इथे जे सांगणार आहे, तो एक अनुभव आहे, माझा. वडिलांनी खूप लहानपणापासून, सातत्यानं माझ्या मनावर तरंगत ठेवलेला विषय म्हणजे अध्यात्मं. विवेकानंद आणि त्यांची शिकवण म्हणजे त्यांच्या अतीव जिव्हाळ्याचा विषय. ती आवड राहिली. लग्नानंतरही योगायोगाने जोपासली गेली.
सिडनीतल्या वेदांत केंद्रातर्फे एक "स्पिरिच्युअल रिट्रीट" आयोजित केलं जाण्याची बातमी कळली. ’ह्यावेळी तू जा...’ असं नवर्याने बोलून दाखवल्यावर मी उड्या मारायच्या बाकी ठेवल्या होत्या... त्यामागे, ’जा बाई जा... चार दिवस जरा आम्ही निवांतपणे घालवतो’ असेल काय? वगैरे सुद्धा माझ्या मनात आलं नाही.
तीन डोंगरांच्या कुशीत, मूळ शहरापासून शंभरेक किलोमिटर दूर, जिथे मो-बाईलवेडेपणा करता येत नाही अशा ठिकाणी हे रिट्रीट होतं. चार दिवस. संध्याकाळी सात ते सकाळी साडेसात मौन, पहाटे चार वाजता सुरू होणारा आश्रमाचा कार्यक्रम, योगासनं, दिवसातून दोनवेळा ध्यान, आश्रमात अंगमेहनत इ. इ. कशालाच न घाबरता मी नाव दिलं आणि गेलेही. माझ्यासारखेच अजून एकोणपन्नास जण होते. त्यात, ज्यांचा शब्दन-शब्द ऐकावा असे वेदांत केंद्रातले मोठे वयोवृद्ध पूर्णानंद स्वामी, शिवाय आत्मानंद अन वेदानंद स्वामी, असे आम्ही नेहमी आश्रमात बघायचो ते दोन स्वामी आणि एक आम्ही न बघितलेले अगदी तरूण- स्वामी ईशानंद.
बरीचशी वयस्कर जोडपी, काही तरूण जोडपी, काही एकटे तरूण आणि तरूणीही... मीही त्यात
. एकूण जमाव अतिशय आनंदी. आयुष्याच्या अनिर्बंध प्रवाहाला काहीतरी बांध घालता येण्याजोगी कला शिकायला मिळावी... किमानपक्षी त्या दिशेने विचार तरी व्हावेत ह्याच उद्देशाने स्वत:हून एकत्र झालेला.
पहिल्या दिवशी संध्याकाळी एकेक करीत गाड्या आल्या. आम्ही सगळेच एकमेकांना मदत करण्यात गुंतलो. केंद्राचे सगळे तरूण स्वामी कुणाची खोली कुठे, आंघोळी-पांघोळींची व्यवस्था, औषधोपचार, आजूबाजूचा परिसर असलं सगळ्यांना सांगण्यात गुंतलेले. ईशानंद स्वामी, आलेल्या वयस्करांचं सामान उचलून त्यांच्या त्यांच्या खोल्यांमधून ठेवीत होते. आम्ही सगळेच संध्याकाळी सातच्या आत सगळं मार्गी लावायच्या पाठी लागलो. त्यानंतर मौन... हातवार्यांनीही बोलायचं नाही.
माझ्या खोलीत एक मध्यम वयाच्या दाक्षिणात्य काकू होत्या. शांततेत रात्रीचं जेवण उरकुन, दुसर्या दिवसाचा गजर लावून झोपलो.
गजराच्या आधीच मला जाग आली... कसल्याच आवाजाने नाही. किंबहुना पाखरंही उठायच्या आधीच्या निरव शांततेनंच असणार. माझ्या मोबाईलमधला अलार्म तानपुर्याच्या आवाजाचा आहे.... शहरात इतर आवाजांत तो इतका छान वाटतो म्हणून सांगू... पण त्या पहाटेवर त्या आवाजानेही ओरखडे उठल्यासारखं वाटलं.
पटापट आवरून मोठ्ठ्या ध्यानाच्या सभागृहात आलो. एका स्वामींनी थोडक्यात दिलेल्या सुचना ऐकत सगळेच ध्यानाला बसत होते. एक एक करीत सगळेच गोळा होत होते. माझ्या खोलीतल्या काकू आल्या. त्यांना जमिनीवर बसता येत नसल्याने ईशानंद स्वामींनी उठून त्यांच्यासाठी खुर्ची आणून दिली. कृतज्ञतेने त्यांच्याकडे बघत, काकू बसल्या आणि त्यांनी डोळे मिटले.
