घर - १६

Submitted by बेफ़िकीर on 25 February, 2011 - 06:15

लघुरुद्राच्या दिवसापासून घरात पुर्वीसारखेच हासरे वातावरण तयार झाले. गौरीला आता स्वीकारले गेले होते. बर्‍याच अंशी! काही प्रमाणात अंजली व तारका या दोघींचे इगो हर्ट झाले होते हे खरेच! आजवर जिला बोलायचो तिची माफी मागावी लागणे हे काही साधे काम नव्हते. पण कुमारदादा आणि शरद या दोघांनी लघुरुद्राच्या आदल्या दिवशी दोघींना भयंकर झापले होते. आजवर झालेल्या प्रत्येक गोष्टीतील त्यांचे दोष त्यांना दाखवून दिलेले होते. त्यामुळे त्या दोघींनी घाबरून जाऊन गौरीकडे येऊन तिची माफी मागीतली होती. दरम्यान वसंताने मात्र कुमारदादाच्या घरी जाऊन सर्वांसमोर मनातली भडास काढली. पण लघुरुद्राच्या दिवशी मात्र त्या बाबीचा कुणी उल्लेखच केला नाही. उलट हासत हासत वसंतालाही आपल्यात समाविष्ट करून घेतले. त्या दिवशी रात्री मात्र वसंताने कुमारदाला नमस्कार करून आणि मिठी मारून रडत क्षमा मागीतली.

घर!

अजूनही अपूर्णच होते खरे तर! पण त्यालाही पूर्णत्व आले.

राजू आणि गीतावहिनी बिगुलला घेऊन पुण्यात राहायला आले एकदाचे! या बदलीसाठी अखंड प्रयत्न करत होता राजेश!

ते आले आणि सुरुवातीला जुन्या घरातील राहिलेल्या दोन खोल्यांमध्ये राहू लागले. हे जुने घर अण्णाच्या नावाने करण्यात आले होते. राजेशचा जागेचा तपास सुरू झाला. महिन्याभरात जागाही मिळाली. योगायोगाने राजेश आणि गीताचे घर वसंताच्या घराजवळ होते. त्यामुळे आता सततच्याच भेटीगाठी आणि येणेजाणे चालू झालेले होते.

चारही भाऊ आपापला संसार वेगवेगळ्या ठिकाणी करत असले तरी प्रत्येकाची मने मात्र सर्वांच्याच संसारांमध्ये रमलेली होती.

अपशकुनी अपशकुनी म्हणता म्हणता गौरीतील चांगुलपणा आता जाणवू लागला होता. जणू नियम असल्याप्रमाणेच सगळे रविवारी सकाळी दहा वाजता वसंताकडे यायचे. गौरी मन लावून स्वयंपाक करायची. जेवणखाण करून दुपारचा चहा घेऊन सगळे परत जायचे. कुमारदादाकडे तर सगळ्यांचाच सतत राबता असायचा. तिथे आई बाबा होते हे एक कारण होतेच, त्यात पुन्हा कुमारदादाला भेटल्याशिवाय चैन न पडणे हे दुसरे कारण!

वसंता आणि गौरीचे मिसळीच दुकान आता बर्‍यापैकी चालत होते. कस्टमर्स रस्त्यावरच उभे राहून मिसळ खायचे. गगन सबकुछ झाला होता त्या दुकानाचा! दुकान होते घरातच, पण कस्टमर्स मात्र रस्त्यावर! जागेच्या मालकांनी वाढीव भाडे मागीतले आणि ते द्यायला वसंताने काहीच कुरकूर केलेली नव्हती. त्यांनी मोठ्या मनाने व्यवसाय करू दिला हेच वसंता नशीब समजत होता. सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळात मिसळ आणि चहा मिळायचा. हळूहळू एटीजी मिसळ कर्णोपकर्णी होऊ लागली होती. पुन्हा एकदा!

खरे सांगायचे तर वसंताचेच उत्पन्न आता चारही भावांपेक्षा अधिक होते. कारण त्याचा स्वतःचा पगार आता पावणे तीन हजार आणि दुकानाचे तर तब्बल साडे तीन हजारापर्यंत सुटू लागले होते.

