मराठी भाषा दिवस (२०११) - स्पर्धा निकाल आणि समारोप

Submitted by संयोजक_संयुक्ता on 28 February, 2011 - 22:22

गेले काही दिवस सुरु असलेल्या 'मराठी भाषा दिवस' उपक्रमांचा आनंद मायबोलीकरांनी घेतला. यात सहभागी झालेल्या आणि उपक्रम यशस्वी होण्यास हातभार लावलेल्या सर्व मायबोलीकरांचे आभार. आज उपक्रमातील स्पर्धांचे निकाल जाहीर करत आहोत.

परीक्षकांचे मनोगत-

बोलगाणी, बालकवी अन निबंध या विभागातल्या सर्व प्रवेशिका ऐकल्या, पाहिल्या, वाचल्या. अगदी पुन्हा पुन्हा पाहिल्या, ऐकल्या. पाच वर्षाच्या आतल्या मुलांनी म्हटलेली गाणी पाहताना ऐकताना एकच विचार माझ्या मनात येत होता - त्यांच्या जिव्हाळ्याचे, ओळखीचे विषय अन नेहमीच्या वापरातली, कानावरुन जाणारी भाषा असल्याशिवाय मुलं ही गाणी इतकी समरसून म्हणणार नाहीत. कपात होता गर्रर्रम चहा ऐकताना मला घाबरायला झालं. छोट्या इराने 'नऊ लक्ष' म्हणताना नाक अन डोळे कसे विस्फारले असतील तेही डोळ्यासमोर उभं राहिलं.

गणपतीबाप्पाच्या पोटाची चिंता, घाईगडबडीत शाळेत पोचल्यावर सुट्टीचा दिवस आहे हे कळल्याचा आनंद, चित्याने फस्त केलेले प्राणी, या सगळ्याची मजा समजून उमजून ही गाणी म्हटली आहेत. शब्दांची जादू आत्तापासून या मुलांवर आहे हे ऐकून पाहून मराठी भाषेच्या परिस्थितीबद्द्ल, भविष्याबद्दल आशा वाटते.

पण निबंध विभागात पाचच प्रवेशिका आलेल्या पाहून थोडी खंत वाटली. स्वतःहून पुस्तक वाचण्याच्या वयातली मुलं. पुस्तकंच वाचत नसावीत का? दुसरा एखादा मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय दिला असता तर जास्त प्रतिसाद मिळाला असता? की या वयातल्या मुलांकडून असं अवांतर काही लिहून घेणं किती कठीण असेल याची मला कल्पना नाही? यावर मायबोलीवर सक्रीय असणार्‍या पालकांचं मत जाणून घ्यायला आवडेल .

जागतिक मराठी दिनानिमित्त स्पर्धा घेण्याचं हे दुसरंच वर्ष. तरी या स्पर्धांना भरपूर प्रतिसाद मिळाला. पुढच्या वर्षी आणखीन स्पर्धक भाग घेतील, थोड्या मोठ्या वयाच्या मुलांचा, मोठ्यांचा प्रतिसाद जास्त प्रमाणात लाभेल अशी आशा. विजेत्यांबरोबर सर्व स्पर्धकांचे व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन.

*******

स्पर्धा निकाल :

बोलगाण्यासाठी सर्वोत्तम पाच तर "बाल"कवी आणि निबंध स्पर्धेसाठी प्रत्येक गटात एक विजेता निवडला आहे.
स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे-

बोलगाणी-
रुणुझुणू (सृजन) - इटुकला कप

तोषवी (सानिका) - उंदीरमामा

HH (HH यांची मुलगी) - एकदा आला एक चित्ता

स्वर (स्वरा) - वाघोबा लपला

पारिजात३०(श्रिया) - खेळण्यांची शाळा

निबंध

गट पहिली ते तिसरी
(मंजिरी) - अवनी

गट चौथी ते सहावी
(giri purohit) समृद्धी पुरोहित

गट सातवी ते दहावी.
(limbutimbu) धनश्री नित्सुरे

बालकवी
(कविता नवरे) - सानिका नवरे

या सर्व विजेत्यांना 'मायबोली खरेदी' विभागाचे $२५ चे गिफ्ट सर्टिफिकेट पारितोषिक म्हणून देत आहोत.

ही पारितोषिके डीसी जीटीजीमध्ये (वासंतिक कल्लोळ २०१०) सहभागी झालेल्या सर्व मायबोलीकरांनी मिळून पुरस्कृत केली आहेत.

