पापाची भागीदारी

Submitted by अभय आर्वीकर on 16 February, 2011 - 12:10

प्रिय ग्राहक मित्रहो,
यंदा कांद्याचा भाव आणि कांद्याचे भावाचे राजकारण चांगलेच गाजले. हे आपण जाणताच.
यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन प्रतिएकरी कमी आले मात्र प्रति एकरी उत्पादनखर्च एकतर दरवर्षीएवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आला.
उत्पादनखर्च वाढीची कारणे:
१) वाढलेले डिझेलचे भाव
२) सेंद्रीय /रा. खताच्या वाढलेल्या किमती
३) दुपटी-तिपटीने अचानक वाढलेले शेतमजूरीचे दर.
४) अतिपावसामुळे वाढलेला मशागतीचा खर्च.

खर्च वाढलेत पण उत्पादन मात्र कमी आलेत, त्यामुळे कांदा उत्पादकाला यावर्षी कांदा पिकवायला प्रतिकिलो रू. ४०/- पेक्षा जास्त खर्च आला.
*
मागणीपुरवठ्याच्या सिद्धांतानुसार, मागणी आणि पुरवठा यात तफ़ावत आल्याने कांद्याचे भाव वाढून ७०-८० रू. पर्यंत प्रति किलो एवढे वाढलेत. त्यामुळे निसर्गाने शेतकर्‍यांशी न्याय करून त्याचा उत्पादनखर्च भरून निघेल अशी व्यवस्था केली.
*
पण विद्वत्ताप्रचूर विद्वान अर्थशास्त्र्यांनी कांगावा केला. त्यामुळे नेहमीप्रमाणेच केंद्रशासनाने कांदा निर्यातबंदी केली एवढेच नव्हे पाकिस्तान मधून कांद्याची आयातही केली. अनैसर्गिकरित्या कृत्रिमपणे कांद्याचे भाव पाडलेत.
*
आता प्रतिकिलो २ रू सुद्दा शेतकर्‍यांच्या हातात पडणार नाही, अशी शासनाने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे.
*
प्रिय ग्राहक मित्रहो,
आता स्वस्तात कांदा खरेदी करतांना तुम्हाला आनंद होत असेल तर आनंद जरूर माना.
पण आपल्याच देशातल्या गरीब, देशोधडीस लागलेल्या, कोणत्याही क्षणी आत्महत्या करण्याची पाळी येऊ शकते अशा कांदा उत्पादक शेतकर्‍याला आपण प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडत आहोत, याचीही जाणिव असू द्या.
*
भविष्यात एखाद्या कांदा उत्पादकाने आत्महत्या केली तर त्या पापाचे सुक्ष्म/अंशता आपणही तर भागीदार नाहीत ना? याचाही शोध घ्या.
*
हे निवेदन वाचून भावनाप्रधानही होऊ नका. कारण ग्राहकासमोर शेतकर्‍याला आता प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडण्याशिवाय इलाजही उरलेला नाही. फ़क्त हे स्वत:च्या मनात ठेवा.
तुम्हाला हे जर जिवाभावातून कळले, हृदयात सहानुभूती निर्माण झाली, नेमक्या प्रश्नाची जाणिव झाली तर "बुडत्याला लुटण्याच्या" पातकातून तरी नक्कीच मुक्ती होईल.
*
अनेकांना प्रश्न पडतो की शेती परवडत नाही मग शेती का करतात. एकेकाळी मलाही हाच प्रश्न पडला होता.
आता मात्र उत्तर गवसले. आत्महत्या करायची वेळ आली तरी चालेल पण तो शेती करायचे सोडू शकत नाही.

कारण,

शेतकरी हा उत्पादक आहे. आणि उत्पादकाला उत्पादन केल्याशिवाय चैन पडू शकत नाही.

उदा. मुलगा मोठा झाल्यावर तुला लाथा घालेल असे कितीही मातृत्वाला समजावून सांगीतले तरी मातृत्वाची प्रसवण्याची प्रेरणा जशी कमी होत नाही, तसेच परिणाम काहीही होवोत शेतकर्‍यांची उत्पादन करण्याची प्रेरणा काही कमी होत नाही.

