किचन डेकोर. उत्कृष्ट मॉड्युलर किचन्ससाठी पुण्यातले अग्रगण्य नाव.
मिलिंद देशमुख हे 'किचन डेकोर' चे सर्वेसर्वा. सर्वोत्तमतेचा अविरत ध्यास, कामातली सततची शिस्त, प्रयोगशीलता आणि हेवा वाटेल अशी उद्यमशीलता यांच्या जोरावर अकरा वर्षापुर्वी डेक्कनच्या पुलाच्या वाडीत थाटलेल्या छोट्या ऑफिसपासून कोथरूड आणि औंध इथे मोक्याच्या जागेवर उभ्या केलेल्या प्रशस्त आणि आधुनिक शोरूम्सपर्यंतचा केलेला प्रवास आपल्याला थक्क करून सोडतो. आणि त्यांच्याशी बोलताना चिकाटी, आत्मविश्वास आणि 'एंडलेस जर्नी फॉर द एक्स्लन्स इज माय डेस्टिनेशन' या उक्तीचा प्रत्ययही येतो.
मिलिंद देशमुखांशी साजिरा यांनी केलेले हे छोटेसे हितगुज, खास मायबोलीकरांसाठी.
प्रश्न- कसा सुरू झाला ह्या व्यवसायाचा हा प्रवास?
मिलिंद- बी.ई. सिव्हिल पर्यंत शिकल्यावर इंटेरियरमधे आवड असल्याने यात काहीतरी चांगले काम करून दाखवण्याची मनाने उचल खाल्ली. किचन इंटेरियर हा त्यातल्या त्यात जिव्हाळ्याचा विषय. मग विचार जुळणार्या एका मित्रासोबत डेक्कनच्या अगदी छोट्या जागेत ऑफिस थाटले. 'आम्ही किचन ट्रॉलीज करून देतो' अशा छोट्या जाहिरातीपासून सुरुवात झाली. आपण यात उत्तम काम करू शकतो असा आत्मविश्वास वाटत होता. सुरुवातीचा प्रवास खडतर असतोच. पदोपदी निराशा आणि अडचणी. पहिला क्लायंट मिळाला, तेव्हा मात्र हुरूप आला. सुरूवातीला आधीच अस्तित्वात असलेल्या किचन ओट्याला ट्रॉलीज करून द्यायच्या- अशा कामांपासून ते थेट 'संपूर्ण किचन इंटेरियर' इथेपर्यंत हा प्रवास येऊन ठेपला आहे. आज आमची वारज्याजवळ शिवणे येथे अत्याधुनिक जर्मन मशिनरीने सुसज्ज अशी फॅक्टरी आहे. आणि आमच्या कोथरूड आणि औंधच्या दोन्ही शोरूम्स मध्ये २१ मॉड्युलर किचन्स फक्त डिस्प्लेसाठी आम्ही ठेवली आहेत. आमच्या ग्राहकांना निवडीची संधी जास्तीत जास्त मिळावी, जागेचा सर्वोत्तम उपयोग आपण कसा करू शकतो- तसेच या क्षेत्रात वापरली जाणारी नवनवीन तंत्रज्ञाने आणि आधुनिक कच्चा माल आणि वस्तू यांचा उपयोग हे सारे बघायला मिळावे- हा हेतू.
स्पेशालायझेशन विचाराल, तर 'मॉड्युलर किचन्स' असेच उत्तर द्यावे लागेल.
प्रश्न- या धंद्यामध्ये कोणत्या प्रश्न-समस्यांचा सामना सतत करावा लागतो..? म्हणजे 'इश्युज- हार्ड टू डील' असं काहीतरी?
मिलिंद- समस्या म्हणता येईल की त्याला, ते नाही सांगता येणार, पण प्रत्येक ग्राहकाच्या घरातल्या जागा आणि गरजांनुरूप सर्वच बदलते- याचा थोडा त्रास होतो. आमच्या कामाचे स्टँडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करणे खूप अवघड आहे. कमीत कमी भारतात तरी सध्या ते शक्य नाही. म्हणजे थोडक्यात प्रत्येक कामाची सुरूवातच गमभन पासून करायची! ग्राहकाच्या जागा-गरजा-बजेट यांचा मेळ आमच्या कामाशी घालण्याची सुरूवात डिझाईनपासून होते. मग त्यात एकदा किंवा अनेकदा चर्चा करून झाल्यावर फेरफार-बदल; त्यावरून होणारे कमी-जास्त होणारे बजेट इ. मग शेवटी अॅप्रुव्हल, आता या सार्यात अनेकदा आपली स्वतःची जागा, गरजा आणि बजेट याबद्दलच्या ज्याच्या त्याच्या स्वभावानुसारचे गैरसमज निस्तरणे हेही आलेच. लहरी किंवा थोडे 'हटके' असे स्वभाव असले, तर हे प्रकरण बरेच लांबते. कधी कधी खूप संयम बाळगूनही सारेच बारगळते.
