द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ५

Submitted by बेफ़िकीर on 11 February, 2011 - 07:38

'जपानला पुन्हा भुकंपाचा धक्का'

'मुंबई हैदराबाद बसला भीषण अपघात, १६ ठार'

'आज गानकोकिळा पुण्यात'

'सोने कडाडले'

'काय सांगता'

'बुडणार्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात युवक स्वतःच ठार'

'बदल्यांचे अधिकार पुन्हा कृषी आयुक्तांना'

'राजधानी परतीच्या प्रवासात रतलामला थांबणार'

'सुलभ कररचनेचे सुतोवाच'

'गावनिहाय पॅकेज हवे'

'तापमान - हलक्या सरी येण्याची शक्यता'

'पीएला केले कार्यमुक्त'

'द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या पाचशे जागा वाढणार'

'उपसंचालकांना घेराव'

'पंपचालकाची पाठराखण'

'आयटीआय आंदोलन प्रकरणी पाच जण ताब्यात'

'कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या शाळांचा घसरला दर्जा'

'नियम मोडणार्‍याला दंड करण्याचे अधिकार हवालदारांनाही'

'आठ वर्षात निम्याने घटले विद्यार्थी'

'पेरण्या रखडल्याने शेतकर्‍यांना चिंता'

'नोकरीबरोबर तब्येतही सांभाळा'

'प्रत्येक शहरात घनकचरा व्यवस्थापन केंद्र'

'वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून शेखर करणार टेढी बात'

'रवींद्र महाजनी वयात आले'

'मंगळावर चमकली वीज'

'पुणे तेथे पाणी उणे - आता चाळीस टक्के कपात'

'पुणे न्यायालयात आज मोर्चा'

'पाऊस लांबल्याने तोंडचे पळाले पाणी'

'यापेक्षा जपानी बरे'

'सुटकेचा प्रयत्न करत आहोत. डंपर्स बाहेर पडताना चेक केले जातात का ते बघ. ज्या दिवशी तुला नवलेच्या फोनवरून असे सांगीन की खीर आवडते - खीर घेऊन ये, त्याच्या दुसर्‍या दिवशी वाघोलीला डंपर्स खाली करतात तेथे एक फियाट ड्रायव्हरसकट ठेव. तू तेथे येऊ नकोस. फियाटमध्ये चार शर्ट पँट आणि पाच हजार रुपये ठेव. सुरे ठेव. हे करणे शक्य होणार नसेल तर खीर आणता येणार नाही असे फोनवरच म्हण. किंवा खीर काही दिवसांनी आणेन असे म्हण! आणि खीर कधी आणू शकशील ते तूच जेलमध्ये येऊन सांग. '

एवढा मोठा संदेश काही हेडिंगमधल्या अक्षरांमधून निर्माण होऊ शकत नव्हता. आकाश चिडलेला होता. तो म्हणाला इतके समजत नाही का की फक्त हेडिंगची अक्षरे आणायची नाहीत तर बारीक बारीक अक्षरेही आणायची?

त्यावर वाघने विचारले होते की बाबूला जर पेनच मिळणार असेल तर मुळात पेपरमधून अक्षरे आणायचीच कशाला?

मात्र बाबू स्वतःच म्हणाला होता की पेन फक्त अर्ध्या तासासाठी वगैरे मिळेल. कायमचे मिळणार नाही. त्यातच फटाफटा अक्षरांवर नंबर लिहायला लागतील.

मग वाघने विचारले की मग मेसेजच अर्ध्या तासात लिहीला तर काय बिघडले?

बाबू म्हणाला की मेसेज कुणी पाहिला तर सरळ कळू शकेल. नुसती अक्षरे आणि अगदी बारीक नंबर्स पाहिले तर काही समजायचे नाही.

आणि आजचा दिवस वाया गेल्याचे पाहून सगळेच उदास झाले. उद्या मात्र दुपारी जमतील ती बारीक बारीक अक्षरे फाडून आणायची हे पुन्हा ठरले.

याचे कारण वरील बातम्यांमधून जो मेसेज बनवता येऊ शकत होता तो काहीसा असा झाला असता.

'पाच जण - मुक्त - प्रयत्नात - सांभाळा - वेगवेगळ्या - परतीच्या प्रवासात - बस - हवे - थांबणार - प्रत्येक - हवालदारांना - चिंता'

अशा संदेशातून डिटेल्स काहीच समजली नसती. पाच जण कधी मुक्त होणार, कसे मुक्त होणार, काहीच नाही!

मात्र!

दुसर्‍याच दिवशी रात्री झोपाझोप होण्याची वेळ झाल तेव्हा या बरॅकमधील चारही कैदी एकमेकांना अत्यानंदाने मिठ्या मारत होते. कारण आज मिळालेल्या शेकडो बारीक बारीक अक्षरांमधून आकाशने सिस्टिमॅटिकली एक व्यवस्थित मेसेज तयार केला होता. फक्त आत्ता पेन नसल्यामुळे त्यावर क्रमांक लिहीता येत नव्हते. आणि 'चारही कैद्यांनी' म्हणण्याचे कारण हे... की नसीम कुणालाही मिठी मारत नव्हता. कारण...

.... ही योजना अंमलात येण्याचा अर्थ म्हणजे त्याचे मरण प्रिपोन होणे!

आणि ते लक्षात आल्यानंतर चौघांनी नसीमला मिठ्या मारल्या. लगेच मेलो काय अन दोन महिन्यांनी फाशी झाली काय! मरायचेच आहे ही जाणीव अधिक तीव्र झाल्यामुळे कित्येक महिन्यांनी आज नसीम घळाघळा रडला. त्याचे रडणे पाहवत कुणालाच नव्हते, पण आकाश तर स्वतःच रडू लागला. त्याला ती मनोवस्थाच समजू शकत नव्हती की नसीमला आत्ता काय वाटत असेल!