पण "जालिम जमाना" हे काही लक्षात घेत नाही.
२ रुपयात किलोभर कांदा मिळतो म्हटल्यावर तो जाम खुष आहे.

गंगाधर मुटे
*******

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी या दृष्टिने कधी विचारच केलेला नव्हता :अरेरे:. म्हणणे पटले... मला प्रगतीच्या काही आशा दिसत नाही.

२०१० मधे दिवाळीत मी भारतात गेलो होतो... काही कारणाने शेगावाच्या आधी रेल्वे थांबवली होती. शेतकर्‍यांचे रेल-रोको आंदोलन सुरु होते. त्यांच्या रास्त मागण्या सरकारच्या कानावर जाण्यासाठी 'आदळ आपट'. मुटे साहेबांच्या मायबोलीवरच्या लेखांनी मनात एक वेगळी बाजु soft corner तयार झाली होती म्हणुन झालेल्या विलंबाचा मला काही त्रास वाटला नाही. सोबतच्या प्रवाशांना म्हटले 'विदर्भ एक्प्रेस' थांबवली असती तर २-५ मोठे मासे तरी रखडले असते... मंत्री महाशय साधारण 'विदर्भ एक्प्रेस' ला पसंती देतात.

<<शेगावाच्या आधी रेल्वे थांबवली होती. शेतकर्‍यांचे रेल-रोको आंदोलन सुरु होते.>>

त्या रेल्वेत तुम्ही होते काय?

मी होतो ना इंजिनसमोर.
http://shetkari-sanghatana.blogspot.com/search/label/%E0%A4%86%E0%A4%82%...

हो मी होतो... मला वाटते रात्री ९:३० ला वातावरण निवळले आणि गाडीचा मार्ग मोकळा झाला.

अरेरे! किती मी दुर्दैवी.
उदयजी,
तुम्ही आणि मी एकाच प्लॅटफ़ॉर्मवर चार तास होतो. आणि तरी आपली भेट झाली नाही.
पण ही "न झालेली भेट" मात्र आता माहित झाल्यावर अविस्मरणीय ठरणार आहे. कारण तुमची गाडी अडवून तुम्हाला चार तास ताटकळत ठेवण्यास कारणीभूत ठरलेल्या पहिल्या दहाबारा आंदोलकामधील मीही एक आहे.
त्याचे झाले असे की, कापसाच्या निर्यातीवर बंदी लादू नका या मुख्य मागणीसह इतर चार मागण्यांचा सोक्षमोक्ष लागावा म्हणून बेमुदत रेल्वे रोको करायचा असा शेतकरी संघटनेचा निर्णय झाला. जाहीर सभेमध्ये मा. शरद जोशींच्या तोंडून आदेश निघताच, सभा संपायची वाट न पाहता शेतकरी रेल्वेच्या दिशेने धावायला लागले.

शेगावच्या या शेतकरी महामेळाव्यात यावेळेस नव्या दमाच्या तरूण शेतकरीपुत्रांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सहाजिकच या नव्याने संघटनेत सामील झालेल्यांना शेतकरी आंदोलनाची शिस्त माहीत नसणारच. त्यामुळे अन्य पक्ष आंदोलन करतात त्याच धर्तीवर आंदोलनाची सुरुवात होऊन काही अनिष्ट घडू शकेल याची मला भीती वाटली. भीती वाटण्याचे कारण असे की, "आंदोलन स्थळी पहिल्यांदा महिला शेतकरी जातील, त्यांच्या मागून पुरूष कार्यकर्त्यांनी जावे" असा स्पष्ट आदेश शरद जोशींनी दिला होता. आणि तरीही हे नवयुवक रेल्वेच्या दिशेने पळत निघाले होते.

