नऊ रुपये किलो ...

Submitted by vaiddya on 18 February, 2011 - 03:33

भ्रष्टाचाराच्या टोलेजंग आकड्यांचे गगनचुंबी मजले,
कितीतरी बलात्कारित मुली, बाया..
पेटून किंवा पेटवून मेलेली माणसे ..
टॅक्स चुकवणारे नट-नट्या ..
भाव चढल्या किंवा उतरल्याने रस्त्यावर आलेले शेतकरी..
ओतलेलं दूध किंवा फेकलेला शेतमाल ..
भडकलेले जमाव किंवा पेट्रोल-डि़झेल ..
कायमच्या थंडावत चाललेल्या कला ...
काळाने गिळंकृत केलेले कलाकार ...
जातीच्या आभिमानाची आंदोलने ..
जमातींची संमेलने ...
देहांची विवस्त्र प्रदर्शने ..
खेळाडूंच्या दुखापती-मान-अपमान-लिलाव !
जाहिरातींमधली उत्तानासने ...
निवेदनांमधली आर्जवे ..
राजकारणी हेवेदावे-कावे !
असे सगळेच ..
माझ्या बेडरूममधल्या कपाटाशेजारच्या
कॉर्नरमधे ..
निमूट उभे आहे ..
एक चळत बनून !
रोज एव्हढे सगळे ..
आणि आणखी बरेच काही त्या ढिगावर येऊन पडत आहे ..
नवे .. खपाऊ ..
म्हणून छापले जाऊन ..
अश्या ढिगार्‍याचा भाव सध्या वधारला आहे ..

माझ्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या
दुकानाबाहेरचा फलक म्हणतो आहे

सर्व रद्दी नऊ रुपये किलो !

गुलमोहर: