घर - १३

Submitted by बेफ़िकीर on 11 February, 2011 - 03:16

गौरीला विलक्षण आनंद झाला होता.

सकाळी कुमारदादा आल्यापासूनच तिला समजले होते की आज आपल्या या नवीन घरात सगळे येणार! आईबाबांची समजूत घालायला!

आणि तिने कुमारदादाच्या हातात चहा ठेवून ताबडतोब गगनला घेऊन डेक्कन कॉर्नरकडे धाव घेतली. तीन भाज्या विकत घेऊन आणि वसंताच सांभाळत असलेल्या डेक्कनवरील चितळ्यांच्या शाखेतून श्रीखंड घेऊन ती लगबगीत घरी आली.

गगनने तुफान वेगाने हालचालींना सुरुवात केली आणि गौरीने जमेल तितक्या पटापटा स्वैपाक सुरू केला. वसंताशी दादा बोलत होता. आई आणि बाबा तिथेच बसलेले असले तरीही ते एक शब्दही बोलत नव्हते.

आणि अर्ध्याच तासात अण्णा आला. रविवार होता. चितळ्यांचे दुकान चालूच असले तरीही वसंताला सुट्टी होती. आणि सगळेच आज जमणार हे निश्चीत झालेले होते.

थोड्याच वेळाने राजूबरोबर तिघी वहिन्याही आल्या. बिगुल घरीच थांबला होता उमेशदादा आणि वेदाताईबरोबर! उमेश आणि वेदाला मात्र कसेसेच वाटत होते आजी आजोबा निघून गेल्यापासून!

आणि आज सगळ्यांना गौरीने आपल्या हातच्या जेवणाने आणि टापटिपीने इतके खुष केले की भांडणाचा मूळ मुद्दाच बाजूला राहिला.

मात्र शेवटी बाबांनी सगळ्यांना सांगीतले.

"हे बघा.... जे झाले ते काही वाईट आहे असे मुळीच समजू नका.. आम्ही आई वडीलच आहोत.. मुलाकडेच राहतोय.. वसंताकडे राहतोय म्हणजे तुमच्यावर रागावलो आहोत असे मुळीच नाही.. सगळे इथे येत जात जा... आम्हीही सगळ्यांकडे येऊ.. पण आता आपलं सदाशिव पेठेतलं घर तर जाणार आहे.. तेव्हा तिथे जास्त काळ राहणे शक्य होणार नाहीच आहे.. त्यामुळे काहि दिवस इथे राहू... काही दिवसांनी कुमारकडे जाऊ.. कधी शरदकडे राहू... प्रवास झेपला तर कानपूरलाही जाऊन येऊ... हे जे काही झालेले आहे ते आपले मुख्य घर रस्तारुंदीत जाणार म्हणून झालेले आहे... ते काही वाद घातल्यामुळे किंवा भांडणांमुळे झालेले नाही.. मी तुम्हा सगळ्यांना आज एक गोष्ट सांगतो... आपण सर्वांनी एकत्र राहावे हा आमच्या दोघांचा कायमच आग्रह होता... पण एक गोष्ट हीसुद्धा महत्वाची आहे की प्रत्येकाला स्वातंत्र्यही हवेच.. प्रत्येकाला आपापला संसार करावासा वाटणारच.. तेव्हा एक लक्षात घ्या... की आपण सर्वांनी असेच स्वतःला समजवायचे आहे की आपण भांडून वेगळे झालेलो नाही आहोत.. आपले घर रस्त्यात जाणार म्हणून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जागा घ्यायला लागल्या इतकेच..तेव्हा आता सगळ्यांनी पुर्वीप्रमाणेच हासत खेळत राहा, येथे येत जा, आम्हालाही घेऊन जात जा आपल्याकडे आणि प्रेमाने आणि एकोप्यानेच राहा.. "

हळूहळू बाबांचे म्हणणे हे अगतिकतेतून नसून सच्चे आहे हे पटू लागले. तस मात्र हळूहळू सगळ्यांचेच चेहर उजळू लागले. आपापला संसारही करता येणार आणि सर्वांचे संबंधही व्यवस्थित राहणार आणि आधारही मिळणार!