आणि त्याचवेळेस... आणखीनच दहशत बसवणारी घटना घडली...

पठाण...

अवाढव्य पठाण अचानक बरॅकपाशी आला..

"अय बाबू... चल्ल... चल्ल बाहर..."

"... क्युं साहब??"

प्रश्न विचारल्याची शिक्षा मिळालीच! खण्णकन लाथ बसली मांडीवर! बाबूसारखा बाबू, पण तोही आडवा झाला. त्याच्या तोंडातून एक घुसमटता उद्गार तेवढा निघाला. मात्र लाथ मारूनही पठाण अत्यंत शांतच होता.

"चल्ल चल्ल... सवाल नही करनेका.. चल्ल जरा घुमके आते है..."

एन्काउंटर!

सरळ होते. वाघ, मुल्ला, नसीम आणि बाबू या चौघांनाही समजले ते!

धिस वॉज टाईंम टू गेट किल्ड!

द डेथ वॉज निअर... व्हेरी... व्हेरी निअर...

एन्काउंटर!

मागेही दोघांचे एन्काउंटर करताना त्यांना न्यायला आलेल्या हवालदाराने हेच वाक्य उच्चारलेले होते. 'चल जरा घुमके आते है'!

कैद्याला चक्क व्हॅनमधून सहाजणांनी बाहेर न्यायचे. त्या सहापैकी चौघांनी दोघा हवालदारांनाच जखमी करायचे. एखादी जुनी मोटारसायकल तिथे आणून तिला व्हॅनचा धक्का द्यायचा. हे होईपर्यंत कैद्याला समजलेले असायचे की हे काय नाटक आहे. आणि मग शांतपणे कैद्यावर गोळी झाडायची.

'पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या अत्यंत धोकादायक कैद्याचा पाठलाग करताना पोलिसांशी झालेल्या चकमकीत कैद्याचा मुत्यू! दोन पोलिसही गंभीर जखमी'

पोलिस खरच गंभीर जखमी आहेत का हे पाहायला एकही नागरिक जात नाही. वार्ताहर जरूर जातात, पण त्यांनाही माहीत असते. 'असे' केल्याशिवाय ही घाण कधी संपणारच नाही.

एक पॅरलल योजना कार्यान्वित व्हावी लागते हे काही प्रमाणात आपल्या घटनेचं आणि शासनप्रणाली व न्यायव्यवस्था यांचं अपयश आहे खरं! पण प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे असतातच!

पॅरलल योजना म्हणजे, बाबूसारख्या कैद्याला सहा वर्षांची शिक्षा होणे हे आपल्या न्यायालयाने ठरवलेले! आणि पॅरलली शासकीय अधिकार्‍यांनी वरून परवानगी मिळवून त्याला खलास करणे ही पॅरलल योजना! ते असे का करतात त्याचे महत्वाचे कारण आहे. कित्येकदा पैशांच्या जोरावर शिक्षा न मिळणे, अतिशय कमी मिळणे, मिळाली तरी लगेच सुटका करून घेणे हे प्रकार काही गुन्हेगार करतात. आणि हे गुन्हेगार प्रत्यक्षात अस्सल गुन्हेगार असतात. त्यांची प्रवृत्तीच ती असते. आता बाबूनेच सात मर्डर केलेले होते. असे वागणार्‍याला खरे तर फाशी व्हायलाच हवी. पण त्याला झाली नाही. त्याला फक्त सहा वर्षांचीच सक्तमजूरी झाली. एन्काउन्टरची परवानगी मागीतली जाते ती यासाठी, की सरळ सरळ हा गुन्हेगार अत्यंत घोर अपराधी असतानाही केवळ पुराव्यांच्या तोकडेपणामुळे पुन्हा मोकाट सुटू शकेल हे बरोबर नाही. ही बाब महिनोनमहिने वरिष्ठांना आणि गृहखात्याला समजावून सांगीतली जाते. असे परदेशी अतिरेक्यांच्या किंवा गुन्हेगारांच्या बाबतीत घडत नाही याचे कारण असे की तेथे परारष्ट्र खात्याला भारत देश या नात्याने जगाला उत्तर द्यावे लागते. पण अंतर्गत गुन्हेगार, जे याच देशाचे नागरिक असून त्यांचे न्यायदान येथील न्यायालयाच्या परिघात येते व गृहखाते व पोलिस खाते हे दोघी फिर्यादी पक्ष म्हणून उभे राहू शकतात त्यांचे एन्काउन्टर करणे अधिक सोपे असते.

एन्काउन्टर असे उगाचच कुणाचेही होत नसते. त्यासाठी गुन्हेगार हा मुळातच त्या प्रवृत्तीचा आहे हे सर्व पातळ्यांवर मान्य व्हावे लागते. त्याने केलेले गुन्हेही तसे असावे लागतात. ते करताना कोणत्याही प्रकारे 'चुकून गुन्हा घडला' किंवा 'रागाच्या भरात घडला' अशी शक्यता नसावीच लागते. म्हणजे 'गुन्हा करणे' हाच हेतू असावा लागतो. अशा एन्काउन्टर्सच्या प्रस्तावांवर दीर्घकाळ निर्णय होतही नाही. कधी लगेचच होतो. निर्णय झाला तरीही एन्काउन्टर लागलीच उरकता येईलच असेही नसते. जेलमध्ये अनेक घटना घडत असतात. अनेक नेतेमंडळी येत असतात. अर्थात, माणूस जेलच्या बाहेर असला तर एन्काउन्टर उरकता येते लगेचच!

