कदमाचा बाब्या धापा टाकतच आला. एकानं विचारलं," काय जालं रं?"
धापा टाकतच तो म्हणाला," आवं लौकर चला कि तिकडं. त्यो शिरप्या नव्हं कां? त्यो पडलाय हिरित."
सगळ्यांनीच एकदम वळून पाहिले.
साधारण सातची वेळ. मारुतीच्या समोरच्या पारावर गावकरी निवांत बसलेले. माघ महिना संपत
आलेला, तरीहि,संध्याकाळची थंडी कमी झालेली नव्हती. शेतातली कामं जवळपास संपलेली होती. त्यामुळे
थोडा निवांत वेळ होता. कुणी घोंगड्या पांघरून, कुणी शेकोटी पेटवून तर कुणी बिड्या फुंकत गप्पा मारत
बसले होते.गावात विजेचे दिवे होते पण एक आठवडा दिवसा, एक आठवडा रात्री असे होते.आज दिवे दिवसा होते त्यामुळे रात्री गावात अंधार होता.आणि प्रतिपदा असल्याने तशी रात्रही अंधारीच होती. मारुतीच्या देवळातल्या समईच्या उजेडात आणि शेकोटीच्या उजेडात जेवढी तोंडं दिसतील तेवढीच.बाकी सगळ्या गप्पा अंधारातच
चालु होत्या.
" ए कोण रं तू? अन खुठं पडला शिरप्या?" बाब्या तोपर्यंत गावात अजून इतराना सांगण्यासाठी अंधारात गडप झाला. सगळे भराभर उठले. अंधारातच चर्चा सुरु झाली.
"ए काय म्हण्ला रं बाब्या. बाब्याच व्हता नव्हं?"
"आरं तो शिर्प्या नव्हं का, तो हिरित पडला म्हन"
"मग बोलत काय बसलाता चला कि लवकर. पण तो पडला कंच्या हिरित? वरल्याकडच्या कि खालल्याकडच्या." एक मुंडासं बोललं.
"म्हायत नाय बा" कुणितरी मान हलवली.
" आरं त्या बाब्याला इचारा कि मग?"
"त्यो हाय कुटं?"
"ए इचार कसला करता. चला वरल्याकडं जाउ. ती हिरंच पायवाटंला हाय. अंधारात दिसली
नसल." एक जण खेकसला.
"ए नाम्या कंदिल आण कि तुजा." असं म्हणून एकाने दुकानातला कंदिल उचलला. नाम्या लागला
ओरडायला तसा खुदबा त्याच्यावर खेकसला " ए गपए. उगं बोंबलु नग. काइ काळ येळ कळतय का?
तो शिरप्या पडलाय हिरित."
"ए अजुन दोन चार कंदिल घ्युन या रं. " अन्धारात कोण काय बोलतय काहीच समजत नव्हतं.
सगळे घाईघाईने निघाले. रस्ता दिसत नव्हता. सवयीने खाचखळगे काटेकुटे काही न पाहता सगळे चालले होते.एवढ्यात कुणितरी ओरडलं,
"अन दोरखंड बि लागल की."
"खरं कि. आता ते कुणाकडं मिळंल?."
"नाना पाटलाकडं मिळल पहा."
"ए जारं कुणितरी पाटलाकडं."
"म्या जातू." कुणितरी पाटलाकडं पळालं.
अंधारात कोण कुणाशी बोलत होतं काही कळत नव्हतं.दोन चार कन्दिल गोळा झाले.
थोडेसे चेहरे दिसायला लागले. हळू हळू इतर गावकरी गोळा झाले.पण कुठं जायचं ते ठरत नव्हतं. शिवाय दोरखन्ड आणलं नव्हतं म्हणून घोळका करून सगळे तिथेच थांबले. पुन्हा गप्पा सुरू झाल्या.
"पन म्या म्हन्तो हा येवढ्या रातच्यान कशाला गेलाव तिकडे."कुणितरी वैतागलं.
" तेला बि आजच पडायच व्हतं हिरित."
"आरं तेच्या वावरात लै उन्दीर झाल्याती म्हन." एकाने माहिती पुरवली.
"आरं वावरात काय देशातच लै उन्दीर झाल्याती." कुणितरे आपली कळवळ व्यक्त केली..
"व्हय व्हय. लै उन्दीर झाल्याती बग. चारा खा,कपडा खा, पैसा खा, आरं घरंच्या घरं नरड्यात चालल्याती तेन्च्या." एक मुंडासं बोललं. सगळे हसू लागले.