याहून अधिक काय पाहिजे माणसाला?

खरे तर सगळे जण आई बाबांची माफी मागून त्यांना मुख्य घरी घेऊन जायला आलेले होते. त्यात वसंतालाही समजावून सांगण्याचा हेतू होताच! वसंता भडक माथ्याने काहीतरी बोलेल याचा अंदाज असल्यामुळे गौरीने जरूरीपेक्षाही अधिक प्रेमाने पाहुणचार केला होता. गगनची बडबड ऐकून अधेमधे हसूही येत होते. दिडच खोली होती ती! आधी गगन बाहेरच्या खोलीत झोपायचा. वसंता आणि गौरी आत! पण आता आई बाबांना येऊन दोन दिवस झालेले होते. आई बाबा आता बाहेरच्या खोलीत झोपायचे. गगन बाहेरच्या ओसरीवर झोपायचा. तो आरामात होता. त्याचे वडील काही वेळा येऊन त्याला पाहून गेलेले होते. त्यांच्या दृष्टीने गगन आता चांगल्या घरात गेला होता. त्या लोकांना त्याचे काय करायचे असेल ते करूदेत असे त्यांना वाटू लागले होते.

दुपारचा चहा घेऊन सगळे निघून गेले.

आई आल्यापासून गौरी सतत आईंच्या समोर राहायची. त्यांच्या पायाला मलम लावून देणे, शेक देणे, त्यांना हवे ते पदार्थ करून देणे!

प्रकार वेगळाच घडू लागला होता. ज्या गौरीला आई बाबा अपशकुनी म्हणायचे ती आता सून नव्हे तर मुलीप्रमाणे करू लागली होती. हे दोघे वेगळे राहू लागले म्हणून तिच्या आईची येजा वाढली असेही झालेले नव्हते. अक्का आठवड्यात एकदाच येऊन जायच्या. वसंताचे घर लहान असले तरी त्याचे आणि गौरीचे मन खूपच मोठे होते. आणि गौरीला 'वसंताने आपल्याला विचारातही न घेता आई बाबांना इथे आणण्याचा निर्णय घेतला' याबाबत काहीही वैषम्य नव्हते. उलट तिला चांगलेच वाटले होते ते!

यामुळे तिची प्रतिमा काहीशी सुधारेल हा स्वार्थही होताच, पण मुख्य म्हणजे भरल्या घरात आणि तेही स्वतःच्या असल्यासारखे वाटू लागले होते. याच कारणासाठी तिने गगनचा स्वीकार केलेला होता. पण आता गगनने येथेच राहावे की नाही हे तिला समजत नव्हते. पण काही काळातच गगनचा घरकामातील हातभार इतका वाढला की त्याच्याशिवाय तिचे पान हालेनासे झाले.

गगनच्या वडिलांना वसंता अजूनही सव्वाशे रुपये द्यायचा!गगनचे जेवणखाण आणि राहणे करून! पण आई बाबांना आणि घरातल्या इतरांना गगन खुपू लागला. ते गगनलाही जाणवू लागले तसा गगन काहीसा निराश झाला. पण एक दिवस त्याने गौरीचाचीला दादीचे पाय चेपताना पाहिले आणि विचारले..

"मै दबाऊ क्या पाव?"

आणि चारच दिवसात गगन त्याही दोघांच्या गळ्यातला ताईत बनला. आजोबा आता त्याला मराठी शिकवू लागले घरातच! बोलायला! मग हळूहळू अक्षर ओळख! शिक्षणात तो रसही घेत होता. पंधरा एक दिवसातच त्याला पेपरमधील अक्षरे निदान वाचता येऊ लागली. वाक्यांचा अर्थ कळत नसला तरी!