अजून काही साधक आले ज्यांना वयोपरत्वे खाली बसता येत नाही. ईशानंद स्वामी, लक्षं ठेऊन त्यांनाही मदत करीत होतेच.
संन्यास म्हणजे कोण रूक्षपणा, कहर साधना, तपश्चर्या, निर्लेप कोरडेपणा... असलं काही डोक्यात घेऊन आलेल्या कुणालाही ह्या तरूण स्वामींचं असं धावून धावून मदत करणं, नक्की आश्चर्यजनक वाटलं असतं. ईशानंदांनी तत्परतेने केलेली कोणतीही सेवा, छोटीशी गोष्टं, आमचे मोठे, वयोवृद्ध स्वामी पूर्णानंद स्वामी मोठ्या कौतुकाने बघत होते. अधे-मधे स्निग्धं हसूही सांडत होतं. क्वचित प्रसंगी त्यांच्या सशक्तं तरूण हातांचा आधार घेण्यासाठी मोठे स्वामी पायर्यांशी थांबलेलेही दिसत.
नाश्त्याच्यावेळी, कुणाला अजून कॉफी हवी असल्यास जग घेऊन ईशानंद आमच्यात फिरत होते. मी, काकूं अन अजून दोघं-तिघांच्या कंपूकडे येता येताच पूर्णानंदांची हाक आली तसे, हातातला जग माझ्या हातात देऊन गेलेही. मी उरलेल्यांना कॉफीवाटप केलं.
दुपारच्या जेवणाला सगळे रांगेत उभे राहिलो. ईशानंद सगळ्या वयस्कर साधकांना बसायला जागा, पाणी बघत होते, किंवा वाढूनही आणत होते. मधेच त्यांनी एक पान वाढून मोठ्या स्वामीजींना नेऊन दिलं.
मी माझं पान घेऊन, माझ्या खोलीतल्या काकूंसहं एका डेरेदार झाडाच्या पारावर बसले. साधा भात, कोशिंबीर, डाळ, दही बेत होता. जेवण रुचकर अन भरपूर होतं. बसलो होतो तिथून वरून सगळेच दिसत होते... मन लावून जेवताना. ईशानंद मोठ्या स्वामींना हवं-नको बघून मग आपलं वाढून घेऊन इतर दोन स्वामींसोबत बसलेले दिसले.
आमच्या इथे गप्पा चालल्या होत्या.. काही काही पारमार्थिक... बर्याचशा सांसारिक.... मुलं, बायका, नवरे, नोकर्या असलंच काहीतरी तोंडीलावणं.
"भात आवडायचा नाही... इतर इंडियन मित्रांच्या घरचं बघून रोटी हवीच असायची... नाहीतर डोसातरी. नुस्त्या भातावर जेवलाच नाही कधी", काकू ईशानंदांकडे बघून म्हणाल्या.
"तुम्ही ओळखता त्यांना?", संन्याशाचा सांसारिक भूतकाळ त्याच्यासकट सगळ्यांनीच विसरायचा असतो, अशी आपली माझी समजूत.
"हो तर.... माझा मुलगा" काकू म्हणाल्या अन हसून पुढला घास घेतला.
माझा हातातला घास हातात अन तोंडातला तोंडात. कालपासून ही माऊली अन तिचा संन्यास घेतलेला मुलगा एका छपराखाली वावरतायत. कुठे अगदी तिळमात्रंही त्यानं आई म्हणून झुकतं मापच काय पण, ओळखसुद्धा दिलेली दिसली नाही. काकूंनीही एकदाही उल्लेख तर सोडाच पण मदतीची अपेक्षाही दाखवली नाही. तिच्यालेखी जसे ते दोन स्वामी तसाच हा ही.
मूल म्हणून ईशानंदांच्या वेषात शिरता येईना अन आई म्हणून तर ह्या माऊलीच्या मनाच्या दारातही उभं रहायचं धाडस होईना. नक्की काय अन कसं निभवतायत हे दोघं... ते ही इतकं सहज? कसं शक्यं आहे? किती अन काय काय माझ्या मनात दाटून आलं म्हणून सांगू.
आपसूक हातातला घास पानात परतून ठेवत मी स्तब्धं झाले.
माझी अवस्था काकूंच्या ध्यानात आली. माझ्याकडे वळून त्या म्हणाल्या, ’... मी ठीकच आहे. सुरूवातीला खूप खूप जड गेलं, बघ.