"तुमाला ती गोष्ट म्हाइत हाय का. एका गावात लै उन्दीर झाल्ते म्हन.काळे,गोरे,भुरके. समदं
खाऊन लोकाना पिसाळून सोडलं व्हतं. येक दिस येक मुरलिवाला आला अन मुरली वाजवू लागला. समदे उन्दीर तेच्या मागून गेले. त्यानं समद्याना नदीमध्ये बुडवलं. ज्ञानु सांगत असतो बाबा. त्याच्या पुस्तिकात हाय म्हन."
एकानं आपलं ज्ञान पाजळलं.
"आपल्या देशात बि असा मुरलीवाला आला पयजेल अन समद्या उन्दरांना नदीत नेऊन्शान
बुडवलं पायजे." गप्पा रंगायला लागल्या होत्या. शिरप्याला लोक बहुतेक विसरले होते.
" आता बया, व्हय का.ह्ये गडी मानसं अजुन हिथच हायेती. आव गप्पा काय मारत हुभं
राहिल्याती ?तिकडं ते शिरप्या मरल की. जावा की लौकर." घाईघाईने तिथे येत परटाची म्हातारी
तावदारली.
," ए मावश्ये तु जा की तिकडं. काड त्या शिरप्याला भाईर. " एक तरूण पोरगं फिद्फिद्लं. सगळे जणु भानावर आले.
"आरं ए दोरखन्ड आणायला गेल कि वळायला. चला रं आपण फुडं जाऊ. " काही वयस्कर
माणसं घाई करू लागली.
"आव पन त्या हिरित पानी नाय हाय. शिरप्याला काय बि व्हणार नाय. अन तेला पवायला
बि येतं."
" पानी नसल पन किडुक बिडुक असलं तर." एकानं भीति बोलून दाखवली.
सगळे भराभरा निघाले. एव्हाना सगळा गाव गोळा झाला होता. बायका चुकचुकत होत्या. चर्चा
चालू होती. कुणि रात्री दिवे नसतात म्हणून सरकारला शिव्या घालत होतं.कुणि शिरप्याच्या काळजीत होतं.
अन्धारी रात्र, झाडांच्या लांबलांब सावल्या, रात किड्यांची किरकिर,सगळ्यांच्या पायातल्या वहाणांचा कर्र कर्र आवाज,चार दोन कन्दीलाच्या उजेडात थोडेफार दिसणारे चेहरे,त्यांचे बोलण्याचे आवाज, आजुबाजुची नीरव शांतता, मध्येच एखाद्या कुत्र्याचं केकाटणं,हे सगळं वातावरण जास्तच भयभीत करणारं होतं.
सगळे कसेबसे विहिरीजवळ पोहोचले. झाडाझुडुपात झाकलेली विहिर दिसतच नव्हती.सगळे
कन्दील पुढे आले.झुडुप बाजुला सारून सगळे खाली बसले. पण विहिरीत खालचे दिसणार कसे? कन्दील जरी
धरले तरी उजेड वरच रहात होता. एकाने कन्दील वाकडा केला.
"आरं आरं दमान घे कि जरा. घासलेट वततोस का काय?" कुणि एक करवादला.
" म्या म्हन्तो पयलं तेला हाक मारून बगा."असे एकाने म्हणताच सर्वांनी त्याला दुजोरा दिला.
" शिरप्या, ए शिरप्या " सर्वानी हाक मारायला सुरुवात केली. "शिरप्या शिरप्या" एकच गिल्ला
केला. पण आतून काही आवाज येईना.
" आता काय बेसुद जालं कि काय? आवाजच न्हाय."
"आरं ये शिरप्या आरं बोल ना बाबा काय तरी. " शिरप्याची आई लांबूनच गळा काढत आली.
बायकांनी डोळ्याला पदर लावले." असं कसं जालं व, कवा गेला, कशाला गेला काय बि कळलं नाय बगा".
शिरप्याची आई अंग टाकून रडत होती. बायका तिला समजावत होत्या.काय करावं लोकांना कळत नव्हतं.
शिरप्याचा आवाज येत नव्हता. लोक बेचैन झाले होते.
तेवढ्यात मागून कुणितरी धावत पळत आलं. " हे घ्या दोरखन्ड" दोरखन्ड आणलं तसा
सर्वांचा गोंधळ सुरु झाला." ए टाका तो हिरित. सुद असेल तर धरल."
"आरं जरा दमानं. पुना कुनितरी पडल तेच्यात." सर्वाना आता फक्त शिरप्या दिसत होता.
इथे यायला उशीर झाला म्हणून सगळे हळ्हळ्त होते. मागच्या लोकांना दिसत नव्हते. म्हणून ढकलाढकली
चालू होती.प्रत्येक जण बोलताना कन्दील तोंडाजवळ आणून बोलत होतं.