आईबाबांना येथे येऊन आता दोन महिने होत आले होते. या दोन महिन्यात ते कधी कुणाकडे गेलेही नाहीत. मात्र बाकीचे सगळे वारंवार त्यांना येऊन भेटायचे. कुमार आणि अण्णा तर रोजच एकदा भेटून जायचे. हळूहळू कुमार आणि अण्णाने वसंताला काही ना काही स्वरुपात मदतही करायला सुरुवात केली. घरात हे नाही, ते नाही, असे काही जाणवले की ते दोघे ती वस्तू आणून द्यायचे.

गगन आपल्या आई वडिलांनाही मदत करतो हे पाहून बाकीच्यांनाही आता त्याची गंमत वाटू लागली होती. अशा मुलांना प्रेम मिळाले की तेच खूप असते हे सत्य आहेच!

आणखीन एक चांगली गोष्ट ही झाली की चितळ्यांचे हे नवीन दुकान खूपच चालू लागले. त्या विभागातील नागरिकांची चांगलीच सोय झाली.

समांतररीत्या इतरही बाबी होतच होत्या. एक दिवस दादा शिफ्ट झाला कसबा पेठेत! नाही म्हंटले तरी वेदा आणि उमेश हमसाहमशी रडले. अण्णा तर बोलेनासाच झाला होता. आई बाबा जाऊन दादाकडे चार दिवस राहिले.

काहीच दिवसात अण्णाचाही फ्लॅट तयार झाला. वास्तूशांतीला गौरी आपल्याच घराची वास्तूशांत असल्याप्रमाणे राबली. अंजली वहिनींच्या हातात तारकाने सर्व नियंत्रण दिलेले होते.

आणि आणखीन महिन्याभरातच राजूचेही पत्र आले.

पुन्हा पुण्याला बदली! केवळ एकाच महिन्यात राजू आणि गीतावहिनी पुण्यात येणार होत्या. ते अर्थातच जुन्याच घरात काही दिवस राहणार होते. दुसरी जागा मिळेपर्यंत!

पण....

... पण याचवेळेस इतर दोन वाईट गोष्टीही घडत होत्या. आता आईंना चालणे शक्य राहिलेले नव्हते. त्या उभ्या राहिल्या तरी त्यांना आधार लागू लागला. वैद्यकीय प्रगती आजैतकी नसल्यामुळे काही समजायला मार्ग नव्हता की काय झालेले आहे. डॉक्टर नेहमीच्याच औषधांमध्ये काहीतरी बदल करत होते इतकेच!

आणि दुसरे म्हणजे...

... कॉर्पोरेशनची फायनल नोटीस आली..

... सहा दिवसांनी 'घर' पाडायला लोक येणार!

त्या दिवशी सगळेच दु:खी झालेले होते. आता राजू आणि गीतावहिनीला अण्णाच्या फ्लॅटवर ठेवायचे ठरलेले होते. आणि घर पाडायच्या दिवशी सगळे जण घरासमोर जमा झाले.

घराची पूजा केली. मनोभावे नमस्कार केला. देवाचे आभार मानले की इतके मोठे, इतक्या मोठ्या मनाच्या माणसांचे घर आजवर आम्हाला मिळाले. अक्काही रडत होत्या. त्यांच्याही घराचा काही भाग जाणार होता. पण तो पटवर्धनांच्या घराइतका मोठा नव्हता. पण त्यांना एकटीला फार जागेची जरूरही नव्हती. त्यांचे घर मात्र पंधरा दिवसांनी पाडायला येणार होते.

हे घर अर्धवट पाडल्यानंतर एक चांगल्यापैकी भिंत बांधणे आवश्यक होते. सर्वांनी पैसे जमवलेलेही होते आणि एक मिस्त्रीही ठरवून ठेवलेला होता.

सकाळी दहा वाजता पहिली कुदळ पडली... एक ढलपा निघाला भिंतीचा... आणि...

... प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आले..