काही वेळा वरिष्ठ पातळीला 'एन्काउन्टर केल्यानंतरच' समर्थन दिले जाते. आधी सांगीतलेच जात नाही. हे होणे मोठे मुश्कीलच! पण असेही काही वेळा होऊ शकते. जेव्हा खात्यातील जबाबदार अधिकार्‍यांनी त्या गुन्हेगाराचे गुन्हे किंवा इतिहास जवळून पाहिलेला असतो ते असा निर्णय अचानकही घेऊ शकतात. पण नंतर त्यांना हजारो प्रश्नांना समाधानकारक उत्तरेही द्यायला लागतात.

प्रश्न असा निर्माण होतो की न्यायसंस्थेने दिलेला आदेश झुगारून ही समांतर योजना अंमलात आणावी लागते याचा अर्थच न्यायसंस्था बरीचशी आंधळी आहे असा नाही काय?

आणि उत्तर असते..... होय... न्यायसंस्था वरकरणी तरी आंधळीच असते.. आतून तिला माहीत असते की हा गुन्हेगार किती पोचलेला आहे... पण एक तर पैशांनी तरी तोंडे बंद होतात... किंवा पुराव्याअभावी तरी..

आणि बाबूच्या बाबतीत एन्काउन्टरचा निर्णय होण्याची शक्यता येरवडा कारागृहात सर्वाधिक होती. कारण सात सात मर्डर्स करूनही केवळ सहा सात वर्षांसाठी तो इथे आलेला आहे म्हणजे त्याला उडवणारच हे सगळ्यांना ज्ञात होते.

आणि आत्ता पठाण म्हणत होता...

"चल्ल.... जरा घुमके आते है..."

मृत्यू! बाबूच्या डोळ्यामध्ये मृत्यू साकळलेला होता स्पष्टपणे!

एक मात्र खरे! की तो धाय मोकलून रडत नव्हता. त्याच्या विझलेल्या डोळ्यात एकच भावना होती. ती म्हणजे, निर्मल जैनचा सूड न घेता आणि मिनीला एकदाही न भेटता आपल्याला या जगाचा आणि तोही अशा पद्धतीने निरोप घ्यावा लागणार!

हे सगळे केवळ दोन सेकंदात झाले. दोन सेकंदच तो पठाणकडे बघत असावा.

अचानक मुल्लाने पठाणचे पाय धरले आणि विनवू लागला...

"साहब.. इसको मत मारो..."

मुल्लाने असे करण्याची दोन कारणे होती. एक तर सरळ सरळ आता आपल्यातील एकाचा मृत्यू होणार हे समजल्यामुळे वाटलेली भीती! आणि दुसरे म्हणजे, त्याने स्वतः मर्डर केलेला नसला तरीही त्याची प्रवृत्ती गुन्हेगारी आहे हे माहीत असल्यामुळे पुढे मागे त्याचेही एन्काउन्टर होईल ही त्याला वाटत असलेली दुसरी भीती!

वाघ तटस्थपणे आणि प्रचंड घाबरून खिळलेला होता. नसीम मात्र अभद्र ओरडू लागला तशी पठाणने त्यालाही एक लाथ घातली. नुकताच त्याला चेंबरमध्ये भरपूर तुडवलेला होता पठाणने! नसीमने आवाजच बंद केला. मात्र आकाशला अजूनही वाटत होते की काहीतरी कारणाने बाबूला चेंबरमध्ये नेत असावेत.

आकाश - साहब... इसको क्युं चेंबरमे ले जा रहे हो?? इसने कुछ नही किया??

जेलमध्ये आल्याच्या तिसर्‍या चवथ्याच दिवशी या पोराने आपल्याला सवाल करावा हे पठाणला कसे रुचेल.

आकाशला किंकाळी फोडणेही शक्य होणार नाही इथपर्यंत मारला पठाणने! तेही केवळ एक दिड मिनिटातच!

आकाश लोळागोळा होऊन खाली पडला तसा त्याच्यावर थुंकत आणि शिवीगाळ करत पठाण म्हणाला..

"ए *****... सूरत क्या देखता है... चल्ल..."

बाबूचे बखोट धरून त्याला फरफटवत पठाण बरॅकच्या बाहेर नेऊ लागला तसा मात्र वाघ मधे पडला. वाघलाही लाथेने तुडवत पठाणने बरॅक बाहेरून बंद केली. आणि त्याच क्षणी नसीम, मुल्ला आणि वाघ अभद्र रडू लागले. आता मात्र बाबूचा धीर संपला. बाबूने अक्षरशः हंबरडा फोडला. इतर बरॅक्समधून आता किंकाळ्या यायला लागल्या. शिव्यांची बरसात व्हायला लागली. दोन इतर हवालदारांच्या मदतीने बाबूला नेताना पठाणच्या मनावर त्या इतर बरॅक्समधल्या अभद्र किंकाळ्या आणि शिव्या यांचा काहीही परिणाम होत नव्हता.

इकडे आकाशला त्या मार खाल्लेल्या अवस्थेतच समजले की बाबूला ठार करण्यासाठी नेत आहेत. मग मात्र तो भीतीने ओकलाच! सामान्य माणसांना असले प्रसंग सहनच होऊ शकत नाहीत. आपल्यासमोर धडधाकट असलेल्या एका माणसाला सरळ उचलून नेतात आणि तेही सगळ्यांना माहीत असते की याला मारणार आहेत. हे कसे काय सहन होणार?

मुल्ला छाती पिटून कर्कश्श ओरडू लागला. "मुझे लेजाओ, मुझे मारो' असे म्हणत! कारण त्याला उगाचच वाटू लागले होते की आपलेही असेच एन्काउन्टर करणार!

संजयबाबू! काही मिनिटांमध्येच संजयबाबू इतिहासजमा होणार होता.