आणि महत्वाचे म्हणजे आईंना आयुर्वेदीक उपचारांमुळे चक्क उतार पडायला लागला होता. कर्करोग नष्ट झालेला नसला तरी आता जीवघेणा राहिलेला नव्हता. डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. बाबांचा तर आनंद गगनात मावेना! त्यांनी आईंसाठी जे जे केले त्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळाले होते.

पटवर्धनांचे घर म्हणजे सुखाची रास झाली होती. दु:ख एकच होते...

... की सगळ्यांची राहण्याची जागा वेगवेगळी होती.

आज बिगुलचा सातवा वाढदिवस! बिगुलला अजूनही सगळे धवल न म्हणता बिगुलच म्हणत होते. गगन आणि बिगुलची बर्‍यापैकी गट्टी जमलेली होती.

बिगुलचा वाढदिवस गौरीने आपल्याच घरात साजरा करायचे ठरवले होते. सगळ्यांना मान्यही होते. आई आणि बाबा रिक्षेतून आले होते. सगळेच आता जमलेले होते. बिगुलला पुण्यातल्या शाळेत प्रवेश मिळालेला होता. इयत्ता पहिलीत त्याचे माध्यम हिंदी होते. आता मराठी! उमेश आता दहावीत होता तर वेदा सातवीत! दोघांचीही महत्वाची वर्षे होती.

आज धमाल चाललेली होती. अण्णा आणि दादा आपापल्या कामावरून दुपारीच घरी आले होते आणि तिथून वसंताकडे! राजूने तर सुट्टीच घेतलेली होती.

एटीजी मिसळही आज बंदच ठेवण्यात आली होती. वसंताने धावाधाव करून वाढदिवसाची जमेल ती तयारी केलेली होती.

गौरीने बिगुलला आवडतात म्हणून पाकातले चिरोटे केले होते. पुलाव, आलू मटर, पुर्‍या वगैरे बेत होता.

जेवणे अजून सुरू झालेली नव्हती. गप्पाच चाललेल्या होत्या. सगळ्यांनी बिगुलला काही ना काही दिलेले होते. तो आनंदाने फुलला होता. तेवढ्यात कुमारदादाने गगनलाही एक भेट दिली. आता गगन जरा मूडमध्ये आला. मगाचपासून तो नुसतेच गंभीर डायलॉग फेकत होता ए के हंगलसारखे! आता जरा वयाप्रमाणे हासला वगैरे! मग सगळ्यांनीच त्याला काही ना काही दिले. कुणी पैसे तर कुणी पेन वगैरे!

मात्र गगनला स्वतःच्या आणि वेदा, उमेश, बिगुल यांच्या पातळीतील फरक व्यवस्थित माहीत होता. आपण गरीब आहोत, न शिकलेले आहोत आणि येथे कामाला आहोत याची जाणीव होती. तो या तिघांसारखा हक्काने कधीच वावरायचा नाही. हां! एक मात्र होतं! त्याची डायलॉगबाजी मात्र कायमस्वरुपी असायची. त्याची ती डायलॉगबाजी बघूनही वेदा किंवा उमेश मात्र कधी तसे बोलायचे नाहीत. ते फक्त ऐकायचे आणि हसायचे. अर्थात, ते दोघेही त्याच्यापेक्षा लहान होते वयाने! मराठी बोलणे मात्र बर्‍यापैकी आत्मसात केले होते त्याने!

अण्णा - काय गगन?? बरं झालं नं आज सुट्टी दुकानाला ते?

गगन - दुकान बंद है तो क्या हुवा? काम तो होताही है ना?

अण्णा - बहोत काम होता है नही तुझे??

गगन - छोडिये साहब.. आप पूछताछ करेंगे.. और अपनी दुनियामे खोजायेंगे.. मै वहीं का वही..

अण्णा - ये कौनसे पिक्चरका डायलॉग है??

गगन - गरीबोंका तो हर कोई मजाक उडाता है.. गरीबको जीनेका हकही नही है..

अण्णा - वसंता.. याचं एकदा सगळं लिहून ठेव.. छापायला देऊ..

गगन - आप कुछ परेशानसे लग रहे है बडे साहब..

कुमारदादाकडे बघत दिव्य बाळ बोललं!

दादा - हं..

गगन - क्युं??

दादा - तेरा इलाज कहा हो सकता है ये सोच रहा हूं..

गगन - क्युं?? मुझे क्या लिंफोसार्कोमा ऑफ द इन्टेस्टाईन हुवा है??

दादा - म्हणजे काय?

गगन - क्या बोले?

दादा - मतलब क्या?

गगन - आनंदमे राजेश खन्ना को जो होता है वो..

दादा - आई... तू इथे बस... म्हणजे पाय पसरून बसता येईल..

आई - असूदेत.. कुमार..

दादा - हं..

आई - एकदा जोगेश्वरीची ओटी भरायचीय रे.. अंजलीला घेऊन जा..

दादा - का?

आई - सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून बोलले होते..

दादा - नक्कीच.. मीही बोललो होतो..

आई - काय?

दादा - तू बरी झालीस तर अंबाबाईला चांदीचं निरांजन देईन..

आई - माझं म्हणत नाहीये रे... घरातले सगळे एक झाले तर मी जोगेश्वरीचं बोलले होते..

दादा - घरातले सगळे एकच आहेत की.. पण ओटी नक्की भरू आपण.. आजच जाऊ... काय गं??

अंजली - चालेल.. तुम्हीही या गं तिघी..

तारका - जाऊ की.. आज भाऊ काका असते तर??

अण्णा - भाऊ काका असते तर म्हणाले असते.. नालायकांनो.. वाढदिवस कसले करता?? शाखेत जा..

दादा - खरच.. राजू.. तू पुन्हा जायला लागलास का शाखेत??

गीता - ई.. नको बाई..

अण्णा - तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो??

गीता - ध्यान दिसतात..

अण्णा - माणसं असतात तशीच दिसतात.. आता हीच बघा की.. रागीट आहे म्हंटल्यावर रागीट दिसते..

तारका - झालं... यांना फुटलं तोंड.. घरच्या माणसात आलेत ना? आता बोलतीलच मला..

अण्णा - सत्य ते सत्यच...

तारका - नसेल तर काय? ... तुला सांगते गीता.. जेवल्यानंतर ताटही उचलून ठेवत नाहीत..

गीता - हे तसलेच...

दादा - मी मात्र राबतो बाबा घरात सारखा..

अंजली - आहाहाहाहाहा.. दहा वेळा चहाची ऑर्डर सोडतात...

दादा - शरद.. मी आयुष्यात ऑर्डर सोडेन असं वाटतं तुला??

अण्णा - ह्या! काहीतरी काय?? तू एक बिचारा मानव आहेस...

दादा - पण हिला पटत नाही...मी कसातरी हात जोडून विचारतो... चहा मिळेल का म्हणून..

अंजली - उमेश आहे म्हंटलं इथे.. काय रे उमेश.. बाबा चहा कर हे कसं सांगतात..

उमेश - तोंडातल्या तोंडात पुटपुटतात... चहा मिळाला असता तर बरं वाटलं असतं...

सगळे हासू लागले.

अंजली - मुलगा वडिलांवरच जाणार..

गौरी - ह्यांनाही लागतो सारखा चहा..

गीता - तू कधीपासून गं भावजींना अहो जाहो करायला लागलीस??

अण्णा - जन्माला आल्यापासून..

गौरी - काय बोलतात..

तारका - आपल्यासमोर म्हणते... आपण गेलो की म्हणेल.. वसंता.. जरा भाजी घेऊन ये..

गीता - भावजी तर मलाही ए म्हणतात...

वसंता - मग काय म्हणू?? माझ्यापेक्षा लहान आहेस तू..

गीता - वयाने!.. मानाने मोठीय मी....

आई - आमच्यावेळेस तर सासरी मांजर असलं तरी त्याला अहो म्हणायचे... कुमार व्हायच्या आधी एक मांजर होती घरात... पिसी नावाची.. तिला म्हणायचे मी... अहो पिसी.. इथे लुडबुडू नका..

गीता - ई... काहीही..