गेला तो जमाना..... ते युग संपले.. आता फक्त आठवणी... एक रस्ता रुंद होतो पाडुनी काही घरे... वेदना ती जात नाही बांधुनी काही घरे....

या घरात आपण तीनचाकी खेळण्यातील सायकल फिरवली... एकमेकांशी खेळलो.. कवड्या, पट, पत्ते, भेंड्या...

ती चिडवाचिडवी... रडणी.. हट्ट.. तक्रारी... चहाड्या.. मार.. हासणे.. कट्टी... बट्टी... अभ्यास... आनंद... सुट्या.. मे महिना.. दिवाळी.. नवरात्र.. पाऊस.. शाळेला जाणे.. आल्यावर खेळणे..

आणि आज??

आज प्रत्येकाचे संसार वेगळे... जागा वेगळ्या... आईला कर्करोग.. बाबांचे वय झालेले.. कुणासाठी काही करायचं तर आपली बायको पैशाचा प्रश्न काढेल की काय याची शंका...

... संपलं सगळं...

आई बाबांनी उभा केलेला संसार आज अशा पद्धतीने मोडला....

पाहवत नव्हतं ते दृष्य!

एकेका घावाबरोबर एकेक तुकडा उडत होता भिंतीचा.. सामान सगळं आधीच हालवेललं होत.. पण तरीही ते मोकळं सुनसान घर अजूनही आपलं घरच वाटत होतं..

पाहवेनासे झाले तसे सगळेच तिथून निघाले.. कुणाकडे कॅमेराही नव्हता जुन्या घराचा फोटो जतन करायला.. एका कॅमेरामनकडून आधीच फोटो काढून घेतलेले होते अण्णाने!

सगळे जण अण्णाच्या फ्लॅटवर निघून आल्यावर मात्र अंजली वहिनींनी निक्षून सांगीतलं बाबांना!

आता ताबडतोब तुम्ही आमच्याकडे शिफ्ट व्हा! वसंताभावजींचं घर लहान आहे. त्यांचा संसारही नवा आहे. आपल्या घरी भरपूर जागा आहे. आमची जबाबदारीही आहे.

हे सगळं प्रेमानेच चाललेलं होतं!

आणि खरच आई बाबा तयार झाले.

दोन दिवसांनी आई बाबा घरातून निघताना मात्र गौरीला रडू आले. तिला खूप थोपटले आईंनी! तिने जे केले होते त्याचे काही मोलच होऊ शकत नव्हते. आजवरच्या संस्कारांमध्ये कित्येक वर्षे काढणार्‍या थोरल्या सुनांनी ऐन वेळेस 'यांना आम्हीच का सांभाळायचे' हा मुद्दा काढावा आणि जिला अपशकुनी मानावे तिच्या लहानश्या घरात तिने आपले इतके आपुलकीने करावे ही बाब खरे तर आई बाबांना स्वतःलाही लाजिरवाणी वाटवणारी भासत होती.

पुन्हा एकदा घरात फक्त वसंता आणि गौरी! गगन होताच, पण त्याचा प्रश्न वेगळा होता.

आणि .....

.... आज सकाळी भाऊकाका या थोर महात्म्याचे आगमन झाले... डायरेक्ट वसंताकडेच!

============================================

भाऊ - तूच ती समोरची चिमुरडी ना??.. वसंताशी लग्न केलंस ती??

गौरी - अं??.. हो... बसा ना भाऊ काका... तुम्ही कसे काय आलात??

भाऊ - मोठ्या माणसांना नमस्कार करायचे संस्कार झाले नाहीत वाटतं तुझ्यावर??

गौरीने लगबगीने नमस्कार केला आणि चहा ठेवला.

भाऊ - गेला कुठे दिवटा??

गौरी - भाजी आणायला गेलाय..

भाऊ - नवर्‍याला अरे जारे करतेस वाटतं??

गौरी - नाही नाही.. चुकून बोलून गेले.. येतील आत्ता लगेच... पण तुम्ही कसे आलात एकदम??

भाऊ - एकदम?? एकदम कसला? मी काय हस्तनक्षत्रातला पाऊस आहे? पत्रं पाठवलवतं..

गौरी - घरच गेलं ना आपलं..

भाऊ - आपलं? आपलं नाही.. माझं.. राम एवढासा होता तेव्हा मी त्या घरात राहायचो.. आणि नालायकांनो.. घर पाडणार हे मला कळवायची अक्कल नाही कुणालाही??

गौरी - मला वाटलं बाबांनी कळवलं असेल..

भाऊ - आहे कुठे तो आता?

गौरी - दादांकडे राहतात...

भाऊ - म्हणजे वेगळे झालात तर सगळे..

गौरी - हो पण.. तुम्हाला आमचं घर कसं मिळालं??

भाऊ - आमचं?? तुला बोलायच्या ट्युशनला घातली पाहिजेल..

गौरी - आपलं आपलं.. हे घर कसं काय शोधलंत??

भाऊ - जुन्या घरी गेलो तर सगळं सपाट.. दोन खोल्या कशाबशा राहिलेल्या... त्याही रिकाम्याच.. ती तुझी आई बाहेर गेलेली.. मग एक जण म्हणाला चितळ्यांच्या दुकानात जा.. त्यांचा मुलगा भेटेल.. तिथे गेलो तर ह्याला दुसर्‍या दुकानात ठेवलं असं कळलं.. त्या दुकानात गेलो तर घर इथे आहे समजलं... शरद कुठे असतो मग?

गौरी - त्यांना मेहेंदळे गॅरेजपाशी फ्लॅट मिळाला...

भाऊ - आणि तिसरा??

गौरी - ते आता येतायत इथे.. बदली करून...

भाऊ - मग तो कुठे राहणार?

गौरी - आधी अण्णाभावजींकडे... मग वेगळी जागा घेतील..

भाऊ - हा कोण दिवटाय???

गगन आत्तापर्यंत नुसताच या नवीन म्हातार्‍याकडे टकमक बघत होता. हा आजवर एकदाही न दिसलेला माणूस इतका खाडखाड कसा काय बोलतोय त्याला समजेना!

गौरी - हा गगन म्हणून आहे.. सांभाळलाय आम्ही.. काम वगैरे करतो..

भाऊ - कुणाचाय हा?

गौरी - एक नेपाळी आहे.. त्याचा मुलगाय..

भाऊ - स्वतःच्या सख्ख्यांना सोडायचं आणि नेपाळहून पोरं आणायची सांभाळायला.. काय दिवस आलेत..

गौरी - चहा घ्या...

भाऊ - मी कोण आहे हे तुला माहितीय का??

गौरी - म्हणजे काय भाऊ काका? लहानपणापासून बघत नाही का मी तुम्हाला??

भाऊ - तुझ्या सासर्‍याचा थोरला चुलत भाऊ आहे.. नुसता चहा देतेस??

गौरी - नाही नाही... आत्ता होईल स्वयंपाक.. तोवर चहा घ्या..

भाऊ - काय रे? शाळेत जातोस का??

गौरी - तो हिंदी बोलतो...

भाऊ - शाळेमे जाता है क्या??

गगन - ये जालिम दुनियाही एक स्कूल है मेरे लिये...

चहाचा घोट घशात अडकून सौम्य ठसका लागला भाऊकाकांना! डोळे वटारून ते गगनकडे पाहू लागले.

भाऊ - दुनिया स्कूल है?? वय क्या है तेरा??

गगन - वय? वय क्या होता है?

भाऊ - उमर उमर

गगन - चौदा साल... आपकी क्या है??

भाऊ - कुणाशी बोलतोयस??

गगन - ये क्या बोलरहे है चाची??

गौरी - गगन... वो दादाजी के बडे भाई है.. ठीकसे बात करो..