दूसरे म्हणजे या धंद्याचे काही प्रमणात असलेले 'लेबर ओरिएंटेड' असे स्वरूप. कितीही अत्याधुनिक यंत्रणा, मशिनरी वापरली, तरी फॅक्टरीत थोड्याफार प्रमाणात आणि मग ग्राहकाच्या घरी बर्याच अंशी कामगार वर्गावर अवलंबून राहावे लागते. ग्राहकांच्या स्वभावांसारखेच कुशल-अर्धकुशल कामगार वर्गांच्या लहरी देखील सांभाळाव्या लागतात.
ग्राहकाला कमीत कमी त्रास होईल असे बघावे लागते. डिझाईन एकदा अॅप्रूव्ह झाले, की सारे काही काम आमच्या कारखान्यात. आणि शेवटी थेट फक्त इन्स्टॉलेशन /असेंब्लीसाठीच क्लायंटच्या साईटवर, म्हणजे त्यांच्या घरी. फर्निचरच्या निमित्ताने घरात अनेक दिवस अव्याहत आवाज, पसारा, धूळ, त्यानिमित्ताने होणार्या त्यांच्या गैरसोयी, हे सारेच टळते. यात काम चालू असताना क्लायंटने अचानक काहीतरी सुचून बदल केले तर त्रास होतो, फेर्या वाढतात, काम वाढते, लांबते. पण त्याला इलाज नाही.
एकंदरित आता या सार्या गोष्टी आम्ही कामाचा भाग म्हणून स्वीकारू लागलो आहोत. समस्यांचे- अडचणींचे निराकरण करण्याचा सतत प्रयत्न करत राहणे हा कामाचा भागच नाही का?
प्रश्न- या व्यवसायात आणखी कोणत्या नवीन संधी खुणावत आहेत? किंवा या व्यवसायाशी संबंधित नसलेले एखादे काम भविष्यात हाती घेण्याची इच्छा?
मिलिंद- 'मॉड्युलर किचन्स' ही आमची इतक्या वर्षांनंतर खासियत झाली आहेच. पण संपूर्ण घराचे इंटेरियर- असे काही प्रोजेक्ट्स हाती घ्यायचे आहेत. 'नुसते किचन का? सारेच घर आम्हाला करून द्या नव्याने' असं सांगणारे अनेक ग्राहक आहेत. मूळ कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, आणि पुरेसे यंत्रबळ, मनुष्यबळ आणि आत्मविश्वास आल्याशिवाय हे करणे योग्य नाही, म्हणून आजवर टाळत आलो. पण आता अकरा वर्षांनंतर, इतक्या वर्षांच्या अनुभवाने आणि अनेक ग्राहकांनी आमच्यावर टाकलेल्या गाढ विश्वासामुळे हे सारे सहज शक्य होईल असे वाटते आहे. सर्व प्रकारच्या माध्यमांत सततच्या जाहिराती आमच्या चालू असल्या, तरीही चांगले काम केल्यामुळे झालेली कर्णोपकर्णी प्रसिद्धी- हा मुद्दा आम्हाला बरीच मदत याबाबतीत करेल, असे वाटते.
'अनरिलेटेड डायव्हर्सिफिकेशन'चा सध्या तरी काहीही विचार नाही. भविष्यात केव्हा जमले तर बघू या.प्रश्न- नव्याने हा व्यवसाय करू बघणार्यांना काही सांगू इच्छिता? काही आवडते, स्वतःला पटलेले असे 'कोट' वगैरे?
मिलिंद- "बी सिरियस" इतकेच. अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवी प्रत्येक गोष्ट. कितीही छोटी, कमी महत्वाची असू देत. तिचे आता महत्व कमी आहे म्हणून गांभीर्याने घेतले नाही, तर नंतर तिचे वाढलेले महत्व ही किंमत आपल्याला मोजावीच लागते. 'हसतखेळत'ही अनेक गोष्टी घ्याव्याच लागतात, किंवा क्वचित प्रसंगी नाईलाजाने दुर्लक्षही करावे लागते, पण मनोमन तिचे महत्व ओळखून असावे. ते तसे ओळखलेच नाही, तर मग काही पुढे काही गोष्टी बिघडत, फसत जातात.