दादा - खरच.. ती पिसी मलाही आठवतीय.. बरीच वर्षे होती नाही??

अण्णा - मला नाही आठवत..

तारका - तुम्ही झाल्यावर घाबरून पळून गेली असेल....

तारकावहिनींनी मगाचचे उट्टे काढले..

अण्णा - मग काय तर?? तारकाचा नवरा जन्माला आला म्हणून पळाली..

बिगुल - तिला कसं माहीत तुम्ही तारकाकाकूचा नवरा होणार??

गगन - शादी उपर भगवान तय करता है..

वसंता - गप रे तू... मार खाशील..

आई - ह्यांच्याशी एक वाक्य बोलायचं तर मला चार चार दिवस वाट पाहायला लागायची..

राजू - का??

आई - नवर्‍याशी कसं बोलणार सगळ्यांसमोर??

राजू - मग लग्न कशाला करायचं??

आई - तुमच्यासारखे जन्माला घालावे लागतात ना??

राजू - काहीही.. नवर्‍याशी कसं बोलायचं म्हणे..

आई - कडक होतं फार तेव्हा..

दादा - आता उलटंय..

अंजली - वायफळ काहीतरी बोलू नका.. काय उलटंय??

दादा - तुझ्याशी बोलायचं म्हणजे मला आठवडाभर तयारी करावी लागते..

तारका - हे मात्र खरंय.. माझं लग्न झाल्यावर मला सगळ्यात टेन्शन वहिनींचंच होतं..

दादा - तुमचं काय? माझही लग्न झाल्यापासून मला सगळ्यात जास्त टेन्शन हिचंच होतं..

अंजली - अजून काय काय नावं ठेवायचीयत ती ठेवून घ्या.. अण्णा भावजी.. बघा कशी बोलतीय..

अण्णा - माझं जर तिच्यावर काही नियंत्रण असतं तर वेदाला एक भाऊ नसता का झाला??

वेदा - होणार होता??

अण्णा - बोंबला आता... हिला काय उत्तर देऊ??

तारका - आहे ते खूप आहे..

गीता - वहिनी... अजूनही हरकत नाही...

तारका - तुझा सल्ला विचारेन तेव्हा बोल हां??

अंजली - राजू भावजी... तुमचं काय??

राजू - माझं काय म्हणजे??

अंजली - नाही.. बिगुलला बहीण वगैरे??

राजू - मला काय?? चालेल झाली तर...

गीता - अ‍ॅहॅ.. चालेल झाली तर..

तारका - बघ बघ.. हवीय त्यांना..

गीता - त्यांना काय लागतंय बोलायला..

वसंता - गौरी चहा टाक.... म्हणजे तुलाही काहीतरी काम केल्यासारखं वाटेल

गौरी - हो का?? बसलेलीच असते की नाही आरामात?? सरळ सांग चहा हवाय म्हणून..

तारका - हे बघा अरे तुरे केलं..

दादा - करूदेत हो.. नवीन लग्नं आहे अजून.. आमचं काय.. संपलं सगळं..

अंजली - मीही तेच म्हणते..

आई - मग आम्ही काय करायचं??

राजू - तुमच्या लग्नाला किती वर्षं झाली गं आई??

बाबा - झाली असतील सत्तर..

आई - ह्यांना सात वर्षं झाल्यापासूनच सत्तर झाल्यासारखी वाटतायत..

दादा - मला वाटतं एक्केचाळीस वर्षे झाली असतील..

अण्णा - तुला होतं वाटतं आमंत्रण लग्नाचं...

दादा - मला तर माझ्याही लग्नाचं नव्हतं आमंत्रण..

अंजली - तरी आले होते..

दादा - काय करणार?? समाजकार्याचा वसा घेतलेला आहे..

गौरी - तुमच्या लग्नात मला फ्रॉक घेतला होता..

अण्णा - त्याचेच परिणाम भोगतोय वसंता..

तारका - आमच्याही लग्नात घेतलावत बरं??

गौरी - हो.. तुमच्याही लग्नात घेतलावता..

गीता - मलाच नाही घेतलं कुणी काही..

गौरी - तुम्ही होतात कुठे तेव्हा??