गगन - आपने कभी बतायाही नही के दादाजीके बडे भाईभी है...??

भाऊ - तुला रिपोर्ट करायचं की काय सगळ्यांनी? चल्ल... काम कर...

गगन - आखिर आपभी औरोंकी तरहा एक आम आदमीही निकले... जो गरीबोंका खूSSSन..

'खून'च्या पुढचे तो बोलू शकला नाही कारण गौरीचा एक सणसणीत फटका पाठीत बसला आणि बाहेर पळावे लागले.

भाऊ - ही कसली समस्या आणून ठेवलीयत घरात??

भाऊकाका तापून गौरीकडे पाहात होते.

गौरी - तो बावळट आहे.. लक्षच देऊ नका...

तेवढ्यात वसंता आला आणि त्याच्या मागून घाबरत घाबरत गगन!

भाऊ - नालायक?? घरं बदलता?? घर पाडलं तरी या भाऊकाकाला कळवत नाही? एक पंधरा पैशांचं पोस्टकार्ड पाठवता येत नाही?? तुमची घरे नागपूरहून आलेल्या म्हातार्‍या माणसाने शोधत बसायची? नोकर्‍या बदलता?? आई बापांना एका मुलाकडे ठेवता?? वाट्टेले तिथे राहता? आणि हा कोण उपद्व्यापी उद्धट कार्टा आणलायस उचलून नेपाळ्याचा?? याला आधी फटके लाव दहा...

गगन हादरलेला होता. चाचाला असे फाडून खाणारे कुणी त्याने पाहिलेले नव्हते.

वसंताने आधी नमस्कार केला.

वसंता - कधी आलात? घर कसं मिळालं?

सगळे पुन्हा सांगीतले भाऊ काकांनी!

मग घर पाडल्याचे दु:ख व्यक्त झाले पुन्हा एकदा! वसंताच्या आईला कॅन्सर झाल्याचे मात्र त्यांना माहीत होते. त्याही गोष्टीचे दु:ख व्यक्त झाले. तोवर वसंताने आणलेल्या भाजीपैकी सर्वच भाज्या करायचे गौरीने ठरवले. तेव्हा मात्र भाजी चिरतानाचा आणि इतर मदत करतानाचा गगनचा सुपरफास्ट आविर्भाव पाहून भाऊकाकांनाही आश्चर्य वाटले.

अत्यंत चविष्ट जेवणाची नाही म्हंटले तरी तारीफ करावीच लागली त्यांना! हरभर्‍याची झणझणीत उसळ, लाल माठाची 'टक्क' करायला लावणारी भाजी, टोमॅटो बटाट्याची सुकी भाजी, एक भाजलेलं वांगं, काकडीची कोशिंबीर, उरलेल्या दुधाची खीर आणि आधीच कधीतरी करून ठेवलेलं मिरच्यांचं लोणचं! सोबतीला तव्यावरच्या गरमागरम पोळ्या आणि भात!

हळूहळू एकेका घासाबरोबर भाऊ काकांचा चेहरा बदलू लागला. ते वसंता आणि गौरीला जाणवू लागले. या नव्या सुनेवर सणसणीत टीका करण्याची संधी भाऊंच्या हातून जात होती. कारण प्रत्येक पदार्थ खाल्ला की असे वाटत होते की दुसरा पदार्थ खाऊच नये, नाहीतर या पदार्थाची चव जाईल!

त्या म्हातार्‍याने आठ पोळ्या खाल्ल्या आठ!

"जेवण बरं करतेस तशी" इतकी घसघशीत कॉम्प्लिमेन्ट तर आजवर वसंताच्या आईलाही मिळालेली नव्हती. वामकुक्षीच्या वेळेस वसंताने गगनलाअ पिटाळून आधी पाने आणायला लावली. पान चघळत चघळत भाऊ काका सुस्तावून डोळे मिटू लागले तसा गगन पुन्हा बाहेर धावला. कुमारदादा आणि अण्णाला कळवायला! 'भाऊकाका आलेत'!