सर्व स्पर्धकांचं आणि त्यांच्या पालकांचं हार्दिक अभिनंदन!

स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून मेधा आणि मितान यांनी काम केलं. त्यांचे विशेष आभार.

धन्यवाद.
-संयोजक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व संयोजकांचे, विजेत्यांचे, आणि स्पर्धांमध्ये सामिल झालेल्या स्पर्धकांचे अभिनंदन.

गेल्या वर्षीपेक्षा बोलगाणीला (बाकीचं माझं वाचून झालेलं नाही अजून) नक्कीच जास्त प्रतिसाद मिळाला या वर्षी.

विजेत्यांच अभिनंदन...संयोजकांचपण अभिनंदन जोरदार साजरा झाला मराठी दिवस Happy

सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे आणि संयोजकांचे मनापासुन अभिनंदन!!!!!
सर्वात आवडलेलं म्हणजे "बोलगाणी" Happy

पाच वर्षाच्या आतल्या मुलांनी म्हटलेली गाणी पाहताना ऐकताना एकच विचार माझ्या मनात येत होता - त्यांच्या जिव्हाळ्याचे, ओळखीचे विषय अन नेहमीच्या वापरातली, कानावरुन जाणारी भाषा असल्याशिवाय मुलं ही गाणी इतकी समरसून म्हणणार नाहीत. कपात होता गर्रर्रम चहा ऐकताना मला घाबरायला झालं. छोट्या इराने 'नऊ लक्ष' म्हणताना नाक अन डोळे कसे विस्फारले असतील तेही डोळ्यासमोर उभं राहिलं.>>>>>>अगदी अगदी. Happy

अरे वा, सर्व संयोजक, परीक्षक, व विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन व आभारही. अशाच अजुन वैविध्यपुर्ण स्पर्धा घेउन येत राहा.

अरे वा मस्त ! सगळे स्पर्धक, स्पर्धकांचे कुटुंबीय, संयोजक, परिक्षक, विजेते, मायबोलीकर लेखक, वाचक सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. मराठीला दुसर्‍या पिढीपर्यंत नेण्यासाठी आणि नवीन अनुवादित साहित्य मराठीत आणण्यासाठी सगळ्यांनी केलेले हे प्रयत्न पाहून खूप छान वाटतंय !

सगळ्या बालचमूचे अभिनंदन...

आणि संयुक्ताचे आभार. हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि उत्तरोत्तर याला भरघोस प्रतिसाद मिळावा ही सदिच्छा.

अभिनंदन. आयोजकांचे आणि सर्व पालकांचे आभार. Happy

आर्या, स्वरा आणि एच्चेच ची छकुली यांची गीते ऐकत/पहात आमच्या पोरीचे आठवडाभराचे रात्रीचे जेवण अतिशय आनंदात पार पडले. Happy

विशेष म्हणजे मागील वर्षीचे एखाद दुसरेच बोलगाणे रिपीट झाले. पारंपारिक/ नवीजुनी / स्वरचित सर्व प्रकारची गाणी ऐकुन फार छान वाटले.

अनुवादकांचेही आभार. फार छान वाटले अनुवाद वाचताना.

सर्व विजेते आणि सहभागी मराठीप्रेमी स्पर्धकान्चे, त्यान्च्या पालकान्चे अभिनन्दन Happy

