गोष्ट अल्केची -डायरीतील नोंदी,त्याही जशा हाताशी आल्या तश्या -भाग पाच.

Submitted by किंकर on 28 February, 2011 - 14:17

ठिकाण-हॉटेल जनसेवा,लक्ष्मीपथ.ऑक्टोंबर१९८७ -दिवाळीतील भर दुपार -मला माहित आहे कि,हि वेळ आणि हे ठिकाण,हे काही डायरी लिहण्याचे ठिकाण नाही. आणि पुण्यातील हॉटेले म्हणजे,खाद्य पदार्थ गरम असतीलच याची खात्री नाही,पण मालक मात्र केंव्हाही गरमच."या ठिकाणी टेबल खुर्ची खाण्याची सोय म्हणून असते,ती लिहण्यासाठी वापरू नये."या सारख्या पुणेरी सल्ल्याच्या पाट्या टाळून,मी इथे आलो होतो.आणि बाहेरील उन्हाने नाही,पण नुकत्याच पाहिलेल्या दृश्याने,पुरता करपलो होतो. गेले चार /सहा महिने जे इतरांकडून ऐकले होते,व जे खरे असले तरी, मन मानत नव्हते ते मी स्वतःपाहीले.शगुनच्या भव्य साडी शो रूम मधून मोठ्या बॅगा सांभाळत, अलका आणि गुप्ताजी तेही हसत खिदळत बाहेर पडत होते.खरे तर मी त्यांना पाहिले,पण त्यांनी मला पाहिले नाही.आणि नाही पाहीले तेच बरे झाले.भेट होवून देखील गुप्ताजींच्यासमोर,मी काही अलकाच्या नजरेला नजर देवू शकलो नसतो, जणू काही मीच,स्वतःला अपराधी मानत होतो.कदाचित जेंव्हा तिने उत्तराची वाट पाहिली,त्यावेळी मी उशीर केला.म्हणून जाणीवपूर्वक तिने हा मार्ग धरला आहे का?एकेकाळी जोशीबुवांच्या नजरेला घाबरून,रडणारी अलका आज कुठे हरवली आहे.अलकास पत्र पाठवून देखील सहा महिने होवून गेले,आणखी किती वाट पहायची. माझी अवस्था तर आताशी, 'तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही, तुम किसी और को चाहोगी तो मुश्कील होगी.' अशी होत आहे. शेवटी आजच्या डायरीच्या नोंदी पाठोपाठ मी अखेरचे,होय! माझ्याकडून अखेरचे पत्र लिहण्याचे ठरवले.

माझ्या प्रिय अलकास,

कशी सुरवात करू ? काय सांगू , काय विचारू? संपत नाही प्रश्नांची मालिका मी १ एप्रिल रोजी तुला पत्र लिहिले होते तेंव्हा पत्राची तारीख जरी १ एप्रिल असली तरी मी एप्रिल फुल केलेले नाही, याची स्पष्ट कल्पना मी तुला दिली होती. तरीही तुझ्या कडून काहीच उत्तर नाही. गेल्या चार सहा महिन्यात तुझे हसणे,तुझे दिसणे सारेच मला दुर्मिळ झाले आहे.पूर्वी आपण एका ऑफिसात असताना,किमान तुझ्या अस्तित्वाची साथ होती;आता तीही नाही. आणखीन एक म्हणजे तुला आठवतेय,कि तू म्हणाली होतीस,"अरे जोशिसरांच्या नजरेचा त्रास होतो. पण कुणाला सांगता येत नाही." तेंव्हाची तुझी निरागसता कोठे आणि आज,हो आजच मी प्रत्यक्ष पाहीले म्हणून लिहितो कि,गुप्ताजींबरोबर खिदळत फिरणारी, अलका कुठे?.देशील का या प्रश्नांची उत्तरे?अर्थात एक सांगतो,तू काही माझ्या पत्राला;उत्तर देण्यास बांधील नाहीस. पण एक लक्षात ठेव,जर तुझी काही स्वतःची बाजू असेल,आणि ती तुला माझ्या समोर मांडवी वाटली,तरच पत्राचे उत्तर दे. तसेच आणखी एक सांगतो, जर तू काहीच उत्तर,या वर्षीच्या अखेर पर्यंत दिले नाहीस,तर तुझे मौनच मी बोलके समजून,तुला काहीच म्हणायचे नाही असे गृहीत धरून पुढे मार्गस्थ होईन.अर्थात मार्गस्थ होणे म्हणजे तुझी वाट पाहणे सोडून देणे.कारण माझा मार्ग बदलेल पण मी मार्गी लागेन का?आज माहित नाही.तुझ्याशिवाय जगू शकेन पण ते जगणे म्हणजे,रोजचे मरणे होईल.यापेक्षा जास्त काय लिहू आणि कसे लिहू?मलाच कळेना झालेय,म्हणून इथेच थांबतो. ३१ डिसेंबर १९८७ तुला तुझा अंतिम निर्णय देण्याची,अखेरची तारीख आहे हे लक्षात ठेव.

