच खरं.
दाद, तरल, मनाच्या पारदर्शक
दाद, तरल, मनाच्या पारदर्शक स्थितीत आलेला विलक्षण अनुभव तुम्ही अगदी तसाच शब्दबद्ध केला. वाचताना आदी शंकराचार्य आणि त्यांची आई आठवली.
Pages