आणि निरोप तरी कसा सांगावा त्याने कुमारदादाला? दार दादानेच उघडले तर दारात गगन उभा! आतमध्ये आजोबा पेपर वाचतायत पलंगावर पडून! आणि गगनने सांगीतले..

"इनके बडे भाई अचानक आगये... आप लोगोंको शाममे बुलाया है चाचाने उनसे मिलनेके लिये..."

दादाने एक थप्पड लगावली आणि पाठोपाठ त्याला घरात असलेले गुलाबजामही खायला दिले.

अर्थातच, संध्याकाळपर्यंत कुणी थांबणारच नव्हते. कुमार पहिला वसंताकडे धावला आणि तिघांनाही घेऊन आपल्या घरी आला. सरळ होते. वसंताकडे भाऊकाकांना ठेवण्यापेक्षा इकडे आईबाबांबरोबर ठेवणे केव्हाही बरे! आणि मुख्य म्हणजे आई वसंताकडे जाणे हा अवघड प्रकार झाला असता.

आणि संध्याकाळी सगळेच तिथे जमले.

फारच धमाल चाललेली होती. अंजली वहिनींनी अगदी मनापासून सगळा स्वैपाक केलेला दिसत होता. वेदा आणि उमेश तर केव्हाच एका खोलीत गप्पा मारायला निघून गेले होते. तारका आणि गौरी अंजली वहिनींना सगळी मदत करत होत्या. बाहेर भाऊकाका सगळ्यांची फिरकी घेत होते. आधीचे घर पडण्याचे आणि आईंना कर्करोग असण्याचे गांभीर्य हळूहळू विरत चाललेले होते. याचे कारण हे होते की डायग्नोसिसच्या विविध पद्धती अस्तित्वातच नसल्यामुळे आईंचा कर्करोग कितपत बळावला आहे की कमी होत आहे हे नीटसे माहीतच नव्हते.

काही असले तरी कुमारचे घर खूप सुंदर होते. आणि मुख्य म्हणजे चार खोल्या होत्या. मागच्या बाजूला एक छोटे अंगण होते आणि त्यात काही रोपटीही लावलेली होती. भाड्याचेच घर होते, पण चांगलेच मोठे होते. यावरूनच दुकान मस्त चाललेले असणार हे सहज समजत होते. घरातील वस्तूही सुरेख होत्या. घर सजवलेलेही छान होते. प्रत्येक जण घराचे आणि सजावटीचे कौतुकही करत होता. चक्क भाऊकाकाही म्हणाले...

"बरं लावलंयस घर..."

आज गगनला मात्र तिथे प्रवेश नव्हता. तो घरीच राहिलेला होता. उगाच भाऊकाका भडकायला नकोत!

जेवणे झाल्यानंतर उमेशने बागेतला दिवा लावला. वेदाला तो एक नवीन रोप दाखवायला घेऊन मागे निघून गेला. आवराआवरी चाललेलीच होती. गौरी तेवढ्यात बाथरूमला गेली.

उमेश आणि वेदा तेव्हा नेमके बाथरूमच्या मागे आलेले होते. बाथरूमच्या खिडकीसमोरच उभे होते नवीन रोप पाहात!

अचानक त्या रोपाच्या आजूबाजूला काही गोष्टी पडल्या. दचकून दोघांनी वर पाहिले तर एक बायकी हात खिडकीतून आत जात होता. तो हात गौरीकाकूचा आहे हे वेदाने ओळखले कारण गौरीकाकू घालत असलेले घड्याळ तिला व्यवस्थित माहीत होते.

'असेल काहीतरी' असे मानून आणि थोडेसेच आश्चर्य व्यक्त करून वेदा आणि उमेश दहा एक मिनिटांनी परत घरात आले बाग बघून झाल्यावर!

आणि वेदाने विचारले..