तुझाच परंतु तुझा होवू न शकलेला

वीरेंद्र
ठिकाण-घर.दुपारची वेळ,निवांत-२४ डिसेंबर१९८७ -माझी दहा/बारा दिवसांची रजा शिल्लक होती.आणि घरच्या सगळ्यांनाच गावी, यात्रेस जावयाचे होते म्हणून;मी थेट ३१/१२/१९८७ पर्यंतची रजा घेतली होती.बाकी सगळेच दुपारच्या गाडीने,गावी रवाना झाले होते.मी त्यांना दोन दिवसानंतर येईन,असे सांगितले होते.आणि आज तर घरीच,आराम चालला होता.आज गावी जाताना,आईने एक वेगळाच विषय मांडला होता."हे पहा, वीरू आतापर्यंत बोलले नाही.पण आज सांगते,नोकरी झाली,चार खोल्याचे घर,दोन भावात आहे,बहिणीच्या लग्नाची जबाबदारी पार पडली आहे.दादाचे चार हात होवून,दोन वर्षे झालीत,येत्या वर्षात तू लग्न करून,मला माझ्या जबाबदारीतून मोकळे कर रे बाबा."मी म्हटले,"अग,इतकी काय घाई करतेस?पाहू दोन चार वर्षांनी.मी काय म्हातारा झालो नाही अजून."तर ती इतकेच म्हणाली, "न येणाऱ्याची वाट पाहत राहशील तर काय लगेचच म्हातारपण येईल." ती असे का म्हणाली मला नाही उमजले,पण या संवादानंतर ती गावी गेली. आणि मला मात्र ३१/१२/१९८७ या तारखेच्या संदर्भाची वेगळीच आठवण झाली. मन मलाच म्हणाले, "अरे तुझी आई म्हणते,ते खरेच आहे, अलकाचे पत्र नाही या आठवड्यात आले तर पुढे काय?"आणि मनाने विचारलेल्या या प्रश्नास,आज तरी मी उत्तर देवूच शकलो नाही.