एवढ्यात मागून कुणितरी आला आणि सगळ्याच्या मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागला.तो सारखा विचारत होता." आव काय झालय? म्या कवाचान विचारतोया."
"काय झालं म्हून काय इचारताय. शिरप्या पडलाय हिरित."
" काय? आव शिरप्या कस काय पडला हिरित" तो किन्चाळला.
"आता कसा पडला, का पडला म्हायताय व्हय." कुणितरी खेकसले.
"आवं माजं ऐका जरा, आवं माजं ऐका जरा," तो सारखा घुसण्याचा प्रयत्न करत होता आणि
काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता पण कुणि त्याचं ऐकुन घेत नव्ह्तं. शेवटी तो जोरात किन्चाळला,
"आवं हे काय म्या हिथच हाय शिरप्या." त्याच कुणिच ऐकुन घेत नव्हतं तो गयावया करून
सांगत होता. शेवटी एकाने ते नीट ऐकले आणि दुसर्याच्या हातातला कन्दील ओढून घेऊन त्याचा चेहरा नीट
न्याहाळला.आणि घाबरून नुसताच उड्या मारत किंचाळायला लागला "शिरप्या, शिरप्या" .सगळ्यांनी
मागे वळून पाहिलं. "आता ह्याला काय झाल?"
"ए माकडावानी उड्या का माराय लागला.?"
" शिरप्या हिथच हाय. त्यो हिरित नाय"
"काय?"सगळेच मागे वळून बघायला लागले.कुणितरी कन्दील शिरप्याच्या तोंडाजवळ
धरला. तो गोंधळून उभा होता.
"आता ग बया. शिरप्या तर हिथच हाय. मग हिरित कोण पडल?" सगळ्या बायका जवळ
आल्या. शिरप्याची आई शिरप्याला कुरुवाळून रडु लागली.
"मग बाब्यानं कसं काय सांगितल असं?" खुट हाय तो बाब्या?" गावकरी संतापले. तशी
बाब्याची आई त्याला बखोट्याला धरून घेऊन आली."ह्यो बगा बाब्या. काय रं बाब्या कसला तमासा केलास.
समद्याचा जीव टांगणीला लावलास नव्हं."
"बाब्या तू कवा पायलं रं शिर्प्या पडलेला?"
" शिरप्या टमरल घ्युन वावरात चालला व्हता. म्या बि ट्मरल घ्युन गेलतो तेच्या मागं."
"टमरल घ्युन खुटं गेलतास?" एका पोरानं हसत हसत छेड काढली.
"टमरल घ्युन खुटं जात्यात?" बाब्या जाम चिडला. सगळे हसायला लागले.
" बरं फुडं काय झालं सांग".
" फुड काय, शिरप्या फुड गेला अन हिरित पडल्याचा अवाज आला. पान्यात बुडून तो मेला
असता. म्हुन घाइनं सांगाया आलो." बाब्यानं खाली मान घतली.
शिरप्यानं कपाळावर हात मारला. " आरं म्या वावरात चाललो अन कुत्रे आले अंगावर
भुकत. तेना पळवुन लावावं म्हुन घेतला एक दगड थोरला अन पाठीत हाणाया गेलो तर तो पडला हिरित. पन म्या म्हन्तो तुमी समदे हिकडं कामुन आल्याती, म्या तर तिकडं खालल्या वावरात गेलतो." सगळे एकमेकाकडे पहायला लागले.
"म्हाइत नाय बा. हे चला म्हण्ले आलो." सगळेच एकमेकाकडे हात दाखवायला लागले.
" चला चला, सगळा सावळा गोंधळ हाय अन काय. "
"व्हय बा. धा वाजुन गेल्याती. पोटात लागलेत कावळे वरडायला." सगळे परत त्याच दोन
चार कन्दीलाच्या उजेडात रस्त्यातले खाचखळगे काटे कुटे ओलांडत भराभरा निघाले.
परटाची रखमा मात्र शिरप्याच्या चिंतेनं आधी एक शब्द बोलली नव्हती.पण आता मात्र
तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. "त्या शिदुचा मुडदा बसवला. मेल्याला कितींदा सांगितलं कि त्या हिरिवर
एखादा पत्रा घाल. पन न्हाय. ऐकायचं नाव न्हाय. आज शिरप्या न्हाय पडला म्हुन काय जालं?उद्या
कुनिबि पडल." आणि असेच काही बाही बडबडत राहिली. सगळे गावकरी निघुन गेले होते. आता फक्त
रखमाची बडबड अन दूर कुठेतरी कुत्र्यांचे भुंकणे एवढाच आवाज गावातली शांतता चिरून जात होता.