=======================================

सेन्टरमध्ये लाथ बसल्यावर मात्र बाबू वेदनेने काळानिळा पडला. आत्तापर्यंत अर्धा तास तो पठाणचा मार सहन करत होता. पण ही लाथ जीवघेणी होती. प्राण डोळ्यात आले. मरून जाणे चांगले असे वाटू लागले. आणि दोन्ही हात पोटाखाली दाबावेत म्हंटले तर तेही शक्य नव्हते. त्याचे दोन्ही हात वर बांधलेले होते. नुसतेच तडफडण्याशिवाय काही करताच येत नव्हते.

आधी त्या वेदनेची पातळी समजण्यातच मेंदूचा भुगा व्हायची वेळ आली. आवाज फुटेना! आणि दुसर्‍याच क्षणी घशातून एक आर्त किंकाळी बाहेर पडली.

आता उत्तर द्यावेच लागणार होते. नाहीतर आणखीन एक अशी लाथ बसली तर एन्काउन्टर करा असे आपणच सांगू असे बाबूला वाटू लागले.

जवळपास पाच मिनिटे तडफड तडफड झाल्यानंतर बाबू डोळे उघडू शकला. मगाशी हनुवटीवर बसलेल्या मुठीमुळे तोंडात रक्त जमा झालेले होते. ते पहिल्यांदा त्याने थुंकले. डोळ्यांमधून पाणी वाहात होते. रडत होता बाबू! आणि माफी मागून सोडण्याची विनंती करत होता. .....

... फक्त एक गोष्ट मात्र तो करत नव्हता..

ते म्हणजे... नवले, पठाण आणि इतर दोन हवालदार विचारत असलेल्या प्रश्नाचे उत्तर!

आणि प्रश्न होता...

"आज पेपरमधून अक्षरे फाडलीस ती कुठे ठेवलीस... आणि काय करणार आहेस त्या अक्षरांचे????"

बाबूचे उत्तर एकच!

"मी अक्षरे फाडली नाहीत आणि मला काहीही माहीत नाही तुम्ही काय विचारताय"

मात्र वेदना कशाबशा सोसतानाच तो विद्युत वेगाने विचारही करत होता. हे कुणी सांगीतले असेल?? आकाश?? आपल्याविरुद्ध तक्रार करता यावी म्हणून? पण तो मुलगा तर तसा वाटत नाही. मग... नसीम?? तो एकटाच मरणार आणि आपण सुटू शकणार याचा हेवा वाटून?? शक्य आहे.. माणूस असे करेलही! की मुल्ला??? छे! मुल्ला तर स्वतःच सुटायचा कधीपासून प्रयत्न करतोय. वाघ?? वाघ कायम असल्या योजनांमध्ये खोडा घालायचा. पण तो हे पठाणला सांगेल? शक्यता कमी वाटतीय!

नसीम! नसीमच असणार!

आणि बाबू हादरलेला होता ते दुसर्‍याच गोष्टीमुळे! आत्ता जर एखादा हवालदार बरॅकमध्ये तपासला गेला तर ती अक्षरे मिळणार होती. त्यांच्यावर नंबर्स नसले तरीही आकाशला थोडासा धुतला तरी त्याने सगळे सांगून टाकले असते. ती अक्षरे आपल्या बरॅकमध्ये असतील असे यांना का वाटत नसेल? इतके कसे काय हे बावळट असतील? असं नसणारच! कुणीतरी गेलं असेल तपास करायला आपल्याला इकडे आणल्यावर!

जर यांना हे समजते की आपण अक्षरे फाडली, तर त्या अक्षरांचं काय केलं हे कसं समजत नाही? आणि फक्त आपल्यालाच धरले हे कसे काय झाले? अक्षरे तर सगळ्यांनीच फाडली होती.

की???.... कुणीतरी फक्त आपल्यालाच अक्षरे फाडताना पाहिले?? इतरांना पाहिलेच नाही?? आणि आज की काल? काल जी अक्षरे फाडली ती निरुपयोगी म्हणून आज फेकून दिली. आजची अक्षरे अजून बरॅकमध्ये आहेत. कुणी पाहिले असेल? कोण आपल्या आजूबाजूला होते? तसे तर सगळेच होते. मग हे कुणी पाहिले असेल??? कुणी???

तेवढात आणखीन एक फटका बसला. सगळेच फटके असह्यच होते. पण मगाचचीजी लाथ होती त्या तुलनेत हा फटका कमीच होता. आणि ज्या अर्थी या फटक्यावर पठाणची वेळ आली होती त्या अर्थी बाबूला समजले, पठाण आता मारून मारून वैतागलेला आहे... बहुधा आपली सुटकेची किंवा विश्रान्तीची वेळ जवळ आलेली आहे.

आणि त्यातच एक अमूल्य माहितीही मिळाली. नवलेला पठाणने विचारले.

"साब इसको खल्लास क्युं नही करते है अपन, मेरे समझमे नही आता.."

"हरामीके एन्काउन्टरकी पर्मिशनही नही मिलरही है ..."

बाबूच्या जीवात जीव आला. आज आपण मरणार तरी नक्की नाही. आणि इथून सुटू शकलो तर या सगळ्यांकडे पाहून घेऊ!

मात्र एका हवालदाराने आता बाबूला फ्रेशली मारायला सुरुवात केली.

बर्‍याच वेळाने कळवळत बाबू उद्गारला.

"भाग जाना चाहता था मै.. इसलिये चिठ्ठी बनारहा था.."

जे अपेक्षित होते तेच ऐकायला मिळाले. ते ऐकल्यावर रागाने आणखीन काही फटके मारले हवालदाराने बाबूला! त्यानंतर मात्र नवले पुढे झाला. आता निदान मार खाणे टळणार हे बाबूला समजले. कारण आता फक्त प्रश्नोत्तरे!

नवले - कैसे भागनेवाला था बे ***??

येथे मात्र बाबूचे डोके भन्नाट चालले.

बाबू - आपका रिव्हॉल्व्हर आपको दिखाके..

उडालाच नवले! हा हे कसे करणार होता ते त्याला समजले नाही.

नवले - कैसे क्या??

बाबू - मिनीको चिठ्ठी देनेवाला था मै... आपको खुष करके फिर उसने बोलनेका.. बाबूसे मिलना है.. फिर आप उसदिन की तरह मुझे क्वार्टरपे बुलायेंगे... फिर मैने आपपे हमला करनेका.. आपका रिव्हॉल्व्हर लेकर आपकोही होल्ड अप करके भाग जानेका..

कित्तीतरी जोरात हासला नवले! खूप जोरात आणि खूप वेळ हासला. आणि नंतर...

... नंतर त्याने केन हातात घेतली आणि बाबूला फोडून काढायला सुरुवात केली.

बाबूच्या किंकाळ्या इतक्या वाढल्या की आता पार लांबवर असलेल्या बरॅकींपर्यंत आवाज पोचतो की काय असे वाटू लागले. दोन हवालदारांनी नवलेला थांबवले.

लालभडक डोळ्यांनी बाबूला खाऊ की गिळू अशा नजरेने पाहात नवले बाजूला झाला आणि पाणी पिऊ लागला. बाबू असह्यपणे तडफडत होता. त्याला आता हवालदारांनी सोडवले. त्याबरोबर तो लोळागोळा होऊन खाली पडला. एका हवालदाराने चक्क पाणीही दिले. बाबूने गटागटा पाणी प्यायले.

तोवर नवलेने त्याचे केस धरून त्याला उभा केला. बाबू कसाबसा उभा राहिला. नवलेने स्वतःचा मोबाईल फोन बाबूच्या तोंडापाशी धरला आणि म्हणाला...

"मिनीका नंबर लगाया है... अब्बी उसको बुला इधर... अब्बी... मेरेको मंगती है अब्बी मिनी.. चल्ल बोल.."

तोपर्यंत स्पीकरवर लावलेल्या त्या फोनमधून मिनीचा दचकलेला आवाज आला. तिला नवलेचा नंबर तिच्या फोनवर दिसलेला होता.

"हॅलो... साहब..."

"मिनी...."

बाबूचा तो क्षीण आवाज ऐकून मिनी आणखीनच दचकली. तेवढ्यात बाबूने सांगीतले..

"जेलमे आ... साहब बुलारहे..."

मिनी क्षणभर स्तब्धच होती हे पाहून नवले बाबूला म्हणाला..

"उसको बोल के तू उसे खुद मेरे गोदपे बिठायेगा आज रात.. तू खुद..."

"मिनी... जेलमे आ... "

"हा... आती..."

रात्रीच्या अकरा वाजता जेलमध्ये जायचा हा मिनीचा पहिला प्रसंग नव्हता. पण बाबूचा आवाज ऐकून मात्र ती शहारलेली होती.

नवलेने आता बाबूची थट्टा आरंभली.

"तेरी बहन कैसी है रे दिखनेमे?? आ?? और मा?? मै सबको एकेक बार बुलानेवाला है इधर.. मै मतलब?? तू खुदच बुलायेगा और मेरे पास सुलायेगा.. स्साला ******.. मुझे होल्ड अप कर रहा है... नही मै तेरा एन्काउन्टरच करनेवाला है.. लेकिन क्या है ना?? शोहरके सामने उसके बिवीको **नेमे बडा मजा आता है... वो करके एक दिन तेरेको उडायेगा मै..."

वेदनांनी तडफडणारा बाबू पाऊण तास आपल्याच शरीराचे दुखरे भाग दाबून धरत होता. दिसायला रक्ताचा थेंब फक्त तोंडातच! पण संपूर्ण शरीर वेदनामय झालेले होते. त्या वेदना दिसू शकत नव्हत्या.

पाऊण तासांनी मिनी आली तसे पठाण आणि दोन्ही हवालदार बाबूला घेऊन जायला लागले. नवले ओरडला..

"ए *****... इधरा आ?????... बिठा इसको मेरी गोदी मे... बिठा..."

शहारलेली मिनी तो किळसवाणा प्रकार घडतो की काय या भीतीने अर्धमेली होत असतानाच मान खाली घालून बाबू तिथे आला. मिनीच्या डोळ्यांमध्ये न बघताच त्याने तिला नवलेकडे ढकलले आणि शरमेने काळा ठिक्कर पडलेला बाबू नवलेचे सात मजली विकट हास्य ऐकत बाहेर पडला. नवले तिथून मिनीला क्वार्टरमध्ये घेऊन जाणार होता.

आपल्या बरॅकमध्ये बाबू परत आलेला पाहून त्या बरॅकवरची अभद्र छाया नष्टच झाली. अचानक उत्साह निर्माण झाला. मुल्लाने तर मिठीच मारली बाबूला! त्या तिघांचा आणखीन एक प्रॉब्लेमही होता. बाबूला मारले तर आपण सुटणार कसे!

पण आता ती शक्यता पुन्हा निर्माण झाली. कारण बाबू जिवंत परत आला होता.

आणि बाबूने झालेला प्रकार सगळ्यांना सांगीतला तसे मात्र सगळ्यांनाच वाईटही खूप वाटले आणि बाबूबाबत आदरही निर्माण झाला. वाईट याचे की सगळ्यांनिच अक्षरे फाडलेली असून एकट्या बाबूनेच फाडल्याचे कळले अन त्याला मार पडला. आदर यासाठी की इतका मार खाऊनही बाबुने योजना तिसरीच सांगीतली त्यामुळे मुळ योजना अजूनही पार पडू शकते!

स्वतःच्या हाताने स्वतःच्या बायकोला दुसर्‍याकडे सोपवण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार केलेल्या बाबूला आता शरमेने मानही वर उचलावीशी वाटत नव्हती. अर्थात, त्याला माहीत होते की माजुर्ड्या नवलेने हे त्याला कधीतरी करायला लावलेच असते. ती मानसिक तयारी त्याने केलेली होतीच आधीपासून! पण प्रत्यक्षात तो प्रसंग वाटला होता त्याहूनही अश्लाघ्य होता.

वेदनांच्या गुंग्त कधी डोळे मिटले ते बाबूलाही समजले नाही. बाकीचेही बाबूवरचा एन्काउन्टरचा टळलेला प्रसंग आठवून समाधानी होत झोपून गेले.

=======================================

दुसर्‍या दिवशी बाबूला सक्तमजूरीचे काम करवेनाच! कुणी हवालदार बाबूवर जबरदस्तीही करत नव्हता. त्यांच्यापैकी काही जणांना तर बाबूची कीवही येत होती! नवलेचा रागही येत होता. पण नवलेविरुद्ध बोलणेच शक्य नव्हते.

मात्र अचानक नवले तिथे आला. चारचौघांसमोरच त्याने बाबूला 'काल रात्री मिनीबरोबर कशी मजा केली' ते ऐकवले. आता मात्र बाबूच्या डोक्यात विचार येऊ लागला की नवलेच्या डोक्यात कुदळ घालावी. पण उठवतही नव्हते.

निर्लज्ज नवले निघून गेला. आणि त्याच वेळेस दोन हवालदारांनी पुटपुटत नवलेला शिव्या दिल्या हे बाबूने ऐकले.

अचानक त्यांच्याकडे वळत बाबूने विचारले..

"साहब... मेरी कंप्लेन किसने की कल???? नसीमने??"

अतर्क्य उत्तर ऐकायला मिळाले त्याला!

"... अं??? ... अंहं... इसाप...!"

बाबूचे रक्त कधी नव्हे इतके उसळू लागले होते.

बाबूने इसापवर केलेल्या अत्याचारांचा इसापने असा सूड घेतलेला होता. तब्येत बरी झाल्यावर इसापला धडा शिकवायचाच हे बाबूने ठरवले.

सुटका झालीच तर होण्याआधी इसापला खलास करूनच जायचे हे बाबूने ठरवले.

तेवढ्यातच ते दृष्य दिसले बाबूला!

वाघ! वाघ डंपरमध्ये माती भरल्यानंतर उगाचच डंपरमध्ये चढला होता. लक्ष कुणाचेच नव्हते. त्यामुळे त्याने पटकन मातीत झोपून पाहिले. तोवर डंपरच्या ड्रायव्हरला बहुधा समजले असावे. तो खिडकी उघडून खाली उतरू लागेपर्यंत वाघ मातीत मिसळला होता. बाबूच्या मनावर आणि दुखर्‍या शरीरावर लक्ष लक्ष शहारे आले. ही क्लृप्ती कुणाला समजली तर आत्ताच घोळ होईल हे समजल्यामुळे बाबू वाघवर भयानक खवळला. अचानक त्याला जाणवले. कुठ्नतरी लांबून आकाश आणि मुल्लाचेही लक्ष तिकडेच होते. म्हणजे... ठरवलेले होते की काय सगळ्यांनी????

आणि नसीम डंपरच्या मागे माती उपसून डंपरमध्ये टाकत होता.

ड्रायव्हर तिथे आला. त्याने माती पाहिली.

"ए .. वो आदमी किधर है??"

"... कौन???"

"अभी उपर चढा था वो??"

"ये क्या इधर गया..."

त्या मोकळ्या जागेवर, जिकडे नसीमने हात दाखवला होता, तेथे पन्नास एक फुटांवर तीन कैदी बसलेले होते. त्यांच्यातीलच तो कुणी असावा हे ड्रायव्हरला अजिबात पटले नाही. ड्रायव्हर संशयाने सरळ डंपरवर चढू लागला.

घोळ! हा प्रयोग करण्यातून आता निश्चीतच मोठा घोळ होणार होता. तिकडे मुल्ला आणि आकाश भीतीने गळाठून गेलेले तर या बाजूला बाबू शहारून वेडा झालेला! नसीमला काहीच समजत नव्हते काय करावे?

आणि समजले... नसीमला अचानक समजले...

त्याने सरळ कुदळीचा एक खूपच सौम्य वार डंपरवर चढणार्‍या ड्रायव्हरच्या डाव्या खांद्यावर मागून केला. किंचाळत ड्रायव्हर खाली पडतानाच नसीमने बेंबीच्या देठापासून बोंब मारली...

"अरे भागो... भागो... ड्रायव्हर मर गया... ड्रायव्हर मर गया..."

तिकडे मातीत बुडलेल्या वाघला आपण काय करावे हे समजेना! पराकोटीच्या उत्सुकतेने त्याने मुंडके बाहेर काढले तेव्हा चार सहा जण डंपरपाशी जमा झालेले आहेत आणि ड्रायव्हरला काहीतरी झालेले आहे इतकेच त्याला समजले. तेवढ्यात हवालदारही आले तीन! वाघकडे कुणाचेच लक्ष जात नव्हते.

आवाजामुळे मोठी धावाधाव होणार हे लक्षात येताच वाघ हादरला. असेच पडून राहावे की काय हे त्याला समजेना! ड्रायव्हर मात्र वेगळेच ओरडायला लागला.

"इसने मुझे जानबूझके मारा है... अंदर मिट्टीमे आदमी है...उसको पकडो..."

बोंबललंच!

हवालदार डंपरपाशी धावले. दुसर्‍या एका डंपरचा ड्रायव्हर तिथे धावला. त्याने डंपर स्टार्ट करून आणि हायड्रॉलिक लीव्हर दाबून डंपरचा मुख्य भाग तिरका करायला सुरुवात केली. घरंगळत माती पडायला लागली तसे हवालदार थोडे बाजूला सरकले.