विवेकानंद मोठेच... हवेतच... पण ते शेजारचीच्या घरात जन्माला यावेत... आपल्या घरात नको ते.. हाच विचार होता सुरूवातीला.
माझी कूस असामान्यं करण्याची संधी दिली देवानं... त्यासाठी देवाची, ईशानंदांची ऋणी आहे मी... जेव तू.... आपल्याला पुढच्या लेक्चरला जायचय ना?’
किंचितही न ढळलेली ही माऊली, तिचा धारधार कर्मयोग अन तिला ध्रूवपदावर बसण्याची संधी देणारे स्वत: कर्मसंन्यासी ईशानंद.... साक्षात माझ्यासमोर होतं, हे.
हे काय आहे? नक्की आपल्याला काय होतय ते कळेना. काय अनुभवतेय मी...
अगदी माझ्यासमोर बसून अत: पासून इतिपर्यंत... हे निळं आकाश देवानं रंगवावं... त्यात मोजके ढग, पक्षी, उगवू पहाणार्या सूर्याची आभा.... हे सगळं सगळं माझ्या समोर घडावं.... असं वेड्यासारखं झालं.
हे त्या करनाटकूचंच एक उदात्तं नाट्यं. कोणत्याही बाजूने ह्या नाट्याकडे बघू गेल्यास ’ठकची पडीले’ होत होतं.
नकळत हातातलं ताट बाजूला ठेऊन मी काकूंच्या पायावर डोकं ठेवलं. गडबडीने पाय बाजूला घेत मला उठवत त्या म्हणाल्या, ’वेडी का तू?... स्वत: इतके सगळे स्वामी आपल्यासमोर असताना, माझे पाय धरायचे...’
’माये, ह्या सगळ्या स्वामींतत्वांना जन्मं देणारी, स्तन्यं पाजून हाडा-मासांत घडवणारी तू..... त्यांच्यातल्या परम-तत्वाची त्यांना जाणीव करून देणारीही... कदाचित तूच....तुला आधी नमन.
वाटलच तर तुझ्या धैर्यातला एक.. अगदी एक इवला कण माझ्या रित्या झोळीत टाक....
नाहीतरी अशी माऊली माझ्या आस-पास वावरली.... ह्यानंच धन्यं आहे मी... मी, एक माणूस म्हणून.... एक आई म्हणून’....
प्रत्यक्षात ह्यातलं काहीही ओठांबाहेर पडलं नाही. त्यांच्या समोर लहान होऊन अत्यानंदाने अश्रू ढाळता आले मात्रं.... हीच पुण्याई.
हा अनुभव दोन वर्षांपूर्वीचा.
हा अनुभव दोन वर्षांपूर्वीचा. खूप प्रयत्नांती शब्दांत मांडता आला. वर वर बघता, एक आई आणि तिचा सन्यासी मुलगा ह्यांना जवळून बघता आलं... इतकं सोप्पं आहे.
पण.... तरीही मला स्वतःला ते विलक्षण वाटलं. एकाच छपराखाली त्या दोघांना इतकं निर्लेप तरीही सहज वागताना पाहून मला खरच दाटून आलं.
शिर्षकासकट कितीतरी शब्दांमधून निसटलय... ही माझी मर्यादा अजून काय...
पलिताण्याला आमचे एक स्नेही
पलिताण्याला आमचे एक स्नेही राहतात. त्यांच्या दोन्ही मुलींनी संन्यास घेतला आहे. पलिताण्याला त्या कधी आल्या तर हे काकाकाकू त्यांचं दर्शन घ्यायला जातात. साधी ओळखही दाखवायची नाही, हा नियम उभयपक्षी पाळला जातो.
..........
..........
नाही हो. काहीही निसटलेलं
नाही हो. काहीही निसटलेलं नाही.
(प्रतिक्रिया देताना मात्र नक्की काय लिहावं ते कळत नाहिये. मलाही तुमच्यासारखंच वाटलं असतं.)
ह्म्म... तुझ्या धैर्यातला
ह्म्म...
तुझ्या धैर्यातला एक.. अगदी एक इवला कण माझ्या रित्या झोळीत टाक>> अगदी खरय.. आपलं अख्खं आयुष्य तरुन जाईल त्यावर ..
दाद वाचतांना डोळे कधि
दाद वाचतांना डोळे कधि पाझरायला लागले कळ्लेच नाहि ग, खरच धन्य ती माता आणि धन्य तो पुत्र!
.....
.....
अनुभव नीट भिडला, पण
अनुभव नीट भिडला, पण प्रतिक्रिया देता येत नाही.
