अगदी खुशाल अगदी खुशाल

Submitted by बेफ़िकीर on 24 February, 2011 - 09:58

कोणी नसून ठरुया विशाल अगदी खुशाल अगदी खुशाल
करतात लोक हे आजकाल अगदी खुशाल अगदी खुशाल

क्रान्ती घडेल किंवा फसेल याचा विचार सोडून देत
रस्त्यावरून फिरवू मशाल अगदी खुशाल अगदी खुशाल

वैताग जिंकण्याचा म्हणून माघार घेत मी हारतोय
माना तुम्ही स्वतःची कमाल अगदी खुशाल अगदी खुशाल

सारे असेच होते लहान सारे असेच झाले महान
घोडा खरीद मिळताच नाल अगदी खुशाल अगदी खुशाल

माझ्या मनात आहेस होय... त्याच्यात काय लाजायचेय
पिंजून काढ वस्ती बकाल अगदी खुशाल अगदी खुशाल

झोपून खर्च होते बरेच आयुष्य अल्प जागून भोग
डोळे दिसोत हे लाललाल अगदी खुशाल अगदी खुशाल

जे हासतात त्यांना नसेल हे प्रेम लाभलेले कधीच
हातात हात घालून चाल अगदी खुशाल अगदी खुशाल

आनंद ज्यास झाला अशास आनंद देत आनंद माग
उधळून खुद्द हिरवा गुलाल अगदी खुशाल अगदी खुशाल

पर्याय काय आहे समोर येऊन ठाकला जर मधेच
मृत्यूस जिंदगी कर बहाल अगदी खुशाल अगदी खुशाल

संपायचेच आहे अशास जगवायचे कशाला उगाच
करुदे चितेवरी हालचाल अगदी खुशाल अगदी खुशाल

"वागू नका असे" ते म्हणत, "असा वागणार" माझे विधान
"बदनाम व्हाल, बदनाम व्हाल".. "अगदी खुशाल अगदी खुशाल"

काहीतरी स्वत:चे म्हणून सांगू शकाल का एकदाच
करताय रोज नुसती धमाल अगदी खुशाल अगदी खुशाल

मी 'बेफिकिर' न होवो म्हणून हल्ला कराल मागे हटाल
तुमचेच खड्ग तुमचीच ढाल अगदी खुशाल अगदी खुशाल

गुलमोहर: 

छान!!
"पर्याय काय आहे समोर येऊन ठाकला जर मधेच
मृत्यूस जिंदगी कर बहाल अगदी खुशाल अगदी खुशाल "
एकदम छान शेर आहे हा!

Pages