गीता - मग नंतर द्यायचं..

अण्णा - राजू.. तू माझ्या अन दादातर्फे यांना दोन साड्या घेऊन टाक आजच्या आज..

गीता - ह्यांनी काय म्हणून घ्यायच्या?? तुम्ही दोघांनी घ्या..

बाबा - सगळ्यांनाच आज साड्या घेऊन टाका माझ्यातर्फे..

आईसकट सर्व बायका आनंदल्या! दुपारीच लक्ष्मी रोडला जायचे ठरले.

तेवढ्यात आई म्हणाल्या..

आई - कुमार.. एक गोष्ट मात्र मनात फार राहिली रे..

दादा - काय?

आई - काहीतरी करून... एक मोठं घर घेऊन.. एकत्र राहता येईल का रे?

सगळेच स्तब्ध झाले क्षणभर!

हा विचार पुन्हा का मनात यावा? आजवर काय काय झाले ते लक्षात नाही की काय? पण... पण....

खरच की! अशी कुठे जरूर होती की जुने घर पडले म्हणून चार घरे व्हायला हवीत? अर्थात, जेव्हा चार घरे स्वतंत्र झाली तेव्हा मात्र स्वतंत्र घरे करण्यासारखीच परिस्थिती होती. कारण वादविवाद होत होते, राजू कानपूरलाच होता. पण आता सगळे एक झालेले असताना वेगवेगळे राहण्यापेक्षा एकत्र राहता येईल का हा विचार इन्टरेस्टिंग होता.

बायकांना स्वतःचे असे एक वेगळे घर असलेले आवडतेच! कारण त्यात त्यांचे स्वत्व असते. सर्वांचे कॉमन घर असण्याचा एक परिणाम असाही होऊ शकतो की हळूहळू विसंवाद होऊन त्याचे पर्यवसान भांडणात व संबंध बिघडण्यात होते.

हाच विचार आत्ता प्रत्येकीच्या मनात होता. आईंचे ठीक होते. त्याना घरात प्रत्येकजण सन्मानानेच वागवणार होता. पण जावाजावांमध्ये काही असा सन्मान राखला जाईलच असे नव्हते. एकाच किचनवर पुन्हा पहिल्यासारखे काम करायचे म्हणजे भांडी वाजणारच होती. अंजली, तारका, गीता व गौरी चौघींनीही ताबडतोब मनातल्या मनात ठरवले होते की आजच रात्री आपापल्या नवर्‍याला कन्व्हिन्स करायचे. अर्थात, आत्ता बोलताना तरी या प्रस्तावाबाबत आनंदच व्यक्त करायला हवा होता.

तेवढ्यात राजेश म्हणाला..

राजू - मी आत्ता जागा शोधत असताना मला.... शनिवार पेठेत एक मस्त घर बघायला मिळाले.. साडे सहा लाखाला विकतायत.... आठ खोल्या, त्यातल्या पाच रूम्सना अ‍ॅटॅच्ड बाथरूम, मोठ्ठंच्या मोठं किचन आहे, दोन ओसर्‍या, दिवाणखाना लाजवाब आहे.. नवीन आहे तसं.. दोनच वर्षं झालीयत.. मालकांना काहीतरी कायमचं मुंबईला जावं लागणार म्हणून विकतायत म्हणे.... सहस्त्रबुद्धे... तळमजल्यावरच आहे..

वर्णन तर अप्रतिम वाटत होतं!

बाबा - साडे सहा लाख????

अंजली - तेच नं..

राजू - सगळ्यांनी घातले तर सहज होईल..

घरात जेव्हा गौरीसंदर्भात वादावादी होत होती तेव्हा राजू कानपूरला होता. त्याला प्रत्यक्ष झळ काहीच पोचली नव्हती. त्याच्या मनात अजूनही तेच जुने घरपण होते.

अंजली - आमचं आत्ताच झालं ना नवीन घर?? त्यात गेले बरेचसे पैसे..

वेदाला कंठ फुटला.

वेदा - बाबा..घेऊ की ते घर... तिकडे कुठे पटवर्धन बागेत राहायचं... कुणी असतं तरी का तिथे??