केवळ.
केवळ.
खरंय..वाचून मन इतकं भारवलंय
खरंय..वाचून मन इतकं भारवलंय कि प्रतिक्रिया लिहितांना शब्दच हरवले..
असेही लोकं आहेत या दुनियेत,म्हणूनच चालतीये दुनिया.. तुला हा आगळा वेगळा अनुभव मिळाला ,तू ही भाग्यवान आहेस!!
खरच केवळ !!
खरच केवळ !!
ती माय-लेकरे व तुम्ही (सुंदर
ती माय-लेकरे व तुम्ही (सुंदर प्रकारे अनुभव शब्दबद्ध केल्याबद्दल) - सर्वांना साष्टांग दंडवत........
खूप सुंदर प्रकारे लिहिलस
खूप सुंदर प्रकारे लिहिलस दाद.(डोळे पानावले
)
खरच अस सन्यास वगैरे घेने किती अवघड आहे .
वरच्या सगळ्या प्रतिक्रियांना
वरच्या सगळ्या प्रतिक्रियांना अनुमोदन. इतकच लिहु शकते.
सगळ्यांचे आभार. चिनूक्सं,
सगळ्यांचे आभार.
चिनूक्सं, उभयतांनी ओळख दाखवायची नाही. हा नियम नसावा. कारण त्याच दिवशी एका लेक्चरमधे मोठ्या स्वामींनी कशाच्यातरी संदर्भात, त्यांचं नातं उल्लेखलं... तेव्हा ईशानंद मागे वळून आईकडे बघून हसलेही.
गंमत आहे...
हीच एक आई का? सगळ्याच स्त्रिया माझी माता असतिल... ह्या प्रेरणेनं ईशानंद फकिरीसाठी बाहेर पडले असतिल... अन ती आईही त्याच मातीचं मूळ बीज... काय नव्हेच ते! मला भूल पडली ती, त्यांच्यातल्या आताच्या सहजभावाची....
असो...
त्याच रिट्रीटमधला अजून एक अनुभव आहे... जो शब्दांत आणण्याचा प्रयत्नं चालू आहे... अजून डोक्यातच... इथे देण्याइतपततरी उतरावा अशी खरच इच्छा आहे.
दाद, निव्वळ अप्रतिम शब्दांत
दाद, निव्वळ अप्रतिम शब्दांत मांडला आहे अनुभव!
माझ्या अनुभवविश्वात एकदा अशा तरुण स्वामींच्या आई असलेल्या पाच -सहा मातांच्या कुटीत त्यांच्यासोबत राहण्याची खूप सुंदर आठवण आहे. त्या मातांनी जणू आपला पुत्र व्यापक स्वार्थासाठी ईश्वराच्या भरवशावर जगाला सोपविला होता. त्यांच्या वागण्यात कोठेच तक्रार नव्हती. खंत नव्हती. उलट माझ्यासकट इतर अनेक तरुण-तरुणींवर आईच्या वात्सल्याचा, स्नेहाचा वर्षाव करायच्या त्या. कोणी नवखे असेल त्यांची चौकशी, त्यांची विचारपूस, त्यांची व्यवस्था इत्यादी गोष्टींमध्ये आपण होऊन रस घ्यायच्या. मी त्यांच्यासोबतच रहायला होते. आमचे नाते खूप अनौपचारिक. त्यातल्या अनेकींकडे मी कधी छोटा-मोठा हट्ट केलाय, आणि त्यांनी माझे हट्ट मातेच्या वात्सल्याने पुरवलेत. त्यांना माझे वागणे कोठे खटकले तर आईच्या हक्काने रागवल्या सुध्दा आहेत त्या!
त्यांचे पुत्र असलेले संन्यासी स्वामीही त्यांना काही वार्यावर सोडत नाहीत. आश्रमात त्यांची अगत्याने विचारपूस करणे, एरवी त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मिळत नाही म्हणून रोज थोडा वेळ त्यांच्या समवेत व्यतीत करणे, त्यांना हवे नको ते पाहणे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून ते आपल्या माता-पित्यांचे मन जपत असतात. कधी कधी कोण आई आणि कोण मूल असा प्रश्न पडावा इतके!
तुझा आश्रमाचा अनुभव वाचून राहवले नाही. आश्रमाचे माहेरपण अनुभवून मला बरेच दिवस झालेत. गेले अनेक दिवस तेथील ओढ लागली आहे. आज तुझा इतका सुंदर लेख वाचल्यावर तो खूप आतवर पोचला..... काय म्हणू!!!