नाही म्हटले तरी आम्ही अनुभवी आंदोलक. शेवटल्या क्षणापर्यंत शिस्तीत आंदोलन कसे चालवायचे, यात बर्‍यापैकी पारंगत झालेले, शिवाय २५ वर्ष आंदोलनात घालवल्याचा अनुभवही पाठीशी.
मग काय, मीही बेधूंद होऊन सुसाट वेगाने पळत निघालो. सभा स्थळ ते रेल्वे स्टेशन हे अंतर किमान २ कि.मी तरी असेल. आणि मी धावतच होतो. पुढच्यांना मागे टाकीत होतो. पण त्याहीपुढचे जत्थे काही संपत नव्हते. कारण तेही धावतच होते. आणि पुढच्याला, जेव्हा तोही धावतच असेल तेव्हा, ओलांडून पुढे जाणे किती कठीण असते, ते कळायला अनुभवच लागतो. कल्पना, वाचन आणि ऐकूण समजून घेण्याच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे हेी.

(अपुर्ण)

मुटेसाहेब आयातीतीमुळे दर कसा काय पडतो? समजा, ५ किलोची गरज असताना, २ किलोच उत्पादन झाले, तर सरकार आयात ३ किलोचीच करते ना? त्यामुळे जितकी डिमांड आहे, तितकाच सप्लाय मेंटेन केला तर दरात तफावत यायचे कारण उरणार नाही..

कांद्याची बातमी मी टी व्ही वर पण पाहिली होती.. ते कांदे बघून मनात दुष्ट शंका आली होती-२ दिवसांपूर्वी, आता तुम्हालाच ती शंका विचारतो.... कांदे शेतातून काढल्यावर त्याच्यावर लाल रंगाचे जे वाळलेले ३-४ थर तयार होतात, ते तयार व्हायला किती दिवस/आठवडे लागतात? Proud आलं का लक्षात मला काय म्हणायचे आहे ते? कांदा नुकताच शेतातून काढला आणि लगेच बाजारात आणला, तर त्याच्यावर वाळके थर कमी असणार ना? आता इतके वाळके थर त्या कांद्यावर दिसत होते म्हणजे कांदा शेतातून आधीच काढून कुठेतरी ठेवला होता.. तेंव्हा रेट जास्त होते. आणि नंतर रेट पडतोय म्हटल्यावर हे कांदे लगेच बाजारात आणले गेले असणार, असा माझा एक अंदाज आहे.. कांदा नेमका तयार कुठल्या महिन्यात होतो? बाजारात किती दिवसात येतो? ( ही केवळ एक शंका आहे.)

कांदा नेमका तयार कुठल्या महिन्यात होतो? बाजारात किती दिवसात येतो? ( ही केवळ एक शंका आहे.)
----- माल (येठे कांदा) बाजारात येतांना सरळ मार्गाने येतो अथवा मधे दलाल असतांत?

माझ्या तोकड्या ज्ञानानुसार (मुठे साहेब दुरुस्त करतिल), बहुतेक फायद्याचे लोणी हे मधात असलेले दलाल लोकंच खातात... कारण त्यांच्याकडे मॅनिप्युलेशन साठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्ही असतांत. म्हणजे (शेतकर्‍याला जेव्हा पैशांची जरुरी असते.... तत्काळ पैसे हवे असतांत.... थांबायला धिर नसतो) माल अत्यंत कमी दराने विकत घेतांत... मग हवे तेव्हढे (किंवा जमेल तेव्हढे) दिवस स्वत : कडे ठेवायचे आणि जेव्हा भांव चांगला (टंचाई असते) असतो तेव्हा माल बाजारांत आणायचे. लोकं चढ्या भावाने खरेदी करतात म्हणजे काय सर्व पैसे शेतकर्‍यालाच जातो कां?

yes, but the people who were shown in that news were the farmers. They were not agents. The farmers themselves brought their goods for selling to the agents. So it was the track of a onion from farmer >>>to agent in the market. The agents were giving low rate and farmers were crying. And therefor, I have this query. The onion which was shown in the news was more ripened which probably indicates that the onion was kept with the farmer for a longer time. The agents' manipulation was only with the price , but here probably 'sathebaaji' was made by farmers. ( its a probability... ) font problem Sad

अशा प्रकरणात कमोडिटी एक्स्चेंज मदत करु शकते... ज्या दिवशी किंमत योग्य वातते, त्याच दिवशी सेल ऑर्डर द्यायची... नंतर किंमत चढली , पडली तरी फरक पडत नाही.. सेटलमेंटच्या दिवशी मालाची लॉटनुसार डिलिवरी द्यायची.