अण्णा - दादा.. मी एक बोलू का??

दादा - काय?

अण्णा - तू कदाचित नाराज होशील.. पण.. मला असं वाटतं की... एकत्र राहायला लागलं की काही ना काही होतं... उगाच अर्ग्युमेन्ट्स होतात..

तारका - असं काSSSही नाही... घरात चार माणसं असली की रुसवे फुगवे होणारच.. त्याचं काही एवढं अवास्तव महत्व वाढवायची जरूर नाही...

वेदा - बाबा... घेऊ की ते घर..

अंजली - तेच ना.. आणि तो काय महत्वाचा प्रश्न आहे का... मुख्य गोष्ट म्हणजे आत्ता लगेच पैसे कुठले घालणार..

तारका - आत्ताचं विकायचं घर...

अंजलीला या विधानाचा राग आला. स्वतंत्र असलेलं घर विकून पुन्हा एकत्र राहण्यात कुणालाच रस नव्हता. त्यात तारका असं म्हणाली.. पण आत्ता वाद घालण्यातही कुणाला रस नव्हता..

राजू - चौकशी करून येऊ का

दादा - बघून ये काय म्हणतायत.. आहे का गेलंय..

गौरीला खरे तर वैताग आला या चर्चेचा! आत्ता कुठे नव्याने आयुष्य सुरू होत होतं! पण या पटवर्धनांच्या घरातल्यांचे सगळ्यांचेच चेहरे जणू उमलले होते त्या कल्पनेने! सुना तेवढ्या नाराज होत्या.

त्या दिवशी रात्री प्रत्येक भावाला त्याच्या त्याच्या बायकोने प्रचंड चर्चा करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. की ते घर आपण नकोच घ्यायला!

प्रत्येकाकडे दुसर्‍याच्या विरोधी मुद्दे भरपूर होते.

तारका अण्णाला म्हणत होती की दादा आणि वहिनी काय सहज आत्ताचं घर विकून नव्या घरात पैसा देतील. त्यांना दुकान आणखीनच जवळ! गैरसोय तुमचीच होणार आहे. बॅन्क लांब, वेदाची शाळा लांब! ती जाणार कशी शाळेत?

तिकडे अंजली कुमारला पटवत होती. राजूभावजी बिगुलची सोय बघतायत! गीता जॉब करणार असेल, मग बिगुलला सांभाळायला कुणीतरी पाहिजे ना? म्हणून हा विषय ते ताणतायत!

गौरी वसंताला सांगत होती. तुझं दुकान इथे, आता तर हॉटेलही चालू झालंय, एकत्र राहिल्यावर काही घरात हॉटेल काढून चालणार नाही. कशाला काहीतरी विषय काढतात राजूभावजी!

आणि गीता राजेशला म्हणत होती. जुन्या घराच्या दोन उरलेल्या खोल्या अण्णाभावजींच्या नावाने, दुकान दादांच्या नावाने, वसंतभावजींचं हॉटेल आहेच, आपला प्रश्न आपण आत्ताच सोडवलाय जागेचा.. पुन्हा कशाला एकत्र यायला हवंय??

आणि झाले असे की दोन दिवसांमध्ये या सगळ्या वहिन्यांनाच असे वाटायला लागले की हल्ली सगळ्यांना किती मजा येते!

असेच सगळे राहिले तर किती मोठा आधार होईल तो! काहीच उणे पडणार नाहि आयुष्यात! मग हळूच एक जण दुसरीकडे जाऊन तावर बोलू लागली. मग त्या दोघी थोरल्या वहिनींशी बोलाव का यावर विचार करू लागल्या. मग हळूच वसंता राजूला जाऊन भेटला घराची चौकशी केलीस का विचारायला! नंतर मधेच बाबा म्हणाले 'काय, त्या घराच काय कॅन्सल झलं की काय'! मग कुमारदादाने अण्णाला चर्चेला बोलवून घेतले. तिथे वेदा आणि उमेष दोघांनी मुद्दा लावून धरलाच! मग हळूच तारका वहिनी म्हणाल्या की अंजली वहिनींना सोडून तिकडे लांब राहिल्यावर मला काही सुचतच नाही. हळूहळू दिलजमाई सुरू झाली. दोन दिवसांपुर्वीचे मुद्दे आता निरर्थक वाटू लागले.