भीतीने थरथर कापत नसीम त्या पडणार्‍या मातीकडे बघत होता. सगळेच डोळे रोखून पाहात होते.

आणि.... केवळ पंधरा एक सेकंदातच...

संपूर्ण डंपर रिकामा झाला...

वाघ???? वाघ नव्हताच...

नसीम अक्षरशः हतबुद्ध होऊन रिकामा डंपर पाहात होता. आत्ता आपला चेहरा 'इथे कुणी असणार नव्हतेच' असा असायला हवा हेही त्याला सुचले नाही. अविश्वासाने त्याने लांब बसलेल्या बाबूकडे पाहिले. तर बाबू तिसरीकडेच पाहून मंद हासत होता. तो कुठे पाहून हासतोय हे बघण्यासाठी नसीमने मान वळवली तर....

.... आणखीनच लांबवर...

मुल्ला आणि आकाशबरोबर वाघ उभा होता...

नसीमला 'जीवात जीव येणे' या वाक्प्रचाराचा अर्थ प्रत्यक्षात समजला त्याक्षणी!

आणि इकडे हवालदार नसीमला धरून खेचून नेत असतानाच कुणीतरी कैदी म्हणत होता..

"साब ये ड्रायव्हरको क्युं मारेगा?? और ऐसे मिट्टीमे कोई जिंदा रहसकता है क्या??"

मात्र जाताना नसीमला ते दिसले.

डंपरला जसे मागच्या बाजूला अनलोडिंगसाठी कव्हर होते तसे दोन्ही साईड्सनाही होते बहुधा! कारण या बाजूचे कव्हर सताड उघडे आणि खाली पडलेले होते... उघड होते... वाघ इथून निसटलेला होता..

प्रश्न फक्त एकच होता. तो म्हणजे यापुढे डोळ्यात तेल घालून डंपरकडे बघितले जाणार होते. ते कसे टाळायचे?

वाघने उगाचच प्रयोग करायला नको होता.

एक हवालदार तर बाकीचे डंपर्सही खाली करायला सांगत होता.

मात्र त्याच वेळेस.....

.... गेले तीन चार दिवसांपासून जी गोष्ट आकाश नोटीस करत होता ती त्याने आज नीट, अगदी नीट निरखली...

लोहगाव एअरपोर्टवरून एक फ्लाईट टेक ऑफ घ्यायची. तिचे टायमिंग असे होते की सक्तमजूरीच्या वेळेस ती कारागृहावरील आकाशातून जायची. अगदी नीट पाहिले तर खिडक्यांमधून माणसेही दिसतात असे त्याच्या लक्षात आले होते. त्या स्वतंत्रपक्ष्याच्या उड्डाणाचे कुतुहल म्हणून सर्वच्या सर्व कैदी हात उंचावून ओरडाआरडा करायचे आणि हसायचे. अशी फ्लाईट संध्याकाळी खेळायच्या वेळेस वगैरे जायची नाही. पण सक्तमजूरीच्या वेळेस मात्र जायचीच जायची!

कैद्यांचा तो प्रचंड आवाज आकाशला फार फार महत्वाचा वाटला.

आणि नेमकी ती फ्लाईट आत्ता जात होती. हिचे टायमिंग कसे समजणार? 'साहेब वाजले किती' हा प्रश्न हवालदाराला विचारण्यामागे एकच उद्देश असू शकायचा. भूक लागली आहे किंवा तहान लागली आहे. आणि आत्ता एकच हवालदार डंपर्स रिकामे करून घेत होता. बाकीचे ड्रायव्हरला आणि नसीमला नवलेकडे घेऊन गेलेले होते. ते डंपर्स तपासणार्‍या हवालदाराला टाईम विचारण्यात अर्थच नव्हता कारण तो आधीच भडकलेला होता.

आकाशने एक, दोन ,तीन असे आकडे मोजायला सुरुवात केली. साधारण एक आकडा एका सेकंदाला अशा रेटने!

मधे कुणी काही विचारले तर तो अबोल राहात होता.

आणि मोजून १९२१ आकडे मोजून झाले तेव्हा... लंचटाईमची घंटा वाजली...

साधारण बत्तीस मिनिटे लंचच्या आधी... ती फ्लाईट जाते... म्हणजे साधारण साडेबाराला जात असावी...

म्हणजेच... दहा वाजता सक्तमजूरीचे काम सुरू झाले की अडीच तासाने ही फ्लाईट जात असणार.... आणि... जवळपास त्याच वेळेला डंपर्सही भरून होतायत... कैद्यांचा हा आरडाओरडा तर डंपर्सचे ड्रायव्हर्स आणि हवालदारही पाहतात... तीच वेळ आहे... मातीत घुसण्याची... अर्थात... मातीचे चेकिंग आजपासून सुरू झाले तर मात्र.... 'मातीत मिळण्याची'!

मागे बाबू येऊन उभा राहिला आहे हेही आकाशला समजलेले नव्हते.

वाघ आणि मुल्ला बरॅकपाशी होते आणि त्यांच्यापासूनच काही अंतरावर आकाश! आणि आत्ता बाबू आकाशच्या पाठीमागे येऊन उभा होता.

बाबूच्या हाकेने प्रचंड दचकला आकाश!

"क्या??"

"वाघ च्युत्या है"

"वो तो हैही..."

"अब सब डंपर्स चेक करने लगजायेंगे..."

"हां... सिर्फ आधा मिनिट ऐसा होगा चेकिंग रुकजायेगा..."

"क्या??? .. कब???"

"जब वो हवाईजहाज जाता है..."

चक्रावून बाबू या हुषार माणसाकडे पाहात होता...

"लेकिन.. गेटपे तो करेंगेही ना चेक.."

"वो तो अगर करते होंगे तो वैसे भी करेंगे... और अगर नही करते होंगे तो तबभी नही करेंगे..."