आईशी ती गावी जाताना झालेला संवाद,आणि मनाचे संभाषण, यात कधी झोप लागली कळलेच नाही. दुपारी चार वाजता जरा निवांत पडू,म्हणून सुरु केलेली विश्रांती चांगलीच लांबली. एकदम दारावरची बेल वाजली,आणि वाजतच राहिली. खडबडून जागा झालो, तर घर अंधारून गेलेले. झटकन उतून धडपडत दिवा लावला आणि त्याच अवतारात दार उघडले तर दारात अलकाची आई. माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. पटकन मागे होत, "आत या" म्हटले. त्या आत येताच,त्यांना वाकून नमस्कार केला. आणि त्यांना बसावयास सांगून, मी आवरून घेण्यासाठी पटकन आत गेलो. पाचच मिनिटात तयार होवून बाहेर आलो . मग त्यांना विचारले,"आज असे अचानक येणे केलेत ? फोन नाही,निरोप नाही सर्व ठीक आहे ना !"यावर त्यांची मुद्रा थोडी सचिंत झाली. मग त्या म्हणाल्या, " हे बघ वीरू, मी आज आली आहे ते एक वेगळेच काम घेवून. कसे बोलू कोठून सुरवात करू काहीच कळत नाही रे." अलका माझी मुलगी,खरे तर आमचे नाते आता आई मुलीचे राहिलेलेच नाही.आम्ही अगदी मैत्रिणी झालो आहोत. आणि त्यामुळेच हल्ली,मला असे वाटते आहे कि, अलका माझ्या पासून नाही, अगदी सर्व जगापासून,काही तरी लपवून ठेवते आहे.एक दोनदा वाटले कि,मित्र म्हणून ती तुझ्याशी काही बोलली का ? का तिच्या मौनाचे कारण तू आहेस ? हे तुलाच विचारावे. पण नाही रे धाडस झाले. पण गेल्या वर्षभरात,अलकात होत गेलेले बदल मला कोड्यात टाकत आहेत. मागे एकदा मला म्हणाली, " आई, विरू जीवनाचा साथीदार म्हणून मी स्वीकारला तर तो तुला आवडेल का? " तेंव्हा मी म्हटले, का? त्याची मागणी आलेली दिसते? तर मला म्हणाली अग तसे नव्हे, आली तर आपला विचार पक्का नको का? आणि मी सल्ला तुलाच तर विचारणार ना? " तेंव्हा तिला म्हटले,हे बघ,मी त्याला तो घरी येवून गेला,तेंव्हा भेटले होते. आता त्या गोष्टीला,चार वर्षे होत आली,तेंव्हा तुला हवा तो निर्णय घे.मी आहे तुझ्या पाठीशी." मग आपल्या या निर्णयावर,ती काय म्हणाली?"माझा थेट आणि उत्सुकता पूर्ण प्रश्न विचारला गेला. त्यावर त्या म्हणाल्या, " ती इतकेच बोलली कि, या वर्षअखेर निर्णय घेणे भागच आहे." माझे मन माझे मागील पत्र व नुकतेच पाठवलेले पत्र आणि अलकाचे वागणे यातील संगती शोधत होते. आता आपली काही स्पष्ट मते,थेट अलका पर्यंत पोहचवण्याची हीच आणि अखेरची संधी आहे याची मला जाणीव झाली. मी पटकन उठत त्यांना म्हणालो, " आई, घरचे सगळेच गावी गेलेत,तुम्ही बसा.मी चहा करतो तुमच्या साठी." तर त्या म्हणाल्या, "अरे कशाला त्रास..? असे काही म्हणत नाही, फक्त माझ्या बरोबर, तुही घे. म्हणजे मला बरे वाटेल." मी पटकन आत जावून चहा टाकला. आता चहा घेता घेता,सर्वच गोष्टींचा उलगडा होईल, असे मनासी म्हणत चहा तयार केला.घरात आईने गावी जाताना,केलेल्या तिखट मिठाच्या पुऱ्या होत्या, त्या आणि चहा घेवून बाहेर गेलो. अलकाची आई शांतच होती,पण अस्वस्थ मात्र नक्कीच होती.चहा आणि खाऊ समोर ठेवला तर,"तिखट मिठाच्या पुऱ्या? अरे,हा तर अलकाचा अगदी आवडता खाऊ.असुदे" मी ज्यासाठी आले न, तेच सांगायचे राहून जाईल.अरे अलका आता,आताची नोकरी सोडून मुंबईत जावून,नवीन नोकरी करणार म्हणतेय.तिच्या ओळखीचे कोण गुप्ताजी म्हणून आहेत; त्यांच्या बहिणीचा मोठा,सहा खोल्यांचा-जुना बंगला आहे,कुठे अंधेरीच्या तिकडे, आणि तिला नोकरीपण मिळतेय तिकडच्या बाजूला.म्हणून चाललीय.मी एकदम आवक होत,पण स्वतःला सावरत विचारले, "कधी ठरले हे सगळे अलकाचे ? आणि तुम्ही तिला परवानगी दिलीत?कशी राहील ती, इतक्या मोठ्या शहरात आणि तेही एकटीच?" मग मात्र आईंच्या डोळ्यात पाणी आले.त्या म्हणाल्या, "अरे मला थोडेच वाटतेय का तिने असे अचानक दूर जावे म्हणून ? पण मला म्हणाली, "आई वर्षभराचा तर प्रश्न आहे? आणि मी तिथे काही एकटी नाही, गुप्ताजींची बहिण, आहेच ना सोबतीला.शिवाय चार पैसे जास्तीच मिळणार आहेत, बर का मला नव्या नोकरीत.आता अगदी प्रत्येक शनिवार,रविवार नाही जमणार यायला,पण दोन तीन आठवड्यात भेट होईलच."असे म्हणाली. तर खरे सांगू का वीरेंद्र मलाच समजत नाही काय करावे. दोन दिवस झालेत ती मुंबईस गेली आहे. अंधेरीची जागा नवीन ऑफिस सगळे पाहूनच इकडे राजीनामा देणार म्हणाली आहे. आणि तिने तुझ्यासाठी निरोप सांगितलाय कि, ३१/१२/१९८७ रोजी तिला तिची मैत्रीण तुला देण्यासाठी काही पार्सल देणार आहे ते न विसरता घरून ताब्यात घे. आणि हा निरोप मी समक्ष तुला द्यावा असे तिचे म्हणणे होते म्हणून मुद्दाम आले. तर तू ३१ किंवा १ तारखेस येवून तुझे पार्सल घेवून जा. मी वाट पाहीन,पाहिजे तर त्या दिवशी,जेवायलाच येवून जा. चार वर्षात नाही जमले,ते आता जमव.इतके सांगून, त्या बाहेर पडल्या. आणि मी विचारात. (क्रमशः)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वा!!! आत्ताच सलग ५ भाग वाचले. जबरद्स्त लिहिलेय... पुढच्या भागाची उत्सुकता आहे. लवकर लिहा... Happy

नमस्कार!
आपण वेळ काढून वाचन केलेत,अभिप्राय दिलात खूप आनंद झाला. त्यामुळे भविष्यातील लिखाणास प्रेरणा मिळते. अभिप्रयाबरोबर सूचनांचे देखील स्वागत आहे. धन्यवाद.

मी सुद्धा आतापर्यंतचे सगळे भाग वाचलेत... अतिशय उत्कंठावर्धक कथा आहे. पुढचे भाग येऊद्या लवकर.

लिहिताना लहान लहान परिच्छेद करुन लिहा. एकदम मोठा परिच्छेद दिसला की वाचायला वेळ लागेल असे वाटुन वाचणे टाळले जाते.. लहान केलेत तर वाचायला बरे वाटेल.