दाद, अनुभव अगदी
दाद, अनुभव अगदी भिडला.
माझ्या एका नणण्देची मुलगी संन्यास घेऊन दक्षिणेकडील आश्रमात रहाते. वय २५.
माझी दुसरी एक नणंद ( या मुलीची सख्खी मावशी) याच आश्रमात सोशल वर्क करते. ती वर्षातले बरेच दिवस त्या आश्रमातच रहाते. तर या मावशीबरोबर ही मुलगी तिथे काही दिवसासाठी गेली. ही मुलगी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (पेटी) शिकते. तिथे ...त्या आश्रमात तिचा कार्यक्रम झाला. नंतर ती घरी आली....पण मन त्या आश्रमातच. नंतर ती परत आश्रमात गेली ती कधीही परत न येण्यासाठीच. सुरवातीला नणंदेला जरा जड गेलं . पण आता तिने खुल्या दिलाने , आनंदाने सत्य पचवलं आहे.
अप्रतिम..... असा अनुभव येणं
अप्रतिम.....
असा अनुभव येणं भाग्याचं आहेच, पण तू ते तितक्याच ताकदीने आणि उत्कटतेने वाचणार्यापर्यंत पोहचवू शकतेस हे महान आहे.
या आधीचेही तुझे लेख वाचताना, तुझा अनुभव आणि वाचक यामधे तू येत नाहीस हे फार सुंदर आहे...धन्यवाद.
दाद,सुंदर लिहिलयस. मला कधीकधी
दाद,सुंदर लिहिलयस.
मला कधीकधी वाटतं इतके विलक्षण अनुभव हिलाच का येतात?
मग कळतं कोणताही सुंदर अनुभव विलक्षण शब्दात मांडतेस तू.
वर आगाऊ यांनी म्हटल्याप्रमाणे तुझा अनुभव आणि वाचक यामध्ये तू येत नाहीस हेच तुझं वेगळेपण आणि कौशल्यही.
अनुभव नीट भिडला, पण
अनुभव नीट भिडला, पण प्रतिक्रिया देता येत नाही.
>>>>>> हो अगदी असेच झालेय माझे
खूपच सुंदररीत्या शब्दबध्द केलाय.
नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलं
नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलं आहेस.
दाद, नेहमीप्रमाणेच सुंदर लेख!
दाद, नेहमीप्रमाणेच सुंदर लेख!
खूप सुंदर मांडलंय...
खूप सुंदर मांडलंय...
वाचता वाचता डोळे कधी भरुन आले
वाचता वाचता डोळे कधी भरुन आले ते कळलच नाही.
खुप सुंदर लिहिलयस...अनुभव मनाला भिडला..
<<<< कोणताही सुंदर अनुभव विलक्षण शब्दात मांडतेस तू.
वर आगाऊ यांनी म्हटल्याप्रमाणे तुझा अनुभव आणि वाचक यामध्ये तू येत नाहीस हेच तुझं वेगळेपण आणि कौशल्यही>>>>>>प्रचंड अनुमोदन.
आजची सकाळ मी कालच्या उदास
आजची सकाळ मी कालच्या उदास पार्श्वभूमी वर सुरु केली.. इतक्यात ३ पुस्तक एका पाठोपाठ वाचले.. आणि तिन्ही मध्ये स्त्रीची अगतिक स्तिथी बघून काल अगदी भडभडून आलं तिसरं पुस्तक तसंच सोडून दिलं.... कधी तरी एक विचार हि येतो कि नक्की स्त्रीचा काय रोल आहे ह्या जगात..
पण आज दिवसाची सुरुवात ह्या लेखापासून झाली.. दाद नि काही तरी लिहावं आणि गढूळ मन परत स्वच्छ व्हावं तसं झालंय अगदी.. अनुभव तर छानच आहे पण नेहमी प्रमाणे सुंदर उतरलंय !
असे अनुभव खुप जणाना येत
असे अनुभव खुप जणाना येत असतीलही. पण शब्दाची अशी सुंदर शिल्पं बनवुन ते अनुभव सादर करणे फार थोड्या लोकाना जमत.
वरच्या सर्वांना अनुमोदन
वरच्या सर्वांना अनुमोदन देण्यापलिकडे काही करता येणार नाही..
सुंदर लिहीलेस..
छान लिहिलं आहेस. आवडलं.
छान लिहिलं आहेस. आवडलं.
अप्रतिम ..
अप्रतिम ..
सुंदर लिहिलं आहे ! आवडलं
सुंदर लिहिलं आहे ! आवडलं
Pages