मग एक घनघोर चर्चा! उलट सुलट मुद्दे! त्यावर प्रतीमुद्दे! तेही खोडून काढले जाणे! मग ते खोडून काढणेही खोडून काढले जाणे! शेवटी बाबांनी निर्णय देणे...

"सगळ्यांनाच एकत्र राहावसं वाटतंय तर घ्या की ते घर?? नाहीतरी आम्हा म्हातार्‍यांना सगळ्यांकडे जात बसता येतच नाही... आपला संसार बघितला की बरं वाटतं... काय रे कुमार???"

निर्णयाच्या अपेक्षेने एकन एक चेहरा दादाकडे वळला..

"राजू... तू उद्या जाऊन त्यांना भेट... थोडा अ‍ॅडव्हान्सही देऊ... काय???"

कल्ला झाला कल्ला! केवळ कल्ला!

त्या दिवशी चितळ्यांचे सर्वात मोठे गिर्‍हाईक कोण ठरले असेल तर पटवर्धन!

एक महिना! एक महिना लागला सगळं व्हायला! प्रत्येकाचे सामान तिथे हलायला, स्थिरस्थावर व्हायला!

कुमारने स्वतःचे घर विकून दोन लाख घातले होते या घरात! अण्णाने बँकेकडून मिळालेला फ्लॅट भाड्याने देऊन सत्तर हजार घातले.. राजेशने आणि वसंताने एक पासष्ट, एक पासष्ट घातले. अण्णा बाकीचे पैसे दादाला आणि दोन्ही धाकट्या भावांना हळूहळू देणार होता.

मात्र एक गोष्ट झाली.

या घरखरेदीत सगळ्यांकडची जवळपास सगळीच बचत कामी आली. त्याचा परिणाम अर्थातच राहणीमानावर झाला. पण मनाचे राहणीमान इतके उच्च होते की तनाचे राहणीमान कसे आहे हे कुणी बघतच नव्हते. रोजचा दिवस म्हणजे दसरा आणि रात्र म्हणजे दिवाळी होऊ लागली होती.

थट्टा मस्करीत वेळ कसा जात होता तेच लक्षात येत नव्हतं! कधी नव्हे ते प्रेम नवीन रेकॉर्ड्स करत होतं दिवसेंदिवस!

त्यातच आणखीन एक गोड बातमी मिळाली. गीतावहिनी पुन्हा प्रेग्नंट होती.

घर!

खर्‍या अर्थाने 'घर' झाले होते आता ते एक!

आजवर नुसतेच विस्कळीत प्रेम आणि तुटक सहवास होते मूळचे घर गेल्यापासून! आता अगदी हक्काचा सहवास आणि ओथंबलेलं प्रेम!

फक्त.............. फक्त एक गोष्ट कुणालाच माहीत नव्हती....

की 'घर' ही त्यांची कहाणी... आता अंतीम टप्यात पोचली होती....

गुलमोहर: 

सही.

संपली की संपत आली.
शेवट गोड आहे.
पूर्ण कादंबरी वाचताना बर्‍याच प्रसंगात रिलेट होता आलं कारण एकत्र कुटुंबाचा अनुभव आहे.
शेवट गोड असला तरी पटला नाही.

मस्तच.... दिलजमाई झालि हे वाचुन कोण आनंद झाला पण........ हा पण किति विचित्र असतो नाहि???? "अंतीम टप्पा........" काय हे भुषणराव.... ये बात कुछ जचि नहि.... अहो आत्ता कुठे सगळे एकत्र आले होते आणि लगेच अंतीम टप्पा......

मस्तच जमलिय......

म स्त ..

मला वट्तं आणखी ३-४ तरी भाग असतील...!
शेवटी शेवटी तुमची कादम्बरी संपुच नये असंच वाटत राहतं.. पण, ते तुमचे शेवटचे "बोल्ड शब्द" आणि तो "निवडक दहात नोंदवा" हा पर्यायी शब्द येतोच स्क्रोल करता करता Happy