कमोडिटी एक्स्चेंजची स्थापनाच शेतकर्‍याच्या हितासाठी झाली आहे. पण शेतकर्‍याला यात सहभागी होता येत नाही आणि इतर लोक ट्रेडिंग करुन पैसे मिळवत बसतात.. ज्या दिवशी चांगला दर असेल त्याच दिवशी दर बुक करणे हे शेतकर्‍याला साध्य करुन दिले पाहिजे.

कमोडिटीवर बटाटा ट्रेड होतो. कांदा होतो का हे माहीत नाही..

( कांद्याची किंमत झपाट्याने पडली त्याचा आणखी एक फायदा झाला.. खाद्य महागाई दर कमी झाला.. खाद्य पदार्थांपैकी एखाद दुसर्‍या वस्तुची किंमत जरी एकदम पडली तरी सरासरी खाली येतेच , भले बाकी वस्तुंच्या किंमती आहे तशाच का राहीनात आणि सरकार मात्र टिमकी वाजवायला मोकळे.. महंगाई काबु मे है.. ( आणि लगेच शेअर मार्केट हिरवेगार झाले.. Happy )

कोणाला दोन रुपये किलो दराने कांदे मिळताहेत?
आणि याआधी भरमसाठ दराने कांदे घेऊन पुण्यसंचय केला की आम्ही. तेव्हा ग्राहकांना लुबाडणार्‍यांनी पापक्षालन कधी करायचे?
ग्राहकांनी शेतकर्‍यांची लुबाडणूक होते म्हणून कांदे खरेदी करणे थांबवले तर भाव आणखी नाही का पडणार?

<<तेव्हा ग्राहकांना लुबाडणार्‍यांनी पापक्षालन कधी करायचे?.>>

ग्राहकांना आणि शेतकर्‍यांची लुबाडणुक करणारे जे आहेत त्यांनाच "सरकार" म्हणतात. Happy

भाव कितीही वाढले तरी फायदा होतो फक्त दलालांचा.
ना उत्पादकाला योग्य भाव मिळतो ना ग्राहकांना स्वस्त मिळतो.
रयतू बाजार हा पर्याय होऊ शकतो का ?

शेतकरी हा उत्पादक आहे. आणि उत्पादकाला उत्पादन केल्याशिवाय चैन पडू शकत ही.
मुटेजी,
पुर्ण अनुमोदन !
६० रु दर असलेला कांदा (माल) अवघ्या काही दिवसातच ६ रु किलोंनी मिळायला लागतो, यावरुन शेती किती बेभरवशाची आहे हेच दिसुन येईल .

पुण्यामध्ये पिंपरी-चिंचवड मार्केट मध्ये शेतकर्‍यांकडुन व्यापार्‍यांकडे डायरेक्ट येणार्‍या/शेताच्या बांधावरुन मागवल्या जाणार्‍या भाज्या,फळे या मुळे परिसरातील शेतकर्‍यांना बर्‍यापैकी दर मिळत होता,ग्राहकांना देखील योग्य दरात माल मिळायचा, इथल्या व्यापार्‍यांना देखील चांगला भाव देणं शक्य होत होत, पण मार्केटयार्ड ,गुलटेकडी येथील दलाल,अडते (एकुण सरकारी व्यवस्था/कमेटी) यांच नुकसान होऊ लागल्यामुळे,पिंपरीतल्या अशा खरेदीवर पुर्ण बंदी आली,त्या व्यापार्‍यांच्यावर कारवाईची भीती घालण्यात आली.

यावरुन सरकारला ग्राहक किंवा शेतकरी यांच्यापेक्षा काळजी कुणाची जास्त आहे हेच दिसुन येतं ..