=++++++++++++++++++++++++++++++++++++++=
त.टी: ह्यातला थोडा विनोदी भाग सोडला तर बाकी सगळा प्रसंग खरा आहे. गावात विजेचे दिवे नसताना
जेंव्हा असा भयानक प्रसंग ओढवतो तेंव्हा त्यांना फक्त परमेश्वरच वाली असतो. गावातली ही
समस्या मी माझ्या कुवतीप्रमाणे मांडायचा प्रयत्न केला आहे एवढेच.
झ्याक लिवलंय कि. आन खरखुर
झ्याक लिवलंय कि. आन खरखुर हाये म्हंतायसा मंजी लई बेस कि !
अनुमोदन दिनेश ना..
अनुमोदन दिनेश ना..
शाळेत अस्ताना "खेळ खंडोबा"
शाळेत अस्ताना "खेळ खंडोबा" नावाचा धडा होता, आठवला.मस्त लिहीलय.पु.ले.शु.!
शाळेत अस्ताना "खेळ खंडोबा"
शाळेत अस्ताना "खेळ खंडोबा" नावाचा धडा होता>>>>>>>>>>> दादाश्री खरच मस्त आठवण काढलीत. तो धडा म्हणजे हहगलो होता.
गोंधळ मजेदार. पुलेशु.
म्या बी दिनेस्दांना अनुमोदन
म्या बी दिनेस्दांना अनुमोदन देतु अन लेकीकेला पुलेसु म्हंतु.
अगदी द. मा. मिरासरादार
अगदी द. मा. मिरासरादार ईश्टाईल झालीय कथा.. मजा आली...
लिहीत रहा.
धम्माल अमितला अनुमोदन. अगदी
अमितला अनुमोदन. अगदी द.मा. पद्धतीचे लेखन
मस्त लिहीलय पुढे काय याची
मस्त लिहीलय
पुढे काय याची उत्सुकता रहाते, भाषेचा बाज देखिल राखलाय
छान जमलंय.
छान जमलंय.
मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल
मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.आणि ग्रामिण कथेला
ग्रामिण भाषेत प्रतिसाद दिल्याबद्दल, पुलेशु बद्दल विशेष आभार.
बर्यापैकी चांगल्या गावरान
बर्यापैकी चांगल्या गावरान भाषेत लिहिलंय....खरी घटना आहे ते वाचून थोडं वाईट वाटलं खरं...आजही गावात वीज नाही, चांगले रस्ते नाहीत हे सत्य आहे
छान आहे! आवडेश!
छान आहे!
आवडेश!
शिल्पा, प्रज्ञा
शिल्पा, प्रज्ञा प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार.
भाषेचा बाज आणि औत्सुक्य
भाषेचा बाज आणि औत्सुक्य चांगल्या प्रकारे टिकवून धरलंय.
आवडली कथा.
कथा आवडली.
कथा आवडली.
मस्त कथा आवडली
मस्त कथा आवडली
कथा छान.
कथा छान.
उल्हासदा,जुई,स्वति,चिन्गी
उल्हासदा,जुई,स्वति,चिन्गी सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मस्त लिहिले आहेस रे...
मस्त लिहिले आहेस रे... आवडले...
चन्दन मी सुरेखा कुलकर्णी आहे.
चन्दन मी सुरेखा कुलकर्णी आहे. सुरेश कुलकर्णी नाही. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मस्त लिहिलयं.
मस्त लिहिलयं.
आवडलं
आवडलं
रेशिम, स्वप्ना-राज धन्यवाद.
रेशिम, स्वप्ना-राज धन्यवाद.
छान....
छान....:)
मस्तच! मजा आली!
मस्तच! मजा आली!
(No subject)
असाच प्रसंग माझ्या गावात घडला
असाच प्रसंग माझ्या गावात घडला आहे.चार लहान मुले हातगाडिवर बसली होती.एक मुलगा उतारावर ती ढकलत होता.उतार संपल्यावर अशीच विहीर होती.वापर नसल्यामुळे वर झाडे,झुडपे होती,त्यामुळे एकदम दिसत नव्ह्ती.ती हातगाडी घरंगळत सरळ विहिरीत पडली.वर बसलेली चारही मुले आत पडली.ढकलणार्या मुलाने आरडाओरडा करुन लो़क जमेपर्यंत त्या चारही मुलांचा मृत्यू झाला होता.
छान आवडली :स्मित:
छान आवडली