... तो प्रश्न ऐकून सगळ्यांचेच चेहरे गंभीर झाले.... इन फॅक्ट... काहीसे हिंस्त्रच झाले.. फक्त... गौरीचा सोडून... तिचा चेहरा मात्र प्रचंड घाबरल्यासारखा झाला होता...

कारण वेदाने सगळ्यांसमोर विचारले...

"गौरी काकू.. तू मगाशी बाथरूममधून बागेत लिंबू आणि मिरच्या का टाकल्यास?????"

=========================

( भागाचा क्रमांक संपादीत केलेला आहे. आभारी आहे)

गुलमोहर: 

झकास...

छान चाललिये.
घर पाडतानाचे क्षण मी ही अनुभवलेत. ज्या वाड्यात लहानाचे मोठे झालो, लुटुपुटुचे, भातुकलीचे खेळ खेळलो त्या वाड्याला स्वतःच्या डोळ्यांनी जमीनदोस्त होऊन तिथे टोलेजंग इमारत होताना काय दु:ख होत हे फक्त आणि फक्त डोळ्यातुन झरझरणार्‍या पाण्यालाच माहित.

मस्तच! जुने "घर"पाडणे म्हणजे काय? यातुन मि ही गेले आहे. तेंव्हा माझ्यावर इतरांना समजाविण्याची जबाब्दारी होती, पण आज खरे दु:ख झाले.
कहाणी उत्तम चालली आहे, हे लिंबु-मिरचीचे काय आणले मधेच? घर-१४ टाका, अनिस वाले यायच्या आत!!!

सर्वांच आभार!

मुग्धानंद,

अनिस वाले म्हणजे काय?

हा भाग छान झाला....बिचारी गौरी पुन्हा संशयाच्या जाळ्यात????
आणि मला ही नाही दिसला घर-१३.....

कहाणी उत्तम चालली आहे, हे लिंबु-मिरचीचे काय आणले मधेच? घर-१४ टाका, अनिस वाले यायच्या आत!!!>>> मुग्धानंद, छान मार्ग आहे पुढचा भाग लवकर टाका सांगण्याचा Happy Happy

माझ्यामते, या हसत्या खेळत्या "गोजिरवाण्या" घराला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून तिने नजर काढली असेल>>> अनुमोदन!!! पण हे असं लपवून करायची काय गरज? उगाचचा ट्विस्ट वाटतोय हा.... Uhoh

मलाही हा भाग जरा छोटाच वाटला... छान लिहिला आहे पण... Happy

घर पाडण्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने मलाही काही आठवले... आमच्या बिल्डिंगशेजारी एक छानसे टुमदार घर होते. आजूबाजूचा परिसर मस्त मोकळा होता. तिथे खेळता, बागडता यायचे. एक गोड आज्जी आजोबा आणि त्यांची दोन मुले रहात. त्या कुटुंबाने ते घर पाडून तिथे मोठी बिल्डिंग उभारली. आता आमच्या बिल्डिंगमधून बाजूला पाहिले तर दुसरी बिल्डिंग... मोकळी हवा नाही, मोकळी जमीन नाही. ते गोड आज्जी आजोबा देवाघरी गेले, त्यांची मुलं आपापल्या कुटुंबासोबत बिल्डिंगमधल्या फ्लॅटमधे शिफ्ट झाली... सगळे बदलले आता... होत्याचं नव्हतं व्हायला एक क्षण पुरेसा असतो, नाही का? आम्हीही ते घर पडतांना पाहून असेच कळवळलो होतो... आमचे घर नव्हते, म्हणून काय झाले? आमच्या सुंदर आठवणी होत्या, त्याच्याशी जोडलेल्या... Sad

मस्तच... छान..
गौरी ने केलेल्ला स्वयंपाक आणि आदरातिथ्याने सगळे आनंदले हे वाचुन जरा कुठे हायसे वातत होते तित्क्यात हा ट्विस्ट.....
लवकर लवकर पुढचा भाग वाचलो आता.....