***
मिलिंदचे शेवटचे बोलणे ऐकले, तेव्हा हे याच नाही, तर जगातल्या कुठच्याही, छोट्या मोठ्या व्यवसायात, कामात हे तंतोतंत लागू होते- असा विचार मनात आला. 'किचन डेकोर'च्या भरभराटीसाठी शुभेच्छा देऊन आणि त्यांनी मायबोलीला दिलेल्या शुभेच्छा स्वीकारून मी निघालो.
***
kothrud showroom- opp. yashwantrao chavan natyagruha, kothrud, pune
Aundh showroom- near sony world, near parihar chauk, aundh, pune
मिलिंद देशमुखांसाठी मायबोलीकरांचे काही प्रश्न असल्यास प्रतिसादांत कृपया विचारावेत. शक्य असल्यास इथेच प्रतिसादांत ते उत्तर देतील. धन्यवाद.
***
मुलाखत छान झाली आहे.
मुलाखत छान झाली आहे. प्रतिक्रियांमधे श्री. देशमुखांनी दिलेली माहिती उपयुक्त आहे.
आज हा धागा वर काढण्याचा उद्देश म्हणजे ही मुलाखत वाचल्यावर २ वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका नातेवाईकांना या पानाची लिंक पाठवली होती. तेव्हा त्यांच्या घराचं बांधकाम सुरू होतं. त्यांनी त्यांच्या ३ मित्रांना लिंक फॉरवर्ड केली. तिघांनीही 'किचन डेकोअर'कडून कीचन्स तयार करून घेतली. काम उत्तम झालं. कुठलेही प्रॉब्लेम्स आले नाहीत असा फीडबॅकही दिला. आता नातेवाईक स्वतः यांच्याकडून स्वयंपाकघराचं काम करवून घेणार आहेत. (घरी आलेल्या त्यांच्या माणसानं, "तुम्हाला आमच्याबद्दल कुणाकडून कळलं" असं विचारून घेतलं.
) महत्त्वाचं म्हणजे, हे नातेवाईक, सोयीचं पडेल म्हणून, स्वयंपाकघराचं काम, घराचं इंटिरिअर करणार्यांकडूनच करवून घेणार होते. पण एकतर त्या कंपनीचा अनुभव आवडला नाही. स्वतःच्याच कल्पनांचं घोडं दामटणारे आणि क्लाएंटच्या प्रत्येक कल्पनेला "माझं ऐका, हे चांगलं दिसणार नाही" म्हणणारे लोक आवडले नाहीत. 'किचन डेकोअर'ची माहिती होतीच, म्हणून त्यांना संपर्क साधला. काल शोरूममधे जाणार होते. घरी आलेल्या व्यक्तीचा अनुभव चांगला होता. यांच्या कल्पना आणि गरजा समजून घेतल्या.
साजिर्या, या मुलाखतीकरता तुला धन्यवाद!
क्लाएंटांनी तसं सांगितलं की नाही हे माहिती नाही, पण मायबोलीमुळे श्री. देशमुखांना बराच बिझनेस मिळाला.
मृण्मयी + १ ह्या मुलाखतीची
मृण्मयी + १
ह्या मुलाखतीची लिंक मंजूडीकडून मिळाली. आम्ही नुकतंच किचन डेकॉरकडून मॉड्युलर पॅरलल किचन युनिट बनवून घेतलं. आमचाही अनुभव चांगला आहे
वॉर्डरोब्जही त्यांच्याकडूनच बनवून घ्यायचा विचार होता. एस्टिमेट घेतले होते पण काही कारणाने आम्ही लाकडी वॉर्डरोब्जचा प्लॅन रहित करुन गोदरेजचे वॉर्डरोब्ज घ्यायचे ठरवले म्हणून ते राहिले.
छान. तुमच्याबद्दल बरच
छान. तुमच्याबद्दल बरच (चांगलच) ऐकलय.
शुभेच्छा !
आज एवढ्या दिवसांनी मी ही
आज एवढ्या दिवसांनी मी ही मुलखात वाचतोय महणजे २०११ तो २०१४ ...तीन वर्षांनी किचन मध्ये पुण्यासारख्य शहरात कितीतरी बदल जाला आहे...खुप लोक या क्षेत्रात आलेत...तरीही अजून बरंच करता येण्यारारख आहे आस वाटत..
वर सरांनी सांगितलेलं सर्व आजही लागूच पडत...
मला वाटत आता किचन बनवणार्या लोकांची एक संघटना असावी त्यात काही नियम असावेत ...हे ग्राहक व व्यावासायीक दोघाम्च्याही फायद्याचे असेल..
नाही का?
प्रमोद धुमाळ
९९२३७५९९९०
पुणे
Pages