"वो तो मिनीही बतापायेगी..."

तेवढ्यात वाघ तिथे आला.

"नसीमपे और एक केस होगया... अब जल्दही फासी देंगे उसको..."

गांभीर्य सगळ्यांच्याच मनांना व्यापून उरले.

"फिर... मरेगा कौन?????"

आकाशचा तो प्रश्न तर आणखीनच गंभीर करून गेला सगळ्यांना!

तेवढ्यातच कुणीतरी बाबूला हाक मारली.

"तेरी दुल्हन तेरे लिये खास खाना भेजी है.. ले बेटा.. खा ले... मुहोब्बत तो बहुत है उसे तुझे.. अं??"

एका हवालदाराने मिनीने बाबूसाठी पाठवलेला डबा बाबूच्या हातात दिला. ही सोय इतर कुठल्याही कैद्याला नव्हती. मिनी नवलेला खुष करत असल्यामुळेच ती हे करू शकत होती. आणि चौघांनाही आश्चर्य वाटले.

काल रात्रीच इतके भीषण प्रकार होऊनही मिनीने हे धाडस केलेच कसे? आणि डबा इथपर्यंत येऊ दिला कसा नवलेने??

अर्थातच, डब्याचे पूर्ण चेकिंग झालेले असणार होतेच! त्यामुळे जे पदार्थ आहेत ते खाणे इतकाच डब्याचा उद्देश असणार हे चौघांनाही माहीत होते.

बरॅकमध्ये आल्यावर डबा उघडला बाबूने! चौघांनीही निरखून पाहिले. काहीही नाही! अर्थात, काही नसणारच होते म्हणा!

पुर्‍या आणि बटाट्याची भाजी!

ती खुशबु घेऊन चवताळल्यासारखे सगळे तुटून पडले डब्यावर! हातातच पुरी भाजी घेऊन खाऊ लागले. जेवण झालेले असूनही! आकाश सोडून! कारण त्याला येऊन तीन चारच दिवस झालेले असल्यामुळे त्याला अजून तितके अप्रूप नव्हते. एकेक घास सावकाश खात तो डबा हातात घेऊन निरखत होता.

आणि......

.... ताडकन उभा राहिला आकाश...

"क्या बे???"

तो असा डब्याकडे का बघतोय ते बाबूला समजेना!

डब्यावर प्रेम स्टील सेन्टर, ओल्ड मॉस्क रोड, खडकी, पुना असे लिहिलेला एक स्टीकर होता. आणि अगदी दिसणार नाही अशा पद्धतीने...

मॉस्क या शब्दातील एम आणि क्यू या अक्षरांखाली पेनाने काढलेले ठिपके होते...

हे उगाचच कोण करेल? डबा हातात असताना पेन कुणी कशाला हातात घेईल?? आणि ठिपके तरी कशाला काढेल डब्यावर! एम आणि क्यु म्हणजे काय?

नक्कीच! नक्कीच हेतूपुरस्पर हे ठिपके काढलेले आहेत.

चौघांनी दहा दहा वेळा ते ठिपके बघून आकाशची हुषारी शेवटी मान्य केली.

आणि त्या रात्री एम आणि क्यु वर दबक्या आवाजात प्रचंड चर्चा झाली.

नवलेचा संबंधच दिसत नव्हता यात! कारण एन हे अक्षरच नव्हते ठिपका मारलेले!

एम म्हणजे कोण?? क्यु म्हणजे कोण??

आठवतायत त्या सगळ्यांची नावे, आडनावे हे सगळे आठवून झाले. कुणाचे एम जुळतंय तर कुणाचे क्यु तर कुणाचे काहीच नाही. आणि ज्यांचे काही जुळतंय त्यांच्याशी मिनीचा दुरान्वयानेही संबंध येणे / आलेला असणे शक्य नाही.

मग एम क्यु म्हणजे काय??

आणि उगाचच त्या अक्षरांपासून सुरू होणारे इन्ग्लीश, हिंदी आणि मराठी शब्द आकाश आठवायला लागला. इन्ग्लीशची जबाबदारी त्याने घेतली, हिंदीची मुल्लाने आणि मराठीची वाघ आणि बाबूने!

आणि जांभयांची संख्या पाचशेवर गेली असेल... डोळे आता उघडणे अशक्य झाले असेल... तेव्हा अचानक मुल्ला म्हणाला..

"क्यु मतलब... क्वार्टर तो नही होगा?? नवलेका??? वो वहा आती रहती है ना???"

खाडकन झोप गेलेले तीन चेहरे मुल्लाला न्याहाळत असतानाच वाघ म्हणाला...

"क्वार्टरमे.... या क्वार्टरके आसपास कहीं.......??????? "

चक्रावलेल्या बाबूने विचारले...

"क्या????"

अंधाराकडे बघत वाघ पुटपुटल्यासारखा उद्गारला.

".... कोई... मोबाईल फोन तो नही फेका होगा उसने???????"

गुलमोहर: 

फारच छान चालली आहे. फार दिवसांनी यायला भेटले माबोवर, हा वीकांत छान जाणार घर आणि द वर्ल्ड ऑफ डिफरन्स मध्ये...

मस्तच...
बाबुला दाद.... त्याने खर सांगितले अस्ते तर कल्पना करवत नाहि अशि मारहाण झालि अस्ति.
पण वाघ् ला काय गरज होति डंपर मध्ये जायचि? कि तो ट्रायल करत होता?
आकाश अजुनहि तेच धाडस करणार हे वाचुन त्याचा कोण अभिमान वाटला... कारण कधिहि जेले हा प्रकार माहित नसलेला, आणि जेल मध्ये आल्यावर ईतके प्रसंग गुदरल्यावरहि प्लॅन पुर्ण करायचाच हे म्हणजे ग्रेटच....