>>>> पण निबंध विभागात पाचच प्रवेशिका आलेल्या पाहून ----पालकांचं मत जाणून घ्यायला आवडेल . <<<<< या सर्व परिच्छेदासन्दर्भात....
मुले पुस्तके वाचत नाहीत असे नाही, पण टीव्ही व अन्य करमणूकीच्या सुविधान्मुळे तसेच "मार्कान्च्या" रेट्यापुढे त्याचे प्रमाण लक्षणीय रित्या घटलेले आहे. मात्र थोड्या मोठ्या कळत्या वयात म्हणजे माध्यमिक शाळेत व महाविद्यालयीन वर्गातील ज्या मुलान्मधे रस निर्माण होण्याची सन्धी लाभते, अशी मुले नक्कीच वाचतात. तरीही याचे प्रमाण अतिशयच कमी होत चाललेले आहे हे देखिल एक वास्तव.
परिक्षा-मार्क्स अन शाळान्चेच अभ्यासेतर अन्य उपक्रम, अभ्यासाचे व छन्दान्चे क्लासेस, घरच्या अडचणी, इत्यादीतून वेळ काढून मुलान्कडून लिहवुन घेणे म्हणले तर अवघड, पण परिक्षेइतके अत्यावश्यक गरजेचे समजले तर नक्कीच सोप्पे ! त्यातुन, इन्टरनेटची-स्कॅनिन्ग इत्यादीची सहज उपलब्धता असणे/नसणे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती, शिवाय उपक्रम सदस्य/अन्या पर्यन्त पोहोचण्यातील दुविधा यामुळे आज जरी प्रवेशिका कमी वाटत असल्या तरी भविष्यात "आवर घालणे" कठीण होईल इतका प्रतिसाद लाभू शकतो हे निश्चित!
कृपया लक्षात घ्या की आत्ता केवळ नित्य सक्रिय मायबोली सदस्यच यात भाग घेताहेत, मात्र सहभागी "स्पर्धकान्कडून" होणार असलेल्या तोन्डी प्रसिद्धीद्वारे मात्र त्या त्या शाळातील त्यान्चे सहाध्यायी देखिल भविष्यात या उपक्रमात निश्चितच सहभागी होतील
निबन्ध स्पर्धेचे गट केवळ शालेय विद्यार्थीवर्गापुरतेच मर्यादित आहेत असा काहीसा गैरसमज माझा झाला आहे त्यामुळे मी माझ्या महाविद्यालयिन पाल्यान्कडुन / तसेच मी स्वतः देखिल शक्य असूनही काहीच लिहून घेतले/काढले नाही. एक नक्की की महाविद्यालयीन विद्यार्थ्यान्चा सहभाग झाल्यास याच उपक्रमाची प्रसिद्धी तोन्डोतोन्डी प्रचण्ड प्रमाणात वाढेल. यास काही काळ जावा लागेल पण हे नक्कीच होईल.
निबन्धाबरोबरच, केवळ हस्ताक्षराबाबत, "सुन्दर/सुवाच्य हस्ताक्षरातील देवनागरीतील मराठी लेखन" असाही विषय ठेऊ शकतो.
संयोजक_संयुक्ताच्या सर्व सभासदान्चे मनःपूर्वक आभार आणि यशस्वी संयोजनाबद्दल अभिनन्दन Happy

सगळ्या छोट्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन.
पुढच्या वर्षी आमचा बाळोबा पण असेल गाणी म्हणायला.

विजेत्यांचे, आणि स्पर्धांमध्ये सामिल झालेल्या स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन
संयोजकांचे विशेष आभार..

सर्व बालचमूचे हार्दिक अभिनंदन! Happy
अनुवादांमुळेही मजा आली. तमिळ, फ्रेंच, इंग्रजी, जपानी, पंजाबी, हिंदी व मूळच्या बंगाली भाषेतील साहित्याचा आनंद घेता आला. संयोजकांचे खास आभार व इतका सुंदर उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल कौतुक!! Happy

यंदाचाही मराठी दिवसाचा उपक्रम फार सुंदर साजरा झाला. मायबोली आणि संयुक्ता प्रशासन, सर्व संयोजक आणि सहभागी झालेल्या सर्वांचंच कौतुक आहे. Happy

विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन! Happy

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर :

वरच्या परीक्षकांच्या मनोगताशी पूर्णपणे सहमत.

मोठ्या मुलांच्या बाबतीत (निदान आम्हा परदेशस्थांच्या बाबतीत) मुलं 'वन ऑन वन' संभाषण करण्याइतकं मराठी बर्‍यापैकी सहज बोलू शकतात. परंतु निबंध लिहिता येण्यासाठी जितकं प्रभुत्व (त्या भाषेत तितका प्रगल्भ विचार करता येणं, ते विचार मांडण्यासाठी आवश्यक तितकी शब्दसंपदा, मनात आलेल्या विचारांची नीट प्रतवारी आणि क्रम लावता येणं, एकूण लिखाणाचा ओघ ठरवता येणं, इ.) आवश्यक असतं तितकं बहुधा त्यांच्याकडे नसावं.
उदा. माझा मुलगा शाळेचे 'बुक रिपोर्ट्स' उत्तम लिहितो. पण त्याची पूर्ण विचारसरणी (थॉट प्रॉसेस) ही अमेरिकन आहे. मग त्याचे विचार मारून मुटकून (मी) मराठीत भाषांतरित करायचे आणि त्याने ते 'पाठ करून' म्हणायचे हे (थोड्या हटवादीपणानंतर) माझं मलाच निरर्थक वाटायला लागलं, आणि मी तो नाद सोडला.

Pages